घराची ऊब

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
7 Sep 2022 - 9:46 am

प्रत्येक घराला एक प्रकारचा उबदारपणा असतो. आणि साधारणपणे माणूस आपल्या घरात एकदम समाधानी असतो. कितीही दिवस बाहेर गेलं तरी घरी आल्यावर एक प्रकारचं समाधान, मोकळेपणा मिळतो तो काही वेगळाच. ४ दिवस घर बंद करून जावं तर आल्या आल्या घरात एक प्रकारचा वास येतो. जणू घर सांगत असत कि असं दारं, खिडक्या बंद करून मला सोडून तुम्ही कसे जाता? आधी घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या काय करायचं तर दारं खिडक्या मोकळ्या उघडून टाकायच्या. घराला स्वच्छ हवेचा श्वास घेऊ द्यायचा. मग घर पण कसं मोकळं होत. मनमोकळेपणाने तेही आपलं स्वागत करतं.

आपलं घर आपल्याला आपल्या सुख दुःखासह सामावून घेत. घरावरच आश्वासक छप्पर आपल्याला एक विश्वास देत. " हे माझं आहे " हि भावना त्यात असते आणि म्हणूनच प्रेमही असतं. my house, my rules प्रमाणे प्रत्येक घराचे अगदी लिखित नसले तरी नियम असतात. अगदी tv बघायचा तर कोणते कार्यक्रम कुणी बघायचे हेही ठरलेलं असत. जेवायचं कसं,कुठे, कधी, काय याचेही ठोकताळे असतात आणि साधारण त्यात बदल होत नाहीत. comfort level हा प्रकार आपल्याला आपल्या घरात मिळतो. त्यामुळे ४ दिवस बाहेर जाऊन आलो, अगदी कितीही निसर्ग रम्य ठिकाणी जा किंवा आणखी परदेशात जाऊन या, आपल्या घरात आपल्यावर जस मस्त वाटत तसं कुठेच वाटत नाही. घर माणसांना आणि घरातली माणसं त्या वास्तूला सरावलेली असतात. आताशा अगदी माहेरी जरी गेलं तरी आपल्या घरी परत कधी जातोय असं होतं. माहेरी जातोय ते थोडे दिवस राहायला याची जाणीव असतेच. त्यामुळे ते थोडे दिवस झाले कि घरी परतायची ओढ लागते. हि ओढ लागणं आणि ती टिकवून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे.

हॉटेल, व्हिला,कॉटेज वगैरे नावाने कितीही सोयी सुविधा असलेलं ठिकाण जरी असेल तरी ४ दिवस चेंज म्हणून बरं वाटत. पण थोडेच दिवसात त्याचा कंटाळा येऊन आपलं घर बोलावू लागत. गावाला स्थायिक झाल्यापासून मुंबई, पुणे शहरात ३/४ दिवसाच्या वर राहायचं म्हणजे जीवावर येत. कधीकाळी याच गर्दीचा आपण एक भाग होतो. मुंबईला जॉबला असताना त्याच लोकल मधून जायचं, इकडून तिकडे ब्रिज क्रॉसकरून जायचं असं सगळं आठवत. पुण्यात जॉबला असताना त्याच पुण्याच्या गर्दीचा एक भाग होऊन सिग्नल चुकवायला गल्ली बोळातून २ व्हिलर काढून कशी फिरवायचो हे आठवताना हसू येत. आता मात्र आपण हे तेव्हा कसं जमवलं याच आश्चर्य वाटत. शहरात असलेल्या नातेवाईकांचे फ्लॅट खर तर ऐसपैस मोठे आहेत. तरीही आताशा गावातल्या ऐसपैस घराची सवय झाल्याने जागा लहानच वाटतात. तरीही बाकीच्यांचा मानाने आमचं गावातलं घर असून कॉम्पॅक्ट असच आहे. पण आजूबाजूला असलेलं मोकळं आवार, त्यात करत असलेली छोटीशी शेती, चार दोन भाज्या, छोटंसं सारवलेलं अंगण, ताशा वाजवल्यासारखा पत्र्यावर आवाज करत यथेच्छ कोसळणारा पाऊस, आजूबाजूला असलेले छोटे छोटे ओढे, मनसोक्त पाऊस बघत घराच्या व्हरांड्यात गरम चहा पित बसण्याचं सुख काही औरच. ४ दिवसांच्या वर बाहेर राहिलं कि हे सगळं खुणावत, बोलवत राहतं आणि मग आपसूक पाय घराकडे ओढले जातात. घरी आल्याचा जसा आपल्याला आनंद होतो तसाच आपण आल्याचा घरालादेखील आनंद होतो हे जाणवत.

आणि मग परत रुटीन सुरु होत. शाळा, कॉलेजची गडबड, डबे करण्याची घाई, अभ्यास आणि असंच सगळं. जरा सगळे आपल्याआपल्या जागी स्थिरावले कि मग निवांतपणे घरी असलेली मी मस्त एक स्पेशल चहा स्वतःसाठी तयार करून घेते आणि हे सगळं लिहायला बसते.

--धनश्रीनिवास

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

विनोदपुनेकर's picture

7 Sep 2022 - 10:56 am | विनोदपुनेकर

छान लिहिलंय ..

कुठेही फिरायला जरि गेलो त्या नंतर स्वतच्या घरात आल्या नंतरचा फील वेगळाच ..

अजून एक निरीक्षण :

कामानिमित्त /शिक्षणानिमित्त पुण्यात स्थायिक झालेले गावी गेल्यावर म्हणवे तितके रुळत नाहीत .. पुण्याची ओढ लागते आणि गावी करमत नाही .

श्वेता२४'s picture

7 Sep 2022 - 1:36 pm | श्वेता२४

लेख खरंच छान लिहीलाय. पण माझंही हेच मत आहे. आधी पुणे व आता मुंबई येथे स्थाईक झाल्यापासून गावाकडे एकदम संथ व नंतर नंतर बोअर व्हायला लागतं. शेवटी कधी एकदा मुंबईला परत जातोय असं होतं. कारण आता मुंबईतलं घर आपलं वाटत असतं.

वामन देशमुख's picture

7 Sep 2022 - 11:36 am | वामन देशमुख

कितीही दिवस बाहेर गेलं तरी घरी आल्यावर एक प्रकारचं समाधान, मोकळेपणा मिळतो तो काही वेगळाच.

आवडलं अगदी!

---

अवांतर:

आणि साधारणपणे माणूस आपल्या घरात एकदम समाधानी असतो.

असा माणूस आपल्या आयुष्यात *यशस्वी* झाला असं म्हणता येईल का?

वामन देशमुख's picture

7 Sep 2022 - 1:58 pm | वामन देशमुख

कितीही दिवस बाहेर गेलं तरी घरी आल्यावर एक प्रकारचं समाधान, मोकळेपणा मिळतो तो काही वेगळाच.

आवडलं अगदी!

---

अवांतर:

आणि साधारणपणे माणूस आपल्या घरात एकदम समाधानी असतो.

असा माणूस आपल्या आयुष्यात *यशस्वी* झाला असं म्हणता येईल का?

मदनबाण's picture

7 Sep 2022 - 6:57 pm | मदनबाण

होम स्विट होम... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You will face many defeats in life, but never let yourself be defeated. -Maya Angelou

सरिता बांदेकर's picture

7 Sep 2022 - 8:58 pm | सरिता बांदेकर

छान.
सहमत आहे.

तर्कवादी's picture

8 Sep 2022 - 12:03 am | तर्कवादी

यामुळे ४ दिवस बाहेर जाऊन आलो, अगदी कितीही निसर्ग रम्य ठिकाणी जा किंवा आणखी परदेशात जाऊन या, आपल्या घरात आपल्यावर जस मस्त वाटत तसं कुठेच वाटत नाही.

सहमत.. पण "बैठ्या घराला" स्वतःचं असं एक व्यक्तिमत्व जाणवतं, तसं ते फ्लॅटला जाणवत नाही. माझ्या आयुष्याची सुमारे ३२-३३ वर्षे बैठ्या घरात गेली आणि आता फ्लॅटमध्ये सात वर्षांहून अधिक काळापासून राहतोय. पण जुने घर आठवत राहते. घरातील सोयी-सुविधां, सौंदर्य व आजूबाजूचा परिसर यांचा विचार केल्यास फ्लॅटमधले वास्तव्य नक्कीच खूप आरामदायी आहे पण फ्लॅटला असे स्वतःचे व्यक्तीमत्व जाणवत नाही.. किंवा अजून तरी ते तसे माझ्या भावनिक पटलावर ठसू शकले नाही.

इतकेच काय मला माझे आजोळचे घर आठवत राहते. मी आजोळी अजूनही जातो पण गेले २५ वर्षात नाही मुक्कामी थांबलो नाही. अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले ते छोटेसे घर आहे, खूप जुने असल्याने सुविधा नीटशा नाहीत. पण तरी त्या घराला स्वतःचे असे व्यक्तिमत्व जाणवते.

मला माहितेय की हा मुद्दा बराचसा भावनिक आहे आणि आणि तो नेमक्या शब्दांत मांडणे कठीण आहे. एक सुदरं उदाहरण देतो - सुंदर , नीटनेटकी छापील अक्षरे आणि एखाद्या व्यक्तीच हस्ताक्षर (जे कदाचित फारसं सुरेख /नेटकं नसेलही).. यांत काय फरक जाणवतो ?

नचिकेत जवखेडकर's picture

8 Sep 2022 - 10:17 am | नचिकेत जवखेडकर

छान लिहिलंय. आम्ही नवरा बायको जेव्हा कामानिमित्त बेंगळुरूला शिफ्ट झालो तेव्हा पुण्याला आलो की वाटायचं अरे कसलं आरामात चाललंय सगळं इकडे. आणि कदाचित भाड्याचं असलं तरी स्वतःच्या पैशांनी राहत होतो म्हणून बेंगळुरूमधल्या घराबद्दल जास्त आपलेपण वाटायचं हे मात्र खरं! :)

विवेकपटाईत's picture

8 Sep 2022 - 10:33 am | विवेकपटाईत

शहरातील फ्लेट्स एक आवश्यकता आहे. तिथे मर्यादात राहावे लागते. भाग्यशाली आहेत ते लोक जे गावांतल्या मोकळ्या हवेत राहतात. घराला घरपण असेल तर ओढ असते फ्लॅट असो की वाडा. बाकी चार भिंतीत ....वाट पाहण्याचे ठिकाण.

गावाकडे निवांत वेळ असेल तर छान वाटतं राहयला.
कामाच्या शहरात घराची ऊब खरी गरजेची वाटते.घर म्हणजे ऊब बरोबर!सहमत!

मुक्त विहारि's picture

8 Sep 2022 - 9:27 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे...

लोगन's picture

8 Sep 2022 - 11:44 pm | लोगन

मस्त

धर्मराजमुटके's picture

8 Sep 2022 - 11:58 pm | धर्मराजमुटके

छान लेख !
मी तर घराच्या उबेला इतका सोकावलोय की जवळजवळ घरकोंबडाच झालोय म्हणाना :)