रिमझीम गिरे सावन...
सुलग सुलग जाये मन...
भिगे आज इस मौसम में....
लगी कैसी ये अगन....
पडद्यावरती या गाण्यात, अमिताभच्या गाण्यावर मोहित होऊन गालावर नाजूक, गोड खळी पडणारी मौसमी इतकी लोभस दिसते की बस....या गाण्यात तीच्या गोड दिसण्याकडे मन इतके आकृष्ट होते की किशोरच्या आवाजाकडे व गाण्यातील शब्दांवर लक्ष लागतच नाही. पण २००५ नंतर जेव्हां केव्हा मी गाणे ऐकतो तेव्हा तेव्हां दुसर्या एका मौसमीची दुखरी आठवण काळजाला चिरत जाते. अंगावर शिरशिरी येते, नकळत मन विद्ध होते आणि आपल्या असहाय्यतेची जाणीव दुःखाचे बोचरे बाण बनून ह्रदयाला टोचायला लागते. आपल्या जवळची माणस, बाप, माणुसकी, समाज, माया इ. शब्द पोकळ वाटायला लागतात. त्या दुर्दैवी मौसमीच्या कहाणी मी आपल्यासमोर मांडणार आहे. त्यासाठी मी प्रथम आपल्याला पंधरा-सोळा वर्षे भूतकाळात मागे घेऊन जाणार आहे........
कपडे.......चेक
पैसे.........चेक
तिकीटे.....चेक
कॅमेरा.....चेक
चलो दार्जिलींग गंगटोक!! रात्रीची ९-२२ ची खरगपूर-हावडा लोकल पकडण्यासाठी आम्ही चार मित्र खरगपूर फलाटावर वाट पहात उभे होतो. तेवढ्यात काही लहान मुले फलाटावर दारू पिल्यासारखी झोकांड्या देत तर काही रेल्वे रूळावरच दंगा करत चालली होती. समोरून येणार्या इंजिनाच्या जोरदार भोग्यांने व आम्हा मित्रांच्या आरडाओरडीला घाबरून ती, आम्ही उभे असलेल्या फलाटाच्या मागे असलेल्या अंधारात पळून गेली. पिंजारलेले केस, फाटकी चड्डी, मळकट्ट असा सदरा व हातात कसली तरी टूथपेस्ट सारखी ट्यूब घेऊन आमच्या जवळून झोकांड्या देत पळत जाताना यातील १-२ मुलांचे चेहरे लक्षात राहिले.
यानंतर काहीच दिवसांनी आयआयटीतील प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून चालू केलेल्या “प्रबुध्द भारत” या अनाथ मुलांसाठी काम करणार्या सेवाभावी संस्थेसाठी मी काम करण्यास सुरूवात केली. तेव्हा माझ्यावर खरगपूर रेल्वे स्टेशनवरील अनाथ मुलांची जबाबदारी सोपवण्यात आली. आठवड्यातील चार दिवस तेथे जाऊन त्यांना लिहायला व वाचायला येईल इतपत हिंदी, इंग्रजी व गणित शिकवणे हे मुख्य काम होते. माझे अजून दोन मित्र अविनाश पवार व अनिश धनंजय यांच्याबरोबर हे आळीपाळीने करायचे असे ठरले. काम सुरू करताना वाटले त्यापेक्षा हे काम फारच कठीण होते. ५ ते १२ वर्षे वयोगटातील या मुलांमधील काही मुले/मुली घरातून पळून आली होती, काहींना पळवून आणून जबरदस्तीने त्याच्यांकडून काम करून घेतले जाई. दिवसभर ही मुले रेल्वेगाडीमध्ये भीक मागून, डबे साफ करून पैसे मिळवीत. त्यातील काही ठराविक हिस्सा बॉसला दिल्यावर संध्याकाळी ८ नंतर ही मुले अक्षरशः फलाटावर उधळलेल्या वारूसारखी थैमान घालत असत. अल्लड वय आणि त्यात सहज मिळणाऱ्या पैशांमुळे सिगरेट, नशा करणे या अशा गोष्टींकडे त्यांचा कल जास्त असे. त्यांना अक्षरशः शोधून शोधून तिकीट खिडकी जवळच्या मोकळ्या जागेत आणून बसवावे लागे. रात्री नऊ ते साडेदहा अशी आमची शाळेची वेळ होती. त्यांना अभ्यासाबरोबरच व्यसनमुक्ती, स्वच्छता, आरोग्य इ. अनेक गोष्टींवर समजावणे हा देखील एक दररोजचा ठरलेला भाग असे. व्यसनमुक्तीसाठी त्यांना फळे, बिस्कीटे इ. देणे व त्याबदल्यात आम्ही त्याच्यांकडून नशा करण्यासाठी सायकलचे पंक्चर काढण्यासाठी वापरण्यात येणारी एकप्रकारची ट्यूब, सिगरेटस काढून घेत असू. पण परत काही दिवसांनी पहिले पाढे पंचावन्न. ह्या गोष्टी ते कश्याही प्रकारे कोठून ना कोठून मिळवत व परत या दुष्टचक्रात अडकत.
मी काम सुरू करून झाल्यानंतर पहिल्या १-२ दिवसातच मौसमी नावाचे चक्रीवादळ आमच्या त्या रात्र शाळेत घोंघावत आले.........(क्रमश:)
प्रतिक्रिया
16 May 2021 - 9:16 pm | तुषार काळभोर
तुम्ही केलेली सुरुवात अतिशय रोचक आहे.
बाकी रिमझिम गिरे सावन... हे गाणं आवडतं आहेच! मौसमी पण अतिशय सुंदर दिसली आहे.
16 May 2021 - 9:48 pm | Ujjwal
NASHEBAAZ
मन विषण्ण करणारी डॉक्युमेंट्री
16 May 2021 - 9:49 pm | Ujjwal
NASHEBAAZ
16 May 2021 - 11:21 pm | नावातकायआहे
पु.भा.प्र.
17 May 2021 - 10:09 am | प्राची अश्विनी
+११
17 May 2021 - 5:20 pm | चौथा कोनाडा
अतिशय रोचक सुरुवात !
पु.भा.प्र.
छोटे भाग टाकणार असे दिसतय.
लवकर लवकर टाका !
17 May 2021 - 10:06 pm | मुक्त विहारि
सुरूवातच अंगावर आली