१५.२५ करोड, पांढरे कपडे आणि लाल चेंडू !

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
15 Feb 2022 - 12:39 am

बोला पाच करोड... पाच करोड... जनाब फक्त पाच करोड..... फिनिशिंग बॅट्समन आणि शिवाय विकेटकीपर.... प्रत्येक स्पर्धेचा अनुभव... बोला पाच करोड... गरज लागली तर कॅप्टनशिप पण करणार... नवीन लप्पेवाला शॉट तयार केलेला....बोला पाच करोड... पाच करोड एक.... पाच करोड दोन....

"सव्वापाच करोड"!!!

क्या बात है! इसे कहते हैं कद्रदान... है कोई जोहरी जो इस हीरेको उसका मोल देगा???? सवापाच करोड एक.....सवापाच करोड दो.....

आज अग्रेशन ला डिमांड आहे साहेब .... २० ओव्हरमध्ये सेटल व्ह्यायला वेळ कोणाला आहे? यू शुड मेक एव्हरी बॉल काउंट.
मल्टीटास्किंग हवंच ना. मी बॅटिंगच करणार... मी पॉइंटला फील्डिंग करणार नाही असं म्हणून कसं चालेल?
नुसतं टॅलेंट काय कामाचं? रिझल्ट दिलेला असायला पाहिजे.
आधीच्या सीझन्समध्ये केलेल्या साडेपाच हजार रन्सचं काय लोणचं घालायचंय? गेम कसा बदलतोय बघताय ना?
भाई मास अपील म्हणून काही असतं की नाही? त्याला घेतला की त्याच्या देशाची लोकं आपल्या मॅचेस बघणार ना - साधा हिशेब आहे.

गेल्या तीन दिवसांत भरपूर टॅलेंट विकलं गेलं आणि त्यापेक्षा कितीतरी जास्तं राहून गेलं. न विकला गेलेला माल पुढच्या वेळी बघू. तोपर्यंत नवीन टॅलेंट येईलच की बाजारात!

विषय कोणाला किती बोली लागली आणि आणि कोणाला किती पैसे मिळाले हा नाहीये. १५.२५ कोटी ईशान किशनला नाही तर आत्ताच्या घडीला सर्वोत्कृष्ट फॉर्मात असणार्‍या स्फोटक ओपनर + विकेटकीपरसाठी लावले गेले. श्रेयस अय्यर कोलकता नाइट रायडर्ससाठी मधल्या फळीत फलंदाजी करेल आणि शिवाय कर्णधार होऊ शकतो म्हणून ते १२.२५ कोटी.

हा बाजार आहे. ह्यात चूक - बरोबर काहीच नाही आणि शाश्वतही काही नाही. हा विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम आहे ज्याचा आपला प्रेक्षकवर्ग आहे, आपले फायदे आहेत, आणि आपला यथार्थ उच्च दर्जा आहे. आयपीएल आणि इतर फ्रॅन्चायजी लीग्सनी गेल्या १२-१५ वर्षांत क्रिकेट इतकं बदललं आहे की ज्याचं नाव ते. आता बॅट्समनची किंमत त्याच्या सरासरीवरून नाही - तर पहिली बाउंड्री मारायला तो किती कमी बॉल घेतो ह्यावरून ठरते. १६-२० ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल टाकणार्‍या बोलरला सोन्याच्या भावात तोललं जातं. आणि कधी नव्हे ते सर्वोत्तम फील्डर पॉइंट - कव्हर्सला नाही तर लाँगऑन - डीप मिडविकेटला असतो. आकडेवारी आणि विश्लेषण जितकं गुंतागुंतीचं तितकंच अद्ययावत झालं आहे. कुठला बॅट्समन ३ डॉट बॉल नंतर चौथा बॉल कुठे मारायचा प्रयत्न करणार हे त्याच्या प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाच्या विश्लेषकाला माहित असतं. खेळात बदल करणं आणि प्रतिस्पर्धी संघाचे बदल हेरणं ही नुसती गरज नाही तर अनिवार्य झालं आहे. क्रिकेट बदललंय - क्रिकेट बदलतंय.

पण अशी कोणती गोष्ट आहे जी बदलली नाही? १९५७ मध्ये "नौ दो ग्यारह" चित्रपटात देव आनंद आणि कल्पना कार्तिक वेगवेगळ्या खोल्यांमध्ये "आजा पंछी अकेला है" गात "प्रणय" करत होते. आणि आताच्या प्रणयातली "गहराइयाँ" ....काय वर्णावी महाराजा ! आमच्या लहानपणी वाढदिवसाला वर्गात "किस मी" ची दहा पैशाची टॉफी वाटायचो पण आता पोरं मॅक-डी मधल्या पार्टीशिवाय ऐकत नाहीत. मग क्रिकेटनी काय घोडं मारलंय? बदललंय ते चांगलंच आहे... पण.....

हा.... ह्या "पण" मध्येच मेख आहे. आणि ही मेख कळते ती अनुभवातूनच. तरुण वयात फेसाळती बियरच आवडणार. सिंगल मॉल्टची चव कळायला एक परिपक्वता लागते. अ‍ॅक्सलरेटरला पीळ मारत ट्रॅफिकला कट मारत गाडी बुंगवायचं एक वय असतं. मग कळते ती जोडीदाराबरोबर ताम्हीणीच्या घाटातून चाळीसच्या स्पीडने धो-धो पावसात निवांत गाणी ऐकत ड्राइव्ह करण्यातली मजा. आत्ता ऐका टोनी कक्कड किंवा BTS, पण लताबाईंचं "अल्ला तेरो नाम" ऐकून काळजाला पीळ पडणारा एक दिवस येतोच. हे कोणाला चुकलं नाही गड्या. "स्वदेस" मध्ये ती म्हातारी म्हणते ना- अपनेही पानीमें पिघलना बरफका मुकद्दर होता है! बिलकुल सही बोलेली है वो!

पण इथे धोका आहे तो वेगळाच. रिअ‍ॅलिटी शोजमध्ये १२० सेकंदांचे परफॉर्मन्सेस देत मोठी झालेल्या ह्या पिढीतून अर्धा - पाऊण तास "सहेला रे" रंगवणारी गानसरस्वती किशोरी आमोणकर निपजेल का हा खरा प्रश्न आहे. ४ डॉट बॉल गेले तर अस्वस्थ होऊन हवेत बॉल मारणार्‍या ह्या पिढीत ओव्हलवर शटर डाउन करून १४० मिनिटांत ९६ चेंडूंत १२ धावा करणार्‍या द्रविडचा पेशन्स असेल? फक्त रन जाऊ नये म्हणून ऑफस्टंपच्या २ फूट बाहेर यॉर्कर टाकणार्‍या पिढीत सलग नऊ ओव्हर्स निराश न होता अथक बोलिंग करून WACA वर पॉंटिंगसारख्या वाघाची शिकार करणार्‍या इशांत शर्माची चिकाटी असेल? एकीकडे धडाधड विकेट्स पडत असताना साक्षात ऑस्ट्रेलियाच्या घश्यातून ब्रिजटाउन टेस्ट एकहाती काढणारा ब्रायन लारा ह्या पिढीत तयार होईल?

व्हायला हवा! खरोखरंच व्हायला हवा! परीक्षेच्या टेन्शननी किंवा परीक्षा पास न झाल्याने आत्महत्येला उद्युक्त होणार्‍या ह्या पिढीला आयपीलच्या निमित्ताने क्रिकेटची ओळख झाली तरी कसोटी क्रिकेट आवडायला हवं. कारण इतर कुठलाच खेळ टेस्ट क्रिकेट इतका आयुष्याचा आरसा दाखवत नाही. टेस्ट क्रिकेट टॉस हरला तरी तक्रार न करता हिरव्या पिचवर दटून रहायला शिकवतं. अंगावर तोफगोळे डागणार्‍या फास्ट बोलरची रग जिरून जायची वाट बघायचा संयम शिकवतं. एकही गोष्ट मनासारखी घडत नसताना प्रत्येक नव्या ओव्हरसाठी नव्याने रनअप घ्यायला शिकवतं टेस्ट क्रिकेट. आपल्या बोलरसाठी फॉर्वर्ड शॉर्टलेगला छातीचा कोट करून उभं राहायला शिकवतं ते टेस्ट क्रिकेट. वैयक्तिक गौरवासाठी न खेळता संघाच्या विजयासाठी आपल्या इच्छांना मुरड घालायला शिकवतं टेस्ट क्रिकेट. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाच दिवस काबाड-कष्ट करून सुद्धा पदरात काहीच नाही पडलं तरी निराश न होता पुढच्या सामन्यासाठी सज्ज व्हायला शिकवतं ते ही टेस्ट क्रिकेटच!

मी खूप आशावादी आहे. माझा विश्वास आहे की आत्ता चौकार-षटकारांच्या आतषबाजीला चटावलेल्या ह्या पिढीला एक दिवस कळेल की १५.२५ कोटी ही क्रिकेटच्या हिशोबात किती चिल्लर रक्कम आहे. सुरुवातीला अगदी के-पॉप का ऐकेनात... एकदा का गाणं कळायला लागलं की हीच पोरं कधी लता - भीमसेनचे भक्त बनतील त्यांचं त्यांनाही कळणार नाही. आत्ता भले त्यांना बॅटीची कड घेऊन गेलेले षटकार आवडत असतील, पण एक दिवस हीच तरुण पिढी केन विल्यमसन, पुजारा किंवा लाबुशेननी हिरव्यागार पिचवर आग ओकणार्‍या फास्ट बोलर्सच्या आक्रमणासमोर उभारलेली भक्कम तटबंदी बघून हरखून जातील. एका बाजूनी आठ-आठ, दहा-दहा ओव्हर्स टिच्चून गोलंदाजी करणार्‍या पॅट कमिन्स, रबाडा किंवा जिमी अ‍ॅन्डरसनच्या प्रेमात पडतील. एक दिवस त्यांना अश्विन, हसरंगा किंवा रशीद खान फलंदाजाला कसे सापळा लावून जाळ्यात ओढतात ते कळेल. एक दिवस यांच्या लक्षात येईल की सिली-पॉइंट / फॉर्वर्ड शॉर्टलेगला उभं राहायला काय जिगर लागते. एक दिवस जेव्हा ज्यो रूट एखाद्या बोलरला एंड बदलून आणेल तेव्हा त्यामागची खेळी त्यांच्या लक्षात येईल.... एक दिवस ह्या पोरांना त्या २२ यार्डाच्या पट्टीवर बॅट-बॉलनी खेळला जाणारा बुद्धीबळाचा डाव कळेल. शेवटी ज्याला क्रिकेट-क्रिकेट म्हणतात ना ते अजूनही पांढर्‍या कपड्यांत आणि लाल चेंडूनी खेळलं जातं.

म्हणतात ना - अपनेही पानीमें पिघलना बरफ का मुकद्दर होता है!

© - जे.पी.मॉर्गन

क्रीडामौजमजाप्रकटनप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

15 Feb 2022 - 6:38 am | मुक्त विहारि

तरूण वयांत, पटकन निर्णय हवे असतात आणि उतारवयांत उत्तम निकाल हवा असतो...

शृंगार तोच असतो, पण तरूणपणी धसमुसळेपणा आणि उतारवयांत आरामात...

नैसर्गिक आहे ...

भागो's picture

15 Feb 2022 - 8:40 am | भागो

फारच सुंदर लेख
आयपीएल म्हणजे बेसबाॅॅल झाल आहे हे क्रिकेट नाही.

कर्नलतपस्वी's picture

15 Feb 2022 - 8:59 am | कर्नलतपस्वी

बाजार आहे यात बरोबर चुक काहीच नाही
आता करोडो रूपयाची गुंतवणुक या मधे खेळ किती आणी सट्टा किती !
मला वाटते खेळाची वाट लागलीय.
पण लेख जबरदस्त

सामान्यनागरिक's picture

15 Feb 2022 - 3:37 pm | सामान्यनागरिक

१. वस्तुंसारखा माणसांचा पण लिलाव केला जातो.
२. पूर्वीच्या काळात जसे गुलाम विकले जायचे तसंच आहे हे. फ़क्त गुलाम पंचतारांकित हॉटेलात रहातात.
३. जी किंमत दिली गेली त्याच्या एक दशांश पैश्यात आपल्या देशात खुनाची सुपारी दिली जाते.
४. असे असूनही मैदानावर जे काही चालते ते ’ जंटलमन्स क्रिकेट ’ आहे असे समजुन आपण सगळे आपला वेळ देऊन टीव्ही समोर बसून सामने बघतो.
५. हा सगळा केअरफ़ुली ऑर्केस्ट्रेटेड तमाशा आहे. अजुनही आपण वेड्यासारखे मागे धावतो म्हणून त्याचा फ़ायदा घेउन आय पी एल च्या संघांचे मालक करोडॊ कमावत आहेत किंवा करोडॊ काळ्याचे पांढरे करुन घेतायत.
पहिला मॅच फ़िक्सींग चा मामला समोर आला तेंव्हाच मी क्रिकेट बघणं सोडुन दिलं. अजुनही लोकांना आशा आहे की ते चांगलं असेल.

सौन्दर्य's picture

16 Feb 2022 - 12:04 am | सौन्दर्य

"पहिला मॅच फ़िक्सींगचा मामला समोर आला तेंव्हाच मी क्रिकेट बघणं सोडुन दिलं." - मी देखिल

मोहन's picture

15 Feb 2022 - 9:13 am | मोहन

फारच सुंदर लेख. सगळे मुद्दे एकदम पटले .

जेम्स वांड's picture

15 Feb 2022 - 9:16 am | जेम्स वांड

उत्तम लेख आहे, पण काळ बदलतच जाणार, आपण बुढा पारशी असल्यागत गुड ओल्ड ब्रिटिश डेजचे सुस्कारे सोडून काय होतंय

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Feb 2022 - 9:37 am | ज्ञानोबाचे पैजार

तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते ते पहावे.

लिलाव न झालेल्या खेळाडूंच्या यादितली काही नावे वाचून खरच वाईट वाटले

पैजारबुवा,

सुबोध खरे's picture

15 Feb 2022 - 10:01 am | सुबोध खरे

आय पी एल यात मूलभूत गोची हीच आहे कि हि मालिका केवळ मनोरंजनासाठी निर्माण केलेली आहे.

त्यात समानता किंवा न्याय इ. अपेक्षितच नाही.

केवळ चौकार षटकार यांची आतिषबाजी करून दोन घडीचे मनोरंजन एवढाच याचा अर्थ आहे.

अन्यथा फलंदाज २० षटके खेळू शकतो परंतु गोलंदाज मात्र १० षटके टाकू शकत नाही असे का?

त्यांना ४ च षटके टाकू द्यायची हा दुजा भाव का?

विचार करा लय सापडलेला बुमराह सतत १० शतके टाकतो आहे तर या ( तथाकथित) ताबडतोड खेळणाऱ्या पोरांना त्याच्या समोर उभे राहता येईल का?

सध्या त्याच्या दोन ओव्हर खेळून काढा असा सल्ला देणारे त्यांचे सल्लागार काय सल्ला देतील?

हे केवल दोन घटकेचे मनोरंजन आहे एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा आणि सोडून द्यायचं

मार्गी's picture

15 Feb 2022 - 5:44 pm | मार्गी

खूपच जबरदस्त लिहीलंय!! टेस्ट क्रिकेट = जीवन हे मलाही नेहमी वाटतं! जीवनात काहीही एका दिवसात होत नाही. कधी ५० ओव्हर्स टाकूनही विकेट मिळत नाही! संपूर्ण सहमत. सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

15 Feb 2022 - 10:05 pm | तुषार काळभोर

डायरेक्ट काळजाला हात घालणारा विषय!
आयपीएल विषयी काही तक्रार नाही. काळाचा महिमा म्हणून सोडून द्यायचे.
पण, कसोटी क्रिकेट म्हणजे...
जगात सगळ्यात जास्त धावा काढणाऱ्या फलंदाजाला ऑफ साइडला एकही चौकार ना मारता द्विशतक करायला शिकवते, ते कसोटी क्रिकेट.

पहिल्या डावात पावणे तीनशे धावांनी मागे असताना, साडे सहाशे धावा करून ऑस्ट्रेलियाला हरवायला शिकवते, ते कसोटी क्रिकेट.

कानडाऊ योगेशु's picture

15 Feb 2022 - 10:47 pm | कानडाऊ योगेशु

खरंय!
आय.पी.एल ने अगदी कर्दनकाळ गोलंदाजाला सुध्दा सर्कशीतला केविलवाणा सिंह बनवले आहे. आधी दया यायची. पण ८३ च्या निमित्तने जुने किस्से ऐकिवात आले त्यानुसार तेज गोलंदाजांनी पिचवर अक्षरशः रक्तपात करुन माज दाखवला होता. त्यानंतर त्यांना काबुत ठेवण्यासाठी एका षटकात तीनच बाऊन्सर व फिल्डींग मर्यादा वगैरे नियम आणले गेले व खेळ पुरता फलंदाज धार्जिणा बन(व)ला. मला वाटते आय.पी.एल मध्ये गोलंदाजांनी युनियन तयार करुन फलंदाजांपेक्षा जास्त किंमत वसुल करायला भाग पाडायला हवे.कारण जे रिकामटेकडे पब्लिक हे सामने पाहतात त्यांना गोलंदाजांची कत्तल पाहण्यातच जास्त स्वारस्य असते.

सुबोध खरे's picture

16 Feb 2022 - 10:01 am | सुबोध खरे

कसोटी क्रिकेट हे शास्त्रीय संगीतासारखे असते.

कितीही अभिजात आहे म्हटले तरी ३ तास आलाप आणि ताना ऐकण्याची क्षमता सामान्य रसिकाला नसते.

तद्वतच पाच दिवस सकाळी ९ ते ५ पाहत बसायला सामान्य माणसाला वेळ असतो का?

शेवटी चार घटका मनोरंजन म्हणूनच लोक याकडे पाहतात.

दर्दी रसिक आहेत ते कसोटी क्रिकेट किंवा शास्त्रीय संगीताच्या मैफलीला जातील

पण त्यात भरपूर पैसे अपेक्षित असेल तर चूक आहे

नुसती करमणूक किंवा पैसे लावण्यासाठी ( या देशात अधिकृत आहे ) टी २० ठीक वाटले पण आत्मीयता निर्माण होऊ शकली नाही ... जसे पूर्वी आपल्या " राज्याचा संघ" म्हणून आपुलकी वाटायची कारण कदाचित हे कि भले एखाद्या संघ आपलय शहराच्या नावाचा असेल पण त्यातीळ अनेक खेळाडू जर आज इथे उदय तिथे असतील तर तो संघ "आपला" कसा वाटणार?

देश विरुद्ध देश असा तो २० असो एकदिवसिय असो किंवा कसोटी मग ती "आत्मीयता " अपॊआप असते

नेहमीप्रमाणेच धडाकेबाज लेख
सुरुवातीचे दोन सिझन येड्यागत आयपील पाहिले. तिसर्‍या सिझन पासून अधून मधून काही महत्वाच्या मॅचेस बघायला लागलो. नंतर कधी कधी चॅनल बदलताना फोर, सिक्स, विकेट असे काही दिसले तर तेवढ्यापुरते आणी आता मागील काही वर्षे ढुंकून पण बघत नाही.
मात्र कसोटी सामने बघायला खूप मजा येते. मात्र आता झटपट क्रिकेट्मुळे कसोटी सामन्यांचा दर्जा पण खालवला आहे. श्रीलंका, विंडीज हे चांगले संघ ढेपाळले आहेत. नुकतीच झालेली अ‍ॅशेस मालिका पण अत्यंत एकतर्फी झाली.
आम्ही एकदा गप्पा मारताना मी म्हणालेलो : लावयचा बैल (ट२०), शर्यतीचा बैल (एकदिवसीय) आणि शेतात भरपूर काम करणारा बैल (कसोटी) हे वेगवेगळे असतात तसेच संघाचे करायला पाहिजे आणि सगळीकडे समान पैसे, संधी तयार व्हायला पाहिजेत नाहीतर कसोटी क्रिकेटचे अवघड आहे.

धर्मराजमुटके's picture

16 Feb 2022 - 9:28 am | धर्मराजमुटके

पब्लिक अजूनही क्रिकेट बघतं ? अवघड आहे.
मी प्रो कबड्डी चे पहिले २-३ सिजन बघीतले आणि इथे मिसळपाववर त्याबद्द्ल लिहिले होते. मात्र आता त्याचे देखिल पुर्ण बाजारीकरण झाले त्यामुळे मजा राहिली नाही. बघणं बंद केलं.

श्रीगणेशा's picture

16 Feb 2022 - 10:15 am | श्रीगणेशा

क्रिकेट विषयीची तळमळ उतरली आहे लेखात!
आणि विचार करावा असा, क्रिकेट आणि आयुष्यातील समान धागाही नेमक्या शब्दात विणला आहे _/\_

खास प्रतिसाद लिहिण्यासाठी लॉग इन करायला भाग पाडणारा लेख! मुजरा घ्यावा पंत! :-)

आयपीएल - टी २० च्या विरोधात मी नाही. हा प्रकार फुटबॉल लीग्स, बेसबॉल लीग्स, बास्केटबॉल लीग्स या धरतीवर आला आहे. क्लब्सचे मालक, टीम तयार करणं, अ‍ॅनालिसिस, प्लेयर्स हुडकून काढणं, दुसर्‍या टीम्स सोबत सौदे करणं हे सगळं यात आलं. अगदी प्रोफेशनल एजंट्स च्या कंपनीज असतात टीम्स तयार करण्यात. एक टीम तयार करण्यात जवळपास २०० लोकांचा स्टाफ राबत असावा. ही स्वतःच एक कंपनी असते आणि कंपनी सारखीच नफा/तोट्याचा व्यवहार बघते. फक्त प्रॉडक्ट म्हणजे इथे एक खेळाडू असतो किंवा सपोर्ट स्टाफ असतो.
याचा फायदा १३० कोटी लोकसंख्येच्या देशात खेळाडूंना नक्कीच होतो. अनेक जण तर रणजी/दुलीप/ईराणी चषक स्पर्धांमधे खेळतही नाहीत. कदाचित संधीच मिळत नसावी. हे खूप अगोदर पासून आहे. या अशा खेळाडूंना आयपीएल सारखी लीग्स म्हणजे खूप मोठी संधी असते. त्यात चूक काय?

अर्थात् मॉर्गन म्हणतात तसेच मलाही क्रिकेटचा मुळापासून आस्वाद घ्यायला टेस्ट क्रिकेटच आवडते. आणि जे आपल्यासारख्या रसिकांना समजते ते काय स्वत: खेळाडूला समजणार नाही. पण संधीच मिळत नसेल तर त्यानं तरी काय करावं? मला तर या पॅशननं जगणार्‍या लोकांचा फार अभिमान वाटतो. खेळावरच्या प्रेमापोटी हे लोक्स अनेक गोष्टी बाजूला सारतात. अशा खेळाडूंसाठी हे मोठं स्टेज आहे. हां हे खरं की यामुळे गेम मारकुटा झालाय, पण टेस्ट क्रिकेट मधे संधी मिळालेल्या खेळाडूला धीर धरणं शिकावंच लागतं [सन्माननीय अपवादः सेहवाग]. तीच तर टेस्ट क्रिकेटची खासियत आहे, फक्त ते बंद न पडू देणे एवढे आयसीसीने केले पाहिजे.

जे.पी.मॉर्गन's picture

17 Feb 2022 - 1:17 pm | जे.पी.मॉर्गन

सर्वांच्याच मनापासून आलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. मी सहसा लेखामागचे माझे विचार विशद करायला जात नाही पण सगळ्यांचेच तळमळीचे प्रतिसाद वाचून राहवलं नाही.

खरंतर आयपीएलचा लिलाव हे निमित्त ठरलं. मु.वि., सुबोध खरे, जेम्स वांड, राघव, आदींनी म्हटल्याप्रमाणे बदल तर होणारच आणि त्यासाठी "हा हन्त हन्त" म्हणून उसासे सोडण्यात काहीच अर्थ नाही. एक मुद्दा लेखात जास्त अधोरेखित व्हायला हवा होता तो म्हणजे आताच्या "इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशन" आणि त्यायोगे "इन्स्टन्ट फ्रस्ट्रेशनच्या" एकंदर कलाचा. सी ए च्या परीक्षेत पास झाली नाही म्हणून एक २४ वर्षीय मुलगी आत्महत्या करते किंवा १०वीच्या रिझल्टचं टेन्शन घेऊन एखादा मुलगा फास लावून घेतो हे एक समाज म्हणून आपलं अपयश आहे असं मला वाटतं.

माझ्या मते जीवन कौशल्य (life skills) शिकवायला खेळांइतकं सोपं आणि रंजक माध्यम नाही. अपयश पचवणं, एखाद्या गोष्टीसाठी दीर्घकालीन योजना आखणं, चिकाटी, संयम, अपयशसुद्धा सकारात्मकतेनी घेणं ह्या सगळ्या गोष्टीच मुलांमध्ये बिंबवणं खूप गरजेचं आहे. खेळ आणि संगीत हे प्रत्येकाशी दुवा साधतं. आणि म्हणूनच खेळांची, कसोटी क्रिकेटची किंवा शास्त्रीय संगीताची आवड लागावी ह्यासाठी पालकांनी आणि शाळांनीदेखील विशेष प्रयत्न केले पहिजेत. कारण एरवी दीर्घकाळ टिकून राहणार्‍या फार गोष्टी आता आपल्याला दिसत नाहीत.

ह्या लेखाच्या निमित्ताने ह्या महत्वाच्या मुद्द्यावर तुमचे विचार वाचायला नक्की आवडेल.

जे.पी.मॉर्गन.

मुक्त विहारि's picture

17 Feb 2022 - 7:52 pm | मुक्त विहारि

यश नक्कीच मिळेल....

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचले की, आयुष्यात संकट आले की, कसा मार्ग काढायचा? हे समजत जाते..

संधी मिळाली की फायदा घेणे, हा एक भाग झाला...तोरणा किल्ला ताब्यात घेणे..

काही काळा पर्यंत, योग्य त्या संधीची वाट बघायची आणि संधी मिळताच, उपाय योजना अंमलात आणायची, हा दुसरा मुद्दा झाला.... शाहिस्तेखानाला पळवून लावणे..

आणि संधी निर्माण करणे, हा तिसरा मुद्दा झाला...अफजलखानाचा वध...

सगळी सोंगं आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही. भारतीय खेळाडू असतील अंबानी, वेस्ट इंडिज चे खेळाडू वर्ल्ड कप BCCI च्या फंडावर खेळले होते. IPL चा पैसा कसोटी क्रिकेट चा शौक पाळण्यासाठी वापरला जात असेल तर IPL चांगलंच आहे.

उगा काहितरीच's picture

17 Feb 2022 - 10:24 pm | उगा काहितरीच

छान लेख.

फारएन्ड's picture

19 Feb 2022 - 10:04 pm | फारएन्ड

जबरी. मागच्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया सिरीज ने कसोटी क्रिकेट पुन्हा "कूल" केले होते. ती ब्रिस्बेनची टेस्ट असंख्य लोकांनी पाहिली/फॉलो केली. पहिल्या मॅच पासून मुख्य संघातील लोक जखमी होउन बाहेर गेले, पण प्रत्येक वेळेस जे बदली खेळाडू आले त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. शेवटच्या कसोटीपर्यंत जवळजवळ अर्ध्याहून अधिक संघ वेगळा होता. आणि तरी आपण जिंकलो.

या अशा आठवणी अनेक वर्षे राहतात. अजूनही २००१ च्या सिरीज चे हायलाइट्स बघायला मजा येते. गावसकर वि. वेस्ट इंडिज, तेंडुलकर वि. ऑस्ट्रेलिया, लक्ष्मण वि. ऑस्ट्रेलिया, सेहवाग वि पाकिस्तान या लढती "२-३ तास विरंगुळा" सदरात येत नाहीत. स्टीव वॉ ने १९९५ मधे विंडीज चे साम्राज्य खालसा करून ऑस्ट्रेलियाचे राज्य आणले ती सिरीज. ब्रायन लाराने १९९९ मधे ऑल्मोस्ट एकहाती ऑस्ट्रेलियाला थोपवून धरले ती सिरीज, भारताने ऑस्ट्रेलियाचा १६ कसोटी सलग जिंकणारा अश्वमेध एकदाच नव्हे, तर दोनदा थोपवला (२००१ कलकत्ता व २००८ पर्थ) त्या सिरीज, "दिल जीतो" ऐकून २००४ मधे पाकला गेलेला संघ सिरीजही जिंकून आला ते - ज्या पिढीने हे सगळे लाइव्ह पाहिले त्यांना वर्षानुवर्षे हे क्रिकेट म्हणजे चर्चेचा विषय आहेत. अजूनही वेळ असला की यातील क्लिप्स पाहाव्याश्या वाटतात.

आयपीएल हे डायल्यूटेड क्रिकेट आहे हे नक्की. पण मला ते ही आवडते. त्याची एक स्वतःची सिस्टीम तयार झाली आहे. तेथेही सतत यशस्वी व्हायला काही कौशल्ये लागतात. मूळचे कसोटीचे तंत्र असलेले पण आयपीएल मधे तावून सुलाखून निघालेले खेळाडू कसोटी क्रिकेटचाही दर्जा उंचावतात. गेल्या काही वर्षात कसोटी सामने जास्त निर्णायक होउ लागले, तेथेही खतरनाक फिल्डिंग दिसू लागली. तोटेही आहेत. सामन्यात चिकार वेळ हाताशी असताना अनावश्यक फटके मारून विकेट फेकण्याचे प्रमाण खूप आहे. वेळाचा वापर हे कसोटी क्रिकेटमधले एक तंत्र आहे. ते नवीन खेळाडूंना फारसे ज्ञात नसावे असे अनेकदा दिसते. पण तरीही आयपीएल किंवा टी-२० चीही एक मजा आहे.

मला पहिल्यांदा सचिन, द्रविड सारखे लोक हे मल्ल्या, अंबानी ई. ना "अन्सरेबल" आहेत ही कल्पनाच सहन होत नसे. पण ७०, ८० च्या दशकातील हलाखीची परिस्थिती ऐकल्यावर त्यापेक्षा हे बरे असेच वाटते आजकाल. वरती कोणीतरी लिहील्याप्रमाणे २० ओव्हर्सचे सामने जर कसोटी क्रिकेट सबसिडाइज करत असतील तर ते चांगलेच आहे.