मुंबई लोकल मधील खरेदी

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
20 Jun 2022 - 12:23 pm

सध्या कोकणात वास्तव्य असल्याने मुंबईत काही कारणाशिवाय येणं होत नाही. सुरवातीला शिक्षणासाठी आणि मग नोकरीसाठी काही काळ मुंबई मध्ये असल्याने मुंबई लोकलची चांगली माहिती आहे. सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर तिन्ही मार्गांवर तेव्हा भरपूर भटकून घेतलंय. त्यामुळे लोकलची सवय नसली तरी भीती मात्र नक्कीच नाही. हां पीक अवर्स ना मी जाण्याचं टाळते निश्चित. मुंबईला आल्यावर कधी वेळ आलीच लोकलने फिरायची तर मला खूप उत्सुकता असते. एक तर मी नेहमी स्लो लोकल पकडते. याआधीच्या अनुभवानुसार मी फास्ट लोकल पकडली कि ती सिग्नलला एवढा वेळ काढते कि स्लो पुढे निघून जाते. तसही मी हाताशी भरपूर वेळ घेऊन बागडत असते त्यामुळे स्लो लोकल मला आवडते.

स्लो लोकलला लेडीज डब्यात चढल्यावर मला उत्सुकता असते ती फेरीवाल्यांची. रोजच्या लोकलवाल्याना कदाचित त्रासाचे असतील हे फेरीवाले. पण कधीतरी मुंबई दर्शन करणाऱ्या मला यांचं फार आकर्षण आहे. ठाण्याला लोकल पकडली तर नाहूर, कांजूर, विद्याविहार असल्या स्टेशनवर हमखास हे चढतात. गर्दीच्या वेळा चुकवून गेल्याने डब्यात खूपच कमी बायका असतात. काय काय असत या फेरीवाल्यांकडे? स्नॅकचे पदार्थ, बांगड्या, कानातले, टिकल्या थोडक्यात साजश्रुंगाराचे बरेचसे सामान, पिशव्या, इअर फोन्स, चार्जेर, सेल्फी स्टिक,पर्स, पाऊच, कधी छोटे छोटे डबे, रुमाल, स्कार्फ आणि बरच काही. आलेल्या बऱ्याच फेरीवाल्यांकडून मी काही ना काही घेते. गेल्या २/३ वर्षात लोकलचा प्रवास केला नाही. नाहीतर याआधी अगदी २० रुपयात छान कानातले, १०० रुपयात बांगड्या, ३० रुपयात बटवा अशी खरेदी केलेली आहे. खर तर या गोष्टी फार काही चांगल्या क्वालिटीच्या नसतात. २० आणि ३० रुपयात तुम्ही क्वालिटीचा विचार करूच नये. नाहीतर सरळ चांगल्या दुकानात जाऊन नेट पैसे टिकवून घ्यावे. पण इथे या क्षुल्लक खरेदीचा आनंद मिळतो. त्या मुलाने किंवा मुलीने अख्खा बॉक्स आपल्या हातात दिला कि सगळे कानातले उलथापालथ करून मग एखाद दोन पसंत करून घेतले जातात. मी नेहमी टॉप्स वापरते. मोठे लांब कानातले वापरायला हळू हळू सुरवात करतेय. मग नाही वापरले तर पडून राहतील म्हणून घेतले जात नाहीत. पण मग २० रुपये वाले पडून राहिले तरी फार दुःख होत नाही असं म्हणून ते कानातले खरेदी केले जातात.

एकदा अशीच लोकल मधून जात असताना एक मुलगी छोट्या छोट्या पर्स विकायाला आली. किंमत ऐकून मी उडालेच. गावात किमान ८० रुपयाला मिळणारी पर्स ती फक्त ३० रुपयांना विकत होती. बरं होती पण छान. चांगल्या जरीच्या काठाची, नीट शिवलेली, वर प्लास्टिक पॅकिंग मध्ये अगदी आकर्षक दिसत होती. मी तिथल्या तिथे ५ पर्स घेतल्या. आता मी एकटी काही सगळ्या वापरणार नाही. पण घरी पहिल्यांदाच कुणी आलं कि हातावर काहीतरी देताना अश्या छोट्या छोट्या वस्तू बऱ्या पडतात. नंतर एकदा एकजण डबे विकायला आला होता. टिफिन मध्ये भाजीचे असतात तसे छोटे छोटे डबे. हे डबे पण माझे बरेचदा इकडून तिकडे करताना ज्याच्याकडे गेले तिकडचेच होऊन जातात. त्यामुळे तेच डबे छान सेट मध्ये मिळाले. ते पण मी असेच ५/६ च्या संख्येत घेतले. परत आले नाही तरी वाईट वाटायला नको हीच भावना. टिकल्या तर कितीतरी वेळा घेतल्या आहेत. ह्या अश्या नटण्या मुरडयाच्या वस्तू दिसल्या कि काय भुरळ पडते काय माहित पण त्या विकत घेतल्या जातात हे खरं. खरं तर मेकअप वगैरे करण्यातली मी नाही. मला सवय नाही आणि मला येतही नाही. आवड नसल्याने कधी शिकून घ्यावं असही वाटलं नाही. लिपस्टिक आणि काजळ सोडलं तर माझ्याकडे मेकअपचे सामान पण नाही. त्यामुळे कुठे लग्नाला वगैरे जाताना पण मी फारशी तयार नसते. मग या बांगड्या, कानातले यांचे माझ्याकडे कलेक्शन पण नाही. पण याच कारणाने उगाच ते भारीतले घेऊन पडून राहण्यापेक्षा हेच स्वस्तात मस्त बरं असं म्हणून मी इथे खरेदी करते. मागच्या वेळी दादरच्या रानडे रोड वरून जाताना एक पर्स आवडली. फक्त २०० रुपये म्हटल्यावर मी मागचा पुढचा विचार न करता ती घेतली. मी जेव्हा वापरायला सुरवात केली तेव्हा जवळपास सगळ्यानी कुठे घेतलीस, कितीला घेतलीस चौकशी केली. आणि २०० रुपये किंमत ऐकून आम्हाला पण आणायची ना, अश्या कमेंट करून झाल्या. किती बरं वाटलंय माहितेय ? खरं तर त्या फेरीवाल्याने २०० सांगितल्यावर मी घासाघीस केली असती तर किमान १५० ला त्याने सहज दिली असती. पण आमची आजी म्हणते तशी मी म्हणजे,"देई वाणी, घेई प्राणी" या पंथातली. मला भाव करणं, घासाघीस करणं कधी जमलंच नाही. पण तरीही इतरांच्या दृष्टीने ती पर्स स्वस्तच होती. म्हणून मी खुश होते. मग हे लोकलचे फेरीवाले मुळातच ४० नि ५० रुपयाला वस्तू विकत असतात. त्याच्याबरोबर कुठे भाव करायचा असं वाटत. शिवाय बिचारे पोटासाठी कष्ट करतायत असं वाटत.

गेल्या २/३ वर्षात मुंबई त्यातही लोकल वारी अजिबातच झाली नाही. त्यामुळे सध्या काय ट्रेंडिंग आहे माहित नाही. परवा असेच एक कानातले भाचीला देताना आठवले कि हे लोकल मध्ये घेतलेले लांब कानातले जे मी कधीच वापरेल नाहीत. सुदैवाने ते अजूनही चांगल्या स्थितीत असल्याने भाचीने लगेच त्याला कुळ लावून टाकलं. मीही स्वखुशीने आणखी चार जोड तिला देऊन टाकले. तीही खुश मीही खुश. तिला जर या फेरीवाल्यांच्या दुनियेत आणलं तर मला खात्री आहे तीही इथे माझ्यासारखीच रमून जाईल.

धनश्रीनिवास

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

20 Jun 2022 - 4:31 pm | चौथा कोनाडा

छान लेख ! आवडला !

लोकलनं प्रवासाचा function at() { [native code] }यल्प अनुभव. त्यात मुंबईचा जवळजवळ नाही म्हणण्या इतका.
पण ठाण्याला नातेवाईकांकडे गेलो कि तिथल्या बायकांचे लोकल खरेदीचे अनुभव ऐकून भारी वाटतं !
स्त्रीयांसाठी खरेदीचे सुख काही औरच ... आणि फुटकळ दागिने आणि नेहमी लागणारया वस्तूंचे म्हंजे स्वर्गसुखच !

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Jun 2022 - 4:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा एरर हल्ली मलासुद्धा येउ लागलाय मिपावर. काय कारण असेल?