उर्दू शायरीमधील "हर्फ गिराना" आणि हिन्दी चित्रपट संगीतावर त्याचा परिणाम

Primary tabs

धष्टपुष्ट's picture
धष्टपुष्ट in जनातलं, मनातलं
21 Nov 2021 - 12:57 pm

आतापर्यंत भूलचुकीमुळे काही काव्यशास्त्रविषयक लेख "जे न देखे रवी" मध्ये लिहीत होतो. कालचा लेख इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. क्षमस्व!

---

मराठी वृत्तबद्ध कवितेत एखादे अक्षर लघु आहे का गुरु यामध्ये संदिग्धता नसते, पण त्याचा कधीकधी जाचही होऊ शकतो. उर्दूमध्ये "हर्फ गिराना" या सवलतीमुळे त्यात लवचिकता, कधी कधी संदिग्धता आणि म्हणूनच रोचकता आली आहे.
.

या लघुलेखात आपण २ गोष्टी पाहणार आहोत
१. हर्फ गिराना काय प्रकार आहे
२. तो कधी कधी नीट न समजल्यामुळे चित्रपट संगीतात कसा घोटाळा होतो

---

या लेखाच्या व्याप्तीच्या बाहेर:
१. उर्दू शायरीचा गण परिचय (माफाइलुन, फाइलातुन, इत्यादी. त्याच्यावर पुढे लिहिण्याची इच्छा आहे)
२. गझलचा आकृतिबंध आणि पारिभाषिक माहिती. https://www.maayboli.com/node/21889 इथे बरीच माहिती मिळेल.
.
सोप्या शब्दांत "हर्फ गिराना" म्हणजे "गुरु अक्षर लघु करणे
"
"है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा" या ओळीचे वृत्त बघूया. गाण्याची चाल डोक्यातून तात्पुरती काढून टाका.
खरंतर हे वृत्त असं आहे: लगागागा लगागागा लगागागा लगागागा, पण सहज वाचलं तर तसं भासत नाही कारण जितका वेळ सामान्यतः बोलताना आपण है, तो आणि पे ला लावतो त्याहून काहीसा कमी वेळ या वृत्तात बसवण्यासाठी आपण घेतो. ही अक्षरे थोडी झर्रकन उच्चारतो. त्यालाच हर्फ गिराना म्हणतात. खाली अशी उदाहरणे अधोरेखित केली आहेत
.
अशी:
१. है अप ना दिल (सामान्यतः दीर्घ/गुरु असणारा है गिराके लघु म्हणून लगागागा)
२. तो आ वा रा (सामान्यतः दीर्घ/गुरु असणारा तो गिराके लघु, म्हणून लगागागा)
३. न जा ने किस (लगागागा)
४. पे आ ए गा (सामान्यतः दीर्घ/गुरु असणारा पे गिराके लघु म्हणून लगागागा)
.
स्वाध्याय: या ओळींमधला कुठला "हर्फ गिराया" है तो ओळखायचा प्रयत्न करून बघा:
१. ये एक टूटा हुआ तारा न जाने किस पे आएगा
२. बहोत भोला है बेचारा न जाने किस पे आएगा

----

हे अरिष्ट उर्दूमध्ये नियमित कोसळतं. आता याचे काही ढोबळ नियमही आहेत. सगळे काही इथे देता येणार नाहीत, पण आपली सज्जता असावी इतपत उपयोगी होतील:

१)अंत्य वर्ण आ ई ऊ ए ओ असतील तर ते लघु केले जाऊ शकतात.
उदा:

सारे जहाँ से अच्छा, हिंदोसिता हमारा
(गागालगालगागा, गागालगालगागा)
या मध्ये से ला लघु गणलं गेलं आहे.

तेरा आणि मेरा ला तिरा आणि मिरा असं लिहिण्यामागे हाच प्रकार आहे. उदा दिलावर फ़िगार यांचा शेर:

मिरा मकाँ , ही बदल गया, न तिरा पता, कोई और है
मिरी राह फिर, भी है मुख़्तलिफ़, तिरा रास्ता, कोई और है

(ललगालगा ललगालगा ललगालगा ललगालगा)

(तिरा आणि मिरा व्यतिरिक्त ही, को, री, भी, है अश्या दीर्घ/गुरु अक्षरांनाही लघु मानले आहे)
.

२) एखादा गुरु वर्ण “हर्फ गिराके” लघु बनून त्याआधीच्या लघु वर्णात लोप पावू शकतो. त्या दोघांना लघु + गुरु न मानता लघु + लघु मानायचा प्रघात आहे. सोदाहरण देतो:

उलटी हो गयीं सब तदबीरें कुछ न दवा ने काम किया
देखा इस बीमारी-ए-दिल ने आखिर काम तमाम किया
मीर तकी मीर

हा गागागागा गागागागा असा आहे, पण यातली सूक्ष्मता थोडी फोड करून बघूया:
उल टी हो गयीं सब तद बी रें, कुछ न-द वा ने का म-कि या
(गागागागा गागागागा)
दे खा इस बी मा री-ए दिल ने, आ खिर का म-त मा म-कि या
(गागागागा गागागागा)

दोन लघु अक्षरांना एक गुरु मानण्याची पद्धत आहेच. उदा: उल, सब, तद इत्यादी. न-द, म-कि आणि म-त सुद्धा याच प्रकारात मोडतात.

पण गयीं आणि री-ए कडे विशेष लक्ष देऊया.
गयीं: अन्यथा आपण ह्याला लघु-गुरु असं मानलं असतं, पण यीं ला लघु करून ह्याला लघु-लघु = गुरु मानले आहे. त्याला जवळजवळ "गै" असं उच्चारलं जातं.
री-ए: अन्यथा ह्याला आपण गुरु-लघु मानलं असतं (हिंदी उर्दू मध्ये ए लघु असतो), पण री ला लघु करून ह्याला लघु-लघु = गुरु मानले आहे. ह्याचा उच्चार जवळजवळ "र्ये" असा होतो.

३) कधी कधी पुढचा स्वर किंवा महाप्राण आधीच्या व्यंजनात मिसळून टाकणं सोयीचं असेल तर तसंही करतात. वृत्तात बसवायला काहीही!. हर्फ गिराना ही तडजोड आहे, हा प्रकार केलाच पाहिजे हा दंडक नाही.

कल चौदहवी, की रात थी, शब् भर रहा, चर्चा तेरा
कुछ ने कहा, ये चाँद है, कुछ ने कहा, चेहरा तेरा
इब्ने इंशा

(गागालागा गागालागा गागालागा गागालागा)
यामध्ये चौदहवी चा उच्चार जवळजवळ चौधवी असा होतो. हापण हर्फ गिरण्याचाच भाग आहे.

----

आता थोडं बघूया याचा परिणाम गायनावर कसा होतो. अनेक वेळा आपल्याला आवडणाऱ्या गाण्यांच्या चाली छंदःशास्त्रानुसार सदोष असतात. ह्यात अनुचित काही नसलं तरी हे लक्षात येणं रोचक होऊ शकतं.

१) उदा "उमराव जान" मधलं हे गाणं:

ये क्या, जगह, है दो, स-तों, ये कौ,नसा, दया,र है
हदे, निगा,ह तक्, यहाँ, गुबा,र ही, गुबा,र है

इथे लगा,लगा,लगा,लगा x२ असा वृत्त आहे. म्हणून पहिल्या ओळीतली ये, है ही दीर्घ/गुरु अक्षरं लघु केली गेली आहेत. पण https://www.youtube.com/watch?v=QdxyXKsWEMs जर ऐकलंत तर ही अक्षरं लांबवली जातात, म्हणून ही चाल छंदःशास्त्रानुसार सदोष आहे.

२) "बाझी" मधलं दुसरं उदाहरण:

तदबीर से, बिगड़ी हुई, तकदीर ब,ना ले
अपने पे भ,रोसा है तो, एक दाँव ल,गा ले

(गागालगा,गागालगा,गागालगा,गागा)
आता दुसऱ्या ओळीत गागालगा गागालगा गागालगा गागा मध्ये बसण्यासाठी पे चा हर्फ गिरवायला लागतो, म्हणजे तो लघु करायला लागतो. इतकंच नव्हे तर भरोसा मधल्या भ वर बल देऊन तो दीर्घ/गुरुही करायला लागतो. पण गाण्याच्या चालीमध्ये पे लघु नसून गुरु आहे.

----

यापुढे हिंदी चित्रपट संगीत ऐकताना आपले कान काहीसे आणखी तीक्ष्ण झाले असतील अशी आशा करत,

धष्टपुष्ट

कवितालेख