कला, कलावंत आणि आपण : जाणिजे चित्रकर्म (भाग २)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in कलादालन
22 Oct 2011 - 10:27 am

यापूर्वीचे लेखनः चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म (भाग १)

कला म्हणजे नेमके काय, हे सांगणे अवघडच. कलावंत नेहमीच्या प्रापंचिक व्यवहारापेक्षा वेगळे असे जे काही करत असतात, ती कला, असे आपण मानतो.
खरेतर आपल्यापैकी प्रत्येक जण रोजच्या व्यवहारातसुद्धा अनेकदा कलावंताप्रमाणे वागत असतो. जसे आज कोणत्या रंगाचा सदरा घालावा, त्यावर कोणत्या रंगाची विजार व टाय बरा दिसेल हे ठरवताना, अमुक साडीला कोणत्या रंगाच्या बांगड्या, कानातले, लिपस्टिक, चपला व पर्स मॅच होईल हे ठरवताना, किंवा बशीतल्या गरमागरम पोह्यांवर हिरवी कोथिंबीर, पांढराशुभ्र खवलेला नारळ, पिवळीधम्म शेव यांची रंगसंगती साधताना आपण एक कलावंताच बनलेलो असतो.

कलावंत कलाकृती का घडवतात, या प्रश्नावर हल्ली आपल्याला 'अभिव्यक्ती' 'सौंदर्य निर्मिती' अशी उत्तरे सुचतात. परंतु पूर्वीपासून सदासर्वकाळ असेच होते, असे म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ आदिमानवाने हजारो वर्षांपूर्वी काढलेली गुफाचित्रे, इजिप्तच्या पिरामिड मधील कलाकृती (ज्या नंतर कोणत्याही मानवाने बघाव्यात असे अभिप्रेत नसायचे), अजिंठा वगैरे लेण्यातील चित्रे, खजुराहोची मिथुनशिल्पे इ. मागील नेमके प्रयोजन काय असावे, हे जाणणे कठीण आहे.

एकादी कलाकृती आपल्याला आवडण्या - न आवडण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे कुणाला प्रवासात बघितलेल्या दृष्याची आठवण करून देणारे एकादे चित्र एकदम भावते, कुणाला काही धार्मिक,पौराणिक घटना वा थोर ऐतिहासिक व्यक्तीचे चित्र आवडते, तर कुणाला त्यातील कलात्मक गुणांमुळे एकादे चित्र आवडते.

1. Corot याचे एक चित्र (१८२६)

2. रविवर्मा: दत्तात्रेय जन्म

3. एक जपानी चित्र:

कलाकृती आवडण्यामागील भूमिका कोणतीही असली, तरी त्यात कुणाला फारसे काही वावगे वाटत नाही, मात्र कधी कधी ती न आवडण्यामागील भूमिका, उदा. अमूक चित्र बघून धार्मिक भावना दुखावल्या जातात, म्हणून तिचा धिक्कार करणे, हे कलारसिकांना अनाठायी वाटते.

बहुतांश लोकांना प्रत्यक्षात ज्या वस्तू, व्यक्ती वा दृष्ये प्रेक्षणीय वाटत असतात, त्यांची चित्रे सुद्धा आवडतात. उदा खालील डावीकडचे चित्र बघा. हे ज्या व्यक्तीचे चित्र आहे, ती मुळातच देखणी असल्याने तिचे चित्र सुद्धा सुंदर वाटते. याउलट शेजारचे गाढवाचे चित्र बघून कित्येकांना वाटेल, की गाढवात काय असे चित्र काढण्यासारखे ? परंतु कलागुणांचे निकष लावता हे गाढवाचे चित्र देखील चांगले आहे, असे म्हणावे लागते, यावरून असे दिसते, की चित्राचे सौदर्य वा श्रेष्ठत्व हे चित्र विषयाच्या सौंदर्यावर फारसे अवलंबून नसते.

4. James Tissot याचे चित्र (१८८०) आणि 5. Isaac Israels याचे गाढवांचे चित्र

बऱ्याच कलावंतांना पूर्वीच्या वा अन्य कलाकारांचा कलेत काहीतरी 'चूक' असून आपण स्वत: 'बरोबर' असे काहीतरी करावे व करत आहोत, असे वाटत असते. हे 'बरोबर' नेमके काय आहे, याचा शोध ते घेत असतात.
आपण तटस्थपणे जेव्हा कलेच्या इतिहासाचे अवलोकन करतो, तेंव्हा आपल्याला ही 'चूक - बरोबर' ची पुनरावृती अनेकदा झालेली दिसून येते. उदा. खालील चार चित्रे:
6. Cimabue याचे येशू व मेरीचे चित्र (१२८४)

7. Ingres याचे चित्र (१८३२): यात चित्रित व्यक्तीचा चेहरा, शरीराची ठेवण व लकब, खुर्ची, कपडे वगैरेंचे पोत इ. चे साधर्म्य, छायाप्रकाशाचा आभास वगैरे कमालीच्या काटेकोरपणाने चित्रित केलेले आहे.

8. याउलट खालील चित्रात मोदिग्लियानी ने समोरील व्यक्तीचे चित्र रंगवताना आकारांमधील डौलदार लयबद्धता, रेषांची सफाईदार वळणे (उदा. खांद्याचा आकार, हात ठेवण्याची पद्धत, चेहर्याचा आकार इ.) , डोळे, नाक, कान इ. च्या बारीक तपशीलांना फाटा देउन केलेले चित्रण, ब्रशचे फटकारे दिसू देणे, वगैरेतून एक वेगळेच सौदर्य साकार केलेले आहे.

9. पुढील चित्र पाब्लो पिकासो याचे आहे (१९२५). यात त्याने मोदिग्लियानीपेक्षा केवलात्माकते च्या दिशेने आणखी चार पाउले पुढे टाकलेली दिसतात.

पारंपारिक पद्धतीपेक्षा काही वेगळा शोध घेणारया कलावंतांच्या कलाकृती लोकांच्या एकदम पचनी पडत नाहीत. सूर्योदय/सूर्यास्ताची खालील दोन चित्रे बघा. (क्र. १० व ११)

वरील डावीकडले चित्र Ivan Aivazovsky याचे १८७२ सालचे, पारंपारिक पद्धतीने रंगवलेले, तर उजवीकडील चित्र Claude Monet याने त्याच सुमारास रंगवलेले आहे. मोनेचे हे चित्र त्याकाळी लोकांना अतिशय धक्कादायक वाटून ते कुचेष्टेचा विषय ठरले होते. मोनेच्या चित्रातील चित्रविषय हे निमित्तमात्र असून त्याला त्यातून त्यापलीकडील कलामूल्यांचा शोध घ्यायचा असे.

(चित्रः 11 व 12 ) कधीकधी खूप मेहनतीने, दीर्घकाळ काम करून रंगवलेल्या तैलचित्रापेक्षा एकादे रेखाचित्र जास्त सरस वाटते.
John Everett Millais याचे एकाच विषयावरील एक रेखाचित्र आणि दुसरे तैलचित्र बघा.


वास्तवदर्शी चित्रे काढता येत नाहीत, म्हणून आधुनिक चित्रकार काहीतरी वेडीवाकडी चित्रे काढत असतात, असा एक आक्षेप नेहमी घेण्यात येत असतो. काही चित्रकारांच्या बाबतीत हे खरे असले, तरी पिकासो सारखे समर्थ कलावंत वास्तवदर्शी कलेत पारंगत असूनही जेंव्हा वेगळी वाट चोखाळतात, तेंव्हा त्यातून त्यांना काय अभिप्रेत असते, हे शोधणे अगत्याचे ठरते.

13. पिकासोने काढलेले त्याच्या मुलाचे चित्र (१९२३)

14. चित्रकार रेनुआ याचे पिकासोने केलेले रेखाटन (१९१९)

15. पिकासोचे एक स्थिर वस्तुचित्र (१९२०)

आणखी काही चित्रांचा परिचय पुढील भागात....
(या लेखमालेत चित्रे जास्त आणि वाचायचा मजकूर कमी, अशी योजना मुद्दाम करत आहे, यात वाचकांनी जास्त बघावे आणि कमी वाचावे, असा हेतु आहे.)

संस्कृतीकला

प्रतिक्रिया

प्रास's picture

22 Oct 2011 - 3:42 pm | प्रास

जाणिजे चित्रकर्म या लेखमालेतलं हे दुसरं पुष्प छान आहे. विशेषतः जास्त वाचण्यापेक्षा जास्त बघणं अपेक्षिल्यामुळे बघणं तर होतंच आहे पण दरम्याने या चित्रांसंदर्भात जास्त वाचण्यासाठी उद्युक्त होण्याची जाणीव होत आहे. तुमच्यासारख्या कलाकाराने यावर काही लिहिलं तर ही जाणण्याची प्रक्रिया अधिक योग्यप्रकारे होईल असं वाटलं म्हणून प्रतिसादलं.

एकाच विषयांवरची वेगवेगळ्या कलाकारांची चित्रं या कलाकारांच्या शैलीतला फरक अधोरेखित करतंच आहेत पण त्यांच्यातला भेद नेमका कशात आहे हे जर काही अधिक शब्दांमध्ये आलं तर समजण्यास मदत होईल असं वाटतं. बरेचदा हा अनुभव येतो की दो चित्रांमधलं एक दुसर्‍यापेक्षा आवडतं पण ते नेमकं का आवडलं याचं साधक-बाधक कारण मात्र देता येत नाही. अशावेळी तुम्ही केलेल्या विवेचनाचा आपलं मत निश्चित करताना उपयोग होईल असा अंदाज आहे.

मध्ये जास्त अंतर न ठेवता पुढचे भाग द्यावेत ही विनंती.

(चित्रकला समीक्षणार्थ उत्सुक)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2011 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्र पाहतांना आणि त्यातले बारकावे समजून घेतांना मजा येत आहे.
अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

लेखमालिकेचा आस्वाद घेतोय.
मला वास्तवदर्शीच चित्रकृती आवडतात.

पैसा's picture

23 Oct 2011 - 12:05 pm | पैसा

चित्रांचा तुलनात्मक अभ्यास या दृष्टीने छान आहे. मानवी इतिहासातल्या सगळ्यात जुन्या चित्रांपैकी असलेली फ्रान्समधली गुहाचित्रे इथे पहा.

त्यात मानवी आकृत्या खूप कमी आणि प्राण्यांची चित्रं आहेत ती पूर्ण वास्तववादी पद्धतीने काढलेली नाहीत. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य त्या काळातही चित्रकार घेत होतेच!

प्रास's picture

23 Oct 2011 - 7:01 pm | प्रास

गुहाचित्रांच्या दुव्याबद्दल आभारी आहे. भन्नाट आहे एकदम!

:-)

मदनबाण's picture

23 Oct 2011 - 2:38 pm | मदनबाण

छान मालिका...
राजा रवी वर्मांची सर्वच पेंटींग अफलातुन आहेत. :) स्त्रीयांचे अलंकार आणि त्यांच्या साडीवरील डिटेल्स हे पहायला मला फार आवडते.
उदा :---

संदर्भ :--- http://www.reflectionsofanartoholic.com/raja-ravi-varma-and-the-royals/
पण सध्या मला एक प्रश्न पडला आहे, तो म्हणजे लेडी विथ द लँप हे चित्र नक्की कोणी काढले आहे ?
म्हणजे १) राजा रविवर्मा की २) एस एल हलदनकर
हे चित्र मला फार आवडते,समईचा प्रकाश ज्या प्रकारे शरीरावर (विशेषतः चेहर्‍यावर) दाखवला तो केवळ अप्रतिम आहे. :)


(चित्र जालावरुन घेण्यात आले आहे.)

(कला प्रेमी) :)

चित्रगुप्त's picture

23 Oct 2011 - 11:10 pm | चित्रगुप्त

मदन बाण यांनी इथे दिलेले चित्र हे सावळाराम लक्ष्मण हळदणकर (1882–1968) यांच्या चित्रावरून कुणितरी कॉपी केलेले चित्र आहे (खाली सही आहे, ती मला वाचता आली नाही)
हळदणकर यांचे मूळ चित्र (१९३६): (याविषयी माहिती इथे )

(चित्र डकवताना चित्राची रुंदी २०० ठेवल्यास ते फार मोठे न होता बरे दिसते, जिथे खूप तपशील बघण्यासारखे असतील तिथे ४००-६०० ठेवता येइल).