आभार

Primary tabs

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
2 May 2021 - 11:30 am

नमस्कार, सतत दर ३०सेकंदाला कानावर पडणार्‍या 'ब्रेकींग न्यूज' ने सुन्न झालेल्या मनाला काहीतरी दुसरा विषय द्यावा म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन काँग्रेस समोर दिलेल्या भाषणाची प्रत काल वाचायला सुरुवात केली. ते त्यांच्या राष्ट्रीय नेत्यानी दिलेले भाषण अशीच भूमिका मनात असल्याने वाचताना थोडा सैलावून वाचत होतो. अचानक एक ओळखीची वाचावी अशी फ्रेज 'a once-in-a-generation investment' डोळ्यासमोर आली आणि मी भारतात परत आलो. आरोग्य -शिक्षण -रोजगार या क्षेत्रातल्या येऊ घातलेल्या काही बदलांबद्दल पुढे बरेच काही लिहिले होते पण मला हे नक्कीच जाणवले की हे आपल्याला काही नवे नाही. माझ्या शैक्षणिक क्षेत्रापुरते बोलायचे झाले तर अशी गुंतवणूक करणार्‍या अशा अनेक महामानवांची नावं डोळ्यासमोर उभी राहिली.१८९३ साली संपूर्ण बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे सयाजीराव गायकवाड हे त्याचे थोर उदाहरण आहे. त्यानंतर पुढची पहाट उगवली २००९ साली ! (Right to Free and Compulsory Education Act 2009)
इतिहासात फारसे न डोकावता आता सध्या काय घडते आहे ते सांगतो. आता शिक्षणासाठी मदत करणारे संस्थानीक नाहीत तर तुमच्या माझ्या सारखे सर्वसामान्य लोक आहेत. वर्तमानातही असे प्रयत्न करणारे अनेक चेहेरे माझ्या ओळखीचे आहेत. फरक इतकाच आहे यापैकी काही चेहेरे मी बघीतलेले पण नाहीत. फक्त त्यांना मी चेहेरे म्हणतो इतकेच काय ते ! ते नेते नाहीत, ते शिक्षक नाहीत, उच्चभ्रू म्हणावे अशा वर्गवारीतले पण नाहीत. ते सामान्य शेतकरी आहेत, छोटीमोठी नोकरी करणारे आहेत, शिक्षित आहेत पण शैक्षणिक क्षेत्रात नाहीत असे हे लोक आहेत. एखाद्या पिढीला मदतीचा हात देण्याचे मूल्य जपणारे हे लोक आहेत.आता हे सगळे फारच कोड्यात बोलतो आहे असे वाटत असेल तर थोडे विस्तारात सांगतो.
गेले संपूर्ण वर्षं मी घरीच आहे. एका घडीला मला असे वाटले की माझा आणि माझ्या आवडत्या शैक्षणिक क्षेत्राचा आता कायम वियोग होणार. हे सगळे संपणार. त्याच क्षणाला मन बंड करून म्हणाले " मास्तर , इतक्या लवकर हार मानून कसे चालेल.एखाद दोन टर्म वाया गेल्यात , आयुष्य नाही " मी कामाला लागलो. विद्यार्थ्यांना फोनवरूनच मार्गदर्शन करायला सुरुवात केली. पुण्यातल्या माझ्या एका मित्राच्या ओळखीने हिंगोलीच्या एका विद्यार्थ्याचा फोन आला. त्याच्या समस्या ऐकताना कळाले की इतके दिवस शहरात राहिल्यावर ग्रामीण विद्यार्थ्यांच्या फारच कमी समस्या माझ्यापर्यंत पोहचल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण भागातील सुयोग्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने देण्याचा उपक्रम सुरु झाला. या विद्यार्थ्यांकडे आर्थिक पाठबळ नव्हते पण त्यांच्या एका पिढीला ही मदत मिळाली तर ती मदत नव्हे तर गुंतवणूक होणार होती. हळूहळू कामाला गती आली. या विषयावर मी मिपावर एक लेख लिहिला. काही सकारात्मक साद आले. काही सकारात्मक आणि सक्रिय प्रतिसाद आले. एक छोटा शेतकरी , एक विदुषी , एक प्रयोग शाळा मदतनीस असे करत माझ्या कामाला चालना मिळत गेली. केवळ मिपाच्या वाचकांच्या मदतीने दूरवरच्या खेड्यातली काही मुलं आता नव्या शैक्षणीक साधनांचा वापर करत आहेत. त्यांचे भविष्य सांगायला ज्योतिषाची गरज नाही कारण ते आता आमच्या नियमित संपर्कात असतात. घराची चौकट न ओलांडता लातूर, देवरूख, आणि सोलापूर पर्यंत पोहोचणे शक्यच नव्हते.या सर्व मिपाकरांचा मी आभारी आहे. त्यांनी केलेल्या वेळेची गुंतवणूक वाया जाणार नाही हे नक्की.
धन्यवाद.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

2 May 2021 - 1:12 pm | प्रमोद देर्देकर

2020 या वर्षी माझा मुलगा 10 वी पास झाला तेव्हा तुम्हाला संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला. डॉ खरे यांनी no. दिला पण काही उपयोग झाला नाही.

विनायक प्रभू's picture

2 May 2021 - 1:37 pm | विनायक प्रभू

भरपूर वेळ आहे अजून.
संपर्क करा

मुक्त विहारि's picture

2 May 2021 - 1:29 pm | मुक्त विहारि

तुम्ही योग्य तेच काम करत आहात ....

अभिनंदन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2021 - 1:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुरुजी तुमचं काम आपल्याला पहिल्यापासून आवडतम.
बाय द वे, आज आम्ही लै खुश आहोत.
मांगो. क्या चाहते हो. ;)

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

2 May 2021 - 2:25 pm | विनायक प्रभू

औरंगाबाद मध्ये ५ विद्यार्थी
आणि काही नको.

चौथा कोनाडा's picture

3 May 2021 - 5:33 pm | चौथा कोनाडा

अतिशय कौतुकास्पद !
हार्दिक अभिनंदन !