एक स्फुट... (निसर्ग आणि माझी पुस्तके)
....मी लहान असताना पहिले अनुवादीत पुस्तक वाचले ते ‘‘मोहॉकची रणदुंदुभी’’. लेखक (मराठी अनुवादक) आठवत नाही. अमेरिकेतील मोहॉकच्या खोऱ्यात गोऱ्यांनी जी वसाहत केली त्याच्या पार्श्र्वभूमीवरील ही कादंबरी... त्या वेळी तरी मला फार आवडली ती. त्यातील निसर्गासाठी. चांगली जाडजूड होती. The Drums of Mohwak ही इंग्रजी कादंबरी मात्र नेटवर कुठेतरी उपलब्ध आहे. मी एक दोन वर्सांपूर्वी याचा अनुवादही करायला घेतला होता. पण नंतर तो अर्धवट राहिला. त्यातील काही भाग खाली देत आहे.. एक तरूण जोडपे वसाहत करण्यासाठी निघालेले असते त्यांची ही गोष्ट आहे... यातील एका रेड इंडियन माणसाने एका गोऱ्या माणसाच्या पाठलागाचे वर्णन अफलातून आहे.... मी केलेल्या अर्धवट अनुवादातील काही भाग खाली गंमत म्हणून देत आहे...
...ते एकदम स्कायलरच्या जंगलातून उघड्यावर आले. चहूबाजूला आता नांगरलेल्या शेतजमिनी दिसू लागल्या. शेतात काम करणारी माणसे दिसू लागली. लानाला त्या जंगलातून एकदम सुटका झाल्यासारखे वाटले. आजुबाजूला पहाताना तिला जाणीव झाली की त्यांचे घर आता काहीच मैलांवर आहे. या सगळ्या शेतजमिनी, दणकट घरे, त्यात काम करणारी माणसे पाहिल्यावर, आपण एवढ्या काही आडरानात पडलेलो नाही याची तिला खात्री वाटली.
त्यांची गाडी पहाताच काही माणसे त्यांना बघण्यास कुंपणापर्यंत आली. त्यांनी गिलला अभिवादन केले व लानाला उत्सुकतेने न्याहाळले. सगळे विचारत होते, ‘काय बातमी आहे तिकडची ?’ जेव्हा गिलने सांगितले की विशेष काही बातमी नाही तेव्हा ते हसले व लानाकडे पहात, हसत म्हणाले, ‘तिकडे नसेल पण तुझ्याकडे खास बातमी दिसते आहे’..
गेला अर्धा तास ते स्कायलरमधून गाडी हाकत होते. परत एकदा रस्त्यावर व नदीकाठावर जंगलाचे आक्रमण झाले. महाकाय एल्म, विलो व किन्ह्याच्या वृक्षांची दाटी झाली. खडबडीत, लाकडे गाडलेल्या रस्त्यावरुन जाताना गाडी हिंदकळत होती. घोडीही काळजीपूर्वक पावले टाकत चालली होती. ते जेव्हा क्रॉसबी मॅनॉरला पोहोचले तेव्हा ती जागा लानाला जगावेगळी, विचित्र वाटली. नदीकाठी एक सुबक घर उभे होते. त्याच्याच शेजारी एकोंडक्यात बांधलेली साठवणीची खोलीही दिसत होती पण त्या सगळ्यावर भुतकाळाची छाया पडल्यासारखे वाटत होते.
तेवढ्यात डोळ्यावर हाताचा पंजा धरत एक बाई त्या खोलीच्या दरवाजात आली. तिची प्रकृती काही बरोबर वाटत नव्हती. कसल्यातरी दडपणाखाली ती वावरत असल्यासारखे वाटत होते. लाना तिच्याकडे पहात ओशाळपणे हसली पण त्या बाईने तिची दखल घेतली नाही ना ओळख दाखवली. गिल घाईघाईने गाडी शेजारी आला. हळू आवाजात लानाची समजूत काढत म्हणाला, “ तिच्याकडे लक्ष देऊ नकोस लाना ! ती जरा विचित्रच आहे. ती जॉन्सनची माणसे आहेत. त्यामुळे त्यांना येथे जास्त मित्र नाहीत.”
“कोण आहे ती बाई ?”
“वुल्फची पत्नी ! माझे त्याच्या बरोबर बऱ्यापैकी पटते पण बाकीच्यांचे त्याच्याशी विशेष पटत नाही. त्यांच्याशी कोणी बोलत नसल्यामुळे ती बहुतेक एकलकोंडी आणि विचित्र झाली असावी”.
मोठ्या आवाजात त्याने तिला अभिवादन केले. “हेलो !” असे म्हणत ती आत जाण्यासाठी वळली. तेवढ्यात गिलने विचारले, “ मिसेस् वुल्फ, काय एकट्याच आज ?”
“जॉन गेलाय जवळच कुठेतरी. बोलावू का त्याला ?”
“नाही नाही...कोणी दिसले नाही म्हणून विचारले ”
“थॉमप्सन कुटुंब मागच्या गुरुवारीच गेले” ती म्हणाली.
“कायमचे ?”
“हो बहुतेक. ते ऑस्वेगोला गेले. काँग्रेस स्टॅनविक्सची गढी दुरुस्त करणार आहेत म्हणे. याचा अर्थ कटकटींना सुरुवात होणार. मी जॉनला स्टॅनविक्सलाच जा म्हणत होते पण तो म्हणाला की ते परवडणारे नाही. तिकडे जायचे म्हणजे जगण्यासाठी रोख पैसे लागतील”. स्टॅनविक्सच्या दिशेने तिने मान हलवली आणि आत गेली.
लाना व गिल तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात असतानाच ती घराकडे वळली.
“त्यांनी त्यांच्या खिडक्या फळ्या मारुन बंद केल्या आहेत ” तेथे एवढी शांतता का होती याचे ते उत्तर होते तर. “त्यांनी त्यांची जनावरेही बरोबर नेली आहेत.”
ते बघून लानाच्या अंगावर काटा आला. “या घरात फक्त ते दोघेच राहतात की काय ?” तिने विचारले.
“ह्ंऽऽऽऽ असे वाटतंय खरं ! त्यांना एक मुलगी आहे. तिचे लग्न डॉ. पेट्रीशी झालंय. तो कमिटीचा सभासद आहे. त्यामुळे तो तिला माहेरी पाठवत नाही”
“सगळंच भयंकर” लाना पुटपुटली. गिलने चमकून तिच्याकडे पाहिले.
“ आपल्याला काय करायचय ? आपला पक्ष खरा व प्रामाणिक आहे.”
लानाने यावर काही उत्तर दिले नाही. निमुळता होत होत रस्ता आता जंगलात शिरला. प्रकाशाच्या धुरकट तिरप्या रेषांखालून रडतखडत त्यांची गाडी चालली होती. त्या घोडीच्या प्रत्येक पावलाने तिचे घर जवळ येत होते पण लानाला ते कित्येक योजने दूर असल्याचे वाटत होते. एकदा तर तिला ते आता येणारच नाही असेही वाटले. ‘ आपण घरी चाललो आहोत” तिने स्वत:ला बजावले. पानापानांमधून झिरपणाऱ्या प्रकाशाची तिव्रता आता कमी झाली. त्याचा रंगही सोनेरी झाला. दूर कोठेतरी डोंगरावर, उजव्या बाजूला पकोरडी कोंबडीने तिचा ढोल संथ लयीत वाजविण्यास सुरुवात केली. त्याची लय वाढत होती हे लानाच्या लक्षात आले. तेवढ्यात त्या घोडीच्या डोक्याभोवती माशा घोंगावत आल्या व तिला त्रास देऊ लागल्या. त्यांच्या प्रत्येक चाव्याने ते त्या बिचाऱ्या प्राण्याचे रक्त काढत होत्या. ती बिचारी जोरजोराने डोके व शेपटी हलवत त्या माशांना हाकलून लावण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होती. ती खूर आपटत अंग जोरजोराने हलवत शेवटी परिस्थितीला शरण जाऊन पाय उचलत होती. ते बघून लानाला रडू आले. तिने हताशपणे गिलकडे पाहिले. तो हातातील फोकाने गाईला हाकारत होता. ती आता गाडीच्या मागे आली.
“या माशा नेहमी असतात का येथे ?” लानाने विचारले.
“जंगलात माशा असतातच. बहुदा आता पाऊस पडनार असेल म्हणून त्या बाहेर आल्या आहेत.”
त्याच्याही कपाळावर माशांनी चावल्यामुळे गांध आली होती व त्यातून येणारा रक्ताचा ठिपका स्पष्ट दिसत होता. “ आमच्या गावी एवढ्या मोठ्या माशा मी कधीच पाहिल्या नाहीत.”
“तुला आता त्यांची सवय करावी लागेल. हे घे आणि त्या माशांना हाकल” असे म्हणून त्याने त्याच्या हातातील मॅपलची डहाळी तिला दिली. लानाने त्या घोडीच्या डोक्यावरुन माशा हाकलण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात तिला त्या कामाची गोडी वाटू लागली. मधेच घोडी डोके खाली घाले व तिला माशा हाकलाव्या लागत नसत. त्या कामात ती इतकी गुंगून गेली की डावीकडचा छोटा रस्ता तिच्या नजरेतून निसटला. पलिकडेच जंगल साफ करुन मोकळी केलेली जमीनही तिच्या लक्षात आली नाही. जेव्हा गिलने “ते डिमुथची वाडी आहे” असे सांगितले तेव्हा तिच्या लक्षात आले की तो रस्ता तिला दिसला नव्हता.
“कुठे ?” तिने विचारले.
“गेली मागे ! पण व्हिवरवाडी पुढेच आहे.”
तिने ती कुठे आहे हे पाहण्यासाठी नजर दूरवर टाकली. तिला विरळ होत गेलेली झाडी दिसली. सूर्य समोरच क्षितिजावर बुडत होता. मावळताना त्याने काळ्या ढगांच्या करड्या कडा सोनेरी किरणांनी भाजून काढल्या होत्या. ती ते पहात असतानाच त्या ढगांनी सूर्याला झाकाळून टाकले. त्याच क्षणी तेथे पूर्वेकडून येणारे वारे थडकले. त्या वाऱ्याने माशा उधळून लावल्या. काहीच क्षणात त्यांनी पावसाबरोबर सरवटावर प्रवेश केला. त्या झोडपणाऱ्या पावसाच्या तिरक्या धारांतून लानाला व्हिवर कुटुंबाचे घर अस्पष्टसे दिसले. चौकोनी आकाराची मुख्य इमारत, त्यालाच नंत जोडलेली एक लाकडाची खोली. ती लाकडे अजूनही नवीन दिसत होती. छिलण्यांनी शाकारलेले छप्पर, त्यातून आकाशात गेलेले धुराडे व त्यातून वर जाणारा धूर लानाला आवडला. ते घर एका सरवट्याच्या मध्यभागी होते व त्याच्या तिन्ही बाजूला शेतात अर्धवट जळालेले बुडखे, तेथे मका लावत असावेत हे सांगत होते. घरासमोर रांगोळी घालावी तसा तीनचार एकरांत व्यवस्थीत नांगरलेल्या जमिनीत गहू लावललेला दिसत होता. त्यातून एक गाडीवाट वखारीकडे जात होती. त्या घराच्या समोरच दोन्ही बाजूला खैराची झाडे उभी होती. एक होते पिवळ्या रंगाचे तर एक होते लाल.
कुठेही माणसाची चाहूल नव्हती पण जंगलाच्या किनाऱ्यावरुन एक नवीन रस्ता फुटला होता. तो रस्ता खाडीवरच्या रिअल कुटुंबाच्या वस्तीवर जातो असे गिल म्हणाला. “ आपल्याला अजून सरळ जायचे आहे.”
किंग्जरोड परत एकदा जंगलात गुडूप झाला पण लगेचच तो एका आल्डरच्या झिलाण्यात आला. डावीकडे अर्ध्या मैलावर अंधारात नदी होती. त्याच्यामागे विलोच्या जंगलामागे परत चढ दिसत होता. रस्ता एकदम डावीकडे आल्डरझांमधे वळला आणि सरळ ऊतरणीला लागला.
घोडी तेथे थांबली आणि गिल गाडीच्या बाजूला गाईला घेऊन आला. त्याच्या चेहऱ्यावरुन पाणी ओघळत होते पण त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते.
“ह्ंऽऽऽऽऽ पोहोचलो एकदाचे !”
“कुठे ?” लानाने न समजल्यामुळे विचारले.
“कुठे म्हणजे घरी !” त्याने तिच्याकडे पाहिले.
“गिडिॲपऽऽऽऽऽ तो त्या घोडीच्या अंगावर ओरडला. तिने मुख्य रस्ता सोडून गाडीच्या धावांमुळे तयार झालेला रस्ता पकडला. त्याच क्षणी लानाच्या नजरेला ते घर पडले.
एका उंचवट्यावर ती लाकडी केबीन उभी होती. त्याच्याच मागे मातकट पाण्याचा ओढा आल्डरच्या बनातून वहात होता. दूरवर जमीन रुंदावत गवताच्या झिलाण्यात लुप्त झाली होती.पहिल्या नजरेत तिच्या ध्यानात याच गोष्टी आल्या. तिचे प्राण तिच्या कंठाशी आले. येथे ....? “रडू नकोस” तिने स्वत:ला बजावले. “रडू नकोस !”
तिला ते घर एखाद्या अनाथ आश्रमासारखे भासले. घरामागे गिलबर्टच्या शेतीच्या पहिल्या वाहिल्या प्रयत्नांच्या खुणा दिसत होत्या. जळलेले बुडखे, कमीजास्त उंचीची मक्याची रोपे. घराभोवती व्हरांडा व छप्पर नसल्यामुळे पावसाने चिखल माजला होता. त्याच्याच मागे तिला घोड्यासाठी व गाईसाठी गोठा बांधलेला दिसला. तेवढ्यात गिल ओरडला, “ लाना वर बघ धुराड्यातून धूर येतोय ” तिने चमकून वर पाहिले तर धुराच्या रेघोट्या वर चालल्या होत्या. पण त्यामुळे तो पाऊस अजुनच भयप्रद वाटत होता.
“ चल गिल घरी जाऊया” असे ती म्हणणार तेवढ्यात तिने स्वत:ला सावरले. काय भले वाईट व्हायचे आहे ते आता येथेच... ती मनाशी म्हणाली. तिचे घर आता दूर राहिले होते. या घराचे रुप बदलणे ही आता तिची जबाबदारी होती. त्यांनी गाडी घरापाशी आणली. घराचा दरवाजा उघडला व एका मजबूत बांध्याची, पांढऱ्या केसाची स्त्री हातात परडी घेऊन उभी होती. तिच्या अंगावर मळकट झगा होता ज्याचा रंग कधीकाळी निळा होता हे सांगावे लागले असते. तिला धक्का बसल्याचे सरळ सरळ दिसत होते.
“गिल आश्चर्याचा धक्काच दिलास तू मला. मी तुझ्यासाठी घर आवरुन ठेवणार होते. मी आत्ताच चूल पेटवली आणि ही रोपे दरवाजात ठेवायला निघाले होते.” गिलने लानाला आधार देण्यासाठी हात पुढे केला.
“तू आत जा लाना. तो पर्यंत मी ही गाडी खाली करतो. या आहेत मिसेस व्हिवर....ही लाना” मिसेस व्हिवरने हातातील रोपे खाली न ठेवता लानाला कवेत घेतले.
“लाना” मिसेस व्हिवर खुष होऊन म्हणाल्या, “तुझ्याबद्दल मी बरेच काही ऐकले आहे. देव साक्षी आहे त्याला. पण गिलने सांगितले त्यापेक्षा, लाना तू शतपटीने सुंदर आहेस....”
यात या लानाकडे तिच्या आईने दिलेले एक मोरपिस असते आणि ते पाहण्यासाठी वाडीतील लोक कशी गर्दी करतात त्याचे वर्णन वाचणेही मजेशीर आहे..
नंतर वाचली ती जॉन मूर यांची पुस्तके. नंतर जॅक लंडन यांच्या कथा कादंबऱ्या. ही सगळी पुस्तके वाचली ती त्यातील निसर्गासाठी. त्यातच एक होते ‘‘देरसू उझाला’’ आणि The Yearling. याचेच नंतर श्री राम पटवर्धन यांनी केलेले ‘‘पाडस वाचले’’ मी ते घेतले तेव्हा त्याची किंमत होती फक्त रुपये १०. त्यानंतर मात्र प्रत्येक पावसाळ्यात मी या पुस्तकाचा फडशा पाडत असे. यातील निसर्ग, विचारांचा साधेपणा, आणि जगण्याच्या तत्वज्ञानाने माझ्या मनाला भुरळ पाडली. हा अनुवाद मूळ पुस्तकापेक्षा अप्रतिम झाला आहे असे माझे प्रामाणिक मत आहे किंवा मराठीत ते पुस्तक आपल्याला जास्त भावत असेल... जेव्हा मी लिहायला सुरुवात केली तेव्हा मात्र पाडसच्या वाचनात खंड पडला पण त्यातील तत्वज्ञान मात्र माझ्या ग्रे मॅटरमधे पक्के बसले आहे.
देरसू उझाला या माणसानेही मला अशीच भुरळ घातली आणि मी त्याचे झपाटून भाषांतर केले. फक्त तीन महिन्यात. उद्या भारतात जायला निघायचे, आणि रात्री बरोबर २ वाजता मी ‘समाप्त’ हा शब्द लिहिला.
त्यानंतर निसर्ग ओतप्रोत भरलेली पुस्तके लिहिली (अनुवाद. ही जाहिरात नव्हे. या लेखाच्या अनुषंगाने उल्लेख केला आहे.) वॉल्डन आणि आरण्यक. निसर्गाची वर्णने करताना माझा कळफलक न थांबता चालतो आणि लिहिण्याची वेळ जर पहाटे असेल तर मग बहारच... :-)
पण मला आठवतात ज्योडी आणि पेनी कारण आता पावसाळा जवळ आला आहे...
परवा मुलीचा फोन आला होता आणि कसलातरी विषय निघाला आणि ती मला म्हणाली, ‘‘ बाबा तुमच्याकडून आम्ही एक मात्र शिकलो की सदान कदा पुढे पाहायचे. भूतकाळात अडकून पडायचे नाही...’’ हे मी पेनी कडून शिकलो आणि तेच संस्कार माझ्या मुलांवर माझ्या नकळत झाले असावेत. हा पेनी म्हणजे ज्योडीचा बाप. आता ज्योडी कोण हे सांगण्यासाठी अजून थोडेसे लिहावे लागेल... ती गोष्ट सांगावी लागेल. ज्यांनी पाडस वाचले आहे त्यांच्यासाठी हा लेख म्हणजे फक्त एक आठवण !
लेखिका मार्जोरी किनन रॉलिंग्ज फ्लोरिडामधे एका पबमधे रोज संध्याकाळी जाऊन बसत असे. तेथे अनेक शेतकरी जमत व गप्पांना नुसता उत येई. त्या ऐकता ऐकता या बाईचा वेळ कसा जाई ते तिला कळत नसे... ऐकलेल्या कथांवरुन तिला या कथेचे बीज गवसले आणि ही कादंबरी लिहिली गेली.
यात एका पेनी नावाच्या माणसाची कहाणी आहे. किंवा त्याच्या कुटुंबाची कहाणी आहे. त्याच्या कुटुंबात एक चांगली जाडजूड बायको, अनेक मुलांनंतर वाचलेला त्यांचा मुलगा ज्योडी, दोन शिकारी कुत्री, एक घोडा आणि एक बंदूक आणि त्यांची बॅक्स्टरवाडी एवढे सदस्य आहेत. या कुटुंबाची जगण्याची धडपड, त्यांचा प्जंगलातील प्राण्यांशी चाललेला संघर्ष आणि त्याच वेळी त्या प्राण्यांबद्दल वाटणारी कणव हे सगळे वाचण्यासारखे आहे. पेनीची आणि थोट्या अस्वलाची झुंज वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात.
एकुलता एक मुलगा असल्यामुळे ज्योडीला आपल्याला एक सवंगडी असावा असे सारखे प्रकर्षाने वाटत असते. पण बिचाऱ्याला एकच मित्र, तोही फॉरेस्टरांच्या वाडीवर.. फॉडरविंगचे व्यक्तिचित्रही वाचण्यासारखे आहेच. असो त्याला शेवटी एक सवंगडी मिळतो.. एक हरणाचे पाडस. याची आई पेनीला त्याला चावलेल्या सापाचे वीष उतरवण्यासाठी मारावी लागलेली असते. त्या उपकाराची अल्पशी फेड म्हणून हे पाडस घरी आणले जाते... मग ते पाडसही घराचे सदस्य होते.... ज्योडीचा आता वेळ झकास चाललेला असतो... पण काळ पुढे सरकतो आणि पाडसही मोठे होते... त्याची भूक वाढते आणि पेनीने लावलेले पीक फस्त करणे त्याच्यासाठी फारच सोपे होते. शेवटी बॅक्स्टर कुटुंबावर उपाशी मरण्याची वेळ आल्यावर ज्योडीच्या आईला त्या पाडसावर गोळी झाडण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही.... पाडस मेल्यावर ज्योडी रागावून घरातून नाहीसा होतो. एका फुटक्या तुटक्या बोटीत बसून तो ती पाण्यात लोटतो. त्याला बोस्टनला जायचे असते. पण दोन तीन दिवसातच त्याला भुकेचा खरा अर्थ कळतो. बाप जेव्हा आपण भुकेने मरू असं म्हणतो म्हणजे काय याचा अर्थ त्याला आत्ता कळतो. आत्तापर्यंत त्याला भुक म्हणजे आता आईकडून काहीतरी खाण्यास मिळणार एवढाच अर्थ माहीत असतो...
काही दिवस उपासमार झाल्यावर बिचारा घरी येतो. घराची आठवण त्याला छळत असतेच. घरी आल्यावर त्याचा बाप त्याला सांगतो,
....तुला मी काही गोष्टी सांगणार आहे बाप्याबाप्यातील गोष्टी. मी तुझ्यावर उलटलो अशी तुझी कल्पना. प्रत्येक माणसाला केव्हा ना केव्हा तरी समजून घ्यावी लागते अशी एक गोष्ट सांगतो तुला. कदाचित तुला ती एव्हाना समजलीही असेल. प्रश्न फक्त माझ्यापुरता नाही. तुझा हरीण मारावे लागले येवढ्या पुरताही नाही. पोरा, सारे जीवनच आपल्यावर उलटत असतं..
बापाकडे पाहात जोडीने मान हलवली.
पेनी म्हणाला, ‘
‘‘माणसांच्या दुनियेत काय चालतं ते पाहिले आहेस तू. नीचपणा, दुष्टपणा करणारी माणसं तुला माहीत आहेत. मृत्यूच्या युक्त्या-प्रयुक्त्या तू पाहिल्या आहेस. भूक आणि उपासमार म्हणजे काय ते तुला कळले आहे.
हे जीवन सुंदर आणि सोपे असावे असे प्रत्येकालाच वाटत असतं. जीवन सुंदर आहे, फार सुंदर आहे पण ते सोपे मात्र नाही. जीवन एका फटक्यात आपल्याला जमीनदोस्त करतं. आपण उठतो आणि जीवन अजून एक फटका मारतं ! आयुष्यभरात मी असाच बेचैन, असुरक्षित राहिलो आहे.''
त्याचे हात रजईच्या सुरकुत्यावरून फिरू लागले.
‘‘ निदान तुझे आयुष्य अडचणीचं असू नये, कमीत कमी ते माझ्यापेक्षा सुखाचा असावं अशी माझी इच्छा. आपल्या पोटची पोरं जगाला तोंड देण्यासाठी उभे टाकताना बापाचे हृदय भडभडून येत असतं. आपली ससेहोलपट झाली तशी आपल्या पोरांची व्हायची आहे हे त्याला माहीत असतं. जमेल तितका काळ त्यापासून तुला वाचवायची माझी इच्छा होती. तुझ्या पाड्याबरोबर तू नाचाव-बागडाव असं मला वाटत होतं. तुझा एकाकीपणा त्यामुळे कमी झाला होता हे मला माहीत होतं.
पण प्रत्येक माणूस एकाकी असतो त्याने काय करायचं?
जीवन जेव्हा फटका मारून खाली पाडतं तेव्हा काय करायचं त्याने? एकच करायचं. आपल्या वाट्याला भोग येईल तो स्वीकारायचा आणि पुढे चालू लागायचं.’’
आयुष्यभर मी याच तत्वज्ञानाने चालत राहिलो आहे. आणि ज्याप्रमाणे ज्योडीला त्याने बांधलेली पाणचक्की युगाच्या अंतापर्यंत फिरत राहाणार आहे असं वाटत असते तसेच मलाही हेच तत्वज्ञान जगाच्या अंतापर्यंत आपल्याला तारून नेणार याची खात्री आहे..... विशेषतः सध्याच्या पार्श्र्वभूमीवर...
-जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
9 May 2021 - 5:34 pm | प्रचेतस
क्या बात है..!
सुरेख लेख.
पाडस नाव म्हणताच डोळ्यांसमोर राम पटवर्धनांचेच नाव येते, अप्रतिम अनुवाद झालाय हा.
आपल्याकडील लेखकात निसर्गावर लिहिणारे नाव डोळ्यासमोर येते ते गोनीदांचेच. एकापेक्षा एक सरस पुस्तके आहेत इथल्या निसर्गाने बहरलेली.
10 May 2021 - 6:20 pm | Bhakti
वाह
निसर्ग आणि माणसाचे मन वर्णन ,प्रसंग वाचताना प्रसन्न वाटलं.
श्री राम पटवर्धन यांनी केलेले ‘‘पाडस वाचले’’ मी ते घेतले तेव्हा त्याची किंमत होती फक्त रुपये १०
खूपच ऐकलय पाडस या पुस्तकाबद्दल !लवकर पुस्तक वाचायला हवे :)
10 May 2021 - 6:32 pm | मुक्त विहारि
काही पुस्तकांची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद ....
11 Jul 2021 - 7:08 pm | गॉडजिला
हेच बोलतो.
प्रचेतस यांचा प्रतिसादही सुरेख
10 Jul 2021 - 10:44 pm | वैनिल
'पाडस' ही मर्मबन्धातली ठेव आहे माझ्यासाठी. ह्याचा अनुवाद रामकाकांनी अप्रतिम केला आहे. तुमच्यासारखंच त्यातील तत्वज्ञान मात्र माझ्याही ग्रे मॅटरमधे पक्कं बसलं आहे. :-)