आज चाललास...? नाही बोलावलं तरी पुढच्या वर्षी तू येशीलच... आम्हीच आणू, त्यात काय एवढं? तसा तू 'सेलिब्रिटी'! तू येणार म्हणून कोण काय आणि काय नाही करत हे मी तुला सांगायची गरज नाही. तू चौसष्ट कलांचा अधिपती असला तरी मला तुझी पासष्टावी कला- सोशिकतेचं- भारी कौतुक वाटतं. तुला देवळाच्या गाभाऱ्यात कैद करून ठेवणारे आम्हीच असलो तरी आमचे शिर शेवटी तुझ्या समोरच झुकणार. काही चूक झाली तर कधी वर पाहून, कधी कानाला हात लावून तर कधी आई-बापाकडे पाहून तुच आठवतो. मात्र तुझ्या सोशिकते समोर कधी कधी तुझं देवपण सुद्धा फिकं पडतं बघ.
एरवी माणसांची काय बिशाद की कुणा देवाला मंदिरातून उचलून आणावं आणि स्थापना करावी त्याची चौकात. पण तू अपवाद. कारण तू सोसतो. माणसांचा अमानवी नंगानाच तू ढिम्मपणे सहन करतो. मनुष्य असुरांची उंच आरास तुला भावते म्हणून की काय, पण तू भाविकांना 'पावताना' (अगदी भेटताना सुद्धा!) भेदभाव करतो असं वाटतं मला. आपला 'अतिविशिष्ट'पणा (VIP) मिरवत मुळात अतिसामान्य व्यक्ती तासनतास ताटकळत बसलेल्या भक्तांना मागे टाकून चटकन तुझ्या पायाशी येते तेव्हा त्यांना तू सोंडेचा एक तडाखा का देत नाहीस? आता तू गल्लोगल्लीचा 'राजा' झाला आहेस तर आमची सरकारी गुलामी संपवून आम्हाला निदान प्रजा व्हायचं सुख तरी दे. तुझ्या सुखकर्ता आणि विघ्नहर्ता असण्याला काही 'अटी लागू*' असतात का? असतील तर त्या सांग, पण हे असं मूर्ती बनून यायचा आणि पाण्यात गुडूप व्हायचा खेळ बंद कर.
शोधून सापडेल अशी एकही उणीव नाही तुझ्यात. सोंड असूनही कसला गोड दिसतो तू बाप्पा. तुला कळतंय का की, बाबा आणि पप्पा मिळून तुझा बाप्पा झालाय. तू आमचा 'डबल' बाप आहेस! मग तू तसं वागायला नको का?
किती दिवस या निर्जीव मुर्त्या पाठवणार आहेस? एकदा तू स्वत:च ये. मंडळाची खंडणी, कान फुटतील अशा गडगडाटी आवाजातील आरत्या, पत्त्यांचे डाव आणि झिंगाट होऊन सैराट नाच हे सगळं सोबत करु. जमलं तर निवडणूकीच्या वर्षी ये. त्यावर्षी तुझाही 'रेट' चांगला असतो. नाहीतर असं कर... १० दिवस काय चांगलं वर्षभरासाठी ये इकडे. आपल्या घरी मुक्काम कर. 'घालीन लोटांगण' म्हणत स्वार्थापायी इतरांना लोळवणारे लोक तुला दाखवतो. जिथे तू कधीच गेला नसशील अशा 'तीर्थक्षेत्रां'च्या वाहनतळावर नेतो तुला. मग कळेल तुला की सामान्य भाविकाला तुझ्यापर्यंत पोहोचायचं म्हणजे किती पैसा मागे सोडावा लागत असेल. पण एक अट आहे! तू चिडायचं, रागवायचं अजिबात नाही. कुणाचं देवत्व उघडं पडलं की त्याची रवानगी लगेच मंदिराच्या कोठडीत करतो आम्ही! यंदा तू जात आहेस. वरची परिस्थिती थोडी जरी बदलावी असं वाटलं तर परत ये. नाहीतर मला सोबत घेऊन चल...
तुझाच... नाही तू माझाच!
प्रतिक्रिया
10 Sep 2022 - 10:34 am | मुक्त विहारि
गणपती आता विद्येची देवता राहिलेली नसून, प्रदूषण दैवत झालेली आहे...
देवाला रस्त्यावर आणू नये, हे आता पटायला लागले आहे ...
10 Sep 2022 - 12:32 pm | अनुस्वार
आता खरा बाप्पा तेवढा घरातलाच. बाहेर देवापेक्षा 'फ्लेक्स'वरील टुकार चेहऱ्यांचे दर्शन जास्त होते किंबहुना तशीच योजना केलेली असते.