एक: अली कुली (ईसवी सन १६०७) I
गवताच्या सळसळीतून आणि घोड्यांच्या टापांनी चुरडल्या जाणार्या पाचोळ्याच्या आवाजामधून सुद्धा अली कुलीला वाघाच्या गुरकावण्याचा आवाज आला. त्याने हाताची मूठ दाखवून सोबतच्या गावकर्यांना सावध होण्याचा ईशारा केला.
काही पावलांनंतर हरणाच्या धडावर पाय रोवलेला प्राणी अली कुलीला दिसला. रक्ताळलेले दात दाखवत वाघाने आपल्या शिकारीपुढे बचावात्मक पवित्रा घेतला.
नंतर, अली कुलीने विचार केला. एकूण सहा तलवार आणि भाला घेतलेली माणसे, एवढ्या ताकदीशी त्या वाघाने का झुंज द्यावी ? एका हरणासाठी ? का त्या हरणापलीकडे त्या वाघाची काही मृत्यु झेलण्यापर्यंत नेऊ शकणारी काही इर्षा होती ? वाघाला मारुन त्याचे कातडे उतरवलेले पाहात असताना अली कुलीच्या डोक्यात हेच विचार घोंघावत होते.
अली कुलीने डोके हलवले. कसली ईर्षा आणि कसलं काय. साध्या सिध्या जंगली जानवरामध्ये आपण इन्सानी जज्बात घालत आहोत. पण त्याच्याच मनातल्या एका कोपर्यातून असहमतीचा आवाज आला.
“ ‘ती’ वाघिण... तिचे काय ? तिने नाही का बछड्यांसाठी स्वतःला कुर्बान केलं ?”
अली कुली त्या विचाराने अस्वस्थ झाला. शेर अफगाण. हल्ली त्याचे हे पादशाहाँनी दिलेले नाव त्याच्या डोक्यात घुमत असे. अली कुली खान इस्तज्लू, शेर अफगाण- “वाघाशी कुस्ती करणारा”, बर्दवान प्रांताचा जहागिरदार…
...राजद्रोही !
अजमेरची ती थंड संध्याकाळ त्याला आठवली...
*******
दोन
पर्शियामध्ये सफवी सम्राट शाह ईस्माइल (दुसरा) कडे सफराची, म्हणजे वाढपी म्हणुन अली कुली सेवेत होता. ईसवी सन १५७८ मध्ये शाह ईस्माइलचा मृत्यु झाला. तिथून अली कुली आपले नशीब आजमावायला कंदाहारला गेला. निरनिराळ्या सैन्यांसाठी लढत अली कुली मुलतानला पोहोचला. मुलतान मध्ये त्याच्या भवितव्याची दिशा बदलली आणि त्याची गाठ पादशाह अकबरचे खान-ए-खाना, मुघल सैन्याचे प्रमुख आणि पुढे त्याचे भाग्य बदलणारे अब्दुर्रहीम खान यांच्याशी अली कुलीचे संबंध आले.
पादशाह हुमायुन निर्वतल्यावर (ईसवी सन १५५६) शहजादा जलालुद्दिन मुहम्मद, वय १५ वर्षे, याच्या खांद्यावर राज्यशकट येऊन पडले, तेव्हा बैरम खान, जो हुमायुनचा खान-ई-खाना, म्हणजेच सेनापति होता, त्याने नुकतेच मिसरुड फुटलेल्या पादशाहाला (ज्याने राज्यकर्ता म्हणून स्वतःस अकबर असे नाव निवडले) राज्यशकट शिकवायची जबाबदारी घेतली. बैरम खान अकबरचा सर्वात विश्वासू सोबती, शिक्षक आणि मार्गदर्शक होता. काही वर्षे अकबरचा खान-ए-खाना म्हणुन बैरम खानाने काम केले, पण कोणत्यातरी विषयाचे निमित्त होऊन पादशाह आणि बैरम खान यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे अकबरने खानास दिल्लीतच महालात राहाणे किंवा हज यात्रेस जाणे असे दोन पर्याय दिले. बैरम खानाने दुसरा पर्याय निवडला आणि तो हज यात्रेस निघाला. पुढे त्याच्या साथीदारांनी कान फुंकल्याने बैरम खानाने अकबराविरुद्ध बंड पुकारले, पण अकबराने आपल्या शिक्षकाचा पंजाबमध्ये युद्धात पराभव केला. अकबरने आपल्या मित्रास पुन्हा एकदा दोन पर्याय दिले, आधीसारखेच साम्राज्याचा सल्लागार म्हणुन राजधानीत राहायचे, किंवा आपली हज यात्रा तशीच चालू ठेवणे. बैरम खानाने पुन्हा दुसरा पर्याय निवडला. काही काळानंतर साम्राज्याच्या जुन्या शत्रूंकडून बदला म्हणुन गुजरातमध्ये ईसवी सन १५६१ मध्ये बैरम खानाची हत्या झाली.
बैरम खानाच्या मृत्युने खिन्न बादशहाने खानाच्या कुटुंबास आपल्यापाशी, अहमदाबादच्या शाही दरबारात बोलवून घेतले. बैरम खानाची दुसरी पत्नी, सलीमा, ही अकबरची चुलत बहिण होती. अकबर, अकबरची लाडकी पत्नी रुकैय्या बेगम आणि सलीमा हे सगळे चुलत भावंडं होते, आणि लहानपणी एकत्र खेळणारे होते. आपल्या बालमैत्रिणीस सन्मान आणि आधार मिळावा आणि लाडक्या रुकैय्याला सोबत मिळावी म्हणुन अकबरने सलीमा सुलतानशी विवाह केला.
अब्दुर्रहीम खान, वडील बैरम खान यांच्या मृत्युनंतर वयाच्या पाचव्या वर्षी अहमदाबादला पोहोचला. बैरम खानाच्या कुटुंबाचा सन्मान म्हणुन अकबरने अब्दुर्रहीमला ‘मिर्झा खान’ अशी पदवी दिली. तसेच, त्याची सावत्र आई सलीमा मुघल साम्राज्ञी झाली असल्याने, तो पादशाह अकबरचा सुद्धा सावत्र मुलगा झाला. हळूहळू आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर अब्दुर्रहीम अकबरचा खान-इ-खाना झाला. इतकेच नव्हे, तर हट्टी आणि नाठाळपणे वागणार्या शाहजादा सलीमला वळणावर आणण्यासाठी पादशाहानी सलीमचा मार्गदर्शक म्हणून अब्दुर्रहीम खानला जबाबदारी दिली, तिच जबाबदारी, जी पादशहाँसाठी अब्दुर्रहीमचे वडील बैरम खानांनी निभावली होती. हा मुघल दरबारातला अतिशय मोठा मान होता. आणि केवळ मानच नाही, तर पुढे होणार्या शाहजाद्याची निष्ठा संपादन करणे हा मोठा राजकीय फायदा त्यात असे.
अली कुलीचे भाग्य मुलतान मध्ये फळाला आले, आणि तो अब्दुर्रहीम खानाच्या नजरेत आला. अब्दुलरहिमने तरण्याबांड ऊंचापुर्या अली कुलीला हेरले, त्याचा महत्वकांक्षी स्वभाव जोखला, आणि त्याला मुघल सैन्यात सामावून घेतले. अनेक मोहीमांमध्ये अली कुलीने आपली चुणुक दाखवली, आणि तो अब्दुर्रहीम खानाचा अतिशय जवळचा माणूस बनला. अब्दुर्रहीम खानने अली कुलीला १५९४ मध्ये लाहोरच्या शाही दरबारात पादशाह अकबरास पेश केले. अकबरने सुद्धा अली कुली बद्द्ल चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्याने अली कुलीला ईनाम म्हणुन दोन गोष्टी दिल्या, एक म्हणजे ऊत्तर साम्राज्यातल्या थत्ता शहराची मनसब, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या दरबारातील प्रमुख चिटणीस, घियास बेग उर्फ इतमदुदौला याला त्याची मुलगी, मेहरुन्निसा हिचा विवाह अली कुलीशी लावावा, असा प्रस्ताव दिला.
घियास बेगचे पुर्वायुष्य म्हणले तर अली कुलीसारखेच, म्हणले तर अत्यंत भिन्न. शाह सफवी, म्हणजे शाह दुसरा ईस्माईलच्या आधीचा पर्शियाचा सम्राट होता. (ईस्माईल दुसर्याच्या मृत्युनंतर अली कुली हिंदुस्थानात आला.). घियास बेगचे वडील मुहम्मद शरीफ हे शहा सफवीच्या दरबारात वजीर होते. मुहम्मद शरीफचा आणि काही काळाने शाह सफवीचा मृत्यु झाला, आणि सत्तेत येणार्या शाह ईस्माईल दुसर्याच्या सत्तेत घियास बेगच्या कुटुंबाचे वासे फिरले. कर्जदारांकडून झडप पडून गुलामीत कोसळण्याआधी १५७६ मध्ये घियास बेग आपल्या बायकामुलांसोबत पर्शियातून निसटला, आणि नशीब आजमवण्यासाठी हिंदुस्तानाकडे निघाला. पळतीमध्येच कंदाहारच्या एका छोट्याश्या झोपडीत त्याच्या चौथ्या अपत्याचा, आणी दुसर्या मुलीचा जन्म झाला. तिचे नाव ठेवले गेले- मेहरुन्निसा- स्त्रियांमधला सुर्य. (मेहर-उन-निसा).
घियास आणि अली कुली मधला समान धागा पर्शिया होता. घियास शाह सफवीच्या मृत्युनंतर पळाला, आणि शाह ईस्माईल दुसरा गादीवर आला, ज्याचे राज्य केवळ दोनच वर्ष टिकले. त्याच्या मृत्युनंतर अली कुलीने पर्शिया सोडले. घियास बेगला त्याच्या घराण्याच्या नावामुळे एका व्यापार्याने पुष्कळ मदत केली, आणि पादशहा अकबरला पेश केले. पादशहाँनी त्याला संधी देऊन दरबारात कारकूनीचे काम दिले. घियास बेगने हळूहळू दर्बारात जम बसवला आणि दरबारातला महत्वाचा कारभारी बनला.
अली कुली आणि घियास बेग. दोघांनी दोन वर्षांच्या अंतराने आपला देश सोडला, आणि नव्या देशात आपला जम बसवला. पण किती भिन्नपणे ! अली कुलीकडे घराण्याच्या नावाचे पुण्य नव्हते. त्याने जे काही मिळवले, ते स्वतःचे रक्त सांडून. अली कुली अकबरासमोर आला ते मुघल सैन्यात १६ वर्षे चाकरी केल्यानंतर, आणि घियास बेगची मुघल चाकरी खुद्द पादशहाँच्या मर्जीमुळे सुरु झाली. अली कुलीला दरबारात एक शूर सैन्याधिकारी म्हणुन किंमत होती, पण घियास बेगचे दरबारातले स्थान इतके वरचे होते की त्याने अली कुलीचा आपल्या अतिशय सुंदर आणि तेज़तर्रार मुलीसाठी जोडी म्हणुन स्वतःहून कधी विचार केला नसता.
पण पादशाहा अकबरने त्यांचे भवितव्य एकमेकांच्यात गुंतवून टाकले.
अकबराचे ह्या लग्नामागचे धोरण अगदी साधेसरळ होते. पस्तिशीचा अली कुली अजुनही उसळत्या रक्ताचा होता, आणि अत्यंत महत्वकांक्षी. त्याला जर मुघल साम्राज्याच्या दावणीला बांधायचे असेल, तर मुघल सल्तनतीच्या एखाद्या ताकदवान आणि स्वामिनिष्ठ अधिकार्याच्या मुलीशी याचे लग्न लावायला हवे. त्यात दोन्ही परिवार पर्शियाचे असतील तर अजुनच चांगले, एकमेकांना धरुन राहतील.
पादशाहाचा घियास बेग कडे दिलेला “प्रस्ताव” हा आदेशच होता, हे घियास आणि अली कुली दोघांना माहित होते. त्यामुळे पस्तिशीच्या अली कुलीचा सतरा वर्षाच्या मेहरुन्निसाशी ईसवी सन १५९४ मध्ये विवाह झाला. अली कुलीच्या परिवाराचे सदस्य म्हणुन खुद्द खान-ई-खाना अब्दुर्रहीम खान जातीने हजर राहीले, कारण अली कुलीचा खरा परिवार मायदेशातच होता. यातून अब्दुर्रहीम खानांचा अली कुलीवरचा स्नेह दिसतो.
अली कुलीच्या लग्नानंतर काही महिन्यांनी शाहजादा मुरादचा मृत्यु झाला. हा पादशहा अकबरचा सर्वात लहान मुलगा होता. शाहजादा मुरादच्या शोकात बुडलेल्या पादशहाँनी आपल्या थोरल्या मुलाला, शाहजादा सलीमला, राणा प्रतापसिंहाच्या मृत्युमधुन अजून सावरणार्या उदयपूरास काबिज करायच्या मोहीमेला पाठवले आणि पादशाह स्वतः दख्खन मोहीमेस निघाले. इथे नियतीने आणखी एक वळण घेतले आणि अली कुली आणि शाहजादा सलीमची भेट घडवुन आणली.
***
तीन: अली कुली- (ईसवी सन १५९४) II
... अली कुलीला अजमेरची ती थंड संध्याकाळ आठवली-
सफेद अरबी घोड्यावर स्वार शाहजादा अधिकारी आणि शिपायांच्या रांगांमध्ये दौडत होता. शिकारीला येण्यासाठी सोबती निवडणे चालू होते. अली कुलीने अश्या बर्याच शिकारींमध्ये सहभाग घेतला होता. कधी प्रांत सुभेदारांसोबत, कधी इतर मोठ्या अधिकार्यांसोबत. ह्या शिकारी अली कुलीला कंटाळवाण्या वाटत. भलामोठा सारंजाम घेउन निघायचे. सैनिक किंवा ईतर कुणीतरी प्राण्याचा माग काढून शिकारीतल्या महत्वाच्या अधिकार्याला सांगणार. मग सगळा पसारा घेऊन मागावर जायचे, तोपर्यंत शिपायांचे गट शिकारीला ठराविक अंतरापलिकडे जाउ देणार नाहीत. मग प्रमुख अधिकारी बंदुकीने प्राण्याचा वेध घेणार, आणि मग सगळ्यांकडून वाहव्वा. ह्या गोष्टी युद्धप्रमुख आणि अधिका-यांमध्ये सहकार्याची भावना तयार करण्यासाठी महत्वाच्या असत. अली कुलीला शिकार मनापासून आवडत असे. पण शाही शिकारीमध्ये काहीही मजा नाही असे त्याचे मत बनले होते. पण, आज गोष्ट वेगळी होती.
शाहजाद्यासोबत शिकार ही गमावण्यासारखी संधी नसते. अली कुलीने समोरुन जाणार्या शाहजाद्याच्या नजरेत नजर मिळवली. सलीमने निरुत्सुक पणे हात झटकून अली कुलीकडे निर्देश केला. अली कुलीने समोर येऊन झुकुन कोनिश केली.
“नाव.”
“अली कुली इस्तज्लु, हुजूर. थत्त्याचा मनसबदार, हुजूर.”
कंटाळलेल्या सलीमच्या डोळ्यांमध्ये अचानक एक चमक आली, असे अली कुलीला वाटले, आणि तो गोंधळुन शाहजाद्याकडे पाहू लागला. मात्र पुढच्याच क्षणी पुन्हा सलीमचा चेहरा निर्विकार झाला होता. मनगटाच्या एका फटकार्यात सलीमने अली कुलीला एका बाजूला निवडलेल्या सरदारांमध्ये उभारण्याचा हुक्म दिला.
अजगराच्या वेगाने शाही ताफा निघाला. अली कुलीने शहजाद्याच्या जितक्या जवळ जाता येईल तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण काही अंतर पार केल्यावर शिष्ठाचार न मोडता आणखी जवळ जाणे शक्य नव्हते. अली कुली ने आणखी पुढे जाण्याचे प्रयत्न थांबवले आणि तो शांतपणे रपेट करत राहीला.
आणि, त्याचे विचार सहजपणे त्याच्या स्त्री कडे वळले.
पादशाहांच्या आज्ञा झाली नसती तर त्याने स्वतःहून कधी लग्नाचा विचार केला नसता. त्याचे आयुष्य सैन्याच्या छावण्यांमध्येच गुंतले होते, आणि सैन्यापाठोपाठ येणार्या बुणग्यांमध्ये त्याच्या गरज पूर्ण करणार्या स्त्रियाही असत. त्यामुळे शरीरसुख आणि स्त्रिसहवास ह्या गोष्टी त्याच्या विचारांमध्ये अगदी गौण जागा व्यापत असत. पादशहाँनी घियास बेगसोबत त्याचे नाते जोडले ह्यात अली कुलीला सगळ्यात जास्त पसंद आलेली गोष्ट म्हणजे सासर्याच्या रुपाने मिळालेला दरबारातला साथीदार. त्याची मुलगी मेहरुन्निसा सुंदर आहे असे त्याला सांगितले गेले होते. त्याच्यावर अली कुलीचा फारसा विश्वास नव्हता, कारण सगळ्या कुलीन मुलींचे वर्णन बहुदा सुंदर म्हणुनच होत असे, मग त्या खरोखर कश्या का दिसत असेनात. आणि आपल्या होणार्या पत्नीचे रुपसौंदर्य ही अली कुलीच्या दृष्टीने गौण बाब होती. दरबारात वर चढण्यासाठीच्या शिडीला नाक डोळे कसे का असेनात, पायर्या मजबूत असल्या म्हणजे झाले. ते एक, आणि एक मुलगा, वारस म्हणून, इतक्याच अपेक्षा त्याने घियासच्या मुलीकडून केल्या होत्या.
पण निकाहनंतरच्या रात्री त्याच्या नजरेत जे आले त्या आठवणीने त्याला आजही हृद्यात गोड वेदना होत होती.
पिंगट केशसांभार पाचूच्या कड्यांमध्ये दाटीवाटीने बसवला होता, क्षणार्धात उसळुन बाहेर येण्यासाठी. हिरव्या पोशाखातून दिलखेचक जागांमधून दिसणारा गव्हाळ नितळ पृष्ठभाग. तिच्या लहानश्या हालचाली सुद्धा आजूबाजूच्या अणूरेणूंना कंपित करत होत्या. हे पाहिल्यावर त्याची नजर चेहेर्यावरच्या बारकाव्यांवर रेंगाळू लागली. धारधार नाक, बदामी आकाराची हनुवटी. आणि ते निळे टपोरे डोळे, त्याच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून पाहाणारे. तिला पाहून जे वादळ त्याच्या मनात ऊठले होते त्याने तो चक्रावून गेला. तिने विड्यांचे ताट त्याच्या समोर केले आणि काहीतरी विचारले. ते शब्द त्याला आज आठवत नव्हते, पण त्या शब्दांनी त्याच्या मनातल्या तसबिरीचा एक कोपरा रंगवला होता, आणि त्यानंतर तिचासोबत घालवलेले क्षण ही तसबिर हळूहळू रंगवत गेले. तिच्यासोबत बोलताना राहून राहून त्याला दिवाण-ए-खास मधले चिकाचे पडदे आठवत होते. त्यामागून किणकीणत्या आवाजात पादशहाँना एखादे मत किंवा सल्ला येत असे. पादशहा कधी त्या पडद्याकडे पाहून मागील व्यक्तीचे मत विचारत असत. तिचा आवाज ऐकल्यावर त्याच्या डोळ्यासमोर ते मंद हवेत सरसरणारे पडदे येत असत. आजपर्यंतचे स्त्रीसंबंध फक्त छावणी आणि बाजारातल्या बायकांसोबत आल्याचा हा परिणाम असे त्याला वाटले. आणि मेहरुन्निसा वाढलीच दरबारी रितभातांसोबत. त्यामुळे या प्रतिमेचे अली कुलीला फारसे आश्चर्य वाटले नाही. यावेळेस मोहीमेस येताना तो नेहमी सारख्याच उत्साहाने निघाला, पण मोहीम संपवून घरी जाताना आपल्याला नेहमीप्रमाणे निरुद्देशपणा जाणवणार नाही ह्याची त्याला खात्री होती.
त्याची तंद्री समोरुन धावत येणार्या सेवकाला पाहून मोडली.
“हुजूर” सेवक धापा टाकत म्हणाला “साहीब शाहजाद्यांनी आपल्या सोबत सवारी करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे.”
अली कुलीने मान डोलावली आणि घोड्याला टाच देऊन गर्दी कापत तो शाहजाद्यापर्यंत पोहोचला. सलीम त्याच्या ऊजव्या बाजूच्या माणसाशी काहीतरी बोलत होता. अली कुलीने त्या व्यक्तीला लगेच ओळखले- कुत्बुद्दीन खान कोका. सलीमचा दूध-भाऊ. सलीमला कुत्बुद्दीन त्याच्या दोन्ही भावांपेक्षा अधिक जवळचा होता. त्याचे कारण स्पष्टच होते, की कुत्बुद्दीन कधीही सिंहासनासाठी सलीमचा प्रतिस्पर्धक नसणार होता. आणि त्याऊलट सलीमचे सावत्र भाऊ मुराद आणि दानियाल लहानपणीपासूनच त्याचे प्रतिस्पर्धक होते. सलीम जरी एकटाच पादशहांचा औरस पुत्र असला, तरी तिमुराद परंपरेनुसार राजाच्या अनौरस मुलांचा सिंहासनावरचा दावा त्याच्यापेक्षा कनिष्ठ नव्हता. मुराद आणि दानियाल कडे स्पर्धक सोडुन आणखी काही म्हणुन पाहाणे शक्य नव्हते, त्यामुळे सलीमच्या दाईचा समवयीन मुलगा कुत्बुद्दीन कोका लहानपणापासून सलीमसाठी भावापेक्षा प्रिय होता. ‘कोका’ हे नावापुढे लावलेले विशेषण त्याचे सलीमसोबत नाते दर्शवत होते- दुध भाउ. मुघलांच्या तिमुराद परंपरे प्रमाणे दुधाचे नाते रक्ताच्या नात्याईतकेच महत्वाचे होते. तितकेच नाही तर कुत्बुद्दीन आणखी एका प्रकारे मह्त्वाचा होता. त्याची आई, म्हणजे सलीमची दाई, ही सुफी शेख सलीम चिश्तींची मुलगी होती. पादशहा अकबर शेख चिश्तींचे निस्सीम भक्त, त्यांच्या आशिर्वादानेच सलीमचा जन्म झाला होता. (त्यामुळे पादशहा सलीमला लाडाने ‘शेखू बाबा’ म्हणत.) त्यामुळे कुत्बुद्दीन सलीमचा अगदी विश्वासाचा आणि जवळचा व्यक्ती होता.
सलीम आणि कुत्बुद्दीन सोबत महाबत खान सुद्धा होता. महाबत सलीमला सोबती म्हणुन दहा वर्षांचा असताना दरबारात आणला गेला, आणि कुत्बुद्दीन आणि सलीमच्या जोडगोळीत सामील झाला. काही वर्षांनी त्याची नेमणुक शाही परिवाराचा अंगरक्षक म्हणुन केली गेली. महाबत खानने अली कुलीला पाहीले आणि त्याने शाहजाद्याकडे वळुन काही सांगितले. सलीमने मागे वळून पाहीले आणि अली कुलीला आपल्या बाजूला येण्याचा ईशारा केला. सलीमच्या चेहेर्याकडे पाहताना अली कुलीच्या मनात विचार तरळला- हा चेहरा बापाला ठार करण्याच्या काबिल वाटतो का ? ही कुजबुज सल्तनतीत कित्येक आठवड्यांपासून चालू होती. पादशहाँनी मोठ्या आजारपणातून उठून आपल्या हमामवाल्याचा विषप्रयोगासाठी शिरच्छेद करवला होता. शंकेची सुई अर्थातच सलीमवर होती.
अली कुली शाहजाद्याच्या डाव्या बाजूस गेला, आणि शाहजाद्याला सलाम केला. सलीमने मान डोलावली.
“कुलीखान ! अब्दुर्रहीम खानांकडून खूब तारीफ ऐकली आहे तुमची.”
“खान-ई-खाना फार दयाळू आहेत, हुजूर.”
“तुमच्याबद्दलची तारीफ हकीकतीशी किती मिळते हे आम्ही पाहूच. पण रहीमचाचा तुम्हाला स्वतःचा मुलगा मानतात ही तुमच्यासाठीची मोठी पावती आहे.”
हे ऐकून अली कुली क्षणभर भावुक झाला, क्षणभरच.
“त्यांच्या रहमतीमुळेच सगळे आहे, हुजूर.”
अली कुलीकडे वळत शाहजादा म्हणाला-
“उद्यापासून उदयपूरच्या नाकेबंदी साठी ठाणे बसवले जाणार आहेत.”
अली कुलीला आनंद झाला. वेढ्याची थोडीतरी जबाबदारी मिळणार आहे तर !
“मात्र तुमची तलवार सदैव माझ्याशेजारी रहावी असा माझा मनसब आहे.”
अली कुलीने शिकस्त करुन आपली निराशा लपवली. “खविंदांची सेवा करायला मिळणे माझे भाग्य समजतो.” सलीमने मान डोलावली.
त्यानंतर काही वेळ सलीम त्याचा आणखी एक मित्र, मुहम्मद शरीफशी ऊद्याच्या कामांविषयी बोलला. मधे मधे कुत्बुद्दीन कोका आणि महाबत खान सुद्धा चर्चेत सहभागी होत होते. अली कुली योग्य ते अंतर राखून रपेट करत राहीला. काही वेळाने, अली कुलीने पाहीले, शाहजादा आणि त्याच्या मित्रांमध्ये काहीतरी नजरानजर झाली, आणि शाहजादे मुद्दाम घोड्याला चालवत मागे पडले आणि त्यांचे सहकारी पुढे जात राहीले. अली कुलीने खूण ओळखून सलीमच्या बाजूला घोडा नेला.
काही क्षण शांत राहून शाहजाद्याने विचारले-
"तू घियास बेगचा जावई आहेस ना ?"
अली कुलीने बुचकळ्यात पडून उत्तर दिले- "हो, हुजूर."
सलीमने मान डोलावली. "तुझ्यापाशी काही महत्वाचे काम आहे."
तेव्हढ्यात समोरुन एक घोडेस्वार शिपाई दौडत आला. "हुजूर, काही अंतरावर वाघाचे बच्चे सापडले आहेत."
सलीमच्या भुवया वक्र झाल्या होत्या. पण "आपण नंतर बोलू " असे म्हणून अली कुलीला त्याच्यासोबत येण्याची खुण करुन तो पुढे निघालेल्या त्याच्या सहकार्यान्मधे सामील झाला.
काही झाडांच्या रिंगणामध्ये झुडुपांमधून गुरगुर करणारे दोन बछडे दिसले. शाहजाद्यांनी कौतुकाने टाचांवर बसून जवळुन बछड्यांचे निरीक्षण केले. बछडे सुळे दाखवत फिसकारत होते. जवळ हात नेताच झटक्यात नख्यांनी वार करत होते. सलीमने झटक्यात एकाच्या मानेमागच्या मांसल भागाला धरुन उचलले.
"आकार काय आणि आवेश काय बच्च्याचा." सलीम त्याच्या पकडीतला अजुनही धुसफुसणारा बछडा उचलत म्हणाला. जवळच्या एका सैनिकाकडे बछडा सोपवुन तो म्हणाला- "दोन्ही बछड्यांना घ्या. आग्र्याच्या बागेची शान होतील हे."
महाबत खान डोळ्यांवर हात ठेऊन मावळतीच्या किरणे अडवून पुढे पाहू लागला-
"सरकार, तिथे झुडुपांमध्ये आणखी एक आहे. "
सलीमने त्या दिशेस पाहिले. "महाबत, अली, कुत्बुद्दीन- चला. पादशहाँसाठी शाही नजराणा ठरतील हे बच्चे."
काही अंतर कापल्यावर, भारी धूड एका बाजूवरुन दुसर्या बाजूला झुकल्यामुळे वाळलेल्या पानांचा बारीक आवाज, आणि एक उग्र गोडसर वास दोनीही गोष्टी अली कुलीला एकदमच जाणवल्या. त्याने हळू आवाजात हाक दिली- "हुजूर..."
पण सलीम आणि महाबत त्याच्या आवाजापल्ल्याड होते. सलीम वाकून झुडपामागे लपलेल्या पिल्लाला धरण्याचा प्रयत्न करत होता. अली कुलीने बाजूच्या एका भालाईताकडून हलकेच भाला घेतला आणि हातवारे करुन सलीमला सावध करण्याचा प्रयत्न करु लागला. शाहजाद्याचे त्याच्याकडे लक्ष गेले.
"कुलीखान का..."
शाहजाद्याचे बोलणे बर्याचश्या आवाजांनी खंडीत झाले. कानठाळ्या फोडणार्या गर्जना करत वाघीणीने झेप घेतली आणि ती सलीमकडे सरसावू लागली. अली कुलीने क्षणार्धात नेम धरुन भाला फेकला. खांद्यात भाला रुतल्यावर वेदनेने गर्जना करत वाघीण दिशा बदलत अली कुलीच्या दिशेने झेपावली.
अली कुलीने धडपडत मागे सरकताना हात कंबरेकडे नेला, तसा झाडाच्या मुळाशी पाय अडखळून तो पडला. वाघिणीने त्याच्यावर झेप घेतली, आणि काही क्षणाच्या झटापटीनंतर जमिनीवरच्या माणूस आणि पशूच्या गाठोड्याची हालचाल बंद झाली.
वाघिणीच्या कलेवराला ढोसत आणि डिवचत सैनिकांनी ती मेल्याची खात्री करुन घेतली. त्यानंतर चार पाच माणसांनी एकत्रित पणे तिचे शव बाजूला सारले. तिच्या बरगडीला तोडून अली कुलीचा खंजिर पूर्ण मुठीपर्यंत आत गेला होता. अली कुलीचा अंगरखा पूर्ण रक्ताने माखला होता. छाती, मान आणि जबड्यावरची काही कातडी फाटली होती. शरीरभर बर्याच ठीकाणी मुका मार लागल्याने रक्त साकळले होते. सलीमला वाचा फुटत नव्हती. कुत्बुद्दीन ओरडला- ताबडतोब कापडी झोळी तयार करा, जखम साफ करा... अली कुलीला काय होत आहे फारसे समजले नाही, आणि त्याची शुद्ध हरपली.
अली कुलीचे डोळे उघडले तेव्हा क्षणभर त्याला वाटले की आपल्याला बांधले का गेले आहे ? त्याचा जवळपास पूर्ण बांधा आणि उजवा खांदा कपड्यात बांधला होता. हळूहळू शरीरातल्या वेदना आणि रक्ताचा लोखंडी वास त्याला काय घडल्याची आठवण करुन देऊ लागले. पात्यामधले प्रतिबिंब पाहून अली कुलीने शिवी हासडली. त्याची छाती, उजवा खांदा आणि मान, आणि जबड्याचा काही भाग पूर्ण जखमांनी भरला होता. त्यातल्या काही जखमांचे व्रण आयुष्यभर राहणार होते.
अली कुलीला जागे पाहून एक पोरगा घाईघाईने तंबू बाहेर जाऊ लागला. “ए तू, पोरा, थांब.” अली कुलीने जमेल तितक्या मोठ्याने आवाज दिला. तो मुलगा लगबगीने अली कुलीकडे आला.
“पाणी. पाणी दे. घसा कोरडा पडलाय.”
मुलाने लगेच पाण्याचा गडू आणला. अली कुलीच्या हातात देऊन म्हणाला-
“साहब, सावकाश. थोडसच प्या.”
त्याच्या बोलण्याचा मतितार्थ समजून अली कुलीने विचारले- “मी किती वेळ शुद्धीत नव्हतो ?”
“चार दिवस साहब.”
अली कुलीने आश्चर्याने श्वास सोडला, आणि मान डोलावत गडू पोराच्या हातात दिला. “जा.”
काही वेळात हकीम आला, आणि अली कुलीला माहित असलेली गोष्ट सांगून गेला- “अल्लारहमतीने जास्त घाव आहेत ते वरवरचे आहेत. खांद्यात मोठी जखम झाली आहे, ती भरायला काही महीने आराम करावा लागेल.” त्यानंतर रात्री पोरगा हकीमचा सब्जा आणि हलके जेवण घेऊन आला. काही दिवस असेच गेले, आणि अली कुलीला पुश्कळच बरे वाटू लागले. अधुनमधुन ताप यायचा, पण वाघाच्या हल्ल्यानंतर ते होतच असते असे हकीमाने त्याला आश्वस्त केले.
अली कुली शाहजाद्याकडून माणूस येण्याची वाट पाहात होता. पाच दिवस कोणीही आले नाही. अली कुली नेहमीप्रमाणे विड्याची पाने चावत तंबूसमोर रात्रीच्या झुळकेत बसून राहीला. गारठा वाढल्यावर अली कुली तंबूच्या आत गेला आणि चारपाई वर उताणा झाला. त्याचा डोळा लागण्याआधी तंबूच्या प्रवेशातून काळ्या आणि लांबसडक केसांची एक सुंदर स्त्री आणि सोबत महाबत खान आला. महाबत खान एका कानापासून दुसर्या कानापर्यंत हसत होता. “ह्या नज़्मा. अजमैरच्या सर्वात प्रसिद्ध आणी सुंदर तवायफ आहेत. शाहजाद्यांनी खास तुमच्या खिदमत साठी पाठवल्या आहेत.”
“महाबत, नको.”
महाबत खान हसून म्हणाला “फिक्र करु नका. तुमच्या जखमांना धक्का न लावता खूबीने दिल खुश करतील तुमचे.”
अली कुलीने नज़्माची नजर टाळत सांगितले- “नाही, त्याबद्दल शंका नाही. पण आमचे मन नाही.”
त्यानंतर बराच वेळ महाबत खानाच्या आग्रहाला प्रतिरोध करता करता अली कुली थकून गेला. नंतर नज़्माच उठली आणि अली कुलीच्या कुरळ्या केसांमध्ये हात ठेवत महाबतला म्हणाली “चला साहीब. इथं आधीच दुसरी औरत ठाण मांडून आहे.” अली कुलीकडे बघुन उत्फुल्ल स्मित करत ती तंबू बाहेर पडली. महाबत खान चेहेर्यावर नाराज भाव घेऊन बाहेर पडला.
अली कुलीने आपण नकार का दिला याचे आत्मपरिक्षण करायचा प्रयत्न केला. पण कोणतेही ठोस कारण त्याला सापडले नाही. फक्त मेहरुन्निसाचा चेहरा आणि सरसरणारे चिकाचे पडदे त्याच्या मनात येत होते. त्या दृश्याने त्याच्या हृद्यात जे तरंग उठत होते, ते त्याच्यासाठी नवे अनुभव होते. त्या सुरसुरीतच तो झोपी गेला.
त्यानंतर दोन दिवस पुन्हा कोणत्याही घडामोडींशिवाय गेले. त्याच्या हाताखालचा एक अधिकारी, सफदर खान त्याला बघण्यास अधुनमधुन येत असे. त्याच्या कडून मोहीमेची माहीती मिळत असे.
तिसर्या दिवशी सकाळी त्याला भेटायला कुत्बुद्दीन कोका आला. त्याच्या हातात कागदाची सुरळी होती. त्याने स्मित करुन अली कुलीला सांगितले-
“अली कुली इस्तज्लू, आजपासून तुम्ही शेर अफगाण- वाघाशी कुस्ती करणारा. शहजादे सलिम यांनी स्वतः पत्रावर सही केली आहे. तुमची मनसब पन्नासने वाढवायचा प्रस्ताव पातशहांकडे शहजाद्यान्नी पाठवला आहे.”
अली कुलीची कानशिले तप्त झाली. ह्या शाहजाद्यासाठी मी वाघिणीशी झुंज केली आणि काही रुपडे आणि चमकदार नाव देऊन हा आभार मानतो ? स्वतः भेटायला येण्याची सुद्धा तसदी घेत नाही ?
त्याने कमीत कमी मान झुकवुन कागदाचा स्विकार केला. “हुजूर दयाळू आहेत.”
कोकाला त्याच्या भावना जाणवल्या.
“शाहजादे सलीम काल अत्यंत तातडीच्या कामासाठी अजमेरबाहेर गेले आहेत.” कोका बचावात्मक सुरात म्हणाला. “शाहजाद्यांची तुम्हाला भेटण्याची इच्छा होती, पण काही कारणांमुळे त्यांना जमले नाही.”
“शाहजाद्यांची इच्छा होणे हाच मोठा मान आहे.” अली कुली यांत्रिकपणे म्हणाला. अचानक त्याला शाहजाद्याबरोबरचा संवाद आठवला. “शाहजादे माझ्याकडे काही काम आहे असे म्हणाले होते...”
आधी कुत्बुद्दीनच्या चेहेर्यावर प्रश्नचिन्ह उमटले, पण काही क्षणातच समजूतीचा भाव आला.
“बहुतेक आता सलीमला जे काही तुमच्याकडून हवे होते त्याची गरज वाटत नाही.” कुत्बुद्दीन एकदम अनौपचारीकतेने म्हणाला. अली कुलीला आश्चर्य वाटले.
“ते असो. तुमच्या माणसांसोबत तुम्ही तयार राहा. शाहजाद्यांना आग्र्यात सामिल होण्यासाठी सैन्य हवे आहे. आणि शूर फौजी हवे आहेत. तुमची प्रवास करण्याईतपत तब्येत झाल्यावर लगेच आग्र्याकडे निघा.” असे बोलून कुत्बुद्दीन अली कुलीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन बाहेर पडला.
त्या संध्याकाळी सफदर खान आला. अली कुलीला त्याला बर्याच गोष्टी विचारायच्या होत्या.
“सफदर ?”
“जनाब.”
“आग्र्याला काय होणार आहे?”
सफदरच्या चेहेर्यावर हसू फुलले, जे साधारणपणे काहीतरी गरमागरम बातमी असल्यावर फुलत असे.
“जनाब, ते एक रहस्यच आहे.”
अली कुली हसला. “सगळ्या सैन्येला माहित असणारे रहस्य ?”
सफदर पण हसला. “आग्र्याला जाण्याची गोष्ट सुद्धा जमेल तितकी गुप्त ठेवली आहे जनाब. जे स्वतः आग्र्याला चाललेत त्यांनाच कळवले आहे या बाबत.”
अली कुली कोड्यात पडला. “आग्र्याला का जात आहेत पण?” आणि अचानक त्याला त्या गोष्टीचे महत्व समजले. उत्तराधिकार्यांच्या युद्धाची वेळ आली तर !
“पादशहाँना काही झाले काय ?!”
सफदरने मान हलवली. “नाही जनाब. पादशहा सलामत आहेत.”
“मग मोहीमेच्या मध्येच आग्रा का ?”
सफदर खानाने आजूबाजूला पाहीले आणि तो कुजबुजला- “जनाब, आग्र्याला काय आहे याचा विचार केला तर अंदाजा येईल. सल्तनतची तिजोरी तिथे आहे. “
अली कुली सफदर गेल्यावर बर्याच वेळ यावर विचार करत राहीला.एव्हाना सलीमचे आपल्याकडे काम काय असावे त्याला अंदाज आला होता. घियास बेगच्या ओळखीने आग्र्याच्या खजिनदाराची माहीती घेणे आणि गरज पडल्यास घियासच्या ताकदीचा वापर करणे- हाच हेतू असणार. खजिन्याच्या नाड्या हातात आल्यावर पादशहा तरी काय करणार ? घियास पर्यंत पोचण्यासाठी अली कुली लागणार. पण बहुतेक शाहजाद्याला दुसरा कोणीतरी दुवा मिळाला असेल आणि अली कुलीची मदत लागली नसणार.
अली कुलीने मान हलवली. अकबर आणि सलीम यांच्यात स्वामी निवडण्याची वेळ येणार तर. सिंहासनाच्या लढ्यात भाग घेणे तेव्हाच उपयोगाचे, जेव्हा फायदा प्रचंड असेल आणि त्यामानाने धोका कमी असेल. इथे दोनीही नव्हते. जरी सलीमने बापाला धूळ चाटली, तरी अली कुलीचे त्यामधले महत्व अनन्यसाधारण नसणार. अली कुलीकडे ना अगडबंब फौज, ना संपत्ती. त्यामुळे अली कुलीचे बक्शीश खूप मोठे नसणारच. शेवटी, अली कुली ठरला एक फौजी. दुसरी गोष्ट म्हणजे, पादशाह अकबर वृद्ध असले तरी मुघल दरबारी आणि सेनापतींवर त्यांची जबरदस्त पकड होती. त्यामुळे सलीम युद्धात धूळ चाखण्याची शक्यता मोठी होती. पण सलीमला थेट नकार देणे सुद्धा धोक्याचेच. सलीम विजयी झाला, किंवा आता पराभूत होऊनही पुढे पादशाह अकबराच्या मृत्यनंतर शाहजादा दानियालला हरवून जर सिंहासनावर बसला असता, तर अली कुलीच्या महत्वकांक्षांवर पाणी फिरले असते. त्यामुळे आग्र्याला पातशहांच्या सैन्याविरुद्ध सलीमला मदत करायची की नाही हा निर्णय त्याच्या समोर वाढून ठेवलेला.
अली कुलीने झोपण्यापूर्वी राजकारणाचे विचार बाजूला सारले, आणि , मेहरुन्निसाच्या स्वप्नान्मध्ये हरवला.
भाग १ समाप्त.
By Anant, born active 1584-1611 - V&A Museum <a rel="nofollow" class="external autonumber" href="http://images.vam.ac.uk/indexplus/result.html?_IXFIRST_=8&_IXSS_=_IX...">[1]</a>, Public Domain, Link
चार वर्षाच्या अब्दुर्रहीम खानला स्विकारताना अकबर.
प्रतिक्रिया
23 May 2021 - 7:12 am | चित्रगुप्त
हा पहिला भाग सावकाशीने वाचून काढला. लिहीण्याची शैली आवडली आणि आजवर ठाऊक नसलेले ऐतिहासिक बारकावे समजून घेत वाचण्यात मजा आली.
शेवट उत्कंठावर्धक असल्याने आता दुसरा भाग वाचायला घेतो आहे. अनेक आभार.
24 May 2021 - 8:35 am | तुषार काळभोर
वरचा प्रतिसाद कॉपी पेस्ट.
+
चित्र अतिशय सुंदर आहे. त्यातील बारकावे जाणून घ्यायला आवडतील.
सध्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे गाय/बैल, घोडे, चित्ते, मोर हे नजराणे दिसताहेत.
23 May 2021 - 8:54 am | गॉडजिला
मजा आली...