हाडाचा सापळा (गूढकथा)

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
24 Sep 2022 - 10:15 pm

हाडाचा सापळा (गूढकथा)

काही घटना एकदम अनपेक्षितपणे घडतात.
पण खरोखर त्या अनपेक्षित असतात का? की त्या विधिलिखित असतात. आगोदरच त्या निश्चित झालेल्या असतात. तुम्ही केवळ त्या घटनांचे एक वाहक असता. किंवा मग नाममात्र साक्षीदार असता. कदाचित तसेही असू शकेल.
     मी हे असे का म्हणतोय, त्यालाही कारण आहे. एक तार्किक स्पष्टीकरण आहे. ते स्पष्टीकरण समजून घेण्याईतपत मी समंजस नसेलही, पण त्या स्पष्टीकरणाच्या जाणिवा मात्र मला तीव्रपणे जाणवायच्या. त्या माझ्या अगदी अंगावर यायच्या. हे जे काही सगळे घडले, ते माझ्याच सोबत का घडले, याचे भले माझ्याजवळ उत्तर नाही. पण ते माझ्यासोबत घडले होते. आणि मी त्या घटनेतला एक दुवा ठरत गेलो होतो. खरेतर माझ्यासारख्या पंधरा- सोळा वर्षांच्या मुलासोबत हे होणे योग्य नव्हते. पण आता सगळे घडून गेलेले होते. आता कोणत्याही गोष्टी बदलणाऱ्या नव्हत्या. त्या सगळ्या घडून गेलेल्या होत्या.
           मी तो समोरचा सापळा पुन्हा पुन्हा बघत होतो. तरीही माझे समाधान होत नव्हते. माझ्या पंधरा- सोळा वर्षांच्या बालमनाला तो सापळा कमालीचा आकर्षक वाटत होता. प्रथम तर त्याची भीतीही वाटली. पण वर्गात आपण एकटे थोडीच आहोत? सगळी मुले आहेत, विज्ञानाचे सरही आहेत, या जाणिवेने भीती एकदम लोप पावली. फळ्याच्या अगदी समोर सरांनी तो सापळा लटकवला होता. आणि त्याच्या प्रत्येक अवयवाची माहिती ते सांगत होते. ते काय सांगत आहेत, त्याकडे माझे अजिबात लक्ष नव्हते. मी तो सापळा पाहण्यात हरवून गेलो होतो.
           साधारणतः एखाद्या प्रौढ वयाच्या माणसाचा तो सापळा असावा. अगदी पाच - साडेपाच फुटाचा तरी हमखास असेल. आणि पुन्हा त्यात अगदी खराखुरा. कुठल्या सिमेंटचा किंवा चुन्याचा तो नक्कीच बनलेला नव्हता. कधीकाळी एखाद्या मृत माणसाच्या शरीरापासून तो मिळवलेला असावा. म्हणजे एखाद्या मृत माणसाच्या शरीरापासून तो अलग केलेला असावा, याच कल्पनेने मला शहारून आलेले होते.
             प्रथमच मी असा मानवी हाडांचा एकसंध सापळा बघत होतो. अगदी कवटी पासून ते तळ पायापर्यंत त्या सापळ्यात एक जिवंत जाणीव मला जाणवत होती. तो अलगद लटकवला असल्याने, हवेच्या झोतासोबत त्याची हालचाल होत होती. त्या हालचालीमुळे तो अजूनच गूढ वाटू लागला.त्याचे ते लांबलचक हात, कधीही वर होतील आणि आपल्या गळ्यापर्यंत येतील असेही एकदा मनात उमटून गेले. त्याची ती कवटी वाऱ्याने इकडे तिकडे हलायची, तेव्हा तर मनात भीतीचे अनेक तरंग उमटून जात होते.
             नवल, भीती, उत्सुकता अशा संमिश्र भावनांनी माझ्या मनात गर्दी केली होती. तडक असे उठावे आणि त्या सापळ्याला स्पर्श करावा, अशी प्रबळ इच्छा मनात आली होती. पण मी तसे करू शकत नव्हतो. एक तर त्या सापळ्याची भीती वाटत होती आणि दुसरे म्हणजे सगळ्या वर्गादेखत असे करणे म्हणजे, स्वतःचे हसे करून घेण्यासारखे होते.
           तो तास कसा निघून गेला हे कळालेच नाही. पण तासभर मी फक्त त्या सापळ्याकडेच बघत होतो. त्याच्यातच पूर्णपणे गुंतून गेलो होतो, हे मात्र खरे. वर्गात इतरही मुले होती, पण त्यांना त्या सापळ्या विषयी एवढी आकर्षकता वाटली असेल, असे मला वाटत नाही. पण माझी त्या सापळ्याप्रती जी आकर्षकता होती, ती नेमकी कशी होती, हेही सांगणे मला कठीण गेले असते. पण एक मात्र नक्की होते. मला तो सापळा मनापासून आवडला होता. त्याच्या विषयी मनात एक जिज्ञासा उत्पन्न झाली होती. एक आपलेपण मनात प्रकट झाले होते. जणू आमच्यात कुठल्यातरी आंतरिक पातळीवरची बांधिलकी निर्माण झाली असावी, म्हणून तर मी त्या सापळ्याभोवती  गुंतत चाललो होतो. कदाचित तो सापळा सजीव असता तर त्याला माझ्या या जाणिवांची जाणीव झालीही असती, पण या अशा निर्जीव सापळ्यावर माझ्या जाणिवांचा काय परिणाम होणार आहे?
तास संपला होता. सर तो सापळा घेऊन प्रयोगशाळेत निघूनही गेले होते. तरीही मी, तो सापळा लटकला होता त्या रिकाम्या जागेकडे बघतच होतो. आता माझे मलाच हसायला येऊ लागले. त्या हाडाच्या निर्जीव सापळ्यात कशाला आपण एवढे गुंतत आहोत, असे मनाला पटवून देऊन मी मनातले सगळे विचार बाजूला काढून टाकायचा प्रयत्न केला.
               मानवी मन कमालीचे गुंतागुंतीचे असते. एकदा एखादी गोष्ट मनात रुतून बसली, की ती सहजासहजी निघत नाही. मग तुम्ही कितीही ती गोष्ट मनातून काढायचा प्रयत्न केला, तरी ते जमत नाही. तास संपल्या पासून मी तो सापळा मनातून काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण तो काही केल्या निघत नव्हता. त्याच्या प्रतीची उत्सुकता काही केल्या कमी होत नव्हती. या अगोदर मला कधीच असे झाले नव्हते. मी अनेक वस्तू, गोष्टी पाहिल्या होत्या. पण मी कशात एवढा गुंतून गेलो नव्हतो. अनेक चमत्कारिक बाहूल्या पाहिल्या होत्या,  चित्रविचित्र पुतळे पाहिले होते, अनेक भय कथाही वाचलेल्या होत्या. पण भीतीच्या, नवलाईच्या ज्या संवेदना या सापळ्याने निर्माण केल्या होत्या,त्या बाकी कशानेच माझ्या मनात उत्पन्न झाल्या नव्हत्या.
कोणतीही गोष्ट सहजासहजी घडत नसते किंवा मग अनाहूतपणे घडत नसते. ही जी सापळ्या विषयी मला ओढ लागत होती, तीही कदाचित काही संयोगामुळेच लागत असेल. तिच्यात कुठला दैवयोग नसावा. पण आता मला एक गोष्ट जाणवत होती, त्या सापळ्याविषयी मी जास्त विचार करणे चांगले नव्हते. ते माझ्या हिताचे ही नव्हते. माझे अंतर्मन मला त्या सापळ्यापासून दूर राहण्याचा सल्ला देत होते. पण मी ते किती गंभीरपणाने घेईल, हे माझे मलाच माहीत नव्हते.
             दुपारचा प्रहर संपून गेला होता. उन्हे मागे गेले होते. काही वेळात शाळा सुटली असती. पोरांची घरी जाण्याची लगबग सुरू झाली होती. मीही घरी जाण्याची तयारी करू लागलो. पण एक उदासीनता अंगभर पसरून गेली होती. एरवी शाळा सुटायच्या वेळी किती उत्साही असतो मी! पण आज तो उत्साह कुठेच दिसत नव्हता. घरी जाण्याची इच्छाच होत नव्हती. येथेच वर्गात तसेच बसून राहावे, असे वाटू लागले. आपण एकट्याने घरी जायचे आणि त्या बिचाऱ्या सापळ्याने त्या प्रयोगशाळेत बंद रहायचे, हे योग्य आहे का? तो आपल्याला एवढा आवडला होता, मग त्याला पुन्हा भेटायला नको का?
             माझी मनस्थिती द्विधा होऊ लागली. मनात खलबते सुरू झाले होते. माझे स्वतःवरचे नियंत्रण ढासळू लागले होते. मी अनियंत्रित होत चाललो होतो. सायंकाळचे कवडसे वातावरणात शिरत होते. दिवस मावळतीकडे सरकत होता. कोणत्याही क्षणी आता शाळा सुटल्याची बेल झाली असती. माझे मन अजूनही द्विधा अवस्थेत हिंदोळे खात होते.
               अखेर शाळा सुटली होती. मी लगबगीने वर्गाबाहेर पडलो. मला माहित होते, प्रयोगशाळा बंद व्हायला काहीच अवधी होता. तेवढ्या अवधीत मला प्रयोगशाळेत पोहोचून, तो सापळा पाहून यायचे होते. मी कोणाच्याही नजरेत येणार नाही अशा तऱ्हेने प्रयोगशाळेत शिरलो. प्रयोगशाळेतला तो सापळा मला बघायचा होता.
           प्रयोगशाळेत अंधार जरा जास्तच जाणवत होता. प्रयोगशाळेत शिरताच एक थंड लहर अंगभर पसरली होती. तिथले वातावरण बाहेरच्या पेक्षा अतिशय थंड जाणवत होते. अवतीभोवती सगळा काचेचा, लाकडाचा, रसायनांचा पसारा पडलेला होता. कुठल्यातरी रसायनांचा दर्प गडदपणे नाकात शिरत होता. एवढे सगळे असले तरी सभोवताली एक शांतता पसरलेली होती. कुठलीच हालचाल माझ्या कानावर पडत नाव्हती. बाहेर एवढा गोंगाट असतो, तरीही त्याचा ध्वनी कानावर येऊ नये, याचे मला आश्चर्य वाटत होते. पण मला या बाकीच्या गोष्टींशी काहीही घेणे देणे नव्हते.मला तो सापळा केवळ बघायचा होता.
            मी पुढे  पुढे सरकत होतो. प्रयोगशाळेचे शेवटचे टोक बरेच दूर होते, हे मला माहीत होते. कदाचित तो सापळा ही मागच्या टोका जवळच्या रिकाम्या जागेत असावा. मी धीम्या गतीने पुढे सरकत होतो. आता काहीसा कोंदट वास येऊ लागला, वातावरण अजूनच गहिरे होऊ लागले.
              काय झाले काही कळलं नाही. पण अचानक सगळीकडे एकदम अंधार झाला. एखादा जळता दिवा बंद केल्यावर, क्षणभर डोळ्यांपुढे एकदम अंधार होतो तसे काहीसे झाले. पाठोपाठ दरवाजा लावून घेतल्याचा आवाज माझ्या कानावर आला. सर सर करत भीती माझ्या मेंदूत घुसली.  म्हणजे प्रयोगशाळेचा दरवाजा बंद झाला होता आणि या अशा भयप्रद वातावरणात मी एकटाच सापडलो होतो. मला पळभर काय करावे, काहीच कळेना.  कारण एकदम अंधार झाल्याने माझ्यासमोर सगळा काळाकुट्ट अंधार पसरला होता. समोरचे काही दिसत नव्हते. जोरात दरवाज्याकडे पळावे, असेही वाटले. पण अंधारात दरवाज्याकडे कसे पळणार, कशावर धडपडून खाली पडलो तर?
             हळू हळू अंधाराला माझे डोळे सरावू लागले. अवतीभोवतीच्या वस्तू दृश्यमान होऊ लागल्या. वस्तूंचा आकार दृष्टी पथात येऊ लागला आणि अचानक मला ते दिसले. माझ्यापासून अवघ्या चार पाच फुटाच्या अंतरावर तो हाडांचा सापळा लटकलेला होता. अगदी सरांनी वर्गात लटकलेला होता, तसाच. क्षणभर मी स्तब्धपणे त्या लटकलेल्या सापळ्याकडे बघू लागलो. हळूहळू मी मंत्रमुग्ध होत आहे, याची जाणीव मला व्हायला लागली. अवतीभोवतीच्या अवकाशाचा मला विसर पडत होता. मला दरवाज्याकडे जायचे आहे, मला या प्रयोगशाळेतून बाहेर पडायचे आहे, आपण येथे एकटे आहोत, या सगळ्या गोष्टींची मला विस्मरण होऊ लागले. मला फक्त आता तो समोरचा सापळा दिसत होता. एका प्रौढ माणसाचा, पाच - साडेपाच फूट लांबीचा, अगदी खराखुरा सापळा.
           मला कळत होते. सापळ्याविषयीची माझी ओढ आता परमोच्च बिंदू पर्यंत पोहोचली होती. माझ्या शरीरात आता केवळ आणि केवळ त्या सापळ्याविषयीच्याच जाणिवा उरल्या होत्या. आमच्यातील ते पाच - सहा फुटांचे अंतरही मला आता नको होते. मी एकटक पाऊल टाकत पुढे त्याकडे जात होतो. मी सापळ्याच्या अगदी निकट पोहोचलो होतो. अगदी काही इंचांवर. त्याला स्पर्श करण्याची माझी इच्छा वर उचंबळून आली.
मी आता माझा उरलोच नव्हतो. कोणाच्या तरी आज्ञेवर जणू माझी इंद्रिये काम करत होती. कोणाच्या तरी हुकुमावर माझा मेंदू काम करत होता. आता त्याला स्पर्श करण्याची इच्छा अनावर झाली होती. मी क्षणभर डोळे मिटले, आणि त्याच्या त्या हातावर अलगद स्पर्श केला.
            एका वेगळ्याच परिभाषेतील अनुभूती माझ्या शरीरात पसरून गेली होती. ते एवढे टणक हाड, पण ते टणक मुळीच जाणवले नाही. मी जेव्हा त्या सापळ्याच्या हाताला स्पर्श केला, तेव्हा तो हात मला कमालीचा नरम जाणवला. अगदी मांसल गोळ्याला हात लावावा तसे झाले माझे. अगदी थंड स्पर्श जाणवला तो.
             मी पुन्हा एकदा त्याला स्पर्श केला, पुन्हा तीच नरम आणि थंड अनुभूती आली. असे कसे शक्य आहे. मी जरासा मागे सरकलो. आता मला दिसू लागले. तो सापळा हलत होता. त्याला एका प्रौढ माणसाचा आकार येत होता. हळूहळू त्याच्या हातांवर, पायावर, डोक्यावर मांस चढत होते. त्याची हालचाल होत होती. त्याला सगळे शरीर प्राप्त होत होते. त्यावर मांस, रक्त चढत होते.
          हळूहळू माझ्या जाणिवा परत येत होत्या. पुढे काय घडतं आहे, याचा मला बोध होत होता. येथे काहीतरी अमानवीय घडत आहे, हे मला कळून चुकले होते. येथून आपण लवकर निघालो नाही, तर मग आपल्याला काहीच करता येणार नाही. भीतीने माझे सर्वांग थरथर कापत होते. आता अवतीभोवती वेगवेगळ्या हालचाली होऊ लागल्या. मघापासून ताणून धरलेला अवकाश सैल होऊ लागला. हळूहळू त्या सापळ्याचा देह बनू लागला. मी एकदम पाठीमागे सरकू लागलो. आणि दरवाज्याकडे जाण्यासाठी पळालो.
          पण, मला पुढे जाताच येईना. शरीरातले त्राण गेल्यासारखे वाटू लागले. पुढे पाऊल टाकण्या एवढी शक्ती शरीरात उरली नव्हती. मी कमालीचा कमजोर होऊ लागलो. मला दरवाज्याकडे जायचे होते. पण मला काहीच हालचाल करता येत नव्हती. आणि अचानक पाठीमागे काही आवाज झाला. कोणीतरी माझ्या पाठीमागून चालत येत होते. अगदी माझ्या पाठीमागून कोणीतरी उभे राहिल्याचे मला जाणवले.
            मी हळूहळू पाठीमागे वळलो. तेवढयात काहीतरी वेगाने प्रयोगशाळेतून बाहेर पडताना दिसले. अगदी काळे,मांसल आणि पाच सहा फूटउंचीचे. आणि हे सगळे काही कळायच्या आत मी भोवळ येऊन खाली पडलो. पण पडताना माझ्या डोळ्यात प्रचंड भीती होती. आणि त्या शेवटच्या दृष्याच्या काही गडद छटा होत्या. त्या प्रौढ माणसाच्या काही गडद छटा.
          दार उघडल्याच्या आवाजाने मला जाग आली. मी अजूनही प्रयोगशाळेतच पडलो होतो. शाळेची बेल स्पष्टपणे ऐकू येत होती. माझ्या सर्व अंगभर वेदना जाणवत होत्या. कोवळा प्रकाश आजूबाजूला पसरलेला होता. मी कसाबसा प्रयोगशाळेतून बाहेर आलो. माझा वर्ग भरलेला होता. मी तसाच वर्गात शिरलो. माझी जागा रिकामी होती. मी जागेवर जाऊन बसलो. वर्गात सगळा गोंधळ सुरू होता. आणि अचानक सगळीकडे शांतता पसरली गेली. विज्ञानाचे  सर वर्गात आले होते. कालचा अर्धवट राहिलेला धडा आज ते पूर्ण करणार होते. आणि त्यांच्या हातात तोच कालचा सापळा होता. हाडाचा! अगदी खराखुरा!
             पण माझ्यासकट सगळ्यांना एका गोष्टीचे प्रचंड नवल वाटत होते. कालच्या मानाने आज सापळा एकदम लहान दिसत होता. अगदी पंधरा - सोळा वर्षांच्या मुलाचा असावा तसा. जेमतेम उंचीचा, हात - पाय लहान असलेला. एकदम लहान, पण एकदम खराखुरा.
            मलातर एकदम नवल वाटले. त्याचबरोबर एका गोष्टीचा खेदही वाटू लागला. मी वर्गात आलो होतो, आता बाहेर जात होतो, तरी माझी कोणी नोंद घेत नव्हते. माझ्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते.अजबच होते!

*समाप्त
वैभव देशमुख.

कथालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

25 Sep 2022 - 7:07 am | कर्नलतपस्वी

मस्तच.

एक गोष्ट कधीच समजली नाही भुतांच्या गोष्टीत वातावरण थंड,कुबट वास वगैरे असे का असते.

शाली आणी भिम्याच काय झालं बुवा&#128512

vaibhav deshmukh's picture

25 Sep 2022 - 9:55 am | vaibhav deshmukh

हाSSSSSS
भुतांना जरा थंड वातावरण आवडते.
गरमी सहन होत नाही त्यांना.
शाली लवकरच पूर्ण करतोय.

श्वेता व्यास's picture

25 Sep 2022 - 3:49 pm | श्वेता व्यास

आवडली कथा.