ब्ऊबा आणि कीकी किंवा बलूबा आणि टेकेट

Primary tabs

nemake_va_mojake's picture
nemake_va_mojake in जनातलं, मनातलं
29 Jan 2022 - 8:14 pm

*ब्ऊबा आणि कीकी किंवा बलूबा आणि टेकेट*

शब्दब्रह्म हा बऱ्यापैकी वापरातला शब्द आहे. या शब्दाला प्राचीन परंपराही आहे. पण अर्थात तो बऱ्याच सैलपणेही वापरला जातो. सध्याच्या काळात माझ्यासारखा बोटांचा चाळा म्हणून काहीही खरडणाराही शब्दब्रह्माचा उपासक आणि भर्तृहरिसारखा साक्षात्कारी सखोल तत्त्वचिंतकही शब्दब्रह्माचा उपासक. फरक असतो तो उपासनेच्या दर्जाचा.
भर्तृहरिसारखा थोर चिंतक स्फोट-सिद्धांतातून आदिम नादतत्त्व ते शब्दाचं प्रकट रूप किंवा स्फुट ध्वनिरूप (पश्यंति ते वैखरी) या प्रवासाची उपपत्ती मांडतो. आणि मी माझी फुटकळ, शब्दबंबाळ यमकं जुळवताना जेरीला येतो. पण म्हणून काय झालं? "शब्दब्रह्माचा उपासक"च!
पण अशा अज्ञानी उपासनेत उपास्य वस्तूचं गांभीर्य बरेचदा लक्षात येत नाही.
लेखाच्या विचित्र शीर्षकाला अजून स्पर्श न केल्याने हे वाचायचं थांबवलं नसेल असं मनाशी धरून त्या शब्दांकडे येतो. ध्वनिसंवेदनेचा अर्थाशी संबंध जुळवण्याचा हा प्रयत्न. शास्त्रज्ञांनी दोन आकृत्या लोकांना दाखवून त्यांचा संबंध ब्ऊबा व कीकी या दोन शब्दांशी जोडायला सांगितला. हा प्रयोग दोन गटांवर केला. एक गट उत्तर अमेरिकेतल्या लोकांचा व दुसरा गट दक्षिण भारतातील लोकांचा. एक जी काहीशी कमानदार किंवा गुटगुटीत आकृती होती ती लोकांना ब्ऊबा वाटली आणि दुसरी काहीशी तीक्ष्ण वा टोकदार आकृती ही कीकी. तसंच काहीसं बलूबा व टेकेट बद्दल. गुबगुबीत बलूबा. काटक टेकेट! या शब्दांना दोन्ही गटांच्या भाषेत काहीच अर्थ नाही. पण उच्चारांच्या ध्वनिरूपावरुन ते त्या त्या आकृतीशी संलग्न केले गेले. भाषेच्या उगमाचं संशोधन करताना योजलेले हे प्रयोग आहेत. यावरून शब्दाचं ध्वनिरूप हे शब्दाचा अर्थ न समजताही कसं काम करत असतं याचा थोडा अंदाज येतो.
आणि स्फोट-सिद्धांतातून भर्तृहरिने यावर किती सखोल विचार केलाय आणि शब्दाद्वैतासारखी परब्रह्मापर्यंत नेणारी गोष्ट मांडलीय हे वाचून आपल्या परंपरेचा क्षणभर तरी अभिमान वाटल्यावाचून राहात नाही.
मुद्दा हा आहे की हे सगळं आपल्या आयुष्याला कुठे स्पर्श करतं? एक म्हणजे कवितेच्या वाचकासाठी अशा गोष्टींचा वा शब्दांचा हेतूपुरस्सर केलेला वापर लक्षात घेऊन कवीला दाद देण्यासाठी आणि दुसरं इथे मघाशी म्हटल्याप्रमाणे होतकरू कवींना उपास्य वस्तूचं गांभीर्य लक्षात येण्यासाठी.

"गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले" सारखी कविता याचं उदाहरण म्हणून बघितली तर हे समजायला मदत होईल. या ओळीतला आशय सुगम आहे पण तो कसा व्यक्त झालाय ते बघणं आवश्यक -
एक म्हणजे - ऱ्हस्व शब्द विपुल प्रमाणात - ज्यामुळे लयीत म्हणताना उच्चारणाचा वेग आपसूक वाढतो
दुसरं म्हणजे - ड/द सारख्या ध्वनीची पुनरुक्ती - ज्यांतून गडगडण्याचा ध्वनी आणि वेगाचं सूचन
आणि कळस म्हणजे ढगा साठी "जलद" हा ढग/वेग हे दोन्ही सुचवणारा द्व्यर्थी शब्द.

बोरकरांनी हे मुद्दाम शब्द शोधत बसून केलं असेल? वाटत नाही मला तरी. मर्ढेकर म्हणतात तसं ही कवीची "लेखनगर्भ आत्मनिष्ठा". जर कवीची ऊर्मी खरी असेल, प्रतिभा अस्सल असेल, सौंदर्याची सहज जाण आणि आवश्यक तेथे तंत्र हे प्रकट विचाराच्या पलीकडे जाऊन सिद्ध झालं असेल तर असं काव्य निपजतं.
अर्थात हे शब्दभान म्हणजेच कविता नाही. हा कवितेचा फक्त एक घटक आहे.
"तव चिंतनी मन गुंगुनी मी हिंडतो रानीवनी"
(बोरकर)

"खप्पड बसली फिक्कट गाल
तळभिंतीवर घेऊन जख्खड"
(मर्ढेकर)

यासारख्या ओळींतूनही या घटकाचं सामर्थ्य जाणवतं पण त्याचं महत्त्व व यश हे एकूण कवितेच्या संदर्भातच बघितलं पाहिजे.
महत्त्वाचा भाग हा की हे घटक अव्यक्त पातळीवरून वाचकावर परिणाम करत असतात आणि कवितेला पूर्ण अर्थाने कविता बनवत असतात.
करंदीकरांच्या बालकवितांत (आणि इतरही काही कवितांत) याचा अतिशय यशस्वी वापर केलेला दिसतो. कोलटकरांच्या रचनांना कविता म्हणताना बऱ्याच जणांची जीभ अडखळते पण त्यांनीही याचा प्रभावी वापर केला आहे.
गद्यामध्ये याचा वापर करणं कठीण. भारत सासणेंच्या "पत्राचं कोडं अर्थात जुवाखाना" सारख्या कथेत कथानकाचा वेग आणि नाट्य तोलत जाणारी गद्यरचना हा अत्यंत सुंदर व लक्षणीय प्रयोग पण गद्याला अंगभूत मर्यादा असतात. (हे विधान धाडसी आहे पण मी ते तसंच राहू देतोय)

कवितेला कविता राखण्याचा प्रयत्न इमानाने करणं हेच कवीच्या हातात असतं. आपल्या कवितेच्या उर्मीमागील प्रेरणा नीट समजून घेणं आणि त्याबद्दल खात्री पटल्यावर त्यांची शुद्धता अबाधित ठेवून त्यांना पूर्ण न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं हे कवीचं कर्तव्य आहे. अर्थात उर्मी ते कविता हा बरेचदा कवीमधला सामान्य माणूस शुद्धीवर नसताना होणारा प्रवास असतो. पण त्या प्रवासाचं फलित काय हे साक्षेपी दृष्टीने स्वतःला आणि वाचकांना पाहता यावं म्हणून हे.

*- कौस्तुभ आजगांवकर*

वाङ्मयकविताआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

अगदी असंच मला संतकाव्याविषयी वाटत आलंय. ज्ञानेश्वरांपासून बहिणाबाई आणि तुकडोजी महाराजांपर्यंत सर्वांनी एकेक अक्षराचा आणि छंदाचा विचार करून लिहिलं असेल का?
चोखोबा, त्यांची पत्नी सोयराबाई, सोयराबाईचा भाऊ बंका यांनी जे 'लिहिलंय' ते काव्य म्हणता येईल इतकं छंदात, यमक असलेलं, सुगम आहे. समाजातील सर्वात तळातील घटक असताना त्यांना वाचणं आणि लिहिणं येत असेल का शंका आहे.. तरी त्यांची निर्मिती संत'वाङ्मय' मध्ये समाविष्ट व्हावी, अशा साहित्यिक प्रकाराची आहे.
या सर्वाला 'आंतरिक ऊर्मीतून आलेलं' हे कारण असेल का?

कंजूस's picture

30 Jan 2022 - 8:46 am | कंजूस

शंकराचं तांडव एका अशाच काव्यात आहे. डड्डडड्ड असा डमरुचा आवाज ऐकल्याचा भास होतो.

सुंदर,अगदी मनातलं वाचतेय असं वाटलं!

चौथा कोनाडा's picture

30 Jan 2022 - 7:55 pm | चौथा कोनाडा

सुरेख !
बरेच शब्द हे त्यांच्या उच्चारावरुन (नादतत्व / ध्वनिरूप ) बनलेत.
उदा. खळखळाट, भरभर इ.
असे शब्द वापरुन आशयपुर्ण कविता तयार करायलाही वेगळी प्रतिभा हवी !
मोजकेच कवि अशा कविता करतात !

मला आवडलेली अशी एक रचना, ज्यात ली हे दीर्घ अक्षर वापरून सुंदर नाद साधला आहे :

कोमल काया की मोहमाया पुनवचांदनं न्हाली
सोन्यात सजली रूप्यात भिजली रत्‍नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली, इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली, रत्‍नप्रभा तनू ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली

छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी, नयन तलवार

ही रती मदभरली दाजी ठिनगी शिनगाराची
कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वार्‍याची

ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहुन थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली, इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली, रत्‍नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदणं न्हाली

- गुरु ठाकुर

कर्नलतपस्वी's picture

30 Jan 2022 - 8:33 pm | कर्नलतपस्वी

अभिषेकी बुवां बोरकरांच्या कवितेबद्दल बोलताना म्हणले की त्यांच्या कवितेत शब्द आणि सुर हातात हात गुंफून येतात.
आशोकजी परांजपे यांची " केतकीच्या बनी मधे" ही कविता त्यांना राजस्थानात लग्न समारंभात मोर आणी अश्रु बघून सुचली आसे वाचले आहे.
गोविदांग्रज यांच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा "राजहंस माझा निजला " ही कविता सुचली.
गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई
ही कवीता एका सीनेमातील अंगाई गीत म्हणून प्रसिद्ध आहे. खेडेगावातील दररोजची घटना, शब्द साधेच पण किती गेय आहे.
उत्कट आणी उत्स्फूर्त भावनाविष्कार म्हणजे कवीता आसे मला वाटते. छंद आणि यमक जुळवायच्या नादात ट ला ट जोडणाऱ्या कवीची फरपट सामान्य वाचकाला सुद्धा सहज लक्षात येते.
हे सर्व मनातून येते तेव्हांच ते जनात कित्येक वर्षे जीवंत रहाते.

अनन्त्_यात्री's picture

31 Jan 2022 - 9:33 am | अनन्त्_यात्री

शेवटचा परिच्छेद "समीक्षकी" ढंगात लिहिल्यासारखा वाटतो :)