दिठी- एक अनुभूती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
28 May 2021 - 2:11 pm

दिठी, एका सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणा-या सुखदु;खाची गाथा सांगणारी एक छोटीशी गोष्ट. अतिशय तरल, सुंदर, भावनांचा कल्लोळ, मनात निर्माण होणारे असंख्य विचार, सतत हिंदकळत राहावेत अशी एक उत्तम कलाकृती. एखादी सुंदर कथा, कादंबरी, वाचून झाल्यानंतर किंवा एखादं गाणं डोळे मिटून ऐकत राहावे, पुस्तक छातीवर उपडं करून त्या कथेत, संगीत मैफलीत रमून जावे त्यातून बाहेर पडूच नये असा आनंद देणारी कथा म्हणजे 'दिठी' मराठी चित्रपट. Deethi चित्रपटाची सुरुवात रामजीच्या एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने सुरू होते. रामजीचा मुलगा पावसात आलेल्या पुरातील भोवऱ्यात वाहून जातो, येथून हा चित्रपट हळूहळू पुढे सरकायला सुरुवात होते. रामजी हा लोहार काम करणारा ग्रामीण भागातला एक बलुतेदार आहे. गाव अतिशय सुंदर, टुमदार आहे, हिरवाईने नटलेले आहे, आणि सतत आभाळ आणि पावसाने भरलेले आहे. चित्रपटात येणारी पात्र अगदी मोजकी आहेत. सतत कोसळणारा पाऊस याचं छायाचित्रण तर अतिशय सुरेख आहे. अशा रामजीच्या आयुष्यातलं दुःखाची गोष्ट. मुलाच्या जाण्याने आपल्याच दुःखात गुरफटलेला रामजी. (किशोर कदम) जगण्यात आता काही रस उरलेला नाही. जगातच काही उरलेले नाही अशावेळी एक नवी आशा, एक नवी उर्जा, नवीन सर्जनात्मक गोष्ट घडते, एक नवा अंकुर रामजीच्या जीवनात घेऊन येतो त्याची ही कथा.

'आता आमोद सुनासी आले' या दि.बा.मोकाशींच्या लघुकथेवरील हा चित्रपट. दिग्दर्शन सुमित्रा भावे यांचे आहे. चित्रपटात माउलीचे दोन अभंग आहेत. पात्र, रामजी (किशोर कदम) जोशीबुवा ( डॉ.मोहन आगाशे) संतु वाणी ( दिलीप प्रभावळकर) गोविंदा (गिरीष कुलकर्णी) पारुबाई ( अमृता सुभाष) आणि अशा काही मोजक्या अभिनेत्यांच्या अभिनय तर उत्तमच झाला आहे, पण पाऊस हा एक खलनायक तर हंबरणारी गाय हे या चित्रपटातील कळवळून टाकणारी पात्र आहेत. छायाचित्रण तुषार पंडित यांचं अतिशय उत्तम दर्जाचं झालं आहे. एकूणच या सर्व टीमने एक वेगळी अशी कलाकृती निर्माण केली आहे.

दिठी म्हणजे दृष्टी, जगण्यातील वास्तवाकडे पाहण्याची दृष्टी. तीन दशके पंढरीचा वारी करणाऱ्या रामजीचा एकुलता एक मुलगा हिरावून गेल्यानंतर विठठलाला प्रश्न विचारणारा रामजी. अनेकांच्या दु:खात पांडुरंग म्हणून उभा राहणारा रामजी मात्र स्वतःच्या दु:खात कोलमडून जातो. आजूबाजूचा मित्रपरिवार, आठवड्याला पोथी-पुजा करणारे मित्र, समजवणारे सहकारी हे सर्व खोटं वाटायला लागतात. सोबत असलेला सावळा विठ्ठल सुद्धा आपल्याला मदत करीन नाही, अन्याय करतो तेव्हा रागाच्या भरात विधवा तरुण सुनेला जी ओली बाळंतीण असते तिला आणि तिच्या लहानमुलासहित 'निघून जा' म्हणणारा रामजी अतिशय उत्तम अभिनयाने जबरदस्त साकारला आहे. चित्रपटातील संवाद फार संथ आहेत, असे वाटायला लागते, अर्थात ते वातावरणास पोषक आहेत, आणि कलाकृतीला एका उंचीवर नेण्यास भाग पाडते असेही वाटते. संवादापेक्षा आजूबाजूचं चित्रपटात आलेलं चित्रण- वातावरण हे या चित्रपटाची खरी ताकद आहे. सव्वा तासाचा चित्रपट आहे, एक चहाचं दुकान, वाहणारी नदी, पाऊस, दिंडी, आणि दोन अभंग आपल्याला एका वेगळ्याच विश्वात नेतात. आणि सर्वांगसुंदर असा आनंद आणि अनुभूती देतात असे वाट्ते.

मराठीत अनेक आशयघन चित्रपट देणाऱ्या सुमित्रा भावे यांचा हा शेवटचा चित्रपट. हा चित्रपट बनविताना कलाकार, दिग्ददर्शक यांना आर्थिक पाठबळाशिवाय हा चित्रपट उभा करावा लागला असे वाचनात आले, सिनेमाला मदत करणारे हात आखडत गेले, शेवटी मोहन आगाशे यांनी स्वतःहून हा आर्थिक डोलारा सांभाळला, सिनेमातील कलाकारांनीही मानधन घेतले नाही, चित्रपट एकदा पडद्यावर येऊ द्या, मग बघू असे कलाकार म्हणाल्याचे वाचण्यात आले. दुर्दैवाने करोनाकाळ असल्यामुळे सिनेमा मोठ्या पडद्यावरही येऊ शकला नाही, अडलेल्या हंबरणाऱ्या गायीसारखीच या सर्व टीमची अवस्था झाली असे म्हणावे लागेल.

रामजीचं दुःख कशामुळे हलकं होतं, तो त्यातून बाहेर पडतो का ? त्याचं आकाश मोकळं होतं का आणि का होतं ? चित्रपट आनंद देतो काय ? यासाठी दिठी बघायलाच हवा. 'सोनी लीव' वर २१ मे पासून चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

कलाविचारसमीक्षामाध्यमवेध

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 May 2021 - 2:29 pm | प्रचेतस

उत्तम परिचय.
बऱ्याच काळानंतर तुमचे राजकीय विषय सोडून इतर विषयावर लेखन आले त्याबद्दल आभार.

सुमित्रा भावे-सुनिल सुकथनकर जोडीचे बरेच चित्रपट पाहिलेत आणि सर्वच आवडलेत. साधेपणा हे सर्वच चित्रपटांचे बलस्थान. हाही चित्रपट ह्या द्वयीने दिग्दर्शित केलाय की सुमित्रा भावेंचे नुकतेच निधन झाले म्हणून त्यांच्या सन्मानार्थ दिग्दर्शक म्हणून फक्त त्यांचेच नाव टाकलंय कळत नाही.

किशोर कदम आधी प्रामुख्याने गारवा अल्बममुळे सौमित्र म्हणून ओळखले जात. पण खूपच समर्थ अभिनेते आहेत ते.

सुमित्रा भावेंच्या इतर चित्रपटातही निसर्ग / आजूबाजूचा परिसर हेही एक पात्र म्हणूनच असते. दहावी फ मधली शाळा, वास्तुपुरुष मधला वाडा, देवराईतील देवराई आणि कित्येक इतर. प्रतिकांचा इतका चपखल वापर मराठीत इतर कुणीच केला नाही असे म्हणावेसे वाटते.

चित्रपट अवश्य बघणारच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2021 - 11:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुमित्रा भावेंच्या इतर चित्रपटातही निसर्ग / आजूबाजूचा परिसर हेही एक पात्र म्हणूनच असते. दहावी फ मधली शाळा, वास्तुपुरुष मधला वाडा, देवराईतील देवराई आणि कित्येक इतर. प्रतिकांचा इतका चपखल वापर मराठीत इतर कुणीच केला नाही असे म्हणावेसे वाटते.

अगदी खरंय...! बाकी, प्रतिसाद आवडलाच. मन:पूर्वक आभार.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

28 May 2021 - 2:29 pm | कंजूस

म्हणजे की काही करूण प्रसंग भाविक आस्तिकाला नास्तिक करणारे येतात. त्यापैकी एक.

यावर मायबोलीवरही लेख आला होता सुमित्रा भावेंचा सहायक झालेल्या चिनूक्स उर्फ चिन्मय दामलेचा।

सिरुसेरि's picture

28 May 2021 - 6:22 pm | सिरुसेरि

सुरेख ओळख . सुमित्रा भावे , सुनील सुकथनकर यांचे चाकोरी , दहावी फ , वास्तुपुरुष हे यापुर्वीचे चित्रपटही लक्षात राहिले आहेत . मायबोलीवरील लेखाची लिंकही हा चित्रपट समजुन घ्यायला उपयुक्त आहे .

कुमार१'s picture

28 May 2021 - 2:35 pm | कुमार१

उत्तम परिचय.

सरांचे उत्तम लिखाण. धन्यवाद.

उगीच याला चिमटा घेणे, त्याला शालजोडीतला देणे, इकडे कुणावर राजकीय काडी टाकणे तर तिकडे कुणाला सामाजिक चावी मारणे.. आणि मग कोणी बाहुले त्या चावीने टण टण झांजा वाजवणे चालू झाले की खो खो हसून मज्जा बघणे अशा खोड्या करण्यापेक्षा ज्येष्ठ मित्रांचे हे अस्सल लेखन सुखद वाटते.

प्रदीप's picture

28 May 2021 - 7:52 pm | प्रदीप

माझ्या अतिशय जिव्हाळ्याच्या 'आता आमोद सुनासी आले' ह्या दि.बांच्या कथेवरील चित्रपटाचा एक चांगला रिव्ह्यू, म्हणून वाचून आनंद वाटला.

मात्र "आणि मग कोणी बाहुले त्या चावीने टण टण झांजा वाजवणे चालू झाले की खो खो हसून मज्जा बघणे " असे म्हणणे म्हणजे प्राडॉ. जे काही इतर राजकीय भाष्ये असलेले लिहीत असतात, त्यांत त्यांची स्वतःची मते नसतात, तर ते नुसतेच 'चाव्या मारण्यासाठी लिहीलेले असते' हे म्हणणे, प्राडाँच्या 'इन्टिग्रीटी'चा अपमान आहे असे मला वाटते. (निदान, माझ्याबद्दल असे कुणी म्हटले, तर मला ते तसे नक्कीच वाटेल). असो, हे विषयांतर झाले.

जाता जाता, अनुभव व अनुभूती ह्यांत काय फरक असतो?

प्राडॉ. जे काही इतर राजकीय भाष्ये असलेले लिहीत असतात, त्यांत त्यांची स्वतःची मते नसतात, तर ते नुसतेच 'चाव्या मारण्यासाठी लिहीलेले असते' हे म्हणणे, प्राडाँच्या 'इन्टिग्रीटी'चा अपमान आहे असे मला वाटते.

हे राम...!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2021 - 11:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वारकरी संप्रदायातील संतमेळ्यातील ज्येष्ठ संत गोरोबाकाकांचा जो अधिकार, तोच आमच्या जालमेळ्यातील गविकाकांचा आम्हा मित्रांवर जेष्ठाचा अधिकार आहे, त्यांची मतं, त्यांचे विचार, त्यांचे लेखन, त्यांचे उपदेश आम्हा जालस्नेहींना नेहमीच आनंदायक आणि मार्गदर्शक असतात. अधुन मधुन गोरोबा काकांसारखी ते काही मडकी थाप मारुन तपासत असतात काही हाती लागतात, काही नाही इतकेच. बाकी, आपण आमच्या इन्टिग्रीटीचा जो विचार केला, आपली मतं व्यक्त केली त्याबद्दल आभारी आहे.

अनुभव व अनुभूती यातला फरक असा की, पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी या स्थूल इंद्रियांद्वारे जीवाला येणा-या आणि जाणवणा-या संवेदना असतात त्याला अनुभव म्हणतात. मोग-याची फुलं ओंजळीत असली की त्याचा नाकाद्वारे जो गंध येतो त्याला अनुभव म्हणतात, तर हातात मोगर्‍याची फुलं नाहीत आणि नाकाच्या वापराशिवाय जो मोग-याचा गंध येतो त्याला म्हणायचं अनुभूती.

चित्रपटात द्वैत आणि अद्वैत असा संबंध आहेच. तीस वर्ष वारी करुन पुण्य संचय केले त्याचा काहीच फायदा नाही का. तू माझ्यापेक्षा वेगळाच आहे. तटस्थ आहे. रामजीचे वारकरी मित्र जेव्हा रामजीच्या दु:खात असण्याकडे पाहुन म्हणतात, रामजी इतका जवळचा पण त्याचं दु:ख मला लागत नाही हे आश्चर्य आहे. आपण कळवळलो, पण आतलं सुखी आणि निश्चिंत मन हललं नाही. आपलं सगळं ठीक आहे ही भावना नी त्याची ऊब कधी तुटली नाही.

गविसर आणि आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

-दिलीप बिरुटे

प्रदीप's picture

29 May 2021 - 2:00 pm | प्रदीप

अनुभव व अनुभूती ह्यांतील सू़क्ष्म फरक विशद करून सांगितल्याबद्दल धन्यवाद. तर इथे तुमचे असे म्हणणे आहे, की हा चित्रपट म्हणजे आपणांसाठी अनुभूती होती! ह्याबद्दल आक्षेप घेणारा मी कोण? पण मला हे जरा 'फार-फेड (मराठी शब्द?) वाटले, म्हणूनच मुळात विचारले होते. ते एक असो.

आणि कुणी तुमच्या राजकीय लिखाणाविषयी, ते मुळात तुम्हाला अभिप्रेत नाही, तर तुम्ही निव्वळ राजकीय काड्या टाकता, व नंतर प्रतिसाद आले की (उत्तरे वगैरे न देता) खो खो हसून मज्जा बघत बसतां, असे म्हणताहेत, त्याला तुमचीच सहमती आहे, हे दर्शवलेत, हे चांगलेच केलेत. तर, ह्या धाग्याच्या संदर्भांत तेही असोच.

Bhakti's picture

29 May 2021 - 4:38 pm | Bhakti

वाह
चंदनाचा टिळा लावला विठू कपाळी
अंतरंगी श्वासात भिनला भक्ती परिमळ||
-भक्ती

चौकस२१२'s picture

31 May 2021 - 5:35 am | चौकस२१२

अनुभव व अनुभूती
प्रत्यक्ष इंद्रियांना जे दिसते/ स्पर्श करते तो अनुभव
अनुभव = .. प्रेयसी / बायको मिठीत असणे
अनुभूती: तीच व्यक्ती आपली आठवण काढीत असेल या विचाराणे सुखावून जाणे किंवा तिच्या पासून आपण खूप दिवस दूर असलो तर जी एक मानसिक + शारीरिक ओढ वाटते .. ती अनुभूती
सोप्या शब्दात सुचले ते हे असे

शाम भागवत's picture

3 Jun 2021 - 3:00 pm | शाम भागवत

अनुभव व अनुभूती या दोन्हींमध्ये अनुभव हा कॉमन फॅक्टर (मराठीत =समान धागा ?=समान घटक?) आहे असे मला वाटते.
अनुभूती मध्ये अनुभवातून काहीतरी बोध घेणे, काहीतरी शिकणे किंवा एखादा अर्थ अजून स्पष्ट होणे, असा थोडासा अर्थ अभिप्रेत आहे.
आणि जे काही शिकले त्यातून आपले वर्तन आणखी उच्च पातळीवर नेणे अभिप्रेत आहे.

वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास कोणतातरी सिध्दांन्त असतो. त्याच्यावर श्रध्देने विश्वास ठेऊन वाटचाल चालू असते. पण मग कधीतरी त्या सिध्दान्ताचा अनुभव येतो. त्यावेळेस अनुभूती आली असे म्हणता येईल. त्यानंतरची वाटचाल पहिल्यासारखीच चालू राहते पण ही वाटचाल श्रध्देवर नव्हे तर अनुभवातून मिळालेल्या ज्ञानावर आधारित असते. किंवा ज्ञानोत्तर वाटचाल म्हणता येईल. मग हा सिध्दांन्त पहिल्या पायरीवरचा असो किवा "तत्वमसि" या शेवटच्या पायरीवरचा असो.

निदान अध्यात्मिक विवेचनात तरी अनुभूती या शब्दाचा असा उपयोग करतात अशी माझी समजूत आहे.

त्यामुळे व्यवहारिक जगात या शब्दाची वेगळी व्याख्या कोणी करत असेल तर त्याला माझी काही हरकत नाही.
मग भले मग ती मिठी मारण्याची अनुभूती असो.
शिवाय अध्यात्मिक बाबीतही कोणी नवा पायंडा पाडू इच्छित असेल तरी माझं काही म्हणणं नाही.
🤣

शाम भागवत's picture

3 Jun 2021 - 3:02 pm | शाम भागवत

तर हातात मोगर्‍याची फुलं नाहीत आणि नाकाच्या वापराशिवाय जो मोग-याचा गंध येतो त्याला म्हणायचं अनुभूती.

मला वाटते याला "स्मृती" हा शब्द वापरत असावेत.

चौकस२१२'s picture

31 May 2021 - 5:28 am | चौकस२१२

प्रदीप...
इंटिग्रेटी चा अपमान करण्याचाच कोणाचा हेतू नसावा... एक चांगलं लिहू शकणाऱ्या विचारी माणसाने सतत एकच अंगाने का लिहावे ! याचा खेद होता .. म्हणून माझ्य हि प्रतिसादात प्रोफेश्वरचे कौतिक आणि हीच विनंती केली कि हातोटी आहे तर असे छान लिहीत जा.. राजकीय विषयवार लिहू नका असे नाही पण मग चर्चेपासून पळून जाऊ नका .. पण ते तरी कशाला... हे असे मस्त विश्लेषण / परीक्षण लिहा .. चांगले वाटले

दुर्दैवाने काही जेष्ठ (म्हणजे मिपावयाने जेष्ठ) तर आता प्रतिसादमात्र उरलेत त्यांचा इतरांचा व एकूण सर्वांचाच लेखन संन्यास यानिमित्ताने सुटो ज्यातून सुखद वाचनाचा महापूर मिपावर येवो हीच त्या दिठी मधल्या विठ्ठलाचरणी प्रार्थना.

@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रकरण परमेश्वरापासून माणुसकीकडे जाणारे वाटत आहे, ट्रेलरमधे सगळ्यांनी गँभीर अभिनय अत्यन्त खंभीरपणे केलाय असा देखावा सिनमधील चेहरे व संवाद बघून निर्माण होतोय (ज्यात रॉ फ्लो मिसिंग आहे कलाकार पाडद्यावर न्हवे रंगमंचावर वाटत आहेत) अर्थात कथानकाचा आगापिछा समजल्यावर याचे जस्टीफिकेशन काय ते व्यवस्थित स्पष्ट चित्रपटात नक्कीच होत असणार , त्यामुळे हा चित्रपट एक अभिनयशाळा ठरणार असं वाटतं.

बाकी स्वदेस चित्रपट सलग न बघू शकणाऱ्यानी हा चित्रपट एका सिटिंगमधे संपूर्ण बघण्याच्या नादी लागू नये असे वैयक्तिक मत.

सौंदाळा's picture

28 May 2021 - 2:49 pm | सौंदाळा

चित्रपट ओळख / परीक्षण छान लिहिले आहे.
निसर्ग, रंगसंगती यांनाच कथानकाचा भाग बनवुन कथा पुढे न्यायला खूपच स्किल लागत असेल.
सर्व अभिनेते पण तगडे दिसतायत. चित्रपट नक्कीच बघेन.
सर, आता थांबू नका.

मराठी_माणूस's picture

28 May 2021 - 3:32 pm | मराठी_माणूस

चित्रपटाची छान ओळख. मोकाशींची कथा वाचलेली आहे.
ह्यांचाच "बाधा" नावाचा एक छान चित्रपट अ‍ॅमॅझॉन प्राइम वर नुकताच पाहीला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2021 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाधा चित्रपट पाहिलाय, पण शेवट असा काही खास भिडला नव्हता, त्याही चित्रपटातले छायाचित्रण मस्तच आहे. प्रतिसादाबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

28 May 2021 - 5:29 pm | चौथा कोनाडा

💖
अतिशय सुंदर ओळख ! सुमित्रा भावेंचे सिनेमे आवडतातच.
ओटीटी सभासद नसल्यामुळे कसा पाहणार हा प्रश्नच आहे !

Bhakti's picture

28 May 2021 - 6:20 pm | Bhakti

वाह !
सुंदर परीक्षण लिहिले आहे.
मातीतला,मनाला स्पर्शणारा,उत्तम सिनेमाटोग्राफी असणारा सिनेमा वाटतोय.

तुषार काळभोर's picture

28 May 2021 - 6:43 pm | तुषार काळभोर

छान ओळख.
दिग्दर्शक आणि अभिनेते दोन्ही मराठी चित्रपट सृष्टीतील अतिशय वरच्या स्तरातील असूनही चित्रपट निर्मितीला आर्थिक पाठबळ मिळू नये ही केवळ दुर्दैवी नव्हे तर महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. अशा चित्रपटांनाही जर निर्माते मिळणार नसतील (कारण प्रेक्षक मिळणार नसतील) तर मराठीच्या नावाने स्वतःचीच छाती पिटून घेण्याला काही अर्थ उरत नाही.

तर गल्ला नाय. पण सोनी लिव ओटिटिने राईट्स घेऊन निर्मात्यास थोडेफार पैसे मिळवून दिले असतील. पण बाकिचे निर्माते एवढे नशिबवान नसतील.

चौकस२१२'s picture

28 May 2021 - 7:04 pm | चौकस२१२

वा छान ओळख करून दिलीत ... एक विंनती, चालू घडामोडी आणि राजकारण जरा सोडून असेच छान लिहा जास्त

उपयोजक's picture

28 May 2021 - 7:20 pm | उपयोजक

थोडे अवांतर:
'गिरीष' आणि 'गिरीश' यातलं अचूक कोणतं? आणि का?

कंजूस's picture

28 May 2021 - 9:13 pm | कंजूस

काय बरोबर
शब्दाचे योग्य रूप कोणते ? इथे पाहा.

कॉमी's picture

28 May 2021 - 10:50 pm | कॉमी

ओळख छान !

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 May 2021 - 11:26 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली.. असेच काहीसे नेहमी लिहीत जा राव...

पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2021 - 11:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनाला दाद देणा-या सर्व प्रतिसाद लिहिणा-या मिपाकर मित्रांचे मनःपूर्वक आभार. वाचकांचेही आभार. आपण तोडक्या-मोडक्या लेखनाला दाद देऊन लिहिण्यास प्रोत्साहन देता, त्यामुळे निश्चितच आनंद होतो. सर्वांचे तहेदिलसे शुक्रिया....!

आता आमोद सुनासि आले | श्रुतिशी श्रवण निघाले |
आरसे उठले | लोचनेशी.

-दिलीप बिरुटे
(आनंदी)

कंजूस's picture

29 May 2021 - 12:09 pm | कंजूस

लिहिते राहा.

अनुभव व अनुभूती यातला फरक असा की, पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी या स्थूल इंद्रियांद्वारे जीवाला येणा-या आणि जाणवणा-या संवेदना असतात त्याला अनुभव म्हणतात.

मोग-याची फुलं ओंजळीत असली की त्याचा नाकाद्वारे जो गंध येतो त्याला अनुभव म्हणतात, तर हातात मोगर्‍याची फुलं नाहीत आणि नाकाच्या वापराशिवाय जो मोग-याचा गंध येतो त्याला म्हणायचं अनुभूती.

वा वा वा आत्मिकतेची इतकि साधी, सोपी, लोभस व्याख्या मिपावर लिहणारे बहुदा तुम्हीच... तुमच्या पेर्णा तपासणे आता फार आवश्यक वाटु लागले आहे. कुठे ही अनुभुतिची सुरेख व्याख्या अन स्पष्टिकरण अन कुठे.... तुमचे ते... जाउदे... इथे तो विषय नको.

स्मांतर चित्रपटाच्या सर्व प्रेक्षकांना मनसोक्त शुभेच्छा चित्रपट बघुन झाल्यास इथे / मिपावर आवर्जुन अभिप्राय द्यावा. बाकी ज्या कारणासाठि मिपाचे खरे अस्तित्व उभे आहे त्या अनुकुल एक धागा काढल्याबद्द्ल धागा लेखकाचे अत्यंत आभार्स.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2021 - 2:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुभव अनुभूतीबद्दल आपली काही मतं, विचार असतील तर इथे लिहा समजून घ्यायला आवडेल. किंवा नव्या धाग्यावर नवा विषय सुरु केला तरी चालेल. मांडलेला विचार अंतिम आहे, असे थोड़ीच आहे. मला जे वाटलं, ते लिहिले. आपणास वाटेल ते लिहावे. आपलाही या विषयातील अभ्यास समजून घेता येईल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

गॉडजिला's picture

29 May 2021 - 8:39 pm | गॉडजिला

सर माझा तसा अभ्यास नाही, आणि मनाला भिडेल असे काही चांगले लिहावे ही माझी प्रतिभा नाही, मिपाच्या ध्येयधोरणांचा मान आणि भारतीय कायद्यांची मर्यादा पाळत उजवीकडे अथवा डावीकडे स्वताचा तोल जाउ न देता प्रतिसादत राहणे, आणि मिपाकरांच्या इथल्या उस्फुर्त आणी रंजक योगदानाचा आनंद घेणे यापलीकडे काहीच माझे काहीही महात्म्य नाही, साध्य नाही.

तरीही आपल्या सुचनेसाठी/अभिप्रायासाठी आपले मनःपुर्वक धन्यवाद.

गॉडजिला's picture

29 May 2021 - 1:26 pm | गॉडजिला

मन आणि बुद्धी या स्थूल इंद्रियांद्वारे जीवाला येणा-या आणि जाणवणा-या संवेदना असतात त्याला अनुभव म्हणतात.
असे असेल तर अनुभुति एक तर झोपेत तरी येत अस्लि पाहिजे,अथवा झोपेत नसुनही मन आणि बुध्दीची कक्षा ओलांडल्यावर तरी.. ?

धागा लेखकाला वरिल गोष्टीचे ज्ञान झालेच कसे या बद्द्ल अत्यंत कुतुहल आहे.

अनिंद्य's picture

29 May 2021 - 5:00 pm | अनिंद्य

आता आमोद सुनासि आले !

उत्तम परिचय करून दिलात सर, सौष्ठवपूर्ण लेख !

कासव's picture

30 May 2021 - 11:33 pm | कासव

खुप छान परिचय करून दिल्यामुळे चित्रपट पाहिला. पण मला तरी थोडा रटाळ वाटला. हे माझे वैयक्तिक मत. चित्रीकरण, निसर्ग आणि गायीचा योग्य वापर ह्याला ५/५ मार्क. दोन्ही अभंग पण छान आहेत. पण कथा थोडी सावकाश सरकते आहे. तासा भराचा चित्रपट पण पळवून पहावा लागला. मला गाभा कळला नसेल कदाचित. पण मला कळलेला सारांश "show must go on"

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2021 - 1:24 pm | चौथा कोनाडा

चित्रपट पाहिला. पण मला तरी थोडा रटाळ वाटला.

हा किंचितदोष मला कासव सिनेमा बघतानाही जाणवला. पण एकंदरीत आवडला होता कासव.

वेगळ्या धाटणीचा कोर्ट देखील भारी होता. पण शेवटचा एक बाळबोध प्रसंग (म्हण्जे जे सिनेमाभर सांगितले आहे, त्यासाठी पुन्हा एक पुनरुक्ति प्रसंग रटाळते कडे झुकणारा) जो माझा पोपट करुन गेला ! कोर्ट म्हटला मी हमखास पोपट प्रसंग आठवतोच !

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2021 - 1:24 pm | चौथा कोनाडा

चित्रपट पाहिला. पण मला तरी थोडा रटाळ वाटला.

हा किंचितदोष मला कासव सिनेमा बघतानाही जाणवला. पण एकंदरीत आवडला होता कासव.

वेगळ्या धाटणीचा कोर्ट देखील भारी होता. पण शेवटचा एक बाळबोध प्रसंग (म्हण्जे जे सिनेमाभर सांगितले आहे, त्यासाठी पुन्हा एक पुनरुक्ति प्रसंग रटाळते कडे झुकणारा) जो माझा पोपट करुन गेला ! कोर्ट म्हटला मी हमखास पोपट प्रसंग आठवतोच !

अन्या बुद्धे's picture

4 Jun 2021 - 8:53 am | अन्या बुद्धे

नक्की बघणार. सुंदर परिचय..

गॉडजिला's picture

18 Jun 2021 - 7:24 pm | गॉडजिला

नाहीतर आपणच पिक्चर बनवायचे आपणच त्याबद्दल चांगले चुंगले लिहून आणायचे.आपणच इंस्टावर रडू रडू प्रमोशन करायचे हे काही खरे नाही गड्या…

https://bolbhidu.com/people-should-be-able-to-choose-their-language-that...