वह कौन थी ?

Rahul Hande's picture
Rahul Hande in जनातलं, मनातलं
6 Jul 2021 - 1:58 am

अमेरिकेच्या टेक्सासमधील डल्लास शहरात २२ नोव्हेंबर १९६३ ला एक ऐतिहासिक घटना घडली. अमेरिकेचे अत्यंत लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांची एका रोड शोमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली. सुमारे शंभर वर्षांपूर्वी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची हत्या झाली होती. आजवर या दोन्ही घटनांमधील संबंध व साम्य दाखवण्यात अनेकांनी लेखण्या झिजवल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने शोध घेऊन त्यांना उलगडलेले रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी संपले नाही,ते या दोन घटनांमधील रहस्य. दोन्ही हत्यांमध्ये मारेकरी ठरविण्यात आलेल्यांची देखील लगेच हत्या झाली. त्यामुळे हत्या,हत्यारे आणि हत्येमागील हात कायमचे रहस्याच्या कृष्णविवरात गडप झाले. आज ही जगात या घटनांचे गूढ आकर्षण कायम आहे. केनडी यांच्या हत्येतील रहस्यात एका छायाचित्राने अथांग गहिरेपण भरले आहे. हत्येच्या प्रसंगी उपस्थितीत एका छायाचित्राकाराने काढलेल्या छायाचित्रात गोळी चालल्यानंतर उडालेल्या गोंधळात एक महिला अत्यंत शांतपणे तिच्या हातातील कॅमेराने तो प्रसंग टिपतांना दिसते. ब-याच संशोधनकर्त्यांनी या अज्ञात महिलेच्या हातात कॅमेरा सदृष्य पिस्तूल असल्याचा दावा केला आहे. सीआयएने महिलेचा प्रचंड शोध घेतला. मात्र हत्येच्या घटनेनंतर आजवर या महिलेचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. रशियन पद्धतीने बांधलेल्या स्कार्फमुळे ती इतिहासात 'द बबुश्का लेडी' म्हणून ओळखली जाते. मोनालिसाच्या हास्याप्रमाणे बबुश्का लेडीबद्दलचे गूढ आज ही अबाधित आहे. केनडींच्या हत्येनंतर संशयाची सूई तीनशे साठ अंशात फिरुन, अखेर एका बिंदूवर स्थिर झाल्यासारखी दिसते. हा बिंदू म्हणजे एक रहस्यमय व गूढ संघटन. ज्याला इल्युमिनाती म्हणून ओळखले जाते. बबुश्का लेडीचा संबंध इल्युमिनातीसोबत जोडण्यात आला. हत्येच्या मागे हे संघटन असल्याचा अंदाज साधार सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. सर्वसामान्यांना रॉ,मोसाद, सीआयए इत्यादी गुप्तहेर संघटना आणि त्यांचे रोमांचकारी कारनामे माहित असतात. यासर्व गुप्तहेर संघटनांच्याही आधीपासून अस्तित्वात असलेली गुप्तहेर संघटना म्हणूनही इल्युमिनातीचा उल्लेख अनेक ठिकाणी करण्यात आलेला दिसतो. हे संघटन गूढ,रहस्य,संशय,गैरसमज इत्यादींच्या धुक्यात गुरफटल्याने त्याचे नेमके स्वरूप व कार्य याबाबत अनेक कथा-दंतकथा निर्माण झाल्या. त्यामुळे इल्युमिनाताला समाजोपयोगी मानावे की समाजविघातक याबाबत जगातील अभ्यासक-संशोधक आणि विविध राष्ट्रांच्या गुप्तहेर संघटना यांच्यातच संभ्रम असलेला दिसतो. इल्युमिनातीबाबत जगात सर्वसामान्यांना अत्याल्प कल्पना असल्याचे जाणवते. आजवरच्या संशोधनात इल्युमिनातीसंदर्भात काही विश्वनीय माहिती संकलित झालेली दिसते. १७४८ साली जर्मनीच्या वबेरिया प्रांतात जन्मलेला एक अनाथ मुलगा. चुलत्याच्या आधाराने जगतो. जगाचे निदर्य वास्तव व विषमतेचे हलाहल पचवत मोठा होतो. भविष्यात आपण समताधिष्ठित समाजाची स्थापना करू असे स्वप्न उराशी बाळगतो. त्यासाठी शिक्षणाच्या जोरावर आपल्या जीवनाला आकार व अर्थ देतो. इंगोलश्टाट विद्यापीठात चर्च कायदा किंवा कॅनन लॉ आणि व्यावहारिक तत्त्वज्ञान विषयाचा प्राध्यापक-दार्शनिक आणि एक कुटुंबवत्सल गृहस्थ म्हणून ॲडम विशॉप्ट म्हणून ओळखला जाऊ लागतो. ॲडम विशॉप्ट आयुष्यात स्थिर-स्थावर झालेला असतो. बाहय जगात शांत दिसणा-या या प्राध्यापकाच्या मनात नव्या जगाचे विचार थैमान घालत असतात. मानवीनेच निर्माण केलेला धर्म,मानवाच्या गुलामीचे व शोषणाचे कारण बनला आहे. हा विचार विशॉप्टच्या मनात पक्का झालेला असतो. एक कॅथोलिक ख्रिश्चन म्हणून आणि चर्चच्या कायदयाचा अभ्यासक म्हणून धर्माचा अंर्तबाहय अनुभव व धर्म संकल्पनेतील व्यर्थतता त्याला अस्वस्थ करून गेलेली असते. धर्ममुक्त मानवी जीवन या संकल्पनेतून अखेर १ मे १७७६ ला ॲडम विशॉप्ट एका गुप्त संघटनेची स्थापना करतो. त्या संघटनेचे नाव ऑर्डर ऑफ इल्युमिनाती. इल्युमिनाटस हया लॅटिन शब्दावरुन इल्युमिनाती शब्द निर्माण झाला आहे. ज्याचा अर्थ प्रकाशमान किंवा प्रबुद्ध असा होतो. इल्युमिनातीला प्रबुद्धता युग गुप्त समिती असे देखील आपण मराठीत संबोधू शकतो. नव्या विश्वाच्या व्यवस्थेचे (New World Order) स्वप्न ॲडम विशॉप्ट आणि विद्यापीठातील त्याच्या पाच सहका-यांनी पाहिले. १७८४ पर्यत हया संघटनेची सदस्य संख्या पाच हजारापर्यंत गेली. धर्म व कर्मठता यापासून मुक्त अशा समानतेवर आधारित नव्या जगाची निर्मिती त्यांना करायची होती. इल्युमिनातीची संकल्पना स्पष्ट करणाऱ्या विशॉप्ट यांनी लिहिलेल्या पुस्तकाची एक प्रत आजही इंगोलश्टाट येथील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेली आहे. विशॉप्ट यांच्या घरात इल्युमिनातीच्या प्राथमिक गुप्त बैठका होत असत. संघटनेच्या सदस्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत गेली. स्थानिक सरकारला याचा सुगावा लागल्यानंतर इल्युमिनातीवर बंदी घालण्यात आली. विशॉप्ट यांना दुस-या शहरात पाठवण्यात आले. तेथे त्यांनी आपले उर्वरित आयुष्य शांततेत घालवले. त्यांची इल्युमिनाती मात्र चांगलीच बहरली. एका धर्मातीत व समताधिष्ठित जगाचे स्वप्न बाळगणा-या इल्युमिनातीची मूलभूत विचारधारा व उद्देश चांगले होते. पुढे मात्र इल्युमिनाती वादग्रस्त ठरू लागली. दुःखातून मुक्ततेसाठी ईच्छामरण अथवा आत्महत्येचे समर्थन, चूका करणा-यांना मृत्यूदंड देण्यावर विश्वास, धर्मावर श्रद्धा ठेवणारे लोक मुर्ख आहेत आणि त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे इत्यादी गोष्टी समोर आल्याने संघटनेवर अंकुश वाढवण्यात आला. याचबरोबर जगात सर्वत्र गर्भपातावर प्रतिबंध असतांना इल्युमिनातीद्वारे गर्भपाताला प्रोत्साहन देण्यात येत आहे. अशी माहिती सरकारी गुप्तहेर संघटनांना मिळाली. गर्भपातासाठी आवश्यक उपकरणे संघटनेच्या सद्स्यांकडून जप्त करण्यात आली. लिखाणासाठी न दिसणारी शाई,आत्महत्येला प्रोत्साहन देणारे लिखित साहित्य,तसेच अनेक विचित्र योजनांचे अंजेडे इल्युमिनातीच्या सद्स्यांकडून ताब्यात घेण्यात आले. यामुळे संघटनेला एक गूढतेचे वलय प्राप्त होऊ लागले. इल्युमिनाती आज एक षडयंत्रकारी संघटन म्हणून कुप्रसिद्ध झालेले व जाणीवपूर्वक केलेले दिसते. मार्क डाईस सारख्या षडयंत्र सिद्धांतवादी लेखकांच्या मते इल्युमिनाती आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. तसेच ब-याच षडयंत्र सिद्धांतांनुसार जगातील वर्तमान सरकारे आणि विविध संस्था यांच्या माध्यमातून या संघटनेचे सदस्य त्यांना अपेक्षित नव्या जगाला अस्तित्वात आणण्यासाठी अनुकुल घटना घडवत असतात. फ्रेंच राज्यक्रांती, वाटरलूची लढाई,केनडींची हत्या अशा अनेक ऐतिहासिक घटनांच्यामागे इल्युमिनातीच होती. उच्च शिक्षित असलेल्या इल्युमिनाती सदस्यांकडे विशिष्ट गूढ शक्ती आहेत. असे आरोप विविध गुप्तचर संघटना सातत्याने करत असतात. जगात कोणत्याही घटनेचे धागेदोर सापडत नसतील,तर जगातील सर्व कार्यक्षम गुप्तचर संघटनांना आपली अकार्यक्षमता व हतबलता यांचे खापर फोडण्यासाठी इल्युमिनातीच्या अदृष्य-अगोचर अस्तित्वाचा लाभ घेता येतो. एखादया चांगल्या व कल्याणकारी विचारधारेचा अतिरेक तिला कायमचे बदनाम करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इल्युमिनाती. द बबुश्का लेडी व इल्युमिनाती दोहोंच्या बाबतीत वह कोन थी ? हे गूढ असेच अबाधित राहणार आहे.
राहुल हांडे,
चलभाष – ८३०८१५५०८६
इमेल – handerahul85@gmail.com

इतिहासलेख

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

6 Jul 2021 - 7:53 am | गुल्लू दादा

इल्युमिनाती बद्दल आधी थोडेफार वाचले होते. धन्यवाद.

सौंदाळा's picture

6 Jul 2021 - 9:57 am | सौंदाळा

नवीन माहिती मिळाली.
लेखनशैली छानच

पाषाणभेद's picture

12 Jul 2021 - 7:50 pm | पाषाणभेद

असेच म्हणतो.

कुमार१'s picture

6 Jul 2021 - 11:47 am | कुमार१

चांगले लिहिलेय

गॉडजिला's picture

6 Jul 2021 - 1:10 pm | गॉडजिला

आपण अजून एखादा भाग यावर अवश्य लिहावा

तुषार काळभोर's picture

18 Jul 2021 - 2:38 pm | तुषार काळभोर

बबुष्का लेडी बद्दल पहिल्यांदा वाचलंय.
बाकी लिंकन आणि केनेडी या हत्या झालेल्या दोन अध्यक्षांविषयी काही योगायोग खचित आहेत.
Lincoln–Kennedy coincidences urban legend