कटाक्ष -
मुळ कन्नड चित्रपट
नाट्य, थरारपट
वेळ - २ तास ३० मिनिटे
हिंदी परभाषीकरण (डबिंग)
ओळख -
नावातल्या 'ए लेजेंड' नुसार चित्रपटाची कथा एका आख्यायिकेवर बेतलेली आहे. कर्नाटकातील काही ग्रामीण लोकसंस्कृतींमध्ये आढळणाऱ्या 'भूता कोला' या परंपरेशी संबंधित ही आख्यायिका सांगून चित्रपटाची सुरुवात होते. चित्रपटात या परंपरेचा केवळ 'कोला' असा उल्लेख असून या कार्यक्रमाच्या उत्सव मुर्तीला 'देव' म्हणतात. हे देव गावातील कुणीही व्यक्ती असू शकते. एरवी सामान्य माणूस म्हणून जगणाऱ्या या व्यक्तीच्या शरीरात 'कोला'च्या वेळी वनदेव संचारतात अशी मान्यता असते. 'कांतारा'चा कन्नड अर्थ वनदेव असाच आहे. हे देवच आपले वर्षभर रक्षण करतात यावर गावकऱ्यांची श्रद्धा असते. आख्यायिका १८४७ पासून सुरू होऊन राजा आणि गावकऱ्यांमध्ये 'देवा'च्या साक्षीने एक करार होतो. राजघराण्यातील पुढील पिढ्या या कराराचे पालन करतात का? गावकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करणारा 'साहेब' आणि जंगलाचे रक्षण म्हणजे गावकऱ्यांचे उच्चाटन असे समजणारा 'वन अधिकारी' यांच्या भूमिका बदलतील का? चित्रपटाचा नायक शिवा (रिशब शेट्टी) आपल्या मनमौजी तंद्रीतून कधी बाहेर येईल? हे सगळे नाट्य घडत असताना त्या वर्षाचा 'कोला' पार पडेल का? 'कोला' झाला तर 'देव' काय आदेश देतील? या नागमोडी वळणांवरील नाट्यांच्या खजिन्याचा पेटारा म्हणजे 'कांतारा' हा चित्रपट.
शिल्लक -
चित्रपटाची शिल्लक दोन प्रकारची असते- एक प्रत्यक्ष पडद्यावर चित्रपट पाहताना त्या कालावधीत आपल्याला काय अनुभव आला तो आणि दुसरी चित्रपटातील आवडलेल्या गोष्टी जसे की पटकथा, अभिनय, छायाचित्रण वगैरे. कांतारा पाहणाऱ्या मोठ्या वर्गाचे यातील पहिल्या मुद्द्यावर एकमत होईल. कांतारा ही मोठ्या पडद्यावर अनुभवावी अशी एक सुंदर कलाकृती आहे. बहुतेक प्रसंग जंगलातील असून जंगल जसेच्या तसे पडद्यावर उभे करण्यात छायाचित्रण कमालीचे यशस्वी झाले आहे. कथेच्या सादरीकरणात कृत्रिम धागे जोडण्यापेक्षा दिग्दर्शकाने ग्रामसंस्कृती जशीच्या तशी पडद्यावर दाखवली आहे. कमी असल्या तरी प्रेक्षकाला खळखळून हसवतील अशा मोक्याच्या विनोदी जागा चपखल बसल्या आहेत. लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता या तीन जबाबदाऱ्यांचे शिवधनुष्य रिशब शेट्टी ने अत्यंत लिलया पेलले आहे. चित्रपटाच्या एका टप्प्यात रिषभ शेट्टीने जो अभिनय केलाय तो तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम अभिनयांपैकी एक असेल याची मला खात्री वाटते. समाजमाध्यमांवर बऱ्याच ठिकाणी 'कांतारा'ची तुलना 'तुम्बाड'शी केली आहे. परंतु कथेसहीत इतरही बाबतींत मला 'तुम्बाड' सरस वाटला. तरीही रद्दी बॉलिवूडपटांना कंटाळलेल्या चित्रपट प्रेमींसाठी 'कांतारा' चा मनोरंजन उतारा ही दिवाळी भेट आहे.
प्रतिक्रिया
30 Oct 2022 - 5:37 pm | यश राज
कांतारा बघण्याची प्रचंड उत्सुकता आहे.
अगदी +१
चित्रपटाच्या शेवटाबद्दल खूप ऐकले आहे . प्रसार माध्यमांमध्ये काही क्लिप्स पाहिल्या त्या बघून वरील वाक्याची खात्री पटते.
तसेच "वराह रुपम" गाणे खूप सुंदर जमले आहे. रिषभ शेट्टीने खूप मेहनत घेतली आहे व सर्व मेहनत सार्थकी लागली असे मला वाटते.
30 Oct 2022 - 5:37 pm | यश राज
कांतारा बघण्याची प्रचंड उत्सुकता आहे.
अगदी +१
चित्रपटाच्या शेवटाबद्दल खूप ऐकले आहे . प्रसार माध्यमांमध्ये काही क्लिप्स पाहिल्या त्या बघून वरील वाक्याची खात्री पटते.
तसेच "वराह रुपम" गाणे खूप सुंदर जमले आहे. रिषभ शेट्टीने खूप मेहनत घेतली आहे व सर्व मेहनत सार्थकी लागली असे मला वाटते.
30 Oct 2022 - 9:12 pm | अनुस्वार
'वराह रूपम' हे गीत आणि चित्रपटाचे पार्श्वसंगीत अव्वल दर्जाचे आहे. 'कोला' नृत्यातील एक विशिष्ट मर्मभेदी आवाज तर चित्रपट संपला तरी कानात घुमत राहतो.
31 Oct 2022 - 9:14 pm | वामन देशमुख
तेलुगू कंतारा नक्की पाहीन.
31 Oct 2022 - 9:23 pm | अनुस्वार
आपल्याला आवड असल्यास मुळ भाषेत पाहणे कधीही उत्तम. आणि तसंही कांताराचं हिंदी डबींग जरा घाईत उरकलंय असं वाटलं. डबींग चा दर्जा आणखी चांगला हवा होता.
31 Oct 2022 - 11:27 pm | गणेशा
कांतारा अतिशय सुंदर चित्रपट आहे, मास्टरपीस असे म्हणता येणार नाही परंतु एक उत्क्रुष्ट कलाकृती म्हणुन या सिनेमा कडे पाहता येईल..
आलेगाव (शिरूर) ला यात्रेला देव -दानव असे कोला type युद्ध दरवर्षी पाहतो.. त्यामुळे हा सिनेमा जास्तच जवळचा वाटला..
ऋषभ शेट्टी भारीच...
1 Nov 2022 - 10:38 am | श्वेता व्यास
चित्रपट पाहण्याच्या यादीत आहे. तुंबाड खूप आवडला होता, हाही आवडेल कदाचित.
1 Nov 2022 - 10:57 am | Bhakti
फक्त क्लायमॅक्स पाहण्यासाठी थेअटरला जावं का हा प्रश्न आहे.सिनेमा ओव्हर रेटेड आहे असेही वाचलं.त्यामुळे OTT वर पाहणार आहे.अगदी ..तुम्बाड कधीही सरस असणारं.त्यात अनेक भावनांच मिश्रण आहे.
1 Nov 2022 - 12:53 pm | पॉल पॉट
ज्याने हा सिनेमा थेटरात मीस केला समजून घ्यावं त्याने आपलं खूप मोठं नूकसान करून घेतलं.
1 Nov 2022 - 1:12 pm | अनुस्वार
बाकी चित्रपटही सुंदरच आहे. लक्षात राहण्यासारखा अनुभव येईल. फक्त तुम्बाड सारखं काहीतरी पाहायला मिळेल या अपेक्षेने गेलात तर हिरमोड होईल.
2 Nov 2022 - 11:20 am | श्वेता२४
बहुदा मी फारच अपेक्षेने गेले होते. पण मला अजुनही कळत नाहीय हा सिनेमा मला तितकासा का आवडला नाही. या चित्रपटाची आणि तुम्बाडची तुलनाच होऊ शकत नाही. पूर्णपणे वेगळ्या कथा , विषय व मांडणी आहे. या सिनेमातून नेमका काय संदेश द्यायचा आहे हे समजलं नाही. अंगात देव येणं हे खरं आहे व काही ्मानवीय/दैवी प्रसंग खरे असतात असंच या सिनेमातून दिसतंय. खरंतंर हा श्रद्धेचा विषय होऊ शकतो. त्यामुळे तितकासा भिडला नाही. हो. पण ही फॅन्टसी आहे असं समजून मी या सिनेमाकडे आता पाहते तेव्हा आता या सिनेमाच्या काही ठळक गोष्टी जाणवतात. जसं की आदिवासींचे निसर्गाशी असलेले नाते त्यावरचे त्यांचे अवलंबित्व. शिवा त्या इन्सपेक्टरला म्हणतो की या जंगलात माझ्या आधिच्या कित्येक पिढ्या तुमचे सरकार अस्तित्वात असण्यापूर्वीपासून राहतात. तुमच्या सरकारने त्यांची परवानगी घेतली होती का? हा संवाद खाडकन डोळे उघडणारा आहे. आधी जय भीम व आता कंतारा यामुळे आदिवासींचे निसर्गाशी जोडले गेलेले जीवन अजून समजून आले एवढे नक्की. त्यानुसार हा सिनेमा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. नायकाचा व इतर सर्व पात्रांचा अभिनय उत्कृष्ट व नैसर्गिक. क्लायमॅक्स मस्तच.
2 Nov 2022 - 12:27 pm | अनुस्वार
सध्या सार्वजनिक जीवनात कोणतीही गोष्ट चर्चेत असली की प्रत्येकाला शक्य तितक्या प्रकारे त्यावर टिप्पणी करायचीच असते (बऱ्याचदा निव्वळ मनाच्या थापा). मग अशाने कितीही टाळले तरी या गोष्टींबद्दल चक्क आपलीही काही मतं/अपेक्षा तयार होतात. तुम्बाड ची अपेक्षा ठेवून गेले आणि कांतारा निदान त्या दिवसापुरता तरी अगदीच सामान्य चित्रपट वाटला असा अनुभव माझ्या काही मित्रांनी घेतल्याने मी सावध होतो. म्हणून मुळ लेखात मी एक चित्रपट म्हणून कांतारा छान अनुभव आहे एवढंच नमुद केलंय. याच सामाजिक दबावामुळे [ FOMO (fear of missing out) ] मी KGF Chapter 2 चित्रपटगृहात पाहायला गेलो आणि PVR मधील आयुष्यातली पहिली झोप पूर्ण करून आलो.