अर्धवट कागदे. - कथा

Primary tabs

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
26 May 2021 - 2:11 am

प्रस्तावना - ही कथा पुर्णपणे काल्पनिक आहे.एकूण पाच भागात ही कथा प्रकाशित करण्याचा मानस आहे. त्यातील एक भाग आज प्रकाशित होत आहे.
----

माझ्या बदलीला आता फक्त एक आठवडा राहिला होता. अजून बरीच पॅकिंग राहिली होती. घरातला पसारासुद्धा काढायचा होता. आमची अडगळीची खोलीसुद्धा डोळ्याखालून घालायची होती. बराच पसारा होता त्या खोलीत. खोलीत गेलो आणि तिथले बाबांचे पुस्तकाचे शेल्फ स्वच्छ करत बसलो. एकाहून एक जाड पुस्तके तिथे कोंबून बसवली होती. त्यातली कित्येक पुस्तके वर्षानुवर्षे तिथेच पडली होती. त्यातल्या एका पुस्तकाची तर पानेही बाहेर निघत होती. ते पुस्तक नीट करायला मी ते बाहेर खेचले. पुस्तक उघडले तर त्यात काही कागदे होती. त्यावर काही लिहून ठेवलेलेही दिसत होते. मी वर तारीख बघीतल तर मार्च २०२०. म्हणजे तब्बल १२ वर्षापुर्वीचे हे कागद होते. अक्षर तर बांबांचेच वाटत होते. मी ते कागद वाचू लागलो...
.
.

"डॉक्टर, डेथ झाली आहे." " श्रीपुरे , अहो मग प्रोसेस फॉलो करा ना. आता तेही मीच सांगू का ? " जनार्धन वैतागाने उद्गारले. "डॉक्टर , डेथ 'त्याची' झाली आहे " श्रीपुरे एका बेडकडे बोट दाखवून बोलले. जनार्धनांनी त्या दिशेला पाहिले. निराशाने मान त्यांनी हलवली आणि ते त्या कोविड वॉर्डमधून बाहेर पडले. आपला पीपीई कीट उतरवून ते लॉकररुमद्धे गेले. आपल्या लॉकरमधून त्यांनी आपला मोबाईल काढला आणि एका नंबरवर ते फोन करू लागले.

"हा कोण बोलतोय?" पलिकडून आवाज आला. "मी डॉक्टर जनार्धन बोलतोय डी. आय. पी. हॉस्पिटलमधून. मधूकर याची डेथ झाली आहे. तुम्ही लवकरात लवकर या इथे. " थरथरत्या आवाजात डॉक्टरनी आपले बोलणे कसेबसे पुर्ण केले.खरेतर ही कोविडची लाट आल्यापासुन डॉ. जनार्धन यांनी कैक जणांना जग सोडून जाताना पाहिले होते. एक निःश्वास सोडून ते पुन्हा इतर पेशंट्सना तपासायला तयार होत होते. पण आजचा हा इसम वेगळा होता.

मधूकर त्याचे नाम. प्रान्तीपुरातील नामवंत प्रस्थ होते ते. तब्बल ३०हून अधिक केस या महाशयांवर दाखल झाल्या होत्या. दरोडा , अपहरण , खंडणी असे सगळे प्रकार मधूकरने तरूणपणीच करून टाकले होते. मागे उभी असलेली राजकिय ताकद आणि गावात असलेला लोकाश्रय यावर तो आजही तग धरून उभा होता. कैकवेळा पोलिसांनी त्याला पकडूनही नेले होते पण बेल ऑर्डर घेऊन हा प्रत्येकवेळी निसटला होता. एवढा दरारा असलेला माणूस आज करोनाने मात्र सहज मेला होता.

डॉ जनार्धन पोलिसांची वाट बघत बसले होते. अर्ध्या तासात एकदाची पोलिसांची गाडी येताना दिसली. गाडी पार्क होताच इन्स्पेक्टर समीर लगबगीने डॉक्टरांकडे आले. " गावात कुणाला कळवले तर नाही ना ?" इन्स्पेक्टरनी प्रश्न टाकला. " नाही. अहो जर मधूकर मेला हे गावातल्या लोकांना कळाले तर लोक इथे येऊन आग लावायलासुद्धा कमी करणार नाही. तुम्ही ती तुमची प्रोसेस पुर्ण करा लवकरात लवकर. या मधूकरच्या नातेवाईकांना तेवढ बोलवा आणि एकदाचा अंत्यसंस्कार उरकून टाका. " डॉक्टर आता अजूनच घाबरले होते. "तुम्ही घाबरू नका हो डॉक्टर. एकदा प्रोसेस पुर्ण होऊ द्या. लगेच आपण पुढचे विधी करून टाकू." इन्स्पेक्टर धिराच्या सुरात बोलले आणि कामात जुंपले. आपला रिपोर्ट त्यांनी लगबगीत तयार केला आणि शववाहिकेत मधूकरला ठेवलेले पाहिले.आता नातेवाईकांना बोलवणे अपरिहार्य होते.

इन्स्पेक्टर समीर यांच्या सुपीक डोक्यात एक कल्पना सुचली. इनक्वायरीसाठी बोलावले आहे असे कारण पुढे करून नातेवाईकांना घरून आणायचे आणि वाटेत गाडी फिरवून स्मशानाकडे न्यायची. त्या लोकांचे फोन काढून घेतले की त्यांना कोणाला कळवताही येणार नाही. स्वताःच्या या कल्पनेवर ते मनोमन खुश झाले

गावात कोणाला संशय यायला नको म्हणून त्यांनी साध्या गाडीतून आपल्या हवालदाराला मधूकरच्या घरी पाठवले आणि स्वतः पोलिस स्टेशनकडे निघाले. हवालदार घरी पोहचला तेव्हा घरी मधूकरचा मुलगा , बायको आणि त्याची आई एवढेच जण उपस्थित होते.
आश्चर्य म्हणजे मधूकरचे नातेवाईक फारसे आढेवेढे न घेता त्या हवालदारसोबत निघायला तयार झाले. वाटेत ठरल्याप्रमाणे हवालदाराने मधूकरच्या मरणाची बातमी त्यांना दिली आणि त्यांचे मोबाईलही काढून घेतले.
सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. कोणी काहीच बोलत नव्हते.

यथावकाश ते स्मशानात पोहचलले. स्मशान तसे गावाच्या बाहेरच होते. जागोजागी गवत उगवून आले होते. कंपाऊंडची भिंत ठिकठिकाणी पडझडीला आलेली होती . इन्स्पेक्टर समीर यांनी त्यांच्या एका हवालदाराला तिथे पाठवले होतेच. तो एका कोप-यात तंबाखू मळत बसला होता. सगळेजण शववाहिकेची वाट बघत बसले होते

मधूकरचे शव घेऊन शववाहीकाही एव्हाना तिथे पोहचली
होती.प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधलेल्या मधूकरचा चेहरा त्या नातेवाईंकाना दाखवण्यात आला आणि लगोलग अंत्यसंस्कारही उरकण्यात आले. गावात बातमी फुटण्याची आधी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

हवालदाराने आळस दिला आणि तो उठून घराकडे निघाला. पलीकडच्या भिंतीमागे त्याला कसलिशी हालचाल जाणवली. संशयाने तो तिकडे बघू लागला. पण तिथे कोणीच नव्हते. जाताना त्याने डॉ. जनार्धनला फोन केला आणि 'काम झाले' असा निरोप दिला.

इकडे डॉक्टर कमालीचे अवस्थ होते. जेव्हा काम झाले असा फोन आला तेव्हा कुठे त्यांच्या जिवात जीव आला. त्यांनी आपला फोन पुन्हा हातात घेतला. "काम झाले" एवढेच ते पुटपुटले आणि फोन ठेवला .....
...

इथे कागद संपला होता. मी पुस्तक उलटेपालटे करून बघितले पण त्यात दुसरे कागद काही सापडले नाहीत. गंमत म्हणून मी ते कागद माझ्या बायकोला , संजनाला दाखवले. तिने ते वाचले आणि माझ्या हातात ठेवले "पुढे काय आहे या कथेत ?" तीने विचारले. "अग एवढच सापडल मला. पण मला एक गोष्ट कळत नाही की मी वडिलांना कधी गोष्ट लिहिताना पाहिली नाही , मग ही गोष्ट त्यांनी का लिहिली असेल ग? तीही अशी अर्धवट ?

"अरे गोष्ट नाही डायरी असेल ती. किंवा डायरीसारखे काहीतरी. दुसरी बाब म्हणजे किती थोडक्यात त्यांनी सगळी गोष्ट पुढे नेत आहेत. कथा जास्त न फुलवता ते पटपट पुढे लिहित गेलेत. आपण एखादा प्रसंग दुस-याला सांगतो ना तसं.खरे आयुष्यात तर हे घडले नसेल ना ? असेही तुझे बाबा डॉक्टरच होते की. " संजनाने मिश्कीलिच्या स्वरात विचारले .

खरेच की ..माझे बाबा तर डॉक्टरच होते की! आता पुढचे पाने शोधणे आले. गोष्ट असो वा प्रसंग , मला आता पुढची कागदे शोधणे भागच होते.

भाग १ समाप्त

कथालेख

प्रतिक्रिया

जब्बरदस्त,
येऊ द्या पुढचे भाग

मराठी_माणूस's picture

26 May 2021 - 4:37 pm | मराठी_माणूस

कागदे ?

गॉडजिला's picture

26 May 2021 - 4:48 pm | गॉडजिला

पुभाप्र

सिरुसेरि's picture

26 May 2021 - 8:59 pm | सिरुसेरि

पाहिला भाग संशय निर्माण करुन चटकन संपला . +१ . पुभाप्र . "अर्धवट कागदे" हे शीर्षक वाचुन "काशीयात्रे" या शीर्षकाची आठवण झाली .

"अर्धवट कागदे" हे शीर्षक रचून कथा अर्धवट सोडली नाही म्हणजे मिळवलं ;)

कासव's picture

27 May 2021 - 10:15 pm | कासव

लवकर येऊ द्या

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2021 - 1:18 pm | चौथा कोनाडा

जब्बरदस्त,
उत्सुकता ताणली गेलीय
येऊ द्या पुढचे भाग

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2021 - 1:18 pm | चौथा कोनाडा

जब्बरदस्त,
उत्सुकता ताणली गेलीय
येऊ द्या पुढचे भाग

नावातकायआहे's picture

11 Jun 2021 - 11:55 pm | नावातकायआहे

पु.भा.प्र.