माझी आई खूप धार्मिक होती. त्याउलट वडील तर्क कठोर. आई देवाची पूजा रोज मनोभावे करायची. तिला वेळ नसेल तर मोठा भाऊ करायचा. आई सर्व व्रतवैकल्ये,श्रावणातले उपास, गौरी गणपती, नागपंचमी, गोकुळाष्टमी, दसरा, पाडवा सगळं, सगळं करायची. शिवाय विनायकी आणि अंगारकी करायची. जिवतीची पूजा करायची.
वडील म्हणायचे,"या हल्लीच्या काळात जिवतीएवढी मुलं परवडणार आहेत का? शिवाय जिवतीचा कागद चिकटवून काय होणार आहे? मुलांवर विज्ञाननिष्ठ संस्कार करणं हे आईवडिलांचं कर्तव्य."
दोघांचेही विचार ऐकून माझी द्विधावस्था व्हायची. आईवर माझं फार प्रेम होतं. म्हणून ती सांगते म्हणून मी शुभंकरोती म्हणायची. पण माझ्या बुद्धीला त्या वेळी वडिलांचं म्हणणं पटायचं.
आईला, भावाला काम असलं, त्यांना वेळ नसला की आई मला पूजा करायला सांगायची. अगदी लहान वय ते. पूजा करायचा मला विलक्षण कंटाळा यायचा. मी कशी पूजा करायची माहिताय? देवांवरची आधीची फुलं काढायची. सहाण आणि खोड नुसतंच ओलं करायचं. गंध नीट उगाळायचंच नाही. कारण गंध उगाळायचा मला खूप कंटाळा येई. मग ताम्हनात पाणी ओतून सगळे देव मी एकत्रच खळबळायची. देवाच्या प्रत्येक मूर्तीला वेगळी आंघोळ घालायचीच नाही. नंतर वस्त्रानं देव पुसायचीच नाही. नंतर हळदीकुंकवाच्या कुयरीत देवांना उलटं करुन देवांची डोकी खाली करायची. त्यांच्या डोक्यांना हळदीकुंकू चिकटायचं. त्या मूर्तींना सुलट करुन तबकात ठेवायची. बचकभर फुलं त्यांच्या अंगावर टाकायची. उदबत्ती, निरांजन लावायचं. झाली पूजा!
देवाच्या आंघोळीचं पाणी तुळशीवृंदावनात न ओतता बाहेरच्या पायरीजवळ जाऊन डाव्या बाजूला फेकून द्यायची. निर्माल्य निर्माल्याच्या पिशवीत टाकायची. नेवैद्य दाखवायची. म्हणजे नुस्ता समोर ठेवून द्यायची. आई विचारायची "झाली एवढ्यात पूजा?नीट केलीस का?" मी म्हणायची,"हो.नीट केली. तू येऊन बघ हवं तर!" आईचा विश्वास बसायचा नाही. मग मला एखादा रट्टा मिळायचा.
अशाप्रकारे अगदी लहान असताना न कळत्या वयात अशी उपटसुंभ पूजा मी केली. लहानपणी त्यात आपलं काही चुकतंय असं माझ्या निर्लज्ज आणि कोडग्या मनाला वाटायचंच नाही. मी अश्रद्ध होते की आळशी होते? मला अक्कल नव्हती हेच खरं! मग मोठी झाले. लग्न झालं. ह्यांची बदली झाली आणि आम्ही एका नव्या घरात भाडेकरु म्हणून गेलो. त्या घरात एका कोपऱ्यात उंचावर एक देवघर होतं. आधीपासूनच.
आसपास बागही होती. बागेत एक तुळशीवृंदावन होतं. त्या वृंदावनाला दिवा लावायला एक छोटीशी देवळी होती. शेजारीच घरमालक सहकुटुंब सहपरिवार राहातं होते. ते तुळशीवृंदावन आणि ती देवळी पाहून काय झालं मला कुणास ठाऊक! मला वाटलं, ह्या देवळीत रोज दिवा लावावा. घरात देव ठेवावेत.
मग माझ्याकडे असलेली,शो पीस म्हणून घेतलेली गणपतीची मूर्ती मी एक लोकरीचे बस्कर टाकून कोपऱ्यातल्या देव्हाऱ्यात ठेवली. आईनं आणि सासूबाईंनी दिलेली अन्नपूर्णा, लंगडा बाळकृष्ण, शाळीग्राम शोधून काढले.आणि छोट्या ताटलीत ठेवले. फुलं घातली. तुळशीची पाने वाहिली. निरांजन लावलं. संध्याकाळी देवापाशी पुन्हा एकदा निरांजन लावलं. वृंदावनाच्या देवळीत पणती लावून तेलवात केली. संध्याकाळच्या धूसर अंधारात ते वृंदावन आणि प्रकाश देणारी ती पणती इतकी गोड दिसत होती! देवापुढचं निरांजन पाहूनही प्रसन्न आणि शांत वाटत होतं. मग मी रोज तसं करायला लागले.
पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मी आणखी मोठी झाले. तिशीत प्रवेश केला. आणि माझा दृष्टिकोन बदलला. माझं वाचन वाढलं. आगरकर, सावरकर, जे कृष्णमूर्ती, विवेकानंद, चिन्मयानंद, शिवानंद, ओशो असं खूपच वाचलं. आणि मला कर्मकांड नको वाटायला लागलं. वडिलांच्या मतांचा प्रभाव माझ्यावर होताच! मी व्रतवैकल्ये उपवास वगैरे करत नव्हतेच. पण मग रोजची पूजाही करेनाशी झाले. सामाजिक कार्य करायला लागले. गोरगरीब, गरजूंना मदत करायला लागले. काही वस्त्यांमधे जाऊन तिथं संस्कारवर्ग घालवायला लागले. हळूहळू समविचारी मैत्रिणी भेटल्या. सगळ्या मिळून सामाजिक कामं करायला लागलो. मोलकरणींना शिकवायचो. प्रौढांसाठी साक्षरता वर्ग चालवायला घेतला. शाळेत जाऊ न शकणाऱ्या मुलांना शिकवायला लागलो. अनाथाश्रमात जाऊन मुलांना गोष्टी सांगितल्या. वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या वृद्धांशी गप्पा मारायला लागलो. गावच्या महिला दक्षता समितीच्या सदस्य झालो. महिलांवरचे अन्याय दूर करण्यासाठी खटपट करायला लागलो. प्रसंगी पोलिसांची मदत घ्यायला लागलो. मारकुट्या नवऱ्यांना काहीअंशी आळा बसू शकला. रिमांड होम मधली, अनाथाश्रमातली मुलं सणावाराला, दिवाळीत वगैरे आमच्याकडे दोन दिवस राहायला येऊ लागली. त्याकाळात पंजाबमध्ये अतिरेक्यांनी हैदोस घातला होता. अतिरेक्यांच्या हल्ल्यात ज्यांचे आई-वडील मारले गेलेत अशा अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेसाठी मी काही काम केले. तीन मुलांना मी शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला. ही यादी खूप मोठी आहे. आपल्यापैकी बरेच जण अशी मदत करत असतात. मी त्यांतलीच एक. मला वाटलं देवाची सेवा म्हणजे अशा संकटग्रस्तांना मदत करणं. माझ्या मनाला त्यामुळे शांती समाधान मिळाले. तुम्हालाही असा अनुभव आला असेल. अशी मदत केल्याचे सर्वत्र सांगू नये, पण विषयाला धरुन आलं तर सांगायला हरकत नसावी.
आता वयपरत्वे अंगमेहनतीची कामं होत नाहीत. बाहेर जाऊन सामाजिक कामं करणं शक्य होत नाही. मग मी झेपेल तितपत अल्प देणगी, मदत देते. तीही आता फारशी शक्य होत नाही.
पण तरी आपल्या अर्ध्या भाकरीतली चतकोर कोणाला देण्यात आनंद असतो. दान सत्पात्री व्हावं याची पुरेपूर काळजी घेते. यात माझा देव मला सापडलाय का? कळत नाही. मी आता पूजा अर्चा, उपास, व्रतवैकल्ये करत नाही. फक्त गीतेचा एक अध्याय रोज वाचते. त्यातली स्थितप्रज्ञाची लक्षणं वाचून स्फूर्ती मिळते. आपण ती अंगी बाणवावी असं वाटतं. ॐ अक्षरावर थोडी ध्यान धारणा करण्याचा प्रयत्न करते. मन एकाग्र होतंच असं नाही.
उगीच काहीतरी कल्पना करुन देवाला चार हात, सोंड, चक्र, वाहन देण्यापेक्षा तो कसा आहे, कसा दिसतो ते मला "माहीत नाही" असं म्हणणं जास्त प्रामाणिकपणाचं आणि तर्कशुद्ध आहे असं आताशा वाटतं.
देव आहे का नाही, तो कशा स्वरूपात आहे आपल्याला सामान्य माणसाला कळत नाही. मी पूजाअर्चा करत नाही हे बरोबर आहे का नाही काय माहीत!
"तो" खरा कसा आहे? "देवच जाणे!", असंच शेवटी म्हणावं लागेल.
प्रतिक्रिया
16 Dec 2021 - 10:26 am | Bhakti
छान प्रगटन!
त्यातली स्थितप्रज्ञाची लक्षणं वाचून स्फूर्ती मिळते. आपण ती अंगी बाणवावी असं वाटतं
शेवटी स्फूर्तीसाठीच स्थितप्रज्ञानाच्या शोधात पुढे पुढे जातो.
16 Dec 2021 - 11:50 am | सर टोबी
असामान्य असण्याचं विशेष म्हणजे कोणतीही गोष्ट सहज, सोपी करण्याची हातोटी. ती तुमच्याकडे आहे हे सतत जाणवते. खूपच मस्त वाटतंय तुमचा अनुभव वाचून.
16 Dec 2021 - 12:46 pm | मुक्त विहारि
तुम्ही जे कार्य करत आहात, तीच पुण्याई आणि तीच ईश्र्वरसेवा ...
ह्या संदर्भात, तुमचे गुरू म्हणजे, एकनाथ
तहानलेल्या गाढवाला गंगाजल पाजणे आणि गरजू व्यक्तीला यथाशक्ती मदत करणे, हीच एक प्रकारची ईश्र्वरसेवा...
तुम्हा-आम्हाला, मंदिरात जायची गरज नाही....
पापी माणसे मंदिरात आणि पुण्यवान माणसे जनसेवाला...
16 Dec 2021 - 1:41 pm | तुषार काळभोर
नक्की का?
:D
16 Dec 2021 - 2:01 pm | मुक्त विहारि
आजारी मनूष्य दवाखान्यात
बेवडा गुत्त्यात
आबटशौकिन वेश्यागृहात
तसेच हे आहे
16 Dec 2021 - 1:41 pm | तुषार काळभोर
विशेष म्हणजे सगळं मॅटर ऑफ फॅक्ट पद्धतीने सांगितलय. कसलाही उपदेश ना करता, कसलाही आव न आणता.
जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, |
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा||
हे तुम्ही प्रत्यक्ष जगताहात!!
16 Dec 2021 - 4:07 pm | बाजीगर
तुषार काळभोर यांची प्रतिक्रिया सारखंच माझं पण मत आहे
पूजा केली होती कलावतीदेवींनी..
फूले वाहतांना त्यांनी पाकळ्यांची बाजू मूर्तीच्या बाजूला करुन देठ आपल्याकडे केले होते !
कुणी असे का केले विचारल्यावर
त्या म्हणाल्या
"देवाला देठ टोचतील ना..." !
आहे आपल्यात अशी 'मनाची कोमलता'
जर असेल तर पूजा करा.
स्तोस्त्र...
चापलूसी नाही का ती?
तू छान आहेस
सूंदर आहेस
शक्तीशाली आहेस
आणखी काय काय आहेस
त्यापेक्षा मला तुझ्या सानिध्यात आल्यावर शांतता मिळले,
मी छान होतो
मी सुंदर होतो
संकटं झेलायला,
अपयश पेलायला
मी शक्तीशाली होतो
हे चिंतन (मराठीत) जास्त चांगले नाही का!
अपराधी भावना:
रोज एखादा पूजा करतो
एखादे दिवशी राहिली
तर अपराधी भावना ग्रासते
आता काही वाईट होईल का
मन अशांतीने भरतं
ही पूजा?
पूजा करा
पण ती देवाला नको तर स्वत:ला खूष करण्यासाठी करा.
जे मिळालय त्याबद्दल कृतज्ञता माना,
काही मागण्याचा प्रश्न कुठे?
So पूजा is time for relaxation.
कर्मकांडात अडकू नका.
अपराधी राहू नका.
करावीशी वाटली तर पूजा ही करा.
तो आनंदोत्सव होऊ दे
उपचार नको.
कर्मकांड नको.
18 Dec 2021 - 2:43 am | पाषाणभेद
बाजीगर ओ बाजीगर!!
तुमचे एकदम बरोबर!!
16 Dec 2021 - 4:42 pm | चौकस२१२
कसा दिसतो ते मला "माहीत नाही" असं म्हणणं जास्त प्रामाणिकपणाचं आणि तर्कशुद्ध आहे असं आताशा वाटतं.
- माझा प्रवास
- सर्वसामान्य हिंदू मध्यमवर्गीय कुत्म्बातील बालपण घरातील वातावरण फारसे धार्मिक नाही , पण सर्व सण वार व्हायचे पण स्तोम नाही, कोणत्याही गुरु बाबा/ ताई महाराज हि भानगड नाही
- वडील एकीकडे मराठी विन्यान परिषदेला मदत करणारे आणि त्याच वेळी सावरकरवादि!
- लहानपणी घरातील देवांची पूजा , अगदी देवळात जाऊन कीर्तन नंतर स्वयंवमसेवक म्हणून काम करणे याची गोडी लागलेली ( एखाद्या शांत आणि स्वच्छ देवळात गेलं तिथला सुवास घेतला कि प्रसंन्न वाटते )
- शाळेनंतर एका सुट्टीत पु ना ओकांच्या परम शिश्याबरोबर आग्रा फतेपूर फिरणे झाले आणि त्याचे म्हणणे अर्धवट पटले पूर्ण नाही ...
- महाविद्यालयीय जीवनात धर्म वैगरे विचार कऱ्याला वेळ नव्हता
- नोकरीत धर्म या संबंधी फारसा प्रश्न नाही पण एकदा जातीवरून ऐकायला मिळाल तेवहा मनावर घेतलं नाही ...आता परिणाम होतो .. (थँक्स टू बारामती चा "जाणता राजा"
-धार्मिक चालीरीती आणि समाज या बद्दल खटकल्या काही गोष्टी एकीकडे दसर्यास कारखान्यात यंत्रांची पूजा करणे योग्य वाटायचं पण त्याचा वेळी ख्रिस्ती सेक्रेटरी च्या मेजवरील "टाईप राय्टर चि पूजा झालीच पाहिजे" हे जरा विचित्र वाटायचे उगाचंच तीला पण पूजेसाठी फुल पुडी ( तिचा चेहरा बघण्या सारखा व्हायचा)
- पुढे नोकरी करताना स्थलनातर हाच एक उद्देश त्यामुळे त्यावर प्रयतन करताना समकालीन तसेच प्रयत्न करनारे इतर मित्रांचे " मंगळवार सिद्धिविनायक = परदेशाची जाण्यात यश" हे पाहून ते काही पटायाच नाही पण त्याच वेळेस " सामाजिक हिंदू "म्हणून जाणीव होऊ लागली ( उदाहरण ख्रिस्ती मित्राला , हटकणे आखाती देशात नोकरी अर्ज करीत असताना उगचहक आपलं धर्म लिहू लागला ( सुप्त हेतू अरब बाबा मला घे नोकरी वर , मी हिंदू नाही ) किंवा वांद्र्यात राहणारी कोकणी बोलणाऱ्यांना बोलणाऱ्या ख्रिशनांना देवनागरी कशी काय येत नाही ( कोकणी आणि मराठी भाषा म्हणून जवळ असताना ) याचे वाटलेले आशर्य ,
हिंदू एक व्हावा यासाठी जाणीव ( इस्कॅन च्या मंदिरात "फक्त कृष्ण सुप्रीम गॉड हेड" वाल्याना तुम्ही "हिंदू दिसता " मग असे एका देवात का अडकून पडता म्हणून विचारलेलं आठवतंय किंवा सिध्दिविनायक ट्रस्टी ना " आपण सर्व हिंदू एक आहोत " अशी रंगवलेली पाटी २५ भाषेत लिहून देतो ( स्वखर्चाने ) असे विचारले होते ( त्यानं नाही हि म्हणवत नवहते आणि हो हि !)
- ख्रिस्ती बहुल देशात स्थलांतर ... " दिवाळी" वातावरणचा " नसल्यमुळे ते सुख हरवले .. मराठी मंडळ आणि भाषा यावर जास्त प्रेम धर्म तसा गौण ...
- हळू हळू धर्म पेक्षा भारतीय "रेस जागरुगकता येत गेली
- आयुष्यतील कठीण प्रसंगात साधारण मानसाचा देव आणि ज्योतिष इत्यादी वरील विश्वास वाढण्याकडे कल असतो .. माझे उलटे झाले ..त्यात अर्थ नाही "आपण आणि आपले कर्म " एवढेच खरे ... पण त्याचा वेळी हिंदुत्वाकडे सामाजिक प्रश्न म्हणू जास्त बघू लागलो
- हिंदू एक व्हावा, केवळ सामाजिक कारणासाठी यावरील विश्वास वाढतोय पण तयच वेळी विशेष करून महाराष्ट्रातील जातीय राजकारण पाहून "कसलं हिंदू हिंदू असे हि वाटते .... "
देव असेल नसेल, धर्म हि अफूची गोळी असेल नसेल ... काह्ही असो त्या फुकाच्या वादात अडकण्यात स्वारस्य नाही आता
सामाजिकरीत्या हिंदूंना फार ढकलला जातंय त्यविरुद्ध जमेल तसे विरोध करणायचा प्रयत्न करणे
वय झाल्यावर धार्मिक काही वाचन होईल असे वाटत नाही ... सर्वसाधारण साहित्यातून उलगडत जाणारी मानवाची/ मनाची उलाढाल पाह्यला जास्त आवडेल असे वाटते
असो .. शेवटी स्वान्तसुखाय हेच खरे कि काय असे वाटू लागले आहे
16 Dec 2021 - 9:26 pm | सोत्रि
सहज, सोपं आणि सुंदर!
_/\_
- (माहित नाही असं म्हणणारा) सोकाजी
4 Jan 2022 - 3:25 pm | आजी
सर्वांना धन्यवाद.
Bhakti-"स्थितप्रज्ञाची लक्षणे वाचून स्फूर्ती मिळते"हे तुमचं म्हणणं पटलं.
सर टोबी-माझं लेखन आवडतं! मनःपूर्वक धन्यवाद.
मुक्त विहारी-"जनसेवा हीच ईशसेवा" हे तुमचं म्हणणं बरोबर आहे.
तुषार काळभोर-उपदेश न करता,कोणताही आव न आणता मी लिखाण केलंय म्हणता! आभारी आहे.
बाजीगर-"कर्मकांड नको" हे तुमचं म्हणणं योग्य.
चौकस२१२-दीर्घ अभिप्राय. सारं स्वान्तसुखाय हे पटले.
सौत्रि-माझं लिखाण "सहज,सोपं, सुंदर"थॅंक्यू.
सर्वांचेच पुन्हा मनःपूर्वक आभार.
5 Jan 2022 - 12:57 pm | आंबट गोड
अगदी सहज, मनातलं लिखाण, आजी! तुमच्या मनाची निर्मळता हीच देवपूजा आहे.
बाकी सगळे नुसते उपचार.
7 Jan 2022 - 6:26 pm | सिरुसेरि
छान लेखन . "जनसेवा हीच ईशसेवा" याच अर्थावर आधारीत "देव देव्हा-यात नाही . देव नाही देवालयी " , "माना मानव वा परमेश्वर " , "सप्त शिवाहुनी सुंदर ते " अशी गीते प्रसिद्ध आहेत .