दिवाळी अंक २०२१ : साकारते आहे एक अधुरे स्वप्न

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

मित्रहो, नुकताच वयाच्या सत्तरीत प्रविष्ट झालेलो आहे. जगरहाटीच्या दृष्टीने आता ‘म्हातारपण’ आलेले असले, तरी आपले हिरवेपण जपत काहीतरी शिकत राहण्याच्या प्रयत्नाला आणखी एक वळण मिळत आहे, त्याचा हा आढावा.

लहान वयात सुरू झालेला माझा चित्रकलेचा छंद अजून चालत आलेला आहे. या दीर्घ काळात विविध माध्यमे हाताळत जे प्रयोग केले, त्यातून हळूहळू स्वतःची विशिष्ट शैली विकसित करता येऊन तशी पुष्कळ चित्रे रंगवली, त्यापैकी दोन प्रातिनिधिक चित्रे -

.

1

चित्र १. माध्यम: तैलरंग 33X33 इंच. (‘अलकाझी फाउंडेशन फॉर आर्ट्स’ संग्रहात)

.

2

चित्र २. माध्यम: तैलरंग 33X42 इंच

मात्र हे सगळे करण्यात काहीतरी सुप्त मनात दडलेले, जिव्हाळ्याचे असे करणे राहून गेलेले आहे, अशी हुरहुर गेल्या दोन-तीन वर्षांत प्रबळ होऊ लागली. मग ते नेमके काय, हा विचार करताना लक्षात आले की अगदी तरुण वयात इंदौर, मुंबई आणि बडोद्यातल्या चित्रसंग्रहातली, तसेच लायब्ररीतील पुस्तकांमधून पाश्चात्त्य कलासंग्रहालयातली चित्रे बघून आपण अतिशय भारावून गेलेलो होतो, आणि तशी चित्रे रंगवून त्यांनी आपल्या घराच्या भिंती भरून टाकाव्यात, घराचेच ‘म्युझियम’ बनवावे, असे अतिशय उत्कट स्वप्न आपण उरी बाळगले होते.
१९६७च्या सुमारास इंदौरला लायब्ररीतील पुस्तकांमध्ये बघितलेली काही चित्रे अजूनही आठवतात.

.

3

चित्र ३. शीर्षक: The Blind Girl (1856) चित्रकार - John Everett Millais.

या चित्रातली अंध मुलगी आपल्या बहिणीकडून आकाशातल्या इंद्रधनुष्याचे, आजूबाजूच्या रम्य परिसराचे वर्णन ऐकत आहे. नुकताच पाऊस पडून गेलेला असल्याने हवेतले ताजेपण, गारवा, त्यात उबदार वाटणारे उन्ह, आसमंतात दरवळणारा गवताचा सुगंध, पक्ष्यांचे आवाज, जवळच वाहणाऱ्या झऱ्याची खळखळ हे सगळे अनुभवताना ती उन्मनी स्थितीत गेलेली वाटते. घट्ट गुंफून ठेवलेल्या हातातूनही तिची भावनोत्कटता जाणवते आहे.

या दोघींची फाटकी वस्त्रे, अंध मुलीच्या गळ्यात अडकवलेल्या कागदावरील “PITY THE BLIND” हा मजकूर आणि तिच्याकडे असलेले concertina हे लहानसे वाद्य (- ते वाजवत, गाणी म्हणत दारोदार फिरून त्यांची गुजराण होत असावी का?) यावरून त्यांच्या परिस्थितीची कल्पना येते. या कठीण, प्रतिकूल परिस्थितीतही जपलेली आशा, निरागसता आणि समाधान हे तिच्या चेहऱ्यावरील भावांवरून जसे जाणवते, तसेच ते काळ्या मेघांनी भरलेले आकाश आणि त्यात अवतरलेले सुंदर दुहेरी इंद्रधनुष्य या संकेतातूनही व्यक्त होते. राजेरजवाड्यांची भव्य वैभवशाली चित्रे रंगवण्याच्या त्या काळात असे चित्र रंगवणे हेसुद्धा एक विशेषच.

पाश्चात्त्य संस्कृतीतली एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीची लेखी नोंद करून ठेवणे. उदाहरणार्थ, या चित्रातील निसर्ग इंग्लंडातील Winchelsea (Sussex) या भागातील असून अंध मुलीच्या चित्रणासाठी Mathilda Proudfoot आणि लहान बहिणीसाठी Isabella Nicol या मुलींना मॉडेल म्हणून बसवून हे चित्र रंगवले होते. अंध मुलीने पेहेरलेली वस्त्रे एका वृद्धेकडून दोन दिवसांसाठी उसनी आणून त्याबद्दल तिला एक शिलिंग दिला होता, तसेच मुळात ज्या मुलीवरून या चित्राची कल्पना सुचली होती, ती मुलगी तरुण वयातच मृत्यू पावल्याचीही नोंद चित्रकाराची पत्नी Effie हिने करून ठेवलेली आहे.

.

4

चित्र ४. चित्रकार : Claude Lorrain (1600 - 1682)

.

5

चित्र ५. A Summer Night : (1887) चित्रकार - Albert Joseph Moore

वयाच्या सोळाव्या वर्षी लायब्ररीत बघितलेल्या या चित्रावर मी फारच मोहित झालो होतो. त्यापूर्वी मी फक्त चांदोबा किंवा दिवाळी अंकांमधली चित्रेच काय ती बघितलेली असणार. असली एकाहून एक जबरदस्त चित्रे बघूनच माझा चित्रकार बनण्याचा निश्चय पक्का झाला असावा. पुढल्याच वर्षी मी कलाशाळेत प्रवेश घेतला.
त्या काळी लायब्ररीत बसून या चित्रावरून प्रतिचित्र बनवणे शक्य झाले नव्हते, पण आपण ते वयाच्या सत्तरीत आल्यावर हाती घेऊ, अशी कल्पनाही तेव्हा आली नव्हती.

जगभरातील प्रसिद्ध कला-संग्रहालयांमध्ये असलेली अशा प्रकारची यथार्थदर्शी चित्रे बहुतांश कलारसिकांना अतिशय आवडतात. या चित्रकलेविषयी थोडीशी माहिती करून घेऊ या.
युरोपात ग्रीक-रोमन काळात कळसाला पोहोचलेली यथार्थदर्शी कला युरोपात ख्रिस्ती धर्माचा उदय होऊन त्याचे वर्चस्व वाढल्यावर मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आल्याने पुढील हजारेक वर्षे लुप्त झाली. पुढे चौदा-पंधराव्या शतकात पुन्हा एकदा यथार्थदर्शी कलेची वाटचाल सुरु झाली.
इ.स. १५६३मध्ये फ्लॉरेन्समध्ये स्थापित Accademia e Compagnia delle Arti del Disegno, १६४८ साली पॅरिसमध्ये स्थापित Académie royale de peinture et de sculpture, १७६८ साली इंग्लंडात स्थापित Royal Academy of Arts तसेच जर्मनी, स्पेन, रशिया, आणि इतर युरोपीय देशांमधील विविध संस्थांमधून शिकलेल्या अनेक उत्तमोत्तम कलावंतांनी युरोपचे कलाविश्व समृद्ध केले. या कलेला सर्वसाधारणपणे ‘अ‍ॅकॅडेमिक कला’ असे म्हटले जाते. या पद्धतीच्या कलेचा झालेला चरम विकास Vermeer, Bouguereau, Ingres, Caravaggio, Alexandre Cabanel वगैरेंच्या चित्रांमधून दिसून येतो.

.

6

चित्र ६. “The Art of Painting” डच चित्रकार Johannes Vermeer याचे एक सुप्रसिद्ध चित्र. (१६६६)

तीन वर्षांपूर्वी व्हिएन्नाच्या Kunsthistorisches Museum या संग्रहालयात फिरताना अवचितपणे हे चित्र समोर आल्यावर उन्मनी अवस्थेस पावलो होतो. मग संध्याकाळी बाहेर निघेपर्यंत पुन्हा पुन्हा या चित्रासमोर येऊन उभा राहत होतो. माझ्यामते Vermeer हा यथार्थदर्शी कलेतील सर्वात थोर कलावंत.

.

7

चित्र ७. चित्रकार - ‘त्रिन्दाद मास्तर’ - Antonio Xavier Trindade (1870 - 1935)

युरोपातील थोर कलावंतांच्या तोडीचा माझ्यामते एकमेव भारतीय चित्रकार म्हणजे मुंबईच्या सर जमशेटजी जिजीभाई आर्ट स्कुलात शिकून पुढे १८९८ ते १९२६ या काळात तिथेच शिक्षक असलेले सुप्रसिद्ध ‘त्रिन्दाद मास्तर’.
माझे नशीब एवढे थोर, की त्रिन्दाद यांची बरीच चित्रे एका योगायोगामुळे मला बघायला मिळाली. १९७६च्या सुमारास एकदा मुंबईला गेलेलो असताना माहीम स्टेशनावर उतरून अंदाजाने एका रस्त्यावरून समुद्राच्या दिशेने जाताना अचानक ‘Casa Bianca’ असे बंगल्याचे नाव आणि खाली ‘त्रिन्दाद’ नावाची पाटी दिसली. कोल्हापूरचे माधवराव बागल यांच्या ‘कला आणि कलावंत’ या पुस्तकातून त्रिन्दाद यांची ख्याती मी वाचलेली असली, तरी त्यांचे एकही चित्र तोवर बघायला मिळाले नव्हते. हिंमत करून फाटकातून आत जाऊन दार वाजवल्यावर एका तरुणीने ते उघडले. मी चित्रकला शिकत आहे वगैरे सांगितल्यावर तिने अगत्याने घरात लावलेली सगळी चित्रे दाखवली. मी अगदी थक्कच झालो, मग दर वेळी मुंबईला गेल्यावर तिथे जाऊन मनसोक्त चित्रे बघायचो. (आता ती चित्रे Fundacao Oriente Art Gallery पणजी, गोवा इथे आहेत, असे आत्ताच हा लेख लिहिताना जालावर शोध घेता समजले. आता तिथे जाणे आले)

‘अ‍ॅकॅडेमिक’ कलाशिक्षणात अनेक शतकातून विकसित होत गेलेल्या परंपरेचे महत्त्व असून या शिक्षणक्रमात सुरुवातीला व्हीनस, अपोलो वगैरे ग्रीक/रोमन मूर्तींवरून रेखाटन आणि शेडिंगचा अभ्यास तसेच स्थिरवस्तुचित्रण, व्यक्तिचित्रण वगैरेंच्या सरावातून हळूहळू चित्रकला साध्य करायची असते. चित्र रंगवताना सर्वात आधी रेखाटन अचूक होणे आवश्यक असते. त्यानंतर प्रमाणबद्धता, तोल, पर्स्पेक्टिव्ह, छाया-प्रकाश वगैरेंच्या मर्यादा सांभाळत, विविध रंगांच्या मिश्रणातून नेमक्या रंगच्छटा तयार करून योग्य त्या आकारांचे ब्रश वापरत मूळ रेखाचित्र हरवू न देता अनेक थरांमध्ये काम करत करत शेवटी हवा तो प्रभाव निर्माण करणे हे दीर्घ प्रयत्नातूनच साध्य होत असते.
भारतात ब्रिटिश सरकारने मद्रास - कलकत्यात १८५४ आणि मुंबईत १८५७ साली या पद्धतीने शिकवणारी स्कूल ऑफ आर्ट सुरू केली. तत्पश्चात भारतातील विविध राजघराण्यांनी आपापल्या संस्थानात सुरु केलेल्या कला शाळांपैकी इंदौरचे महाराज तुकोजीराव होळकर यांच्या प्रेरणेने १९२७ साली चित्रकार दत्तात्रय दामोदर देवळालीकर यांनी स्थापित केलेल्या संस्थेत माझे कलाशिक्षण झाले.

पुढे दिल्लीतले एक मोठे राष्ट्रीय म्यूझियम उभारण्यात सिंहाचा वाटा उचलण्याची संधी मला मिळाली (अलीकडे हे सहा मजली म्यूझियम आग लागून संपूर्णपणे नष्ट झाले) तसेच युरोप-अमेरिकेतली अनेक प्रख्यात म्युझियमे बघितली, त्यावर लेख लिहिले, तरी ‘घराचे म्युझियम’ बनवण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले होते.

हे स्वप्न अधुरे राहण्याचे कारण काय, तर १९६८ सालचा एक प्रसंग. त्या दिवशी आपली काही चित्रे घेऊन इंदौरच्या चित्रशाळेचे प्राचार्य मनोहर किरकिरे यांना भेटलो होतो. ही चित्रे मी चांदोबा वगैरेतील चित्रांवरून काढलेली होती.
चित्रे बघून किरकिरे मास्तर म्हणाले की "तुमचा हात चांगला आहे. उद्यापासून शिकायला या, मात्र आता यापुढे अशी दुसऱ्यांची चित्रे किंवा फोटो वगैरे बघून चित्रे काढायची नाहीत. इथे आम्ही तुम्हाला जे शिकवू ते मन लावून शिकायचे." मग काय, माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही आणि मी शाळेत दाखल झालो. तिथे समोर मांडलेल्या वस्तू, बसलेल्या व्यक्ती वगैरे प्रत्यक्ष बघून अभ्यास करायचा असे. (त्या काळातील विविध आठवणींवर असलेला लेख इथे वाचता येईल)....दुवा: दुवा

किरकिरे सर हे जुन्या पिढीतले उत्कृष्ट चित्रकार होते. समोरचे दृश्य हुबेहुब रंगवण्यात त्यांचा हातखंडा होता आणि विद्यार्थ्यांनी ती कला मनःपूर्वक अभ्यास करून आत्मसात करावी, अशी त्यांची तळमळ असे. ते प्राचार्य होते, तोवर त्यांनी शाळेतले ग्रंथसंग्रहालय कुलूपबंद करून ठेवलेले होते. पुस्तके बघून विद्यार्थी आपल्या कामापासून भरकटत जातात, असे त्यांचे मत होते.
किरकिरे सर निवृत्त झाल्यावर प्राचार्य बनलेल्या चंद्रेश सक्सेना सरांचा कल काहीसा आधुनिकतेकडे झुकणारा होता. आधुनिक कलेचा पितामह Paul Cezanne हा त्यांचा आवडता फ्रेंच चित्रकार. विद्यार्थ्यांनी पुस्तकातून विविध प्रकारची चित्रे बघावीत, दिल्ली-मुंबईला जाऊन मोठमोठी प्रदर्शने बघावीत, काहीतरी वेगळे प्रयोग करावेत, असे त्यांचे सांगणे असे. त्यांनी आल्याआल्या शाळेची लायब्ररी खुली करून आम्हाला खास लायब्ररीत बसण्यासाठी काही तास नेमून दिले आणि आमच्यासमोर जागतिक कलेचे विशाल दालन खुले केले.

मात्र चित्रांवरून/फोटोवरून चित्रे काढायची नाहीत हा दंडक पाळण्यापायी आपण आपल्या दिवंगत आई-वडिलांची, पत्नी, मुले-नातवंडे वगैरेंची व्यक्तिचित्रे कधी रंगवली नाहीत, भटकंतीत बघितलेल्या अनेक अद्भुत जागांची रेखाचित्रे जरी बनवली असली, तरी मोठी तैलचित्रे रंगवली नाहीत, या दंडकामुळे स्वतःची एकमेवाद्वितीय अशी चित्रशैली विकसित करणे जमले, पण त्याबरोबरच यथार्थदर्शी चित्रणाच्या अभ्यासाला पडलेल्या मर्यादा ही आपल्या जीवनातली एक मोठीच कमतरता असल्याचे अलीकडे माझ्या लक्षात आले.

पाश्चात्त्य कलेतील रथी-महारथी त्यांच्या समृद्ध कलापरंपरेतून शिकत, जुन्या चित्रांचा बारकाईने अभ्यास, नकला करत महान झाले, हे आठवून आता आपण स्वतःवर घातलेला निर्बंध सोडून देऊन थोर कलावंतांची चित्रे आणि अन्य संदर्भ यावरूनही ‘म्युझियमसारखी’ चित्रे रंगवून त्यांच्या सतत सानिध्यात राहावे आणि आपले अधुरे राहिलेले स्वप्न आता तरी पूर्ण करायला घ्यावे, असे वाटले. तब्येत, विशेषतः दृष्टी ठीकठाक आणि हात स्थिर असेपावेतोच ते करणे शक्य असल्याने आता वेळ न घालवता कामाला लागले पाहिजे, हे प्रकर्षाने जाणवले. यासाठी जे प्रयत्न मी सुरू केलेले आहेत, त्यापैकी काही चित्रे खाली देतो आहे.

… अर्थात माझा हा उद्योग म्हणजे थोर चित्रकारांच्या वैभवशाली ‘इंद्राच्या ऐरावता’मागून फरपटत जाणारी माझी ‘श्यामभटाची तट्टाणी’ आहे, याची मला कल्पना आहे. ही सगळी चित्रे उर्वरित आयुष्यात माझ्याजवळच राहाणार असल्याने अधूनमधून सुचेल तसे सगळ्या चित्रांमध्ये सुधारणा करता येतील. त्या दृष्टीने ही सगळी चित्रे अपूर्ण आहेत असे म्हणता येईल.

.

8
चित्र ८. १९६७ साली इंदौरच्या जनरल लायब्ररीतील एका पुस्तकात 'A Summer night' हे चित्र बघितले, तेव्हापासून ते दीर्घकाळ माझ्या मनात घर करून होते. चित्रकाराचे नाव विसरलो असलो, तरी चित्राचे शीर्षक लक्षात राहिलेले होते. अलीकडे जालावर शोध घेता ते सापडल्यावर अतिशय आनंद झाला. मग त्यातली एक आकृती घेऊन हे चित्र करायला घेतले. ‘म्युझियमासारखी चित्रे’ रंगवण्याच्या माझ्या प्रयत्नातले हे पहिले चित्र. (या चित्राला साजेशी फ्रेम एका पुराणवस्तूंच्या दुकानात मिळाली).

चित्रावरून प्रतिचित्र करण्याचा हा माझा गेल्या पन्नास वर्षांतला पहिलाच प्रयत्न असल्याने आपल्याला हे जमेल की नाही याविषयी मी साशंकच होतो, पण २५-३० टक्के गुण मिळण्याइतपत तरी जमले असे वाटून उत्साह आला. आता संपूर्ण चित्रदेखील करायला घ्यावे असे वाटत आहे.

.

9
चित्र ९. तैलरंग, 22x23 इंच.

काही वर्षांपूर्वी फ्रान्समधील ‘लुआ’ (Loire) नदीच्या काठी फिरताना पलीकडल्या काठावर एक सुंदर प्रासाद दिसला होता. त्या वेळी पटकन एक रेखाचित्र बनवले होते. त्याबरोबरच काही अन्य संदर्भाच्या साहाय्याने हे चित्र रंगवत आहे.
त्या परिसरात असलेल्या, लिओनार्दो दा विंची त्याच्या जीवनाची अंतिम वर्षे (१५१६-१५१९) जिथे राहत होता, त्या Château du Clos Lucé या प्रासादात फिरतानाच माझ्या (अद्याप अधुऱ्या) ‘मोनालिसाच्या गूढस्मिताची विलक्षण रहस्यकथा’ या कथामालेची कल्पना मला सुचली होती.
दुवा: मोनालिसाच्या गूढस्मिताची विलक्षण रहस्यकथा
43438

.

10

चित्र १०. इंदौरच्या लायब्ररीतील पुस्तकात Lord Frederic Leighton (१८३०-९६) याचे चार ग्रीक स्त्रिया समुद्रकाठी शिंपले/दगड वेचत आहेत, असे एक चित्रही मला तेव्हा फार आवडले होते. इच्छा असूनही त्या काळी काढायच्या राहून गेलेल्या या चित्रातील स्त्रियांपैकी एकीचे हे चित्र (काही बदल करून) सध्या रंगवत आहे.

.

11

चित्र ११. Claude Lorrain (१६००-१६८२) हा माझा अत्यंत आवडता चित्रकार. लूव्र म्युझियममध्ये शिरलो की सर्वात आधी मी त्याच्या दालनात जातो. याच्या चित्रांमधून पुढील काळातील युरोपियन निसर्गचित्रकारांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली. इंग्लंडातील अनेक धनिकांच्या विस्तीर्ण इस्टेटींची आखणी याच्या चित्राबरहुकूम करण्यात आली होती म्हणे. त्याच्या भव्य चित्रांच्या अनुकृती बनवणे ही माझी एक अवघड अशी महत्त्वाकांक्षा अजूनही आहे. त्याची सुरुवात एका लहानशा चित्रापासून केलेली आहे, ते हे चित्र.

.

12

चित्र १२ . ‘पाठमोरी’ तैलचित्र 30 x 18 इंच.
Jean-Auguste-Dominique Ingres (1780-1867) हा एकोणिसाव्या शतकातील आघाडीचा फ्रेंच चित्रकार. 1808 साली रोममधील फ्रेंच अ‍ॅकॅडेमीत PRIX DE ROME नामक शिष्यवृत्ती घेऊन शिकत असताना रंगवलेल्या चित्रावरून केलेले माझे अभ्यासचित्र.
फ्रान्सचा सुप्रसिद्ध राजा लुई चौदावा याने 1666 साली सुरू केलेली (आणि 1968पर्यंत चालत आलेली) ही शिष्यवृत्ती अतिशय सन्मानजनक असून अनेक चित्रकारांना तिचा अपरिमित लाभ झाला होता.

.

13

चित्र १३. फ्रेंच आल्प्समधील एक खेडेगाव. अनेकदा वेगवेगळे बदल करत, रंगांचे थरावर थर चढवत हे चित्र रंगवण्याचा महिनाभराचा अनुभव फार आनंददायक होता.

.

14

चित्र १४. इटलीतील एक प्राचीन गाव. तैलरंग.

काही कौटुंबिक व्यक्तिचित्रे:
.

15

चित्र १५. वडिलांचे व्यक्तिचित्र (1896-1978)

.

16

चित्र १६. मुलगा, सून, नातवंडे.

.

17

चित्र १७. नात.

.

18

चित्र १८. सौ. चित्रगुप्त.

.

19

चित्र १९. सतराव्या शतकातील वेशभूषेत अस्मादिक.

.

20

चित्र २०. ‘सिंदाबादची अग्निद्वीपाची सफर’ (तैलरंग 16 X 20 इंच)
बालपणीच्या काळातील मर्मबंधातली ठेव म्हणजे ‘चांदोबा’ आणि (विष्णुशास्त्री आणि कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी भाषांतरित केलेले -) ‘अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी’. याविषयीसुद्धा काहीतरी करायचे मनात आहे. सुरुवात म्हणून वरील काल्पनिक चित्रे रंगवतो आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रांसमधील ‘प्रभाववादी’ (Impressionist) चित्रकार Monet, Renoir, Pissarro,Sisley तसेच उत्तरप्रभाववादी चित्रकार Van Gogh, Paul Cezanne, Gaugin, Valloton, Paul Sérusier वगैरेंनी यथार्थदर्शी कलेशी फारकत घेऊन काम करणे सुरू केले. त्यांची चित्रेदेखील मला अतिशय प्रिय आहेत. तशी चित्रे रंगवताना खूप मुक्तपणे काम करता येते, त्यातली मजा काही औरच असते. तेही आता सुरु करायचे आहे.

माझी एक आंतरिक गरज असलेल्या या उद्योगातून आनंदाबरोबरच खूप काही शिकायला मिळेल आणि आपले अधुरे स्वप्न पूर्ण होत असल्याचे समाधानही लाभेल, अशी आशा आहे. (याविषयी अन्य चित्रकार, समीक्षक वगैरे विद्वान मंडळींचे काय मत आहे वगैरे गोष्टींचे महत्त्व माझ्यालेखी शून्य आहे)

.

21

चित्र २१. शेवटी एक जुने चित्र देऊन या लेखाचा समारोप करतो. हे चित्र 1968 साली किरकिरे सरांना दाखवायला नेलेल्या चित्रांपैकी एक असून इंदौरच्या ‘जनरल लायब्ररी’त बसून १९४०च्या दशकातल्या मासिकातील एका चित्रावरून काढले होते. तेव्हा माझ्याकडे चार-सहा पोस्टर कलरच्या बाटल्या आणि दोन-तीन ब्रश एवढेच चित्रसाहित्य असायचे. खरे तर तेव्हाच आणखी एकदा हे चित्र जास्त अचूकपणे चितारायचे होते, पण ते राहून गेले. पुढे अनेक वर्षांनंतर त्या लायब्ररीची पडझड होऊन चित्रकलेची पुस्तके ठेवलेली काचेची कपाटे ढिगाऱ्याखाली गेलेली बघून फार व्यथित झालो होतो… हे चित्र एवढ्या वर्षांनंतर आता पुन्हा एकदा व्यवस्थितपणे तैलरंगात रंगवावे, आणि आयुष्यातले एक अधूरे वर्तुळही पूर्ण करावे, अशी इच्छा आहे.

.

22

चित्र २२. आजी-आजोबांचा सहवास आणि चित्रे रंगवताना प्रत्यक्ष बघणे...
मला आपल्या बालपणी जे मिळाले नाही (माझे दोन्हीकडले आजी-आजोबा त्यांची मुले लहान असतानाच देवाघरी गेले) ते आपल्या नातवंडांना भरभरून मिळावे, ही इच्छा…

दिवाळी अंकात काही लिहिण्यासाठी खास निमंत्रण देण्याबद्दल मिपा प्रशासनाचे आणि संपादक मंडळाचे अनेक आभार. या लेखाच्या निमित्ताने मला आपल्या कला-यात्रेचा आढावा घेता आला, जुन्या आठवणीत आणि विविध कलावंतांच्या चित्रांमध्ये पुन्हा एकदा रमता आले.

क्रमशः (आगामी चित्रांसाठी)
कला आणि कलासंग्रहालये याबद्दलच्या माझ्या काही लेखांचे दुवे:

१. चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म (भाग १)

२. कला, कलावंत आणि आपण : जाणिजे चित्रकर्म (भाग २)

३. संग्रहालायातील कलाकृती आणि त्यांचे विविध विषय

४. एका तैल-चित्राची जन्मकथा (भाग २ -संपूर्ण)

५. चांदबीबी आणि मादाम पोंपादूर : भारतीय आणि पाश्चात्त्य कलेतील भेद

६. (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी

७. पॅरिस भ्रमंती: वैभवशाली प्रासाद, संग्रहालये आणि कलाकृती (भाग १: फॉन्तेनब्लो)

८. चित्रानुभूतीत जगण्याची धुंदी ... (नवीन) - रेखाचित्रांसह

९. नयन वळविता सहज कुठेतरी - काही चित्रस्मृती

१०. श्रीगणेश लेखमाला २०२० - माळवा परिसर : काही आठवणी, काही चित्रे

११. महाभारताविषयी आठ लेखः अजब महाभारत

इतर काही उपयुक्त (यूट्यूब) दुवे :
The 100 Best Paintings by Painters posted in 2016

Isaac Levitan: A collection of 437 paintings (HD)

Camille Pissarro: A collection of 978 paintings (HD)

Camille Corot: A collection of 489 paintings (HD)

Caravaggio: A collection of 79 paintings (HD)

William Turner: A collection of 1530 paintings (HD)

प्रतिक्रिया

श्वेता व्यास's picture

2 Nov 2021 - 5:12 pm | श्वेता व्यास

तुम्ही काढलेली सर्वच चित्रे अप्रतिम !

चित्रगुप्त's picture

2 Nov 2021 - 10:48 pm | चित्रगुप्त

अनेक आभार.

श्वेता२४'s picture

2 Nov 2021 - 5:19 pm | श्वेता२४

.

चित्रगुप्त's picture

2 Nov 2021 - 10:50 pm | चित्रगुप्त

चित्रे आवडली हे वाचून समाधान वाटले. आभार.

चौथा कोनाडा's picture

2 Nov 2021 - 5:31 pm | चौथा कोनाडा

सिद्धहस्त चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरलेल्या अप्रतिम कलाकृती, आणि नेहमी प्रमाणेच सिद्धहस्त लेखन !
माझा आ गया चित्रगुप्तजी !

चित्रगुप्त's picture

2 Nov 2021 - 10:51 pm | चित्रगुप्त

चित्रकला आणि लेखन दोन्ही आवडले, छान वाटले. अनेक आभार.

चित्रांच्या माध्यमातून एखादा विषय खुलवणे चांगले जमते तुम्हाला. समर्पक चित्रे असतात.

हा लेख तुमची ओळख चित्रांच्या माध्यमातून करून देणारा आहे.

त्यातील तुमची चित्रेही छान आहेत.

'चित्रांच्या माध्यमातून चित्रकाराची ओळख' ही कल्पना खूप आवडली. या दृष्टीने विचार करून आणखी काही लेखन करता येईल. काही चित्रकारांचे (उदहरणार्थ व्हॅन गॉग - ) सम्पूर्ण जीवन त्याच्या चित्रातून उलगडत जाते. अनेक आभार.

कंजूस's picture

2 Nov 2021 - 8:04 pm | कंजूस

चित्रांंतील उजेड, भाव आणि डोळे अप्रतिम. पुन्हा पुन्हा वाचत आहे.

@कंजूसः लेखात पुन्हा पुन्हा वाचण्याजोगे काही आहे, हे वाचून समाधान वाटले. अनेक आभार.

अप्रतिम चित्रे आणि सुंदर लेख. मागील ऑनलाईन मिपा कट्टा झाला तेव्हा ह्यातील काही चित्रे तुम्ही दाखवली होती त्याची आठवण झाली

चित्रगुप्त's picture

4 Nov 2021 - 11:58 am | चित्रगुप्त

@सरनौबतः बरोबर. ऑनलाईन मिपा कट्ट्यात मी साधारणपणे हाच विषय मांडला होता, आणि त्यावर लेख लिहावा असे तेंव्हा वाटले होते. दिवाळी अंकाच्या निमित्ताने ते लवकरच झाले.

सौंदाळा's picture

3 Nov 2021 - 6:20 pm | सौंदाळा

अप्रतिम
तुम्ही पुर्वी पण तुमच्या गुरुजनांनी सांगितल्यामुळे चित्रावरुन चित्र किंवा माणसांची चित्र काढत नाही असे लिहिल्याचे आठवत आहे.
आता ही चित्रे काढायचा निर्णय घेतलेला बघून आनंद झाला आणि चित्रे बघून 'देरसे आये पर दुरुस्त आये' असे वाटले.
काका, खरंच डोळयांचे पारणे फिटले.
कलाकार लोकांचा नेहमी हेवा वाटतो आणि आपणपण काहीतरी करायला पाहिजे असे वाटत राहाते. असो

@सौंदाळा: देरसे आये ... अगदी अगदी. तसा जरा उशीरच झालेला आहे, कारण विविध थोर कलावंतांनी आपापले संपूर्ण आयुष्य जे शिकण्यात आणि ज्या प्रकारची कलानिर्मिती करण्यात व्यतीत केले, ते आता सत्तरीत आल्यावर साधण्याइतका वेळ माझ्याकडे उरलेला नाही. हा प्रयत्न करताना आपण त्यांचासमोर 'किस झाड की पत्ती' आहोत हे जाणवत रहाते. तरीपण प्रयत्न करण्यातले समाधान लाभते हेही नसे थोडके.
दुसरे म्हणजे अश्या प्रकारे चित्रांवरून प्रतिचित्रे बनवण्याच्या प्रयत्नातून मूळ चित्रकारांची थोरवी कळून येते, चित्रांमधले आजवर न जाणवलेले मर्म उलगडू लागते आणि त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होतो.
मी नुक्ताच पॅरिसला आलेलो आहे. अजून एकाही संग्रहालयात जाणे झालेले नाही पण आता तीच चित्रे पुन्हा नव्या दृष्टीकोणातून बघायला कसे वाटते याबद्दल खूप उत्सुकता दाटून आलेली आहे
'थंडीतले पॅरिस' अशी लेखमाला सुरु करून येत्या दोन-अडीच महिन्यात करणार असलेल्या भ्रमंतीबद्दल लिहावे असा विचार आहे.
प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

चौथा कोनाडा's picture

10 Nov 2021 - 1:29 pm | चौथा कोनाडा

'थंडीतले पॅरिस' अशी लेखमाला सुरु करून येत्या दोन-अडीच महिन्यात करणार असलेल्या भ्रमंतीबद्दल लिहावे असा विचार आहे.

या लेखमाले बद्दल खुपच उत्सुकता.
येऊ द्या लवकरात लवकर !

कुमार१'s picture

3 Nov 2021 - 6:30 pm | कुमार१

तुम्ही काढलेली सर्वच चित्रे अप्रतिम !

चित्रगुप्त's picture

4 Nov 2021 - 12:18 pm | चित्रगुप्त

@कुमार१: दर्दी रसिकांची दाद मिळणे, यापरते आणखी काय हवे ? अनेक आभार.

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 6:49 pm | मुक्त विहारि

शेवटचा फोटो जास्त आवडला

नातवंडे आणि आजोबा,

सध्या नातवंडांना काही कळो ना कळो, पण अगदी लहानपणापासून कलेचे असे प्रत्यक्ष संस्कार मिळाल्याने त्यांच्या पुढील आयुष्यात कला, सृजनशीलता, सात्विक करमणूक आणि आनंद यांना नक्कीच स्थान राहील याची मला खात्री वाटते आणि ते बघायला आपण बहुधा हयात नसू, या विचाराने थोडी उदासीपण येते.
कौतुकाबद्दल अनेक आभार.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Nov 2021 - 7:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुमचे लेख म्हणजे एक नयनरम्य वाचनानुभव असतो, हा लेखही निराश करत नाही,

तुम्ही काढलेल्या चित्रात काय आहे ते माहीत नाही पण त्या कडे नुसते बघत बसावेसे वाटते, आणि त्या नंतर कितीतरी वेळ ती डोळ्या समोरून आणि डोक्यातून जात नाहीत

पैजारबुवा,

तुम्ही काढलेल्या चित्रात काय आहे ते माहीत नाही पण त्या कडे नुसते बघत बसावेसे वाटते, आणि त्या नंतर कितीतरी वेळ ती डोळ्या समोरून आणि डोक्यातून जात नाहीत

मला आदर्शवत वाटणार्‍या थोर कलाकृतींचा हा गुण तुम्हाला माझ्या चित्रात जाणवला, हे वाचून खूप समाधान आणि धन्य धन्य वाटले. अनेक आभार.

स्मिता.'s picture

12 Nov 2021 - 3:37 pm | स्मिता.

काकांचे लेख वाचणे ही एक पर्वणीच असते. खूप नवनवीन काहीतरी कळत जातं आणि तुमच्यासहीत निरनिराळ्या चित्रकारांची चित्रं बघून नेत्रसुखही मिळतं.
तुम्ही काढलेली निसर्गचित्रे आणि व्यक्तिचित्रे खूपच छान! काकूंचे चित्र विशेष आवडले.

चित्रगुप्त's picture

14 Nov 2021 - 1:44 am | चित्रगुप्त

@ स्मिता. आता तुमची लंडनातली सगळी संग्रहालये बघून झाली असतील असे वाटते. त्याबद्दल एकादा तरी लेख अवश्य लिहावा. मला अजूनपर्यंत तो योग आलेला नाही पण उत्सुकता खूप आहे.
चित्रे आणि लेख आवडले हे छानच.

मदनबाण's picture

3 Nov 2021 - 7:33 pm | मदनबाण

मस्त !

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Nov 2021 - 11:47 pm | अमरेंद्र बाहुबली

खुप छन लेख काका.

चित्रगुप्त's picture

6 Nov 2021 - 12:30 am | चित्रगुप्त

@ मदनबाण, अमरेंद्र, तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल अनेक आभार.

आपल्या सादरीकरणाची उत्सुकतेने वाट बघत असणाऱ्या मिपाकरांपैकी मी एक आहे.
पाश्चात्य संगीत, चित्रकला, वैचारिक लेखन यावर आपल्या देशावर राज्य केले या आकसापोटी हेटाळणीयुक्त वर्तन किंवा मानणे हे असंस्कृतपणाचे आहे, याची जाणीव चित्रगुप्त आपल्या कुंचल्यातून वेळोवेळी लिहून सादर करतात. नातवंडांच्या समावेत बसून आपल्या कलाकारीची अतृप्त भावना ते सांगतात ते माझ्या सारख्या सामान्य वाचकाला फार भावते.

माझ्या लेखांची उत्सुकतेने वाट बघत असणाऱ्या मिपाकरांपैकी आपण एक आहात हे वाचून आणखी लिहीण्यासाठी ऊर्जा मिळाली.
कलेत रमणार्‍यांना पाश्चात्य काय किंवा आणखी कोणते काय, सगळे नवे-जुने कलावंत आपल्यातलेच वाटतात. भारतात इंग्रजांनी तिकडल्या पद्धतीने शिकवणार्‍या कला-शाळा स्थापित केल्याने त्यातून शिकणारांना सहाजीकच पाश्चात्य चित्रकला जवळची वाटू लागली. त्यातून संग्रहालयांमधे रमण्याच्या माझ्या छंदातून ती आवड अधिकच गहिरी झाली.
प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

खूप सुंदर चित्रे आणि तितकाच सुंदर लेख.

प्रचेतस's picture

4 Nov 2021 - 6:19 am | प्रचेतस

तुमचे लेख वाचणे आणि चित्रांच्या सफरीत हरवून जाणे ही एक पर्वणी असते.
माझ्यासारख्या चित्र अडाण्यांना चित्रकलेची सहजसुंदर ओळख तुमच्या लेखांमधून होते.

तुम्ही काढलेली सर्वच चित्रे आवडली. सुरेख एकदम.

चौकस२१२'s picture

4 Nov 2021 - 8:31 am | चौकस२१२

चित्रगुप्त कुतूहल म्हणून विचारतो , आपण कार्य कोणत्या क्षेत्रात केलेत? अभियंता ( सिविल) आर्किटेक्त्त ? आणि त्या कार्य आपल्या या गुणांचा उपयोग झाला का ?

@ चौकस २१२: माझे कार्य-क्षेत्र हे कलेसंबंधीच होते. त्या दृष्टीने मी भाग्यवानच ठरलो असे म्हणता येईल. तसे १९६९-७१ ही दोन वर्षे मी इंजिनियरिंग कॉलेजातही गेलो होतो पण ते सोडून दिले.
तुम्ही कुतुहल म्हणून हा प्रश्न विचारलात हे खूप चांगले केले कारण कलेतून माझा जन्मभर चरितार्थ कसा चालला, त्या त्या काळी एकंदरित वातावरण कसे होते, सुरुवातीपासून मी काय काय केले, कोणकोणते टक्के-टोणपे खाल्ले, आशा-निराशेचे काळ कसे आले-गेले, दिल्ली आणि मुंबईतील आर्ट गॅलर्‍यावाल्यांबद्दल बरेवाईट अनुभव, चित्रप्रदर्शने, हे सगळे लिहायला घेतले तर तो एक मनोरंजक लेख होईल, विसरून गेलेल्या अनेक गोष्टी हा आढावा घेताना मला आठवत जातील. तेंव्हा आता पुढील लेख यबद्दलच लिहावा असे वाटते आहे.
अनेक आभार.

अनिंद्य's picture

12 Nov 2021 - 12:04 pm | अनिंद्य

.... समग्र आढावा ...

@ चित्रगुप्त,

फक्त एक लेख नको, जीवनानुभव- कालानुभव असे दीर्घ आत्मकथन लिहावे अशी आग्रहाची मागणी करतो.

तुमच्याच शहरात असतो तर ह्या कामासाठी लेखनिक म्हणून काम करायला एका हातावर, सॉरी एका पायावर तयार झालो असतो मी :-)

जीवनानुभव- कालानुभव असे दीर्घ आत्मकथन लिहिण्याचा विचार आहेच, आणि यापूर्वी याविषयीचे दोन लेख मिपावर आलेले आहेतच. (या लेखाच्या शेवटी दिलेले दुवे )
पण का कुणास ठाउक, मला जसे इंदुरात घालवलेल्या १९५१-१९७७ या काळाबद्दल जशी आत्मियता (आणि त्याबद्दल भरभरून लिहावेसे-) वाटते, तशी दिल्लीतल्या १९७७ पासून आजतागायतच्या मुक्कामाबद्दल कधीच वाटलेली नाही. दिल्लीविषयी आपलेपण कधीच वाटले नाही आणि तिथल्या सुरुवातीच्या क्लेशदायक जीवनातल्या आठवणीपण नकोश्या वाटतात. अजूनही त्याविषयी निर्लिप्तपण आलेले नाही. त्यामुळे बघूया केंव्हा लिहावेसे वाटते ते.

किरण कुमार's picture

4 Nov 2021 - 8:43 am | किरण कुमार

सर्व चित्रे सुरेख आणि अस्सल जिवंतपणा आहे चित्रात.

चित्रगुप्तांचे लेख म्हणजे डोळ्यांसाठी मेजवानी असते. हा लेखही तसाच नयनमनोहर झालाय.

-(चित्रकलेचं अंग नसल्याने हळहळणारा) सोकाजी

श्रीरंग_जोशी's picture

5 Nov 2021 - 2:11 am | श्रीरंग_जोशी

जगप्रसिद्ध चित्रांवरचे तुमचे भाष्य, तुमच्या कुंचल्यातून अवतरलेली एकाहून एक चित्रे व तुमचे अनुभवकथन अन नातवंडांबरोबरचा फोटो व शेवटची संदर्भसूची या सर्वांच्या संयोगाने हा लेख अप्रतिम झाला आहे.

काही महिन्यांपूर्वीच्या ऑनलाइन मिपा कट्ट्याच्या रेकॉर्डेड व्हिडिओमधे पण या लेखातली काही चित्रे व तुमचे त्यावरचे भाष्य उपलब्ध आहे.

अभिजीत अवलिया's picture

5 Nov 2021 - 10:00 am | अभिजीत अवलिया

नेहमीप्रमाणे अप्रतिम चित्रे. लेख फारच आवडला.

चित्रगुप्त's picture

10 Nov 2021 - 12:46 am | चित्रगुप्त

@शलभ, प्रचेतस, किरणकुमार, सोत्री, श्रीरंग जोशी, अभिजीत अवलिया, आपल्या कौतुकाबद्दल अनेक आभार.

प्रसाद गोडबोले's picture

5 Nov 2021 - 12:29 pm | प्रसाद गोडबोले

सर्व चित्रे पाहुन खुप भारी वाटलं !

याविषयी अन्य चित्रकार, समीक्षक वगैरे विद्वान मंडळींचे काय मत आहे वगैरे गोष्टींचे महत्त्व माझ्यालेखी शून्य आहे

आणि हे एक वाक्य विशेष आवडलं ! आपण आपल्या आनंदासाठी करयाचं बस्स ! आमच्या क्षेत्रातील, एका महान गणितज्ञाचे हे वाक्य आठवले - "Exposition, criticism, appreciation, is work for second-rate minds. - G. H. Hardy "
हे सगळ स्वान्तःसुखाय आहे , आपलं आपल्या आनंदासाठी ! कलेसाठी कला बस्स !!

प्रदीर्घ लेख आणि चित्रे शेयर केल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद !!

मार्कस ऑरेलियस, तुमच्या तीक्ष्ण नजरेनं या लेखातलं एक वाक्य नेमकं टिपलं आहे.
माझ्या एवढ्या वर्षांच्या अनुभवातून मी हे शिकलो की कलानिर्मितीच्या प्रक्रियेत 'रमून जाणे' तसेच त्यातून लाभणारे कौशल्य, ज्ञान, सौंदर्यानुभूति आणि काहीतरी सार्थक असे करण्यातले समाधान हेच महत्वाचे असते. (आनंद नेहमी मिळतोच असे नाही. बरेचदा निराशाही हाती लागते)
बाकी इतर लोकांकडून मिळू शकणार्‍या गोष्टी म्हणजे अळवावरचे पाणी असते.
G. H. Hardy यांचे वाक्य मननीय.

तुमच्या या चित्र लेखामुळे दिवाळी अंकाला चार चांद लागले:)

सुधीर कांदळकर's picture

6 Nov 2021 - 6:33 am | सुधीर कांदळकर

नितांतसुंदर चित्रे आणि सुरेख लेखन. चित्रातले फारसे कळत नसल्यामुळे तपशीलवार प्रतिसाद देता येत नाही. पण लेख मस्त.

ते ४ क्रचे चित्र जलरंगातले आहे की कसे?

असो. छान लेख, धन्यवाद.

क्र. ४ चे चित्र जलरंगातले नसून तैलरंगातलेच आहे. मात्र मला मिळालेली ही प्रतिमा बहुतेक कुणीतरी पुस्तकातील छापील फोटोवरून घेतलेली असू शकते, त्यामुळे ते जलरंगातले वाटत असेल.
माझी चित्रे आणि लेखन आवडल्याचे वाचून समाधान वाटले. अनेक आभार.

श्रीगुरुजी's picture

6 Nov 2021 - 3:10 pm | श्रीगुरुजी

तुमची चित्रे अप्रतिम आहेत. तुम्ही काढलेल्या नातीच्या चित्राला प्रथम क्रमांक! (मला चित्रकलेची शून्य माहिती व शून्य समज आहे).

चित्रगुप्त's picture

10 Nov 2021 - 1:36 am | चित्रगुप्त

@ पियुशा, श्रीगुरुजी, कौतुकाबद्दल अनेक आभार.

नमस्कार चित्रगुप्तजी.
दिवाळी अंक प्रकाशित झाल्यानन्तर पहिला लेख आपलाच वाचला. अप्रतिम चित्रे आणि त्याबरोबरच आपले प्रामाणिक शब्दकथन पाहून/वाचून काय प्रतिसाद द्यावा कळेना. त्यामुळे पुन्हा लेख वाचून काढला आणि सर्व चित्रे पुन्हा डोळ्याखालून घातली.
पाश्चात्यांची वास्तवदर्शी चित्रे मलाही पहायला खूप आवडतात. पद्धतशिरपणे कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करावा आणि सादर करावे ते पाश्चात्यांनीच. आपल्याकडे प्राचीन मंदिरांवर असलेली अप्रतिम शिल्पे, वेरूळ अजिंठा मधील भित्तीचित्रे , आपलयाकडेही वास्तव दर्शी कलाकृती चितरणारे कलाकार होते हे दर्शवतात. नन्तर ती कला लुप्त झाली. आम्ही इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती संभाजी, पहिला बाजीराव, किंवा महादजी शिंदे किंवा अजून काही ऐतिहासिक पुरुषांची त्यावेळच्या चित्रकारांनी काढलेली चित्रे पहायचो पण ते काही बरोबर वाटायचे नाही. म्हणजे डोळे खूप मोठे, ते पण एकाच साईडने, दंड एकदम काटकुळे असं सगळं डिसप्रपोरशनेट काढलेले. त्यामुळे हिरमोड व्हायचा. एव्हढे पराक्रमी वीर शरीरयष्टीने असे किरकोळ कसे असतील हा प्रश्न पडायचा.
आपली अधुरी राहिलेली इच्छा पूर्ण होवो ही सदिच्छा. आम्हाला आपल्या भरपूर अप्रतिम कलाकृती पहायला मिळोत. आपण काढलेली कौटुंबिक चित्रे, निसर्ग चित्रे खूप आवडली. आपल्या छंदातून आम्हासही प्रेरणा मिळते.
दिवाळीत अप्रतिम मेजवानीबद्दल खूप खूप आभार !!

@बबन तांबे: माझा लेख तुम्हाला 'दिवाळीत अप्रतिम मेजवानी' वाटली हे वाचून समाधान वाटले.

ऐतिहासिक पुरुषांची त्यावेळच्या चित्रकारांनी काढलेली चित्रे पहायचो पण ते काही बरोबर वाटायचे नाही. म्हणजे डोळे खूप मोठे, ते पण एकाच साईडने, दंड एकदम काटकुळे असं सगळं डिसप्रपोरशनेट काढलेले.

चांदोबातील चित्रांनी जशी मनावर अमिट छाप सोडली, तसे शालेय पुस्तकांबद्दल न झाल्याने आता मला ती चित्रे आठवत नाहीत. वेगवेगळ्या चित्रकारांनी आपापल्या मगदुराप्रमाणे ती काढलेली असावीत. मराठी पुस्तकात (विशेषतः बाल-साहित्यासाठी) रेखाचित्रे बनवणारांपैकी सी. एम.विटणकर, प्रताप मुळीक, वसंत सरवटे वगैरेंसारखे अपवाद वगळता उत्तम चित्रकारांची वानवाच असलेली दिसते.

.
सी.एम. विटणकर यांचे एक चित्र. (वरील चित्र)
इंग्रजी , रशियन, चिनी आणि अन्य पाश्चात्त्य भाषांमधले बाल- साहित्य बघता त्यातली चित्रे खूपच कल्पक आणि अत्यंत उच्च दर्जाची असल्याचे दिसून येते. अशी खूप पुस्तके मुले लहान असताना आणत असू, ती अजुनही संग्रही आहेत.

चौकस२१२'s picture

9 Nov 2021 - 5:52 am | चौकस२१२

नक्की लिहा ..
बरं अजून काही प्रश्न
१) मला माहिती आहे त्याप्रमाणे फाईन आर्ट आणि कमर्शिअल आर्ट असे दोन भाग असतात .. त्यातील फाईन आर्ट मध्ये ... जीवसदृश्य( रिऍलिस्टिक ) चित्र काढणे हे ऍबस्ट्रॅक्ट चित्र पेक्षा जास्त अवघड असते असे वाटते... यावर आपले काय मत आहे ? (जीवसदृश्य हा शबद बरोबर आहे कि माहित नाही पण मला म्हणायचे आहे कि "दिसते तसे च्या तसे" जणू काही फोटोग्राफ घेतलं आहे )
मला असं वाटण्याचाही कारण म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट आर्ट मध्ये जे काढेल आहे ते चित्रकाराच्या दृष्टीने जरी अगदी अप्रतिम आणि अत्युच्य दर्जाचाही असले तरी त्याचे मूल्यमापन कसे करणार..?
तेच जर एखाद्याचे समजा पंचरंगी खंड्या पक्षाचे चीत्र काढले तर सर्वसामान्य माणूस सुद्धा हे सांगू शकतो कि "हा बुवा हा अगदी खंड्या पक्षी दिसतोय" कारण प्रत्यक्ष खंड्या पक्षी कसा दिसतो हे जगाला माहित आहे / त्याची तुलना करता येऊ शकते
तेच १ मीटर गुणिले १ मीटर च्या काळ्या पाश्वभूमीवर मी दोन पिवळ्या रंगाचे फराटे ओढणे आणि त्याला "जीवनाचे सार्थ " असे नाव देणे ... याचे मूल्यमापन कसे करणार?
कदाचित अभियांत्रिकीत तर्क लावत असल्यामुळे असे वाट असेल का असा मी विचार केला.... पण तसे वाटत नाही कारण सर्वसामान्याला जे भावते त्याचाच विचार केलं तर वरील कारण मीमांसा तर्कशुद्ध वाटते
अर्थात या सर्व गोष्टीत असेही असते म्हणा .. ते दोन फर्राटे सुद्धा "कौशल्याने " काढत येतात किंवा तुमचेच उदाहरण घेतले तर काही राजवाड्यांचे जे चित्र तुम्ही ( तुमचच्या शैलीत" काढले आहे ते जरी प्रत्यक्ष जीवसदृश्य नसाले तरी प्रेक्षणीय आहे हे हि नक्की .. म्हणजे त्यातील मेहनत दिसते .... किंवा साल्वादोर दाली सारख्याची "विचित्र चित्रे "सुद्धा भावतात कारण त्यात काठीया कथा दिसते
पण कधी कधी प्रश्न पडतो कि जे लाखो डॉलर देऊन काही सार्वजनिक "आर्ट इंस्टॉलेशन असतात त्यात "ऍब्स्त्रात या नावाखाली" काय वाट्टेल ते चित्राला जाते किंवा उभारले जाते आणि द्या २ मिलियन असे दिसते... !
असो बऱ्याच वर्ष हा प्रश्न पडला आहे, प्रोडक्त्त डिझआईनं मध्ये आणि वास्तू कला यात खूप आवड असून सुद्धा हे "ऍब्स्ट्रॅकट " काही "हजम नाही होत"

@ चौकस२१२: तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न महत्वाचे आहेत आणि त्यांची उत्तरे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असू शकतात. या लेखाच्या शेवटी दिलेले माझ्या पूर्वीच्या लेखांचे दुवे वाचले का ? त्यातून बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील असे वाटते. त्या लेखांच्या प्रतिसादातून बरीच चर्चा झालेली आहे. तरी वाचून कृपया कळवावे म्हणजे पुढे चर्चा करता येईल.
या विषयावर चर्चा सुरू ठेवायला मला नक्कीच आवडेल. अशा विचारमंथनातून विचार आणखी स्पष्ट होत जातात. अनेक आभार.