बाहेरच्या अंधाराला सकाळच्या धुक्याची जोड आहे. वातावरण अधीकच गहिरे झालंय. अशा वेळेस आपल्या एकटेपणाची जाणीव जास्तच होते.
पैंजणाच्या घुंघरांचा आवाज येतो. मी चमकून समोर पहातो. समोरच्या धुक्यातून एक आकृती जवळ येताना दिसते. मी सावध होतो. हात मंचकाशेजारी ठेवलेल्या खड्गाकडे जातो. पण तो तेथपर्यंत पोहोचत नाही. मधेच थांबतो. धुक्यातून येणारी आकृती म्हणजे तू आहेस. हे जाणवताच मी थबकतो
मागील दुवा : माझी राधा -८ http://misalpav.com/node/50263
राधा ? आत्ता..... या इथे..... की मग आणखी कोण ? राजाला त्याच्या अंगी जात्याच सावधपणा ठेवावा लागतो. कोण कसल्या रूपात येईल सांगता येत नाही. माझा हात पुन्हा एकदा खडगा कडे वळतो. पण ती वेळच येत नाही.
अंधारातून तू माझ्या समोर येतेस. गवाक्षातून मी तुला स्पष्ट पाहू शकतो.
लगबगीने पुढे होत मी गवाक्षा शेजारीच असलेले वाटीकेला जाण्यासाठी असलेली द्वारीका उघडतो . राधा...... तु आत्त्ता या इथे? माझ्या स्वरात मोद , आश्चर्य , उत्साह , उत्कटता , आतूरता आणि बरेच काही शब्दात न मांडता येण्याजोगे.... असे बरेच भाव आहेत. आवाजातली उत्कटता माझी मलाच जाणवते. यात्रीत हरवलेल्या लहान बालकाला त्याची आई ,सखी अचानक दिसावी आणि त्याच्या मनातली व्याकुळता संपावी तसे काहीसे.
राधा? ....... मी पुढे होतो. माझा अजूनही डोळ्यांवर विश्वास बसत नाही. मन द्विधा झालंय. राधा! की मग कोण्या शत्रूचा हेर.... दुसरे मन म्हणतंय ... छे.. शत्रूचा हेर इतर कोणत्याही रूपात येईल. राधेच्या रूपात आला तर तो शत्रूत्वच विसरून जाईल.
माझी साशंकता ओळखून तु पुढे होतेस.
माझ्याकडे पाहून प्रेमभराने हसतेस. तेच हसू. रेखीव डोळ्यातले निरागस हसू. तुझे हसणे पाहून सगळ्या शंका निरसून जातात.
राधा..... माझा प्रश्नार्थक स्वर?
हो... राधाच. तीच गोकुळातली राधा. तुझ्या चेहेर्यावरचे खूप जुन्या ओळखीचे भाव. मला अचानक पुन्हा लहान झाल्यासारखे वाटतय. सुदामा भेटायला आला होता तेंव्हा देखील असेच वाटले होते.
तुला असे अचानक पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे.मला काही सूचतच नाही. साधे तुला वाटीकेच्या दारातून प्रसादात न्यायचेही सूचत नाहिय्ये. मी तेथेच उभा आहे.
माझे हे असे थबकणे तुला अपेक्षीत असावे.
का थांबलास? गोकुळात पुन्हा येशील म्हणून तुझी खूप वाट पाहिली मी. जाताना तुला निरोप द्यायला मुद्दामच समोर नाही आले. पण शेवटी रहावले नाही. म्हणून जाताना तुझी बासरी घेतली.
राधा...... माझ्या तोंडून इतकेच शब्द येतात. मनात एकाच वेळेस सहस्त्र भावना याव्यात आणि त्या व्यक्त करायला शब्दच सापडू नयेत. अशी माझी अवस्था झाली आहे.माझ्या डोळ्यातून अश्रु आत्ता बाहेर येतील इतके डोळे दाटून आलेत.
तू पुन्हा हसतेस. त्य अहसण्याने मी शांतावतो. आईने लहान बाळाला मायेने थोपटावे आणि रडण्यार्या बालकाने शांत व्हावे तसा. माझं हे अधीर रुपडं पाहून मीच चकित झालोय.
राधा......
हो मीच. तुला भेटायला आलेय.
इतक्या दूर? गोकुळाहून थेट द्वारकेला? अगोदर का नाही कळवलं. दूत पाठवला असता तुला आणायला.
त्याची काहीच गरज नाही. तुला भेटावेसे वाटले म्हणून आले. तू सहज बोलतेस.
आज इतक्या वर्षांनी? कशी आहेस? मला खरेतर खूप काही बोलायचे आहे. पण इतकेच बोलून मी तुझ्या कडे पहात रहातो. जितके बोलायचे आहे त्यापेक्षाही तुझ्या कडून खूप काही ऐकायचंय. तू माझ्याकडे पहात हसत रहातेस. आणि थांबतेस.
तुला पहायचं होतं. इतकेच. बस्स.
मला नक्की काय बोलायचं हे सूचत नाहिय्ये. .... पुढचे काही क्षण एक अस्वस्थ शांततेचे. मला ती शांतता असह्य होते.
गोकूळ ते मथूरा अंतर ते कितीसे! अवघे २० योजना. तिथे यायचं होतं.
हो आलं असतं की तेथे भेटता . तिथे तू मथुरेचा राजा होतास. मला राजाला भेटायचं नव्हते. एका विजयी वीराची , एका सम्राटाची भेट घ्यायची नव्हती. मला तो माझा गोकुळातला कान्हा हवा होता. मथुरेतल्या राजकारणाच्या गर्दीत तो हरवला होता. मोठमोठ्या स्वार्यांचे बेत आखणे आणि बळाच्या जोरावर राज्ये जिंकणे यात तू मग्न होतास. माझ्या सारख्या एका सामान्य गवळणीचा तेथे काय पाड लागणार होता.
मग इंद्रप्रस्थाला... नको असतानाही माझ्या तोंडून काहितरी शब्द निघून जातात.
इंद्रप्रस्थाला! तेथे तू त्याही पेक्षा मोठा होतास. सल्लागार होतास. मित्रांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी हस्तिनापूरच्या राजदरबारात शिष्ठाई करत होतास.
एक महायुद्ध आखण्यात मग्न होतास. नीतीकार होतास. रणांगणावर वीरांना शौर्य देणारा क्षत्रीय होतास. भर युद्धात उपदेश करणारा योगेश्वर होतास.
माझ्या साठी राजा , वीर, सम्राट , क्षत्रीय , योद्धा , योगेश्वर, वार्ष्णेय , रिपुदमन, चक्रपाणी हे सगळे एक सारखेच शब्द आहेत. संघर्ष युद्ध , लढाया नुसते हिंस्रता सांगणारे.
मग इथे....
मला माहीत आहे इथे तू द्वारकेचा सम्राट आहेस. पण इथे येण्यासाठी अगोदर तू रणछोडराय झालास. मथुरेच्या नागरीकांना वारंवार होणार्या जरासंधाच्या आक्रमणांपासून त्रास होऊ नये म्हणून तू रणछोड म्हणजे पळपुटा अशी अवमानना स्वतःला लावून घेतलीस. आणि राज्यातील निष्पाप नागरीकांना वाचवलेस.
म्हणजे. ....
मला माझ्या कान्ह्याला भेटायचेय. तोच गोकुळातला अवखळ कान्हा , निरागस खोड्या करणारा, गाई चरायला नेणारा , निसर्गाच्या संगतीत जगणारा आनंदी कान्हा. उत्साहाने सळसळणारा , आपल्याच नादात असणारा, आनंदाने बासरी वाजवणारा कान्हा. त्याला भेटायचं मला. आहे तो इथे?
तुझ्या प्रश्नांने मी निरुत्त्तर होतो. गोकुळातला तो निरागस कान्हा मीच हरवून टाकला आहे. एक एक जबाबदार्या घेत गेलो. राजकारणात टिकायचे असेल तर निरागस राहून चालत नाही. म्हणून कुटीलता शिकत गेलो. सामर्थ्य हाच तुमचा गुण असतो जो तुमच्यावर आक्रमण करणारांना आक्रमणाच्या विचारंपासूनही दूर ठेवतो. म्हणून इतरांना हाणून, ठार करून, मी सामर्थ्यवान बनत गेलो. राजकीय तडजोडी करत गेलो. व्यवहाराची नाती जोडत गेलो. मोठा होत गेलो. पण त्या खटाटोपात एकमेकांशी खेळताना सहज निरुद्देश मैत्री करण्याची भावना विसरत गेलो. कुठे गेला तो कान्हा . मी मलाच स्वतःमधे शोधत रहातो.
तू हसतेस. यावेळेस थोडी वेगळी. कदाचित तुला माझ्यात कुठेतरी तो कान्हा दिसला असावा.
मी कसनुसा हसतो. " मी हरलो राधे. तो कान्हा हरवला आहे . मीच ...." मग आहितरी सारवासारव करण्यासाठी विचारतो." सांग तू कशासाठी आली होतीस"
कशासाठी म्हणजे ? माझा प्रश्न तुला समजत नाही. मला काहीच नको आहे. फक्त तुला पहायचे होते.
अगं मी द्वारकेचा राजा आहे लोक दूरदुरून येतात भेटायला , प्रत्येकाचे काहीना काही काम असते.
तू माझ्याकडे एकटक पहातेस.तुझे डोळे भरून आलेले आहेत.
तू आर्जवी डोळ्यानी विचारतेस.... काय देणार आहेस.? कान्ह्या देणार असशील तर ते गोकुळातले ते क्षण दे. भान विसरून मी कुंजवनात बासरी ऐकत असायचे ते क्षण दे पुन्हा. गोकुळात मित्रांसमवेत तू यमुनेच्या डोहावर मनसोक्त खेळायचा ... ते क्षण दे. निरागस खोड्या करत घरातले दही लोणी पळवायचास ते क्षण दे. नंदवाड्याबाहेर वसंतोत्सवात सगळे भेदाभेद विसरून उत्साहाने रंग उधळायचा तो उत्साह दे. यमुनेच्या तीरी गोपाल मित्रांसोबत कोणाला काही कमी पडू न देणारा तो गोपाळकाल्याचा घास दे. देतोस हे?
मी पुन्हा निरुत्तर.
मला काहीच नको आहे रे. ती गोकुळातली परकर्या वयातली राधा. तीने तुझ्या निरागसपणावर प्रेम केलं होतं. तुझ्यातला तो लहानगा खट्याळ मुलगा मला भावला. तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही माझी. सांग ना काय अपेक्षा करतो आपण लहानग्याकडून. त्याचं हसणं आनंदी असणं हेच आपल्याला कितीतरी देऊन जातं.
"तरीपण".... मी विचारायचा एक क्षीण प्रयत्न करतो. या क्षणी राधेच्या त्या निरपेक्ष प्रेमापुढे आपण किती हतबल आहोत हे जाणवतं. माझे शब्द किती पोकळ आहेत हे मलाच जाणवतं.
खरेच रे काहीच नको. ..... मी तुझी राधा आहे हे इतकेच मला बास आहे.
माझी राधा....... त्या शब्दांनी माझे अंग न अंग रोमांचित होते. एका कसल्याशा अनाकलनीय जाणीवेने मी शहारतो.
माझी राधा.... हो. ते मोरपीस मी आहे म्हणणारी माझी राधा. कान्ह्यावर निरपेक्ष प्रेम करणारी राधा.
कधी जर मला इतिहासात स्थान मिळाले तर लोकांनी माझ्या अगोदर तुझे नाव घ्यावे एवढे तरी मी करू शकेन . अर्थात हे माझ्या हातात नाही. पण इतकी इच्छा करू शकेन.
माझी राधा..... माझी राधा...
मी पुटपुटतोय..... अचानक माझ्या हातावर काहीतरी पडले. कुठूनतरी वार्याने एक मोरपीस येऊन माझ्या हातावर टाकले होते. त्या मोरपिशी स्पर्षाने मी भानावर येतो.
समोर काहीच नाही. माझ्या कानात कोणीतरी कुजबुजतय " मी ते मोरपीस आहे असे समज......"
मी पुटपुटत रहातो. माझी राधा ... माझी राधा.......
(समाप्त )
प्रतिक्रिया
31 May 2022 - 4:55 pm | कर्नलतपस्वी
राधेचा , कृष्ण गोकुळातून गेल्यावर पुन्हा कुठेच उल्लेख नाही. काय झाले असेल हा प्रश्न अनुत्तरीतच राहीला आहे.काही संदर्भ असेल तर लिहा किवा व्यनि करा.
चांगले मुक्तक.
31 May 2022 - 6:15 pm | विजुभाऊ
राधा तीचा नवरा अनय याच्या सोबत राहिली.
कृष्ण एकदा मथुरेला गेल्यानंतर पुन्हा गोकुळाला आला नाही.
कृष्णाची आणि राधेची पुन्हा भेट झालीच नाही.
31 May 2022 - 6:20 pm | विजुभाऊ
ब्रम्ह वैवर्त पुराण आणि गर्ग संहितेनुसार राधा कदली वनात निघून गेली. आणि छाया रुपात तेथेच राहिली. असे म्हणतात.
राधा होती की नाही याबद्दल मतांतरे आहेत.
महाभारतात आणि भागवत ग्रंथात राधेचा उल्लेख येत नाही.
31 May 2022 - 9:17 pm | सुखी
बऱ्याच दिवसांनी तुमचं लेखन वाचून शांत वाटलं... सध्याच्या भाऊगर्दीत हे लेखन वेगळं उठून दिसतय ... __/\__
लिहिते रहा
1 Jun 2022 - 1:55 pm | ज्ञानोबाचे पैजार
सगळे भाग वाचले आणि आवडले,
हा शेवटचा भाग विशेष भावला,
आता पुढे काय?
पैजारबुवा,
2 Jun 2022 - 2:24 pm | विजुभाऊ
पुढे काय?
कथा समाप्त झाली.
राधेचे पुढे काय झाले यावर बरीच मतांतरे आहेत.
राधा लोकवाङ्मयात अमर झाली हे मात्र खरे.
राधे कृष्ण म्हनताना आजही कृष्णाच्या अगोदर राधेचे नाव घेतले जाते.
मात्र विठ्ठल रखुमाई म्हणताना ही रुक्मिणीचे नाव नंतर येते
2 Jun 2022 - 2:34 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवं इजुभाव तुमी शिरशकातच "अंतीम" असे लिवले आहे त्या बद्दल काय बी सवाल न्हाई,
म्या इचरत हुतो "दोसतार" जाली "ध्रांगध्रा" जाली "राधा" जाली आता फुडं काय?
पैजारबुवा,
2 Jun 2022 - 4:08 pm | विजुभाऊ
नक्की लिहीतो.
21 May 2023 - 6:37 pm | विजुभाऊ
पुढे हे
https://www.misalpav.com/node/51312
2 Jun 2022 - 4:52 pm | श्वेता२४
खूप आवडलं
21 May 2023 - 11:35 pm | सुखी
आवडले विजुभाऊ...
22 May 2023 - 8:57 am | श्रीगणेशा
खूप छान!
----
पूर्ण लेखमालिका वाचली, भावली!
खूप छान लिहिलंय _/\_
22 May 2023 - 9:01 am | श्रीगणेशा
अगदी चित्रदर्शी वर्णन!
या संवादात कृष्ण, अधून मधून, फक्त "राधा" असा प्रतिसाद देतोय, आणि राधा भरभरून बोलतेय, असं सुंदर चित्र तयार होतं _/\_
22 May 2023 - 11:12 am | विजुभाऊ
या पुढच्या भागात राधेचे मनोगत आहे https://www.misalpav.com/node/51312
माझी राधा १०