कुमारने मला संध्याकाळी सात वाजता यायला सांगितले होते. जेव्हा मी त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा सात वाजून गेलेले होते. घरांत फक्त वाहिनी होत्या. टीवी वरची कुठलीतरी सीरिअल बघत होत्या.
“या, कुमारने मला सांगितले होते की तुम्ही येणार आहात म्हणून. पण त्याला थोडा उशीर होणार आहे, मिटिंग मध्ये बिझी आहे. आत्ता निघेलच तो . तुम्हाला थांबायला सांगितले आहे.”
“सॉरी हं. तुम्ही सीरिअल बघत होता. मी तुम्हाला डिस्टर्ब केले.” मी अपराधी भावनेने बोललो.
“नाही हो. सीरिअल बघायला वेळ कुठे आहे? मी तो ‘गणिताचा अभ्यास’ हा कार्यक्रम बघत होते.”
मला धक्काच बसला,“ तुम्ही आता गणित शिकणार? का म्हणून?”
“काय करणार. स्वागतला पहिल्या टेस्ट मध्ये थोडे कमी मार्क पडले ना.”
स्वागत म्हणजे कुमारचा एकुलता एक मुलगा. तो तर खूप हुशार होता.त्याला कमी गुण मिळायला काय झाले. आता तो तिसरीत शिकत असावा. ठीक आहे कमी तर कमी एवढे काळजी करण्यासारखे त्यात काय. “कमी म्हणजे किती कमी? पास तर झाला असेलच.” मी पण मूूर्खासारखे बोलून गेलो.”
“अहो, काळजी करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून काळजी करायची. स्वागतला फक्त ९९ मार्क मिळाले.” मला आयुष्यांत सगळ्यांत छान म्हणजे ६३ मार्क मिळाले होते. स्वप्नांतही ९९ मिळणे शक्य नव्हते. अगदी आत्ता जरी मी पाचवीच्या परीक्षेला बसलो असतो तरी. ह्यावेळी मात्र मी शहाणपणाने बोललो. “ एवढे कमी? ----“
“ नाहीतर काय. असे मार्क घेऊन आय आय टीत कशी ऍडमिशन मिळणार? माझी झोप उडाली पहा. मी स्वतःशी म्हटले असा धीर सोडून कसे चालेल? अॅमाझॉन वरून ही तिसरीच्याच्या गणिताच्या अभ्यासाची सीडी मागवून घेतली. तीच बघत होते. पण मलाही जरा डिफिकल्ट जाते आहे. खूप वर्षांनी पुन्हा बघते आहे ना. आता कुमारलाच बघायला पाहिजे. तरी बरं तो आय आय टीच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या क्लासला जातो. चूक आमचीच आहे. आम्ही त्याला तो पहिलीत असतानाच आय आय टीच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या क्लासमध्ये घालायला पाहिजे होता. आम्ही दोन वर्षे उशीर केला. मी असे ऐकले की काही आई वडील मुलाला पहिलीत ऍडमिशन घ्यायच्या आधीच आय आय टीच्या तयारीच्या तयारीच्या तयारी---------- काहीतरीच झाले हे. इतके मुलांना ताबडायचे म्हणजे. ते वय खेळण्याचे. अरे जरा खेळूद्या मुलांना."
मी असे पण ऐकले होते की हल्ली मूल पोटात असतानाच त्याला शिकवतात असे म्हणतात म्हणे!
आय आय टीच्या तयारीच्या कल्पनेने मला घाम फुटला. घशाला कोरड पडली. “वहिनी जरा पाणी ---.”
“गरमी पण वाढत चालली आहे. थांबा मी सरबत आणते.” किचन मध्ये जाता जाता वहिनींनी फॅन चालू केला.
सरबताची टेस्ट छान होती.
स्वागतच्या आईचे आय आय टीचे स्वप्न काही वाईट नव्हते. आज देशाला ----- इत्यादी इत्यादी. "आय आय टी का. वा छान. नाहीतरी आज देशाला इंजिनिअर्स फार गरज आहे. चांगले इंजिनिअर्स मिळताहेत कुठे.”
“अहो त्याला इंजिनिअरिंग थोडच करायचे आहे. आय आय टी ह्यासाठी की मग आय आय एम सहज जाता येते म्हणे, मी त्याचे करिअर प्लॅन करून ठेवले आहे.”
बिचारा स्वागत. त्याचे काय प्लॅन आहेत त्याचा कोणी विचार केला नव्हता. इकडे वहिनी पुन्हा मूळ विषयावर आल्या.
“तरीपण आमचा स्वागत क्लास मध्ये फर्स्ट आला बरका,” वाहिनी कौतुकाने सांगत होत्या, “ त्याला १०३.३३७ टक्के मार्क पडले. पण वर्गांत टफ कॉम्पेटेशन आहे. मोडकांची लतीकामनमोहिनी आहे नं ती दुसरी आली. तिला १०३.३३ टक्के मिळाले.”
मला अजून सरबत प्यावेसे वाटले. पण मागायची लाज वाटली.शंभर टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या ह्या मुला मुलींचे कौतुक करावे तितके कमीच. लतीकामनमोहिनीचे ०.००७ टक्के गुण कुठे गेले असावेत त्याचा मी विचार करत होतो. पण वहिनींना खुश करण्यासाठी बोललो, “लतीका मनमम मोमो मोहिनी--- लतीकामनमोहिनीला जरा जास्तच मार्क मिळाले नाही. काय तुम्हाला काय वाटतंय? ”
“देसाई, आपण काही बोलायचे नाही. चूप बसायचे. नुसते पहात राहायचे. पहा तुमच्या सारख्या त्रयस्थ माणसाला जे समजले पण त्यांच्या मिसला समजत नाही का? सगळे समजते. पण करणार काय. नोकरी करते बिच्चारी. एकदा माझ्यापाशी रडत होती. जाउद्या झाले.” हा डिट्टो माझा ऑफिस मधला अनुभव होता.
“तरी पण -- .” मी उगाचच.
“त्याचे काय आहे देसाई, शाळेत हल्ली एक्सट्रा करीक्युलर ऍक्टिव्हिटीजला मार्क असतात. म्हणजे डाँसिन्ग, सिंगिंग, स्पोर्ट्स ह्यांचे मार्क काउंट करतात. मला हे माहीत होते म्हणून मी स्वागतला झुम्बाचा क्लास लावला होता. तो योगा, क्रिकेट ही करतो. शिवाय रविवारी सकाळी जुडोला जातो. पण त्यांच्या मिसने डाँसिन्ग, सिंगिंगचेच मार्क घेतले. तिथेच ती स्कोर करून गेली.”
(योगा म्हणजे ज्याला आपण योग म्हणतो ते. अज्ञानी वाचकांसाठी)
“मग स्वागतला वाचायला वेळ मिळतो का?”
“आता काय वाचायचे राहिले.”
“नाही म्हणजे आचार्य अत्रे, माटे,भा रा भागवत, साने गुरुजी -----“
“साने गुरुजी ? काय शिकवतात ते. आय आय टी साठी क्लास आहे का. गाईडं लिहिली आहेत का त्यांनी?”
“आधी ते क्लास घेत असत. आता त्यांनी बंद केले लोकांना शिकवायचे.”
तेवढ्यात कुमारचा फोन आला. त्याला घरी यायला अजून उशीर होणार होता.
“सॉरी देसाई, आज काही जमेल असं दिसत नाही. काय करणार हे ऑफिस म्हणजे.”
“अरे कुमार, छोड दो ना. आपण भेटू नंतर कधीतरी.” मी त्याला सांगितले.
आता तेथे थांबण्यात काही अर्थ नव्हता. वहिनींचा निरोप घेऊन बाहेर पडलो.
प्रतिक्रिया
16 Sep 2021 - 9:27 am | गॉडजिला
नेहमीचा तडका नाही आहे.
6 Apr 2022 - 12:53 pm | चौथा कोनाडा
सत्य परिस्थिती !
6 Apr 2022 - 1:17 pm | तुषार काळभोर
बाकीच्या कथांपेक्षा हा लेख/कथा जास्त वास्तवाच्या जवळ जाणारा असल्याने, मनाला भिडला :)
आताच सत्यनारायणाच्या प्रसादासारखे १००% मार्क वाटले जाताहेत. पहिल्या क्रमांकाला १०३.३३७% आणि दुस-या क्रमांकाला १०३.३३% - हेही दिवस दूर नाहीत. आपले डोळे मिटायच्या आधी कदाचित हेसुद्धा दिसेल!