"मी वसंतराव" च्या निमित्ताने

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
14 Apr 2022 - 9:57 pm

शहर - आपलं नेहेमीचंच
स्थळ - guess करायला एकदम सोपं
दिवस - मावळलेला workday
वेळ - रात्री उशिराची

"मी वसंतराव" बघायचा योग आलेला. अगदी ऐन वेळी कशीबशी पहिल्या रांगेतली तिकिटं मिळाली. मराठी चित्रपट mid week हाऊसफुल्ल?? चित्रपट चांगला आहे हे ऐकलं होतंच पण म्हटलं कदाचित उद्या बँक हॉलिडे आहे म्हणून गर्दी असेल. अर्थात गर्दी म्हणजे तरी काय असणार? हाताच्या बोटांवर मोजण्याइतके millennials. Gen Z चा तर संबंधच नाही. अश्या गर्दीतले जवळपास निम्मे चेहरे ओळखीचेच वाटतात (कारण मी ही त्याच गर्दीचा भाग असतो).

पहिला धक्का बसतो तो पार्किंगमध्येच. मोजक्याच गाड्या. जणू काही आठ पडद्यांच्या त्या चित्रपटगृहात एकच स्क्रीन चालू असावं. तिकिट दाखवून त्या सरकत्या जिन्यावरून वर जातो आणि ती अपेक्षित गर्दी दिसतेच. हीच ती लोकं - बालगंधर्व, कट्यार, मी शिवाजीराजे भोसले किंवा नटसम्राट आवर्जून बघायला येणारी. ती इथे दिसणारच होती. हा... आणि बाजूला ही जी किशोरवयीन, तरुण आणि अमराठी लोकं आहेत ती नक्कीच RRR साठी असणार. ह्यांना कुठले झेपायला वसंतराव?

आम्ही आपले चहाचे कागदी कप घेऊन स्क्रीनच्या दाराशी पोचतोय तर ही पिलावळ पॉपकॉर्नआणि कोल्ड-ड्रिंक्स सांभाळत आमच्या पुढे. "dint get the caramel flavor yaa - cheese works for you right?" मला वाटलं स्क्रीन चुकतोय यांचा - आत गेल्यावर पोरं बावचळतील. पण हे काय? ह्या अर्ध आणि तीन चतुर्थांश - चड्डीधारी पोरा - पोरींचा ८ - १० जणांचा ग्रुप आमच्याच रांगेत येऊन बसला की. सगळे विशीच्या आसपासचे. आता मला सिनेमापेक्षा जास्त उत्सुकता ह्यांच्या प्रतिक्रियेची!

इकडे चित्रपट सुरू झाल्यानंतर दुसर्‍याच प्रसंगात "स्स्स्स्स्स्स्स्स", "eeeew" वगैरे प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. म्हटलं ही फिरंगी पिलं वाट लावणार सिनेमाची. पण मला पहिला गुगली पडला तो "वितरी प्रखर तेजोबल" सुरू झाल्यावर. माझ्या शेजारची ताई पलिकडल्या दादाला हळूच म्हणाली "ए sss, ऐसा एक गाना है ना? लता मंगेशकर का." अरे वा! म्हणजे "गगन सदन तेजोमय" निदान ह्यांच्या कानावरून गेलं होतं. Not bad at all. आणि पुढच्याच गाण्याला ताईने चक्क रूपकाच्या पहिल्या मात्रेला मांडीवर टाळी धरली. आता मात्र माझी उत्सुकता ताणली गेलेली की "मी वसंतराव"ह्या पोट्ट्यांना कसा वाटतोय.

पुढचे अडीच - पावणेतीन तास ही तरुण पोरं समरसून चित्रपट बघत होती. अधून मधून न कळालेल्या मराठी शब्दांचे अर्थ विचारले जात होते. त्या ७-८ जणांमधले तिघे चौघे मराठी असावेत. त्यांच्याकडून हळूच चित्रपटाची "गोष्ट" समजून घेतली जात होती. ह्यातले सगळेच काही शिकलेले गायक वादक नसतील. आणि असले तरी आजकालच्या प्रचलित संगीताच्या मानाने ही गाणी त्यांच्या comfort zone च्या बाहेर असतील असंच वाटत होतं. पण जे काही चालू होतं ते त्यांना "आवडत" होतं. जेव्हा गळ्यातून शुद्ध 'सा' लागतो तेव्हा देवळात मूर्तीसमोर उभं राहायची गरज भासतच नाही", "पिता के न होने के एहसास से मारवा गाओ, "माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं" वगैरे वाक्यं बरोब्बर उतरत होती. ह्यांना कदाचित "पंजाबी अंगानी लावलेला केहरवा" किंवा "जयपुर घराण्याची बंदिश" किंवा "कालिंदीतट पुलिंद-लांछित सुरनुतपादारविंद जयजय" वगैरे कळत नसेलही. पण यातल्या 'घेई छंद'ची ट्रीटमेंट 'कट्यार' पेक्षा वेगळी आहे हे त्यांना समजत होतं. योग्य ठिकाणी योग्य दाद येत होती. शेवटच्या "कैवल्यगान"ची शेवटची तान संपल्यावर थिएटरातले दिवे लागून पडदा जेव्हा बंद झाला तेव्हा ही पोरं उठली. एकमेकांकडे भुवया वर करून, खालचा ओठ बाहेर काढून बघत त्यांनी चित्रपट आवडल्याची पावती दिली.

इथे मी चित्रपटाने भारावून गेलेलो असतानाच ह्या मुलांचा प्रतिसाद मला कौतुकास्पद वाटत होता. खरंतर पुण्यात सवाई असो, स्वरझंकार असो वा वसंतोत्सव, प्रेक्षकांमध्ये तरुण पिढीचा सहभाग लक्षणीय असतोच. पण एका महान शास्त्रीय गायकाच्या जीवनपटात ह्या तरुण पिढीला वाटणारं कुतुहल माझ्यासाठी pleasant surprise होतं. प्रेक्षागारात निम्म्यापेक्षा अधिक लोकं तिशीच्या आतली होती. "मी वसंतराव" त्यांना समजलाच नाही तर आवडला होता. ह्यातला कोणी वसंतरावांचा बेदरकारपणा बरोबर घेऊन गेला असेल तर कोणी त्यांची सृजनशीलता, कोणी वसंतरावांची आपल्या कलेवरची अढळ निष्ठा तर कोणी त्यांच्या आईचा खमकेपणा.

लोकांना चांगलं ऐकण्याची, चांगलं बघण्याची भूक आहे. आपल्या परंपरांबद्दल, संगीताबद्दल, संस्कृतीबद्दल अभिमान आहे आणि त्या गोष्टी समजून घेण्याची डोळस वृत्तीदेखील आहे. गरज आहे ती त्यांची ही भूक भागवणार्‍या content ची. बालगंधर्व असो वा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, कट्यार काळजात घुसली असो वा पावनखिंड, गाभ्रीचा पाऊस असो वा जोगवा. त्यांच्या जाणीवा उन्नत करणारा content त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवा. त्यांना आवडेल, रुचेल, पटेल अश्या पद्धतीनं ते व्हायला हवं.

आजकाल आजूबाजुला खूप जास्त निराशा, नकारात्मकता, असहायता दिसते. पण वाईट गोष्टी थांबण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे चांगल्या गोष्टी ठणकावून करणे. कारण चांगलं नेहेमी चांगलंच असतं.

© - जे.पी.मॉर्गन

कलानाट्यसंगीतचित्रपटप्रकटनप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

14 Apr 2022 - 10:03 pm | मुक्त विहारि

प्रचंड सहमत ...

हा सिनेमा, नक्कीच बघीन....

श्रीरंग_जोशी's picture

14 Apr 2022 - 11:39 pm | श्रीरंग_जोशी

या लेखातल्या अनुभवकथनाने सुखद धक्का दिला. हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.

फारएन्ड's picture

15 Apr 2022 - 12:41 am | फारएन्ड

आवडला लेख!

चित्रगुप्त's picture

15 Apr 2022 - 7:21 am | चित्रगुप्त

छोटेखानी लेख खूप आवडला.

वाईट गोष्टी थांबण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे चांगल्या गोष्टी ठणकावून करणे. कारण चांगलं नेहेमी चांगलंच असतं.

हे खूपच आवडलं.
चित्रपट बघण्याची खूपच उत्सुकता लागलेली आहे, पण इथे दिल्लीत ते शक्य होईलसे वाटत नाहीये.
.

कर्नलतपस्वी's picture

15 Apr 2022 - 11:15 am | कर्नलतपस्वी

वेगळ्या धाटणीचे परीक्षण चित्रपटा बद्द्ल खुप काही सांगुन गेले.

तुषार काळभोर's picture

15 Apr 2022 - 1:15 pm | तुषार काळभोर

वाचून आनंद झाला..

नगरी's picture

15 Apr 2022 - 5:15 pm | नगरी

इतकं ओघवते परीक्षण कधीच पाहिले
नाही,खरेच सुंदर!

नगरी's picture

15 Apr 2022 - 5:22 pm | नगरी

Jp.?

कॉमी's picture

15 Apr 2022 - 6:19 pm | कॉमी

वा !
छान लेख.

माझं पुस्तक विकताना मला हाच अनुभव आला, पानिपतसारख्या ऐतिहासिक विषय असलेल्या पुस्तकाला सर्वात जास्त 'दाद' मिळाली ती विशीच्या आतल्या, आसपासच्या पिढीकडून.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

16 Apr 2022 - 3:58 am | हणमंतअण्णा शंकर...

पानिपतसारख्या ऐतिहासिक विषय असलेल्या पुस्तकाला सर्वात जास्त 'दाद' मिळाली ती विशीच्या आतल्या, आसपासच्या पिढीकडून.

तुमचे अभिनंदन. परंतु हा खरेतर चिंतेचा विषय आहे. सगळ्या 'मराठी' समाजाला ( भाषिक अवकाशात तर प्रकर्षाने ) स्मरणरंजनाने ग्रासले आहे.
जेव्हा समाजाची आशादायक भविष्ये कमी कमी होत जातात तेव्हा समाजामध्ये स्मरणरंजनाला उत येतो. कारण, पुढं काय वाढून ठेवले आहे त्याची कल्पना एकतर करता येत नाही, आणि आली तर ती भयावह असते आणि वर्तमान देखील त्रासदायक असेल तर लोकांकडे फक्त भूतकाळच उरलेला असतो..त्याततर जर अस्मितांचे घोळ असतील तर मग काय विचारूच नका.. मग तो इतिहास शक्य तितका फिक्शनल करत उदात्त उन्मत महन्मधुर करत त्याच्यामधली नागवी सत्ये पूर्णपणे झाकत किंवा दुर्लक्ष करत मांडला की लोक तो स्वसमाधानासाठी विकत घेतात. (आपल्यातले अवगुण तपासण्यासाठी, गुणांचा परामर्श घेण्यासाठी तो इतिहास इतिहास म्हणून वाचला जात नाही, तर कशाचा तरी कंठाळी उदो उदो करत आपल्या चुका झाकून स्वतःचे मानसिक गंड-भयगंड त्या इतिहासात मिसळून टाकून मनाला तसल्ली देण्यासाठी इतिहास वाचत राहायचे.).

विशीचा तरूण पानिपतसारखे विषय वाचतो हे ठीक असले तरी ते 'का' वाचतो हे खरवडून तपासले तर? तो नेमकं काय शोधत आहे?

'महाराष्ट्राला केवळ भूगोलच नाही तर इतिहास पण आहे' सारखी टाळीबाज वाक्ये खरेतर 'महाराष्ट्राला केवळ भूगोल आणि इतिहासच आहे' अशी आहेत.

मग पुलं, वपु आणि त्यांच्या आसपासची प्रभावळ यांच्या पलीकडे समाजाला जाता येत नाही, जायचे नसते. ( पु.लं सुद्धा त्यांच्या बावळट मध्यमवर्गीय विनोदासाठी. 'एक शून्य मी' मधले पु. ल. मात्र झेपत नसतात ). मराठी समाजावर अशा स्मरणरंजनाचा सतत मारा केला जात आहे आणि समाज देखील तो आवडून घेत आहे. कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, काकस्पर्श, पांघरूण, फास्टर फेणे, वगैरे..

भारतातली अनेक बेस्ट सेलिंग पुस्तकं पाहिली तर (फ्रस्ट्रेट झालेली) मुलं त्या पुस्तकांमध्ये एकतर स्मरणरंजन किंवा त्यांच्या भंजाळलेल्या अस्मितेला पोसणारं ऐतिहासिक फिक्षनच शोधत आहेत. मेहुला सेरिज असो, तो देवदत्त पटनायक असो, किंवा आपले शिवाजी सावंत असोत.

जगभरातला वाचणारा तरूण आणि मराठी वाचणारा तरूण काय वाचत आहे याची ढोबळ तुलना केली तर मला नैराश्यच येते.

मग पुलं, वपु आणि त्यांच्या आसपासची प्रभावळ यांच्या पलीकडे समाजाला जाता येत नाही, जायचे नसते. ( पु.लं सुद्धा त्यांच्या बावळट मध्यमवर्गीय विनोदासाठी. 'एक शून्य मी' मधले पु. ल. मात्र झेपत नसतात ).

clap

प्रसाद गोडबोले's picture

16 Apr 2022 - 2:39 pm | प्रसाद गोडबोले

स्मरणरंजन

फार महत्वाचा मुद्दा आहे हा . आपण सविस्तर धागा काढावा ह्या विषयवर असे सुचवु इच्छितो.

काही प्रमाणात इतिहास अन स्मरणरंजन ठीक आहे पण त्यातही इतिहास सोडुन जातीय अस्मिताच गोंजारल्या जात आहेत . चांगला जेन्युईन इतिहासावर चित्रपट बनवण्याची कुवतच नाही आपल्या लोकांच्यात . ग्लॅडियेटर पहा , इतिहासाचा आधार घेऊन फिक्शनल चित्रपट आहे पण कसला बनवला आहे, पण कसलं वाटतं पहिलं युध्द पहाताना . आमच्याकडे असे चित्रपटच नाहीत . बरं , ज्या ऐतिहासिक घटनात खर्‍या अर्थाने मतीगुंग करुन टाकणारा मेलोड्रामा आहे त्यातही मसाला घालुन पार पांचट करुन टाकतात तो प्रसंग . शिवाय आम्हाला तर बोलायची सोयही नाही, आम्ही काही टीका केली की लगेच आमच्या जातीवर घसरणार , त्या पेक्ष नकोच ! चाललंय ते चालु द्या !

बाकी स्मरणरंजनाच्या परे जाऊनही करण्या सारखे खुप काही आहे पण त्याला पेक्षकवर्ग कुठाय ? कोणताही मराठी टीव्ही चॅनल कधीही लावा , तुम्हाला एकच दिसेल, - लग्न , भरजरी साड्या , बायकांच्या कटकटी अन नॉन इश्यु चे इश्यु बनवुन रडारड. नाही तर मग ओढुन ताणुन आणलेला ग्रामीणबाज किंवा कोणता तरी देव साधुसंत ह्यांचे चमत्कार तेही इतके तद्दन बकवास ग्राफिक्स वापरुन बनवतात की बघुन हसु येते अन श्रध्दा कमीच होईल की काय अशी संका वाटते . =))))
सायन्स फिक्शन , इन्फोटेन्मेन्ट , कोर्पओरेट लाईफ आणि पॉलिटिक्स , ह्या आणि अशा अनेक विषयांवर एक सुध्दा सीरीज नाही. अ‍ॅडव्हेंचर , अ‍ॅक्शन , वॉर , अ‍ॅडल्ट रोमान्स, मिस्ट्री , क्राईम , फँटसी , वगैरे विषय तर विसरुनच जावा !

पिक्चर र्कडुन तरी काय अपेक्षा करणार ? एकुणच अवघड आहे . आणि तुर्तास तरी इतिहास अन स्मरणरंजनापलिकडे जाऊन काहीतरी भारी पहायला मिळेल अशी आशा नाही.

असो .

हॅ ! हॅ !!
आमच्या देवांनी आणि साधूसंतांनी चमत्कारच इतके भारी केलेत की तुमच्या आधूनिक तंत्राला देखील ते सही सही पडद्यावर उतरवणे जमत नाही त्याला कोण काय करणार :)

मनो's picture

17 Apr 2022 - 3:19 am | मनो

(चित्रगुप्त सोडून) तुमच्यापैकी कुणीच पुस्तक पाहिलेले/वाचलेले दिसत नाही. स्मरणरंजन/छाती अभिमानाने फुलून यावी असे पुस्तकात काहीच नाही, विषयावरून केलेला अंदाज चुकलेला आहे. किंबहुना, त्या काळातील चित्रांचा एक आर्ट फॉर्म/मुक्त चिंतन आहे असेच मी म्हणेन. या कारणामुळेच नेहेमीचे मधमवयीन वाचक हे न वाचता, याउलट नवीन पिढी या मुक्त कलाविष्काराला पाठिंबा देते आहे हे विशेष.

प्रसाद गोडबोले's picture

17 Apr 2022 - 11:40 am | प्रसाद गोडबोले

मनो,

मी तुमच्या पुस्तकाविषयी बोलत नव्हतो , मी केवळ स्मरणरंजन आणि मराठी चित्रपटांविषयी बोलत होतो . कृपया गैरसमज नसावा.
आपले पुस्तक वाचले नसले तरीही तुमचा व्हिडीओ पाहिला आहे, आपण चांगले संशोधन करुन चांगली नवनवीन माहीती पुढे आणत आहात हे उत्तमच आहे , त्यावर कोणतीही टीका केलेली नाही.

माझे इतकेच म्हणणे होते कि त्यावर येणारे ऐतिहासिक चित्रपट "अगाध" क्वालिटीचे आहेत. त्या चित्रपटांचे उद्देश जातीय अस्मिता गोंजारुन गल्ला कमावणे इतकाच आहे, त्यांना इतिहासाशी घेणे देणे नाही. मल्हारी गाण्यावर शेंडी उडवत नाचणारा बाजीराव किंवा समोर ठाकलेली अब्दालीशी लढाई दिसत असताना नाचणारा सदाशिवभाऊ आठवुन मला अजुनही हसु येते आहे =))))
किंवा कहने को जस्ने बहार वगैरे गाण्यात दाखवलेला रोमॅन्टिक अकबर पाहुन खुर्चीतुन पडायचेच बाकी होते. पण त्यात ती नेत्रसुखद ऐश्वर्या असल्यामुळे राहुन गेले =))))
पद्मावत मधील खिलजी विषयी तर बोलाय्लाच नको =))))

(अन्य मराठी चित्रपटातील उदाहरणे देत नाही कारण मला भीति वाटते . )

तुम्ही मला मराठी/ हिंदी भाषीतील - ट्रॉय , ग्लॅडीएटर , डंकर्क , सेव्हिंग प्रायव्हेट रायन , ब्रेव्हहार्ट , हॅकसऑ रिज ह्यांचा तोडीस तोड म्हण्ता येईल असा एक चित्रपट दाखवा . कदाचित साऊथ वाले स्पेशली तेलुगु फिल्मवाले कदाचित हे काम करु शकतील.

असो , तात्पर्य इतकेच चित्रपट सृष्टीत चाललेले स्मरणरंजन हे नवीन काहीच सुचत नसल्याचे प्रतीक आहे , आणि त्यातही इतिहासविषयक चित्रपट हे "...... की" असे म्हणल्यावर विचार बिचार न करता जोरात "जय" म्हणणार्‍या गर्दीला खेचुन गल्ला छपण्याचे उद्योग आहेत बस्स.... असे माझे प्रांजळ मत आहे .

बरेचसे असेच काही म्हणायचे होते.

पर्फेक्ट. कुणाला अश्यात आलेली एखादी तरी साहसकथा, कादंबरी, चांगली रहस्यकथा आठवतेय का?

चित्रगुप्त's picture

16 Apr 2022 - 11:44 am | चित्रगुप्त

मनो, तुमच्या पानिपतवरील अभ्यासपूर्ण पुस्तकाला तरूण पिढीकडून दाद मिळत आहे, ही अतिशय समाधानाची आणि आमच्या पिढीला दिलासा देणारी गोष्ट आहे. मी पण तुमचे पुस्तक घेतले, ते मुख्यतः त्यातील चित्रांसाठी, परंतु तरूण पिढीचे वाचक त्यात रूचि घेत आहेत, हे थोरच.
जो समाज आपला इतिहास विसरतो, तो आपला भूगोलही हरवतो.. असे कुणीसे म्हटलेच आहे.

जगभरातला वाचणारा तरूण आणि मराठी वाचणारा तरूण काय वाचत आहे याची ढोबळ तुलना केली तर मला नैराश्यच येते.

या नैराश्यावर तोडगा म्हणून आता स्मरणरंजन किंवा भंजाळलेल्या अस्मितेला पोसणारं ऐतिहासिक फिक्षन शोधा, हाय काय अन नाय काय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Apr 2022 - 8:56 am | ज्ञानोबाचे पैजार

नाहितर थेट्रात जाउन "पावनखिंड" बघा

पैजारबुवा,

प्रसाद गोडबोले's picture

16 Apr 2022 - 2:22 pm | प्रसाद गोडबोले

परवाच चित्रपट पाहिला थेटरात जाऊन !
खुपच सुंदर चित्रपट आहे, राहुलने कमाल केली आहे ! काही काही प्रसंग इतके सुंदर उतरवले आहेत की डोळ्यात पाणी आलं. वसंतरावांचा संघर्ष आणि त्यातुन तावुन सुलाखुन निघणारे त्यांचे जीवन इतक्या उत्तमपणे चित्रित केले आहे की बस्स पहात बसावेसे वाटले.

सर्व्वांनी हा चित्रपट आवर्जुन थेटर मध्ये जाऊन पहावा असाच आहे !

मूकवाचक's picture

18 Apr 2022 - 10:00 am | मूकवाचक

+१

'राम राम राम राम जप करी सदा' या अंगाई गीतापासून ते 'ललना' सारख्या खट्याळ गीतापर्यंत; नाट्यगीत, लावणी ते रागदारी संगीतापर्यंत वैविध्य असलेले सगळ्याच गायकांनी केलेले पार्श्वगायन अप्रतिम आहे. 'वाटेवर काटे वेचित चाललो' या स्वतः वसंतरावांनीच गायलेल्या गीताप्रमाणे असलेला त्यांचा जीवनपट देखील खूप छान उलगडून दाखवला आहे.)

मराठी चित्रपटसृष्टी अजून चालू आहे?
ऐकावे ते नवलच!!

जोपर्यन्त आमच्यासारखे मराठी चित्रपट आवर्जुन बघणारे प्रेक्षक आहेत तोपर्यन्त मराठी चित्रपट येत राहातील. काळजी नसावी......

- सन्दीप शेजवलकर

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2022 - 5:27 pm | चौथा कोनाडा

खरोखर सुखद अनुभव !
मस्त लिहिलंय !
काही रसिक इ त र भाषेतील चित्रपट पाहून संस्कृती समजाऊन घ्यायचा प्रयत्न करतात हे मोठे आशादायक चित्र आहे !

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Apr 2022 - 1:33 pm | राजेंद्र मेहेंदळे

या चित्रपटाचे तुनळीवरचे टिझर(मराठी प्रतिशब्द?) बघुनच उत्सुकता ताणली गेली होती. त्यामुळे पहिल्याच विकांताला चित्रपट पाहीला. आणि खरोखरच एक उत्तम चित्रपट बघितल्याचे समाधान मिळाले. मा.दिनानाथ, वसंतरावांची आई, पु.ल, स्वतः वसंतराव अणि ईतर सर्व पात्रे रंगविणार्‍या कलाकारांनी घेतलेली मेहेनत जाणवते.

गाण्यांबद्दल तर काय बोलावे? मध्ये मध्ये पार्श्वसंगीत म्हणुन येणारे दादर्‍यामधले "राम राम राम राम" किवा झपतालातले "सुर संगत" किवा धुमाळी ठेक्यातील "पुनव रातीचा" ही लावणी असो किवा "ले चली तकदीर" ही गझल असो . एक एक सुंदर गाणे आपल्याला गुंगवुन सोडतात. शेवटची भैरवी तर अफाट आहे. एकुण चित्रपट आवर्जुन बघावा असा वाटला.

मित्रहो's picture

19 Apr 2022 - 2:37 pm | मित्रहो

खूप छान परिक्षण वेगळा मुद्दा मांडला. चित्रपट बनविणाऱ्यांपर्यंत तुमचा मुद्दा पोहचायला हवा. आजची पिढीला देखील हे संगीत आवडले. मला सुद्धा चित्रपटातली गाणी भयंकर आवडली.
चित्रपट नक्की बघणार