असे देश, अशी नावे !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
6 Jun 2022 - 7:19 am

संपूर्ण जगाचा नकाशा न्याहाळणे हा एक छान विरंगुळा असतो. आज अखेरीस जगभरात एकूण १९६ देश असून याव्यतिरिक्त ‘देशा’चा दर्जा न मिळालेली अनेक बेटे किंवा भूभाग आहेत. (देशांच्या एकूण संख्येबाबत १९५ ते २४९ असे विविध अंक जालावर वाचायला मिळतात; तूर्त तो विषय नाही). नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर शोधण्याचा खेळ शालेय जीवनात बऱ्यापैकी खेळला जातो. गेले काही महिने https://worldle.teuteuf.fr/ या संकेतस्थळावर ‘नकाशावरून देश ओळखा’ हा दैनंदिन खेळ सादर केला जातो. तो नियमित खेळत असताना बऱ्याच अपरिचित देशांचा परिचय झाला. त्यातल्या काहींची नावे कुतुहल चाळवणारी निघाली. त्यांचे उच्चारही मजेशीर वाटले. मग स्वस्थ कुठले बसवणार? त्या नावांची व्युत्पत्ती आणि त्या मागचा इतिहास व भूगोल इत्यादी गोष्टी धुंडाळून काढल्या. त्यातून काही रंजक माहिती गवसली. त्याचे संक्षिप्त संकलन करण्यासाठी हा लेख.

ok

देशनामांच्या विविध व्युत्पत्त्यांवर नजर टाकता बऱ्याच गमतीजमती वाचायला मिळतात. या व्युत्पत्त्यांचे अशा प्रकारे वर्गीकरण करता येते :

1. संबंधित ठिकाणच्या प्राचीन जमाती, राज्य किंवा वंशाची नावे
2. भूभागाचा भौगोलिक प्रकार
3. भूगोलातील दिशा
4. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
5. अनिश्चित/ विवादास्पद व्युत्पत्ती

वरील प्रत्येक वर्गातील काही मोजकी रंजक देश-नावे आता पाहू. उदाहरणे निवडताना शक्यतो मोठ्या देशांऐवजी छोटे, तुलनेने अपरिचित किंवा माध्यमांत विशेष चर्चेत नसलेले देश निवडले आहेत.

१. प्राचीन जमाती / वंशाची नावे
जवळपास एक तृतीयांश देशांची नावे या प्रकारे दिली गेलीत.
क्रोएशिया हा युरोपमधील एक देश. त्याचे नाव एका स्लाविक जमातीवरून ठेवलेले आहे. मुळात हा शब्द इंडो-आर्यन होता. नंतर तो जुन्या पर्शियनमध्ये गेला आणि अखेरीस लॅटिन भाषेत स्थिरावला. या देशात Neanderthals या अतिप्राचीन मानवी पूर्वजांचे जीवाश्म सापडले आहेत.

या गटातील काही देशांची नावे थेट जमातीची नसून त्या जमातींचे गुणवर्णन करणारी देखील आहेत. Burkina Faso असे मजेशीर नाव असलेला हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश. त्याचे जुने नाव Upper Volta हे Volta या नदीवरून ठेवलेले होते. १९८४मध्ये त्याचे नामांतर होऊन नवे नाव लागू झाले. या नावातील दोन शब्द भिन्न भाषांमधले आहेत :
Burkina (Mossi भाषा) म्हणजे प्रामाणिक व सरळमार्गी
Faso (Dioula भाषा) म्हणजे वडिलांचे घर.
थोडक्यात, या देशाच्या नावातून तिथले लोक भ्रष्टाचारविरहित सज्जन आहेत असे अभिप्रेत आहे ! या देशात पूर्वी अनेकदा हिंसात्मक उठाव होऊन सत्तांतरे झालेली आहेत. एक अतिशय अविकसित देश असे त्याचे वर्णन करता येईल.

Guinea हा शब्द नावात असलेले काही देश आहेत. त्यापैकी Papua New Guinea हे एक गमतीदार नाव. यातल्या Papua चा अर्थ (बहुधा) कुरळे केस असलेले, तर Guinea चा अर्थ काळ्या वर्णाचे लोक. हा देश Oceania तील एक बेट आहे. भाषावैविध्य हे या देशाचे वैशिष्ट्य असून तेथे सुमारे ८५१ भाषा प्रचलित आहेत.

ok

२. भौगोलिक प्रकार

जगातील सुमारे एक चतुर्थांश देश या व्युत्पती-प्रकारात मोडतात. बेट, आखात किंवा जमिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलावरून अशा देशांची नावे ठेवली गेलीत.

ok

Sierra Leone हा एक पश्चिम आफ्रिकेतील देश. याचे मूळ नाव पोर्तुगीजांनी ठेवले. त्याचा शब्दशः अर्थ ‘सिंह पर्वतराजी’ असा आहे. परंतु याचा संबंध सिंहांशी अजिबात नाही. तेथील पर्वतराजीतून होणाऱ्या प्रचंड विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेवरून ते नाव दिले गेले आहे. पुढे मूळ नाव इटालिय पद्धतीने बदलून सध्याचे करण्यात आले. हे नाव प्रथम ऐकल्यावर सनी लिओनी या अभिनेत्रीची सहजच आठवण झाली ! 😀

Costa rica हा अमेरिका खंडातील एक छोटा देश. या नावाचा शब्दशः अर्थ किनारपट्टीचा श्रीमंत भाग असा आहे. मूळ नाव (la costa rica) स्पॅनिश भाषेतील असून ते बहुधा नामवंत दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस यांनी दिलेले असावे. त्यांच्या समुद्रपर्यटना दरम्यान ते जेव्हा या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना येथील स्थानिक लोकांनी अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घातलेले दिसले.
या देशाने नागरिकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले असून देशाच्या सकल उत्पन्नातील बऱ्यापैकी भाग शिक्षणावर खर्च केला जातो. या खर्चाचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.

3. भूगोलातील दिशा

सुमारे पंचवीस देशांना त्यांच्या पृथ्वीगोलातील दिशेनुसार नाव दिलेले आहे. त्यापैकी नॉर्वे, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तर सर्वपरिचित देश. त्यांची व्युत्पत्ती अशी :
• नॉर्वे = Northern Way = उत्तरभूमी
• जपान (निप्पोन) = उगवता सूर्य (पूर्व)
• ऑस्ट्रेलिया = दक्षिणभूमी

आता Timor-Leste या अपरिचित देशाबद्दल पाहू.
हा देश आग्नेय आशियातील एक बेट आहे. देशाच्या जोड नावातील दोन शब्दांचा अर्थ असा :
Timor(मलय भाषेत) = पूर्व
Leste(पोर्तुगीज) = पूर्व
हा देश जावा व सुमात्राच्या पूर्वेस असल्याने हे नाव दिले गेले.
येथे पूर्वी दीर्घकाळ पोर्तुगीजांची वसाहत होती. त्यानंतर इंडोनेशियाने लष्करी कारवाई करून तो ताब्यात घेतला होता. 2002 मध्ये त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले. स्वतंत्र अस्तित्व मिळवणारा तो एकविसाव्या शतकातील पहिला देश ठरला. हा अतिशय गरीब देश असून कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेला आहे.

४. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
जगातील सुमारे 25 देश या गटात येतात. त्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेकांची नावे स्थानिक प्रभावशाली पुरुषावरून दिलेली आहेत.

बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातील देश. तो पूर्वी स्पॅनिश लोकांच्या ताब्यात होता. कालांतराने स्थानिकांचे स्पेनविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध झाले. त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नेते Simón Bolívar यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सन्मानार्थ या नव्या देशाला Bolívar असे नाव दिले गेले. पुढे ते मधुरतेसाठी Bolívia असे बदलण्यात आले. हा बहुवांशिक असलेला विकसनशील देश आहे. तेथील भूमी अनेक खनिजांनी समृद्ध आहे.

मॉरिशस या पूर्व आफ्रिकेतील बेटाच्या नावाची कथा तर खूप रंजक आहे. चालू नाव Maurice या डच राजपुत्रावरून दिलेले आहे. परंतु हा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे. सुरुवातीस पोर्तुगीज दर्यावर्दींनी त्याला
Dina Arobi >> Do-Cerne >> Mascarene

अशी नावे दिली होती. त्यानंतर इथे फ्रेंचांची वसाहत झाल्यानंतर त्याचे नाव Isle de France असे झाले. पुढे फ्रेंचांनी शरणागती पत्करून ब्रिटिशांनी यावर कब्जा केला तेव्हा मॉरिशस हे नाव पुन्हा प्रस्थापित झाले.

ओमान
मध्ये खूप तांब्याच्या खाणी असल्यामुळे त्याचे जुने नाव मजान असे होते. पुढे ते संस्थापक पुरुषाच्या नावावरून ओमान करण्यात आले. परंतु या संस्थापक नावासाठी खलील, सीबा आणि इब्राहिम असे तीन ‘ओमान’ दावेदार आहेत !

या गटातील दोन देशनावे स्त्रियांवरुन दिलेली आहेत. त्यापैकी ऐतिहासिक खऱ्या स्त्रीवरून दिलेले (बहुधा) एकमेव नाव म्हणजे St. Lucia.

ok
हे एक वेस्टइंडीज मधील बेट आहे. त्याचे नाव Lucia या संत स्त्रीवरून दिले आहे. कॅथोलिक पंथात ज्या आठ गौरवलेल्या स्त्रिया आहेत त्यापैकी ही एक. या भागातून जात असताना फ्रेंच दर्यावर्दींचे जहाज 13 डिसेंबर रोजी बुडाले. हा दिवस ल्युसिया यांचा स्मृतिदिन असल्याने कोलंबसने त्यांचे नाव या बेटाला दिले. हे बेट त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा मोठा आहे.

५. अनिश्चित/ विवादास्पद व्युत्पत्ती
सुमारे २० देशांच्या बाबत अशी परिस्थिती आहे. त्यापैकी दोन उदाहरणे पाहू.

माल्टा हा पर्यटकांचे आकर्षण असलेला युरोपातील एक छोटासा देश (बेट). किंबहुना स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेले हे एक शहर (city-state) आहे. याच्या दोन व्युत्पती प्रचलित आहेत:
a. ग्रीक भाषेत Malta चा अर्थ मध. या बेटावर एक विशिष्ट प्रकारच्या मधमाशा असून त्यांच्यापासून एक अतिमधुर मध तयार होतो.
b. Maleth या शब्दाचा अर्थ निवारा किंवा बंदर असा आहे.

सरतेशेवटी आपल्या सख्खा शेजारी नेपाळबद्दल. याच्या अनेक व्युत्पत्ती असून भाषातज्ञात त्याबाबत भरपूर मतभिन्नता आहे. ४ प्रकारच्या व्युत्पत्ती प्रचलित आहेत :

a. पशुपती पुराणानुसार ‘ने’ नावाचे मुनी होते (नेमी). त्यांनी संरक्षित केलेला हा प्रदेश आहे.
b. नेपा नावाच्या गुराख्यावरून हे नाव पडले.
c. निपा =पर्वताचा पायथा. आल= आलय= घर. >> पर्वताच्या पायथ्याशी असलेला प्रदेश.
d. तिबेट -बर्माच्या भाषेनुसार:
ने= गाई-गुरे आणि
पा = राखणदार

असे हे व्युत्पत्ती प्रकरण. काही देशांच्या नावांच्या संदर्भात ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध असतात; त्याबाबत दुमत नसते. मात्र जिथे अशी कागदपत्रे उपलब्ध नसतात तिथे भाषा अभ्यासकांना लोककथा किंवा दंतकथांचा आधार घ्यावा लागतो. काही वेळेस मूळ नावांचे अपभ्रंश होत समाजात शेवटी कुठलेतरी भलतेच नाव देखील रूढ होते. अशा तऱ्हेने काही देशांच्या नावाबाबत अधिकृत माहितीखेरीज अनेक पर्यायी व्युत्पत्ती वर्णिलेल्या असतात.

“नावात काय आहे?
” हा शेक्सपिअर निर्मित आणि बहुचर्चित लाखमोलाचा प्रश्न. त्याचे उत्तर, “नावात काय नाही?” या प्रश्नाद्वारेच अन्य कोणीतरी देऊन टाकलेले आहे !

प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. तो आपल्याला कित्येक शतके मागे घेऊन जातो. विविध देशांच्या नावांवरून आपल्या लक्षात येईल की त्यातील बऱ्याच नावांमधून भूगोल देखील डोकावतोय. देशाचे नाव त्या संस्कृतीचे प्रतीक असते आणि तो राष्ट्रीय अस्मितेचाही भाग असतो. नमुन्यादाखल काही देशनावे या लेखात सादर केली. ही छोटीशी जागतिक शब्दसफर वाचकांना रोचक वाटेल अशी आशा आहे.
…………………………………………………………………………………………………………………………………………….
चित्रे जालावरून साभार !

इतिहासलेख

प्रतिक्रिया

तुमचे चौफेर दांडगे वाचन मिपा जगत समृद्ध करते.
येऊ दया अजून असं बरेच काही.
लहानपणी अमृत, ridrers digest, चांदोबाचे अंक लोकप्रभा, साप्तहिक सकाळ असे बहुवाचनीय माहिती असलेली पुस्तके / मासिके वाचली जातं होती.
आताच्या पिढीला ही माहिती एका क्लिकच्या अंतरावर असून त्यात आवड पाहिजे.
काहीवेळा वाटतं की हे माहिती असून काय फायदा चारचौघात हा अतीवाचन करतो पुस्तकी किडा असंही म्हटलं जायचं.

कुमार१'s picture

6 Jun 2022 - 10:32 am | कुमार१

चारचौघात हा अतीवाचन करतो पुस्तकी किडा असंही म्हटलं जायचं.

>>>
मुद्दा बरोबर आहे. याचा सुवर्णमध्य असा साधता येईल.
आपल्या आवडीनुसार झेपेल इतके वाचन आपण करतो. प्रत्यक्ष एखाद्या समूहात वावरताना समोरील लोकांचा अंदाज घेऊन आपल्या व्यासंगाच्या विषयावर मोजूनमापून बोलायचे.
लेखन हे माध्यम आपण निर्वेधपणे वापरू शकतो. हवे ते लिहून ठेवायचे. ज्याची इच्छा आणि आवड असेल तोच ते वाचायला येतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Jun 2022 - 9:30 am | ज्ञानोबाचे पैजार

भारत हे नाव कसे पडले हे माहित असून देखिल इतर देशांची नावे अशी का पडली असतील याचा विचारच केला नव्हता.
पाकिस्तान आणि बांगलादेश ही नावे कशी पडली हे साधारण माहित आहे.
पैजारबुवा,

कुमार१'s picture

6 Jun 2022 - 10:39 am | कुमार१

भारत हे नाव कसे पडले हे माहित असून

>>
याच्या दोन व्युत्पती सर्वपरिचित आहेत (भारतवर्ष आणि भा + रत).
याव्यतिरिक्त काही लिहितो.

मागे एकदा मी स्वातंत्र्य वर्धापनदिनाच्या दिवशी सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम ऐकला होता. त्यात सांगितलेली माहिती अशी होती :

“ब्रिटिशांनी इंडियाची फाळणी केली आणि दोन देश निर्माण झाले. त्यांची अधिकृत नावे अशी ठेवण्यात आली :
१. इंडिया that is भारत

२. इंडिया that is पाकिस्तान.

यातून असे सुचवायचे आहे की, फाळणी झाली ती इंडियाची. नंतर भारत हा पूर्णपणे स्वतंत्र देश निर्माण झाला."

कुमार१'s picture

27 Sep 2022 - 4:38 am | कुमार१

कायदेपंडित जे. साई दीपक यांनी हे पुस्तक चतुष्ट्य लिहिलेले आहे :
India that is Bharat Quadrology

नचिकेत जवखेडकर's picture

6 Jun 2022 - 12:22 pm | नचिकेत जवखेडकर

अरे वा! ही माहिती गोळा करता येऊ शकते ही कल्पना सुचणं हेच भन्नाट आहे :)
जपानबद्दल सांगायचं झालं तर निहोन किंवा निप्पोन हा शब्द जपानी भाषेमध्ये(कांजी मध्ये) 日本 असा लिहिला जातो. 日 म्हणजे सूर्य आणि 本 या कांजीचा एक अर्थ ओरिजिन(उगम?) असा आहे. त्यामुळे सूर्याचा उगम असा अर्थ होतो. अर्थात तांत्रिकदृष्ट्या जपानमध्ये सूर्य सर्वप्रथम उगवत नाही हा भाग वेगळा :)

कुमार१'s picture

6 Jun 2022 - 12:57 pm | कुमार१

तांत्रिकदृष्ट्या जपानमध्ये सूर्य सर्वप्रथम उगवत नाही हा भाग वेगळा :)

अगदी बरोबर !
यासंदर्भात जालावर वाचले असता बरीच उलट-सुलट आणि घोळदार माहिती मिळते.

जपानची तशी नोंद खूप प्राचीन काळी झालेली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा वगैरे गोष्टी अस्तित्वात आल्या आणि संदर्भ बदलले.

काहींच्या मते वर्षाच्या पहिल्या सहामाहीत न्युझीलँड हा प्रथम सूर्याचा मानकरी आहे तर दुसऱ्या सहामाहीत Samoa.
अन्य काहींच्या मते किरिबाटीचा पहिला नंबर आहे वगैरे.

भूगोल अभ्यासकांनी अधिक सांगावे

कर्नलतपस्वी's picture

6 Jun 2022 - 12:42 pm | कर्नलतपस्वी

फावल्या वेळात नकाशा आणी विकी खंगाळायला मला पण आवडते.मस्त वेळ जातो.

नुकताच नायगारा फॉल्सला जाण्याचा योग आला. सर्व प्रथम नकाशावर माहीती शोधत असताना कॅनडा मधे लखनौ नावाचे एक शहर दिसले.

लखनौ माझे आवडते शहर , कुतूहल म्हणून गुगलबुवांना छेडले.

कॅनडाच्या दक्षिण ओन्टारीयो प्रांतात सन १८०० आसपास वसलेल्या निनावी वसाहतीचे नाव उत्तर प्रदेश, भारताच्या लखनौ शहराच्या नावावरून १८५७ मधे ठेवण्यात आले. इथे सुद्धा कॅम्पबेल स्ट्रीट नावाचा रस्ता आहे. उत्पत्तीबद्दल दोन सिद्धांत आहेत - एक म्हणजे मुख्य रस्त्याचे नाव मदत दलांचे नेते सर कॉलिन कॅम्पबेल यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. दुसरे म्हणजे या रस्त्याला समाजाचा पहिला व्यापारी माल्कम कॅम्पबेल यांचे नाव देण्यात आले आहे. लखनौच्या(कॅनडा) अनेक रस्त्यांवर लखनौच्या( उ प्र भारत) मदतकार्यात सहभागी असलेल्या काही ब्रिटिश सेनापतींची नावे आहेत: कॅम्पबेल, रॉस, ऑट्ररम, हॅवलॉक, विलोबी, रोज आणि कॅनिंग.

संपुर्ण जगात सात लखनौ शहरे आहेत.अती उत्तरेला मिनीसोटा,यु एस ए तर अती दक्षिणेला व्हिक्टोरीया,ऑस्ट्रेलियात.

३ लखनौ अमेरीकेत.
२ लखनौ ऑस्ट्रेलियात.
१ लखनौ भारतात.
१ लखनौ कॅनडा मधे.

कुमार१'s picture

6 Jun 2022 - 1:13 pm | कुमार१

७ लखनौ >>> भलतीच रंजक माहिती. छान !
........
अजून काही गमतीजमती :
• ज्या देशांच्या नावांच्या अखेरीस land हा प्रत्यय येतो असे युनोचे सभासद असलेले एकूण १० देश आहेत.
त्यापैकी the Netherlands , New Zealand, Solomon Islands व Marshall Islands ही नावे दोन स्वतंत्र शब्दांनी युक्त आहेत.

• नावात Republic असणारे देश : १२

• नाव United ने सुरवात होणारे देश : ४

नचिकेत जवखेडकर's picture

6 Jun 2022 - 1:27 pm | नचिकेत जवखेडकर

मस्त, रोचक महिती !

सुक्या's picture

7 Jun 2022 - 1:59 am | सुक्या

मद्रास .. ओरेगॉन राज्यात मद्रास नावाचे गाव आहे.
सालेम मासाच्युसेट व ओरेगॉन मम्धे
बरोडा मिशिगन

चौथा कोनाडा's picture

13 Jun 2022 - 5:34 pm | चौथा कोनाडा

सात लखनौ शहरे ....... मस्त, रोचक महिती !

कर्नलतपस्वी _/\_

नेहमीप्रमाणे मस्त लेख. हा खेळ खेळायला मजा येते.

मुक्त विहारि's picture

6 Jun 2022 - 7:34 pm | मुक्त विहारि

वाखूसा

कुमार१'s picture

6 Jun 2022 - 7:48 pm | कुमार१

हा खेळ खेळायला मजा येते.

>>> अगदीच + ११
......

टर्कीने मागच्या आठवड्यात Türkiye असे नामांतर केले. याची कारणे :

Turkey असा गुगलशोध घेतला असता २ अप्रिय अर्थही दिसतात :
१. अमेरिकेतली टर्की पक्षाच्या मांसाची मेजवानी
२. केम्ब्रिज शब्दकोशानुसार ‘मूर्ख माणूस’ व ‘मोठे अपयश’.

https://www.gktoday.in/topic/turkiye-turkeys-new-official-name/
नव्या नावातील ü वेगळाच आहे.

त्या सटिंब u ला उमलाऊट किंवा इंग्रजीत ट्रेमा म्हणतात. A, o आणि u ला ते वापरता येतात.
आपल्या कीबोर्ड वरून आपण ae/ue/oe लिहिलं तरी चालतं.
उच्चार काहीसा ओठांचा चंबू करून करावा लागतो. उदा. Shoen म्हणजे सुंदर, यात o वर टिंबे असतात, e नसतो, आणि उच्चार शोन न करता शएन असा काहीसा होतो.

असेच जर्मन एसझेट म्हणजे डबल एस च्या ऐवजी वापरतात, तो कॅपिटल B सारखा, पण खालचे अर्धवर्तुळ न जोडता तुटक असतो. त्यामुळे suss म्हणजे स्वीट हा शब्द उमलॉट नसतील तर Suess असा लिहिला तरी चालतो. आणि उच्चार सुईस होतो!

आत्ता टर्की असे का करतेय तर त्यांना गेली अनेक दशके युरोपीय समुदायात सामील व्हायचं असल्यानं असा प्रकार केला असावा. जर्मन लोकं मनातून फारच तिरस्कार करतात त्यांचा, पण हा उगाच जवळीक वाढत नेण्याचा प्रयत्न वाटतोय...

त्या सटिंब u ला उमलाऊट किंवा इंग्रजीत ट्रेमा म्हणतात. A, o आणि u ला ते वापरता येतात.
आपल्या कीबोर्ड वरून आपण ae/ue/oe लिहिलं तरी चालतं.
उच्चार काहीसा ओठांचा चंबू करून करावा लागतो. उदा. Shoen म्हणजे सुंदर, यात o वर टिंबे असतात, e नसतो, आणि उच्चार शोन न करता शएन असा काहीसा होतो.

असेच जर्मन एसझेट म्हणजे डबल एस च्या ऐवजी वापरतात, तो कॅपिटल B सारखा, पण खालचे अर्धवर्तुळ न जोडता तुटक असतो. त्यामुळे suss म्हणजे स्वीट हा शब्द उमलॉट नसतील तर Suess असा लिहिला तरी चालतो. आणि उच्चार सुईस होतो!

आत्ता टर्की असे का करतेय तर त्यांना गेली अनेक दशके युरोपीय समुदायात सामील व्हायचं असल्यानं असा प्रकार केला असावा. जर्मन लोकं मनातून फारच तिरस्कार करतात त्यांचा, पण हा उगाच जवळीक वाढत नेण्याचा प्रयत्न वाटतोय...

त्या सटिंब u ला उमलाऊट किंवा इंग्रजीत ट्रेमा म्हणतात. A, o आणि u ला ते वापरता येतात.
आपल्या कीबोर्ड वरून आपण ae/ue/oe लिहिलं तरी चालतं.
उच्चार काहीसा ओठांचा चंबू करून करावा लागतो. उदा. Shoen म्हणजे सुंदर, यात o वर टिंबे असतात, e नसतो, आणि उच्चार शोन न करता शएन असा काहीसा होतो.

असेच जर्मन एसझेट म्हणजे डबल एस च्या ऐवजी वापरतात, तो कॅपिटल B सारखा, पण खालचे अर्धवर्तुळ न जोडता तुटक असतो. त्यामुळे suss म्हणजे स्वीट हा शब्द उमलॉट नसतील तर Suess असा लिहिला तरी चालतो. आणि उच्चार सुईस होतो!

आत्ता टर्की असे का करतेय तर त्यांना गेली अनेक दशके युरोपीय समुदायात सामील व्हायचं असल्यानं असा प्रकार केला असावा. जर्मन लोकं मनातून फारच तिरस्कार करतात त्यांचा, पण हा उगाच जवळीक वाढत नेण्याचा प्रयत्न वाटतोय...

कुमार१'s picture

7 Jun 2022 - 2:38 pm | कुमार१

त्या सटिंब u ला उमलाऊट किंवा इंग्रजीत ट्रेमा म्हणतात

छान माहिती.
इथे दिल्यानुसार मी खालील कोड वापरून पाहिला (वर्डमध्ये). पण नाही टंकले जात.

ü : Alt + 0252.

बहुतेक इंग्लिश देशांमध्ये तशी टंकन समस्या असल्यामुळे ते नवे नाव तिथल्या माध्यमात फारसे वापरले जाणार नाही अशी चर्चा वाचली.

कळफलक सेट करून आपल्यालाही ते लिहिता येते.
युरोपियन भाषांमध्ये चिन्हं वगैरे वैविध्य आहे. टिंब, चंद्रकोर, कॉम्मा, डोक्यावर वर्तुळे, ए ला ई चिकटून लिहिणे, वगैरे.

Orbis keys for diacritics शोधून येल विद्यापीठ संस्थळ पहावे. तिथे शॉर्ट कट कळा दिल्या आहेत.

कुमार१'s picture

7 Jun 2022 - 3:51 pm | कुमार१

युरोपियन भाषांमध्ये चिन्हं वगैरे वैविध्य आहे

>>> +१

येल विद्यापीठ संस्थळ पाहिले. छान आहे.
...
२०१६ पासून Czech Republic चे Czechia झाले आहे.
हे नकाशाच्या खेळातून समजले.

स्मिताके's picture

6 Jun 2022 - 9:23 pm | स्मिताके

मस्त रंजक माहितीपूर्ण लेख.

सुखीमाणूस's picture

7 Jun 2022 - 5:21 am | सुखीमाणूस

नेहमीप्रमाणे विषयाची सुन्दर हाताळणी आणि एका चान्गल्या चर्चेला सुरुवात..

कुमार१'s picture

7 Jun 2022 - 6:19 am | कुमार१

प्रतिसादांमधून खूप उपयुक्त माहिती येत आहे.
वर लखनऊ आणि मद्रास परदेशात असल्याबद्दल आले आहे.

दोन उलटी उदाहरणे पण मला आठवली:
१. वेलिंग्टन आपल्या तामिळनाडूत सुद्धा आहे. या नावाने एक प्रकारे विक्रम केलेला आहे. सुमारे आठ देशात मिळून 39 ठिकाणांना वेलिंग्टन नाव आहे ! ती न्युझीलँडची राजधानी आहे.

२. एक सिंगापूर दक्षिण आफ्रिकेत देखील आहे आणि तेलंगणा राज्यातील सिंगापूरला ‘सेंसस टाऊन’ असा दर्जा आहे. म्हणजे, अजून अधिकृत गाव नाही परंतु पुरेशी लोकसंख्या आहे.

महाराष्ट्रात देखील मी एका आडगावात ‘सिंगापूर’ची पाटी पाहिली होती पण तिची नोंद सापडत नाही.

स्वारगेट वरून सिंगापूरला येष्टी जाते.

कुमार१'s picture

7 Jun 2022 - 8:24 am | कुमार१

म्हणजे थोड्या पैशात गरिबाचे जिवाचे सिंगापूर करून येता येईल !
:)

चंद्रसूर्यकुमार's picture

7 Jun 2022 - 9:30 am | चंद्रसूर्यकुमार

वेलिंग्टन आपल्या तामिळनाडूत सुद्धा आहे. या नावाने एक प्रकारे विक्रम केलेला आहे. सुमारे आठ देशात मिळून 39 ठिकाणांना वेलिंग्टन नाव आहे ! ती न्युझीलँडची राजधानी आहे.

एकापेक्षा जास्त देशात एकाच नावाची इतकी ठिकाणे असतील तर तो नक्कीच विक्रम म्हणायला हवा. पण एकाच देशात एकाच नावाची अनेक ठिकाणे याचा विक्रम वॉशिंग्टन आणि लिंकन या नावांवर असेल हे नक्की. https://www.gl-li.com/2018/01/27/the-most-popular-president-lincoln-or-w... वर दिले आहे की एकट्या आयोवा राज्यात वॉशिंग्टन नावाची ५० पेक्षा जास्त ठिकाणे आहेत. अर्थातच ही सगळी ठिकाणे खूप लहान असतील- आपल्या परिभाषेत एखादं खेडं शोभावी अशी. तरीही अमेरिकेत एकाच नावाची कित्येक ठिकाणे असतात आणि त्यात अशी खेडीच नाही तर मोठ्या शहरांचाही समावेश असतो. पोर्टलंड नावाचे मध्यम आकाराचे शहर मेन राज्यात आहे तर त्याच नावाचे मोठे शहर ऑरेगन राज्यातही आहे. तीच गोष्ट कोलंबस या नावाच्या शहराविषयी. या नावाची शहरे ओहायो आणि जॉर्जिया या दोन्ही राज्यांमध्ये आहेत.

कुमार१'s picture

7 Jun 2022 - 9:41 am | कुमार१

विक्रम वॉशिंग्टन आणि लिंकन या नावांवर

>>> मस्तच !
....
एकाच नावाची गावे/ठिकाणे जगात शोधण्यासाठी हे संस्थळ :
https://geotargit.com/called.php?qcity

चंद्रसूर्यकुमार's picture

7 Jun 2022 - 9:53 am | चंद्रसूर्यकुमार

अरे वा. त्या लिंकवरून कळले की स्प्रिंगफिल्ड नावाची ९ देशांमध्ये मिळून ५८ ठिकाणे आहेत. या ५८ ठिकाणांमध्ये वर म्हटल्याप्रमाणे आयोवा राज्यातील ५० पेक्षा जास्त लिंकन नावाच्या गावांसारख्या लहान ठिकाणांचा समावेश नसावा असे दिसते. नाहीतर कदाचित हा आकडा ५८ पेक्षा जास्त असता.

सुबोध खरे's picture

7 Jun 2022 - 12:05 pm | सुबोध खरे

महाराष्ट्रात अनेक "वडगाव आणि पिंपळगाव" या नावाची गावे आहेत. प्रत्येक जिल्ह्यात निदान एक दोन तरी असतील

श्रीरंग_जोशी's picture

7 Jun 2022 - 8:38 am | श्रीरंग_जोशी

रोचक विषय अन उत्तम मांडणी.

लहानपणी मला अझरबैजान हे देशाचे नाव म्हणजे 'अझहर भाई जान' चा अपभ्रंश वाटायचा :-) .

अमेरिकेत बरेचदा लहानशा खेड्याला जगातल्या प्रसिद्ध शहराचे नाव दिलेले असते. दिल्ली (Delhi) किमान चार अमेरिकन राज्यांमधे आहे. त्याचप्रमाणे बर्लिन व बॉम्बे देखील किमान चार राज्यांमधे आहेत. फ्लोरिडामधे सेंट पीटर्सबर्ग, मेलबोर्न ही गावे आहेत.

महाराष्ट्रातले सिंगापूर माझी मुख्यमंत्री स्व. दादासाहेब कन्नमवार यांच्या पुढाकाराने वसवले किंवा नाव बदललेले गाव आहे असे लहानपणी ऐकले होते.

कुमार१'s picture

7 Jun 2022 - 8:51 am | कुमार१


महाराष्ट्रातले सिंगापूर

>>
सापडले ! रायगडजवळ आहे :

ok

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Jun 2022 - 3:56 pm | अमरेंद्र बाहुबली

महाराष्ट्रात कर्जत नावाचे तीन तालूके आहेत.

गामा पैलवान's picture

7 Jun 2022 - 11:20 pm | गामा पैलवान

किमान तीन खंडाळे आहेत. पहिलं भोरघाटाचं खंडाळे आणि दुसरं रायगड जिल्ह्यातलं खंडाळे. ते बेणे इझ्रायली लोकांचं तीर्थक्षेत्र आहे. तिसरं साताऱ्यापाशी आहे (म्हणे). चौथं नगर जिल्ह्यात आहे म्हणे.
-गा.पै.

जेम्स वांड's picture

13 Jun 2022 - 9:00 am | जेम्स वांड

म्हणजे

पारगाव खंडाळा

आहे

कुमार१'s picture

8 Jun 2022 - 6:12 am | कुमार१

वडगाव, पिंपळगाव, कर्जत व खंडाळा

>>>
पूरक माहितीबद्दल सर्वांचे आभार !

खंडाळा >>> ५ वे उस्मानाबाद जिल्ह्यात सापडले.

वर दिलेल्या जागतिक संस्थळासारखे महाराष्ट्र / भारतासाठी वेगळे सापडत नाही.

निनाद's picture

20 Jun 2022 - 3:42 am | निनाद

५ वे उस्मानाबाद जिल्ह्यात सापडले. याचे नाव धाराशीव असे वापरले पाहिजे. आपणच नाही वापरले तर कोण करणार आहे हा बदल?

नेहमीप्रमाणे उत्तम लेख.

सर्व मोठ्या भौगोलिक खंडांची नावे A ने सुरु होऊन A नेच संपतात. हा योगयोग की अन्य काही ते माहीत नाही.

एक नाव अनेक गावे यात रत्नागिरी (कोंकण आणि ज्योतिबानजीक), औरंगाबाद(महाराष्ट्र आणि बिहार), फोंडा (कोंकण आणि गोवा), देवबाग (कारवार आणि मालवण) (बादवे, फोंडा / पोंडा उच्चारी भेद असू शकतील) वगैरे आठवली.

कुमार१'s picture

8 Jun 2022 - 9:04 am | कुमार१

मोठ्या भौगोलिक खंडांची नावे A ने सुरु होऊन A नेच संपतात

रोचक मुद्दा आहे !
ऑस्ट्रेलिया खंडाबाबत जर आपण काही जाल-प्रश्नोत्तरे वाचली तर करमणूक होते. त्या खंडाला ऑस्ट्रेलिया म्हणायचे की Oceania, यावर घमासान चर्चा झालेल्या दिसतात.
भूगोलानुसार ऑस्ट्रेलिया हा खंड तर Oceania हा ‘भाग (रीजन)’ असे दिसते.

काहींच्या मते, “तुम्हाला ब्रिटिशधार्जिणे शिक्षण मिळाले असेल तर तुम्ही ऑस्ट्रेलिया खंड असेच म्हणणार” वगैरे वगैरे ..... :)

जेम्स वांड's picture

13 Jun 2022 - 8:58 am | जेम्स वांड

कोल्हापूरजवळचा ज्योतिबाचा डोंगर आहे त्याचे नाव "श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी" असे आहे, त्यामुळे कन्फ्युजन तितके होत नाही. अर्थात ज्यांना माहिती आहे त्यांना तसेही कन्फ्युज होणार नाही इतरेजन कन्फ्युज होऊ शकतात.

औरंगाबाद कन्फ्युजिंग आहे, तसेच बारा ज्योतिर्लिंगात वैजनाथ हे कन्फ्युजिंग आहे परळीचा वैजनाथ का देवघर झारखंड येथील बाबा बैजनाथ असे हे कन्फ्युजन आहे

निनाद's picture

20 Jun 2022 - 3:43 am | निनाद

औरंगाबाद कन्फ्युजिंग आहे, म्हणून संभाजी नगर असे यथोचित नाव वापरावे.

कुमार१'s picture

21 Jul 2022 - 5:51 pm | कुमार१

पृथ्वीचा ८वा खंड Zealandia मानला जातो. अर्थात तो 94% पाण्याखाली बुडालेला आहे. उरलेला सहा टक्के जमिनीवर असून त्याचा न्यूझीलंड हा एक भाग समजतात.
अशा देशांच्या सागरी हद्दीवरून बराच खल झालेला आहे. त्या संदर्भात काही आंतरराष्ट्रीय नियमही आहेत.

न्यूझीलंडबाबत एक रंजक माहिती वाचली. जर का त्यांनी सिद्ध केलं, की ते या आठव्या खंडाचेच एक भाग आहेत, तर मग त्यांना त्यांची सागरी हद्द सध्याच्या सहा पट मंजूर होईल !

शेखरमोघे's picture

8 Jun 2022 - 9:28 am | शेखरमोघे

नेहेमीप्रमाणे रोचक आणि माहितीपूर्ण लेख.

Argentina या देशाचे नाव तिथल्या चान्दीच्या (Latin: Argentum) उत्पादनावरून पडले.

अनिंद्य's picture

9 Jun 2022 - 12:45 pm | अनिंद्य

छान लेख

देशांचे नावबदल हा एक रोचक विषय आहे. काही देशांनी अनेक वेळा नामांतर केलेले दिसते. उदाहरणार्थ,
कंबोडियाने चार वेळेस नामांतर करत पहिल्या नावापाशीच वर्तुळ पूर्ण केले !

Kingdom of Cambodia >> Khmer Republic >> Democratic Kampuchea >> State of Cambodia>>> Kingdom of Cambodia.

देशांचे नावबदल हा एक रोचक विषय आहे. काही देशांनी अनेक वेळा नामांतर केलेले दिसते. उदाहरणार्थ,
कंबोडियाने चार वेळेस नामांतर करत पहिल्या नावापाशीच वर्तुळ पूर्ण केले !

Kingdom of Cambodia >> Khmer Republic >> Democratic Kampuchea >> State of Cambodia>>> Kingdom of Cambodia.

कर्नलतपस्वी's picture

12 Jun 2022 - 7:59 pm | कर्नलतपस्वी

बबीना, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश च्या सीमेवरील गाव,खुप जुने व मोठ्ठी छावणी.
या गावात द्वितीय विश्व युद्धात ब्रिटीशांची मोठ्ठी छावणी होती.British Air Base in Native Asia याचे Abbreviation आहे.BABINA

तसेच नागपूर जवळ कन्हान नदी काठी इंग्रजानी तात्पुरती छावणी(Camp (Temp)) उभारली होती त्याचा अपभ्रंश कामटी व स्पेलिंग Kamptee आसे झाले.

आशी अनेक रोचक माहितीवर आधारीत स्वतंत्र धागा बनू शकतो.

कर्नलतपस्वी's picture

12 Jun 2022 - 8:02 pm | कर्नलतपस्वी

Read Army in place of Air

कुमार१'s picture

12 Jun 2022 - 8:52 pm | कुमार१

बबीना आवडली !

रोचक माहितीवर आधारीत स्वतंत्र धागा बनू शकतो.

>>>> जरूर लिहा ...

गामा पैलवान's picture

13 Jun 2022 - 2:03 am | गामा पैलवान

आसामातलं दिग्बोई हे गावाचं नाव Dig Boy यावरनं पडल्याचं ऐकलंय. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Digboi#Etymology
-गा.पै.

mayu4u's picture

17 Oct 2022 - 3:11 pm | mayu4u

New Okhla Industrial Development Authority

जेम्स वांड's picture

13 Jun 2022 - 9:06 am | जेम्स वांड

हलकेफुलके पण ज्ञानवर्धक लिखाण आवडले, आता तुमचे लेखन म्हणले की बेस्ट आहेच हे अध्याहृत असणारच कायम.

वरती बबिना जंक्शनचे नाव अन इतिहास वाचून मजा वाटली कर्नल साहेबांनी दिलेली, कामटी बद्दल तर माहिती होते, बॉम्बे आर्मी ते बंगाल आर्मी जेव्हा एकमेकांत ये जा करत त्याचा टेम्पररी कॅम्प म्हणजे कामटी असे वाचले होते.

असेच मध्य-प्रदेशातील महू (MHOW) बद्दल वाचले होते की त्याचा लॉंगफॉर्म मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर असून त्याचे संक्षिप्त स्वरूप महू आहे, उत्तर प्रदेशात पण एक मऊ जिल्हा असून मला सुरुवातीला हे दोन्ही कायम कन्फ्युज होत असत.

MHOW बद्दल माहिती ऐकीव आहे, खरेखोटे देवजाणे

कुमार१'s picture

13 Jun 2022 - 10:05 am | कुमार१

नेहमीप्रमाणे उत्साहावर्धन केल्याबद्दल धन्यवाद !
पारगाव खंडाळा, रत्नागिरी आणि महु/ मऊ ही माहिती रंजक असून आवडली.
........
सहज म्हणून सांगतो .....
हा लेख अन्यत्रही लिहिला होता. तिथे तो अमेरिकेतील एका बाईंनी वाचला. त्यांची मुले माध्यमिक शाळेत आहेत आणि सामान्य ज्ञान स्पर्धांमध्ये बऱ्यापैकी भाग घेत असतात. या बाईंना तो लेख आपल्या मुलांनीही वाचावा अशी खूप इच्छा झाली. परंतु मुलांना मराठी वाचता येत नसल्यामुळे बाईंनी या लेखाचा इंग्लिश अनुवाद करून त्यांना वाचायला दिला.

लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच रस वाटेल असा हा विषय आहे खरा.

कर्नलतपस्वी's picture

13 Jun 2022 - 12:36 pm | कर्नलतपस्वी

वाॅड भाई,कामटी ही लष्करी वसाहत १८१७च्या सीताबर्डी च्या लढाई नंतर १८२१ मधे इंग्रजांनी वसवली.
इथे काली पलटन,गोरा बझार व लालकुर्ती नावाची ठिकाणे आहेत.

महू, एकेकाळी दक्षिण कमानचे मुख्यालय होते.

इंदोरच्या होळकरांशी १८१७ मधे झालेल्या माहिदपूरच्या लढाई नंतर हे ठिकाण वसवले.

मी वरील सर्व ठिकाणी राहीलो आहे.

चौथा कोनाडा's picture

13 Jun 2022 - 6:12 pm | चौथा कोनाडा

सुंदार माहिती पुर्ण लेख !

धन्यू कुमार१ !

जेम्स वांड's picture

13 Jun 2022 - 9:52 pm | जेम्स वांड

मॅकलॉइडगंज - हिमाचल

डाल्टनगंज - झारखंड

फारबीसगंज - बिहार (बहुतेक फोर्ब्जगंजचा अपभ्रंश असावा)

छावण्यांचा उल्लेख आलाय त्यावरुन, दापोलीला काप दापोली असेही म्हणत असत. श्यामची आई पुस्तकातही काप असा उल्लेख येतो.

बाकी आमच्या कोंकणात वाडी सोबतच 'वडे' ही प्रसिद्ध आहेत. कोतवडे, सैतवडे , बाम्बवडे, राजिवडे अशी गावांची नावे असतात. मुळात वाडा होता किंवा कसे, कल्पना नाही.

कुमार१'s picture

9 Jul 2022 - 12:45 pm | कुमार१

"बांधवाडीचे झाले बांदिवडे" या नावाचा लेख
विजय शेट्टी संपादित
नावांच्या गावा…
या पुस्तकात आहे.

* राजिवडे, नानिवडे >>>
प्रयत्न करूनही 'वडे ' चा उगम काही समजला नाही.
….

विविध देशाच्या नागरिकांना कोणत्या नावाने संबोधतात हा देखील रंजक विषय आहे. भारताच्या बाबतीत आपण फक्त भारतीय एवढेच म्हणतो. परंतु काही देशांच्या बाबतीत नागरिक पुरुष आहे की स्त्री या वरुन वेगळी नावे आहेत. त्यापैकी मला सर्वात गोड वाटलेले म्हणजे
फिलिपिन्सच्या बाबतीतले:

त्यांचा पुरुष फिलिपिनो, तर
स्त्री फिलीपिना असते.
( अर्थात हे सर्व इंग्लिश भाषेच्या संदर्भानुसार).

गामा पैलवान's picture

16 Jun 2022 - 7:13 pm | गामा पैलवान

कुमारेक,

मला वाटतं वडे हा शब्द वडाच्या झाडावरनं आला असावा. नानिवडे म्हणजे वडाभोवती वसलेलं नाणी नावाचं गाव. याबाबत बडोदे शहराचं उदाहरण अगदी चपखल आहे. हिचं मूळ संस्कृत नाव वटोदरा आहे. हिला गुजरातीत वडोदरा म्हणतात तर मराठीत बडोदे. जिच्या उदरात वटवृक्ष आहेत अशी ती वटोदरा नगरी होय. असा मी अर्थ लावला आहे. बडोद्यात आजही चिक्कार वटवृक्ष आहेत.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

16 Jun 2022 - 8:02 pm | कुमार१

चांगली माहिती दिलीत
धन्यवाद !

Nitin Palkar's picture

16 Jun 2022 - 8:03 pm | Nitin Palkar

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि रंजक लेख.

कुमार१'s picture

17 Jun 2022 - 10:33 am | कुमार१

लेखात ज्या Sierra Leone चा उल्लेख आहे तिथे अजूनही तरुणींच्या जननेन्द्रियांला (शिस्निका व काही अन्य भाग) कापण्याच्या अघोरी प्रथा चालू आहेत.
अतिशय निंद्य प्रकार आहे हा.

नवी पिढी त्याविरोधात आवाज उठवत आहे.

जेम्स वांड's picture

17 Jun 2022 - 10:51 am | जेम्स वांड

उर्फ फिमेल जेनाईटल म्युटीलिएशन म्हणतात सिएरा लिओन खूप दूर आहे माझ्या माहिती प्रमाणे भारतात दाऊदी, सुलेमानी आणि अलवी असे बोहरा मुस्लिम समाजातील तीन पंथ ही प्रथा पाळत होते, अर्थात सैफी हॉस्पिटल अन व्यापारातून आलेला पैसा शिक्षण ह्यामुळे ते लोक आता ही प्रथा त्यागत आहेत, त्यांचे सर्वोच्च धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफउद्दीन ह्यांनी पण ही प्रथा त्यागण्याचे व जिथे कायदेशीर असेल तिथेच ही प्रथा पाळण्याचे आवाहन समाजाला केले आहे, मुलांमध्ये फोरस्कीन सर्कमसाईज करतात तसे मुलींत ते लोक क्लायटोरल हूड कट करण्याची विधी करत असत.

कुमार१'s picture

17 Jun 2022 - 11:42 am | कुमार१

पुरुषांची सुंता हा फार सौम्य प्रकार आहे.
तरुण मुलींच्या बाबतीत ‘सुंता ‘ या नावाखाली जे केले जात आहे ते अत्यंत घातक आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, डब्ल्यूएचओ व युनिसेफ या सर्वांचा संयुक्त जाहीरनामा इथे आहे .

त्यातील हे महत्त्वाचे :
या अघोरी प्रकाराचे कोणतेही आरोग्यदायी फायदे नाहीत. ही प्रथा अत्यंत वाईट आहे.

कुमार१'s picture

19 Jun 2022 - 11:37 am | कुमार१

एखाद्या गरीब देशाच्या चलनाचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात सतत ढासळत राहिला तर काही काळाने त्या चलनाचे पुनर्मूल्यांकन करतात.

लेखात उल्लेख असलेल्या Sierra Leone या देशाने नुकतेच तसे केले आहे. हे करताना त्यांनी सध्याच्या चलनाच्या किमतीला 1000 ने भागायचे ठरवले आहे.
आता त्यांच्याकडील सर्वाधिक किमतीची १०,००० Le ची नोट फक्त १० Le ची होईल.

गेल्या काही वर्षांत झिंबाब्वे आणि तुर्किये सकट अन्य काही देशांनी अशी कृती केलेली आहे.

जेम्स वांड's picture

19 Jun 2022 - 11:25 pm | जेम्स वांड

जगातील कुठल्याही भूभागापासून दूर असणारे आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या जवळपास मध्यात वसलेला चिमुकला २५१ +/- लोकसंख्या असणारा ट्रिस्टन द कून्हा द्विपसमूह !

ब्रिटिश ओवरसीज टेरीट्रीचा भाग असणारे ट्रिस्टन द कून्हा द्विपसमूह

केप टाऊन किनाऱ्या पासून २७८७ किलोमीटर
सेंट हेलेना बेटांपासून २४३७ किलोमीटर
आणि

फॉकलंड बेटांपासून ४००२ किलोमीटर अंतरावर आहे, इथं एअरस्ट्रीप नाही, त्यामुळे सगळ्यात जवळचा अन लवकर होणारा प्रवास म्हणजे सहा दिवसांचा केप टाऊन पर्यंतचा बोटीचा प्रवास होय.

गर्दी अन जगापासून दूर कुठंतरी जायची ईच्छा असणाऱ्या लोकांसाठी आयडियल डेस्टिनेशन ??

.

ट्रिस्टन द कून्हा चे जमिनीपासून असलेले ढोबळ अंतर आणि त्याचे दक्षिण अटलांटिक मधील स्थान

.

ट्रिस्टन द कून्हाचा जुना नकाशा

परमहंस नित्यानंद ह्या सत्पुरुषाने एक बेट विकत घेऊन "कैलास" नावाचे हिंदू राष्ट्र वसवले आहे अशी एक बातमी कायप्पावर फिरत होती. असे कैलास नावाचे राष्ट्र खरंच अस्तित्वात आहे का?

हिंदू राष्ट्र कैलासा

कैलासा हे राष्ट्र अस्तित्त्वात आहे.
त्रिनिदाद आणि टोबॅगो इक्वाडोर जवळील एका लहानशा बेटावर पहिले हिंदू राष्ट्र वसवले गेले आहे. जगात हिंदूंना कोणताही देश नसल्याची परिस्थिती पाहून हे राष्ट्र निर्माण केले गेले आहे. कैलासा राष्ट्र जगभरातील विस्थापित हिंदूंसाठी असल्याची घोषणा आहे. नवीन निर्माण केलेले हिंदू राष्ट्र केले आहे. हे पासपोर्ट, चलन आणि इतर कागदपत्रे आपल्या नागरिकांना देते. इ.स. २०२० मध्ये, गणेश चतुर्थीच्या दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ कैलासाची सुरुवात केली गेली आहे. या हिंदू देशाचे अधिकृत चलन कैलाशियन डॉलर असे आहे. हे सोन्याचे आहे! नाण्यांची रचना प्राचीन प्रथम हिंदू राष्ट्रच्या चलनाने प्रेरित आहे. जगभरातील हिंदू या देशाच्या नागरिकत्वासाठी पात्र आहेत.

सनातन हिंदू धर्माचे रक्षण आणि संरक्षण आणि ते संपूर्ण जगाला सांगण्यासाठीच नव्हे, तर जगाला अद्याप अज्ञात असलेल्या छळाची कथा सांगण्यासाठीही कैलासाची निर्मिती करण्यात आली. या ध्येयाच्या दिशेने, कैलासा प्रामाणिक हिंदू धर्मावर आधारित प्रबुद्ध संस्कृती आणि सभ्यतेचे संरक्षण, पुनर्संचयित आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी समर्पित आहे.

या देशाला जाण्यासाठी पर्यटकांसाठी विशेष तीन दिवसीय व्हिसा दिला जातो.
ऑस्ट्रेलियातून, कैलासाची स्वतःची चार्टर्ड फ्लाइट सेवा आहे. याच सेवेचा वापर करून या देशात उतरण्याची सुविधा आहे. हिंदूविरोधी शक्तींमार्फत घातपात होण्याच्या प्रयत्नांमुळे सार्वजनिक प्रवास कंपन्यांना खूप मोकळीक दिली जात नसावी असे दिसते. कैलासाला जाणार्‍या सर्व प्रवाश्यांना त्यांच्या वास्तव्यादरम्यान भोजन आणि निवास प्रदान कैलासातर्फे दिले जाते.

व्यवस्थापनसाठी वाणिज्य शिक्षण आरोग्य गृहनिर्माण मानव सेवा माहिती प्रसारण इत्यादी विभाग कार्यान्वित केले गेले आहेत.

राष्ट्रीय वृक्ष: वटवृक्ष
कैलास राष्ट्रगीत:
श्री मीनक्षी सुन्दरेश्वराभिन्न स्वरूप। परशिव पुत्ररत्न कुमार। गुरुमन्य तुल्यवतार। श्री पार्वती स्थन्यपानलब्ध दिव्य ज्ञान विश्रुत। सकल निगमागमसार भूत। द्राविड वेद प्रवक्तृ। श्रीमत् परमशिव करुणा समधिगत मुक्तामय चतुरश्रयाण गीयमान छत्र चामर श्रीचिह्नकाहलादि समस्त बिरदावल्यलङ्कृत ज्ञानविज्ञान चक्रवर्ति। अशी सुरुवात आहे.

अधिक माहिती https://gov.shrikailasa.org/

छान.
वरील सर्व पूरक उपयुक्त माहितीबद्दल आभार

स्वतंत्र हिंदू देश तयार व्हायला तर हवा आहे. एखादा देश निर्माण कसा होतो हे मात्र रोचक आहे. सामान्य आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेवर कोणतेही लागू प्रतिबंध नाहीत. म्हणजे कोणताही प्रदेश स्वतंत्र व्हायला आंतरराष्ट्रीय कायद्याने आडकाठी नाही. मात्र ज्या राष्ट्रापासून हा भूभाग स्वतंत्र होऊ इच्चितो त्याने ते मान्य करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे एक तर भूभाग विकत घेतला पाहिजे. किंवा जगातल्या कोणत्या तरी एका राष्ट्राने तरी राजनैतिक संबंध असण्याला मान्यता दिली पाहिजे.

पण देशांनी द्विपक्षीय राजनैतिक संबंध राखले नाहीत म्हणजे त्यांचे स्वातंत्र्य अस्तित्त्वात नाही असा अर्थ होत नाही. जसे १९४८ मध्ये इस्रायल सरकारला युनायटेड स्टेट्सने ताबडतोब मान्यता दिली! पण हे प्रदेश मोठे आहेत.
अगदी लहान देश स्वातंत्र्य घोषीत करत असतील बहुदा दुर्लक्ष्य केले जाते - कारण बहुदा आर्थिक आणि लष्करी बळ नसतेच!

या आधीही असे भारताबाहेर हिंदू देश स्थापनेचे प्रयत्न झाले आहेत का? तर हो!

महर्षी महेश योगी यांनी असे अनेक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या देशाचे चलन राम आहे. काही युरोपियन आणि यूएस शहरांमध्ये या राम चलनाला मर्यादित मान्यता होती. हे चलन आयोवामध्यहेही वापरले गेले आहे आणि नेदरलँडमध्ये देखील मान्यता दिली गेली आहे.
आणि त्याच्या राजधान्यांमध्ये अमेरिकेतील महर्षी वैदिक शहर, आयोवा आणि व्लोड्रॉप यांचा समावेश आहे. येथे पहा

आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील देशांशी संपर्क साधून या देशाला मान्यता मिळवण्याचे प्रयत्न झाले आहेत. तुवालु येथील काही बेटे ताब्यात घेऊन त्यावर स्वतंत्र हिंदू देश तयार करण्याचा ही प्रयत्न झाला आहे. कोस्टा रिकामध्ये असा प्रयत्न झाला. येथे तर स्थानिक भारतीयाला येथील समाजाचा राजा म्हणून नियुक्त करण्यासाठी समारंभ आयोजित करण्यात आला होता. पण स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला म्हणून यांना देश सोडण्याचे आदेश दिले गेले हे फार वाईट झाले.

अजूनही आशा मावळलेली नाही. भारताबाहेर एक तरी स्वतंत्र हिंदू देश स्थापनेचे प्रयत्न होतील अशी खात्री आहे.

कुमार१'s picture

21 Jun 2022 - 3:16 pm | कुमार१

आज 21 जून. वर्षातील सर्वात मोठा दिवस.! पृथ्वीवरील खालील देशांत काही ठिकाणी तो तब्बल 21 तासांहून अधिक काळ असणार आहे:

Iceland, Greenland, Alaska, Canada, Norway, Sweden, Finland, Northern Russia, and the North and South Poles

कुमार१'s picture

22 Jun 2022 - 5:14 am | कुमार१

वरील यादीत शेवटी फक्त उत्तर ध्रुव असे हवे आहे
South pole चुकीने लिहिले गेले.

कुमार१'s picture

23 Jun 2022 - 3:38 pm | कुमार१

इंग्लंडमध्ये Stonehenge हे एक जागतिक वारशाचे ठिकाण आहे. इथे दरवर्षी लोक 21 जून ला सूर्योदय पाहण्यासाठी जमतात आणि मोठा उत्सव असतो कोविड काळात तो होऊ न शकल्याने यंदाचा उत्साह जोरदार होता

मदनबाण's picture

24 Jun 2022 - 9:55 pm | मदनबाण

युगांडा हा देश आणि इथियोपियाची राजधानी अदिस आबाबा ही दोन नावे माझ्या टाळक्यात पटकन आली ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithala Konta Zenda | Dnyaneshwar Meshram |

कुमार१'s picture

25 Jun 2022 - 5:51 am | कुमार१

*युगांडा हा देश >>>

हे नाव शालेय जीवनात विद्यार्थ्यांमधील चिडवाचिडवी आणि गमतीजमतीमध्ये चांगलेच वापरात असते !
...
यावरून आचार्य अत्रे यांचा,
" या न्यायाने लंडन तर महाराष्ट्रात हवं होतं."
हा गाजलेला विनोद आठवला

तो कितीही वेळा सांगितला गेला तरी हास्याचे धबधबे उसळत असत. :)))

कुमार१'s picture

26 Jun 2022 - 9:52 am | कुमार१

दोन मोठ्या देशांच्या सीमेवर जर एखादा भूभाग असेल तर दोन्ही देश तो बळकावण्यासाठी उत्सुक असतात. पण या वृत्तीला अपवाद म्हणून Bir Tawil (= उंच विहीर) चे उदाहरण पाहता येईल.

इजिप्त व सुदान यांच्या सीमेवरील हा छोटासा भूभाग. परंतु या दोन्ही देशांपैकी कोणीही त्याच्यावर हक्क सांगायला तयार नाही ! (अर्थात यामागे काही अन्य कारणे आहेत).

Alastair Bonnett यांच्या मते पृथ्वीवरील राहण्यायोग्य पण अद्याप बिलकूल वस्तीविरहित राहिलेला असा हा एकच भाग असून कुठल्याच देशाने त्यावर हक्क सांगितलेला नाही.

त्याला एक सूक्ष्मदेश म्हटले जावे असे काहींनी सुचवले आहे.

गामा पैलवान's picture

26 Jun 2022 - 12:49 pm | गामा पैलवान

कुमारेक,

बीर तवील हे नाव जाम रोचक आहे. बीर म्हणजे विहीर दिसतंय. तवील म्हणजे उंच असावं बहुतेक. मुंबईच्या जवळ बदलापूर येथे तवली ( की टवळी ) नामे डोंगराचं शिखर आहे. या नावांतलं साधर्म्य शोधायचा प्रयत्न करायला आव.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

26 Jun 2022 - 1:19 pm | कुमार१

त्या दोन शब्दांचे बृहदकोश असे अर्थ देतो आहे:

तवली
स्त्री. १ (खा. व. बे.) धातूचें, मातीचें पसरट आकाराचें थाळीसारखें भांडें.
…..
टवळी
3. The fore part of the skull, sinciput.

याचा त्या आकाराची काही संबंध असावा काय?

कुमार१'s picture

27 Jun 2022 - 3:06 pm | कुमार१

आज Dijibouti या देशाचा स्वातंत्र्य वर्धापन दिन असल्यामुळे गुगल डुडल त्यांचे आहे.

कुमार१'s picture

29 Jun 2022 - 10:39 am | कुमार१

राष्ट्रकुल एक मोठा देशसमूह आहे. 1952 मध्ये जेव्हा एलिझाबेथ राणी त्याची प्रतिकात्मक प्रमुख झाली तेव्हा त्यात फक्त ८ देश होते.

आज ही संख्या ५६ झाली आहे. त्यापैकी TogoGabon हे दोन देश नुकतेच सभासद झालेले आहेत.

अन्य काही देश या समूहातून पूर्वी बाहेर पडले आहेत.

कुमार१'s picture

4 Jul 2022 - 8:48 am | कुमार१

जगातील तीन देशांचे (San Marino, Vatican City व Lesotho ) एक समान भौगोलिक वैशिष्ट्य आहे.
या प्रत्येक देशाभोवती संपूर्णपणे दुसऱ्या देशाने वेढा घातलेला आहे.
या तिघांना enclave असे म्हणतात.

Enclave व वेढणारे देश कंसात असे :
San Marino (इटली)
Vatican City (रोम, इटली )
Lesotho (द. आफ्रिका)

ok

चित्रसौजन्य : विकी.

कुमार१'s picture

7 Jul 2022 - 8:32 pm | कुमार१

ज्या देशनावाचे इंग्लीश स्पेलिंग काहीसे मजेदार आहे तो म्हणजे रवांडा ( Rwanada). या देशाची तीन ठळक वैशिष्ट्ये आहेत :

१. एका बाबतीत त्यांनी जगात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांच्या संसदेत महिला खासदार बहुसंख्येने आहेत.
सध्या एकूण खासदारांपैकी ६१ % खासदार स्त्रिया आहेत. असे होण्यामागे अंशतः एक भीषण घटना कारणीभूत आहे. 1994 मध्ये तिथे एका वंशाच्या दहा लाख लोकांच्या अवघ्या तीन महिन्यात ठरवून हत्या करण्यात आल्या. त्यानंतर राहिलेल्या लोकसंख्येमध्ये स्त्रियांचे प्रमाण 60 ते 70 टक्के असे राहिले.

२. प्लास्टिक-बंदीची कठोर अंमलबजावणी

३. गोरिला माकडांच्या १० प्रजाती उद्यानात ठेवल्या आहेत. त्या जगातील सर्वाधिक आहेत.

कुमार१'s picture

7 Jul 2022 - 8:35 pm | कुमार१

Rwanda असे वाचावे.

कुमार१'s picture

16 Jul 2022 - 9:03 am | कुमार१

सध्या अंटार्टिकावर सलग संपूर्ण रात्र चालू आहे.

परंतु तेथून ७००० किमी दूर असलेल्या टोंगामधील ज्वालामुखीच्या प्रकाशामुळे तिथे आसमंत उजळून निघत आहे. त्याचे काही सुंदर फोटो इथे पाहता येतील.:

कुमार१'s picture

7 Aug 2022 - 9:55 am | कुमार१

बऱ्याच देशनावांचा उगम खालील क्रमाने विकसित होत गेलेला आहे :

१. संबंधित ठिकाणी असलेली नदी/ झरा/ तलाव यांचे नाव (hydronym)
२. त्यावरून ठिकाणाचे नाव पडणे (toponym)
३. त्यावरून वंशाचे किंवा देशाचे नाव (ethnonym)

देशाच्या दिलेल्या नावांमध्ये दोन प्रकार पडतात:
a. देशाबाहेरील लोकांनी ठेवलेले नाव (exo..)
b. अंतर्गत नाव (endo..)

कुमार१'s picture

8 Apr 2023 - 9:05 am | कुमार१

4 एप्रिल 2023 रोजी फिनलंड हा नाटोचा 31वा सदस्य देश बनला आहे.

***
फिनलंड म्हटले की नोकियाची आठवण येणे अपरिहार्य आहे.
नोकिया तर आपल्या हातातून केव्हाच गेला
पण..
'एखाद्याचा नोकिया होणे' हा वाक्प्रचार मात्र रूढ झाला !