सोनं
“अरे ए बबन्या,काय खबर मिळाली की नाही?” डुगऱ्यादादाचं डोकं गरम झालं होतं.
सालं चार महिने झाले एक पण मोहिम यशस्वी नाही झाली.या लॅाकडाऊनमुळे एक तर ट्रॅफीक बंद.लोक फिरायला बाहेर पडत नाहीत त्यामुळे लूट बंद.लग्नकार्य बंद त्यामुळे बायका नटून थटून मिरवत नाहीत.रोकडा पण नाही आणि सोनं चांदी पण नाही.त्यात बार बंद मग हातभट्टीच्या पहिल्या धारेच्या कडक मालाला उठाव नाही.
सालं जगायचं तरी कसं.
डुगऱ्यादादा कपाळ बडवत बसला होता.बबन्या धावत धावत आला.त्याला धाप लागली होती.
“ए बबन्या कुठून एव्हढा भूत बघितल्यासारखा पळत आलायस?”डुगऱ्यादादाने विचारलं.
“दादा त्ये पक्की खबर आहे ती शेजारच्या गावात एक बुढ्ढी आहे ना तिच्याकडे भरपूर सोनं आहे.आणि बुढ्ढी एकटीच रहाते.तिला कोणबी नाय.ना आगा ना पिच्छा .”बबन्या एकदम उत्साहात म्हणाला.चांगली खबर दिली आता डुगऱ्यादादा आपल्याला बक्षीसी देणार म्हणून बबन्याने हात पुढे केला.
धाडकन आवाज आला.बबन्याच्या डोळ्यापुढे काजवे चमकले.बबन्या आपला हुळहुळणारा गाल चोळत खट्टू होऊन मागे सरला.
“काय पण खबर आणलीय?शेजारच्या गावात जाणार कसं?गावबंदी आहे ना?”डुगऱ्यादादा गरजला.
“ न्हाय दादा.त्या इष्णूच्या शेतातून गेलं तर कुणाला कळत नाही.सगळे तिकडूनच ये जा करतात.”बबन्या रडवेल्या आवाजात म्हणाला.
“असं होय.मग आधी हे सांगायचं मग असे फटाके फुटत नाहीत.”डुगऱ्यादादा प्रेमाने म्हणाला.
मग सूर्य मावळला की मोहिमेवर निघायचं ठरलं.दादा खूष होता म्हणून कोंबडी,भाकरीचा बेत ठरला.जेवून निघायचं,पण कुणी बाटलीला हात लावायचा नाही अशी ताकीद देऊन दादा आराम करायला गेला.
सूर्यास्तानंतर एक एक जण बाहेर पडले आणि शेजारच्या गावच्या वेशीजवळ आले.सगळीकडे सामसूम होती.
एक एक करत बुढ्ढीमायच्या घराजवळ आले.बुढ्ढीमायच्या जवळपास घरं नव्हती ते बघून डुगऱ्यादादा खूष झाला.चला जास्त मेहनत नाही करावी लागणार.
सगळ्यांनी तोंडावरची फडकी नीट केली.दरवाजाजवळ जाऊन दरवाजा वाजवायचा की आवाज द्यायचा अशी कुजबुज चालू असतानाच ,दरवाजा कुणीतरी उघडला.बुढ्ढीमायला कुजबुज ऐकू आली म्हणून बुढ्ढीमाय हातात टॅार्च घेऊन दरवाजा उघडून बाहेर आली होती.
बुढ्ढीमायला ढकलून डुगऱ्यादादा आत शिरला.
घरात एक छोटा बल्ब चालू होता.बुढ्ढीमाय भाकर खात होती बहुतेक,जवळच एका ॲल्यूमिनियमच्या ताटलीत डाळीचं पाणी दिसत होतं आणि बाजूला भाकर दिसत होती.
घरात तर सगळीकडे दारिद्र्यच दिसत होते.फक्त दोन तीन ॲल्यूमिनियमचे डबे आणि चार पाच भांडी होती.एक खाट होती बस्स.कपाट वगैरे काहीच दिसत नव्हतं.
डुगऱ्यादादा खोलीतली अवस्था बघून बबन्यावर वैतागला.
“काय रे डुकरा,कसली खबर आणलीस,इथे तर काहीच दिसत नाहीय.”
“ नाही दादा,खबर पक्की आहे म्हातारीकडे भरपूर सोनं आहे.रोकड आहे का माहित नाही पण सोनं भरपूर आहे.आपण शोधूया.मिळेल आपल्याला.”बबन्या आत्मविश्वासाने बोलला.
“अरे पण कुठे शोधणार?काही दिसतंय का तुला त्यात सोनं ठेवलं असेल असे.”डुगऱ्यादादा किंचाळायचाच बाकी होता.
“दादा,भिंती आणि जमीन मातीची आहे.यातच कुठेतरी दडवलं असणार.गांवच्या लोकांनी बुढ्ढीचं सोनं बघितलंय.ते बोलत असतात .बुढ्ढीमायच्या सोन्याची खूप चर्चा आहे.”बबन्या जरा गयावया करत बोलला.त्याला डुगऱ्यादादाच्या माराची भीती वाटत होती.
डुगऱ्यादादानी म्हातारीला जरा दरडावून विचारलं,”ए म्हातारे सोनं कुठंय?”
पण बुढ्ढीमाय ढिम्मं होती ती तोंडातून एक शब्द काढायला तयार नव्हती.
सोन्या म्हणाला,”दादा दोन थोतरीत ठेवून द्या म्हणजे घडा घडा बोलेल.”
“अरे मारलं तर पटकन मरेल म्हातारी.जरा वेळ बघूया ,होईल बोलती माराच्या भीतीने.”दादा बोलला.
“ए बुढ्ढे, सोनं कुठेय सांगते का घालू लाथ कंबरड्यात?”बबन्याने दम दिला.
बुढ्ढीमायने शांतपणे खात असलेली भाकर टोपलीत ठेवली आणि डाळीच्या भांड्यावर झाकण ठेवून शांतपणे खाटेवर बसली.आणि हातानीच खूण केली ‘शोधा तुम्ही.’
बुढ्ढीमायचा शांतपणा बघून सोन्याचं टाळकं सणकलं आणि तो बुढ्ढीमायच्या दिशेनी पुढे सरकला..
डुगऱ्यादादानी सोन्याला हातानी थांबवलं.डुगऱ्यादादानी कमरेला लटकवलेली दोरी काढली आणि बुढ्ढीमायला खाटेच्या पायाला बांधून ठेवलं.खरं म्हणजे बुढ्ढीमाय एकदम शांत होती.जणू तिच्याजवळ चोरी होण्यासारखं काहीच नव्हतं.बुढ्ढीमाय एखाद्या स्थितप्रज्ञ माणसासारखी शांत होती.
बबन्याने कमरेला लटकवलेला कोयता काढला आणि भिंतींवर आपटायला सुरूवात केली काही काही ठिकाणी भिंत पोकळ असेल असे वाटत होते.
“दादा हे बघा काही ठिकाणी भिंत पोकळ वाटतेय.म्हणजे भिंतीतच कुठेतरी लपवलं असणार सोनं.”बबन्या उत्साहित होऊन म्हणाला.त्याला खात्री पटली होती कि सोनं नक्कीच भिंतीत लपवून ठेवलं असणार.
घराच्या सगळ्या भिंती कोयत्यानी खणून बघितल्या पण.........सोनं काही गावलं नाही.
डुगऱ्या दादानी परत आपला मोर्चा बुढ्ढीमायकडे वळवला.
“ ए म्हातारे,सांग की सोनं कुठे ठेवलयस?का काढू कोथळा बाहेर?”डुगऱ्यादादाच्या बोलण्याचा बुढ्ढीमायवर काहीच परिणाम होत नव्हता.ती तोंड उघडून बोलायला तयार नव्हती.
तिने परत खांदे उडवले ,जणू सांगत होती,’शोधा तुम्हीच’
कुणी भिंती फोडून काढल्या कुणी सगळे डबे उलटे केले.पाणी भरलेला माठसुद्धा उलटा करुन बघितला.
कुणीतरी एकुलती एक गादी फाडली.एकानी बुढ्ढीमायची गोधडी फाडून चिंध्या केल्या.
पण सोनं काही गावलं नाही.डुगऱ्यादादानी स्वत: बुढ्ढीमायचं सगळं अंग चाचपून बघितलं ,सोनं कपड्यात कुठे लपवून ठेवलंय का बघायला.....
पण सोनं काही गावलं नाही.
आणि बुढ्ढीमाय गालातल्या गालात हसत होती.जणू तिला चोरी होण्याची फिकीर नव्हती.
“मला वाटतं हिने अशीच आवई उठवली असेल सोनं असल्याची.”डुगऱ्यादादा म्हणाला.
बबन्याला अजून आशा होती त्यामुळे तो म्हणाला,” दादा मला वाटतं भिंतीत नसेल पण जमिनीत नक्कीच पुरून ठेवलं असेल.आपण या खाटेखालची जमीन खणून बघूया.सोनं नक्की सापडेल.लोकांनी बघितलंय हिच्याकडचं सोनं.खबर पक्की आहे दादा.”
डुगऱ्यादादानी बुढ्ढीमायला बांधलेल्या दोऱ्या सोडल्या आणि खाट दुसरीकडे ठेवून परत तिला खाटेला बांधून ठेवली.बुढ्ढीमाय गालातल्या गालात हसत होती.
खाटेखालची जमीन खणून झाली पण तिकडेही निराशाच पदरी आली.
डुगऱ्यादादानी बुढ्ढीमायकडे बघितलं तर ती तशीच गालातल्या गालात हसत होती.आता डुगऱ्यादादाचा राग अनावर झाला होता आणि काडकन थोबाडीत मारल्याचा आवाज आला.
“बबन्या कुठे आहे सोनं?चुकीची खबर आणतोस?”दादा आता चवताळला होता.
पोरांनी एव्हढी मेहनत केली पण हाती काहीच लागत नाहीय.
बबन्या आपला लाल झालेला गाल चोळत होता.
“ दादा,मला वाटतंय या बुढ्ढीला काय खाट सरकवता येणार नाही म्हणजे ती या खाटेखाली सोनं कसं लपवणार?आपण सगळी खोली खणून काढूया.माझी खबर पक्की आहे या बुढ्ढी कडे भरपूर सोनं आहे.तिच्याकडच्या सोन्याची चर्चा पंचक्रोशीत आहे.आपण शोधूया नीट.आपल्याला बुढ्ढीकडचं सोनं नक्की मिळेल.”बबन्या गाल चोळत चोळत बोलत होता.बबन्याला पक्की खात्री होती की आपली खबर पक्की आहे.
डुगऱ्यादादानी मान हलवली आणि सगळी खोली खणायची खूण केली.बराच वेळ गेला होता.लवकर सोनं सापडलं नाही तर हात हलवत परत जावं लागलं असतं.थोड्याच वेळात रात्र सरून पहाट होणार होती.
बुढ्ढीमाय गालात हसत या सगळ्यांचे केविलवाणे प्रयत्न बघत होती.
डुगऱ्यादादा आणि त्याची पोरं चिकाटी सोडत नव्हती आणि बुढ्ढीमाय तिचा शांतपणा.
खोलीतली सगळी जमीन खणून झाली आणि घराच्या आजूबाजूची जमीन पण.
सोनं काही हाती लागलं नाहीच.
शेवटी निराश होऊन डुगऱ्यादादानी आपल्या लोकांना सांगितलं,” चला आपण निघूया आता.पण अगदीच रिकाम्या हातानी नको जायला.काय धान्यं असेल ते तरी घ्या बरोबर.सोनं नाही तर नाही.आता बबन्या तू परत पक्की खबर आण मग तुझी मुंडीच पिरगळतो.”
बुढ्ढीमायच्या लुगड्यात घरात होतं ते जोंधळे आणि तांदूळ बांधून घेतले.बुढ्ढीमायला सोडलं.
आणि सगळे बाहेर पडले.
सगळे बाहेर पडले आणि आणि ........
आपलं सोनं चोरांना मिळालं नाही म्हणून बुढ्ढीमायला इतका आनंद झाला की ती जोर जोरात हसायला लागली.........
बुढ्ढीमायच्या हसण्याचा आवाज ऐकून बबन्याचं टकूरं सणकलं.
“हिच्या तर आमची फजिती झालीय म्हणून हिला आनंद होतोय.आता दाखवतोच हिला.” असं म्हणून बबन्या तावातावानी परत बुढ्ढी मायच्या खोलीचं दार उघडून आत शिरला.आणि आत शिरल्याबरोबर जोरात किंचाळलाच.
“दादा,दादा लवकर या आत.सोनं सापडलं.सोनं सापडलं.”
“अरे बबन्याला याड लागलंय.घेऊन ये रे त्याला बाहेर.” डुगऱ्यादादानी सोन्याला फर्मान सोडलं.
पण बबन्याच बाहेर आला.डुगऱ्यादादाला वाटलं बबन्या भ्रमिष्ट झालाय.दादाचा पण आता स्वत:वरचा ताबा सुटला होता.त्याने बबन्याच्या एक मुस्कटात ठेवली.
“दादा मला कशाला मारताय?मला खरंच कळलंय बुढ्ढीमायचे सोनं कुठे आहे.तुम्ही आत तर या.”बबन्या एका हातानी गाल चोळत दुसऱ्या हातानी डुगऱ्यादादाला खेचत बुढ्ढीमायच्या खोलीत नेलं.
आता बुढ्ढीमाय पण समजून चुकली होती आपण हसून चूक केलीय.तिने परत तोंड घट्ट मिटून घेतलं.
बबन्याने डुगऱ्यादादाला बुढ्ढीमायच्या समोर उभं केलं आणि दोन्ही हाताने तिचे तोंड उघडायचा प्रयत्न केला.
“बबन्या तू खूळा झालायस.”असं म्हणून डुगऱ्यादादा जायला वळला.
पण बबन्या बुढ्ढीमायचे ओठ विलग करण्यात यशस्वी झाला.
आणि शेवटचा निकराचा लढा म्हणून बुढ्ढीमायनं बबन्याच्या हाताला चावा घेतला.
ते बघून डुगऱ्यादादाचा राग अनावर झाला आणि बुढ्ढीमायच्या थोबाडीत मारली.
“तुझ्या तर माझ्या माणसाला चावतेस?,”
जोरात थोबाडीत बसल्यावर बुढ्ढीमाय जोरजोरात ओरडायला लागली आणि आणि डुगऱ्यादादाला पण बुढ्ढीमायचं सोनं दिसलं.
सोनं कुणी चोरून नेऊ नये म्हणून बुढ्ढीमायनी आपले दांत काढून सोन्याचे दांत करून घेतले होते.
बुढ्ढीमाय हसली आणि फसली.
आणि डुगऱ्यादादाची चांदी झाली.
डुगऱ्यादादा आणि त्याची पोरं आनंदाने नाचायला लागली.दादा सर्वप्रथम भानावर आला.
दादाने बुढ्ढीमायची अस्सल सोन्याची कवळी काढून घेतली आणि सगळे पसार झाले.
सौ सरिता सुभाष बांदेकर.
ही माझी कथा सुश्राव्य या ॲाडिओ दिवाळी २०२१ अंकात प्रसिद्ध झाली आहे.
प्रतिक्रिया
12 Jan 2022 - 1:10 am | श्रीगणेशा
आवडली कथा!
बुढ्ढीमाय थोडी अजून हुशार आणि संयमी असती तर वाचलं असतं सोनं :-)
16 Jan 2022 - 5:46 pm | सरिता बांदेकर
बुढ्ढीमाय थोडी अजून हुशार आणि संयमी असती तर वाचलं असतं सोनं :-)
हा हा हा
धन्यवाद
17 Jan 2022 - 11:27 am | मुक्त विहारि
आवडली
19 Jan 2022 - 11:52 am | सरिता बांदेकर
धन्यवाद
17 Jan 2022 - 12:39 pm | सौंदाळा
सस्पेन्स + थ्रीलर + मजेशीर
मस्त
19 Jan 2022 - 11:52 am | सरिता बांदेकर
धन्यवाद
19 Jan 2022 - 7:43 pm | Bhakti
भारी होती कथा .
:)
20 Jan 2022 - 5:21 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद
19 Jan 2022 - 8:31 pm | स्मिताके
छान मजेशीर कथा. आवडली.
20 Jan 2022 - 5:21 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद
21 Jan 2022 - 8:56 pm | चौथा कोनाडा
बुढीमाय चतुर होती पण हसली अन फसली !
भारी आहे गोष्ट !
ऐकायला देखील मजा येईल !
लिंक असेल तर नक्की द्या !
22 Jan 2022 - 11:02 am | सरिता बांदेकर
धन्यवाद,
मी लिंक देते पण त्यांचे ॲप डाऊनलोड केल्याशिवाय ऐकता येत नाही म्हणून मी कथा पोस्ट केली.
तुम्ही ॲप डाऊनलोड केलं तर एप्रिलच्या अंकात पण एक कथा आहे ती जरूर ऐका. ‘सरोगसी’ नांव आहे कथेचं.
नं Hi!
Right now I am listening Track "कथा : सोनं
लेखन : सौ. सरिता सुभाष बांदेकर
वाचन : मीनाक्षी आयनोर" From Audio Album - "Sushravya_Diwali_Ank_2021"
I liked it very much and thought I should share it with you as I know you would like it too.
Check it out & download at:
https://vy6s8.app.goo.gl/wi9T
नंतर टाकीन ती पण इकडे.
22 Jan 2022 - 11:02 am | सरिता बांदेकर
धन्यवाद,
मी लिंक देते पण त्यांचे ॲप डाऊनलोड केल्याशिवाय ऐकता येत नाही म्हणून मी कथा पोस्ट केली.
तुम्ही ॲप डाऊनलोड केलं तर एप्रिलच्या अंकात पण एक कथा आहे ती जरूर ऐका. ‘सरोगसी’ नांव आहे कथेचं.
नं Hi!
Right now I am listening Track "कथा : सोनं
लेखन : सौ. सरिता सुभाष बांदेकर
वाचन : मीनाक्षी आयनोर" From Audio Album - "Sushravya_Diwali_Ank_2021"
I liked it very much and thought I should share it with you as I know you would like it too.
Check it out & download at:
https://vy6s8.app.goo.gl/wi9T
नंतर टाकीन ती पण इकडे.