जो माणूस झोपलेला असतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्या कुशीत झोपलेले असते. जो माणूस आळस झटकून उभा राहतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान उभे रहाते. जो माणूस चालत असतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्या बरोबर चालत रहाते. जो माणूस पळत असतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्या पाठोपाठ पळत असते.
-------- इति प्रसिद्ध जपानी तत्वज्ञ मी (१५२४-१५९७)
डॉक्टर ननवरे एक जगप्रसिद्ध मॅड सायंटिस्ट होते. आता त्यांच्या वेडेपणाला मॅड हाच शब्द यथायोग्य होता. ह्या मॅड शब्दाला मराठीत योग्य पर्यायी शब्द नाही. म्हणजे असे पहा की “ मॅड सायंटिस्ट ” म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर जे चित्र उभे रहाते ते “ वेडा शास्त्रज्ञ ” म्हणाल्यावर उभे राहील काय? माझ्या मते नाही! खर सांगायचे तर डॉक्टर ननवरे त्या चित्रापेक्षाही जास्त मॅड होते.
डॉक्टर ननवरे हे मॅड आहेत हे आजूबाजूच्या बऱ्याच लोकांना माहीत होते. त्यांच्या बद्दल बोलताना लोकं, “ अरे तो येडा रे तो. मनांत आले की बंगल्याचे नाव बदलतो तो रे. आता त्याच्या बंगल्याचे नाव काय आहे माहीत आहे ? “अनिश्चित ” ! पोस्टमन वैतागतात रे. असे ऐकले आहे की नाव बदलले की हा कोर्टांत जाऊन अॅफिडविट करून सरकारी गॅझेटमध्ये छापून पण आणतो. असे लोक म्हणतात म्हणे. खरे खोटे देव जाणे.”
डॉक्टर ननवरेंच्या बद्दल अश्या बऱ्याच काही खऱ्या खोट्या आख्यायिका होत्या. ते कसले डॉक्टर आहेत ह्याबद्दलही विविध मतं होती. खूप लोकांच्या मते ते फिजिक्स किवा रसयनशास्त्राचे डॉक्टर आहेत तर काही लोकांच्या माहितीनुसार ते वाङ्मयशाखेचे डॉक्टर होते.
“ वाङ्मय म्हणजे ते हंस, मोहिनी, नवल, जत्रा दिवाळी अंकामध्ये असते ते ना? त्याला काय धाड भरली. त्याला डॉक्टर कशाला पाहिजे?” जन्याभाउंनी नेमका पॉईंट काढला.
“ लागतात. लागतात जन्याभाऊ. त्याला पण आता कीड लागायला लागली आहे. आणि काहीकाही लेखकांना क्लेप्टो नावाचा एक रोग असतो. तो पण फोफावला आहे. हे लोक वाचता वाचता नकळत गोष्टी खिशांत टाकतात. परदेशी गोष्ट असेल तर हमखासच.” अभ्यंकरांनी स्पष्टीकरण दिले.
कट्ट्यावर येऊन गप्पा हाणणाऱ्या त्या समस्त मंडळींचे एका बाबतीत एकमत होते की डॉक्टर ननवरे हे इस्पितळाबाहेरचे वेडे आहेत. एकदा विषय सुरु झाला की मग काय एकेक जण त्यांच्या वेडेपणाचे किस्से ऐकवत. त्यांत खरे किती आणि खोटे किती हे सांगणाऱ्यालाच माहीत.
जन्याभाऊ सगळ्यांत पुढे.
“ एकदा मी माझ्या मॉर्निंग वॉकसाठी गेलो होतो. रस्त्यांत डॉक्टर भेटले. त्यांना काय हुक्की कोणास ठाऊक. त्यांनी मला त्यांच्या संशोधनाबद्दल सांगायला सुरुवात केली.मी त्यांना चुकवायचा खूप प्रयत्न केला तर त्यांनी माझा हात धरून ठेवला. पठ्ठ्या हात सोडायला तयार नाही. त्याला काय प्रॉब्लेम होता कुणास. तो हुसेनबर्गर नावाच्या कशावर तरी जाम वैतागला होता. तो हुसेनबर्गर म्हणे त्यांच्या संशोधनामध्ये तंगड्या अडकवत होता. मी म्हणतो कशाला असले बर्गर खायचे ? मी मधेच काही बोललो तर डॉक्टर नव्याने बर्गरवर प्रवचन द्यायला लागले. शेवटी मी हिसका मारून माझा हात सोडवून घेतला आणि पुढे निघून गेलो. मनात म्हणालो चला सुटलो. अहो मला पण घाई होती ना. मॉर्निंग वॉक घेऊन घरी जाऊन सूर्य नमस्कर घालायचे होते. कॉलनीला चक्कर मारून परत येत होतो बघतो तर काय रस्त्यांत डॉक्टर माझा हात हातांत घेऊन लेक्चर देत होते. देवाशप्पत सांगतो. माझ्या बॉडीला उजवा हात नव्हता. माझा उजवा हात त्यांच्या उजव्या हातात होता. मी जवळ जाऊन त्यांना हाक मारली, “ अहो डॉक्टर, चुकून माझा हात इथे तुमच्याकडे राहिला. तुमचे प्रवचन संपले असेल तर परत देऊन टाका.”
डॉक्टर तंद्रीतून जागे झाले, “ ओहो हा तुमचा हात आहे का? मी मगाधरून विचार करतो आहे की कोण विसरले असणार? माझ्याबरोबर बोलताना लोकांचे असेच होते. तुम्ही फक्त हातच विसरला. एक हात नसला तरी काही फरक पडत नाही हो. जास्तीत जस्त काय शर्टाची बटणे लावता येणार नाहीत का बुटाची लेस बांधता येणार नाही. तुमचे ते मित्र आहेत ना ते मेंदू विसरून गेले होते.”
“ मेंदू विसरून गेले ? माझा नाही विश्वास बसत.”
“ जन्याभाऊ, मेंदूतच आपली सगळी स्मरणशक्ती असतेना. मेंदूच विसरल्यामुळे मेंदू विसरला हे पण विसरून गेले तुमचे मित्र.”
ही गोष्ट ऐकून सगळा कट्टा थरारून गेला. रावराणे मात्र अस्वस्थ झाले होते.
“ जन्याभाउ, तुम्ही चक्क थापा मारता आहात. तुमचे म्हणजे एक एक बात सव्वा सव्वा हात. आठ हात काकडी आणि नउ हात बी.”
“ ठीक आहे. तुम्हाला माझ्या ह्या थापा वाटतात ना. मग जा डॉक्टरांच्या घरी, द्या त्यांच्या हातांत हात आणि विचारा “ त्या हुसेनबर्गरचे पुढे काय झाले?” आहे कुणाची शामत? घ्या आपली पैज आहे. हजार हजार रुपयांची.” जन्याभाउ सात्विक संतापाने ओरडले, “ हातोहात त्यांनी माझा हात चोरला. परत केला हे मान्य पण एखादे वेळी हात वर केले तर? मग बसा कपाळाला उरलेला हात लावून ”
अर्थात आजपर्यंत ही पैज कुणीही घेतली नव्हती. सापाच्या बीळांत हात कोण घालणार? इन फॅक्ट डॉक्टर समोरून येताना दिसले की कट्टावालं पब्लिक दोनी हात खिशांत घालून घेत. अगदी थेट अर्शद वारसी सारखे.
एकदा असेच कट्ट्यावर पब्लिक फोका मारत बसले असताना त्यांच्या समोर एक झ्याक प्याक गाडी येऊन थांबली. गाडीचा दरवाजा उघडून एक भारतीय तरुण आणि एक गोरा बाहेर आले. त्या भारतीय तरुणाने चक्क मराठीत विचारले, “ डॉक्टर ननावरेंचा “गुरुत्वकण” बंगला कुठे आहे सांगाल का?”
“तुम्हाला डॉक्टर ननवरे म्हणायचे आहे ना? त्यांनी कालच आपल्या बंगल्याचे “गुरुत्वकण” नाव बदलून “गुंतागुंत” असे नाव ठेवले आहे.”
मराठी तरुणाने विदेशी माणसाला समजाऊन सांगीतले, “ही मीन्स क्वांटम एंटॅंगलमेंट”
“ओह आय सी. नॅचरली क्वाएट टिपिकल ऑफ डॉक्टर!”
गोऱ्याने आपल्या जॅकेटच्या खिशातून पाकीट काढून त्यातली बिझिनेस कार्ड्स सगळ्यांना वाटली. तो कुठल्यातरी अमेरिकन कंपनीचा एमडी होता. कट्ट्यावरचे सगळे आदराने उठून उभे राहिले. गाडीत बसायच्या आधी त्याने सर्वांना गुडबाय ठोकला.
“आयला, अमेरिकेत काय कमी वेडे आहेत? हे इकडे ह्या वेड्याला शोधत आले.” नाईक साहेबांनी कॉमेंट टाकली, “तिकडे म्हणे बर्निंग सॅंडल्स नावाचा हिरो आहे. तो काय म्हणतो की सगळ्यांना सगळे फुक्कट. सगळ्यांची सगळी कर्जे माफ. फक्त अमीर लोकांनी सज्जड टॅक्स भरायचा. बाकीच्यांना नो टॅक्स!”
“त्याला इकडे बोलवावून घ्या आणि आपला पी एम करू या.” ह्यावर सगळे फिदीफिदी हसू लागले.
पुन्हा डॉक्टर ननवरेंच्या थरार कथा सुरु झाल्या. पण आज जेव्हा जन्याभाउंनी ही गोष्ट रंगवून रंगवून सांगितली, आणि जेव्हा गोष्टीचा शेवट करताना ते म्हणाले, “आहे कुणाची शामत? घ्या आपली पैज आहे. हजार हजार रुपयांची! ” तेव्हा कुलकर्णी पुढे सरसावले, “माझा नाही असल्या भंकस भाकड कथांवर विश्वास. जगांत असं अकल्पित, अघटीत, अमानवीय वगैरे काही नसतं. हे सगळे आपल्या दुबळ्या मनाचे खेळ आहेत. मला नाही वाटत की डॉक्टर मॅड सायंटिस्ट किंवा जादू टोणा करणारे असावेत. मॅड सायंटिस्ट म्हणजे कोण? जे प्रयोगशाळेत राक्षस बनवतात. का? कारण की त्यांना त्यांच्या लहानपणी कोणी चॉकोलेट दिले नाही म्हणून मानव जातीवर सूड उगवायचा असतो ते तसले. डॉक्टर भले क्रॅकपॉट असतील एक्सेंट्रिक असतील पण ते खचितच मॅड सायंटिस्ट नाहीत. मी ही पैज स्वीकार करतो आणि जिंकून दाखवतो. फुकटचे हजार रुपये मिळत असतील तर का सोडायचे. खर आहे की नाही रावराणे?”
सगळे चूप!
“नाहीतरी मी कॉलनीत नवीनच रहायला आलो आहे. मला पण त्यांच्याशी ओळख करून घ्यायची आहेच, ह्या निमित्ताने तेपण होऊन जाईल. उद्याच जावे म्हणतो. कोणी येणार माझ्या बरोबर?” कुलाकर्णींनी प्रश्न केला.
“कुलकर्णी तुम्ही इकडे नवीन आहात म्हणून सांगतो. कशाला उगीच विषाची परीक्षा घेता. तुमचा हात काय, मेंदू काय त्याच्या समोर हजार रूपयांच्या लालचीने कशाला धोका घेता?”
“जन्याभाउ. त्यांना ती मानवी कुत्र्याची गोष्ट सांगा ना.” कुणीतरी मागून प्रॉम्प्ट केले.
जन्याभाउ उत्साहाने पुढे सरसावले, “कुलकर्णीभाऊ, तुमचा विश्वास बसणार नाही तरीदेखील सांगतो. मी एकदा असाच संध्याकाळी डॉक्टरांच्या बंगल्याच्या बाजूने फिरायला गेलो होतो. तेथे बंगल्याच्या सभोवती एक कुत्रा फिरत होता ------”
“त्यांत काय विशेष? बऱ्याच लोकांना कुत्री पाळण्याचा षोक असतो तसा डॉक्टरांनी सुद्धा एक ठेवला असेल कुत्रा. कुठल्या जातीचा आहे? शेफर्ड, बुलडॉग, टेरीअर,बॉक्सर?”
“ कुलकर्णीसर, प्लीज मला थांबवू नका मधेच. मी सांगतो ते ऐका. मग तुम्हीच ठरवा त्या कुत्र्याचा ब्रीड. त्या कुत्र्यासारख्या दिसणाऱ्या प्राण्याला माणसाचे तोंड आणि कुत्र्याचे शरीर म्हणजे सॉरी कुत्र्याचे तोंड आणि माणसाचे शरीर, अॅक्च्युली माणसाचे तोंड आणि माणसाचे शरीर, मला काय म्हणायचे आहे की कुत्र्याचे तोंड कुत्र्याचे शरीर, कुत्रा माणूस---- ” जन्याभाउ भलेतेच गोंधळले होते.
“जन्याभाउ, अहो कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके? काय ते निश्चित ठरवा एकदा आणि मग सांगा.”
“ मागे पहा.” जन्याभाउंच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.
सर्व कट्टा कंपनीचे हात पॅंटच्या खिशांत!
कुलकर्णींनी वळून बघितले तर मागून एक सद्गृहस्थ दुडक्या चालीने येत होते. “काय मंडळी कसं काय चालले आहे. तुम्ही ह्या जन्याभाऊंच्या गप्पा ऐकत होता ना. मी त्यांचा हात चोरला ती गोष्ट.” कुलकर्णींनी ताडले की हेच ते डॉक्टर ननवरे. त्यांचा परिचय करून संधी आयातीच चालून आली होती. का सोडा?
“मी कुलकर्णी. कॉलनीत नवीनच आलो आहे रहायला. आपली ओळख झाली. बर वाटले. हाउ डू यु डू.” कुलकर्णींनी डॉक्टरांशी हस्तांदोलन केले.
“ मला पण! ते डायनॅमिक कॉम्प्युटर लॅबचे डायरेक्टर कुलकर्णी आहेत ते आपले कोण? नाही म्हणजे त्यांच्यात आणि तुमच्यांत बरेच साम्य दिसले म्हणून. तेच ते एपिकॅंथिक फोल्ड असलेले डोळे, तेच डाव्या कानाचे डार्विंस च्युबर्कल.” डॉक्टर काय बोलत होते ते त्यांनाच ठाऊक.
“डॉपलगॅंगर म्हणून काहीतरी असते तसा काही प्रकार असेल. एनीवे माझे कोणीही नातेवाईक कॉम्प्युटरच्या जवळपासही फिरकले नाहीयेत. कुलकर्णी हे आडनाव आपल्यांत खूप कॉमन आहे.” कुलकर्णींनी एका रहस्यकथेत डॉपलगॅंगर बद्दल वाचले होते.
“मंडळीहो, चला मी निघतो. चालू द्या तुमचे. जन्याभाउ ते कुत्र्याचे पण सांगून टाका. हा हा हा ---- कुलकर्णी या एकदा केव्हातरी. खूप गप्पा मारू.”
“चला. मलाही जायला पाहिजे. गुड नाईट,” असे बोलून कुलकर्णी चालते झाले. हळू हळू मंडळी पांगली. ज्याने त्याने आपापले रस्ते पकडले.
कट्टा रिकामा झाला.
कुलकर्णी घरी पोचले. त्यांनी घराच्या कुलुपाची किल्ली काढण्यासाठी खिशात हात घातला तेव्हा त्यांच्या डोक्यांत प्रकाश पडला. हात गायब! त्यांनी ज्या हाताने डॉक्टरांशी हस्तांदोलन केले होते तो हात डॉक्टरांच्या बरोबरच गेला असावा. कुलकर्णींना दरदरून घाम सुटला. जन्याभाउंच्या अनुभवावरून त्यांची खात्री होती डॉक्टर काही तसे एविल नव्हते. चुकून हात त्यांच्याकडे राहिला असावा. लगेच जाऊन मागितला तर निश्चित परत मिळेल.
कुलकर्णी डॉक्टरांच्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा दारावर त्यांच्या सुरक्षाकर्मीने त्यांचे स्वागत केले. गंमत अशी की त्यांच्या बंगल्याला कुंपण नव्हते. तो सुरक्षाकर्मी इतरेजनांच्या सारखाच म्हणजे “मानवी धडावर मानवी डोके” टाइपचा होता. मधेच एकाठिकाणी लिहिले होते, “ गेट इथे आहे.सावधान कुत्र्यापासून नाही, माणसांपासून.”
“तुमचा हात चुकून डॉक्टरांच्या हातात राहिला. ते घरी आले तेव्हा त्यांच्या लक्षांत आले. तुमच्याशी कसा संपर्क करावा हे माहीत नसल्यामुळे ---- ते तुमचीच वाट पहात आहेत. जा सरळ असे आत जा.”
“सुरक्षासाहेब, इथे कुंपण दिसत नाही आहे. मग “ गेट इथे आहे” असे लिहिण्याची गरजच काय?”
“आहे. कुंपण आहे. विद्युत लहरींचे क्षेत्र वापरून बनवलेले कुंपण आहे. तुम्हाला दिसणार नाही पण तुम्ही तिकडून जायचा प्रयत्न केलात तर डोके आपटेल.”
डॉक्टर लहरी आहेत एवढेच कुलकर्णींना समजले.
“सॉरी कुलकर्णी साहेब, आपला हात चुकून माझ्याकडेच राहिला. हा घ्या. त्याचे काय आहे मानसशास्त्रानुसार ज्या ठिकाणी आपल्याला पुन्हा जावे असे वाटते -- अशी सुप्त इच्छा मनांत असते तिथे आपण काहीतरी विसरून येतो. पुन्हा जाण्यासाठी काहीतरी कारण मिळावे म्हणून. हे तसेच काहीसे आहे. ते जाउदेत, काय घेणार तुम्ही? गरम चहा, कॉफी का थंड आईस्क्रीम, कोक, मिल्क शेक, फालुदा आपल्याकडे सगळे आहे. अर्थात व्हिस्की, रम तसले काही मिळणार नाही. दारूबंदी आहे ना.”
“मी कॉफी घेईन.” कुलकर्णींनी सेफ साईड पकडली. पाणी उकळल्याने निदान कॉफीत जंतू विषाणू तरी नसतील. काय नेम नाही ह्या डॉक्टरचा.
डॉक्टरांनी आपला लॅपटॉप उघडला. काही कळ्या दाबल्या. कुलकर्णींना वाटले नजदिकच्या हॉटेलांत घरपोच सेवेमध्ये ऑर्डर दिली असावी.
“दोन मिनिटांत मिळेल. हे बघा बेल वाजली.कॉफी तयार झाली.”
डॉक्टर बाजूच्या खोलीत गेले. येताना दोन टब भरून पॉप कॉर्न घेऊन आले.
“हा माझा रेप्लीकेटर बरोबर काम करत नाही. अजून बीटा व्हर्शन चालू आहे. त्याला मी काय मागितले आणि त्याने काय पाठवून दिले!” डॉक्टरांनी दोनी टब उचलले आणि कचाराच्या टोपलीत फेकून दिले. कुलकर्णींना वाईट वाटले. दोनदोनशे रुपयांचे एकेक टब!
“अहो डॉक्टर मला चालले असते. गप्पा मारत मारत आपण पॉप कॉर्न फस्त केले असते.”
“कुलकर्णी साहेब आपल्याला चालले असते पण मला नाही चालत ना.”
डॉक्टरांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केले. कधी इडली सांभार आले. कधी वडा पाव तर कधी फालुदा.
शेवटी एकदाची कॉफी आली. चमकदार फेसाने भरलेले एस्प्रेसो कॉफीचे दोन मोठे मग!
“हे मशीन कुठून इम्पोर्ट केले?”
“इम्पोर्ट? अहो जगांत काय आख्ख्या विश्वांत हे फक्त एकच मशीन आहे मी बनवलेले आहे ते. कुलकर्णी तुम्ही स्टार ट्रेक बघता का. त्यांत हे मशीन आहे. थोडे बग आहेत अजून. पुढच्या वेळेस याल तेव्हा पहा कसे टकाटक चालेल ते. अमेरिकन माझ्या मागे लागले आहेत. टेक्नालॉजी द्या म्हणून.”
कुलकर्णींचा ऊर अभिमानाने भरून आला. आपला मराठी माणूस एवढा जगांत सुप्रसिद्ध झाला आहे. त्या आवेगात ते हाताचे प्रकरण पार विसरून गेले. ते जायला उठले. डॉक्टर हसून बोलले, “सामान तपासून बघा. हात, पाय, मेंदू, डोळे ,कान-----”
“डॉक्टर तुम्ही पण ना. अहो काय विसरले तर तुम्ही कुठे पळून जात आहात का? तुम्ही थोडेच हात झटकून मोकळे होणार आहात काय? मग. ”
असे आमचे जगप्रसिध्द मॅड सायंटिस्ट डॉक्टर ननवरे!
आणि मग कोरोना आला. देशांत सगळीकडे हाहाःकार माजला. कोरोनाच्या थैमानाला लगाम घालण्यात शास्त्रज्ञ अपयशी ठरले होते. किती लोक आजारी, किती मृत्युमुखी पडले ह्याची गणतीच नव्हती. असे अभूतपूर्व संकट मानव जातीवर प्रथमच आले होते. सर्व जीवन स्टॅच्यू मारल्यासारखे स्तब्ध झाले होते. फॅक्टरीतली यंत्रं हळूहळू काळझोपेची झापड आल्यागत सुस्त पडली. वाऱ्यावर नाचणाऱ्या फुग्याची हवा गेल्यावर लोळा गोळा होऊन पडलेल्या फुग्यासारखी कॉलनीची अवस्था झाली होती. कॉलनीत लॉकडाऊन सुरु झाला. कॉलनीतला कट्टा ओस पडला. नीट ऐकणाऱ्याला कॉलनीचे उसासे ऐकू आले असते. नीट पहाणार्याला कॉलानीचे अश्रू दिसले असते.
डॉक्टरांना सगळे ऐकू येत होते, दिसत होते.
आणि अशा वेळी सगळ्या देशांत खळबळ उडवणारी ती बातमी आली. पुण्यातल्या कुणा ननवरे नावाच्या इसमाने कोरोनावर अक्सीर इलाज शोधून काढलाय म्हणे.
ह्या बातमीदाराने वापरलेल्या भाषेने डॉक्टरांचे माथे सणकले. ‘इसम’ काय ‘अक्सीर इलाज’ ही काय भाषा झाली. दमा, मिरगी, फिस्टुला, भगंदर,बवासीर. सारख्या जबरी गूढ व्याधीवर दवा देणाऱ्या भोंदू वैदूंच्या जाहिरातीमध्ये असे शब्द असतात.
डॉक्टरांच्या बंगल्याबाहेर ओबी वॅन ची आणि टीवी रिपोर्टरची तोबा गर्दी झाली होती. सगळ्यांच्या अन्टेना उपग्रहांच्या दिशेने रोखलेल्या होत्या. अर्थात कुणालाही आत प्रवेश मिळत नव्हता. विद्युतलहरींच्या बलक्षेत्राचे अभेद्य कुंपण कुणाला तोडता येणार? एक दोन मूर्ख वार्ताहारांचा सुरक्षारक्षकाच्या सांगण्यावर विश्वास बसला नव्हता. त्यांनी अदृश्य भिंतीतून जाण्याचा प्रयास केला त्यांनी स्वतःची डोकी फोडून घेतली. शेवटी त्यांनी बंगल्याच्या बाहेरूनच बातम्या द्यायला सुरुवात केली. काही वाहिन्यांनी मजा बघायला आलेल्या कट्टाकरांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा टीवी वर प्रसारित करायला सुरुवात केली. मग काय विचारता जन्याभाऊंच्या कल्पनाशक्तीला उधान आले. थोडा वेळ पब्लिक कोरोना विसरून गेले. टीवीवाल्यांनी अशी काय हवा निर्माण केली की सर्व सामान्य जनतेला आशेचा किरण दिसू लागला.
डॉक्टर आपल्या दिवाणखान्यात बसून टीवीवर हा सारा तमाशा बघत होते.
शेवटी अंधश्रद्धा तोड फोड (अंतोफो) मंडळाच्या सभासदांनी न्यायालयाकडे धाव घेतली. औषधे आणि जादू-ई-उपायांच्या नियमांचे संभाव्य उल्लंघन (potential violation of Drugs and Magic Remedies regulations) केल्याचा आरोप डॉक्टरांवर करण्यांत आला. डॉक्टरांनी आपला दावा सिद्ध करून दाखवावा किंवा तो दावा मागे घ्यावा असे आव्हान त्यांनी दिले. डॉक्टर हे मानायला तयार नसतील तर सरकारने त्यांच्यावर अंधश्रद्धा आणि बुवाबाजी कायद्यान्वये त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती.
हा प्रश्न जनतेच्या जीवन मरणाचा असल्यामुळे न्यायालयाने त्वरित दखल घेतली. डॉक्टरांना न्यायालयांत हजर राहण्याचे आमंत्रण ऊर्फ समन्स आले. न्यायालयांत येऊन त्यांनी आपल्या उपचाराची सविस्तर माहिती न्यायालयाला आणि तज्ज्ञ मंडळींना द्यावी, त्यावर सांगोपांग चर्चा व्हावी अशी न्यायालयाची इच्छा होती.
दुसऱ्या दिवशी डॉक्टर कोर्टांत हजर झाले. लॉकडाउनमुळे इतरेजनांना कोर्टांत येण्याची परवानगी नव्हती. पण टीवी वाहिन्यांना कोर्टाचे कामकाज राष्ट्रीय पातळीवर प्रसार करण्याची मुभा होती.
न्यायालयाने प्रसिद्ध वकील श्री.बाटलीवाला यांना कोर्टांला मदत करण्यासाठी नेमले होते. न्यायालयाने बाटलीवालांना कामकाजाची सुरवात करण्याची अनुज्ञा दिली.
बाटलीवाला ह्यांनी प्रथम केसची थोडक्यांत माहिती सांगितली,
“श्री ननवरे ह्यांनी त्यांच्याकडे कोरोन विषाणू वर-------”
डॉक्टर ननवरे निराश दिसत होते. त्यांनी मधेच उठून बोलायला सुरुवात केली, “अहो महाशय, किमान जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर श्री ननवरे असे तरी म्हणा ”-------
न्यायाधीशांनी त्यांना फटकारले., “न्यायालयांत अशी विशेषणे वापरता येणार नाहीत. तुम्ही शास्त्रज्ञ आहात की नाही हाच मुळी वादाचा मुद्दा आहे इथे. पुन्हा असे मध्ये मध्ये बोलून व्यत्यय आणू नका.”
बाटलीवाला यांची प्रस्तावना झाल्यावर न्यायालयाने डॉक्टरांना प्रथम बोलण्याची संधी दिली. आधी त्यांनी शपथ ग्रहण केली, “मी निष्ठावानपणे वचन देतो की जे मी सांगेन तेच सत्य असेल, संपूर्ण सत्य असेल आणि सत्याशिवाय काहीच नसेल.”
अंताफोने त्यांच्यावतीने विषाणू तज्ञांची टीम उभी केली होती.
त्यांना उद्देशून डॉक्टरांनी बोलण्यास सुरवात केली, “ मी भौतिकशास्त्रज्ञ आहे. मी औषधे देणारा वा शरीराची चीरफाड करणारा डॉक्टर नाही. त्याचप्रमाणे मी जीवशास्त्र पण जाणत नाही. विषाणू तज्ञ तर नाहीच नाही.”
अंताफोचे डॉक्टर बोस अस्वस्थ झालेले पाहून न्यायमूर्तींनी हसून त्यांना प्रश्न केला, “आपल्याला काही सांगायचे आहे का?“
“हो. श्री ननवरे यांनी आताच कबूल केले आहे की त्यांना करोना बद्दल बोलायचा काही अधिकार नाही. ते डॉक्टर नाहीत की विषाणू तज्ञ नाहीत. त्यांना करोनावर उपचार करण्याचा काडीमात्र अधिकार नाही. तेव्हा मला वाटते की ह्या न्यायालयाला लगेचच निर्णय द्यायला काही अडचण नसावी.”
“आपण हा एवढा पसारा उभा केला आहे. आपण तसेच श्री ननवरे वेळ काढून उपस्थित राहिले आहेत. तेव्हा मला वाटते की त्यांचे काय म्हणणे आहे ते ऐकून तर घेऊया.”
“पण इथे भौतिकी जाणणारे कोणी नाहीत. जर माननीय कोर्टाला ननवरे ह्यांचे म्हणणे ऐकायचे असेल तर इथल्या विश्वविद्यालयांत डॉक्टर मोने आहेत. त्यांची सहमती असेल आर आपण त्यांना बोलावू शकतो. त्यांना भौतिकीशास्त्राची चांगली माहिती आहे.”
डॉक्टर मोने घरी टीवी पाहत बसले होते. स्वतःचे नाव ऐकताच ते दचकले. ह्या उहापोहात आपण भाग घ्यावा अशी त्यांना तीव्र इच्छा झाली. त्यांनी बोसना फोन करून, “मी येतो. निघालोच.” डॉक्टर मोने कमी बोलाण्याबद्दल प्रसिद्ध होते.
डॉक्टर मोने आल्यावर न्यायालयाचं कामकाज पुन्हा सुरु झाले.
ननवरेंनी आपल्या उपचार पद्धतीची माहिती मोजक्या शब्दांत सांगितली.
“मी दूरवहनाच्या तत्वाचा उपयोग करणार आहे. दूरवहन म्हणजे एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवून देणे. आपण स्टार ट्रेक मध्ये पाहिले असेल. स्टारशिप कुठल्याही ग्रहावर उतरवावयाचे, तिथे आपले काम करायचे आणि परत उड्डाण करायचे हे सगळे मोठे जिकीरीचे आणि वेळखाऊ काम असते. त्या ऐवजी नेमक्या लोकांना दूरवहनाने त्या ग्रहावर पाठवायचे आणि त्यांचे काम झाले की त्यांना परत उचलायचे हे सुटसुटीत पडते. तोपर्यंत स्टारशिप अवकाशांत चकरा मारत राहील.”
डॉक्टर मोने अस्वस्थ झालेले दिसत होते. ते बोलायला उठणार हे ननवरेंनी ओळखले. “ डॉक्टर मोने, मला माहीत आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे. ह्या सगळ्या कल्पना विश्वातल्या गोष्टी आहेत असेच आपले मत आहे ना. त्या विषयी आपण चर्चा आणि वाद पुन्हा केव्हातरी करू. माझ्या उपचार पद्धतीत मी दूरवहन करणार नाही. फक्त त्यातली एक संकल्पना वापरणार आहे.”
ननवरे पुढे सांगू लागले, “ कुठलीही वस्तू ही अणूरेणूंनी बनलेली असते. अश्या वस्तूची अणूरेणूंची माहिती घेऊन आपण ती माहिती दूरवर पाठवून देउ शकतो तेथे जर योग्य तो कच्चा माल उपलब्ध असेल तर त्या माहितीच्या आधारे ती वस्तू तिथेच बनवू शकतो. आपण फॅक्स करून कागदपत्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवतो तसेच! कागदपत्रं प्रथम स्कॅन केली जातात, माहिती गोळा केली जाते, ती माहिती दूरवर पाठवली जाते. तेथे असलेला कागद, शाई आणि छपाईची यंत्रणा वापरून नवीन प्रत बनवली जाते.”
“माझ्या मते माणूस दुसरे तिसरे काही नसून केवळ माहितीचा साठा ,स्रोत आहे. येस, येस, आत्मा आणि विवेकबुद्धी धरून. माझ्या उपचारपद्धतीत स्कॅनर वापरून रोग्याच्या शरीरातल्या अणूंची माहिती एकत्र केली जाईल, ती संगणकांत साठवली जाईल. मग त्यांतील कोरोनाच्या अणुंना वेगळे करून गाळले जाईल आणि ती शुद्ध माहिती रोग्याच्या शरीरांत पुन्हा पाठवली जाईल. रोगी कोरोना मुक्त!!”
आता मात्र डॉ. मोनेंना थांबवेना, “माननीय न्यायाधीश महोदय, डॉक्टर ननवरेंच्या वर्णनात कित्येक त्रुटी आहेत. विज्ञानाच्या अनेक नियमांची उघड उघड पायमल्ली केली गेली आहे. मानवी शरीरांत सर्व साधारणपणे सातावर सत्तावीस शून्य दिल्यावर जी संख्या तयार होते तितके अणू असतात. त्यांची अतिप्रचंड माहिती साठवून ठेवण्यासाठी लागणारी स्मृती साधने अस्तित्वांत नाहीत. असा संगणकही अस्तित्वांत नाही. माझ्या हिशोबाने ज्या गतीने संगणक शास्त्र प्रगत होत आहे त्या गतीने किमान तीनशे वर्षानंतर हे साध्य होईल. नेक्स्ट पॉईंट, महान हायझेनबर्गच्या अनिश्चितता तत्वानुसार विश्वातील कुठल्याही गोष्टीची पूर्ण माहिती आपल्याला कधीही मिळणार नाही. मानवाचे शरीर स्कॅन केल्यावर आपल्याला शरीरातील प्रत्येक मूलभूत तत्वांची माहिती होईल. ह्याठिकाणी एक लक्षांत घ्यायला पाहिजे की कोरोनाच्या विषाणूंची तशीच माहिती असेल. ती निराळी कशी ओळखली जाणार? महत्वाचे म्हणजे माहिती म्हणजे वस्तू नाही! माहिती नष्ट केली तरी वस्तू उरणारच. हे सगळे करत असताना रोग्याची काय अवस्था असेल? क्षणभर आपण असे मानूया की ही पद्धत यशस्वी झाली तरी देशाच्या लाखो रोग्यांवर उपचार करण्यासाठी लागणारी यंत्रे, ट्रेंड मॅन पॉवर कुठून येणार? माननीय न्यायामूर्ती, ननवरे काय बोलताहेत ते माझ्या अल्पमती मुळे मला समजत नाही आहे.”
“मी जैविक संगणक वापरतो. ते तुमच्या संगणकापेक्षा कित्येक पटींनी जास्त वेगाने काम करतात. सर्वांत प्रथम म्हणजे मी पूर्ण शरीर स्कॅन करणार नाही आहे,” डॉक्टर सांगू लागले, “मी फक्त कोरोना विषाणू स्कॅन करणार आहे.”
“फक्त कोरोना विषाणू स्कॅन करणार आहे? ते कसे काय बुवा?” मोने सरांनी पृच्छा केली.
“आता तुम्ही बरोबर प्रश्न विचारत आहात. तुम्हाला उत्तरेही बरोबर मिळतील. मी रुग्णाच्या शरीरांतील रक्तप्रवाहांत अतिसूक्ष्म बुद्धिमान रोबोंची पलटण सोडणार आहे. ते कोरोनाच्या विषाणूंना पकडून स्कॅनरच्या समोर आणतील. माझे यंत्र त्या विषाणूंची माहिती समूळ नष्ट करेल. विषाणू हतबल होऊन नष्ट होतील.”
डॉक्टर ननवरे पुढे सांगू लागले. “आता तुमचा पुढचा प्रश्न. माहिती आणि वस्तू ह्यांचा परस्पर संबंध. समजा एखाद्या मानवाच्या मेंदूत साठवलेल्या ज्ञानाला आपण पुसून टाकले तर काय होईल? ज्याचा मेंदू रिकामा झाला आहे त्या माणसाचे पुढे काय होते? म्हणून मी म्हणतो की आत्मा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून माहिती हाच आत्मा आहे. त्या माहितीचे नियंत्रण करून आपण पाहिजे तर नराचा नारायण किंवा नराचा वानर करू करू शकतो. ह्या पुढील शतकांत हेच तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. सध्याच ह्या तंत्राचा वापर करून मानवांच्या डोक्यावर चुकीच्या माहितीचा भडिमार करण्यांत येत आहे आणि त्याचे परिणाम आपण बघत आहात. ही त्या तंत्राची पहिली पायरी आहे.”
“न्यायाधीश महोदय, दुसऱ्याही कित्येक शंकांची उत्तरे मी उद्या देईल कारण ज्या संस्थांनी माझ्या संशोधनांत मदत केली प्रथम त्यांची परवानगी घेणे माझे कर्तव्य आहे.” ननवरेंनी आपले भाषण संपवले.
न्यायालयाचे काम त्या दिवसासाठी संपले.
मध्यरात्री केव्हातरी डॉक्टरांच्या घराच्या दरवाज्यावर टक टक झाली. डॉक्टर कुत्र्याचे रुपांतर सश्या मध्ये करण्याच्या प्रयोगांत मग्न होते. इतक्या रात्रीं आपले अभेद्य कुंपण उल्लंघून कोण आले असावे? डॉक्टरांनी विचार करत करत दरवाजा उघडला. समोर काळा चश्मा आणि काळा सूट परिधान केलेले, जगदीश्वराचे दोन प्रतिनिधी उभे होते.
“आम्ही कोण आहोत हे तुम्ही जाणताच. बिग बॉसने तुम्हाला घेऊन आणण्याची जबाबदारी आमच्यावर टाकली आहे.” त्यातल्या त्यांत वरिष्ठ काळभैरवाने आपल्या येण्याचे कारण सांगितले.
“तुम्ही काळप्रवासाच्या नियमांचे उल्लंघन करू पहात आहात, कालप्रवासाच्या नियमावलीतील नियम क्रमांक २१७ ड (५ ) अन्वये तुम्ही भविष्यकाळातील शोध, उपकरणे किंवा असाध्य रोगांवरील औषधे ह्याबद्दलचे ज्ञान वर्तमानकाळात घेऊन जाऊ शकत नाही. कालप्रवाश्याने वर्तमानकालातील घटनांचे फक्त मूक साक्षीदार व्हायचे असते, त्यांत हस्तक्षेप करायचा नसतो! हे नियम तोडून तुम्ही मानवाचे दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करू पाहात आहात. मानवी इतिहासांत कित्येकांनी असे प्रयत्न केले. त्यांचे काय झाले ते तुम्हाला ज्ञात असेल. ह्या मानवांना दुःख सोसू द्या. कष्ट करू द्या. ते निश्तिच कोरोन वर उपाय शोधून काढतील. आपण त्यांत मध्ये पडण्याची गरज नाही. ह्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुमची बदली आता ग्यानिमिडवर करण्यांत आली आहे.”
“तुम्ही डिलाईटफुल गार्डिनरमधली “ऑल अबाउट द डॉग ” ही कथा वाचली आहे? नसेल तर अवश्य वाचा. मी सुद्धा ही कथा इथे आल्यावरच वाचली. कधी कधी दुसऱ्याला मदत करण्यासाठी नियम तोडले तरी चालतात. नियम तोडा पण संकटात सापडलेल्याला मदत करा. माणूस कोरोना वर मात करेल ह्यांत संदेह नाही पण तो पर्यंत कित्येक निरपराधांचे बळी जातील त्याचे काय?” डॉक्टर ननवरेंनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
“आम्ही पोलीस आहोत. नियम केव्हा आणि कोणी तोडायचे हे बिग बॉस ठरवेल. आम्ही फक्त नियमांची अंमलबजावणी करतो. चला आता उगीच उशीर करू नका. सामानाची काळजी करू नका. आपले सामान आपोआप आपल्या मागून येईल.” काळभैरवांचा पण नाईलाज होता. विज्ञानाने त्यांचे हात बांधलेले होते.
दाराच्या फटीतून झुरळांची एक जोडी हे दृश्य बघत होती. माणसे झुरळांचा नायनाट करण्यासाठी कुठली कुठली रसायने वापरतात त्यांचे विश्लेषण करून ते मातृभूमीला कळवणे ही त्यांची जबाबदारी होती. त्यावर तात्काळ प्रतिकारशक्ती कशी बनवायची ह्याचे संशोधन करण्यासाठी हुशार झुरळांचा एक ग्रुप बनवला गेला होता. त्यामुळेच मानव झुरळांचा पक्का बंदोबस्त कधीही करू शकणार नव्हते.
“अरेरे, बिच्चारे डॉक्टर ! वर्तमानातले मानव आणि भविष्यातले मानव. दोनी भाऊभाऊ. पण नाही म्हणजे नाही एकमेकांना मदत करणार,” मि. झुरळ मिस झुरळीला म्हणाले
“तू कधी आयुष्यांत फिजिक्स वाचलं असतस तर तुला कारण समजले असते.” झुरळीने झुरळाच्या बुद्धीची कीव करत त्याला सांगितले.
“ह्या असल्या निर्दय फिजिक्सची ऐसी तैसी. जाउदेत, आपण आपले काम करू या. याचा रिपोर्ट हेड ऑफिसला करायला पाहिजे. आणि हो मला सुट्टीसाठी अर्ज पण करायचा आहे. आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही. डॉक्टरांचे रेप्लीकेटर मशीनशे प्रयोग चालू होते तेव्हा आपल्याला रोज चमचमित खायला मिळत होते. आता ते मिळणार नाही.”
झुरळांनी आपल्या मिशा फेंदारून TOI 700 d ग्रहाकडे रोखल्या आणि संदेश पाठवायला सुरवात केली. संदेश पाठवून झाल्यावर बाजूला पाहिले तर डॉक्टर गायब! दोनी काळभैरव आश्चार्यथकित होऊन इकडे तिकडे बघत होते.
झुरळी झुरळाला म्हणाली, “आपल्या मोठ्या झुरळसाहेबांनी डॉक्टरांना अलगद उचललेले दिसते आहे. गुड! वेरी गुड! ”
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
(माझा ब्लॉग इथे आहे.)
(https://iammspd.blogspot.com/)
प्रतिक्रिया
27 Jan 2022 - 2:39 pm | विजुभाऊ
मेन इन ब्लॅ़क????????
29 Jan 2022 - 3:36 pm | ज्ञानोबाचे पैजार
और आने दो
पैजारबुवा,