पद्मश्री बा. भ. बोरकर सादर अभिवादन......

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
30 Nov 2021 - 7:39 pm

सेवानिवृत्ती नंतरच्या गोष्टी ज्यांनी माझे मन प्रफुल्लित ठेवलं त्यांपैकी एक म्हणजे मराठी कवीता. शाळेत असताना कवीता फक्त टक्के वाढवण्यासाठी वाचल्या. त्यातील थोड्या लक्षात राहील्या बाकी आयुष्यात टक्के टोणपे खाताना विस्मृतीत गेल्या.

सेवानिवृती मुळे वेळच वेळ आणी मराठी पुस्तके, मासिके व अतंरजाला वर वाचण्यासाठी भरपूर साहित्य. जितेंद्र अभिषेकी आवडते आणी " कट्यार व हे बंध रेशमाचे ", नाटकां मुळे जवळून पाहण्याची संधी मिळाली.त्यांचा व बोरकरांचा जवळचा संबध. ते बोरकरांचा उल्लेख नेहमी करायचे. पु ल देशपांडे आणी सौ सुनीताबाईचें यू ट्यूबवर कवीता वाचन आणी मुलाखती व चर्चा पाहिल्यावर उत्सुकता वाढत गेली.
बा भ बोरकरांच्या कविता ,अतंरजाला वरचे लेख वाचत गेलो तसे तसे त्यांचे बहू आयामी व्यक्तित्व आणी प्रतीभा कळू लागली.

३० नोव्हेंबर...

पद्मश्री बा. भ. बोरकर
यांची जयंती !

गोव्यातल्या बोरी गावचे बोरकर बाकीबाब म्हणून ओळखले जायचे. फक्त २० वर्षांचे असताना त्यांचा पहिला कविता संग्रह "प्रतिभा" १९३० साली प्रसिद्ध झाला.१९३४ साली बडोद्यातील वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनात 'तेथे कर माझे जुळती' या काव्यगायनाने कवी म्हणून ते ओळखले जाऊ लागले .

अवघ्या विसाव्या वर्षी काव्य प्रतीभेला संसार थाटण्यासाठी ललकारणारे बोरकर,

शृगांरा़ला अश्लीलतेचा यत्किंचितही स्पर्श होऊ न देणारी "जपानी रमलाची रात्र" ही कवीता ,

"तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात"

"ती" दोन दिवसा करता दुर गेल्यानंतर अस्वस्थ होणारे

तू गेल्यावर फिके चांदणे
घरपरसू ही सुने सुके

आणी

तेवढेच आयुष्याच्या संध्याकाळी,"विसाव्याच्या क्षणी" विरक्त होत त्याच सखीला म्हणतात

"सले कालचीं विसरून सगळी
भले जमेचें जिवीं स्मरूं,
शिशुहृदयाने पुन्हा एकदा
या जगतावर प्रेम करूं."

आयुष्याची उजवण झाली म्हणत तीच्या घरचे तुळशीचे पान आणी तीनेच काढलेल्या आडतल्या पाण्याची तुलना तीर्था बरोबर करतात.

"असावीस पास, जसा स्वप्नभास,
जीवीं कासावीस झाल्याविना,

तेव्हा सखे आण तुळशीचे पान,
तुझ्या घरी वाण नाही त्याची….

तूच ओढलेले त्यासवें दे पाणी,
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजें,"

आयुष्यातील असंख्य चढ उतार पाहिल्यानंतर सुद्धा,

" मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्‍ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा "

म्हणणारे बोरकर जीवनाच्या अंतिम फेरीत म्हणतात,

नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी ",

पं जितेंद्र अभिषेकी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की बोरकरांची कवीता म्हणजे शब्द आणी सूर जणू हातात हात गुंफून येतात, संगीत त्यांच्या कवीतेतच असतं .वयाच्या प्रत्येक पडावावर त्याच्यां कवीतेचे रूप बदलत गेल्या सारखे वाटते.

अप्रतीम फक्त ऐवढच म्हणू शकतो. काही आवडलेल्या आणी कसं जगायचं याचे मार्गदर्शन करणार्‍या काही कवीता त्यांच्या जन्म दिनी खाली दिल्या आहेत.मिपाकर साहित्यप्रेमी त्यांनी आगोदरच वाचल्या आसतील.

*१. जपानी रमलाची रात्र*

तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात

रतीरत कुक्कुट साकुंडीवर आरोहूनी माड
चोच खुपसुनी फुलवीत होता पंखांचे झाड

अद्भुत पंख्यासम भिंतीवर आंदोलुनी छाया
लावित होत्या ताप जगाचा नकळत विसराया

धूप ऊसासत होता कोनि रजताच्या पात्री
विचित्र रेशिमचित्रे होती रसावली गात्री

तुझा पियानो यक्ष जळातील होता निजलेला
मनात गुंफित स्पर्श-सुखांच्या स्वप्नांचा झेला

अन् म्युसेची कवने होती माझ्या हातात
प्रतिचरणाला करित होती धूम्रवेल साथ

जळत ऊसासत होते त्यासह अंतरात काही
होता चिमणा श्वान लोकरी घोटाळत पायी

तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ
आलीस मिरवीत जाळीमधुनी नागिणीचा डौल

करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पांच उकळता याही रंगलेले

अभिष्ट चिंतुनी आम्ही त्यांचे भिडवियले काठ
सुरेहुनी तु गडे भाजिले ओठांनी ओठ

स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा
मज सम त्याच्या कानशिलाच्या झणाणल्या तारा

गंधर्वांच्या दुहिता जमल्या करित पुष्पवृष्टी
हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी

पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पा-यासम अंगातील वासे

आणि तरंगत डुलु लागली नौकेसम शेज
तो कांतितुन तुझ्या निथळले फेनाचे तेज

नखे लाखिया दात मोतिया वैडूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र

कात सोडिल्या नागिणिचे ते नवयौवन होते
विळख्याविळख्यातुनि आलापित ज्वालांची गीते

गरळ तनुतील गोठुन झाले अंतरात गोड
कळले का मज जडते देवा नरकाची ओढ

डोळे बांधुन खेळत होते जीवन मायावी
अंधपणातच वितळत होते भूत आणि भावी

तुझ्या जपानी भाषालिपिसम अगम्य सुन्दरता
असुनि हाती उरली दुर्लभ आली ना हाता

आजही तुज शोधता कधी ती रमलाची रात्र
पाठितुनि जंबिया मधाचा घाली काळजात!

२ तू गेल्यावर फिके चांदणे...

तू गेल्यावर फिके चांदणे
घरपरसू हि सुने सुके
मुले मांजरापरी मुकी अन
दर दोघांच्या मध्ये धुके

तू गेल्यावर या वाटेने
चिमणी देखील नच फिरके
कसे अचानक, झाले नकळे
अवघे जग परके-परके

तू गेल्यावर घरात देखील
पाऊल माझे अडखळते
आणि आटूनी हवा भवतीची
श्वासस्तव मन तडफडते

तू गेल्यावर दोन दिवसास्तव
जर हि माझी अशी स्तिथी
खरेच माझ्या आधी गेलीस
खरेच माझ्या आधी गेलीस
तर मग माझी कशी गती?

३. कांचनसध्या....

पिलांस फुटुनी पंख तयांची
घरटी झाली कुठे कुठे,

आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटें.

कशास नसत्या चिंता-खंती
वेचू पळती सौम्य उन्हे,

तिमिर दाटता बनुनि चांदणें
तीच उमलतील संथपणे.

सले कालचीं विसरून सगळी
भले जमेचें जिवीं स्मरूं,

शिशुहृदयाने पुन्हा एकदा
या जगतावर प्रेम करूं.

उभ्या जगाचे अश्रु पुसाया
जरी आपुले हात उणे

तरी समुद्रायणी प्रमाणें
पोसूं तटिची म्लान तृणें.

इथेच अपुली तीर्थ-त्रिस्थळी
वाहे अपुल्या मुळी-तळी,

असू तिथे सखि! ओला वट मी आणिक तूं तर देव-तळी.

शिणुनी येती गुरें-पाखरें
तीच लेकरें जाण सखे,

दिवस जरेचे आले जरी
त्या काठ जरीचा लावू सुखें...!

४. संधीप्रकाशात अजुन जो सोने...

आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो क्षण अमृताचा,

जे जे भेटे ते ते दर्पणींचे बिंब, तुझे प्रतिबिंब लाडेगोडे…

सुखोत्सवें असा जीव अनावर, पिंजर्याचे दार उघडावे,

संधिप्रकाशांत अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी…

असावीस पास, जसा स्वप्नभास, जीवीं कासावीस झाल्याविना,

तेव्हा सखे आण तुळशीचे पान, तुझ्या घरी वाण नाही त्याची….

तूच ओढलेले त्यासवें दे पाणी, थोर ना त्याहुनी तीर्थ दुजें,

वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल; भुलीतली भूल शेवटली…

५. स्वर्ग नको सुरलोक नको

स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्‍ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा
शोक हवा परि वाल्मिकिच्या परि सद्रव अन् सश्लोक हवा
हर्ष हवा परि स्पर्शमण्यापरि त्यांत नवा आलोक हवा
शंतनुचा मज मोह हवा अन ययातिचा मज देह हवा
पार्थाचा परि स्नेहविकंपित स्वार्थ सदा संदेह हवा
इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृद्रोग हवा
योग असो रतिभोग असो अतिजागृत त्यात प्रयोग हवा
आयु हवे आरोग्य हवे यशभाग्य तसा प्रासाद हवा
श्लाघ्य हवे वैराग्य तयास्तव त्यांत विरोध विषाद हवा
तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा
शिळांत पिचतां जळांतुनी मज निळा निळा उःशाप हवा
मार्क्साचा मज अर्थ हवा अन् फ्रॉइडाचा मज काम हवा
या असुरां परि राबविण्या घरिं गांधींचा मज राम हवा
लोभ हवा मज गाधिजमुनिचा अखंड आंतर क्षोभ हवा
पराभवांतहि अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा
पार्थिव्यांतच वास हवा परि दिव्याचा हव्यास हवा
शास्त्रांचा अभ्यास हवा परि मानव्याचा ध्यास हवा
विश्व हवे सर्वस्व हवे अन् मृत्यू समोर सयंत्र हवा
शरांत परि ही विव्हळतां तनु उरांत अमृतमंत्र हवा
हविभुक सुरमुख मी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा
हे सुख दुर्लभ वाढविण्या मज चौर्‍यांशीत प्रवास हवा

६. तापल्या आहेत तारा

तापल्या आहेत तारा तोंवरी गाऊन घे
स्वप्‍न आहे लोचनीं हें तोंवरी पाहून घे

रे फुलांचा बाण आहे, अमृताची वेदना
नी सुखाच्या आंत आहे शापणारी यातना
त्राण आहे तोंवरी सप्राण हें साहून घे

आग आहे लागलेली अंतरींच्या मोहळा
आणि आकाशांत आहे आसवांचा सोहळा
चालल्या आहेत धारा तोंवरी न्हाऊन घे

वादळीं अंधारल्या पाण्यांतुनी तेजाळुनी
कामिनी आवेगवेडी येत आहे दामिनी
जाग आहे तोंवरी रे दीप हा लावून घे

बोरकरांची आवडती कविता "समुद्र बिलोरी ऐना", त्याच्या अंतिम क्षणी सौ सुनीताबाई देशपांडे यांनी त्यांची अंतिम इच्छा म्हणून दाखवली आसे स्वतः सौ सुनीताबाई ने एके ठिकाणी नमूद केले आहे.

बोरकरांची लोकप्रिय आणी माझी आवडती गाणी जी मी नेहमी ऐकतो.

अनंता तुला कोण पाहू शके,
कशी तुज समजाऊ सांग,
दिव्यत्वाची जेथ प्रचिती,
नाही पुण्याची मोजणी,
झिणी झिणी वाजे बिन,
पांडुरंग त्राता-पांडुरंग दाता

आशा या आवडत्या कवीला ,
बा.भ.बोरकरांच्या स्मृतीला सादर अभिवादन!

कविताविचार

प्रतिक्रिया

खेडूत's picture

30 Nov 2021 - 8:52 pm | खेडूत

छान.
बा भ बोरकर यांच्या 111 व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन!!

अभिषेकी बुवांच्या संगीताने सजलेल्या त्यांच्या रचना म्हणजे पर्वणीच असते. रोज कामाला जाताना गाडीत त्यांचे अनंता तुला कोण पाहू शके ऐकतो. केतकी माटेगावकर हिच्या आवाजात सुद्धा खूप सुंदर झाले आहे.

शाळेत असताना त्यांच्या काही कविता वाचून काव्यसंग्रह मिळवून वाचले होते. नववीत असताना त्यांची चित्रवीणा ही कविता विशेष भावली होती. ती इथे देतो आहे.

चित्रवीणा

निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापॆ
सुखांसवे होऊनी अनावर

तारांमधला पतंग कोठे
भुलूनी गेला गगनमंडला
फ़णा डोलवित झोंबू पाहॆ
अस्तरवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या
तसेच कोठे कातळ काळे
वर्ख तृप्तिचा पानोपानी
बघून झाले ओलेओले

कुठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला
सटीनकांति गोरे गोरे

फूललपंखरी फूलथव्यांवर
कुठे सांडली कुंकुमटीम्बे
आरसपानी पाण्यावरती
तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा
मावळतिचा शकून सांगे
पूर्वेला राउळ इंद्राचे
कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी
अन रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्रवीण
अजूनी करते दिडदा दिडदा.

__/\__

प्रचेतस's picture

30 Nov 2021 - 9:24 pm | प्रचेतस

सुरेख एकदम

अमर विश्वास's picture

30 Nov 2021 - 9:59 pm | अमर विश्वास

पुल आणि सुनीता बाईंनी "पोएट" बोरकर यांच्या कवितांवर "आनंदयात्रा कवितेची" हा कार्यक्रम केला होता.

यु ट्यूब वर आहे.... आवर्जुन ऐकण्यासारखे (लिंक: https://www.youtube.com/watch?v=W4d_G1rwM0Y)

अमेरिकन त्रिशंकू's picture

1 Dec 2021 - 4:37 am | अमेरिकन त्रिशंकू

आवडते कवी बाकीबाब. त्यांची लावण्यरेखा ही कविता आवडती आहे.

लावण्य रेखा

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे

तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्‍या नभा
वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा

देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे
आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळ्वंटतूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती

देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया
लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा

सुधीर कांदळकर's picture

1 Dec 2021 - 7:16 am | सुधीर कांदळकर

ते या लेखामधून उद्धृत केलेल्या कवितांमुळे थोडेफार कळते. जपानी रमलाची ......... मिळवून वाचायचे बरेच दिवसमनात होते. ते अनायासे घडले. धन्यवाद.

या अलौकिक कवितांबद्दल बोलणे कठीणच. हिरेमाणके मोत्यांची उधळणच. किती घेऊं किती नको असे होतेच. तरी पसाभर वेचणे देखील आपल्या आवाक्याबाहेरचे आहे हे ध्यानात येते.

अप्रतिम लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

सौंदाळा's picture

1 Dec 2021 - 10:42 am | सौंदाळा

छान
मधु मंगेश कर्णिक यांनी त्यांच्या गोव्यातील नोकरीनिमित्ताने केलेल्या वास्तव्यातील बा.भ. बोरकरांबरोबरच्या बर्‍याच आठवणी लिहिल्या आहेत.

संपादक मंडळाला विनंती.. धाग्यातील कवितांचे टायटल थोडे मोठे व बोल्ड केले तर वाचण्यास सोपे पडेल.

उत्तम आणि समयोचीत धागा.

मागच्या आठवड्यात मी आणि नूलकर काका कोकण किनारपट्टीने भटकत भटकत गोव्याला गेलो आणि थोडी शोधाशोध करुन बोरी गाव, तेथील बाकीबाबांचे स्मारक व घराला भेट दिली..

बोरी गावात एक साई मंदिर आहे.. तेथे एका तळ्याकाठी हा पुतळा आहे...

.

.

.
.

.

तेथूनच जवळ मुख्य रस्त्यावर घर आहे अशी माहिती मिळाली व फार शोधाशोध न करता घरही सापडले.

.

घर शाकारण्याचे वगैरे काम सुरू होते.
.

या घरात सध्या बिहारी मजूर लोकं रंगकाम + इतर कामासाठी मुक्काम ठोकून होते. बाकीबाब यांच्या पूजेतले देव, मोठे पेटारे आणि त्यांनी कोणत्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने परतभेट देण्यासाठी केलेल्या कांही फ्रेम व त्यांच्या पूर्वजांच्या फोटो फ्रेम अडगळीत पडले होते. या घराचे स्मारक बनणार असल्याचीही माहिती मिळाली..

*********
माझ्या वैयक्तिक संग्रहातील बाकीबाब बोरकरांची सही असलेले पुस्तक (मिपावर पूर्वी एका धाग्यात या पुस्तकाचा रेफरन्स दिला आहे..!)
.
.

कर्नलतपस्वी's picture

1 Dec 2021 - 7:23 pm | कर्नलतपस्वी

नशीबवान समजतो, तुमच्या कडे सत्तर बहात्तर वर्षापूर्वी ची बोरकरांची आठवण आहे. स्मामराका बद्दल दिलेल्या माहीती आणी फोटो बद्दल धन्यवाद.
श्रीपाद जोशी आपणच का!

नै हो.. मी श्रीपाद जोशी नाही.

हे पुस्तक मला पुण्यात रद्दीच्या दुकानात उचकपाचक करताना मिळाले.

कर्नलतपस्वी's picture

2 Dec 2021 - 9:13 am | कर्नलतपस्वी

व्वा, आम्हीपण टाईमपास करता जुन्या बाजारात, फुटपाथवर जुन्या गोष्टी शोधतो.

चौथा कोनाडा's picture

9 Dec 2021 - 5:22 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, मोदक .... बोरकर यांचा पुतळा आणि निवासस्थानाच्या प्रचिं बद्दल !

Bhakti's picture

1 Dec 2021 - 4:43 pm | Bhakti

मस्तच कविता,_/\_
सुनिता बाईंच्या बोरकरांच्या कविता वाचन का केलं बद्दल कुठे तरी वाचलं होतं.

अनन्त्_यात्री's picture

1 Dec 2021 - 6:18 pm | अनन्त्_यात्री

कवितांपैकी ही एक:

माझे घर
~~~~~~~
तृप्त स्वतंत्र गोव्यात केव्हातरी केव्हातरी
फेसाळल्या लाटांपाशी सिंधुसरितेच्या तीरी।
बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर
गार विलायती वेल चढवीन भिंतीवर॥
मागे विहीर काठाची वर प्राजक्ताचे खोड
गर्द हिरवे न्हाणीशी नीरफणसाचे झाड।
केळबनाच्या कडेला स्वच्छ छोटासाच गोठा
त्यात सवत्स कपिला ओल्या चार्‍याचा नि साठा॥
फुलपाखरांच्यासाठी पुढे फुलझाडे चार।
आंबा एकादा कलमी यावी म्हणुनिया खार।
गारव्याच्यासाठी काही गार नाजूक पोफळी
नागमोडी त्यांच्यावर पानवेल मिरवेल॥
वर पश्चिमेला गच्ची अभ्यासिका पूर्वेकडे
शेजारच्या माडावर पाहीन मी सोनसडे।
कानी समुद्राची गाज पुढे ग्रंथ स्वर्णाक्षरी
पारव्यांची कुजबुज खिडकीच्या गजांवरी॥
असा पहाटेला घेत हुक्क्या चहाची लज्जत
लिहीन मी भावगीते तेथे घुमत घुमत।
आणि येता थोडा शीण बसुनिया गच्चीवर
रेखाटीन भोवतीचे चित्र एखादे सुंदर॥
जाळी फेकणारे कोळी, त्यांच्या मासळीच्या होड्या
खपणारे वावराडी, त्यांच्या विसाव्याच्या विड्या।
कधी काजळता क्रूस कधी उजळ घुमट
बांगड्यांशी खेळणारा कधी ओलेतीचा घट॥
आणि मग सेवीन मी जाईजुईचा गे भात
पोईतल्या मासळीचा स्वाद घेत साथ साथ।
वेताचिया खाटेवर थोडा बागेत दुपारी
झोपेन मी घोळवीत तुझी अमली सुपारी॥
आणि सूर्यास्तास माझा रंगी घेऊन शिकारा
तुझ्यासंगे जाईन मी इंद्रचंद्राच्या माहेरा।
कुणी भविष्याचा कवी आम्हा ऐकवील गाणी
ऐकेन ती समाधाने डोळा घेऊनीया पाणी॥
थंडीवार्‍यात पश्मिनी शाल स्कंधी घालशील
काठी उद्याचा तो कवी प्रेमे मला सांभाळील।
घरी येताच नातरे आनंदाने म्हणतील
सांगा गोष्ट किंवा म्हणा नवे गाणे॥
रचुनिया सांगेन मी त्यांना गाण्यातच कथा
जेणे जाणवेल त्यांना उद्या दुसर्‍याची व्यथा।
मग रेलून गच्चीत टक लावीन आकाशी
दाट काळोखातही मी चिंब भिजेन प्रकाशी॥
असे माझे गोड घर केव्हातरी केव्हातरी
अक्षरांच्या वाटेनेच उतरेल भुईवरी॥

कर्नलतपस्वी's picture

1 Dec 2021 - 7:25 pm | कर्नलतपस्वी

सर्वच वाचकांचे धन्यवाद, या निमित्ताने काही आणखीन कवीता वाचायला मिळाल्या.

प्रदीप's picture

1 Dec 2021 - 8:13 pm | प्रदीप

बोरकरांच्या कवितांनी नटलेला धागा वाचतो आहे.

मात्र, एक सूचना करावीशी वाटते (संपादक ह्याविषयी अधिक सांगू शकतात-)

संपूर्ण कविता येथे उर्ढ्रुत करण्यात कॉपीराईटचा अजाणतेपणे भंग तर होत नाही आहे ना?

कर्नलतपस्वी's picture

2 Dec 2021 - 9:20 am | कर्नलतपस्वी

प्रतीसादा बद्दल धन्यवाद. काँपीराईट्स कायद्या प्रमाणे काँपीराईट्स मटेरियल फेअर युजेस करता विना परवानगी वापरण्यास ऐग्झमशन आहे.
दुसरे असे की या सर्व कवीता अतंरजाला वर उपलब्ध आहेत.
संपादकीय मंडळ यावर प्रकाश टाकू शकते, कायद्या चे पालन जरुर करू.

चांदणे संदीप's picture

2 Dec 2021 - 1:53 am | चांदणे संदीप

'पोएट बोरकर' नावाचे व. दि. कुलकर्णी लिखीत एक पुस्तक माझ्याकडे होते. अगदी संग्रही असावे व पुन्हापुन्हा वाचावे असे ते पुस्तक होते. ते एका मित्राला आवडीने वाचायला दिले तर त्याने ते हरवून टाकले. खूप हळहळ वाटलेली त्यानंतर. असो, बोरकर हे आवडत्या कवींपैकी एक आहेत.

सं - दी - प

पुष्कर's picture

2 Dec 2021 - 9:16 am | पुष्कर

माझे सगळ्यात आवडते कवी. तसं माझं कविता वाचन फार नाही, पण शाळेनंतर कवितांपासून लांब गेलेला मी बोरकरांच्या कवितांमुळे परतलो. त्यांची डाळींबीची डहाळीशी ही मराठी कविता आणि त्याचीच कोकणी - डाळमेच्या ताळ्येपरी वार्‍यार झोल नाकां - दोन्ही छान आहेत. संधीप्रकाशात तर कमालच आहे! चपळ तुझे चरण मधलं लालित्य सुंदर आहे. मला आणखीन आवडते ती 'त्या दिसा वडाकडेन गडद तिनसाना, मंद मंद वाजत आयली तुजी गो पायंजणां'. पुलंनी त्यांच्या कार्यक्रमात ही फार छान गायली देखील आहे.

गडद निळे गडद निळे - ह्या कवितेचा स्पेशल उल्लेख गरजेचा आहे. ह्यात शब्दरचना सुंदर आहेच, कवितेला नादही आहे, पण ह्यातल्या कल्पनाही किती मस्त आहेत! 'पद उमटे क्षितिजावरी'काय, 'पद्मराग-वृष्टी' काय .... 'मीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे... नवथर रस रंग गहन करिती नयन ओले' अहाहा! काय वर्णन आहे!

माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्याला आज ७२५ वर्षे झाली.
त्यानिमित्ताने बोरकरांची ही कविता:
माउलींना विनम्र अभिवादन!

ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत
वेद झाले रानभरी गोंधळले संत

ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती
आसवांच्या डोही झाली विझू विझू ज्योती

ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला
बाप रखमा देविवरु कटीत वाकला"

कुमार१'s picture

3 Dec 2021 - 1:27 pm | कुमार१

चांगला लेख.
बोरकरांच्या एका कवितेतील शेवटच्या दोन ओळी खूप आवडतात :

... खादी घालुनी लाच मागती
वजीर आणि प्यादी

(1959 ची कविता असल्यामुळे खादीचा संदर्भ दिसतोय).

चौथा कोनाडा's picture

9 Dec 2021 - 5:16 pm | चौथा कोनाडा

वाह, सुंदरच !

माझ्या तरुणपणी दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी प्रतिभा आणि प्रतिमा हा कार्यक्रम लागत असे. विविध कलाक्षेत्रातील नामवंत व्यक्तींची मुलाखत असे त्याचे रूप असे.

पु ल देश्पांडे यांनी बोरकरांची १९७८ साली या कार्यक्रमासाठी घेतलेली मुलाखत येथे -

https://www.youtube.com/watch?v=69SHMVmh1to&list=LL&index=1&ab_channel=D...

(क्षूद्र भाषिक राजकारणामुळे बोरकरांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून वंचित रहावे लागले, ही बोच राहिलच!)