आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला शेवटच्या ओव्हर मध्ये १२ धावांची गरज आहे....प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार ३० पेक्षा अधिक धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे..अश्या वेळेस विश्वातला कोणताही कर्णधार शेवटची ओव्हर संघातील सर्वात अनुभवी गोलंदाजाला देणे पसंत करेल.....पण ३ यष्टयांच्या मागे उभ्या असलेल्या कर्णधाराच्या मनात वेगळाच प्लॅन होता. त्याने शेवटची ओवर फक्त ३ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या जोगिंदर शर्माला दिली आणि इथेच भारतीय क्रिकेट मधल्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. तो सामना होता पहिल्यावहिल्या T-२० विश्वचषकाचा अंतिम सामना. आणि ३ यष्टयांच्या मागे उभा राहून तो अविश्वसनीय निर्णय घेणाऱ्या कर्णधाराच नाव होत महेंद्रसिंह धोनी..पुढे काय झालं ते सर्वानाच माहितीये..
महेंद्रसिंह धोनी ने टीम इंडियाला पहिलावहिला t-२० विश्वचषक जिंकून दिल्यानंतर २०११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी पण जिंकून दिली..याबरोबरच त्याने भारतीय क्रिकेट ला अनेक गोष्टी दिल्या..आज आपण त्याच्या मैदानी कामगिरीला थोडंसं बाजूला ठेवून त्याला महान खेळाडूंच्या यादीत नेऊन बसविणाऱ्या त्याच्या स्वभावाच्या विविध पैलूंबद्दल माहिती घेणार आहोत.
१. कॅप्टन कूल
धोनीचा संघ सामना हरो अथवा जिंको पण सामना संपल्यावर धोनीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सामन्याचा निकाल काय लागला असेल हे कोणीही सांगू शकत नाही. धोनी कधीच मनातले भाव चेहऱ्यावर दाखवत नाही. सामन्याची स्थिती काहीही असो.. संघ संकटात सापडलेला असो अथवा पराभवाच्या छायेत असो धोनी नेहमी स्तिथप्रज्ञ असतो, तो सतत डोक्यावर बर्फ ठेवूनच मैदानावर वावरत असतो... आणि म्हणूनच क्रिकेटप्रेमी त्याला प्रेमाने "कॅप्टन कूल" म्हणून बोलवतात...
त्याच्या कुलनेस चा एक प्रसिद्ध किस्सा नेहमी सांगितला जातो:
२००८ ला एका tri-series मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया जागतिक क्रिकेट मध्ये एक बलाढ्य संघ होता. १९९९,२००३ आणि २००७ असे सलग तीन एकदिवसीय विश्वचषक जिंकलेल्या त्या संघात पाँटिंग, हेडन, ब्रेट ली, गिलख्रिस्ट, हसी असे एकापेक्षा एक सरस खेळाडू त्या संघात होते. त्या काळात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे ही खूप मोठी गोष्ट मानली जायची. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंड(MCG) वर तो सामना खेळवला गेला. महेंद्र सिंह धोनीचा एकदिवसीय कर्णधार म्हणून तो फक्त १५ वा सामना होता. पहिली फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला १६० धावांत गारद केलं आणि त्यानंतर ५ विकेट बाकी ठेवून भारताने तो सामना जिंकला. भारताने सामना जिंकला तेव्हा रोहित शर्मा आणि धोनी ही जोडी मैदानावर होती. सामना संपण्याआधी धोनी ने रोहित ला सांगितले की जिंकल्यानंतर आपण कोणतंही मोठं सेलिब्रेशन करणार नाही आहोत फक्त त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळाडू सोबत एक gentle shake hand होईल आणि कोणतंही मोठं(exciting) सेलिब्रेशन होणार नाही. त्याने ड्रेसिंग रूम मध्ये पण तसा संदेश पाठवला.
हा धोनीचा एक माईंड गेम होता. ह्यातून त्याला ऑस्ट्रेलियाला आणि जगाला ठणकावून सांगायचं होत की ऑस्ट्रेलिया ला हरवणे ही काही खूप मोठी गोष्ट नाही. आपल्या ह्या क्रियेमुळे ऑस्ट्रेलियन्सच्या आम्हीच कसे प्रबळ आणि सर्वश्रेष्ठ आहोत ह्या belief ला धक्का बसेल हे त्याला माहिती होत. त्याला हेच सांगायचं होत कि हि अनपेक्षित घटना नाहीये आणि हे आता पुन्हा पुन्हा होत राहील. ऑस्ट्रेलिया संघाला ती गोष्ट योग्यरीत्या हाताळता आली नाही. काही वर्षांनतर ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने एका मुलाखतीमध्ये ह्या प्रसंगाबद्दल बोलताना सांगितलं कि आमच्यासाठी तो एक जबरदस्त धक्का होता. श्रीलंका भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्या तीन संघाचा समावेश असलेली ती tri-series भारताने आरामात जिंकली होती.
२. यश व अपयश हाताळण्याची हातोटी
धोनीला त्याच्या कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळापासूनच भरपूर पैसा आणि प्रसिद्धी मिळत गेली पण त्याच्या वागण्यात किंवा वृत्ती मध्ये कधीच फरक दिसला नाही. आजही तो तितकाच नम्र आहे. अनेक खेळाडू कमी वयात यश मिळाल्यावर हुरळून जातात व काहीवेळेस वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याचा समतोल राखू शकत नाहीत. प्रतिभा असूनही यश आणि अपयश हाताळता न आल्यामुळे ४-५ वर्षातच कारकिर्दीचा शेवट झालेले भरपूर खेळाडू आहेत. यश हाताळणं जेवढं अवघड आहे त्याच्याहून पराभव हाताळणं कितीतरी अवघड. २०११ चा विश्वकप जिंकल्यानंतर भारतीय संघ एकसलग मालिका पराभवांना सामोरा गेला पण धोनीने चांगला खेळ करून पुन्हा गाडी पटरीवर आणली. २०२० च्या IPL स्पर्धेत धोनीच्या चेन्नई संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.त्यानंतर धोनीवर भरपूर टीका झाली, त्याच्या धीम्या फलंदाजी मुळे त्याला ट्रोल पण करण्यात आलं पण धोनी डगमगला नाही. २०२१ मध्ये धोनी तीच टीम घेऊन खेळला आणि त्याने चेन्नईला चौथ्यांदा IPL विजेता बनवल. धोनीने ज्याप्रकारे यश आणि अपयश हाताळलं ते खरंच प्रशंसनीय आहे.
३. प्रेझेन्स ऑफ माईंड
धोनीचा आणखी एक स्वभावगुन म्हणजे त्याचा "प्रेझेन्स ऑफ माईंड". धोनीला कोणत्या परस्तिथीमधे काय करायला हवं हे अचूक माहित असत. यष्टयांच्या मागे उभा असताना एखादा खेळाडू कोणता फटका खेळेल हे त्याला अचूक माहित असत. आपले फिरकी गोलंदाज गोलंदाजी करत असताना स्टंप माइक मध्ये "ये स्टेप आऊट करेगा, गेंद थोडा वाईड ही रखो" यासारखे उदगार तुम्ही अनेक वेळा ऐकले असतील. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना हातातले ग्लोव्हस काढण्याचा चालाखीपणा असो, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये शेवटची २ षटके फिरकी गोलंदाजांना देण्याचा निर्णय असो अथवा २००७ च्या विश्वचषकात शेवटचे षटक जोगिंदर शर्माला द्यायचा निर्णय असो असे अनेक किस्से त्याच्या प्रेझेन्स ऑफ माईंड ची साक्ष देण्याकरता देता येतील. त्याच्या प्रेझेन्स ऑफ माईंड चे अनेक मजेशीर किस्से पण आहेत.
२०१७ ला राइजिंग पुणे विरुद्ध मुंबई सामना चालू असताना केविन पीटरसन कॉमेंटरी बॉक्स मधून मनोज तिवारीसोबत बोलत होता. मनोज आणि पीटरसन ह्यांच्यात पुढील संभाषण झाल:
Kevin to Manoj: Tell Dhoni that I am good golf player than him.
त्यानंतर ओव्हर च्या दरम्यान मनोज तिवारी ने हि गोष्ट धोनी ला सांगितली.
त्यावर धोनीने त्याला उत्तर दिलं:
”but he (kevin) is still my first test wicket”.
ह्यावर सगळयांनाच हसू फुटलं.
आणखी एकदा पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने धोनीला त्याच्या रिटायरमेंट बद्दल छेडलं होत त्यावर धोनीने दिलेला प्रतिसाद पण असाच मजेशीर होता. त्याचा दुवा इथे खाली देत आहे:
MS DHONI MAKING FUN OF AUSTRALIAN REPORTER
४. खेळाडूंची पारख
धोनी खेळाडूंमधलं कौशल्य ओळखायला कधीही चुकत नाही आणि एकदा एखादा खेळाडू धोनीला आवडला कि धोनी काहीही करून त्या खेळाडूला संघात ठेवतो आणि त्या खेळाडूवर धोनीचा पूर्ण भरोसा असतो. कधीकधी तो खेळाडू चांगला खेळत नसला तरीही धोनी त्याला वारंवार संधी देत राहतो आणि तो खेळाडूपण एकदा सूर गवसला कि कर्णधारचा विश्वास सार्थ ठरवतो. जडेजा, अश्विन, रैना, शार्दूल ठाकूर, रोहित शर्मा, सॅम करन, ऋतुराज गायकवाड यासारख्या अनेक खेळाडूंच्या यशामागे धोनीचा त्यांच्यावरचा "विश्वास" खूप महत्वाचा होता. ऋतुराज गायकवाड मुलाखतीत एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगत होता कि, IPL २०२० मध्ये सुरवातीला त्याला म्हणावा तसा सूर सापडत नव्हता, धोनीने त्याला वारंवार संधी देऊन विश्वास तर दाखवलाच पण त्याबरोबर त्याने आणखी एक गोष्ट केली. पत्रकार परिषदेत धोनीला जेव्हा ऋतुराज बद्दल प्रश्न विचारला त्यावेळी धोनी म्हणाला, "ऋतुराज एक चांगला फलंदाज आहे, त्याच्या कौशल्याबद्दल माझ्या व सहकाऱ्यांच्या मनात कसलाही संदेह नाही. तो एक दिवस नक्कीच त्याचा सर्वोत्कुष्ट खेळ करून दाखवेल." ऋतुराज म्हणाला, धोनीच्या त्या शब्दांमुळे माझा स्वतःवरचा विश्वास आणखी वाढला. रोहित शर्माच उदाहरण सर्वाना परिचित आहेच. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याला खुप संघर्ष करावा लागला. २०१२ पर्यंत त्याचे संघातील स्थान निश्चित नव्हतं. तो नेहमी मधल्या फळीत खेळायचा पण २०१३ मध्ये धोनीने त्याला सलामीला पाठवायला सुरुवात केली आणि त्यानंतर रोहितने कधीच मागे वळून पाहिलंच नाही.
धोनी बद्दल बोलण्यासारखं आणि लिहिण्यासारखं भरपूर काही आहे. त्याच्या इतर पैलूबद्दल आणि क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन. हा लेख तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल प्रतिसाद नोंदवायला विसरू नका. धन्यवाद.
प्रतिक्रिया
21 Dec 2021 - 9:41 am | जेम्स वांड
सकाळी सकाळी कॅप्टन कूल बद्दल वाचणे म्हणजे पर्वणी, त्याचे मैदानावर असणे, शांतपणे डिसीजन घेणे ह्याला तोड नाही. तुमच्या लेखनाला हातभार लावणारा एमएसडीचा अजून एक गुण म्हणजे त्याची गेम असणारी मास्टरी ही त्याच्या अचूक डीआरएस घेण्यातून दिसून येई. आपल्या गड्यानं डीआरएस मागितला अन तो फेल गेला असे प्रसंग धोनीच्या करियरमध्ये डीआरएस इन्ट्रोड्युस झाल्यापासून विरळाच सापडतील.
एमएसडीयन.
(जर्सी नं ७ फॉरेव्हर) वांडो
22 Dec 2021 - 12:23 pm | राघव
धोनी रिटायर झाल्यावर माझी पहिली प्रतिक्रीया ही होती - Alas, the Most Powerful Number is retired from the Test Cricket!
22 Dec 2021 - 7:22 pm | सुजित जाधव
हा.. म्हणूनच डीआरएस ला धोनी रिव्ह्यू सिस्टिम असंही बोलतात.
21 Dec 2021 - 12:12 pm | सौंदाळा
लेख छान आहे, आवडला.
धोनी पण कर्णधार आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक होता. संयम आणि समतोल हा महत्वाचा गुण.
मात्र त्याच्या काही गोष्टी कधीच आवडल्या नाहीत
१. ज्या पध्दतीने लक्ष्मण च्या कसोटी कारकिर्दीची सांगता धोनीमुळे झाली
२ संघातील वरिष्ठ खेळाडूंनी क्षेत्ररक्षण सुधारले पाहिजे अशी सचिन, कुंबळे वर नाव न घेता केलेली टीका पण स्वतः मात्र फलंदाजीतचा सूर गेला तरी खेळत राहायचा अट्टाहास
पण वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या चांगल्या बाजू खूपच जास्त होत्या आणि लेखात त्या उत्तम मांडल्या आहेत.
ट२० विश्वचषक भारत-पाक अंतिम सामना:
मला तरी हा पुर्ण सामनाच फिक्स वाटत होता (कदाचित फक्त पाकिस्तान सहभागी असेल)
कारण
१. ट२० विश्वचषकासाठी सचिन, सौरव, द्रविड वगैरे दिग्ग्ज खेळाडू इच्छुक नव्हते आणि ते स्पर्धेत सहभागी देखिल झाले नाहीत
२. या परिस्थितीत भारतात आयपीएल रुजणे शक्यच नव्हते
३. विश्व्चषकासाठी नवखा भारतीय संघ जातो काय, अंतिम सामन्यात पाक समोर त्यात पण सामना टाय, आणि पाकिस्तानचे गोलंदाज यष्टीवर पण चेंडू टाकू शकत नाहीत!! भारताचा नेत्रदिपक उत्कंठावर्धक विजय, देशभर जल्लोष
४. काही महिन्यातच आयपीएलची घोषणा आणी करोडो रुपयांचे पांढरे, काळे मार्केट सुरु
22 Dec 2021 - 7:41 pm | सुजित जाधव
आभारी आहोत! तुमच्यासारख्या वाचकांच्या प्रतिक्रिया मिसळपाववरील नवीन लेखकांसाठी खूपच मोलाच्या आहेत..नवीन लेख लिहायला उत्साह येतो.
आणि धोनीच्या वरिष्ठ खेळाडूंच्या बाबतीतील दृष्टीकोनाबद्दल तुमच्या मताशी मी सहमत आहे. पण संघबांधणी करताना किंवा नव्या खेळाडूंना संधी देताना कर्णधाराला कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. पण त्याच्या त्या निर्णयांमुळे संघाच्या कामगिरीत कधी उतार आला नाही त्यामुळे त्याची चर्चा पण जास्त केली गेली नाही.
22 Dec 2021 - 11:48 am | अमरेंद्र बाहुबली
दुसर्याचं क्रेडीट स्वतच्या नावावर घेणे, युवराज बरोबर पोलीटीक्स करणे (युवराजच्या वडीलानी तर खुलेआम शिव्या दिल्या होत्या.) हीच ह्याची ओळख. राष्ट्रपती पुरस्काराला गजेरी न लावता जाहीरातीच्या शूटींगला जाणे. बाकी २००७ नी २०११ ला आपण जे वर्ल्डकप जिंकले ते गौतम गंभीर मुळे पण क्रेडीट गेलं धोनीला. असो.