मृत्यूचा दंश

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
26 May 2021 - 11:55 am

सर्वांना नमस्कार. सर्व जण कसे आहेत? सर्व जण आणि आपले जवळचे लोक ठीक असतील अशी आशा करतो. सध्याच्या दिवसांमध्ये आपण सर्व जण ज्यातून जात आहोत, त्या संदर्भात काही विचार शेअर करतो. सध्या आपण सतत मृत्युचा सामना करत आहोत. आपल्यापैकी अनेकांनी जवळचे लोक गमावले आहेत. आपल्यापैकी अनेकांनी मरणप्राय यातना सहन केल्या आहेत. आपल्याला शक्यतो कधीच मृत्यु हा डोळसपणे बघायला शिकवलं जात नाही. शक्यतो लहानपणापासून आपल्याला मृत्यु ही गोष्टच कळू दिली जात नाही. स्मशानसुद्धा गावाच्या बाहेर असतं आणि आपण हा विषय कधी आपल्या बोलण्यातही आणत नाही.

पण डोळसपणे बघितलं तर कळतं की, मृत्यु ही शाश्वत गोष्ट आहे. किंबहुना आपल्या आयुष्यामध्ये मृत्यु जितका कन्फर्म आहे, तितकं कन्फर्म बाकी काहीही नाही. पैसा, प्रतिष्ठा, सुख, समाधान, शांती ह्या गोष्टी मिळतील किंवा मिळणार नाहीत. त्याबद्दल निश्चित काहीही सांगता येत नाही. पण मृत्यु हा निश्चित आहे. इथे कोणाचंही तिकिट वेटिंग किंवा आरएसी नाहीय तर अगदी कन्फर्म आहे. आज बुद्धपूर्णिमा आहे. तथागत बुद्ध आपल्या भिक्षुंना मृत्युवर ध्यान करण्यासाठी स्मशानात पाठवायचे. दोन दोन महिने ते भिक्षुंना स्मशानात पाठवायचे व म्हणायचे की, बघा मृत्युला. जो देह जळत आहे, ज्वाळा ज्या शरीराला जाळत आहेत, तो नष्ट होणारा देह नीट बघा. आणि डोळसपणे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक दिवस तुमचाही देह असाच नष्ट होणार आहे.

जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यु होतो, तेव्हा एका अर्थाने आपलाही मृत्यु होतो. कारण आपण तो व्यक्ती आपला एक भाग असतो किंवा आपण त्या व्यक्तीचा एक भाग झालेलो असतो. त्यामुळेच एक रिक्तता येते. एक पोकळी निर्माण होते. जर डोळसपणे आपण मृत्युला बघू शकलो तर त्यामध्ये आपल्याला आपलाही मृत्यु दिसतो. पण समाजाने आपल्याला नेहमीच मृत्यु बघण्यापासून दूर ठेवलं आहे. त्यामुळे आपण इतक्या उघड्या डोळ्यांनी मृत्यु बघू शकत नाही. पण जर आपण थोडी हिंमत करून आपला मृत्यु बघू शकलो तर आपल्याला घडणा-या प्रत्येक मृत्युमध्ये आपला स्वत:चा मृत्यु दिसायला लागतो. आपल्याला ते सत्य लक्षात येतं‌ मग की, होय, इथे प्रत्येकाचा मृत्यु निश्चित आहे. आणि जेव्हा आपण दुस-या व्यक्तीचा मृत्यु हा एका अर्थाने स्वत:चाच मृत्यु आहे, त्याचीच पूर्वसूचना आहे असं म्हणून जेव्हा बघतो, तेव्हा हळु हळु त्या मृत्युचा दंश कमी होत जातो. आपल्याला आतून जाणीव होत जाते की, जे कन्फर्म आहे, जे होणारच आहे, ते नाकारून काहीच उपयोग नाही. आणि जेव्हा आपण मृत्युला स्वीकारतो तेव्हा जीवनाचे दुसरे अर्थ आपल्याला उलगडत जातात. मग जेव्हा आपण एखादा गलितगात्र माणूस बघतो किंवा एखादा अतिशय विकलांग स्थितीतला रुग्ण बघतो तेव्हा आपल्याला आतून जाणीव होते की, एक दिवस माझीही ही अवस्था होणार आहे. आज जे त्या व्यक्तीचं सत्य आहे, तेच माझं उद्याचं सत्य आहे.

मृत्युची आठवण जर आपण सतत ठेवली तर जीवनाचा अर्थ बदलत जातो. जीवनात दु:ख आहे, दु:खाचं कारण आहे, दु:ख मुक्तीचा उपाय आहे व दु:ख नसलेली अवस्था आहे असं सांगणा-या बुद्धांच्या ध्यानाच्या मार्गाकडे आपल्याला जाता येतं. थोडसं वेगळ्या शब्दांमध्ये सांगायचं तर त्यामुळे अशी जाणीव होते-

मै पल दो पल का शायर हूँ
पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है
पल दो पल मेरी जवानी है

ही जाणीव जर आपल्याला खोलवर झाली तर हळु हळु बुद्धांनी सांगितलेल्या निर्वाणाच्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला मृत्युच्या पलीकडे असलेलं निर्वाणाचं सत्य गवसतं तेव्हा तो माणूस असं म्हणू शकतो-

मै हर एक पल का शायर हूँ
हर एक पल मेरी कहानी है
हर एक पल मेरी हस्ती है
हर एक पल मेरी जवानी है

सत्याच्या ह्या मार्गावर जाण्यासाठी आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

(हा लेख इंग्रजीत वाचण्यासाठी व ध्यानाबद्दलचे माझे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करावे: www.niranjan-vichar.blogspot.com niranjanwelankar@gmail.com 09422108376)

धर्मजीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

26 May 2021 - 2:37 pm | गॉडजिला

तो नष्ट होणारा देह नीट बघा. आणि डोळसपणे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक दिवस तुमचाही देह असाच नष्ट होणार आहे.

- एकदम सुस्पष्ट प्रकरण.

मै हर एक पल का शायर हूँ
हर एक पल मेरी कहानी है
हर एक पल मेरी हस्ती है
हर एक पल मेरी जवानी है

- हे तर एकदम खासच.

गौतम बुद्ध हे भारताला पडलेले सर्वात सुंदर स्वप्न होय... स्वप्न या अर्थाने कि सध्या त्याने सांगितलेले सत्य समजून घेण्याची तयारी राखणारे फार थोडे आहेत.

अमर, मृत्यूने न मरणारा, अग्नीने न जळणारा आत्मा बंदिस्त होऊ शकत नाही तर तो मुक्त कसा होईल असा प्रश्न विचारला कि तो आधीच मुक्त आहे फक्त त्याला बंदिस्तपणाचा भ्रम झालाय वगैरे गोंधळ सामान्य माणसे हिरीहीरीने करत राहताना आत्म्याचे सेपरेट अस्तित्व स्पष्ट नाकारून त्याजागी अहंकाराचे वास्तव उलगडून दाखवून जगातील याच्यावत सजीव निर्जीवांचा सर्वांचा मिळून फक्त आणी फक्त एकच आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे हे ठणकावुन सांगणारा शास्त्रज्ञ म्हणजे बुद्ध होय. या स्वरूपाला आत्मशून्यता हा योजलेला (काहीसा नकारात्मक) शब्द जेंव्हा मी प्रथम वाचला त्यांनतर स्वस्वरूपाला स्पष्ट करणारा इतका चपखल शब्द मला बुद्ध सोडून इतर कोणत्याही धर्म/ज्ञान/विज्ञान आधारीत ग्रंथात वाचायला मिळाला नाही.

अहंकाराच्या आधारे प्रत्येक व्यक्ती पुन्हा पुन्हा फक्त शरीरच धारण करत राहते असे न्हवे तर हा माझा आत्मा तो तुझा आत्मा हा भेद व महान वैचारिक गोंधळही हा अहंकारच तयार करतो व त्या अहंकाराचा त्याग केल्यास मूलस्वरूप एकच असल्याने सर्वकाही तोच आहे त्याच्यापासून वेगळे असे काहीही नाही याचा अनुभवघेण्यास बुद्ध तत्वज्ञान, साधना हे एक सर्वोत्तम मार्गदर्शन आहे.

अष्टांग योग प्रथम बुद्धाने काढला कि पातंजल ऋषिनी यावर नेमके जन्मवर्ष ठाऊक नसल्याने जाणकार कितीही व कोणताही वाद घालोत त्यातून त्यांची महानता लपून राहू शकत नाही.

भगवान बुद्धांच्या स्वतःच्या शिकवणीत हिंदू धर्मापासून वेगळे असे विशेष काही नव्हते. धम्म हा शब्द धर्म होय. योग असो वा आत्मा बुद्धांची शिकावं बहुतांशी हिंदू ऋषी मुनींच्या शिकवणीप्रमाणेच होती. बुद्धांची भाषा थोडी सोपी आणि कमी कर्मठ होती. ज्ञानेश्वर माऊलींनी गीता मराठीत आम्हाला उपलब्ध करून दिली त्याच प्रकारे. विपश्यना हि प्रक्रिया बुद्ध ह्यांनी स्वतः शोधून काढली असे मानले जाते. पण तसे असले तरी बुद्ध काही हिंदू धर्मापासून वेगळे ठरत नाहीत, कारण विविध ऋषी मुनींनी अश्या नवीन पद्धती शोधून काढायला होत्याच.

माझ्या मते आंबेडकरवादी लोकांनी भारतनत बौद्ध धर्म आणि बौद्ध शिकवण ह्याला मुख्य हिंदू धर्मापासून वेगळे दाखवण्याचा जो प्रयत्न केला त्यातून उगाच बुद्ध ह्याची प्रतिमा वेगळी झाली आहे.

बुद्ध आणि जात :

बुद्ध ह्यांनी जात नाकारली असे म्हटले जाते. हे सुद्धा खोटे आहे. बुद्ध ह्यांचे सुमारे ४०% विद्यार्थी ब्रह्मन् होते ह्यातील अनेक फार महान विद्वान बौद्ध भिक्कू झाले. बुद्धांचे मित्र राजा प्रसेनादी ह्यांना जेंव्हा समजले कि त्यांची शक्या राजकुमारी पत्नी प्रत्यक्षात शक्य राजा आणि त्यांची दासी ह्यांच्या पासून निर्माण झालेली स्त्री आहे तेंव्हा त्यांनी तिला हाकलले. इथे बुद्ध स्वतः मध्ये पडले आणि त्यांनी राजाला सुनावले कि व्यक्तीची जात हि त्याच्या पित्या वरून ठरते आणि त्यामुळे माता कुणीही असली तरी पिता राजा असल्याने राजकुमारी सुद्धा राज घराण्याचीच क्षत्रिय आहे. इथे बुद्धांनी गाढव आणि घोड्याच्या वर्णसंकराचे उदाहरण दिले होते.

भगवान बुद्धांच्या स्वतःच्या शिकवणीत हिंदू धर्मापासून वेगळे असे विशेष काही नव्हते.

योग असो वा आत्मा बुद्धांची शिकावं बहुतांशी हिंदू ऋषी मुनींच्या शिकवणीप्रमाणेच होती.

ह्याचा काही आधार द्याल का?

बुद्धाची शिकवण तुम्ही कुठे/कशी अभ्यासली त्याचाही तपशील मिळाला तर समजायला आणखिन सोपं होईल.

- (अभ्यासू) सोकाजी

> बुद्धाची शिकवण तुम्ही कुठे/कशी अभ्यासली त्याचाही तपशील मिळाला तर समजायला आणखिन सोपं होईल.

भगवान बुद्ध ह्यांच्या शिकवणीचा अभ्यास मी २०१२ मध्ये केला होता. मी धार्मिक नाही त्यामुळे हा अभ्यास निव्वळ पुस्तके वाचून आणि बौद्ध आणि त्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांबरोबर चर्चा करून आहे. डॉक्टर एलस्ट, भरत गुप्त, आंबेडकर ह्यांचे थोडे राजकीय अंगाने जाणारे लेखन, अॅलन वॉट्स ह्यांचे तत्वज्ञानिक दृष्टिकोनातून झालेले लेखन, आणि काही प्रमाणात Eugène Burnouf ह्यांचे ऐतिहासिक दृष्टिकोनातून बुद्धिजम ह्यावरील लेखन ह्या सर्वांचा थोडाफार अभ्यास आहे.

अभ्यासाचा मूळ उद्देश भारतांत बौद्ध धर्म विशेष का पसरला नाही पण विदेशांत तो जास्त का पसरला ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणे होते.

माझ्या मते अॅलन वॉट्स ह्या हरहुन्नरी माणसाने ह्या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यांत दिले आहे. "buddhism is hinduism stripped for export"

बौद्ध धर्म भारतांत हा प्रामुख्याने बौद्ध भिक्षु ह्यांचा स्वरूपांत जिवंत होता. सामान्य भारतीय माणसासाठी बौद्ध हा एक संप्रदाय असल्याने "बौद्ध" म्हणून स्वतःला डिक्लेर करायची कुणालाच गरज वाटली नाही. बौद्ध शिकवण हि बहुतांशी मूळ हिंदू शिकवणच होती. इस्लाम आल्यानंतर त्यांनी बौद्ध भिक्षूंना ठार मारले आणि त्यामुळे ठळक पणे बौद्ध लोक दिसायचे बंद झाले तर शिकावं मात्र भारतांत तशीच राहिली. स्वतः आंबेडकर असे लिहितात.

पण जपान, फ्रांस किंवा चीन देशांचे उदाहरण वेगळे आहे. यांच्यासहित बौद्ध शिकवण नवीन होती, सुटसुटीत होती आणि समजायला सोपी होती आणि त्यांच्या स्थानिक धर्मापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. त्यामुळे तिथे ठळक पाने स्वतःला बौद्ध म्हणून घेत असत.

> ह्याचा काही आधार द्याल का?

सोपे आहे.

भगवान बुद्ध हे क्षत्रिय कुळांत जन्माला आले पण अवघ्या २९व्य वर्षी त्यांनी सर्व सुखांचा त्याग केला. हिंदू पद्धतीत ह्याला सन्यास असेच म्हणतात. सन्यास घेऊन त्यांनी विविध गुरूंचा आश्रय घेतला आणि विविध योग्य पद्धती अभ्यासल्या. हे सर्व त्या काळाच्या हिंदू धर्मातील परंपरांना धरूनच होते. यद्न्यवल्क्य हे श्रीमंत राजदरबारातील पुरोहित होते ज्यांनी सर्व काही (दोन पत्नी सुद्धा) सोडून सन्यास घेतला. त्याच परंपरेंत बुद्धांचा प्रवास झाला. बुद्ध स्वतः कधी हे नाकारत नाहीत.

आम्ही बुद्धांना बुद्ध म्हणत असलो तरी बुद्धांचे शिष्य त्यांना "शाक्यमुनी" म्हणून संबोधित करतात. शाक्य कुलांतील मुनी. बुद्धांनी स्वतः कधी ह्या नावाचा त्याग केला नाही. जेंव्हा कोसल राजाने शाक्यांचे शिरकाण केले तेंव्हा सुद्धा बुद्ध आणि त्यांच्या शिष्यानी हे नाव सोडले नाही.

बुद्धानी विविध योग आणि ध्यान पद्धती अभ्यासल्या पण त्यातील कुठलीच त्यांना विशेष पसंद पडली नाही. तरी सुद्धा आपल्या शिकवणीत त्यांनी विस्तृत पद्धतीने त्यावर चर्चा केलीच पण विपश्यना हा मार्ग त्यांनी आपला स्वतःचा असे प्रतिपादन केले. अनेक ख्रिस्ती किंवा इस्लामिक लोकांना हेच पाहून "बौद्ध हे हिंदू पासून वेगळे आहेत" असे वाटते कारण जुन्या ज्ञानाला अपूर्ण समजणे आणि त्यांत भर घालणे त्यांच्या धर्मांत निंदनीय आहे. पण हे हिंदू धर्मांत मान्यच नाही तर हिंदू धर्माचा प्रमुख भाग आहे. (आंबेडकर हे ह्याचे खूप चांगले उदाहरण आहे. आंबेडकर ह्यांनी स्वतः हिंदू धर्म सोडला असे म्हटले तरी हिंदू धर्मीय लोकांना त्यांचं विषयी खूप आदर हा आहेच आणि त्यांच्या जातीनिर्मूलन कार्यापासून हिंदू धर्मियांना प्रचंड प्रेरणा मिळाली आहे त्यामुळेच बहुतेक आंबेडकर अनुयायी हिंदू धर्म सोडत नाहीत. )

भवन बुद्धांच्या अनेक शिकवणीतील भाग हे उपनिषद किंवा वेदांत नाहीत ह्याचा अर्थ बुद्ध हे हिंदू धर्मांतून वेगळे आहेत किंवा तसा प्रचार ते स्वतः करत होते असे अजिबात नाही उलट त्यांची नवीन शिकवण हि १००% हिंदू परंपरेला धरूनच होती असे दिसून येते.

भगवान बुद्ध स्वतःला रामाचा अवतार म्हणत होते. भगवान राम हा आपलाच मागचा जन्म होता असे त्यांनी म्हटले.

भगवान बुद्ध ह्यांनी आपली "बुद्ध' स्थिती सोडून सामान्य लोकांना शिकवण्याची जबाबदारी का घेतली ? तर ब्रम्हा आणि इंद्र ह्या देवांच्या सल्ल्याने. हे दाखवणारे गांधार शैलीतील शिल्प पेशावर वस्तुसंग्रहालयांत आहे. ज्या जागेवर बुद्ध, इंद्र आणि ब्रह्म अवतरित झाले ती जागा भारतात सानिकसा ह्या गावांत असून तिथे सम्राट अशोकाने बांधलेला अशोकस्तंभ सुद्धा आहे आणि बुद्ध ह्यांचे मंदिर सुद्धा आहे. चिनी चित्रांतून हे दृश्य अनेकदा दिसून येते. बुद्धांचे मंत्र (हृदयसूत्र इत्यादी) सुद्धा वेदिक मंत्रांच्या प्रमाणेच म्हटले जातात. मुख्य म्हणजे बुद्धांच्या शिष्यानी अत्यंत अभिमानाने सरस्वती, गणेश, ब्रह्म आणि इंद्र ह्या देवतांना बुद्धा बरोबर जपान, चीन इत्यादी देशांत नेले.

पण बुद्धांची सर्वांत महत्वाची शिक्षा जी निर्विवाद पणे बुद्धांच्या वैदिक परंपरेची आणि पर्यायाने हिंदू परंपरेची जाणीव करून देते ती म्हणजे त्यांची सप्तषील. समाजाचा ऱ्हास होऊ नये ह्यासाठी त्या समाजाने ७ गोष्टी केल्या पाहिजेत असे बुद्धांनी आपल्या शेवटच्या दिवसांत सांगितले होते. त्यातील तिसरे तत्व तर "सनातन धर्माचे पालन केले पाहिजे" असे आहे.

टीप: बुद्ध ह्यांनी स्वतः कधीही शपथ वगैरे घेऊन हिंदू धर्म सोडला नाही आणि शिष्यनाही सोडायला लावला नाही. श्री आंबेडकर ह्यांनी इतिहासांत सर्वप्रथम शपथ घेऊन हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हे आंबेडकर ह्यांनीच सर्वप्रथम केले. माझ्या मते आंबेडकर ह्यांच्यावरील ख्रिस्ती प्रभाव त्यांच्या ह्या वागणुकीस जबाबदार होता. ख्रिस्ती शिकवणीत जुना धर्म सोडणे आणि नवीन धर्म शपथ घेऊन स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे आणि नवीन धर्म स्वीकारताना जुन्या धर्माची मूल्ये आणि सिम्बॉल्स ह्यांना आग लावणे अपेक्षित आहे.

सोत्रि's picture

27 May 2021 - 6:10 am | सोत्रि

buddhism is hinduism stripped for export - अ‍ॅलन वॅट्स

कोणाचीतरी मतं हा स्त्रोत आणि बेस आहे होय! बरं!!

धन्यवाद. आपल्या वैयक्तिक मतांबद्दल आदर ठेवून पुढचे प्रश्न थांबवतो.
मृत्यु आणि बुद्ध ह्या चर्चेत आंबेडकर का आले मधेच हे अगम्य आहे, पण ते ही असोच.

- (अभ्यासू) सोकाजी

माझे म्हणणे जरा वेगळे आहे अभ्यास आणि व्यासंग हा दांडगा फक्त "असला" पाहीजे त्यामुळे मी आपल्या मताचा ना आदर करू शकतो ना धिक्कार.

बाकी आपण आपले म्हणणे सांगायला जो पुढाकार घेतला त्याचे वैयक्तिक पातळीवर मी स्वागत करतो

सोत्रि's picture

26 May 2021 - 4:00 pm | सोत्रि

हे ठणकावुन सांगणारा शास्त्रज्ञ म्हणजे बुद्ध होय.

शास्त्रज्ञ ही उपाधी वापरल्याबद्दल आपले सर्वप्रथम मनापासून आभार!

मन - शरिर यांच्यातला परस्परसंबंध २६०० वर्षांपूर्वी शास्त्रोक्त पद्धतीने अतिसूक्ष्म बारकाव्यांसह (अभिधम्मपिटक) समजावून सांगणरा हा नक्कीच शास्त्रज्ञ!

अष्टांग योग प्रथम बुद्धाने काढला कि पातंजल ऋषिनी

अष्टांग योग पातंजलींचा
आर्य अष्टांग मार्ग बुद्धाचा

दोन्ही वेगवेगळे आहेत तरीही दोहोंचे गंतव्य स्थान एकच आहे, मोक्ष म्हणजेच निर्वाण!

- (आभारी) सोकाजी

मला बुद्धासाठी शास्त्रज्ञ हा शब्द सोडून सोडून इतर कोणतीही उपाधी सुचत नाही म्हणूनच सध्याचे दलाई लामा जेंव्हा If science proves some belief of Buddhism wrong, then Buddhism will have to change. असे म्हणतात तेंव्हा त्याचे आश्चर्य वाटत नाही.

मार्गी's picture

26 May 2021 - 4:04 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

@ गॉडजिला जी, बुद्धांचा अष्टांग मार्ग व अष्टांग योग दोन्ही अगदी वेगळे आहेत. बुद्धांचा मुख्य जोर ध्यानावर आहे. बाकी आसन- प्राणामायावर नाही.

@ साहना जी, मी धम्मपदाला वाचलं आहे, त्यानुसार निश्चितपणे म्हणू शकतो की, बुद्ध जातीयवादी नव्हते. त्यांनी ब्राह्मण किंवा पंडीत असे शब्द "ब्रह्म- सत्य जाणणारा" किंवा "ज्ञानी" अशा अर्थानेच वापरले आहेत. केवळ जन्म झाला कुळात म्हणून नाही. पण तुम्हांला जे वाटतं ते अनेकांना वाटतं. कारण बुद्धांच्या ख-या उपदेशामध्ये/ वचनांमध्ये नंतर खूपशी भेसळ झाली आहे. आवड असेल तर धम्मपदावरची ओशोंची काही प्रवचने इथून ऐकावीत. तीन- चार प्रवचन ऐकल्यावर आपण मत देऊ शकता: https://oshoworld.com/036-es-dhammo-sanantano-1-122/ बाकी बुद्धांनी मौलिक अर्थाने नवीन शोधलं नाही. कारण सत्य शाश्वत असतं. त्यांनी व नंतरच्या सर्व बुद्धपुरुषांनी/ ज्ञानी व्यक्तींनी सत्य प्राप्त केलं व नवीन काळातील परिभाषेत ते सत्य एक्स्प्रेस केलं. धन्यवाद.

बाकी बुद्धांनी मौलिक अर्थाने नवीन शोधलं नाही. कारण सत्य शाश्वत असतं.

सत्यवचन! 🙏

त्यांनी व नंतरच्या सर्व बुद्धपुरुषांनी/ ज्ञानी व्यक्तींनी

त्यांच्यापूर्वीच्या, त्यांनी व नंतरच्या सर्व अशी किंचीत दुरूस्ती सुचवतो.

- (अभ्यासू) सोकाजी

> बुद्ध जातीयवादी नव्हते.

बुद्ध जातीयवादी होते असे मी म्हटले सुद्धा नाही. अनेक वेळा आधुनिक बौद्ध मंडळी बुद्ध ह्यांनी जातिव्यवस्थे विरोधांत युद्ध पुकारले किंवा जातीव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेला कंटाळून नवीन धर्म स्थापन केला इत्यादी असे म्हणतात. त्यांत तथ्य नाही इतकेच मला म्हणायचे होते.

> त्यांनी ब्राह्मण किंवा पंडीत असे शब्द "ब्रह्म- सत्य जाणणारा" किंवा "ज्ञानी" अशा अर्थानेच वापरले आहेत.

बहुतेक हिंदू शास्त्रांत ब्राम्हण हा शब्द त्याच अर्थाने वापरला आहे. त्यामुळे बुद्ध सुद्धा तीच व्याख्या घेतील ह्यांत शंका नाही. पण कुळ हा प्रकार सुद्धा हिंदू धर्मांत महत्वाचा आहे आणि त्यावरील बुद्ध ह्यांचे मत सुद्धा त्याकाळच्या हिंदू समाजाप्रमाणेच होते असे मला म्हणायचे आहे.

> त्यांनी व नंतरच्या सर्व बुद्धपुरुषांनी/ ज्ञानी व्यक्तींनी सत्य प्राप्त केलं व नवीन काळातील परिभाषेत ते सत्य एक्स्प्रेस केलं. धन्यवाद.

मान्य आहे. बुद्धांनी क्लिष्ट ज्ञान सोप्या पद्धतीने लोकांसमोर आणले. हिंदू धर्मांत बदलांची आणि ज्ञानाच्या शोधांची नेहमीच जुनी परंपरा आहे आणि त्याच परंपरेतील बुद्ध हे महत्वाचे मणी होते ह्यांत शंका नाही.

उपयोजक's picture

27 May 2021 - 7:50 am | उपयोजक

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1496987090485153&id=10000521...

शिवलिंगाची पुजा करताना दलाई लामा.

शिवलिंग हिंदू धर्मात आहेत.मात्र नवबौद्धांच्या २२ प्रतिज्ञांनुसार ब्रह्मा,विष्णू,महेश मानत नाहीत.

ती तथाकथित प्रतिज्ञा राजकीय आहे !

गॉडजिला's picture

26 May 2021 - 4:16 pm | गॉडजिला

अष्टांग योग पातंजलींचा
आर्य अष्टांग मार्ग बुद्धाचा

जाणकार (मी न्हवे) बुद्ध आणी पातंजल तत्वज्ञानात एकमेकांचे ज्ञान मुक्तहस्ते वापरल्याची चर्चा करतात त्यासाठी आधी कोणी रचले यावरही त्यांचा उहापोह होत असतो, म्हणून ही बाब मी प्रतिसादात सामाविष्ट केली. त्यावर विथ रेफरन्स एखादा धागा मोकळा वेळ मिळाला तर दोनही बाजूंच्या म्हणण्यासकट अवश्य टाकेन.

मी दोन्ही मार्ग मर्यादीत कुवतीनुसार अभ्यासले आहेत व हे दोन मार्ग एक न्हवेत इतपत ज्ञान मजप्रत नक्की आहे असा विश्वास वाटतो. यावादाबाबत कोणी जाणकार(म्हणजे अर्थातच एकाचे समर्थक नक्कीच न्हवे) असतील तर त्यांचे म्हणणे समजून घेणे नक्कीच आवडेल

भारताने जगाला दोन मोठ्या देणग्या दिल्या.एक आहे बुद्ध आणि दुसरा कृष्ण.

बुद्ध आत्मिक,अंतर्गत स्तरावर आहे तर कृष्ण बाहेरच्या स्तरावर आहे.बुद्ध एक उदाहरण देत असत.मनःशांती कशी असावी याबद्दल त्यांनी म्हटलं होतं की मन हे रथाच्या चाकाच्या मधल्या दांड्यासारखं असावं. चाकाचा परीघ जोरजोरात फिरतो, धावत राहतो पण मधला दांडा फक्त स्वतःभोवती फिरतो.शांत असतो. तो आपली जागा सोडत नाही. जिथल्या तिथे स्थिर असतो. स्तब्ध असतो.तो आपली जागा सोडून धावू लागला तर रथ निश्चितच कोसळेल.सारा डोलारा खाली येईल.उध्वस्त होईल. म्हणून बाहेर कितीही संघर्ष होत राहिला तरी आत शांतता पाहिजे. मन शांत पाहिजे. ते जितकं शांत राहील तितका रथ नीट धावेल. खाचखळगे पार करेल.बुद्ध आतील शांतता शिकवतो.

बुद्धाचं आणखी एक उदाहरण आहे.
बुद्ध शिष्यांसह दुसऱ्या गावात चालले होते.मधे जंगल आले. सगळे एकामागून एक चालले होते. वाटेत नदी आडवी आली. नदीचं पात्र ओलांडावं लागणार होतं.म्हणून सगळ्यांनी नदीत पाय टाकले.त्यांच्या पावलांमुळे खाली बसलेला गाळ वर आला.पाणी गढूळ झाले.बुद्धांच्यामागे शिष्य नदी ओलांडून पुढे निघाले.पुढे थोडं अंतर पार केल्यावर सगळ्यांना तहान लागली.
बुद्धाने एका शिष्याला सांगितले " परत मागे जा आणि नदीतून प्यायला पाणी घेऊन ये."
शिष्य म्हणाला, " ते पाणी गढूळ झाले आहे. पिण्यासाठी योग्य नाही. "
तरीही बुद्धाने आज्ञा दिली.
बुद्ध काहीतरी शिकवू पाहत होते.
शिष्य मागे फिरला.नदीजवळ गेला आणि पाहतो तर काय, पाणी निर्मळ,स्वच्छ झाले होते. इतके स्वच्छ होते की तळ दिसत होता.शिष्याला पटकन कळले. आपण पाण्यात उतरलो की पाणी गढूळ होते.शिष्याला कळून चुकले की आपण मनाने परिस्थितीत उतरलो की सगळे गढूळ होते.मनात संघर्ष सुरु झाला की काहीच नीट दिसत नाही. परिस्थिती आणखी बिघडते.

बुद्ध मन शांत ठेवायचा संदेश देतात. जो फारच आवश्यक आहे.
श्रीकृष्ण त्याच्यापलीकडे जातो. तो रथाच्या चाकाचा धावता परीघ बनतो.अनेक खड्डे, धक्के, खाच-खळगे कसे पचवत जायचे, त्यांच्याशी कसा सामना करायचा हे शिकवतो.

कृष्णाचं एक उदाहरण पहा.
गोकुळावर मुसळधार पाऊस पडला.गोकुळ बुडू लागले.संकट उभे राहिले.कृष्णाने गोकुळवासीयांना उपाय सांगितला की आपण गोवर्धन पर्वत उचलून घेऊ.त्याच्या आश्रयाला जाऊ.हे काम अशक्य होते.पर्वत कसा उचलला जाणार. पण कृष्ण म्हणाला -मी फक्त करंगळी लावतो आणि पर्वत उचलतो. त्याला आधार देण्यासाठी तुम्ही खालून काठ्या लावा. पुढची कथा अशी आहे की गोकुळातील सगळ्या लोकांनी काठीचा टेकू लावून पर्वत उचलला आणि कृष्णाने करंगळी लावली होती. म्हणजे कृष्णाने काहीच केलं नाही. फक्त संकटाला तोंड देण्याचा आत्मविश्वास दिला.सामुदायिक शक्ती उभी केली आणि संकटाला तोंड दिलं.

कृष्णाचं सगळं चरित्र पाहिले तर दिसते की तो बाहेरचा संघर्ष शिकवतो.
कृष्ण आणि बुद्ध यांचे विचार महाभारताच्या अंतिम युद्धात एकवटलेले दिसतात. बुद्ध आतून शांत राहण्याचा सल्ला देतो आणि कृष्णही फक्त साक्ष बनून उरतो. कृष्ण अर्जुनाच्या रथावर चढला तेव्हा त्याने युद्ध करणार नाही अशी शपथ घेतली होती. त्याने हातात शस्त्र घेतले नाही. तो अर्जुनाचा रथ चालवत राहिला. कृष्ण महान योद्धा होता. युद्धकलेत प्राविण्य होतं. क्रिकेटच्या मैदानावर एखाद्या चॅम्पियन खेळाडूला नुसतं उभं राहून खेळ पाहणे किती कठीण होईल. कृष्णाचीही तीच अवस्था झाली होती. तो फक्त साक्षीदार बनला. अर्जुनाचा रथ चौफेर युद्ध करत राहिला आणि कृष्ण आतून शांत होता. फक्त साक्षीदार होता.

जणू बुद्ध आणि कृष्णाचा इथे संगम झाला.
बुद्ध स्तब्ध आहे तो फार आवश्यक आहे, कृष्ण धावता आहे तोही आवश्यक आहे.
बुद्ध आतील शांतता आहे तर कृष्ण बाहेरील संघर्ष आहे!
दोघे सोबत असतील तर जीवनातील सारा संघर्ष कठीण नाही.

#बुद्ध पौर्णिमा!

(कायप्पा वरून साभार)

सुंदर धागा आणि सर्वांचे विचार मांडणी.

आधी लहानपणी दासबोध नंतर तारुण्यात जिद्दू कृष्णमूर्ती आणि ओशो या सर्व वाचनातून मृत्यू बद्दल सुस्पष्टता आली असली तरी सुमारे गेल्या दहा वर्षांपासून माझ्या वयाचे - आणि काही लहान सुद्धा - मित्र/परिचित मृत्यूमुखी पडत असल्याचे बघून आता आपलाही तो दिवस दूर नाही हे प्रकर्षाने जाणवू लागले, परिणामी आपल्याला जे करावेसे वाटत आले पण राहून गेले ते आता झपाटून करायचे... एवढेच काय ते प्रत्यक्ष सत्य उरले आहे. बाकी बुद्ध पतंजली ध्यान वगैरेंबद्दल उहापोहात आता स्वारस्थ राहिलेले नाही.

माझही काहीसं असंच आहे.
बाकी बुद्ध पतंजली ध्यान वगैरेंबद्दल उहापोहात आता स्वारस्थ राहिलेले नाही. अगदी १००% सहमत कर्मावर अधिक आनंद यात्रा करायचा विचार आहे.

प्रचेतस's picture

26 May 2021 - 7:41 pm | प्रचेतस

वाल्मिकी रामायणात जाबाली म्हणतो,

अष्टकापितृदैवत्यमित्ययं प्रसृतो जनः ।
अन्नस्योपद्रवं पश्य मृतो हि किमशिष्यति ॥

दानसंवनना ह्येते ग्रंथा मेधाविभिः कृताः ।
यजस्व देहि दीक्षस्व तपस्तप्यस्व संत्यज ॥

स नास्ति परमित्येतत् कुरु बुद्धिं महामते ।
प्रत्यक्षं यत् तदातिष्ठ परोक्षं पृष्ठतः कुरु ॥

अष्टका आदि जितकी श्राद्धे आहेत, त्यांच्या देवता पितर आहेत. श्राद्धाचे दान पितरांना मिळते असा विचार करूनच लोक श्राद्धात प्रवृत्त होतात, परंतु विचार करून पाहिला तर मात्र अन्नाचा नाशच होत असतो. भला, मेलेला मनुष्य काय खाईल?

यज्ञ आणि पूजा करा, दान द्या, यज्ञाची दीक्षा ग्रहण करा, तपस्या करा, आणि घरदार सोडून संन्यासी बनून जा इत्यादि गोष्टी सांगणारे ग्रंथ बुद्धिमान् मनुष्यांनी दानाकडे लोकांची प्रवृत्ति करविण्यासाठीच बनविले आहेत.

म्हणून महामते ! आपण आपल्या मनांत हा निश्चय करावा की या लोकाशिवाय दुसरा कुठलाही लोक नाही. जिथे प्रत्यक्ष लाभ आहे, त्याचा आश्रय घ्यावा. पारलौकिक लाभाला मागे ढकलून द्यावे.

गॉडजिला's picture

26 May 2021 - 8:14 pm | गॉडजिला

Thinking is the biggest lie we are capable of equating with being to ourselves :)

Observing is also highly confused with thinking generally.

Since thinking provokes all the doings... As long as we stick with it (that is being under illusion of thinking means existing) we may never able to see/experience what is past beyond it (that is THE ONLY TRUTH).

So instead of thinking how about switching to pure observation ? Instead of fulfilling whatever yet is remaining, how about wasting energy on knowing why desires pop out incessantly ? Great way to break thinking isn't it ?

सुबोध खरे's picture

26 May 2021 - 7:16 pm | सुबोध खरे

आपलाही तो दिवस दूर नाही हे प्रकर्षाने जाणवू लागले, परिणामी आपल्याला जे करावेसे वाटत आले पण राहून गेले ते आता झपाटून करायचे
एवढेच काय ते प्रत्यक्ष सत्य उरले आहे

बाडीस

बाकी चालू द्या

Bhakti's picture

26 May 2021 - 7:18 pm | Bhakti

बाडीस म्हणजे काय?

चित्रगुप्त's picture

26 May 2021 - 7:25 pm | चित्रगुप्त

By default सहमत.

सिरुसेरि's picture

26 May 2021 - 8:56 pm | सिरुसेरि

महाभारतकालीन कथांमधे यक्षप्रश्न हि कथा ऐकीवात आहे . यामधे यक्षाने विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना भीमाने "मानवाला असलेली मृत्यूची जाणीव पण तरिही मानवाचे न सुटणारे मोह , लोभ हे तमोगुण " याबद्दल भाष्य केले आहे .

गॉडजिला's picture

27 May 2021 - 2:36 am | गॉडजिला

टीप: बुद्ध ह्यांनी स्वतः कधीही शपथ वगैरे घेऊन हिंदू धर्म सोडला नाही आणि शिष्यनाही सोडायला लावला नाही.

कसे सोडणार त्यासाठी हिंदू नामक काही अधिकृत अस्तित्वात असायला नको काय ? विविध पंथ, संत, ऋषी आपापल्या मार्गाने सत्यापर्यंत पोचायचा प्रयत्न त्यावेळी करत होते त्यांचे अनेक समुदाय इतकेच काय ते त्याकाळी अस्तित्वात होते अन ते ही एकमेकात आपापले ग्रंथ पकडून जोरात वाद विवाद करायचे अशा वेळी हिंदुत्व सोडून इतिहासाच्या नजरेत पुन्हा सिंधूतील व्यक्ती उरणार काय ? तर हिंदूच कि... त्यांनी प्रचलित तत्वज्ञान , कर्मकांडे नाकारली हेच फार मोठे प्रकरण आहे बाबा साहेबांचे धर्मपरिवर्तन सामाजिक क्रान्तिचा पाठ आहे तर बुद्धाचे साधना परिवर्तन करून साध्य प्राप्त करणे हा अध्यात्मिक क्रान्तिचा पाठ आहे (ज्याकडे दुर्दैवाने अध्यात्मिक लोकांचेही दुर्लक्ष होते आहे) परिणामी बुद्धाला शपथा घ्यायची गरज नाही महानिर्वाण प्राप्त करायला, नि हिंदुनाही त्यांची कर्मकांडे पाळायची गरज नाही बुद्धाच्या साधनेने महानिर्वाण प्राप्त करायला.

मार्गी's picture

27 May 2021 - 7:44 am | मार्गी

सर्वांना वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. सर्व मत- मतांतरांचं स्वागत आहे. अनेक मुद्द्यांसोबत मी सहमत नसलो तरी त्या मतांचा आदर करतो. त्याबद्दल मी इतकंच म्हणेन की, बुद्धांबद्दल कोण काय म्हणतंय ह्यापेक्षा बुद्ध काय म्हणतात हे आपण ऐकणं गरजेचं आहे. आणि आपण जेव्हा बुद्धांना ऐकतो, जाणून घेतो, तेव्हा आपल्याला जो अनुभव येतो तो आपल्याला बरोबर सांगतो. त्यामुळे ऐकीव किंवा वाचीव किंवा दुस-याने सांगितलेल्या ज्ञानाऐवजी स्वतःच्या अनुभवातून जे मिळतं ते खरं कामाचं असतं. स्वतः धम्मपद ऐकताना त्याचा जो स्वाद मिळतो, त्यामुळे आपल्यात जो बदल होतो तो खरा. धम्मपद किंवा गीता, बायबल. काहीही. त्यामुळे कोणीही ऐकीव किंवा वाचीव माहितीवर न थांबता स्वतःच्या अनुभवापर्यंत जावं, इतकंच म्हणेन. खूप खूप धन्यवाद.