कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 1)

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
1 Aug 2021 - 10:01 pm

सुरवातीलाच सांगते मी पूरग्रस्त नाही, पुरामुळे माझं कोणतंही नुकसान झालेलं नाही.आधी अप्रत्यक्षपणे आणि पुरानंतर मी प्रत्यक्ष यात सहभागी होते आणि त्याचाच हा अनुभव.

तर माझं गाव चिपळूण. दर पावसाळ्यात बाजारपेठेत पाणी भरणं ही अगदी वार्षिक कार्यक्रम असल्यासारखी गोष्ट. क्वचित थोडं कमी जास्त होत पाणी. पण त्यात विशेष वाटावं असं काही नाही इतकी त्याची सवय झालेली. आज मी 10 वर्षाच्या मुलाची आई आहे. मी जेव्हा पहिली दुसरी मध्ये होते तेव्हापासून मला आठवतंय त्याप्रमाणे पावसाळ्यात पाणी भरल्याची सुट्टी मिळायची किंवा अर्ध्यातुन शाळा सोडून द्यायचे. सुदैवाने तेव्हा मी रहात असलेल्या भागात पाणी भरत नसल्याने आम्हाला फक्त शाळेला सुट्टी एवढाच कळत होतं. सांगायचा मुद्दा हा की इतकी वर्षे चिपळूण ला पाणी भरतंय. 2005 साल हे एक पुराचं भयंकर आठवणींचं साल म्हणून लक्षात आहे अजूनही. त्यावेळी 2005चा पूर हेच प्रमाण ठरवून नंतरची बांधकाम केली गेली.जुनी बांधकामं वर उचलली गेली. तेव्हासुद्धा बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली जाऊन प्रचंड नुकसान झालेलं होत. पण आपण लोक अश्या गोष्टी फक्त दंतकथानसाठी वापरतो. त्यातून बोध घेत नाही हे वाईट आहे. 2005 च्या पुरावर उपाय म्हणून जीव वाचवा म्ह्णून बांधकाम उंचावर केलं पण नवीन बांधकाम करताना कुठे भराव टाकतोय, कुठले नाले बुजवतोय, दलदलीचा भागात भराव टाकतोय,कुठले डोंगर पोखरतोय याचा विचार स्वार्थी लोकांनी केलाच नाही. याला जेव्हढं प्रशासन जबाबदार तेव्हढेच नागरिक सुद्धा जबाबदार आहेत.

तर असो, 21 तारखेला मी चिपळूण जवळच माहेरी निघाले. जाताना धुवांधार पाऊस बघून श्रीनिवास म्हणाला सुद्धा असाच पाऊस 3/4 तास पडला तर आज चिपळूण मध्ये पाणी भरेल. पण वर म्हटल्याप्रमाणे ते इतकं नेहमीच होत की व्यापारी पण थोड्या तयारीने राहत. आणि खरच तो पाऊस अजिबात थांबायचं नाव घेईना. रात्री बऱ्याच उशिरा गप्पा मारून मग आम्ही झोपलो तोवर पाऊस थांबला नव्हता. सकाळी उठलो तरी पाऊस कोसळतच होता. नदीला किती पाणी आलंय बघूया म्हणून सकाळी सकाळी अगदी दात न घासता, चहा न पिता आम्ही गाडीतून राऊंड मारायला गेलो. इथली गड नदी नेहमीपेक्षा जास्तच फुगली होती. अजून थोडा पाऊस आणि पाणी पुलावरून गेलं असतं. जरा धडकीच भरली. आईकडे घरात कधीही आयडिया ला नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे बाहेर पडल्यावर धडाधड मेसेज आले. आणि आम्ही चकित होत गेलो. चिपळूण ला पुराने 2005 ची लेव्हल क्रॉस केली होती. माझ्या चुलत भावाचं कापडाच दुकान आहे भर बाजारात. त्याचा मेसेज होता, " गाडी गेली, दुकान गेलं आता घरपण जाईल". मेसेज वाचून हादरलेच. सगळ्यांना वाचून दाखवला. लगेच फोन लावला. त्याचा हॅलो च इतका रडवेला होता की माझ्याच्याने पुढे बोलवेना. फोन एक एक करत बाकीच्यांनी घेतला. त्याला धीर द्यायचा प्रयत्न केला पण ते शब्द किती फसवे आहेत हे आम्हालाही कळत होतं. तरी तो राहायला पहिल्या मजल्यावर होता. पण तिकडे जाणाऱ्या जिन्यावर देखील पाणी चढायला सुरुवात झाली होती.इतर जणांची काय हालत झाली असेल, कोण कोण कुठे कुठे राहतात सगळी नावं एका झटक्यात डोळ्यासमोरून येऊन गेली. सकाळी मेसेज वर आलेले फोटो खूप काही सांगून जात होते. भावाच्या दुकानावरून इतर बाजारपेठेची सहज कल्पना येत होती. आणि अंगावर काटा येत होता.कोण कोण कुठे अडकले असतील?, त्यांची सुटका कोण करेल? नुसत्या पावसाने पाणी भरलं की धरणातून पाणी सोडलं? त्यावेळी काहीही सुचत नव्हतं की आम्ही काहीही करू शकत नव्हतो. सुदैवाने माझा फोन चालू होता त्यामुळे निदान मेसेज येत जात होते, परिस्थितीची कल्पना येत होती.
असेच मेसेज चालू असताना साधारण9.30 च्या दरम्यान शाळेच्या ग्रुप वर वर्गमित्राचा मेसेज आला की ,"आई बाबा घरात अडकले आहेत, कुणाकडे रेस्क्यु टीम चा नंबर असेल तर द्या ." परत एका क्षणात त्याचे आई (साधारण वय 68) वडील (साधारण वय 73) आणि त्यांचं घर तो एरिया डोळ्यासमोरून तरळून गेला. फॉरवर्ड मेसेज मधले सगळे नंबर पाठवले तर मी स्वतः देखील त्या नंबर वर फोन करण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने नेटवर्क नसल्याने त्यातला फक्त 1 फोन लागला जो उचलला गेला नाही. आपण काही करू शकत नाही हे जाणवून हतबलता जाणवली. तरीही मेसेज करून एकमेकांना धीर देण चालू होतं.

एकादशी होऊन गेली होती आणि पाऊस सुरू झाला होता. हवामान खात काहीही म्हणू दे पण कधीतरी आमची गावाची लोक म्हणतात ते खूप पटतं. पौर्णिमेपर्यंत पाऊस असाच पडणार हे भाकीत आधीच गावाच्या लोकांनी केलं होतं. 22 ला त्रयोदशी होती म्हणजे तो दिवस पण पाऊस पडणार होता. 23 ला सकाळी 10 ला पौर्णिमा लागतेय म्हणजे 23 पासून पाऊस कमी होईल. आम्हाला पुरात अडकलेले नसून देखील टेंशन आलं. आधीच एवढं पाणी भरलंय त्यात पाऊस असाच पडत राहिला तर पाणी आणखी वाढायचे. कसं होणार सगळ्यांच. भावाचं घर निदान बिल्डिंग मध्ये होत. जीव वाचवायला जायला मजले तरी होते. पण वर्गमित्राचे आई वडील काय करतील? कोण त्यांना मदत करतील? अनेक प्रश्न पण उत्तर काहीच नाही. वेळ जात होता. सकाळी 10 ची भरती होती म्हणजे आधीच भरलेल्या पाण्यात वाढ होणार. पण निदान 10 ची भरती झाली 11 पासून ओहोटी लागेल नि पाणी थोडं तरी कमी होईल अस वाटलं. पण तसं काहीही झालं नाही.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

1 Aug 2021 - 10:16 pm | गॉडजिला

:(

तुषार काळभोर's picture

1 Aug 2021 - 10:22 pm | तुषार काळभोर

आम्हाला बातम्या ऐकून, बघून, वाचून धडकी भरत होती. अप्रत्यक्ष का होईना पण तुमचा अनुभव रियल टाइम आणि थेट असल्याने अकल्पनीय स्थिती झाली असेल. त्यात तुम्ही सांगितलेली हतबलता.
जे प्रत्यक्ष त्या वेगवेगळ्या ठिकाणी पुरात अडकले, त्यांचं कसं झालं असेल!!

परमेश्वर सर्वांना या अस्मानी संकटातून उभे राहण्याची ताकत देवो...

बापरे किती भयानक परिस्थिती.

मदनबाण's picture

1 Aug 2021 - 10:48 pm | मदनबाण

सगळचं भयानक आहे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Kathalikkum Pennin Kaigal | RajheshVaidhya | Ramya Nambessan

Bhakti's picture

1 Aug 2021 - 11:36 pm | Bhakti

खुपच वाईट !
कालच मुलीला म्हणाले जोरात पाऊस पाहिजे,तर म्हणाली नाही आई जोरात पाऊस आला की लोकांची घर पाण्यात जातात टीव्हीवर दाखवलं आहे.एवढ्या लहानगीला वाईट वाटतंय.
तळीये गावाची दशा पाहून तर धस्स झालं.