"घरातून बाहेर पडलास तर तंगड्या तोडून हातात देईन," आईनं दम दिलेला. दम देण्याची तिची ही नेहमीची पद्धत. मला माहित होतं आपल्या तंगड्या बिंगड्या काही तूटणार नाहीत, पण रट्टे पडतील या भीतीने डोळे बंद करून खाटेवर नुसता पडून होतो. डोळ्यासमोर दिसत होते उनाडक्या करत हिंडणारे मित्र. कितीही प्रयत्न केला तरी झोप येत नव्हती. दुपार चांगलीच तापली होती.संध्याकाळी झाडांना गदगदा हलवणारा वारा म्हाताऱ्या माणसासारखा कुठेतरी झोप काढत असावा. कूस बदलावी तशी झाडाची पानं मधूनच हलू लागायची अन् वाटायचं वाऱ्याची गार झुळूक अंगाला स्पर्श करून जाईल. पण, तसं होत नव्हतं. खूपच उकडत होतं. रोज उन्हातून खेळत होतो, रानातून हिंडत होतो, पण एवढा उकाडा कधी जाणवला नव्हता. आता, कोंडून पडल्यामुळे त्याची जाणीव होत होती. खुपच बैचेन वाटू लागलं म्हणून आईला हळू आवाजात हाक मारली. तिने ओ दिला नाही, म्हणजे ती नक्कीच झोपली असावी. असा विचार करून हळूच खाटेवरून उठलो, पायात चप्पल चढवल्या अन घराबाहेर पडलो.
वाटलेलं सगळे मित्र बाळूच्या दुकानात असतील, म्हणून दुकानात आलो तर, इथे कुणीच नव्हतं. बाळूचं दुकान वाडीच्या बाहेर,दुपारचं दुकान बंद असायचं त्यामुळे ते दुकान आम्हा मुलांचा अड्डा बनलं होतं. दुकानाच्या डाव्या बाजूला पाण्याची टाकी,टाकीच्या बाजूला एक जुनं केळाचं झाड. त्या झाडाच्या बुंद्याजवळ नुसता उकिरडा झाला होता. घरातला कचरा,दगड धोंडे ,फुटलेल्या काचा ह्यांचा खच पडलेला.त्यामुळे तिथे जाणं थोडं धोक्याचं होतं. आमच्या आजोबा-पणजोबाच्या आधीपासून हे झाड इथं उभं आहे. एके काळी हे झाड खूप मोठं होतं. मोठं म्हणजे आमच्या आजूबाजूच्या गावातून सुद्धा दिसत असे. पण काही वर्षापासून ते शेंड्याकडून सुकत गेलं आणि एका वादळात मोडून पडलं. त्याच्या वाचलेल्या बुंद्याला पुन्हा फांद्या फुटल्या, एक नवच झुबकेदार झाड तयार झालं. रात्रीच्या वेळेस तर, ते एकदम भयानक वाटायचं. म्हाताऱ्या माणसांच्या तोंडून आम्ही बऱ्याचदा ऐकलेलं कि,"झाडाखाली एक खूप मोठा साप असून,त्याच्या डोक्यावर मणी आहे," तो साप आणि त्याचा मणी पाहण्यासाठी आम्ही अनेक रात्री जागरण करून पाळत ठेवली,पण तो कधीही दिसला नाही. शेवटी आमची खात्री झाली कि, मण्यावाला साप वैगेरे काहीही नसणार,लहान मुलं तिथं जाऊ नयेत म्हणून सापाची कथा रचली गेली असणार.परंतु जर का, त्या जागेतील कचरा उचलला तर पाच-सहा जनावरं, डझन भर विंचू नक्की सापडतील, म्हणून शक्यतो आम्ही मुलं त्या जागेपासून लांब राहत होतो.
मी दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या एका बाकावर बसलो. दुपारी सुस्तावलेला वारा आता बऱ्यापैकी वाहत होता. मधूनच भवऱ्यासारखी गिरकी घेऊन धूळ, जमिनीवर पडलेला पाचोळा आपल्या कवेत घेऊन आभाळाच्या दिशेने जात होता. मे महिन्यात अशी छोटी वादळे नेहमीच होत असतात. सकाळी रानात चरायला गेलेली गुरं परतू लागलेली. ही घराकडं परतणारी गुरं पाहून मला नेहमी एक प्रश्न पडायचा ह्या गुरांना एवढा शहाणपणा कोणी शिकवला! शाळेत प्रभात फेरी निघायची तेव्हा सारे विद्यार्थी जसे सरळ एका रेषेत चालतात एकदम तशीच ही गुरं सुद्धा एका रेषेत चालत यायची. सर्वांच्या पुढं म्हातारा बैल,त्यापाठी दुसरा,त्यानंतर गाई आणि सर्वात शेवटी वासरं. मुख्य म्हणजे त्यांचा क्रम कधीही चुकत नसे. आपली रेषा सोडून कुणीही बाहेर पडत नसे, मी बऱ्याच वेळा ते दृश्य पाहिलेलं. तरीसुध्दा ते दृश्य पाहून भारावून जात होतो. वाडीत परतेपर्यंत ही रेषा कधीही तुटत नसे. पाण्याच्या टाकीच्या कडेला गुरांसाठी बनवलेल्या हौदातून पाणी प्यायल्यानंतर प्रत्येक जण सावली शोधून रवंथ करण्यात मग्न होत असत. रवंथ करणारी गुरं पाहून मला खूप मौज वाटायची, जणू ती रवंथ करीत नसून च्विंगम चघळत आहेत असा भास व्हायचा अन् मी गालातल्या गालात हसायचो,पण हे गुपित मी कुणाला सांगितलं नव्हतं. दुकानाच्या उजव्या बाजूच्या चोंड्यात एक बैल ढिरकत होता. एखाद्या पैलवानानं कुस्तीला आमंत्रण द्यावं तसा तो वाटत होता. कधी पायानं धूळ उडवत होता,तर कधी शिंगे मातीत खुपसून माती उकरत होता. मातीत खेळलेल्या एखाद्या द्वाड पोरासारखा पूर्णपणे मातीनं बरबटून गेलेला. जणूकाही तो झुंजीला आमंत्रण देत होता,परंतु त्याच्या ह्या कृतीकडे दुसरे बैल लक्ष देत नव्हते. कशाला उगाच मुर्खांच्या नादी लागावं या अविर्भावात आसपास असलेले बैल डोळे बंद करून रवंथ करण्यात मग्न होते. कुणी आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाही हे जाणून तो बैल तिथेच फतकल मारून मातीत बसून रवंथ करू लागला.
आता मला सुध्दा कंटाळा यायला लागलेला. वाडीत जाऊन कुणी असेल तर पाहावं असा विचार करून निघणार तोच, कुणीतरी हाक मारली.मी आवाजाच्या दिशेने पाहिलं पण, कुणी दिसत नव्हतं. पुन्हा तोच आवाज कानावर पडला त्या केळाच्या झाडावरून कुणीतरी हाक मारीत होतं. पक्का तो आवाज मंग्याचा होता. मी त्या झाडाच्या दिशेने निघालो, तिथे पोहचण्या अगोदर मंग्या फांदीवरून उडी मारून माझ्या दिशेने आला. आपल्या हातात असणारी दहा रुपयाची नोट माझ्या समोर फडकावत मला म्हाणाला, "हे बघ मला दहा रुपये गावले!"
"कुठं?", मी विचारले.
"ते त्या फांदीवर शर्ट दिसतय ना, त्याच्या खिशात होते. मंग्या म्हणाला.
माझ्या मनात विचार आला, आपण का नाही आधी तिकडे गेलो म्हंजे, ते दहा रुपये मला सापडले असते. पण,तसं कधीच घडलं नसतं कारण,एकतर मी एकटा त्या झाडावर चढणार नव्हतो आणि चुकून चढलो असतो तरी,टाकून दिलेल्या कपड्यांचे खिसे तपासणार नव्हतो. हे असले उद्योग एकच मुलगा करू शकतो, तो म्हणजे मंग्या.
"कुठे गेलेत रे सगळेच्या सगळे", मी मंग्याला विचारलं.
"काय म्हाईत कुठं तडमडलेत, मी पण त्यांनाच शोधतोय", मंग्या म्हणाला
आमचं संभाषण चालू असताना तळीच्या वाटेवरून दोन पोरं येताना दिसली. आम्ही त्यांच्या दिशेने चालू लागलो. ते संज्या आणि पक्या होते. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत होतं ह्यांना कुणीतरी काम सांगितल असणार. ही दोघ आमच्या वाडीतील भित्री, पण सभ्य पोरं. कुणीही त्याची चेष्टा करावी एक शब्द उलट बोलणार नाहीत.आमच्या टीमचा कप्तान दया त्यांना खाजगी नोकरासारखाच वागवायचा. बॅट-स्टम्प आणण्यापासून कुणाला तहान लागली तर पाणी आणण्या पर्यंत सगळी कामं त्यांच्याकडून करून घ्यायचा. आणि ते बिचारे मुकाट्यानं सगळी कामं करायचे. आम्ही बऱ्याचदा त्यांना चिथवण्याचं प्रयत्न केला पण त्यांच्यात काही बदल झाला नाही.म्हणून तो नाद आम्ही सोडून दिला. पण जर कधी कुणी त्यांना मारण्याचा किंवा छळण्याचा प्रयत्न केला तर दया त्यांना बदडून काढायचा.
ते जवळ आल्यावर मंग्यानं विचारलं, "कुठं आहेत रं सगळी पोरं?
"तळीवर गेलीत, साळजीव पकडायला! संज्या म्हणाला.
साळू या प्राण्याला आमच्या गावाकडं साळजीव म्हणतात. त्याच्या अंगावर अणकुचीदार पीसं असतात ज्यांना साळपीस म्हणतात. आम्ही रानात फिरत असताना ही पीसं कधी कधी आम्हाला सापडायची. पण जिवंत साळजीव कधी दिसला नव्हता. ह्या प्राण्यावर कधी शत्रूचा हल्ला झाला तर, तो आपली पीसं बाणासारखी फेकून मारतो. असं आम्हाला ऐकून माहित होतं. पण ते खरं-खोटं काही माहीत नव्हतं.
"मग तुम्ही कशाला आलात?" मी विचारलं.
" तात्यानं मिरच्या आणि काडीपेटी आणायला सांगितलंय", संज्या म्हणाला.
"कोण तात्या?" मंग्यानं विचारलं.
"गणातात्या!" संज्या उत्तराला.
"कुणी पाहिलंय गणातात्यानं? मग तर तिथे काहीच नसणार, मी बीट लावतो. मंग्या म्हणाला.
"नाही रे,तो आईची शप्पथ घेऊन सांगतोय",पक्या भाबडेपणानं बोलला.
ह्या तात्यावर कुणाचाच विश्वास नव्हता. बघावं तेव्हा तराड असायचा. एकदा तर मंग्याच्या बापानं त्याला चांगलाच झापला होता. त्याच झालं असं. आम्ही असेच दुकानात गप्पा मारत बसलो होतो. तेव्हढ्यात तात्या येऊन आमच्या गप्पात सहभागी झाला.
दयानं त्याला म्हटलं," तात्या,एव्हडी दारू कशाला पितो, दारू पिऊन काय भेटतं तुला?
तसा तात्या म्हणाला, अरे, उद्या आपण मेल्यावर स्वर्गाच्या दारावर देव उभा असल, तो आपल्याला इचारणार, तू खाली पृथ्वीवर जाऊन काय केलस. दारू पिलास? तू म्हणणार,"नाय" परत इचारणार, तंबाखू खाल्ली," तू म्हणणार नाय, परत इचारणार,"इडी पिलास". तू म्हणणार नाय. मग देव म्हणणार वसाड्या, तू खाली जाऊन केलस तरी काय? जा नरकात”.
हे संभाषण मंग्यान बापाला सांगितलं. मंग्याचा बाप चांगलाच तापला. संध्याकाळी तात्याच्या घरी जाऊन त्याला चांगलाच दम दिला.
तात्यानं कसनुसं तोड करत एवढच म्हटलं," अरे, पोरांची जराशी मस्करी केली".
घरी येऊन मंग्याच्या बापानं मंग्यालाही दम दिला,"जर कधी तात्याबरोबर दिसला तर अंगाची सालडी लोळवीन". तेव्हा पासून तात्या दिसला कि मंग्या रस्ता बदलायचा.
तात्यानं सांगितलेल्या बहुतेक गोष्टी खोट्या ठरायच्या. पण,इथं एकटं बसण्यापेक्षा तिकडे गेलेलं बरं तेव्हढाच वेळ जाईल म्हणून आम्ही सुध्दा त्यांच्या सोबत निघालो. संज्या आणि पक्या मिरच्या काडिपेटी आणेपर्यंत त्यांची वाट पाहून त्यांच्या सोबत निघालो.
आमची वाडी डोंगराच्या टाळूवर वसलेली. वाडीच्या पाठीमागे डोंगर उतार, त्याला आम्ही तळी म्हणायचो,तळीचा संपूर्ण भाग दाट झाडीचा, म्हणजे छोठसं जंगलच. त्यात करवंदांच्या जाळ्यांची संख्या जास्त. करवंदांच्या दिवसात आम्ही मुलं इकडेच हिंडत असायचो. तळीवरील सर्व वाटा निसरड्या.मे महिन्यात मुंबईतून येण्याऱ्या मुलांना या वाटांवरून चालायला जमायचं नाही. त्यांची अवस्था पाहून आमची चांगलीच करमणूक व्हायची. जरी या वाटा निसरड्या असल्या तरी आमच्या चांगल्याच सरावाच्या होत्या. दिंड्याचा आधार घेत त्या वाटांवरून आम्ही नुसते धावत सुटायचो.
एकदाचे आम्ही येऊन पोहचलो, तशी ही जागा आमच्या परिचयाची. एका मोठ्या दगडाखाली पूर्वी छोटीसी घब होती परंतु ती खणून आता मोठं घाबदाड झालं होतं. तसं पाहिलं तर,ती एक गुहाच वाटत होती.. एखादा मुलगा सरपटत सहज आतमध्ये जाऊ शकेल एवढी मोठी. त्या दगडासमोर सगळी पोरं हातात काठी घेऊन बसली होती. संज्यानं आणलेल्या मिरच्या,काडीपेटी दयाकडं दिली. आम्ही येण्यापूर्वीच गवत,पातेरा जमवलेला. सुकलेल्या झाडाची एक मोठी साल काढून आणली होती. त्या सालीवर धुरी करून साल घबीत ठेवायची होती. सगळी तयारी झालेली फक्त धुरी करायची बाकी होतं. दया काडीपेटी घेऊन गवत पेटवू लागला. पण, जेव्हा जेव्हा दया काडी पेटवायचा, ती हवेनं लगेच विझून जायची.अशाच आठ-दहा काड्या वाया गेल्यावर तात्या म्हणाला, "आरं, दगडाच्या आत जाऊन पेटव, तिथं वारा लागणार नाय."
तात्याच्या म्हणण्याला बऱ्याच जणांनी पाठिंबा दिला. पण! मी शंका काढली,"आत साप असला मग?"
"नाय रे, आम्ही इतका वेळ काट्या ढोसून बघतोय कुणीच बाहेर आलं नाय," दया म्हणाला.
" मग साळजीव पण नसेल", माझी परत एक भाबडी शंका.
"साळजीव आताच हाय, कुठतरी कोपऱ्यात लपला असल", तात्या म्हणाला.
नुसत्या शंका काढत बसलो तर, आपल्याला घरी हाकलून देतील. म्हणून, मी गप्प बसायच ठरवलं.
"फक्त हाताला कापड गुंडाळून जा", एवढी सूचना करून मी जवळच्या दगडावर जाऊन बसलो. पोपट पकडायला जाताना आम्ही ही युक्ती करायचो. आतून पोकळ असणाऱ्या नाण्याच्या झाडावर सुतार पक्षानं बिळं तयार केलेली असतात. त्या बिळातून नंतर इतर पक्षी घरटी बनवतात. अशाच बिळात बऱ्याचदा पोपट सुद्धा अंडी घालतो. एखाद्या बिळात पोपट शिरताना दिसला कि समजायच आत पोपटान अंडी घातलेली असणार, नाहीतर पिल्ले तरी असणार.एकदा का बिळात पोपट शिरला म्हणजे कुणीतरी झाडावर चढायच,हाताला कपडा गुंडाळायचा अन बिळात हात घालून पोपट बाहेर काढायचा. हाताला कपडा असल्यानं पोपट चावू शकत नाही.चुकून कधी बिळात साप असला आणि त्यानं चावा घेतला तरी त्याचे दात लागत नाहीत.
"कुणाकडं टॉवेल हाय का?" दयानं विचारल. टॉवेल कुणाकडेच नव्हता म्हणून, दयानं संज्याकडं शर्ट मागितला. संज्यानं मुकाट्यानं शर्ट काढून दिला. नाहीतर, दयानं पुन्हा त्याला कपडा आणायला पिटाळलं असतं. दयानं शर्ट हाताला व्यवस्थित गुंडाळला. धुरी करण्यासाठी गवत,पातेरा, मिरच्या झाडाच्या सालीवर ठेवून, ती साल घेऊन तो सरपटत घबीत शिरला. त्याचे पाय बाहेरच होते फक्त कमरेच्या पुढचा भाग आत घबीत गेल्यानं दिसत नव्हता. तो आता जाऊन थोडा वेळ निघून गेला. आता आतून थोडा धूर बाहेर येऊ लागला,म्हणजे विस्तव पेटला होता. अन बघता बघता दया पाय झाडू लागला. तो ओरडत सुद्धा नव्हता. काय झालं कुणालाच कळत नव्हतं. सगळे पुतळ्यासारखे स्तब्ध होऊन नुसते बघत होते. एवढ्यात मंग्या पुढे झाला, दयाचे दोन्ही पाय पकडून त्यानं त्याला एका झटक्यात बाहेर खेचला. दयाला जोराची ढास लागली होती. सारख्या शिंका येत होत्या.जोराने बाहेर खेचल्यामुळे त्याच्या हाताचे दोन्ही कोपर चांगलेच सोलपटले होते. संज्यानं तांब्याभरून पाणी दयाच्या हातात दिले. त्यानं चेहऱ्यावर पाणी मारलं, चूळ भरून थोडं पाणी प्यायल्यावर दयाला जरा बरं वाटू लागलं
मंग्यानं दयाला विचारल,"काय झालं?"
काय घडलं असावं ह्याचा अंदाज सर्वानाच आला होता. आत धूर झाल्यावर त्या धुरानं दया गुदमरला होता. त्यामुळे त्याला बोलता येत नव्हतं आणि बाहेरही पडता येत नव्हतं. म्हणून तो पाय झाडू लागलेला.
"आता बरं वाटतंय का तुला?", मंग्यानं पुन्हा विचारलं.
दयानं एक सणसणीत शिवी देऊन विचारलं,"तात्या कुठं हाय?"
तात्या केव्हाच निघून गेला होता, त्या साळजीव स
प्रतिक्रिया
11 Mar 2022 - 6:21 pm | भागो
फारच छान.
तात्या केव्हाच निघून गेला होता, त्या साळजीव स
शेवटी काही राहिले आहे का?
11 Mar 2022 - 6:35 pm | Deepak Pawar
तात्या केव्हाच निघून गेला होता, त्या साळजीव सारखा.
परत संपादन करता येतं का?
11 Mar 2022 - 7:44 pm | भागो
परत संपादन करता येतं का?
मला वाटतंं नाही. वेमाची मर्जी !
पण काही गरज नाही. आशय समजला. देव पावला.
11 Mar 2022 - 7:20 pm | कंजूस
बेवडे लोकांचं डोकं परफेक्ट चालतं. आणि उच्च मराठीत सल्लाही देतात किंवा मत व्यक्त करतात. ते कुणाच्या बा'ला घाबरत नाहीत.
झकास वर्णन आणि गावातलं दुपारचं रिकामटेकडं निवांतपण जमलंय.
14 Mar 2022 - 10:36 am | सौंदाळा
भारी लिहिलय
सगळा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला.
साळींदर पकडणे म्हणजे खूप जोखमीचे काम.
त्या दहा रुपयांचे काय केले मुलांनी? अजून एखादी फर्मास कथा येऊ देत.