मुंबई लोकल मधील खरेदी

Primary tabs

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
20 Jun 2022 - 12:23 pm

सध्या कोकणात वास्तव्य असल्याने मुंबईत काही कारणाशिवाय येणं होत नाही. सुरवातीला शिक्षणासाठी आणि मग नोकरीसाठी काही काळ मुंबई मध्ये असल्याने मुंबई लोकलची चांगली माहिती आहे. सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर तिन्ही मार्गांवर तेव्हा भरपूर भटकून घेतलंय. त्यामुळे लोकलची सवय नसली तरी भीती मात्र नक्कीच नाही. हां पीक अवर्स ना मी जाण्याचं टाळते निश्चित. मुंबईला आल्यावर कधी वेळ आलीच लोकलने फिरायची तर मला खूप उत्सुकता असते. एक तर मी नेहमी स्लो लोकल पकडते. याआधीच्या अनुभवानुसार मी फास्ट लोकल पकडली कि ती सिग्नलला एवढा वेळ काढते कि स्लो पुढे निघून जाते. तसही मी हाताशी भरपूर वेळ घेऊन बागडत असते त्यामुळे स्लो लोकल मला आवडते.

स्लो लोकलला लेडीज डब्यात चढल्यावर मला उत्सुकता असते ती फेरीवाल्यांची. रोजच्या लोकलवाल्याना कदाचित त्रासाचे असतील हे फेरीवाले. पण कधीतरी मुंबई दर्शन करणाऱ्या मला यांचं फार आकर्षण आहे. ठाण्याला लोकल पकडली तर नाहूर, कांजूर, विद्याविहार असल्या स्टेशनवर हमखास हे चढतात. गर्दीच्या वेळा चुकवून गेल्याने डब्यात खूपच कमी बायका असतात. काय काय असत या फेरीवाल्यांकडे? स्नॅकचे पदार्थ, बांगड्या, कानातले, टिकल्या थोडक्यात साजश्रुंगाराचे बरेचसे सामान, पिशव्या, इअर फोन्स, चार्जेर, सेल्फी स्टिक,पर्स, पाऊच, कधी छोटे छोटे डबे, रुमाल, स्कार्फ आणि बरच काही. आलेल्या बऱ्याच फेरीवाल्यांकडून मी काही ना काही घेते. गेल्या २/३ वर्षात लोकलचा प्रवास केला नाही. नाहीतर याआधी अगदी २० रुपयात छान कानातले, १०० रुपयात बांगड्या, ३० रुपयात बटवा अशी खरेदी केलेली आहे. खर तर या गोष्टी फार काही चांगल्या क्वालिटीच्या नसतात. २० आणि ३० रुपयात तुम्ही क्वालिटीचा विचार करूच नये. नाहीतर सरळ चांगल्या दुकानात जाऊन नेट पैसे टिकवून घ्यावे. पण इथे या क्षुल्लक खरेदीचा आनंद मिळतो. त्या मुलाने किंवा मुलीने अख्खा बॉक्स आपल्या हातात दिला कि सगळे कानातले उलथापालथ करून मग एखाद दोन पसंत करून घेतले जातात. मी नेहमी टॉप्स वापरते. मोठे लांब कानातले वापरायला हळू हळू सुरवात करतेय. मग नाही वापरले तर पडून राहतील म्हणून घेतले जात नाहीत. पण मग २० रुपये वाले पडून राहिले तरी फार दुःख होत नाही असं म्हणून ते कानातले खरेदी केले जातात.

एकदा अशीच लोकल मधून जात असताना एक मुलगी छोट्या छोट्या पर्स विकायाला आली. किंमत ऐकून मी उडालेच. गावात किमान ८० रुपयाला मिळणारी पर्स ती फक्त ३० रुपयांना विकत होती. बरं होती पण छान. चांगल्या जरीच्या काठाची, नीट शिवलेली, वर प्लास्टिक पॅकिंग मध्ये अगदी आकर्षक दिसत होती. मी तिथल्या तिथे ५ पर्स घेतल्या. आता मी एकटी काही सगळ्या वापरणार नाही. पण घरी पहिल्यांदाच कुणी आलं कि हातावर काहीतरी देताना अश्या छोट्या छोट्या वस्तू बऱ्या पडतात. नंतर एकदा एकजण डबे विकायला आला होता. टिफिन मध्ये भाजीचे असतात तसे छोटे छोटे डबे. हे डबे पण माझे बरेचदा इकडून तिकडे करताना ज्याच्याकडे गेले तिकडचेच होऊन जातात. त्यामुळे तेच डबे छान सेट मध्ये मिळाले. ते पण मी असेच ५/६ च्या संख्येत घेतले. परत आले नाही तरी वाईट वाटायला नको हीच भावना. टिकल्या तर कितीतरी वेळा घेतल्या आहेत. ह्या अश्या नटण्या मुरडयाच्या वस्तू दिसल्या कि काय भुरळ पडते काय माहित पण त्या विकत घेतल्या जातात हे खरं. खरं तर मेकअप वगैरे करण्यातली मी नाही. मला सवय नाही आणि मला येतही नाही. आवड नसल्याने कधी शिकून घ्यावं असही वाटलं नाही. लिपस्टिक आणि काजळ सोडलं तर माझ्याकडे मेकअपचे सामान पण नाही. त्यामुळे कुठे लग्नाला वगैरे जाताना पण मी फारशी तयार नसते. मग या बांगड्या, कानातले यांचे माझ्याकडे कलेक्शन पण नाही. पण याच कारणाने उगाच ते भारीतले घेऊन पडून राहण्यापेक्षा हेच स्वस्तात मस्त बरं असं म्हणून मी इथे खरेदी करते. मागच्या वेळी दादरच्या रानडे रोड वरून जाताना एक पर्स आवडली. फक्त २०० रुपये म्हटल्यावर मी मागचा पुढचा विचार न करता ती घेतली. मी जेव्हा वापरायला सुरवात केली तेव्हा जवळपास सगळ्यानी कुठे घेतलीस, कितीला घेतलीस चौकशी केली. आणि २०० रुपये किंमत ऐकून आम्हाला पण आणायची ना, अश्या कमेंट करून झाल्या. किती बरं वाटलंय माहितेय ? खरं तर त्या फेरीवाल्याने २०० सांगितल्यावर मी घासाघीस केली असती तर किमान १५० ला त्याने सहज दिली असती. पण आमची आजी म्हणते तशी मी म्हणजे,"देई वाणी, घेई प्राणी" या पंथातली. मला भाव करणं, घासाघीस करणं कधी जमलंच नाही. पण तरीही इतरांच्या दृष्टीने ती पर्स स्वस्तच होती. म्हणून मी खुश होते. मग हे लोकलचे फेरीवाले मुळातच ४० नि ५० रुपयाला वस्तू विकत असतात. त्याच्याबरोबर कुठे भाव करायचा असं वाटत. शिवाय बिचारे पोटासाठी कष्ट करतायत असं वाटत.

गेल्या २/३ वर्षात मुंबई त्यातही लोकल वारी अजिबातच झाली नाही. त्यामुळे सध्या काय ट्रेंडिंग आहे माहित नाही. परवा असेच एक कानातले भाचीला देताना आठवले कि हे लोकल मध्ये घेतलेले लांब कानातले जे मी कधीच वापरेल नाहीत. सुदैवाने ते अजूनही चांगल्या स्थितीत असल्याने भाचीने लगेच त्याला कुळ लावून टाकलं. मीही स्वखुशीने आणखी चार जोड तिला देऊन टाकले. तीही खुश मीही खुश. तिला जर या फेरीवाल्यांच्या दुनियेत आणलं तर मला खात्री आहे तीही इथे माझ्यासारखीच रमून जाईल.

धनश्रीनिवास

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jun 2022 - 1:38 pm | ज्ञानोबाचे पैजार

लोकलचा इतका अनुभव नाही पण डेक्कन क्वीन ने मुंबईला जाताना एकजण पुस्तके विकायला यायचा, त्यातली बहुतेक पुस्तके त्याने स्वतः वाचलेली असायची. कोणतेही पुस्तक बघायला घेतले की तो त्याची इत्यंभुत माहिती सांगायचा. पुस्तके चाळली पण घेतली नाही तरी तो कधी त्रागा करायचा नाही. काही वेळातर तो माझ्या जवळ तिनचार पुस्तके सोडून जायचा म्हणायचा निवांत बघा परत येताना काय ते सांगा.

लॉकडाउन नंतर महिन्यापूर्वी डेक्कन ने मुंबईला गेलो होतो तेव्हा तो आला नाही हे लक्षात आले नाही, आज हा लेख वाचल्यावर त्याची आठवण आली.

पैजारबुवा,

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Jun 2022 - 2:24 pm | राजेंद्र मेहेंदळे

मुळचा मुंबईकर असल्याने ३० वर्षे लोकलप्रवास केला आहे. त्यात ६ वी-७ वी पर्यंत कधी कधी आईबरोबर लेडिज डब्यातुनही प्रवास केला असल्याने तिकडचे फेरीवाले सुद्धा माहित आहेत. :)
फाळणीनंतर सरकारी पुनर्वसन योजनेमुळे सिंधी लोक उल्हासनगरच्या कॅम्प भागात रहायला आले आणि लोकलमध्ये गोळ्या विकणे प्रथम त्यांनी चालु केले. मग हळुहळु तो ट्रेंड पसरत गेला आणि फळे,गजरे,पर्स्,रुमाल्,आलेपाक्,चणेदाणे,पेन काय वाट्टेल ते लोकलमधे विकले जाउ लागले. गर्दीची स्टेशने टाळुअन मधे अधे हे फेरिवाले धंदा करतात. अर्थात रेल्वे पोलिस ,लोकल दादा यांना हप्ता द्यावा लागतोच. त्यांच्या गाड्या ठरलेल्या असतात. एकाच्या गाडीत दुसरा विक्रेता जात नाही आणि गेलाच तर जोरदार भांडण ठरलेले.
मात्र एकदा दुपारच्या वेळात आईबरोबर लेडिज ड्ब्यातुन प्रवास करताना मला एक वेगळाच अनुभव आला. डोंबिवलीला दोन टिकल्या विकणारे गाडीत चढले आणि थोडाफार धन्दा झाल्यावर दारात जाउन उभे राहिले. त्याच दारात खांबाच्या पुढील बाजुला दोन कॉलेज कन्यका उभ्या होत्या. या विक्रेत्यांची आपसात काहीतरी मस्करी वगैरे चालु होती. त्या मुलींनी यांच्याकडे टवाळखोर समजुन दुर्लक्ष केले. गाडी ठाकुर्ली स्थानकात शिरली आणि हे दोघे चालत्या गाडीतुन एक एक करुन उड्या मारुन उतरले आणि गर्दीत हरवुन गेले. काही क्षणातच त्या दोन्पैकी एक मुलगी रडु लागली. माझ्या डोळ्यादेखत तिची पर्स मारली गेली होती आनि मला समजलेही नव्हते. पुढे ही मजल सोनसाखळी /मंगळसुत्रे खेचण्यापर्यंत गेली आणि आतातर मोबाइलही मारले जातात. थोडक्यात हा मामला दिसतो तेव्हढा सरळ नाही. काळजी घ्या.

श्वेता व्यास's picture

20 Jun 2022 - 4:09 pm | श्वेता व्यास

लोकल प्रवास आणि खरेदीचा अनुभव नाही पण लेख आवडला.

चौथा कोनाडा's picture

20 Jun 2022 - 4:33 pm | चौथा कोनाडा

छान लेख ! आवडला !

लोकलनं प्रवासाचा अत्यल्प अनुभव. त्यात मुंबईचा जवळजवळ नाही म्हणण्या इतका.
पण ठाण्याला नातेवाईकांकडे गेलो कि तिथल्या बायकांचे लोकल खरेदीचे अनुभव ऐकून भारी वाटतं !
स्त्रीयांसाठी खरेदीचे सुख काही औरच ... आणि फुटकळ दागिने आणि नेहमी लागणारया वस्तूंचे म्हंजे स्वर्गसुखच !

पद्मश्री चित्रे's picture

20 Jun 2022 - 6:25 pm | पद्मश्री चित्रे

लोकल प्रवास गेली दहा वर्षं रोजचाच.त्यामुळे भरपूर खरेदी.. अगदी दहा रूपयाच्या हेअर क्लिप पासून ड्रेस पर्यंत. Lockdown मधे तर हे नसणं खूपच जाणवलं. ठराविक गाडीला ठराविक डब्यात येणारे फेरीवाले आणि तशाच आम्ही. खूप जणी ओळखीच्या झाल्यात.. फक्त गर्दीत कधीकधी त्रास होतो.. पण... चलता है..

कर्नलतपस्वी's picture

20 Jun 2022 - 8:00 pm | कर्नलतपस्वी

बहात्तर त्रयाहत्तर पहिला लोकलचा प्रवास ठाणे ते दादर, सॅण्डहर्स्ट रोड.

काहीच माहित नाही, पहिलीच मुंबई भेट, सेन्ट्रल, हार्बर फास्ट, स्लो हे सगळेच "एलीस इन वंडरलॅण्ड" सारखा अनुभव. नंतर मात्र मुंबई चा कधीच संबध नाही आला. नुकताच काशिद गेलो आसताना गेट वे पर्यंत बोटीने गेलो.
मस्त अनुभव.
बाकी खरेदी मधे विण्डो शॉपींग.
लेख आवडला.

धर्मराजमुटके's picture

20 Jun 2022 - 8:16 pm | धर्मराजमुटके

छान लेख ! मी देखील लोकल प्रवासात कधी पर्स (पाकीट), कधी सुई दोरा, ईअर फोन, कंगवे, पेन आणि एकदा दोनदा गॉगल खरेदी केले आहेत. क्वचित लहान मुलांसाठी चित्रे रंगवायची पुस्तके पण घेतलीत. स्वस्तात मस्त वस्तू मिळून जातात शिवाय विक्रेता अगदी आपल्या सीटपर्यंत येतो त्यामुळे खरेदीसाठी वेगळा वेळ काढायची गरज पडत नाही. खाण्याचे पदार्थ घेणे शक्यतो मी टाळतो कारण ते कितीपत आरोगयदायी असतात हे मुंबईकर अनुभवाने सांगू शकतो. अर्थात ही सगळी पुरुषांच्या डब्यातली खरेदी. आईबरोबर कधी लेडीज डब्यात जायचा प्रसंग आला नाही. तिकडच्या विक्रेत्यांकडे मालाचे नानाविध प्रकार असतील कारण पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त वस्तू लागतात असा आजपर्यंतचा अनुभव. उलट लेडीज डब्यात जास्त गर्दी म्हणून नेहमी प्रवास न करणार्‍या आया बाया पुरुषांच्याच डब्याला जास्त प्राधान्य देतात.
असो. यानिमित्ताने मिपाकर भगिनीवर्ग लिहिता झाला ही आनंदाची आणि जमेची बाजू. मात्र स्त्रियांच्या आवडीच्या विषयांवर केवळ एखाद दुसर्‍या स्त्री आयडी चा प्रतिसाद पाहून अंमळ वाईट वाटले. पुर्वी मिपावर धागामैदान गाजविणार्‍या अनेक महिला होत्या. कालौघात त्या कुठे हरवल्या कळत नाही. एकेकाळी स्त्री सभासदांची संख्या इतकी जास्त होती की त्यांच्यासाठी अनाहिता नावाचे वेगळे दालन चालू करायचे घाटत होते. अनाहिता विभाग सुरु झाला काय ? किंवा आज त्याची काय परिस्थिति आहे माहित नाही मात्र पैसा ताई, आतिवास, मेघना भुस्कुटे आणि इतर अनेक अनेक स्त्री सभासदांनी इथे उत्तम लिखाण केले होते. अशा अनेक सभासदांची अनुपस्थितीती मला प्रकर्षाने जाणवते.

चौथा कोनाडा's picture

20 Jun 2022 - 8:34 pm | चौथा कोनाडा

((मात्र स्त्रियांच्या आवडीच्या विषयांवर केवळ एखाद दुसर्‍या स्त्री आयडी चा प्रतिसाद पाहून अंमळ वाईट वाटले.))

अगदीच सहमत.
त्यामुळेच मलाही हा धागा बिन प्रतिसादाचा होणार की असं वाटत होतं. पण पुरुष आयाडी सहभागी होत आहेत त्यामुळे छान वाटले.

बाकी अनाहिताचे दिवस म्हणजे जबरी प्रकार होता.

लोक एकंदरीतच इंस्टा व्यतिरिक्त सोशल मीडियाला कंटाळले आहेत की काय असं वाटतं!

लोक एकंदरीतच इंस्टा व्यतिरिक्त सोशल मीडियाला कंटाळले आहेत की काय असं वाटतं!
सहमत!

मी सुद्धा 25 वर्षे गाडीचा प्रवास केला मग दगदगीला थकून 25 वर्षानी कंटाळून कायमचा रामराम ठोकला. तेव्हा माझी टिकल्या, पिना ( अजूनही वेगळ्या बांगड्या) ,कानातले दिसल्यावरची खरेदी व्हायची. आता क्वचितच कुठे गेल्यावर होते. ते दिवस आठवले तरूणपण सुंदरसे मस्त आनंद ज्याचा ,बुद्धी ,शक्ति , उत्कर्षाच्या काळाचा धुंद अनुभव घेतला म्हणजे खूप पैसे मिळाले किंवा खूप वर तरंगले आसे नाही पण तरूणपणच्या शक्तीचा, नविन आनंदाचाी खूप मजा घेतली ती पण कर्तव्य पार पाडूनच सर्वाची, सर्वबद्दलची.थकणे पण थोडी विश्रांती घेतल्यावर ताजतवाने होण्याचेही समजले की परत नविन कामाला उत्साहाने सुरूवात त्याच काळात काटकसर व दुकानात खरेदीची माहितिच नसल्याने. व वेळेअभाविपण गाडीतच टिकल्या ,पिना रूमाल, चिमटे केस, कपड्यांचे, खरेदी चाले

टिकल्या तर गाडीतच खरेदी करायची गोष्ट आहे यावर माझे मन ठाम झाले होते . गाडीतल्या मैत्रिणींशी गप्पातून एकमेकींना पाककृती शिकवण्यापासून ते मुंबईभर कुठे काय चांगले मिळते कधीकधी एकमेकींना आणून देणे ते जगातल्या बायकांशी संबधित (राजकारण सोडून) सर्व विषयांची चर्चा चाले.माहीतीची देवाणघेवाण , काही सल्ले, शिकवणे, भरतकाम, विणकाम,ते पुस्तके यात कुणाच्या साध्या अज्ञानाची चेष्टा न करता शिकविणे, सांगणे मस्त प्रवास होई भयानक गर्दी, घाम येणे अंगाला अंग चेपूनही पहिले मस्त अनुभव सहवासाचा, मन मोकळे होण्याचा मिळे व नविन अनुभवात भर पडण्याचा, नविन शिकण्याचा अनुभव मिळे नंतर तेच तेच रूटीन, वयाप्रमाणे थकवा वाढणे ,त्यामुळे मरगळ वाढून उत्साहाला काट बसणे सुरू झाले. व
नंतर माझा गाडीतिल प्रवास संपला व खरेदिही.िटकल्या सोडून.

लोकलचा अनुभव नाही,पण खरेदी तीही स्वस्तात म्हणजे स्त्रीचा आवडीचा विषय.छान!
माहूरला देवीला नेसवलेल्या साड्या खुप कमी किंमतीत मिळतात.एक काळ्या काठाची साडी कोणीच घेईना,मी लगेच घेतली नंतर सगळ्यात छान तीच निघाली,किंमत केवळ २००/- माझी आतापर्यंत स्वस्त पण आवडीची लक्षात राहिलेली खरेदी :)

जेम्स वांड's picture

21 Jun 2022 - 10:01 am | जेम्स वांड

मुंबईत पाऊल ठेवलं तेव्हा लोकल मध्ये केलेली पहिली खरेदी म्हणजे डुप्लिकेट हेडफोन्स, किंमत पन्नास रुपये मात्र, चांगले ८ महिने चालले, फुल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट! त्यानंतर लोकलमध्ये असलं काही विकत घेतलं नाही जात अलबत कधीतरी लोकमध्येच जांभळं, लिंबं, कधीतरी आली तर फळं घेतल्या जातात, सर्वाधिक खरेदी लिंबाची होते

सान्वी's picture

3 Jul 2022 - 2:23 pm | सान्वी

छान आठवण. मी पुणे लोणावळा लोकल ने एकच वर्ष प्रवास केला पण या खरेदीचा आनंद मनमुराद लुटला. टिकल्या कानातले तर स्वस्त म्हणून कितीतरी घेतले. एकदा गोल्डन कलर ची मण्यांची माळ खूप छान मिळाली ती माझ्या सासूबाई ना खूप आवडली तर त्यांनाच देऊन टाकली. कितीतरी महिने अगदी छान राहिली पॉलिश वगैरे गेले नाही. किंमत फक्त १०० रु! तसेच खड्यांचे bracelet ekda घेतले ते सगळ्यांना खूप आवडले आणि कुठून घेतले वगैरे खूप जणींनी विचारले.

बेकार तरुण's picture

13 Jul 2022 - 4:17 pm | बेकार तरुण

छान लेख....
अनेक वर्षे ठाणे ते सी एस टी प्रवास केला आहे... हमखास लोकलमधे विकत घेतली जाणारी गोष्ट म्हणजे लोकल पासचे कव्हर.... १० रूपयांना वगैरे असायचे अन टिकायचेही भरपूर...
सी एस टी स्टेशन बाहेर कोरडी भेळही मिळायची.... संध्याकाळी भूकेच्या वेळी घरी पोचेस्तोवर पोटाला आधार म्हणुन जंक खाण्यापेक्षा बेस्ट प्रकार होता तो....

मुक्त विहारि's picture

14 Jul 2022 - 12:58 pm | मुक्त विहारि

लोकल मध्ये खरेदी फक्त सुयांची करत होतो

5-10 रुपयांत, 10-12 विविध प्रकारच्या सुया मिळायच्या

आई शिवणकाम करत असल्याने, सुया सतत लागायच्या...

टर्मीनेटर's picture

21 Jul 2022 - 2:12 pm | टर्मीनेटर

लोकल ट्रेन प्रवासाचा माझा अनुभव तसा नगण्य म्हणता येण्यासारखाच आहे.

गेल्या २/३ वर्षात मुंबई त्यातही लोकल वारी अजिबातच झाली नाही. त्यामुळे सध्या काय ट्रेंडिंग आहे माहित नाही.

लॉकडाऊन काळात सुरु झालेले आमच्या सौभाग्यवतींचे 'वर्क फ्रॉम होम' अजून पूर्णपणे संपलेले नाही त्यामुळे अधून मधून काही कामासाठी ती लोकलने ऑफिसला जाते. तिच्याकडून समजलेली नवीन माहिती म्हणजे हल्ली ह्या विक्रेत्या महिला UPI द्वारे पेमेंट स्विकारतात 😀

जय डिजिटल इंडिया 🙏