यापूर्वीच्या लेखात आपण हिंदु देवादिकांच्या 'सपाट' रंगलेपन पद्धतीच्या चित्रातून हळूहळू पाश्चात्त्य पद्धतीच्या 'खोली' ‘घनता’ आणि 'छायाप्रकाश' दर्शवणार्या चित्रांकन पद्धतीकडे झालेली भारतीय चित्रकलेची वाटचाल, आणि त्याच सुमारास तिकडे फ्रांस मध्ये बरोबर याउलट दिशेने होणारी चित्रकलेची वाटचाल बघितली.
या लेखात आता आपण पौर्वात्त्य आणि पाश्चिमात्त्य पद्धतीच्या काही चित्रांद्वारे या दोन्ही चित्रपद्धतींमधील फरक बघूया.
चांदबीबी आणि फ्रांसची मादाम पोंपादूर यांची ही साधारणत: समकालीन चित्रे:
चित्र क्र.१ आणि २
.
चित्र १. अहमदनगर च्या निजामशाहची मुलगी, आणि बिजापूरच्या अली आदिलशहची बेगम ‘चांद खातून’, ‘चांद सुलताना’ अथवा ‘चांद बीबी’ (१५५०-१५९९) हिला अरबी, फारसी, तुर्की, मराठी आणि कानडी भाषा अवगत असून चित्रकला आणि सतार वादनात ती प्रवीण होती.
दख्खनी शैलीच्या या अगदी लहानश्या (८ x ६ इंच) चित्रात दूरवरची झाडे, डोंगर, किल्ला, घरे, जवळच्या भागातील पाणी व त्यातील कमळे, कुत्रे, उडणारे बगळे, ससाणा इ. पशुपक्षी वगैरे बारकाईने चित्रित केलेले असून हिरव्या कुरणाच्या पार्श्वभूमीवर दौडत्या घोड्यावर स्वार आवेशयुक्त अविर्भावातील चांदबीबीचे चित्रण एकाच वेळी ठसठशीत आणि बारीक-सारीक तपशीलांनी भरलेले आहे. पांढरा- काळा घोडा, त्याचे मेंदी लावलेले पाय, चांदबीबीची वस्त्रे आणि पागोटे यात वापरलेले सुवर्ण, यामुळे चित्र एकदम मनात भरते. पळत असलेला घोडा आणि कुत्रा, उडणारे बगळे, ससाण्याचे उभारलेले पंख, दूरवर फडकता झेंडा, चांदबीबीचे उडते वस्त्र आणि केस, यामुळे या चित्राला एक गतिमानता लाभलेली आहे.
चित्र २. मादाम पोंपादूर (१७२१-६४)
चित्रकार: Maurice Quentin de La Tour (१७०४-८८)
माध्यम: कागदावर पेस्टल (७० x ५१ इंच) इ.स. १७५५
‘मार्कीस द पोंपादूर (मादाम पोंपादूर) ही तात्कालीन फ्रांसचे राजकारण तसेच बौद्धिक आणि कलात्मक विश्वावर आपला ठसा उमटवणारी महत्वाची व्यक्ती. तिच्या या चित्रात तिच्या अभिरुचीवर आणि स्वभावावर प्रकाश टाकणारे अनेक संदर्भ चित्रित केलेले आहेत. उदाहरणार्थ टेबलावरील पुस्तके: पास्टर फ़ीदो (सुप्रसिद्ध नाटक), फ्रांसमधून हद्दपार केला गेलेला राजेशाहीचा विरोधक वोल्तेयार याचा ग्रंथ, राजकीय तत्वज्ञानावरील चर्चने बंदी घातलेला मोंतेस्क्यू याचा ग्रंथ, फ्रांसमध्ये पूर्वी प्रतिबंधित असलेले फ्रेंच एनसायक्लोपेडियाचे खंड, रत्नांवर कोरीव काम करण्याबद्दलचे पुस्तक, पृथ्वीचा गोल, चित्रांचा बस्ता, लिखित संगीताचे कागद, बरोक गिटार इत्यादि. हे चित्र कॅनव्हास वर चिकटवलेल्या आठ कागदांवर पेस्टलने रंगवलेले आहे. (याबद्दल माहिती अशी की बनत असलेल्या चित्रात पोंपादूर हीस वेळोवेळी जे बदल करावेसे वाटले, ते करण्यासाठी चित्राचा तेवढा भाग कापून, कागदाचा नवा तुकडा चिकटवून काम करावे लागले).
>>>>> मादाम पोंपादूर ही तात्कालीन फ्रांसचा सर्वेसर्वा राजा पंधरावा लुई याची प्रमुख राजसखी (Maîtresse-en-titre) असूनही राजेशाहीच्या विरुद्ध असलेल्या विचारवंतांची बाजू घेऊन जाहीरपणे तसे चित्रित करवणे हे विशेष.
>>>>> मार्कीस पोंपादूरच्या या चित्राविषयी समग्र माहिती देणारा व्हिडियो इथे बघा.
http://musee.louvre.fr/oal/marquise_pompadour/indexEN.html
---------------------------------------------------------
आता छत्रपती शिवाजी महाराज (१६३०-८०) आणि फ्रांसचा राजा १४ वा लुई (१६३८-१७१५) यांची ही दोन चित्रे बघूया:
चित्र ३. शिवाजी महाराजांचे हे चित्र पॅरिसच्या राष्ट्रीय ग्रंथागारात (मानूचिच्या ग्रंथात) आहे. या ग्रंथात एकूण ५६ चित्रे आहेत. हे चित्र महाराजांना प्रत्यक्ष बघून काढलेले आहे वा नाही, याची शंकाच आहे.
मानूचि ( Manucci, Niccolo 1638-1717) याने भारतातून खास बनवून घेतली एकूण ५६ चित्रे असलेला हा संपूर्ण ग्रंथ (तैमूरलंग ते अवरंगजेब: भारताचा इतिहास) खालील दुव्यावर बघता येईल: यात पृ. १६५ वर महाराजांचे चित्र आहे.
http://gallica.bnf.fr/ark:/12148/btv1b55003367g/f1.planchecontact.r=Manu...
चित्र ४. चौदावा लुई (बेजांसोचे युद्ध) इ.स. १६७४
चित्रकार: Adam Frans van der Meulen
(तैलरंग, २२ x २७ इंच. हर्मिताज म्यूझियम, सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे संग्रहित)
हे चित्र आकाराने तसे लहानच असले, तरी त्यात अश्वारूढ लुईच्या प्रत्ययकारी चित्रणाशिवाय ढगाळ आकाश, दूरवरचे डोंगर, त्यामधून वाहणारी नदी आणि नदीकाठी वसलेले शहर, सैन्याच्या तुकड्या, छावणी, युद्धमग्न सैनिक, तोफ़ांचा धूर, वगैरे अनेक बारकावे प्रमाणबद्ध रीतीने चित्रित केलेले आहेत. दूरचे दृष्य अंधुक, निळसर, तर जवळचे स्पष्ट चित्रित केलेले आहे .
चौदाव्या लुईबद्दल माहितीपूर्ण दुवा:
http://www.louis-xiv.de/index.php?id=31
-----------------------------------------------------
आता ही दोन पाश्चात्त्य चित्रे बघा (चित्रकार: Gerard van Honthorst १५९२-१६५६)
चित्र क्र. ५ व ६:
..
डावीकडे: सोफिया (१६३०-१७१४) (इंग्लंड चा राजा जॉर्ज प्रथम, याची आई)
उजवीकडे: सोफियाची बहीण एलिझाबेथ, तात्कालीन सुप्रसिद्ध लावण्यवती आणि सुसंस्कृत महिला.
या चित्रात एका बाजूचा तीनचतुर्थांश, आणि दुसर्या बाजूचा एक चतुर्थांश चेहरा दिसत असून चित्रणात पर्स्पेक्टिव्ह, छायाप्रकाश यांचा यथायोग्य उपयोग करून चेहरेपट्टीचे हुबेहूब चित्रण केलेले आहे.
>>>>> काही अन्य पाश्चात्त्य कुलीन स्त्रियांची चित्रे इथे बघा.
---------------------------------------
आणखी दोन व्यक्तिचित्रे:
चित्र ६: इखालास खान, (बिजापूरचा हबशी दिवाण) याचे चित्र. गोवळकोंडा, १६७०-८० ( ब्रिटीश लायब्ररी)
चित्र ७: नेपोलियन बोनापार्ट (इ.स. १८०० तैलरंग, १०२ x ८७ इंच) चित्रकार: Jacques-Louis David (१७४८-१८२५)
.
काहीश्या भडक, नाट्यपूर्ण आणि प्रचारकी थाटाच्या या चित्रात खिंकाळणारा घोडा, त्याची वार्याने उडणारी आयाळ, नेपोलियनचे वीरश्रीयुक्त हावभाव, गडद रंगसंगती वगैरेंमुळे हे चित्र तात्कालीन प्रेक्षकांना खूपच प्रभावशाली वाटले असेल.
---------------------------------------------------
आता भारतीय (वा पौर्वात्त्य) आणि पाश्चात्त्य चित्रपद्धतीत काय फरक आहे, ते बघूया.
भारतीय चित्रे:
१. भारतीय चित्रांमध्ये रेषा फार महत्वाची असते. सर्वात आधी रेखांकन करून मग रंग भरल्यावर पुन्हा रेषा चित्रित केली जाते. रेखा प्रवाही, गतिमान, लयबद्ध, लालित्यपूर्ण असून स्मृती आणि कल्पना यांच्या आधारे चित्र बनवले जाते. रेखांकनातून निश्चित झालेल्या आकारांमध्ये सपाट रंगलेपन केले जाते. यामुळे रंगांचे मूळ शुद्ध स्वरूप व झळाळी कायम रहाते.
२. चित्रातील सर्व वस्तू, व्यक्ती इ. एकाच ‘सपाट’ पातळीवर असल्याप्रमाणे चित्रित केलेल्या असतात. महत्वाच्या व्यक्ती वा वस्तू मोठ्या आकाराच्या, तर कमी महत्वाच्या लहान, असा प्रकार असतो.
३. चित्रात बरेच ठिकाणी ‘अचित्र’ म्हणता येईल असा भाग (मोकळी जागा वा चित्रावकाश) असतो. उदाहरणार्थ नुसता निळा, लाल, पिवळा, पांढरा, काळा इ. रंगांचा सपाट भाग, ज्यातून आकाश, पाणी, जमीन वा भिंत वगैरे काही दर्शवणे अभिप्रेत नसून मूळ चित्रविषयाला उठाव देणारी रंगित पार्श्वभूमी, असे त्याचे स्वरूप असते.
चित्र ७: फ़ारुख सियार
"अबुल मुझफ्फर मुइनुद्दीन मुहम्मदशाह फ़ारुख सियार अलीम अकबर सानी वालाशाह पादशाह- ई-बहर-उ-बर शाहीद इ माझलुम" अशी लांबलचक बिरुदावली मिरवणारा
१७१३-१७१९ या काळातील मुगल बादशाह असलेल्या फ़ारुख सियारचे (१६८५ - १७१९) हे चित्र अप्रतिम रंगसंगती, पांढर्यापासून काळ्यापर्यंत विविध रंगछटांचा संतुलित, यथायोग्य वापर, उत्कृष्ट रेखांकन वगैरेंमुळे फारच आकर्षक वाटते. (मुगल शैली, १८ वे शतक.)
४. बहुतेक भारतीय चित्रातून चेहरा एका बाजूने (प्रोफ़ाईल) चित्रित केलेला असतो. तसेच ‘समोरासमोर’ असणारे लोक (उदा. बाण मारणारे दोन योद्धे) अगदी समोरासमोर चित्रित केलेले असतात.
५. चित्रात काही संकेत पाळलेले असतात ( उदा. ‘मीनाक्षी’ म्हणजे मासोळीप्रमाणे डोळे, केळीच्या खांबाप्रमाणे मांड्या, घटासारखे स्तन, देवाच्या डोक्यामागे सोनेरी वलय, राजाच्या डोईवर मुकुट, छत्र-चामरे इ.इ.) मात्र मनुष्याकृती, घोडे, इ. च्या वेगवेगळ्या शरीरस्थितींप्रमाणे होणार्या स्नायुंच्या हालचाली चित्रित केलेल्या दिसून येत नाहीत.
.
चित्र क्र. ८: राम-रावण युद्ध (मंडी येथील पोथीचित्र)
चित्र क्र.९: राधा (‘बनी ठनी’ नामक महिलेचे चित्र ?) चित्रकार: निहाल चंद्र. किशनगढ शैली (सुमारे इ.स. १७५०)
६. ‘अमूक एका विवक्षित बिंदुतून, अमूक एका क्षणी दिसणारे दृश्य’ चित्रित करणे अभिप्रेत नसून चित्रविषय सुटसुटीतपणे, प्रभावीपणे आणि सुंदर रीतिने चित्रित करण्यावर भर असतो.
गणेशः जोधपूर इ.स. १७७५.
७. काही चित्रात, चित्रकाराला त्या प्रसंगाबद्दल ठाऊक असलेले (वा दाखवायचे असलेले) सर्व बारकावे चित्रित केलेले असतात. त्यामुळे एकाच चित्रात निरनिराळ्या काळी, निरनिराळ्या ठिकाणी घडलेल्या घटना देखील चित्रित केलेल्या असू शकतात. काल आणि अवकाश यांची फार मोठी व्याप्ती अशा चित्रांमधे असते.
चित्र क्र.१०: विश्वामित्राची तपश्चर्या (इ.स.१७१२) मेवाड शैली. (ब्रिटीश लायब्ररी संग्रह)
चित्र क्र.११: शिव पार्वती: ‘रसमंजिरी’ ग्रंथातील चित्र (१६९४-९५०). चित्रकार: रविदास
-------------------------------------------------------
पाश्चात्त्य चित्रे:
१. रेखांकन 'डोळ्याला दिसते तसे' केले जाते. ( उदाहरणार्थ आपण एका मोठ्या काचेच्या खिडकीजवळ अगदी स्थिर उभे राहून, एका डोळ्याने काचेपलिकडे त्या विवक्षित क्षणी दिसणारे दृश्य त्या काचेवर ट्रेस केल्यासारखे)
चित्र १२: काचेच्या फ्रेम मधून बघून चित्र काढणे: चित्रकार: Albrecht Dürer, 1532.
२. मनुष्याकृती व अन्य वस्तूंचे घनत्व चित्रातून जाणवावे, यावर भर दिलेला असतो.
चित्र १३: Berthe Goldschmidt हिचे चित्र (१८६८-७०) चित्रकार: Jean Baptiste Camille Corot
३. ‘पर्स्पेक्टिव्ह’ च्या विशिष्ट नियमांनुसार दूरच्या वस्तू लहान तर जवळच्या मोठ्या चित्रित केल्या जातात. (दूरवर निमुळते होत होत क्षितिजावर शून्य होत जाणारे आकार)
चित्र क्र. १४: ‘सोलोमनच्या दरबारात शीबाराणीचे आगमन’ (1890 ) चित्रकार: Edward Poynter
४. शरीरशास्त्राचा अभ्यास हा पाश्चात्त्य कलेत महत्वाचा असतो. स्नायुंच्या हालचालींप्रमाणे घडून येणारे बदल, शरिराची प्रमाणबद्धता, चेहर्यावरील भाव, हातवारे व विविध अविर्भावातून भावनांची अभिव्यक्ती, वगैरे महत्वाचे असते. त्यासाठी नग्न मॉडेलवरून मनुष्याकृतींचा अभ्यास केला जातो.
चित्र क्र. १५: नेपोलियन ची बहीण पोलीन बोनापार्ट हिचे कानोवा (Canova) याने केलेले शिल्प.
५. पाश्चात्त्य रंगलेपन पद्धती :
चित्र बनवताना सुरुवातीला केलेले रेखांकन रंगलेपनात दिसेनासे होते. छाया-प्रकाशाचा आभास निर्माण करण्यासाठी प्रत्येक रंगात यथायोग्य प्रमाणात पांढरा, काळा वा अन्य रंग मिसळावे लागल्याने रंग ‘शुद्ध’ स्वरुपात रहात नाहीत. जुन्या चित्रात अगदी गुळगुळीत रंगलेपनातून वास्तवाचा आभास निर्माण केला जात असे. लाकूड, रेशीम, धातु, लोकर, संगमरवर वगैरेंचा अगदी हुबेहूब आभास अनेक चित्रातून केलेला आढळतो.
चित्र क्र.१६: Women of Amphissa (१८८७) चित्रकार Lawrence Alma-Tadema.
------------------------------------------------------------
आणखी काही भारतीय व पाश्चात्त्य चित्रे:
चित्र क्र. १७: रमाबाई, माधव राव पेशव्यांसह सती जाताना: (१७७२-७५, कागदावर जलरंग आणि सुवर्ण, १२ x १६ इंच, चित्रकार अज्ञात)
चित्र क्र. १८: जोन ऑफ आर्क चे जिवंत दहन (तैलचित्र, १८४३ चित्रकार: Stilke Hermann Anton)
आता या दोन्ही चित्रपद्धतींच्या मिलाफातून बनलेली काही चित्रे बघूया.
चित्र १९: शाहजहान आणि त्याचे चार पुत्र. चित्रकार: Willem Schellinks (1627–1678),
चित्र २०: पाश्चात्त्य शैलीने प्रभावित भारतीय चित्रकार मनोहर (अथवा बसवन) याने काढलेले चित्र ( (जहांगीरचा बस्ता, इ.स. १५९८)
--------------------------------------------------
एकाच विषयावरील भारतीय आणि पाश्चात्त्य चित्रांची उदाहरणे:
चित्र २१: टिपू सुलतान, युद्धभूमीवर: इ.स. १७८०. भारतीय चित्र ( चित्रकार अज्ञात)
चित्र २२: टिपू सुलतानचे युद्धभूमीवर पतन (इ.स. १७८०): चित्रकार: Henry Singleton
चित्र २३: अकबर शिकार करताना:
चित्र २४: सिंहाची शिकार (१८३६) : चित्रकार: Horace Vernet (1789-1863)
शेवटी एक अप्रतिम सुंदर भारतीय चित्र देऊन हा लेख पुरा करतो:
चित्र २५: महाराजा फत्तेसिंह आणि शिकार पार्टी (पूर आलेली नदी पार करताना) चित्रकार: शिवलाल (१८९३)
..........................(समाप्त)........................
प्रतिक्रिया
12 Dec 2013 - 12:32 am | पिवळा डांबिस
अजून शब्द वापरून आनंद गढूळ करू इच्छित नाही..
जियो!!!
12 Dec 2013 - 1:46 am | राघवेंद्र
सुंदर चित्रे आणि त्यावरिल सखोल अभ्यास.
_/\_
12 Dec 2013 - 6:11 am | खटपट्या
फारच सुंदर !!!
चित्रे, वर्णन, माहिती आणि अवलोकन सर्वच छान !!!
12 Dec 2013 - 7:36 am | मारवा
आपण कधीही पिकासो गायतोंडे या सारख्या मॉडर्न आर्टीस्ट बद्दल लिहीत नाहीत असे का ? आपण जर ते उलगडुन दाखविले तर आमच्या सारख्यांना चित्रकले त शुन्य असणारयांना कीती मोठा आनंद मिळेल आणि ते समजुन घेण्यात मदत होईल असे वाटते म्हणुन असे विचारले.
की शास्त्रीय संगीतात असतात तशी घराणे निष्ठा वगैरे चित्रकलेतही असते का ? की आपला तात्विक वगैरे विरोध आहे ?
गैरसमज नसावा केवळ ती चित्रकला समजुन घेण्यात आपल्या सारख्या जाणकारांचे मार्गदर्शन मिळाले तर आनंद झाला असता इतकेच म्हणायचे आहे.
सध्या तरी या लेखा ने अफाट नेत्रसुख आपण दिले ले आहे त्यासाठी अनेक आभार. कृपया असाच आनंद देत रहा ही नम्र विनंती,
12 Dec 2013 - 7:55 am | चित्रगुप्त
मी काहीसा जुन्यात रमणारा रसिक आहे. जुने चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत, प्राचीन कला, महाभारतादि पुराणे, प्राचीन नगरे, किल्ले, इमारती इ. मला जास्त भावते. नव्याचे वावडे आहे असे नाही, पण जुने जास्त जवळचे वाटते. तात्विक विरोध वगैरे काही नाही. मी स्वतः अमूर्त वगैरे चित्रेही आवडीने रंगवतो. तरी आवड एकंदरित जुन्याचीच जास्त आहे. अलिकडे सर्वच गोष्टींचे फार बाजारीकरण झालेले आहे, असे वाटते, त्यामुळे त्यातून सकस असे निवडणे गरजेचे आहे, आणि कठिणही आहे.
12 Dec 2013 - 10:51 am | मुक्त विहारि
"अलिकडे सर्वच गोष्टींचे फार बाजारीकरण झालेले आहे, असे वाटते, त्यामुळे त्यातून सकस असे निवडणे गरजेचे आहे, आणि कठिणही आहे."
12 Dec 2013 - 8:48 am | पहाटवारा
सुरेख चित्रे आणी त्यांच परिचय !
१४ व्या चित्रातली प्रकाशयोजना आणी १६ व्य चित्रातल्या संगमरवराचा ईफेक्ट एकदम खास..
जुन्य काळातल्या भारतीय चित्रांमधली रेखीव कारागिरि भावते पण त्रिमितीमधे काढलेली चित्रे जास्त प्रभावशाली वाटतात.
अवांतर : पहिल्या चित्रातल्या चांद्बीबी आणी मदाम च्या कालखंडात सुमारे १०० वर्षे अंतर असूनहि हि समकालीन कशी?
12 Dec 2013 - 9:40 am | चित्रगुप्त
त्या व्यक्ती समकालीन नसून त्यांची चित्रे अठराव्या शतकातील साधारणतः समकलीन अहेत.
12 Dec 2013 - 9:51 am | अनुप ढेरे
७, १६ आणि १८ लय आवडली. विवेचन पण खासच.
12 Dec 2013 - 10:49 am | मुक्त विहारि
माझ्या सारख्या चित्रकलेतील "ढ" माणसाला पण तुमचा लेख आवडला.
12 Dec 2013 - 11:52 am | जयंत कुलकर्णी
http://gallica.bnf.fr/ark:/12148/btv1b85931054/f1.zoom.r=india या लिंकवर जो नकाशा आहे तो कुठल्या काळातील आहे हे आपण सांगू शकाल का ? आपल्याला फ्रेंच भाषा येत असेल असे गृहीत धरले आहे......
12 Dec 2013 - 8:34 pm | चित्रगुप्त
@जयंत कुलकर्णी:
सदर नकाशा इ.स. १६०६ मधील आहे, असे खालील दुव्यावरून दिसते:
http://gallica.bnf.fr/Search?ArianeWireIndex=index&p=1&lang=FR&q=india+o...
12 Dec 2013 - 5:04 pm | प्रचेतस
अप्रतिम.
भारतीय आणि पाश्चात्त्य कलेतील तुलनात्मक आढावा आवडला.
भारतीय चित्रकलेतील माईलस्टोन असलेल्या अजिंठा आणि उत्तर अजिंठा (वेरूळ, कान्हेरी) शैलीतील चित्रांचा विचार का केला नाही किंवा अशा प्रकारची चित्रे भित्तीचित्रे अथवा प्रस्तरचित्रे ह्या प्रकारात मोडत असल्याने ह्यांचा सर्वस्वी वेगळा विचार करावा लागतो?
अजिंठा शैलीतील चित्रांवर एखादा लेख अवश्य लिहावा अशी आग्रहाची विनंती.
बाकी चित्र क्र. ८ मधील रावणाचे १० वे गर्दभ मुख काही शिल्पांमध्ये सुद्धा दर्शवलेले दिसते.
वेरूळ (लेणी क्र. २१- रामेश्वर, ८-९ वे शतक) रावणानुग्रह शिवमूर्ती
टोक गाव, प्रवरासंगम (१७-१८ वे शतक) राम - रावण युद्ध
12 Dec 2013 - 6:29 pm | अनुप ढेरे
रावणाची सगळी तोंडं (जुळ्यांसारखी) सारखी नव्हती का?
12 Dec 2013 - 7:03 pm | प्रचेतस
रामायणात असा उल्लेख नाही. रावणाची दाही तोंडे सारखीच होती, मात्र रावणाचा रथ गाढवे ओढीत.
तसेच सुंदरकांडात त्रिजटेला पडलेल्या स्वप्नात रावण गाढवावर बसून दक्षिणेकडे जात असल्याचा तसेच तो पुढे खाली डोके आणि वर पाय अशा अवस्थेत गाढवावरून खाली पडल्याचा उल्लेख आला आहे.
पिबंस्तैलं हसन् नृत्यन् भ्रान्तचित्ताकुलेन्द्रियः ।
गर्दभेन ययौ शीघ्रं दक्षिणां दिशमास्थितः ||
पुनरेव मया दृष्टो रावणो राक्षसेश्वरः ।
पतितोऽवाक्शिरा भूमौ गर्दभाद् भयमोहितः ॥
गाढव अशुभ, अपवित्र मानले जाई. साहजिकच रावणाचे एक मस्तक गर्दभरूपी दाखवत असावेत.
12 Dec 2013 - 7:20 pm | चित्रगुप्त
रावण 'दशस्कंधी' (ब्राह्मण?) होता, स्कंध म्हणजे खांदा, त्यामुळे पुढे त्याला दहा तोंडे होती, अशी समजूत पसरली, वगैरे वाचल्याचे आठवते.
'दशस्कंधी' म्हणजे नेमके काय, यासाठी विक्कीवेदाचा वा गूगलोपनिषदाचा शास्त्राधार सापडला नाही. कुणाला ठाऊक आहे का?
12 Dec 2013 - 8:24 pm | प्रचेतस
दशस्कंधी असा उल्लेख वाचल्याचे स्मरत नाही. पण दशग्रीव हा उल्लेख तर मोठ्या प्रमाणावर आढळतो.
13 Dec 2013 - 5:17 pm | इरसाल
दशग्रंथी वाचलाय. म्हणजे चार वेद, सहा शास्त्र अठरा पुराण ज्याला अर्थासकट उलट आणी सुलट पाठ आहेत असा.
13 Dec 2013 - 9:35 am | अनुप ढेरे
माहितीबद्दल धन्यवाद वल्ली!
12 Dec 2013 - 5:21 pm | चित्रगुप्त
भारतीय आणि पाश्चात्त्य चित्रकलेतील भेद हा विषय असल्याने असा फरक ज्या चित्रातून प्रमुख्याने दाखवता येईल, अशी चित्रे घेतली आहेत. अजिंठा चित्रकलेबद्दल लिहायला खास अभ्यास करावा लागेल.
(या कलेवर तात्कालीन अन्य संस्कृतीतील चित्रकलेचा काही प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे का? असे काही उल्लेख शिलालेखात वगैरे आहेत का?)
12 Dec 2013 - 5:29 pm | प्रचेतस
तसा कुठलाही उल्लेख अजूनतरी माझ्या वाचनात आलेला नाही.
पण ही अशा प्रकारची भित्तींवरील चित्रकला सुमारे २२०० वर्षांपूर्वी (साधारणपणे सातवाहनकालात) अस्तित्वात होती हे खास. पण तिचे स्वरूप साधारण छतावरील चौकटींची नक्षी अशाच स्वरूपात होते. व्यक्तिचित्रे इतक्या प्राचीन काळात अस्तित्वात आलेली नव्हती. त्यांच्या उगम अजिंठ्याच्या महायान कालखंडातच आढळून येतो. (पाचवे ते नववे शतक).
12 Dec 2013 - 6:10 pm | प्यारे१
बहोत खूब चित्रगुप्त सेठ!
आमच्याकडून तुम्हाला एक पार्टी लागू!
12 Dec 2013 - 8:36 pm | बॅटमॅन
आई गं!
जरा नजर पुरती भरूदे मग गेट ब्याकवतो. सध्या तरी एक साष्टांग नमस्कार या जबराट लेखासाठी चित्रगुप्तांना _/\_
13 Dec 2013 - 12:01 am | प्रास
असा प्रेक्षणीय धागा काढणार्याचा आयडी चित्रगुप्त बदलून चित्रदर्शी करावा अशी विनंती....
13 Dec 2013 - 12:42 am | नंदन
लेख, त्यातली उदाहरणं - विशेषतः तौलनिक आणि दोन्ही चित्रपद्धतींच्या मिलाफातून आलेली अतिशय आवडली. ओरहान पामुकच्या 'माय नेम इज रेड' या पुस्तकात मध्यपूर्वेतली पारंपरिक मिनिएचर शैली आणि इटालियन रेनेसाँ यांच्यातल्या संघर्षाचे चित्रण आठवले.
13 Dec 2013 - 8:30 am | चित्रगुप्त
@नंदन,
या 'माय नेम इज रेड' विषयी आणखी माहिती द्याल का? म्हणजे त्यात चित्रकलेविषयी काय काय आहे वगैरे?
13 Dec 2013 - 1:02 pm | नंदन
हे पुस्तक नेमकं हाताशी नाही, तेव्हा आठवतं तसं सांगतो. चूभूदेघे.
'माय नेम इज रेड' मध्ये निरनिराळी सूत्रं आहेत. तत्त्वचर्चेपासून ते अगदी खुनाच्या रहस्यापर्यंत. त्यातलीच एक मुख्य घटना म्हणजे तत्कालीन (१५-१६ वे शतक) सुलतानाची थोरवी सांगणारा चित्रमय ग्रंथ सिद्ध करणं. ते करत असताना पारंपरिक पद्धतीबरोबरच (द्विमितीतली, इस्लामी प्रथेप्रमाणे मानवी चेहरे न रेखाटलेली) नव्याने ज्ञात झालेल्या युरोपियन शैलीचाही (त्रिमिती/घनतेचे परिप्रेक्ष्य आणि पोर्ट्रेचर) कलाकारांना मोह पडतो आणि त्यातून निर्माण होणारे बेबनाव इ. एका अर्थी तुर्कस्थानच्या पाचवीलाच पूजलेल्या पूर्व-पश्चिम संघर्षाचं हे एक रूप झालं. या ओघातच मग मिनिएचर शैलीसाठी लागणारं साहित्य, ते तयार करण्याच्या पद्धतींचं वर्णन, कलाकारांच्या दृष्टीवर होणारा अपरिहार्य परिणाम याही बाबी या कादंबरीत येऊन जातात.
13 Dec 2013 - 11:02 am | चावटमेला
लाजवाब चित्रे आणि लेख. बादवे, ती पाश्चात्य चित्रे ३-डी इफ्फेक्ट असल्यासारखी जिवंत भासताहेत.
13 Dec 2013 - 11:36 am | चित्रगुप्त
चित्रे अशी वाटावीत म्हणून पाश्चात्त्य कलावंतांनी दीर्घकाळ प्रयत्न, संशोधन केले, शास्त्रीय सिद्धांत शोधून त्या अभ्यासाची जोड दिली... पुढे नवकलेच्या आगमनाने ते सर्व मातीला मिळाले, कलेविषयी नवनवीन कल्पना, पद्धती रूढ झाल्या. कलेचे क्षितिज आणखी विस्तारले, या सर्व घडामोडीत पौर्वात्त्य कलेचे अनुकरण करणे हा महत्वाचा भाग होता.
13 Dec 2013 - 1:34 pm | चित्रगुप्त
उदाहरणार्थ खालील चित्रे (मातीस व पिकासो या थोर चित्रकारांची). यात प्रकट रेखांकन, सपाट रंगलेपन, "एका विविक्षित क्षणी, एका विविक्षित बिंदुतून दिसणारे दृष्य" या कल्पनेला दिलेला फाटा, पर्स्पेक्टिव्ह-छायाप्रकाश-घनता-शरीरशास्त्र-स्नायुंचे चित्रण -- या सर्व गोष्टींचा अभाव, ही (पौर्वात्त्य कलेची) सर्व वैशिष्ट्ये दिसून येतात.
.
13 Dec 2013 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर चित्रे आणि तेवढेच सुंदर रसग्रहण !
13 Dec 2013 - 6:20 pm | चौकटराजा
असे लेख पाहिल्यावर आपण चित्रगुप्त बाबांच्या गुहेत आल्यासारखे वाटते. काय निरखून पहावे काय नाही असे होते. मला
व्यक्तिशः सर्रॅरिआलिस्टिक, रिआलिस्टीक, इंडीयन मिनेचर सर्व प्रकारची चित्रे आवडतात. ती ती चित्र पहाताना त्या त्या
शैलीच्या मर्यादा व बलस्थाने मनांत पक्की केली ही मग आनंदच आनंद. चंदीगड येथील म्युझियम मधे ही बरीच उत्तम चित्रे पहावयास मिळाली. हा लेख म्हणजे चिगगुप्त बाबाका प्रसाद आहे ! अलिकडील शैलीचा विचार केला तर आता पुण्यास स्थायिक झालेल्या रवी परांजपे यांची शैलीही वाखाणण्यासारखी आहे असे माझे आपले स्वत:चे मत बुवा !
15 Dec 2013 - 10:27 am | चित्रगुप्त
अगदी खरे. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेण्यास हे भान ठेवणे आवश्यक.
15 Dec 2013 - 10:55 am | पैसा
लेख, त्यातील चित्रे आणि विवेचन फारच सुरेख झालं आहे. दोन्ही शैलीतील फरक अगदी व्यवस्थित उलगडून दाखवला आहे. मस्तच!
15 Dec 2013 - 11:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
-दिलीप बिरुटे
15 Dec 2013 - 11:06 am | कंजूस
तुलनात्मक लेख आवडला .
अपेक्षा वाढल्या आहेत !
१)आता जर्मनात दुसऱ्या महायुध्दातली चोरीला गेलेली मूळ चित्रे सापडली त्याची जरा माहिती देणारा धागा लिहिणार का ?
२)राजस्थान (कोटा ,बुंदी ,शेखावती), केरळ ,तमिळनाडुतील म्युरल्सवर(माहितीवजा ) सवडीने लिहिणार का ?
3 Nov 2021 - 9:34 pm | मनो
काका, तुम्ही Willem Schellinks चे चित्र दिले आहे, ते नंतर बनवलेली रिप्लिका आहे. मूळ चित्र हे आहे
https://collections.vam.ac.uk/item/O69124/parade-of-the-sons-of-oil-pain...
18 Jul 2024 - 3:46 am | चित्रगुप्त
'पुराणकथांवरील चित्रे' या लेखाच्या संदर्भात हा जुना लेख वर आणला आहे.