एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग 4 (600 किमी) 19 डिसेंबर 2021

Primary tabs

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
31 Dec 2021 - 10:22 am

तिघांनी तीन फोन वर गजर लावून ठेवले होते. 11 ला पोहोचून 12 वाजता साधारण आम्ही झोपलो. 2 वाजता गजराच्या आधीच जाग आली. आवरून, कपडे बदलून, परत सगळी तयारी करून निघालो. खाली पार्किंग मध्ये आलो तर आमच्या सोडून फक्त 3 अजून सायकल होत्या. बाकी सगळे जण आधीच गेले होते. आपल्याला उशीर झालाय की काय या जाणिवेने पोटात गोळा आला. त्यात फक्त 2 तासाच्या झोपेवर अजून 300 किमी अंतर कापायचं होतं. जाणवून जरा दडपण आलं. पण थोडाच वेळ. एकदा सायकलवर बसलो आणि सुसाट सुरू झालो.

पुन्हा एकदा तो मोठा पूल पार करून अंकलेश्वर वरून हायवे ला वळलो. साधारण तासभर झाला असेल चालवून एक मोठा फ्लायओव्हर आला. तो चढून त्याचा उतार सुसाट वेगाने उतरायला लागलो. सगळ्यात पुढे मनोज दादा, पाठी काही अंतरावर मी नि माझ्या पाठी श्री असे आम्ही वेगात चाललो होतो.आणि फ्लायओव्हर संपतो त्याच्या टोकाला एक मोठा खड्डा आला. मनोज दादा त्या खड्ड्याला वळून गेलेला मी बघितला. मीही वळायला जाणार इतक्यात पाठवून वेगाने ट्रक येताना जाणवलं. मला खड्ड्यात जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. कचकन ब्रेक दाबला तर श्री येऊन मला धडकेल, नाही दाबला तर खड्ड्यात जाऊन उलटी होण्याची शक्यता. शेवटी मी खड्ड्यात जाण्याचा निर्णय घेतला. निदान दोघे एकत्र जखमी होण्यापेक्षा एकावर भागेल असा विचार अक्षरशः सेकंदात करून मी खड्ड्यात आपटले. जरी मी दाणकन खड्ड्यात आपटले असले माझ्या अपेक्षेपेक्षा जरा कमीच आपटले. मला मी अगदीच सायकल सकट लोटांगण घालेन असंच वाटलं होतं. पण ब्रेक दाबत मी सायकलच्या हँडल वर जोरदार आपटले. सुदैवाने पाठवून येणारा श्रीने स्वतःला नीट सावरलं. माझ्याजवळ येऊन मला धीर दिला. मला किंवा सायकल ला काही लागलं तर नाही ना हे बघितल्यावर आम्ही पुढे जायला लागलो.

10/15 मिनिटं झाली आणि आम्ही थोडे पुढे मागे झालो. मनोज दादा आधीच पुढे गेला होता. त्याला या प्रकारचा पत्ताच नव्हता.श्री माझ्यापासून थोडा 25/30 पावलं पुढे होता.आणि मला सायकल नीट चालत नाहीये हे जाणवलं.श्री ला हाक मारून थांबवायचा प्रयत्न केला पण बाजूने जाणाऱ्या ट्रक च्या आवाजापुढे माझा आवाज त्याला ऐकूच गेला नाही. मी खाली उतरून बघितलं तर पाठचा टायर पंक्चर झाला होता. मला टेंशन आलं. श्री ला कॉल केला. मी आले नाही म्हणून थांबला होताच तो परत वळला. सुदैवाने जवळच एक हॉटेल होत. त्या हॉटेल मध्ये बाहेर व्हरांडा आणि स्वच्छ उजेड होता. सायकल उलटी करून टायर काढला. टायर काढून ट्यूब बदलली. यात त्या छोट्या पंपानी हवा भरणं म्हणजे परीक्षा असते. या सगळ्यात श्री मेन तर मी हेल्पर च्या भूमिकेत होते. मला पंक्चर कसा काढायचा याच जरी पूर्ण ज्ञान असल तरी अशा घाईच्या वेळेत भराभर हात चालवून काम होणं गरजेचं असतं. त्यामुळे ते श्री च करू जाणे. पहाटे थंडी होती. सायकल चालवत असताना जराही जाणवत नव्हती पण आता मात्र थांबल्यावर जाणवायला लागली. त्याच हॉटेल मध्ये कॉफी घेतली. टायर बसवल्यावर निघालो. मध्येच मनोज दादाला फोन करून थांबल्याच कळवलं होत. थोडा पुढे जाऊन तो देखील आमच्यासाठी थांबला होता.

साधारण अर्ध्या तासात ट्यूब बदलून परत निघालो. मनोज दादा देखील चहा पिऊन वाटच बघत होता. चहा कॉफी प्यायल्याने झोप उडून तरतरी आली होती. मध्येच एका चेक नाक्यावर ट्रकची मोठी लाईन होती. कुठून कसं जावं मला कळेना. मी पुढे नि हे दोघे मागे होते. मी खूण करून एकाला पुढे व्हायला सांगितलं.मनोज दादा पुढे झाला. दोन ट्रकच्या लाईन मध्ये जागा होती त्यातून तो वाट काढत निघाला. मी त्याला फॉलो करत निघाले. अक्षरशः पिक्चर मध्ये असत तसं वाटत होतं. जवळसपास अर्धा किमी आम्ही दोन्ही बाजूला ट्रक ची लाईन नि मधून आम्ही स्टंट करीत जात आहोत अशा जोशात जात होतो. केवळ हे दोघे होते म्हणून नाहीतर असले प्रकार मी कधीच केले नसते. कधी कोणता ट्रक वाला कुठे वळेल नि आपल्याला चेपेल नेम नाही. सुखरूप त्या दिव्यातून पार पडलो.

कालच्याच पारडी गावात 450 किमी ला तिसरा चेक पॉईंट होता. इथे आयोजक हजर राहणार नसल्याने ATM ची स्लिप जोडायची होती. सकाळी 8 च्या दरम्यान नाश्ता पोटात ढकलला. या स्पीड ने आम्ही 10 पर्यंत पारडी ला पोहोचू असा अंदाज होता. अखंड फास्ट अँड अप च पाणी प्यायल्याने पोटात भूक नव्हती. त्यामूळे मी थोडक्यातच नाश्ता आटपला. पण त्यामुळे मग नंतर मला ताकद कमी पडतेय स जाणवलं. जरी उत्साह वाटलं तरी प्रत्यक्षात पोटात जवळपास काहीच गेलं नव्हतं.परिणामी स्पीड कमी झाला. मग मध्येच एक जेल घेतली आणि थोडी मदत झाली. पारडी ला पोहोचायला 11 वाजले. तिथली 2 ATM सेंटर बंद असल्याने सेल्फी काढून ग्रुप वर टाकला. तिथेच कालच्या हॉटेल मध्ये जेवून घेतलं. आता मनापासून दाल खिचडी प्रकारचा कंटाळा आला होता. कालपासून एकच पदार्थ पोटात ढकलत होतो. पण नवीन पदार्थ ट्राय करणं आणि पचवणं दोन्ही रिस्की होत. साधं सोपं पचायला हलकं हेच निकष लावून दाल खिचडी, दही यावर दर BRM ला राहिलो होतो. पटापट जेवण आटपून निघालो.

आता ऊन चांगलंच तापायला लागलं. अजून साधारण 50 किमी कापून एका झाडाखाली टपरी होती तिथे थांबलो. 2 बाटल्या थंड पाणी घेऊन त्यात सिनर्जी मिक्स केलं आणि प्यायलं. त्या सावलीत इतकं थंड वाटत होतं. खाली साधी जमीन होती. मांडी घालून खांबाला टेकून बसलो होतो. तिथून उठावं अस अजिबात वाटत नव्हतं. पण उठणं भागच होत. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. आता पुढे मॅक डोनाल्ड ला थांबायचं ठरवलं. साधारण 50 किमी झाल्यावर मनोज दादा ने मॅप चेक केला तर मॅक डोनाल्ड अजून 40 किमी होत. पण भूक लागली होती. मग एका टोल नाक्यावर अशाच टपरीवर ऑम्लेट पाव आणि चहा प्यायला. परत निघालो.

आता अगदी थोडं अंतर उरल होत.फक्त 50 किमी आणि एक चारोटी चा चढ. हँडल धरून हात दुखायला लागले होते. शेवटचा पॅच हा नेहमीच कंटाळवाणा होतो. इथेही तसंच झालं.चारोटीचा उतार सुसाट वेगाने उतरलो आणि भराभर अंतर कापायला लागलो. थोडा वेळ झाला आणि रविवार असल्याने मुंबई ला परत येणारं ट्रॅफिक लागायला लागलं. त्यामुळे नाही म्हटलं तरी स्पीड थोडा कमी झाला.

हळूहळू मोठी हॉटेल्स, लॉन्स लागायला लागली. अंतर अगदी 5 किमी उरलं अस श्रीनिवास सांगत होता. फ्लायओव्हर चढून उतरून भयंकर कंटाळा आला होता. पण त्या शेवटच्या 5 किमी मध्ये सुद्धा 5 फ्लायओव्हर लागले. 5 किमी होऊन सुद्धा हॉटेल काही दिसेना. नेहमीप्रमाणे श्री ने 10 किमीचे 5 किमी सांगून मला सायकल चालवायला एनकरेज करीत राहिला. जिथे स्पर्धा संपणार होती ते एक्सप्रेस इन हॉटेल च नाव बिल्डिंग च्या वर उंच निऑन साइन मध्ये दिसत. त्यामुळे लांबून देखील ते दिसत. अजून 2 किमी सायकल चालवून झाल्यावर फायनली हॉटेल च नाव दिसायला लागलं. आता हुरूप वाढला. अगदी थोड्याच वेळात हॉटेल ला पोहोचलो.

आमच्या आधी पोहोचलेल्या खानविलकर यांचे नातेवाईक त्यांच्या स्वागताला आले होते. आमच्यासाठी थांबून त्यांनी आमचे देखील जल्लोषात स्वागत केले. अंबरीश देखील होताच. माझी मैत्रीण कांचन आणि नवरा सूरज देखील आले होते. मिपासदस्य आणि श्रीचा मित्र मोदक देखील सपत्नीक आला होता. दापोलीवाल्यानी तर कमाल केली. आम्ही आल्यावर हार घातले. टाळ्या वाजवल्या. आम्ही ब्रेव्हेट कार्ड स्टॅम्प करून जमा केली. आणि मग फुल्ल जल्लोषात सामील झालो. भरपूर फोटो काढून झाले. मुंबई क्लब ने साधा फिनिशर चा बोर्ड पण ठेवला नव्हता. पण दापोलीवाल्यानी ती कमतरता भरून काढली. भरपूर फोटो काढून झाले.त्यांनीच केक आणले होते.केक कापून एकमेकांना भरवून झाले. लगेचच श्रीहास, तेजानंद, स्वप्नील आणि अनेक जणांचे अभिनंदनाचे फोन आले. घरी कळवलं. प्रचंड समाधान झालं. बकेट लिस्ट मधील एक गोष्ट पूर्ण झाली. इतके दिवस इतरांचे फोटो बघितले. आज मी त्या जागी होते. आवर्जून सगळे आले म्हणून देखील खूप आनंद झाला. मन एकदम भरून आलं.
थोड्याच वेळात दापोलीवाले निघून गेले. आम्ही कांचन, सुरज,मोदक, त्याची बायको सगळे त्याच हॉटेल मध्ये जेवलो. मनसोक्त गप्पा मारल्या. फास्ट अँड उप च पाणी पिऊन तोंड आल्यासारखं झालं होतं त्यामुळे भाज्या तिखट लागत होत्या. पण आता सगळं माफ होत. आता काळजी नव्हती.उद्दिष्ट साध्य झालं होतं. मी हे केलं होतं यावर अजून माझाच विश्वास नव्हता. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला SR झाले होते. खरं तर आधी दडपण होत. एवढं करायला घेतलंय पण नाही पूर्ण झालं तर फजिती व्हायची.त्यामुळे आधी सगळीकडॆ सांगत फिरले नव्हते. आधी केले , मग सांगितले यावर विश्वास ठेवून करत गेले.
या सगळ्यात मला खंबीर साथ लाभली ती श्रीनिवास ची. त्याच SR पूर्ण झाल्यावर सुद्धा केवळ माझ्याबरोबर म्हणून त्याने परत हे 1500 किमी अंतर पार केले. 'तुला नक्की जमणार', हे त्याचं वाक्य मला कायम हुरूप देत राहील. माझे सासरे, मुलगा, माझे आई,बाबा,दादा,वहिनी आणि सगळंच कुटुंब याची भक्कम साथ ही महत्त्वाची गोष्ट आहे. Behind every successful man, there is a woman अस म्हणतात.तर माझ्या बाबतीत केवळ एक कोणीतरी नाही तर अख्ख कुटुंब पाठीशी उभं राहिलं ज्यामुळे मी हे करू शकले.
मीरा वेलणकर, सायकलिंग मधली माझी गुरू,आयडॉल. हिच्याकडून मला स्ट्रेंथ ट्रेनिंगचे धडे मिळाले. तिने सांगितलेल्या बारीक बारीक टिप्स आणि व्यायाम तिच्या सूचनेनुसार करत होते. त्यामुळे मला चांगलाच फायदा झाला. ती बंगलोर ला, मी चिपळूण ला. पण ऑनलाइन विडिओ कॉल वर माझ्याकडुन व्यायाम करून घेण्याचं काम तीन केलं. मागच्या बंगलोर भेटीत तिने मला एक सायकल असलेलं सोन्याचं पेंडंट भेट दिल होत. कोकणातल्या खेड्यात राहून सायकलिंग सारखी वेगळी वाट धरली म्हणून. BRM करताना कायम माझ्या गळ्यात ते पेंडंट असायचं. ते पेंडंट माझ्यावर एक प्रकारचं दडपण आणायचं. आपल्याला तिने हे का दिलंय? मग मला स्वतःला सिद्ध करून दाखवायलाच हवं याची जाणीव व्हायची. All thanks to Meera.

मागच्या वर्षी श्रीहास ने एक चिट्ठी पाठवली होती. Dhanashri and Shrinivas, I want you both to be first couple completing SR. डॉक आज सांगताना आनंद होतोय, yes, we did it. तुमच्या सायकल सायकल ग्रुप ने श्रीनिवासला आणि indirectly मलादेखील खूप मदत केली आहे. तुम्हा सर्वांचे आभार. तुमच्या व्हाट्स अप ग्रुप वर आमचा दोघांचा फोटो dp म्हणून झळकल्याच देखील डॉक ने कळवलं.(आता डॉक कडून पार्टी वसूल करायची आहे)

वेळोवेळी सल्ले देणारे,मदतीला तयार असणारे, काळजी बोलून दाखवणारे तेजानंद, स्वप्नील आणि CCC चे मेम्बर्स आमचा उत्साह वाढवत होते. आमच्या प्रत्येक BRM च सेलिब्रशन अमृता भाटवडेकर ने तिच्या घरी केलं. 600 झाल्यावर घरी केक कापून आम्ही आम्हाला गिफ्ट देऊन सेलिब्रेशन झालं. स्वप्नील - नूतन च्या घरी परत एकदा केक कापून गप्पगोष्टी करत आनंद शेअर केला. नूतन ने एक छान कुर्ता गिफ्ट दिला. दुसऱ्या दिवशी शैलेश पेठे मुद्दाम डबा भरून गुलाबजाम घेऊन आला. भाऊ सुमंत केळकर ने ड्रेस भेट दिला.दुसऱ्याच दिवशी CCC तर्फे सकाळी सत्कार झाला. खूपच छान वाटलं. CCC मध्ये आधीच SR आहेत.इतके दिवस त्यांचे फोटो बघत होते. आता मी सत्कार स्वीकारत होते. खूप भारी वाटत होतं. CCC महिला क्लब कडून आणि लायन्स क्लब कडून देखील सत्कार झाला. पेपर मध्ये नाव आलं. मध्यंतरी ईशान च्या शाळेत सायकल वाटप होत तर प्रमुख पाहुणी म्हणून बोलावलं होतं. SR करायचं ठरवलं तेव्हा यातलं काहीच डोक्यात नव्हतं. पण हे म्हणजे तर फारच भारी फिलिंग होत. मी फारच स्पेशल झाले. हे सगळं शब्दात सांगणं कठीण आहे. ते अनुभवायलाच हवं. हा अनुभव, ही भावना, हे समाधान चिरंतन टिकणार आहे. आणि याच समाधानासाठी केला होता अट्टहास अस मी म्हणेन.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

दुसरे म्हणजे, आता हजार किमीचे ध्येय ठेवा....

चीन मध्ये एक म्हण आहे, एक पाऊल चाललात, म्हणजेच दहा हजार मैल चाललात ....

600 झालेच आहेत, म्हणजेच हजार नक्कीच होतील

रावसाहेब चिंगभूतकर's picture

31 Dec 2021 - 11:46 am | रावसाहेब चिंगभूतकर

अभिनंदन. मुवि काका म्हणल्याप्रमाणे, आता 1000.

मित्रहो's picture

31 Dec 2021 - 11:57 am | मित्रहो

अभिनंदन आता हजार किंवा बाराशे किमी BRM चे लक्ष, दिल्ली ते वाघा बॉर्डर किंवा बंगलोर Gates Of heaven वगैरे

मार्गी's picture

3 Jan 2022 - 9:48 am | मार्गी

जबरदस्त!!!! खूप खूप अभिनंदन!!!! सुंदर लिहीलंय.

Nitin Palkar's picture

6 Jan 2022 - 1:11 pm | Nitin Palkar

खूप खूप अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा.

बेकार तरुण's picture

6 Jan 2022 - 1:47 pm | बेकार तरुण

खूप खूप अभिनंदन....

पुढील सर्व उपक्रमास अनेक शुभेच्छा...

तुषार काळभोर's picture

6 Jan 2022 - 1:50 pm | तुषार काळभोर

६०० किमी पूर्ण करणे, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रथम स्त्री आणि प्रथम दांपत्य झाल्याबद्दल दणकून अभिनंदन आणि १००० आणि १२०० साठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
तुम्हाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देणार्‍या सर्वांचे प्रचंड कौतूक, तुमच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे!