हे वाचा: चित्रलेखा

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
1 Mar 2022 - 1:07 am

कटाक्ष:
भाषा- हिंदी
लेखक- भगवतीचरण वर्मा
प्रकाशन- राजकमल प्रकाशन (द्वारा प्रथम प्रकाशित १९९३)
प्रथमावृत्ती- १९३४
सध्याची आवृत्ती- २६ वी
पृष्ठसंख्या- २००
किंमत- ₹२५०
ISBN : 978-81-267-1585-5

ओळख:
एका गुरूच्या दोन शिष्यांना 'पाप म्हणजे काय?' असा प्रश्न पडतो. त्याचे निराकरण करण्यासाठी त्यांचे गुरु एका शिष्याला योग्याकडे तर दुसऱ्याला ऐषोरामात आकंठ बुडालेल्या सरदाराच्या संगतीत राहण्याची आज्ञा देतात. या दोन शिष्यांसोबत जीवनाच्या दोन टोकांवर हिंदोळे खात वाचक जे अनुभव घेतो त्यांचा थरार 'गेम ऑफ थ्रोन्स'पेक्षा कमी वाटत नाही. रहस्यमय कादंबरी नसतानाही केवळ पात्रांचा वैचारिक दृष्टिकोन बदलून लेखकाने ही कमाल केली आहे हे विशेष. गोष्टीचा पट सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजधानीत- पाटलीपुत्र- मध्ये उलगडतो. एका प्रसंगी चाणक्याचा प्रवेश आहे पण तो कथेच्या संरचनेला पूरक म्हणून. बाकी कथा केवळ मनुष्यांतले वैचारिक द्वंद्व याच परिप्रेक्ष्यातून पाहता येते. किंबहुना ती तशीच पाहावी अशी लेखकाची अपेक्षा असावी. आपली बुद्धी/मेंदू आणि मन/हृदय एकाच प्रसंगात अगदी १०० टक्के पटणारी दोन वेगवेगळी आणि विरोधी मते देऊ शकतात हे न अनुभवलेला मनुष्य विरळाच. याच परस्पर विरुद्धतेचे सूक्ष्मतम पृथक्करण (micro analysis) या कादंबरीत पदोपदी आढळते. लेखकाने दिलेले न खोडता येणारे परस्परविरुद्ध तर्क पाहून जीवनाच्या स्वरूपाबद्दलचा अचंबा आणखीनच वाढतो. महाप्रभू रत्नांबर यांचे दोन शिष्य, श्वेतांक आणि विशालदेव, सरदार बीजगुप्त आणि योगी कुमारगिरि व नर्तकी चित्रलेखा यांच्यात कादंबरीच्या प्रधान भूमिकेची अदलाबदल होत राहते. कादंबरीत पुढे आणखी एका महत्त्वाच्या पात्राची भर पाडून लेखकाने जीवनाच्या अनिश्चिततेला समर्पक न्याय दिला आहे. आज नव्वद वर्षांनंतरही या कादंबरीच्या नवीन आवृत्त्या निघत आहेत हे तिच्या अभिजाततेचे द्योतक आहे. कारण कादंबरीचा विषयच मुळात अभिजात आहे: 'पाप म्हणजे काय?"

शिल्लक:
कादंबरीत कुठेही एका दृष्टीकोनाचा पुरस्कार आढळत नाही. वाचकाला पटतील तसे विविध दृष्टिकोन गोळा करत तो शेवटी स्वतःचे वेगळेच जीवन तत्त्वज्ञान प्रकट करेल ही शक्यताही नाकारता येत नाही. लेखकाने मानवी मनोवृत्ती सोबत चेहऱ्यावर प्रकट होणारे भाव इतके चपखल टिपले आहेत की पात्रांचे भावनाप्रधान चेहरे सहजपणे विसरता येत नाहीत. चित्रलेखा हा एक नितांत सुंदर आणि रोमांचकारी अनुभव आहे. ही कादंबरी प्रेम-वासना, सत्य-असत्य, कर्तव्य-त्याग अशा प्रधान भावनांचे रहाटगाडगे आहे. यात भावनांची ओळख नाही की स्पष्टीकरणही नाही. त्या त्या भावनेच्या कप्प्यात बसवून जीवनाची एक गोल चक्कर आहे. कुणाला काय दिसेल आणि उमगेल हे ज्याचे त्याला माहीत. त्यासाठी जरूर वाचा: भगवतीचरण वर्मा लिखित चित्रलेखा.

साहित्यिकसमाजविचारआस्वादसमीक्षाशिफारस

प्रतिक्रिया

कंजूस's picture

1 Mar 2022 - 3:08 am | कंजूस

एक दारुडा त्याच्याकडून एकच चांगली गोष्ट ( हातातली फुले महादेवाच्या देवळासमोर सांडतात )होते म्हणून तो इंद्रपदावर जातो ही गोष्ट पुराणात आहे.

अमेरिकन त्रिशंकू's picture

1 Mar 2022 - 5:21 am | अमेरिकन त्रिशंकू

या पुस्तकावर आधारित याच नावाचा चित्रपट आहे मीनाकुमारी आणि प्रदीपकुमार यांचा. त्यात साहिर/रोशनची अप्रतिम गीतं आहेत.
१. संसारसे भागे फिरते हो
२. काहे तरसाये जियरा
३. सखी रे मेरा मन उलझे तन डोले
४. ऐ री जाने ना दूंगी
आणि सर्वात आवडणारं
५. मन रे तू काहे ना धीर धरे

आणखीही एकः
छा गये बादल नील गगन पर, घुल गया कजरा साँझ ढले

चौथा कोनाडा's picture

1 Mar 2022 - 1:03 pm | चौथा कोनाडा

सुंदर पुस्तक ओळख !

आज नव्वद वर्षांनंतरही या कादंबरीच्या नवीन आवृत्त्या निघत आहेत हे तिच्या अभिजाततेचे द्योतक आहे.

हे भारी आहे !