दोन अनोळख्या मधला एक दूवा

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
7 Dec 2008 - 8:49 am

"ती मुलगी,दहाऐक वर्षाची असेल संकोचशील झालेली ती माझ्या जवळ येऊन मला एक मासिक वाचायला देऊन गेली.मी तिच्याकडून ते मासिक घेतलं.तिच्या त्या अबोल वागण्यातून जे बोल माझ्या कानी आले ते जणू म्हणाले ,
" वेळ जात नसेल तर वाचा"
आणि माझ्या तोंडूनपण जो अबोल शब्द निघाला तो पण
"धन्यवाद"
असाच होता."

माझ्या एका मित्राने मला सांगितलेली ही एक गोष्ट.
हा माझा मित्र संजय एका सुश्रुषागृहात रुग्णाची सेवा करण्याच्या कामगिरीवर होता.काही कुष्टरोग झालेले रुग्ण सुद्धा त्या सुश्रुषागृहातल्या एका विंगमधे इलाजासाठी आलेले होते.एका पंचविस- तिसच्या तरुणाला कुष्टरोगाची नुकतीच लागण झालेली होती.आणि त्यावर उपायासाठी तो बरेच दिवस इथे राहून आता बरा झाल्यामुळे घरी जायला त्याला परवानगी दिली होती.
त्याच्या घरी त्याचे म्हातारे आईवडिल होते.लग्न झाल्यावर काही दिवसानी ह्या रोगाची त्याला लागण झाली होती.हे लक्षात आल्यावर त्याच्या पत्नीने त्याच्याशी काडीमोड घेतलेला होता.नशिबाने मुलं वगैरे काही नव्हती.

ज्या बसस्टॉपवरून घरी जायला निघाला होता,त्याच बसस्टॉपवर ही मुलगी आणि तिची आई बससाठी उभी होती.हे त्याने पाहिलेलं होतं.त्याच्या डाव्या हाताची सारी बोटं घळून पडल्याने तो हात मुंडा दिसत होता.तेव्हडंच एक वैगुण्य त्याच्या हाताकडे बघितल्यावर दिसलं जात होतं.बस आल्यावर सर्व मिळेल त्या सीटवर बसले.ह्याला पण खिडकी जवळ जागा मिळाली होती. बसमधल्या प्रवाशाकडे जाणून बुजून तो नजरा नजर करीत नव्हता.पण त्याच्या हाताकडे बघून कुणीही त्याच्या बाजूला बसत नव्हतं. त्यामुळे त्याच्या बाजूची सीट प्रवासात रिकामीच होती.त्यामुळे त्याला त्याचं वेगळेपण प्रकर्षाने जाणवत होतं.

नंतर तो रुग्ण संजयला म्हणाला,
"काही वेळा नंतर ती मुलगी,दहाऐक वर्षाची असेल संकोचशील झालेली ती माझ्या जवळ येऊन मला एक मासिक वाचायला देऊन गेली.मी तिच्याकडून ते मासिक घेतलं.तिच्या त्या अबोल वागण्यातून जे बोल माझ्या कानी आले ते जणू म्हणाले
" वेळ जात नसेल तर वाचा"
आणि माझ्या तोंडूनपण जो अबोल शब्द निघाला तो पण
"धन्यवाद"
असाच होता.ती फक्त माझ्याशी हंसली.
ती तिच्या आई जवळ जाऊन बसली असावी.कुठे बसली ते मी पाहिलंच नाही.कारण ते मासिक तिच्याकडून घेतल्या नंतर मी खिडकीच्या बाहेर बघून अश्रू ढाळीत होतो. तिचं ते छोटसं सहानुभूतिचं भावप्रदर्शन बर्‍याच वर्षानी मी अनुभवलं होतं."
ही सर्व हकिकत त्या रुग्णाने पुन्हा चेकअपसाठी त्या सुश्रुषागृहात गेला होता त्यावेळी संजयला सांगितली.

नंतर संजय म्हणाला,
" कुष्टरोगातून पूर्ण बरा झालेल्या ह्या त्यावेळच्या रुग्णाची बर्‍याच वर्षानी माझी गाठ पडली.ते जूने दिवस आठवून आणि ती बसमधली घटना आठवून मला तो रुग्ण म्हणाला,
" दोन अनोळख्या व्यक्ती दूवा साधण्यासाठी प्रयत्न करतात त्या दुव्याचं मला विषेश वाटतं.
त्या मुलीला इतक्या वर्षानी आठवत ही नसेल ती घटना.
मी आपली मनात समजूत करून घेतो की ती आता मोठी झालेली असावी.अशीच इतरांशी दुवा ठेवीत असावी.आणि कदाचित तिच्या मुलांनापण असंच करायला शिकवीत असावी. मला वाटतं त्यावेळी तिच्या आईनेच मला ते मासिक वाचायला म्हणून बक्षीस दिलं असेल. तिने ते मासिक मला का दिलं ह्याचं महत्व मला वाटण्या ऐवजी ते तिने दिलं हेच जास्त महत्वाचं वाटतं.

तिचंच हे उदाहरण घेऊन निरनीराळ्या लोकांशी निरनीराळे दूवे ठेवण्याच्या प्रयत्नात मी असतो.असं मी करतो हे पाहून बर्‍याच लोकाना कळतही नसेल की मी असं का करतो ते.पण मला नक्कीच माहित आहे हे मी करतो ते त्या छोट्या मुली मुळे.
तिने देऊ केललं ते मासिक माझ्या सारख्याला- ज्याला इतर टाळत होते- ते आठवून माझ्या जीवनात त्याचा सतत प्रतिध्वनी येत असतो.माझं पण इतराना केलेलं हे सहानुभूतिचं भावप्रदर्शन त्यांच्या मनावर तसाच परिणाम करीत असावं.आणि त्यावेळच्या त्या छोट्या मुलीला आता जी मोठी बाई झाली असावी तिला मी आठवून एकच म्हणेन "धन्यवाद".

हे त्याचं सारं ऐकून झाल्यावर संजय त्या रुग्णाला म्हणाला,
"ज्यावेळेला तू ती हकिकत मला सांगितलीस त्यावेळेला ती कोण मुलगी हे मी तुला मुद्दामच सांगितलं नाही.पण आता इतक्या वर्षानी सांगतो.
तिच्याही वडिलाना तुझ्यासारखीच कुष्टरोगाची लागण झाली होती.आणि ज्या दिवशी तुला घरी जायला सांगितलं त्याच दिवशी तिची आई आणि ती छोटी मुलगी आपल्या वडिलाना आमच्या सुश्रुषागृहात दाखल करायला आली होती.तुला त्यानी तिथं पाहिलं असावं. आपल्या वडिलाना सोडून ती दोघं तुझ्याच बसमधे बसून परत जात होती.तुला खिडकीजवळ एकटा बसलेला पाहून तिच्या आईला आणि तिला तिच्या वडिलांना असंच टाळलं जात होतं ह्याची आठवण येऊन तुला ते मासिक तिने आणून दिलं असावं."
हे माझं सर्व सांगणं ऐकून झाल्यावर तो मान दुसरीकडे वळवून त्या घटनेची आठवण काढून ढळाढळा अश्रू ढाळत होता.

मी त्याला जवळ घेऊन म्हणालो,
"तुला कधीना कधी कळावं असं मला नेहमी वाटायचं.आज योगायोगाने भेटलास म्हणून एकदाचं सांगून टाकलं.त्यावर तो काय बोलला ते मी ऐकलं नाही पण त्याचे ते अबोल शब्द हेच मला सांगत होते
"धन्यवाद"

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Dec 2008 - 8:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रसंग आणि अनोळखी दूवाही आवडला !

श्रीकृष्ण सामंत's picture

7 Dec 2008 - 9:39 pm | श्रीकृष्ण सामंत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

लिखाळ's picture

9 Dec 2008 - 10:55 pm | लिखाळ

छान.. प्रसंग आणि कथन आवडले.
-- लिखाळ.

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Dec 2008 - 12:46 am | श्रीकृष्ण सामंत

लिखाळ,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com