प्रेम आणि द्वेष

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
23 Dec 2021 - 11:51 pm

प्रेम आणि द्वेष .

उद्यानातील कोपऱ्यात असलेल्या त्या निष्पर्ण ,निर्जीव आणि निरुपयोगी झाडाकडे आता कोणीही बघत नव्हते. ते उद्यान सुद्धा आता कुलूप लावून बंद केले होते. काही दिवसापासून अगदी अघोरी वाटाव्यात अश्या घटना त्या झाडा भोवती होत होत्या. काही दिवसापूर्वी एकाएकी ते सुंदर झाड वाळायला लागले. सगळी पाने गळून गेली. सगळी फळे सुकून गेली . आणि एक उग्र वास त्या झाडाच्या अवती भोवती पसरला. आपल्या जवळ कुणीही येऊ नये अशी त्या झाडाची योजना असेल का ? कुणास ठाऊक पण अगदी ..परवा परवा पर्यंत कसे छान बहरलेले होते ते झाड !...
कसली तरी छोटीशी लाल चुटूक फळे लागायची त्याला. अनेक पोपट , चिमण्या आणि किती तरी वेगवेगळे पक्षी ती खायला त्याच्यापाशी यायची. काही पक्षांनी तर त्याच्या फांदीवर घरटी सुद्धा केली होती. त्यांचा गोड चिवचिवाट त्याला किती सुखकर वाटायचा. त्याच्या सुखकर सावलीत एक बाक ठेवला होता. किती तरी वृद्ध तसेच तरूण आणि लहान लहान मुले त्यावर बसायची . त्या चिमुरड्यांचा किलकिलाट आणि त्या तरूण तरुणींचा उन्माद त्याला खूप हवा हवासा वाटायचा . आजूबाजूला खेळणारी नातवंडे समाधानाने पाहणाऱ्या वृध्द आजोबांच्या थाटात ते झाड समाधानाने डोलत असायचे.
पण आता त्यातले काहीच नव्हते.पाने नाहीत ,फुले नाहीत आणि फळे नाहीत ..पक्षी नाहीत काहीही नाही.
ते झाड अगदी वाळून गेले होते ..त्याच्या सगळ्या फांद्या ..बुंधा काळपट पडायला लागला होता. पण लोकांना वाटायचे तसे ते निर्जीव अजिबात नव्हते .
आत खोलवर एक वळवळणारे . खवळलेले आणि साऱ्या मानवजातीवर सूड उगवायला उत्सुक असे एक त्या झाडाचे सत्व म्हणा किवा अस्तित्व म्हणा दबा धरून बसले होते. आपले सावज केव्हा आपल्या तावडीत येते याची वाट पहात ते..एखाद्या नरभक्षक वाघा सारखे सावजाची वाट पहात बसून होते.
त्याला ती काळरात्र अजून आठवायची . त्या रात्री दबकत दबकत दोन हैवान आले होते. त्यांच्या हातात दोन तीन बाटल्या होत्या. त्याला वाटले पाणी आहे त्यात. त्यांनी ते सर्व पाणी त्याच्या बुंध्याच्या आसपास ओतले आणि ते आले तसे दबकत दबकत निघून गेले. थोड्याच वेळात त्याच्या सर्वांगाची लाही लाही व्हायला लागली. त्याला गुदमरल्यासारखे झाले . एक तीव्र वेदना विजेसारखी त्याच्या सर्वांगातून गेली आणि किती तरी दिवस तो मग तसाच मूक पणे आक्रंदत ..हुंदके देत राहिला. त्याच्या मुळाकडून येणारे जीवन त्याला घेताच येईना ..त्याची पाने जळून गेली ..फळे वाळून खाली पडली ..उरलीसुरली फुले मग गळून गेली.
आपली हिरवीगार फुललेली पाने ..ती लालसर छोटीशी फुले आणि किती तरी पक्षांना मोहवणारी त्याची ती गोड फळे आठवत मग तो आपले दिवस कसे बसे पुढे ढकलत राहिला. आपले अस्तित्व टिकवून राहिला.
त्याची हे अवस्था करणाऱ्या त्या हलकट माणसांवर सूड घेतल्याशिवाय त्याला हे जग सोडून जायचे नव्हते.
मग एकेदिवशी संध्याकाळी त्याला तो माणूस परत दिसला. त्याच्या बुध्यापाशी येऊन तो त्याच्याकडे निरखून बघत होता. त्याचे सुकलेले स्वरूप पाहून एक छद्मी हास्य त्याच्या ओठावर आलेले त्याला दिसले. त्या माणसाच्या वासावरून त्या झाडाने त्याला केव्हाच ओळखले होते. मग त्या किळसवाण्या माणसाने त्याच्या अंगावरून आपला हात फिरवला आणि त्याच्या अंगावर हात ठेऊन तो किती तरी वेळ तिथे उभा होता.
त्या झाडाने आपले सावज हेरले आणि एकदम झडप घातली.

एक अनाकलनीय अशी लहर त्या झाडातून निघाली आणि त्या माणसाच्या हातातून त्याच्या मनात खोल खोल शिरली. त्या झाडासारखीच त्या माणसाला आतून पोखरून टाकणारी ...कुरतडून टाकणारी ..आत खोलवर त्याच्या गाभ्यापर्यंत जाणारी ती लहर आपले विष आता त्या दुष्ट माणसाच्या मनात पसरवणार होती.
का ? का ? का ? माझा असा जीव का घेतलास ? का माझ्यातून माझा प्रेममय जीवनरस काढून असा कडवट सर्व खाक करून टाकणारा द्वेष पेरलास ?
आता माझ्या कडून तुला तोच मिळणार .

आपल्या मनात हळू हळू पसरणारे जहाल असे निराशेचे विष घेऊन तो माणूस परत गेला. पण तो रात्री परत आला. एक दोर घेऊन आला.

मग कधीतरी मध्यरात्री तो दोर त्या झाडाच्या फांदीला लटकावून त्या माणसाने गळफास लावून घेतला.
त्या माणसाचे लटकणारे ते निर्जीव शरीर पाहून त्या झाडाला एकदम खदखदून हसू आले.
कुणी तरी गुदगुल्या केल्यासारखे ते झाड मग किती तरी वेळ हसत राहिले. आनंदाच्या लहरी आपल्या अंगावर झेलत राहिले. .

काही दिवसांनी एक दहा बारा वर्षाचा मुलगा त्या झाडापाशी आला. त्याला सुद्धा त्या झाडाने लगेच ओळखले. त्याच्या नुकत्याच फुटलेल्या कोवळ्या फांद्या जोरात ओढून तोडून टाकायची त्याला खूप हौस होती. आता सुद्धा तसे काही करता येईल का ? असे विचार त्याच्या मनात चालू होते. त्या झाडाचे अस्तित्व एकदम थरथरले. पुन्हा एक लहर उठली आणि त्या मुलाला घेरून गेली. तो मुलगा एकदम काही तरी भयानक दिसावे तसा घाबरला आणि एकदम पळत सुटला. बेफान . मधून मधून मागे वळून त्या झाडाकडे पहात तो पळतच सुटला आणि एकदम एका बाकावर जाऊन आदळला. त्याचे डोके फुटले आणि रक्ताची धार लागली.

मग परत ... कुणी तरी गुदगुल्या केल्यासारखे ते झाड मग किती तरी वेळ हसत राहिले. आनंदाच्या लहरी आपल्या अंगावर झेलत राहिले. ती रक्ताची धार त्याच्या अंगाची लाही लाही शांत करत होती .एक नवे जीवन मिळाल्यासारखे त्याला वाटले.
आता झाडाला हे सगळे आवडायला लागले. आपल्या मनातील ती सर्वांग जाळून टाकणारी ..धगधगणारी आग जरा कमी होते आहे असे त्याला वाटायला लागले.
जगण्याची एक नवीन उमेद त्याला वाटायला लागली.

मग काही दिवसांनी अगदी दुपारी उद्यान बंद व्हायच्या थोडे आधी नुकतीच नोकरी गमावलेले दोन तरूण त्या झाडाच्या शेजारून जात होते. त्यांची काही तरी बाचाबाची झाली. एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला त्या झाडाच्या बुध्यावर ढकलले . खाली पडलेल्या तरुणाने , शेजारी पडलेला एक दगड घेतला आणि आपल्याला ढकलेल्या तरुणाच्या डोक्यात घातला . रक्ताची धार लागली आणि तो तरूण जागीच तडफडून मरून गेला . .

मग परत ... कुणी तरी गुदगुल्या केल्यासारखे ते झाड मग किती तरी वेळ हसत राहिले. आनंदाच्या लहरी आपल्या अंगावर झेलत राहिले.

आता किती तरी दिवसापासून ते उद्यान बंदच असते. त्या उद्यानातच राहणारे माळी दादा केव्हातरी काही काम करायला त्याच्या जवळपास येतात ...या झाडाचे पूर्वीचे रूप आठवून अतिशय दुःखी होतात. त्यांनी ते झाड वाचवायचे प्रयत्न आता सोडून दिलेले असतात. ..पण आजकाल त्या दोन तीन घटना घडून गेल्यामुळे ते या झाडाजवळ जरा सांभाळूनच जातात.

आता ते एक शापित झाड झाले आहे. या शापित झाडामुळे ते सगळे उद्यानच बंद करून ठेवावे लागले होते.

झाडाला ती शांतता आवडते. ही स्वार्थी आणि लबाड मनुष्य जात त्याला आपल्या डोळ्यासमोर नको असते.

पण मधूनच त्याला मनुष्याचे रक्त पाहिल्यावर ..त्याचे प्रेत पाहिल्यावर येणाऱ्या आनंदाच्या लहरी आठवतात आणि मग जवळ येणाऱ्या माणसाची वाट पहात ..तो तसाच आतून जळत दबा धरून बसून असतो. .

पण आता हे असे वाट पहात बसायचा त्याला कंटाळा यायला लागला होता.त्याला माहित होते एके दिवशी काही माणसे येतील आणि ते झाड पाडून टाकतील . स्वार्थी जमात आहे ही माणसांची . .त्याला कुठल्यातरी कारखान्यात नेऊन त्याच्या लाकडाची टेबले करतील ..खुर्च्या करतील ..आणखीन काही तरी करतील .

मग त्या झाडाचे अस्तित्व परत माणसात येईल . या मनुष्य जातीवर सूड उगवणे त्याला मग खूप सोपे जाईल . कारण तो मग त्या माणसांच्या घरातच जाईल . आपल्या मनातील द्वेष ..विष माणसांच्या मनात पसरवणे त्याला मग अगदी सोपे जाईल . या माणसांनी त्याला दिलेले विष त्यांनाच परत देणे त्याला खूप आवडले होते.
त्या नंतर येणाऱ्या आनंदाच्या लहरी आठवून त्याला आत्ता सुद्धा खदखदून हसू येत होते. .

तो त्या सोनेरी दिवसांची वाट पहात होता.
आता या शापित झाडाचा शाप कुणाकुणाला भोवणार होता कुणास ठाऊक ?

अगदी काल परवा पर्यंत प्रत्येक दिवसाला उत्साहाने सामोरे जाणारे ते झाड आता आपल्या मृत्यूची वाट पहात पण आतून घुमसत पडून होते. नेहमीसारखे माळीदादा आपली उद्यानाची फेरी मारत या झाडापाशी आले. या झाडापाशी आले कि ते एकदम उदास होत. आज सुद्धा तसेच झाले. पण आज त्यांच्याबरोबर एक तीन चार वर्षाचा छोटा मुलगा होता. त्यांच्या मुलीचा मुलगा . हा बऱ्याच वेळा या झाडापाशी येत असे. या झाडाला सुद्धा हा मुलगा आवडत असे. आज ही तो मुलगा लगबगीने पुढे आला ,त्याच्या हातात खेळण्यातील पाणी घालायची झारी होती. त्यातील पाणी अतिशय प्रेमाने त्याने त्या झाडाला घालायला सुरवात केली.
“ राजू बेटा ..हे झाड आता आजारी झाले आहे. . याला पाणी घालून उपयोग नाही. ..” माळी दादा त्या मुलाला सांगत होते.
“ का आजारी झाले आहे ? त्याला औषध तुम्ही का देत नाही ?”
“ मी सगळी औषधे दिली ..पण काहीही उपयोग नाही.”
तो मुलगा मग एकदम पुढे झाला आणि आपल्या इवल्याश्या हातानी त्याने त्या झाडाला घट्ट मिठी मारली.
“ राजू ..हे काय करतो आहेस. ? ..” माळी दादा जरा घाबरून म्हणाले. या शापित झाडाजवळ राजूने जाऊ नये असे त्यांना एका बाजूने वाटत होते तर हे झाड शापित वगैरे काही नाही असे सुद्धा त्यांचे एक मन त्यांना सांगत होते.
“ अहो आजोबा ..मला बरे नाहीसे झाले कि ..आज्जी मला अशीच जवळ घेते आणि म्हणते ..आता तू लवकर बरा होशील बर का ! तसे मी या झाडावर प्रेम करतो आहे ..आता हे झाड लवकर बरे होईल ..”
माळी दादांच्या डोळ्यात एकदम पाणी आले. हे जीवन इतके सोपे असते तर किती बरे झाले असते. हे झाड त्यांच्या सुद्धा खूप आवडीचे होते. एका अनामिक प्रेरणेने ते सुद्धा पुढे आले आणि राजू सारखीच त्या झाडाला त्यांनी घट्ट मिठी मारली. आणि थोडे त्या झाडाला उद्देशून आणि थोडे स्वतःच्या समाधानासाठी म्हणाले ,
“ लवकर बरा हो रे बाबा …”
मग किती तरी वेळ आपल्या घराकडे परत जाणाऱ्या त्या जोडीकडे पहात ते झाड ओक्साबोक्शी रडायला लागले. त्याला एकदम जणू पहिल्यांदाच जाणवले. आपण एकदम पुन्हा प्रेममय झालो आहे.

आपला द्वेष करणारी जशी माणसे आहेत तशी आपल्यावर प्रेम करणारी किती तरी माणसे आहेत ..आपण त्यांचा द्वेष घ्यायचा का प्रेम हे आपणच ठरवायचे नाही का ?
त्याला असेही एकदम जाणवले आपल्या मनातला द्वेष पसरवला कि तो वाढतो .. पण आपल्या मनातले प्रेम वाटले कि आपल्या मनातील द्वेष तर कमी होतोच पण सगळे जग जणू प्रेममय होते. त्या झाडाला आता आपलाच राग आला. आपल्याला इतके दिवस हे कसे लक्षात आले नाही ?

आता त्या झाडाचे अस्तित्व एकदम प्रेममय झाले. एका अज्ञात अखेरच्या प्रवासासाठी ही प्रेममय शिदोरी घेऊन ते झाड आता सज्ज झाले. द्वेषाचे इथे घेतलेले गाठोडे त्याने आता इथेच टाकून दिले होते.
बरोबर काय घेऊन जायचे आणि इथेच काय सोडून जायचे हे त्याला आता बरोबर समजले होते.

****************************************

माझी ही कथा "सुवासिनी " मासिकाच्या २०२१ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. मिपाच्या वाचकांना सुद्धा ती आवडेल अशी आशा आहे.

कथालेख

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

24 Dec 2021 - 9:45 am | सामान्य वाचक

सुरेख झालि आहे कथा

Jayant Naik's picture

26 Dec 2021 - 12:27 am | Jayant Naik

आपले मनःपूर्वक आभार.

कर्नलतपस्वी's picture

24 Dec 2021 - 10:40 am | कर्नलतपस्वी

नारायण धारपांची कथा "साठे फायकस" लहानपणी वाचली होती. त्याचीच आठवण झाली .
लेखकाचे अभिनंदन.

Jayant Naik's picture

26 Dec 2021 - 12:30 am | Jayant Naik

माझी कथा आवडल्याबद्दल आभार. आपल्या प्रतिसादामुळे छान वाटले.

Jayant Naik's picture

26 Dec 2021 - 8:54 pm | Jayant Naik

माझी कथा आवडल्याबद्दल आभार. आपल्या प्रतिसादामुळे छान वाटले.

राघव's picture

24 Dec 2021 - 11:28 am | राघव

खूप आवडले. :-)

Jayant Naik's picture

26 Dec 2021 - 12:31 am | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

24 Dec 2021 - 6:23 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान आहे कथा.

Jayant Naik's picture

26 Dec 2021 - 12:31 am | Jayant Naik

आपले अनेक आभार.

सुचिता१'s picture

25 Dec 2021 - 11:54 pm | सुचिता१

खुप छान!!! पुलेशु!!!

Jayant Naik's picture

26 Dec 2021 - 12:33 am | Jayant Naik

आपल्या उत्तेजना मुळे खूप छान वाटले.

टर्मीनेटर's picture

26 Dec 2021 - 5:12 pm | टर्मीनेटर

कथा आवडली 👍

Jayant Naik's picture

27 Dec 2021 - 1:11 am | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Dec 2021 - 8:53 am | ज्ञानोबाचे पैजार

वाचताना मला लॉर्ड ऑफ रिंग्ज मधली युध्द करणारी झाडे आठवत होती.

खरच झाडे जर असे काही करु शकत असती तर मग माणसाची काही खैर नव्हती.

पैजारबुवा,