तुमच्या घरात कुणी तिसराच राहायला येऊन "आता हे घर माझं आणि तुम्ही नोकर", असं म्हणाला तर तुम्ही काय कराल? काही आक्रमण करणाऱ्यावर हल्ला करतील, काही वाटाघाटी करतील आणि काही मलाही तसं सगळं सांभाळायला अवघड जात होतं असा विचार करून चक्क त्या त्रयस्थ माणसाची गुलामी स्वीकारतील. थोडं वरच्या पातळीवर जाऊ. त्या शेवटच्या माणसासारखा गावचा सरपंच वागला तर गावचा कारभार तिसऱ्याच माणसाच्या ताब्यात जाणार. आजपासून सुमारे सव्वा चारशे वर्षांपूर्वी, इसवी सन १६०० साली असंच काहीसं घडलं. इंग्रज गुजरातच्या किनाऱ्यावर आले आणि "तुमचं राज्य आम्ही सांभाळतो राजे साहेब, तुम्ही मजा मारा", असे म्हणत पुढील दोनशे वर्षांत त्यांनी हळूहळू सगळी लहान मोठी राज्ये खिशात घातली. १८५८ साली तर जाहीर घोषणाच केली की भारत हा ब्रिटनच्या राणीच्या साम्राज्य मुकूटातील हिरा आहे. मग पुढे १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध, क्रांतिकारी चळवळी, शेतकरी-आदिवासी लढे, गांधीजींची लोक चळवळ, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इतिहासाने ज्यांची नोंद घेतली नाही अशा अगणित भारतीयांनी स्वतःचा जीव देऊन आपल्या भारत नावाच्या घरात घुसलेला हा इंग्रज बाहेर काढला. तो आपला स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट, १९४७.
मला जे सांगायचंय ते यापुढे आहे. आपला देश विज्ञान तंत्रज्ञानात मागे होता म्हणून आपण पारतंत्र्यात गेलो असा तुमचा समज असेल तर तो साफ चूक आहे. इंग्रज आणि इतर युरोपीय वसाहतवादी (दुसऱ्यांच्या जागा लुटणारे) देश डोक्याने आपल्यापेक्षा नि:संशयपणे भारी होते. इथल्या माणसांची मने त्यांनी पुरेपूर ओळखली होती. ही माणसे अगदी थोड्याशा पण त्वरित लाभा करिता अक्कल गहाण ठेवतात. जालियनवाला बाग (१९१९) आठवा. चार भिंतींनी कोंडलेल्या मैदानात जमलेल्या निष्पाप जनतेवर गोळीबाराचा आदेश देणारा इंग्रज अधिकारी असला तरी प्रत्यक्षात रायफलीचा चाप ओढणारे भारतीय हात होते. रात्रंदिवस एक पंचा अंगाभोवती गुंडाळून वावरणाऱ्या गांधीजींना इंग्रज काहीच करू शकले नाहीत. त्याच गांधींना नंतर भारतीय हाताने गोळ्या घालून ठार केले. एका आकडेवारीनुसार ४०० वर्षांच्या काळात भारतातील एकूण इंग्रजांची संख्या कधीही तीन ते चार लाख यापेक्षा जास्त नव्हती. आणि १९४७ मध्ये भारताची लोकसंख्या होती सुमारे ३४ कोटी. म्हणजे शब्दशः मुठभर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले! कारण आपल्यातल्या बहुतेक मनांनी गुलामी मान्य केली होती. नव्हे ते गुलामीलाच त्यांचा अधिकार मानत होते. म्हणून कित्येक भारतीयांनीच क्रांतिकारकांना पकडून देताना इंग्रजांची मदत केली. "तुम्ही भारतीय मागास, आम्ही इंग्रज प्रगत. आम्ही तुमचे मालक राहू तर निदान तुम्ही जगाल", असे इंग्रज सांगत राहिले आणि आपली नादान जनता "होय बा" करत राहिली.
देशात इंग्रज येण्याआधी आता दलित म्हणून ओळखला जाणारा एक मोठा सामाजिक वर्ग गुलामीतच होता. पण आश्चर्य पाहा. त्या गुलामीचे कारण सुद्धा सारखेच. या दलितांना समाजातला वरचा वर्ग सांगायचा, "बाबा, तुझी लायकी तशी मरणाचीच, पण माझा गुलाम राहशील तर निदान जगशील". ज्योतिराव नावाच्या महात्म्याने या दलितांमध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटवली तेव्हा ते स्वातंत्र्यासाठी लढले. हाच स्वाभिमान राष्ट्रीय पातळीवर जागृत झाला आणि इंग्रजही देश सोडून गेले. आपल्या मनांतली गुलामी काही काळासाठी झोपी गेली. देशाने यथावकाश करायची ती प्रगती केली. जगाला प्रसंगी आपल्यासमोर झुकावे लागले आणि आपणही वेळ आली तेव्हा लोटांगण घातले. पण आज २०२२ मध्ये भारत नावाचे राष्ट्र इतर बलाढ्य राष्ट्रांच्या पंक्तीत स्थानापन्न आहे. लग्नात वाढप्याने ज्यांना दगड मारून पळवून लावले त्यांना नवरा-नवरी सोबत जेवणाचा मान मिळावा एवढी ही वाटचाल अतिभव्य आणि चमत्कारिक आहे. त्याबद्दल आपण सारे अभिनंदनास पात्र आहोत.
धोका पुढे आहे. आता ती गुलामी मात्र पुन्हा झोपेतून उठू पाहत आहे. लोकसेवक म्हणवणारे जनप्रतिनिधी सरंजाम होऊ पाहत आहेत. काल परवा नगरसेवक झालेले लोक प्रभागातून मोकळ्या सांडांसारखे खड्ड्यांतून वाट काढत, दात विचकत, निर्लज्जपणे कार्यकर्ता नामक प्राण्यांचा तांडा घेऊन वावरतात आणि आमच्या प्रभागातले रस्ते कधी करणार असा साधा चौकशीचा (विरोध तर सोडाच!) एक आवाज निघत नाही. नेत्यांनी भ्रष्टाचार आणि माज करायचाच असतो, सरकारी कार्यालयात काम वेळेवर होणार नाहीतच, पोलिसांकडून संरक्षण हवे तर बापूंच्या काही फोटोंचे हस्तांतर करावेच लागेल हे सगळं आपण जवळपास गृहीत धरलं आहे. मान्य केलंय! ही सगळी १९४७ मध्ये झोपी गेलेली गुलामी पुन्हा नव्या दमाने कार्यरत होत असल्याची लक्षणे आहेत. आपल्या पूर्वजांनी अगदी स्वतःच्या रक्ताचे पाट वाहून हे स्वातंत्र्य मिळवले. ते जपून ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे हे समजून घ्यायला तुम्ही समर्थ आहात. हर घर तिरंग्यासोबत हर घर स्वातंत्र्याचा पवित्र विचार पुनश्च रुजावा, हीच भारत मातेच्या चरणी प्रार्थना.
"बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो।"
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या खूप हार्दिक शुभेच्छा.
जय हिन्द! वन्दे मातरम्!