जादूगार (रहस्यकथा)

Primary tabs

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
18 Apr 2021 - 10:03 am

  जादूगार (रहस्यकथा)

गतकाळात घडलेल्या काही घटनांचे पडसाद, तुमच्या अंतर्मनात असे काही उमटलेले असतात की, त्यांच्यापासून तुमची सुटकाच होऊ शकत नाही. आता हेच बघा ना, इतर लोकांना जादू, जादूचे खेळ, ती जादू करणारा जादूगार किती आवडतात! अगदी मनापासून! अगदी तन मन हरपून ते जादूचे खेळ पाहतात. पण माझे तसे नाही. मला जादूगार अजिबात आवडत नाही. आणि त्यांचा तो जादूचा खेळ तर, मुळीच नाही. उलट या अशा जादूगाराबद्दल, मला अतिशय घृणा वाटते. सरसकट सगळे जादूगार हे धोकेबाज, कावेबाज आणि मतलबी असतात, अशी माझी पक्की धारणा आहे. ते तुम्हाला कधी फसवतील, कधी तुमच्यासोबत धोकेबाजी करतील, याचा नेम नाही. कधीकधी तर ते एवढ्या निर्दयीपणे वागतील की, एखादे मोठे पातक कधी तुमच्या माथी मारतील , हेही कळणार नाही. मुळात जादूगार हा प्राणीच विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही, हे माझे मत कोणीच नाकारू शकत नाही.
      आता तुम्हाला तो प्रश्न पडला असणार. जादू, जादूगार यांनी याचे काय एवढे घोडे मारले? तर हा तुमचा प्रश्न रास्त आहे. तुमच्या जागी तुम्ही योग्यच आहात. त्याबद्दल मी तुम्हाला दोष देणार नाही. पण माझीही काहीतरी मजबुरी असेलच ना? जादूगार हा काही माझा जन्मापासूनचा वैरी नाही. किंवा मागच्या जन्मीचा काही आमच्यात दूजाभाव नाही. कदाचित ती घटना जर घडली नसती तर, जादूगाराबद्दल  माझेही मत चांगलेच असते. पण ती घटना तेव्हा घडली, आणि जादूगाराबद्दल एक भीती, एक अविश्वास माझ्या मनात कायमचा कोरला गेला. खरेतर त्या घटनेला जबाबदार पूर्णपणे तो जादूगारच होता, असेही मी म्हणणार नाही. काही अंशी मीही त्याला जबाबदार होतो, हेही मी मान्य करतो. पण मुळात त्या घटनेची सुरुवात तर त्या जादूगारानेच केली होती ना? त्यामुळे मी स्वतःपेक्षा जास्त जबाबदार त्याबद्दल त्याला मानतो. 
  ती घटना छोटी मोठी असती तर, मी तिची ती सल कधीच मनातून काढू शकलो असतो. पण ती घटना छोटी थोडीच होती? एका हत्येचे पातक मी स्वतःच्या माथी मारून घेतले होते. आता सगळेजण तेव्हा म्हणत होते की, ती हत्या नसून तो अपघात होता. एक दुर्दैवाने घडलेला अपघात. भले तो अपघातही असेल, पण तो तर माझ्या हातून झाला होता ना? शेवटी अपघाताने का होईना, पण एका हत्येला मी जबाबदार तर ठरलो होतो ना? आज त्या गोष्टीला बरेच वर्ष झाले असतील, पण अजूनही माझ्या मनात, ती हत्येची सल अधून मधून सलत राहते. खरेतर कित्येकदा, मी त्याचे प्रायश्चित्त म्हणून ढसाढसा रडलो आहे. पण मनाची अशी शांती होत नव्हती. शेवटी एका निरपराध व्यक्तीचा जीव घेतला होता मी. ती बेचैनी आयुष्यभर मला अशीच टोचत राहणार, यात शंका नाही. ती सल आणि तो जादूगार असे सहजासहजी मनातून जातील असे वाटत नाही. पण आता काय करणार! त्याला काही इलाज होता का? ती घटना घडून आता कित्येक वर्ष झाली होती. सगळे काही पूर्वपदावर आले होते, फक्त माझे अंतर्मन सोडता!
              ती घटना कधी घडली? कशी घडली? कशामुळे घडली? हे सगळे प्रश्न जेव्हा वर उफाळून येतात, तेव्हा ती घटना, त्यातील प्रसंग अगदी जिवंतपणे डोळ्यांसमोर येतात, जसे आज याक्षणी आले आहेत.
                  
     “ ऐssss जादूवाला!
      आ गया जादूवालाssssss!
       सब आवो! जादू देखो, देखने का पैसा नाही.
       सब आ जावो.”

असा आवाज सरसर करत कानात शिरला. वर्गात एकच गोंधळ माजला गेला. माझी चुळबुळ होऊ लागली. कधी एकदा वर्गातून बाहेर जातो, असे झाले होते. मला जादू बघायची होती. जेवणाच्या सुट्टीची वेळ झाली होती. आता माझे आणि वर्गातील मुलांचे सगळे लक्ष घंटेच्या टोलवर लागले होते. कधी एकदा दुपारच्या सुट्टीचा टोल होतो, असे झाले होते. आणि दुपारच्या सुट्टीचा एकदाचा टोल झाला. आम्ही वेगाने वर्गाबाहेर पडत जादूगाराच्या तंबूच्या दिशेने धावू लागलो.
      एका मोठ्या तंबू भोवती बरीच गर्दी जमलेली दिसत होती. लोक गोल रिंगण करून, जादूगाराची वाट बघत होते. गर्दी बरीच जमली होती. गर्दीतून कशीबशी वाट काढत, मी आणि भैरव अगदी जादूगाराच्या जवळ जाऊन पोहोचलो. अजुन जादूगार तंबूत आलेला नव्हता. त्याचा कोणीतरी सहायक, तंबूत येऊन विविध हातचलाखी दाखवत होता. अगदी चपळाईने तो आपली कला दाखवत होता.
      त्याने आपल्या डाव्या हातात, एक रुपयाचे नाणे घेतले. ते नाणे सगळ्या गर्दीला दाखवत, ते आता कसे गायब करतो, असे म्हणू लागला. मी आणि भैरव अगदी मन लावून त्याची ती हालचाल बघू लागलो. त्याने डाव्या हाताच्या तळव्यावर, ते एक रुपयाचे नाणे ठेवले. एकदा सगळ्या गर्दीकडे, चौफेर नजर फिरवली आणि, त्या डाव्या हाताची मुठ बंद करून, तो हात दोन- तीन वेळा हवेत फिरवला. उजव्या हातातील छोटीशी छडी, त्या मुठीवरून मागे पुढे करून फिरवली. तोंडाने त्या मुठीवर फुंकर मारली. आणि ती मुठ झटकन सगळ्या गर्दीसमोर उघडली. त्या मुठीतले ते एक रुपयाचे नाणे गायब झाले होते. डोळे विस्फारून मी त्याच्या त्या, रिकाम्या हाताकडे बघू लागलो. त्या वयात अशी करामत खूप नवलाईची वाटायची. मनाला एक अपार आनंद मिळाला.
             एव्हाना तंबू गर्दीने खचाखच भरला होता. वर्तुळाकार रचनेत उभे राहून, सगळे लोक जादूगाराची वाट बघत होते. तोपर्यंत त्या मुलाने अजुन एक - दोन करामती दाखवल्या. आपल्या जवळच्या कापडी पिशवीतून त्याने, एकाच वेळी अनेक नोटा बाहेर काढून दाखवल्या. त्या नोटांकडे मी तर किती उत्सुकतेने बघत होतो? कदाचित त्या कापडी पिशवीत, काहीतरी पैसे छापण्याचे यंत्र असावे, असे तेव्हा वाटायचे. त्या कोऱ्या करकरीत नोटा पाहून एकदम मोह सुटायचा.
आता जादूगार येण्याची वाट आम्ही बघू लागलो. कातडी तंबूच्या एका खोलीतून, जादूगार बाहेर आला. चांगला उंचापुरा, अंगावर रंगीबेरंगी चींध्यांचे कपडे, हातात दिड- दोन फुटाची छडी आणि चेहऱ्यावर धूर्त हास्य करत, तो तंबूच्या मध्यभागी आला. सगळ्या गर्दीत एक उत्साह संचारला गेला. श्वास रोखून मी त्याच्या कपड्यांवरून, छडीवरून, त्याच्या चेहर्‍यावरून नजर फिरवत होतो. मला त्याच्या त्या रूपाचे मोठे अप्रूप वाटू लागले.
  
“सगळे इकडे मन लाऊन बघा!”
 तुमच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही,      अशा जादू तुम्हाला बघायला भेटणार आहेत,
तुमचे सगळे लक्ष आता माझ्यावरच ठेवा.
कुठेही हलू नका.
तर आता सुरु करूयात जादूचे रंगीबेरंगी खेळ!”
 
असे म्हणत, त्याने आपल्या दोन्ही हातात, अचानक रंगबेरंगी त्रिकोणी पताके काढले, आणि ते हवेत भिरकावले. हवेत उडताना ते एकदम मजेशीर वाटू लागले. जसे काही अनेकरंगी फुलपाखरे हवेत उडत आहेत. सगळ्या गर्दीने त्याचा तो कारनामा पाहून, टाळ्या पिटायला सुरुवात केली. मी तर अचंबित होऊन, कधी त्या रंगीबेरंगी पताक्यांकडे,  कधी त्या जादूगाराकडे बघू लागलो. तो जादूगार आता मला एकदम थोर, श्रेष्ठ वाटायला लागला. डोळ्यांची थोडीही उघडझाप न करता, मी आता त्याच्या पुढच्या हालचालींकडे बघू लागलो.
    काय झाले काहीच कळले नाही. पण अचानक गर्दीत, एकच हलकल्लोळ माजला गेला. जो तो एकदम भीतीने, पाठीमागे सरकू लागला. क्षण दोन क्षण काय झाले?  काहीच कळाले नाही. आणि जेव्हा ते लक्षात आले, तेव्हा एकदम भीतीचा काटा, अंगभर उमटून गेला. मी जादूगाराकडे आणि त्याच्या हातातल्या त्या भल्यामोठ्या सापाकडे, बघतच होतो. जादूगाराने तो भला मोठा साप, आपल्या दोन्ही हातात धरलेला होता. त्याचा तो  भला मोठा फणा, हवेत तरंगत होता. तो साप आपला फणा काढून, गर्दीकडे बघत फुत्कार टाकत होता. माझ्यापासून अवघ्या पाच सहा फुटाच्या अंतरावरचे, ते दृश्य पाहून मी एकदम गर्भगळीत होऊन गेलो. मी लगेच तसाच पाच सहा पावले मागे झालो. आणि त्या दृष्याकडे बघू लागलो.
 
 “बघा, इकडे बघा! कसा आहे साप?
   केवढा मोठा आहे?
   बघण्याच्या अंगावर काटा यावा, असा आहे की नाही?”

त्याने हसत हसत, गर्दीला उद्देशून तो प्रश्न केला . पण गर्दीतून काहीच उत्तर येत नव्हते. तो जादूगार पुन्हा मोठ्याने हसू लागला.

“आता नीट लक्ष देऊन या सापाकडे बघा!
नवलाने तुमचे डोळे मोठे मोठे होऊन जातील.
जरा नीट बघा.”

असे म्हणत, त्याने एकवार गर्दीवर नजर टाकली आणि स्वतःचे डोळे मिटून, त्याने काहीतरी मंत्र म्हणायला सुरुवात केली. तो नेमके काय मंत्र म्हणतोय काहीच कळत नव्हते. पण तो जसा जसा त्या मंत्राचा उच्चार करत होता, तसा तसा त्या सापाचा आकार, लहान लहान होत होता. अगदी इंचा इंचाने त्या सापाची लांबी कमी होत होती. मी आणि इतर लोक स्वतःच्या डोळ्यांनी तो अद्भुत चमत्कार बघत होतो. गर्दीतून नुसते आश्चर्याचे हुंकार बाहेर पडत होते. मी तर अक्षरशः श्वास बंद करून त्या दृश्याकडे बघत होतो.
आता जादूगाराचा तो मंत्र, चांगलाच टिपेला पोहोचला होता. तो अगदी मोठमोठ्याने त्या मंत्राचा उच्चार करू लागला. आणि पाहता पाहता तो भला मोठा साप, अगदी मुठीत मावेल  एवढा लहान होऊन गेला. शेवटी शेवटी तर तो साप, त्या जादूगाराच्या उजव्या मुठीत अदृश्य होऊन गेला. थोड्या वेळापूर्वी त्याच्या हातात तो सात- आठ फुटांचा साप असेल, असे कोणी म्हणणार देखील नाही. सगळे कसे अचंबित करणारे होते. टोकाचे आश्चर्याचे होते. गर्दीत नुसते प्रश्नच प्रश्न उमटत होते. हे कसे शक्य आहे? हे कसे झाले? हीच भावना प्रत्येकाच्या मनात उमटली जात होती.
      शेवटी जादूगाराने आपले मंत्र म्हणायचे थांबवले. सगळी गर्दी श्वास रोखून त्याच्याकडे बघत होती. हळूहळू वातावरण थोडेसे सैल झाले. आणि आता जादूगाराने आपली ती उजव्या हाताची मुठ, गर्दी समोर खुली केली. त्याच्या त्या मुठीत अवघ्या दीड- दोन इंचाचा तो साप वळवळ करत होता. अगदी इवलिशी हालचाल करत होता. त्याने तो वळवळ करणारा साप आपल्या मुठीतून हळूच खाली जमिनीवर सोडला. मी झटकन पाठीमागे झालो. सरसर करत माझ्या सर्वांगावर काटा आला. सगळी गर्दी अचंबित होऊन त्या वळवळ करणाऱ्या, दीड दोन इंचाच्या सापकडे बघत होती. आता जादूगार मोठमोठ्याने हसू लागला. त्याच्या जादूचा चांगलाच परिणाम गर्दीवर झाला आहे, याची त्याला जाणीव झाली असावी. त्याने पुन्हा तो साप उचलला आणि आपल्या जवळच्या एका मोठ्या बरणीत तो  सोडून दिला.
     मी तर स्तब्ध झालो होतो. कल्पनेतही येणार नाहीत, अशा गोष्टी मी समोर बघत होतो. तो जादूगार तर आता मला देवासारखाच वाटू लागला. त्याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे अशी, माझी पक्की धारणा होऊ लागली.
          आता पुढे काय घडते, याची मी वाट बघू लागलो. भैरवही माझ्या बाजूला उभा होता. त्याचीही अवस्था माझ्या सारखीच अचंबित झालेली होती. जादूगाराने आता आपल्या अनेक कला दाखवायला सुरुवात केली. हातात लाल, पिवळे, हिरवे, नारिंगी कागद घेऊन, त्याने त्या पासून त्या त्या रंगांची फुले बनवली. आपल्या पिशवीतून त्याने काहीतरी अंगारा बाहेर काढला. तो सगळ्या गर्दीला दाखवला. तो पांढरा अंगारा बघून आम्हाला उत्सुकता लागली, की आता हा काय करेल? त्याने पुन्हा काहीतरी मंत्र पुटपुटला आणि तो पांढरा अंगारा हवेत उधळला. अचानक हवेत सगळा पांढरा पांढरा धुरकट प्रकाश पसरायला सुरुवात झाली. नंतर सगळीकडे एक पांढर्‍या रंगाचा पडदा पसरत गेला. आजूबाजूच्या वस्तू अदृश्य होऊ लागल्या. आजूबाजूची एकही वस्तू दृश्यमान होत नव्हती. अगदी माझ्या बाजूचा भैरवही  मला दिसेना गेला. नुसते आजूबाजूचे आवाज, त्यांचा गोंधळ कानावर पडत होता. काहीवेळ हे असेच घडू लागले. थोडावेळ निघून गेला. हळूहळू तो पांढरा पडदा विरळ होत गेला. आजूबाजूची गर्दी, जादूगार आता स्पष्टपणे दिसू लागले. जादूगार सगळ्या गर्दीकडे बघून पुन्हा पुन्हा जोरजोरात हसू लागला.
   एव्हाना बराच वेळ निघून गेलेला होता. शाळा पुन्हा भरण्याची घंटाही  झाली होती. पण जादू बघायच्या नादात ते आमच्या लक्षात आलेच नाही. भैरव शाळेत जायची घाई करू लागला. आणि मी त्याला त्यासाठी विरोध करू लागलो.
    
“जाऊ दे ना आता. कशाला जायचे शाळेत.
अजुन जादू बाकी आहे ना.
तेवढी बघू आणि मग जाऊ.”

पण तो काही ऐकत नव्हता. माझ्या म्हणण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. तो शाळेत जायचेच म्हणत होता. तो नेहमी असेच करत असतो. कधी कोणाचे ऐकतच नाही. वर्गात सर्वात हुशार असला तरी, तो असा काहीसा विक्षिप्तपणे वागत असतोच. मी त्याच्यापेक्षा थोडा कमी हुशार असलो तरी, व्यवहारात त्याच्यापेक्षा सरस होतो. पण तरीही सगळीकडेच त्याची वाहवा केली जात असे. मी त्याच्याकडे सहसा दुर्लक्षच करत असे. आताही मी त्याला म्हणालो,
“अरे थांब ना, जाऊ ना जादू बघून.
अजुन थोडा वेळच चालेल खेळ.
झाला की मग जाऊ आपण “
मी त्याला सारखी विनंती करू लागलो. पण ती काही तिथे थांबायचा मनस्थितीत नव्हताच. त्याची सारखी चुळबुळ होऊ लागली. शेवटी माझाही नाईलाज झाला. आम्ही दोघेही आता त्या गर्दीतून बाहेर पडतच होतो की, अचानक जादूगाराचा आवाज कानात शिरला.

“ आता आपला शेवटचा खेळ बाकी आहे.हा एवढा खेळ झाला की, आपला जादूचा प्रयोग संपलेला असेल. आता हा जो खेळ आपण करणार आहोत, तो सर्वात आकर्षक आणि आश्चर्यचकित करणारा असेल. तुम्ही तो पाहून थक्क होऊन जाल. माझी नुसती वाहवा कराल. तर चला आता तयार व्हा! माझा नवा खेळ पाहण्यासाठी. आणि त्यासाठी दोन लहान मुले पुढे या! त्यांची या खेळात गरज पडेल.”

असे म्हणत त्याने नेमका माझ्याकडे आणि भैरवकडे निर्देश केला. आम्ही परत जात होतो. पण त्याने नेमका आमच्याकडेच निर्देश केल्याने, आम्ही पुन्हा माघारी वळलो. आता नाईलाज होता. त्याने हाताने आम्हाला जवळ येण्याची खूण केली. प्रथम तर आम्ही जाग्यावरचे हललो नाही. कारण हे असे अचानक जादूगाराजवळ जाण्याची, आम्हाला भीती वाटू लागली. काहीतरी जादू करून, तो आपल्याला कुत्रा, मांजर, ससा काहीतरी करायचा. आम्ही जाग्यावरुन हलत नसल्याचे बघून, जादूगार आणि गर्दीतले लोक आमच्याकडे बघून मोठ मोठ्याने हसू लागले. कदाचित ते आमची चेष्टा करत असावेत. आता कोणीतरी गर्दीत ओरडून म्हणाले सुद्धा,

  “काय भित्री पोरं आहेत राव. पुढे जायला पण घाबरत आहेत.”

मला एकदम कसेतरी झाले. मला राग आला होता. आणि मी लगेच पुढे होत, त्या जादूगाराजवळ गेलो. रागाने त्या सगळ्या गर्दीकडे बघू लागलो. मी भित्रा नाही हे मला त्या गर्दीला दाखवायचे होते. आता लोक हसायचे थांबले होते. माझ्यापाठोपाठ नाईलाजाने का होईना, भैरव देखील जादूगाराजवळ आला.
     आम्ही दोघे त्याच्या दोन्ही बाजूला थांबलो. त्याने एकवार आमच्या दोघांच्याही खांद्यावर हलकेच थोपटले.  त्याने त्याच्या तंबूतून तो भला मोठा , पुठ्ठ्याचा चौकोनी खोका बाहेर काढला.
तो खोका चांगलाच मोठा दिसत होता. त्याने तो खोका अगदी मधोमध मांडला. आणि एकवार गर्दीवर नजर फिरवून, आपल्या त्या मोठ्या आणि खड्या आवाजात तो गर्दीला उद्देशून म्हणाला,

“आता नीट बघा. हा शेवटचा खेळ आहे. सर्वात आकर्षक खेळ आहे. या दोन मुलांमधील एका मुलाला, मी या मोठ्या खोक्यात बसवणार आहे. आणि दुसऱ्या मुलाच्या हातात, ही मोठी तलवार देणार आहे.”

त्याने स्वतःच्या कंबरेला लटकवलेली, ती चांगली लांबसडक तलवार वर काढून , ती गर्दीला दाखवत उद्गार काढले. त्याचे ते तसे बोलणे ऐकून सगळीकडे एकदम सूनसान शांतता पसरली गेली. भैरवची आणि माझी अवस्था तर एकदम गर्भगळीत झाली. आम्हाला त्या प्रयोगाची भीती वाटायला लागली. पण परत तो विचार डोक्यात आला. असे आपण परत घाबरून गेलो तर, पुन्हा गर्दीतले लोक आपल्याकडे बघून जोर जोरात हसणार. आपल्याला भित्रा, पळपुटा म्हणणार. त्यापेक्षा हा प्रयोग करून आपण स्वतःला धाडसी सिद्ध करू या ना! असा काहीसा विचार करून मी न घाबरता प्रयोगासाठी तयार झालो होतो. भैरवही भीतभीत का होईना प्रयोगासाठी तयार झाला. आम्ही दोघेही आता त्या खोक्याच्या प्रयोगाला तयार होतो.
      सगळ्यांचे लक्ष आमच्याकडे होते. त्याने भैरवला त्या खोक्यात बसायला सांगितले. भैरवने आधी आढेवेढे घेतले. पण शेवटी तो तयार झाला. त्याची इच्छा होती की, मी खोक्यात बसावे. पण जादूगाराने त्याला त्यात बसायला लावले. तो खोक्यात बसला. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून आणि दोन्ही हात पाया भोवती लपेटून, तो खोक्यात मुटकुळे मारून बसला. जादूगाराने खोक्याच्या वरचा पुठ्ठा अलगद त्यावर झाकून टाकला. खोके आता पूर्णपणे बंद झाले होते.भैरव आत चुळबुळ करू लागला. पण जादूगाराने त्याला दरडावून सांगितल्यावर, त्याने चुळबुळ बंद केली. तो निपचीतपणे अंगाचे मुटकुळे मारून, खोक्यात बसून राहिला. जादूगाराने खोके चारही बाजूंनी चांगले बंद करून टाकले. दोन छोटे होल हवा जाण्यासाठी त्यावर केले होते. त्या व्यतिरिक्त कुठलाच भाग उघडा दिसत नव्हता.
आता जादूगर माझ्याकडे आला. त्याने मला आत तंबूत नेले आणि तो मला म्हणाला,

” हे बघ, खोक्यावर एका ठिकाणी पेनाने एक वर्तुळ काढलेले आहे. ते वर्तुळ तुला खोक्याकडे पाहिले की लगेच दिसेल. मी जेव्हा तुझ्या हातात ही तलवार देईल, तेव्हा तू अगदी बरोबर, त्या वर्तुळातून तलवार आरपार खोक्यात खुपसायची. दुसरीकडे कुठेही खुपसू नकोस. लक्षात ठेव. काय?"

त्याने माझ्याकडे बघत प्रश्न केला. मी मानेनेच त्याला होकार दिला. आम्ही तंबूच्या बाहेर आलो. सगळी गर्दी मोठे डोळे करून आमच्याकडेच बघत होती. त्यांच्यात उत्सुकता होती. आता पुढे काय घडेल? कसे घडेल? हे पाहण्यासाठी ते आतुर झाले होते. जादूगाराने ती तलवार आता माझ्या हातात दिली. एकवार त्याने माझ्याकडे पाहिले आणि पुन्हा त्या खोक्याकडे नजर टाकली. त्याच बरोबर मीही त्या खोक्यावर नजर टाकली. आम्ही उभे होतो त्या बाजूला खोक्यावर ते वर्तुळाचे चिन्ह मला दिसले. जादूगाराने पुन्हा मला हेच ते वर्तुळ असे खुणावले. मला ते समजले. जादूगार आता निश्चिंत झाला. मीही जरा सावरलो होतो.
            माझ्या हातात आता ती तलवार होती. आयुष्यात पहिल्यांदा असे शस्त्र मी हातात घेतले होते. ती जराशी जड जाणवत असल्याने, माझा काहीसा तोल ढासळत होता. पण मी ती चांगल्याच मजबुतीने हातात धरून ठेवली होती. माझे सारे लक्ष खोक्यावर, त्या खोक्यावरच्या त्या वर्तुळावर होते. सगळ्या गर्दीचे श्वास रोखले गेले होते. जादूगारही स्तब्धपणे उभा राहून, माझ्या हालचालींकडे बघत होता. 
मी पुढे झालो. एकदम पवित्र्यात उभा राहिलो. खोके, त्यावरचे वर्तुळ आता माझ्या नजरेच्या टप्प्यात होते. आता मला इथून पुढचा एक एक क्षण, जबाबदारीचा वाटू लागला. मनात नाना विचार पिंगा घालू लागले. माझा मित्र भैरव आत खोक्यात होता.अंगाचे मुटकुळे मारून तो आत बसलेला असणार. त्याला आता पुढे काय होणार आहे, याची जाणीव नसणार. माझ्यावर आता मोठी जबाबदारी होती. तलवार बरोबर त्या वर्तुळातून आत जायला हवी. नाहीतर? नाहीतर काय? माझ्या मनात एकदम धसकन झाले. भीतीची प्रतिक्षिप्त क्रिया मस्तकात उमटून गेली. नकारात्मक विचार हळूहळू माझ्या मनाचा ताबा घेऊ लागले. आपली चूक होता कामा नये. नाही तर त्याचे परिणाम खूप भयंकर होतील. अति भयंकर होतील. गर्दीतले सगळे लोक आपल्याला हसतील. आपले सगळे मित्र, आपल्याला त्यावरून चिडवत राहतील. आपल्याला भित्रा, पळपुटा, बेजबाबदार, खुनशी म्हणून सगळे जण टोमणे मारत राहतील.
मला आता हळूहळू या सगळ्या गर्दीचा, मित्रांचा, भैरवचा संताप येऊ लागला. त्या सोबतच विचारांचे चक्र सैरावैरा इकडून तिकडे भरकटू लागले. शरीर मेंदूच्या कक्षेबाहेर जाऊ लागले. शरीराचा ताबा माझ्या हातातून सुटून चालला आहे, याची जाणीव प्रकर्षाने व्हायला लागली. आणि काय झाले? कसे झाले? काहीच कळले नाही. अंगात जेवढी ताकद होती, तेवढ्या ताकदीने मी त्या खोक्याच्या वर्तुळाच्या आत तलवार खुपसली होती. पुढे काय झाले? काहीच कळले नाही. पण माझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या आड मला पुढे काय झाले,काहीच दिसत नव्हते. फक्त एक अस्फुटशी किंकाळी, सरसर करत माझ्या कानात शिरली होती. सोबतच गर्दीचा भला मोठा गलका कानावर आला होता.
     मी झटकन डोळे उघडून समोर बघितले. समोर अस्ताव्यस्त झालेले खोके होते. त्यातून रक्ताची धार बाहेर ओघळत होती. खोक्यात काहीतरी धडपड होत होती. कण्हयाचा बारीक आवाज, त्यातुन येत होता. आणि सगळ्यांच्या नजरा माझ्यावर आणि जादूगारावर खिळलेल्या होत्या. नेमके काय घाडून गेले आहे, याचा बोध व्हायला मला काही अवधी लागला असेल. पण जेव्हा मला त्या सर्व घटनेचे आकलन झाले, तेव्हा एकदम माझी नजर त्या खोक्यावरच्या, त्या वर्तुळाकडे गेली. वर्तुळ तसाच शाबूत होता. तलवार वर्तुळाच्या बाजूला, उजवीकडे चार-पाच इंचांवर खुपसली गेली होती. आणि ती, भैरवच्या शरीराच्या आरपार होत, पुढे निघून गेली होती. बस! भैरव मेला आहे आणि तोही आपल्या हातून, ही जाणीवच मला पुरेशी होती. त्या जाणीवेने मी कधी भोवळ येऊन खाली पडलो, हेच मला कळाले नाही. मी धप्पकन खाली जमिनीवर पडलो आहे, हीच शेवटची माझी हालचाल, मला आठवत होती.
         त्या रात्री मी नुसता ढसाढसा रडत होतो. माझी मनस्थिती बिघडली होती. माझ्या डोळ्यापुढे नुसते ते रक्त, ती तलवार, तो वर्तुळ एवढेच येत होते. मी स्वतःला त्याबद्दल दोषी मानत होतो. हे जे काही घडले, त्याला सर्वतोपरी मीच जबाबदार आहे, हे मी मनोमन मान्य करत होतो. पण त्यावेळचे माझे ते वय, माझी समज यामुळे मला कोणी यासाठी जबाबदार धरत नव्हते. जादूगाराला लोकांनी चांगले झोडपून काढले होते. त्याचा सगळा तंबू जाळून टाकला होता, हे त्या दिवशी कोणीतरी बोलताना मी ऐकले होते. मला स्वतःच्या अपराधीपणाचा अतोनात त्रास होत होता. रात्रभर मी नुसता वेगवेगळ्या आवाजाने दचकून जागा होत होतो. लोक म्हणत होते, तो अपघात होता. ती काही मुद्दामून झालेली कृती नव्हती. त्यात त्या पोराची ती काय चूक? तो लहान होता. चूक तर त्या जादूगाराची होती. त्याने अशा लहान मुलांना अशा खेळात सहभागी करून घ्यायला नको होते. त्याच्यामुळेच हे असे भयंकर घडले आहे.
                मध्यरात्रीचा  सुमार होऊनही मी जागाच होतो. माझ्या नजरेसमोरून ते दृश्य जातच नव्हते. मला आता खऱ्या अर्थाने, त्या गोष्टीची तीव्रतेने जाणीव होऊ लागली. स्वतःचा अपराध, ते पातक मला आता स्वस्थ बसू देत नव्हते. मी आतल्या आत नुसता धुमसत होतो. हे जे काही झाले किंवा केले, ते कुठल्याच नीतिमूल्यात बसणारे नव्हते. मी स्वतःच्या नजरेत खाली उतरत चाललो होतो. अपराधीपणाची भावना आता सगळ्या शरीरभर प्रचंड मोठे मोठे धक्के देत होती. मी चुकलो होतो. नाही! नाही! माझी चूक नव्हती. तो अक्षम्य अपराध होता. त्याच्याबद्दल माझा अंतरात्मा, मला कधीच क्षमा करणार नव्हता.
       मी तलवार चालवताना पूर्णतः शुद्धित होतो. तो वर्तुळ अगदी माझ्या टप्प्यात होता.  त्यातून तलवार आरपार घालने, माझ्यासाठी कठीण असे नव्हतेच. पण केवळ सगळा वर्ग,सगळा गाव भैरवला हुशार मानतो. तो कसाही वागत असला, तरी सगळेजण त्याचे गुणगान गातात. केवळ मोठ्या बापाचा मुलगा असल्यामुळे त्याचीच वाहवा होते. मी ही हुशार होतो, त्याच्यापेक्षा किती समजदार होतो, तरीही माझ्या वाट्याला नेहमीच उपेक्षा का येत होती? अभ्यासात मीही त्याच्या इतका हुशार होतो, पण तरीही चार- दोन गुण त्यालाच का जास्त मिळायचे? खेळताना मी नेहमी त्याच्या पेक्षा सरस ठरायचो, पण कौतुक मात्र त्याचीच व्हायचे.
मी तरी कोठपर्यंत सहन करू? माझेही कौतुक व्हावे, माझीही वाहवा व्हावी, माझेही कोणीतरी गुणगान गावे, असे मला नेहमीच वाटत असे. पण ते सगळेच भैरवच्या वाट्याला येत असल्याने, मी त्यापासून वंचित असे. आणि आता ही अशी सांधी चालून आली असल्याने, लगेच मला या साऱ्या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. तो त्याच्याबद्दलचा राग वर उफाळून आला होता. तो अगदी मेंदूपर्यंत गेला होता. मला आता त्याचा तो विक्षिप्तपणा अजून सहन करायचा नव्हता. मुळात तोच आता मला सहन होत नव्हता. त्याला आता माझ्या वाटेतून असे दूर व्हायचेच लागणार होते. वर्तुळाच्या चार- पाच इंच बाहेर तलवार जाणार, हे मला पूर्णतः माहीत होते. शेवटी ती चालवणारा मीच नव्हतो का? आणि ती तशीच  त्याचे शरीर भेदून गेली होती. अगदी माझ्या मनासारखी. सगळे काही यथोचित पार पडले होते. मनाची त्यावेळी एकदम शांती झाली होती. पण आता त्या गोष्टीचा, या अशा मध्यरात्री मी, कितीतरी वेळ पश्चात्ताप करत होतो. जे करायला नको होते, ते मी केले होते. आयुष्यभराचा कलंक स्वतःच्या माथी मारून घेतला होता. अगदी कायमचा.
                  आता कित्येक वर्ष ओलांडली होती. तो प्रसंग असा, कधी मधी मनात तरळून येतो, तेव्हा मनात भयंकर उलथापालथी होऊन जातात. तेवढ्यापुरता मी कमालीचा अत्यवस्थ होऊन जातो. माझ्या आसपास भैरव फिरत आहे, ही जाणीव प्रकर्षाने व्हायला लागते. माझ्या व्यतिरिक्त कोणालाच ह्या गोष्टीची जाणीव नाहीये. भैरव अपघाताने नाही  तर माझ्या सूडबुद्धीने मेला आहे, आणि याच सूडबुद्धीचे, हे असे भूत माझ्या मानगुटीवर कायमचे बसले आहे. आणि आता अधून मधून मला असे छळत असते. आता आता तर कधीही, कुठेही मला माझ्या आसपास भैरव असल्याची जाणीव तीव्रतेने व्हायला लागली आहे. मला आता हे असे सहन होत नव्हते. हे सगळे आता सहनशक्तीच्या बाहेर जात होते. मला आता एका गोष्टीची जाणीव झाली होती. यापासून आपली सुटका नव्हती. एवढ्या सहजासहजी तो प्रसंग, तो भैरव माझा पिच्छा सोडणार नव्हते. कदाचित याचा शेवटही असाच काहीश्या अपघाताने होणार असेल. फक्त आता भैरवच्या जागी मी असेल. कोण जाणो, माझ्या जागी भैरव असेल.

(समाप्त)
वैभव नामदेव देशमुख.
9657902283

कथालेख

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

19 Apr 2021 - 2:49 pm | योगी९००

छान... कथा आवडली.

गॉडजिला's picture

19 Apr 2021 - 2:53 pm | गॉडजिला

....

तुषार काळभोर's picture

19 Apr 2021 - 3:46 pm | तुषार काळभोर

आवडली हो!