Index Investing भाग १

अतरंगी's picture
अतरंगी in जनातलं, मनातलं
17 Apr 2021 - 12:36 pm

गुंतवणूक हा तसे पहायला गेले तर फार मोठी व्याप्ती असलेला आणि व्यक्तिसापेक्ष विषय आहे. गुंतवणूक कधी, कुठे, किती करावी याविषयी आंतरजालावर मुबलक प्रमाणात लेखन आहे. आजही अनेक जण स्वतःच्या ज्ञानानुसार याविषयी लिहित असतात. गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, त्यातील एक म्हणजे कंपन्यांचे समभाग म्हणजेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स.

आजमितीला भारतात ५०४४ कंपन्यांचे शेअर्स लिस्टेड आहेत आणि हजार एक म्युच्युअल फंड आहेत. यात नक्की कोणत्या शेअर्स/फंड मधे गुंतवणूक करावी आणि किती हे ठरवणे हा फार अभ्यासाचा आणि क्लिष्ट विषय आहे. दुसर्‍याच्या सल्ल्याने केलेली गुंतवणूक, चुकीचे किंवा अर्धवट माहितीच्या आधारे घेतलेले गुंतवणूकीचे निर्णय आपल्या आर्थिक परिस्थितीवर दुरगामी परिणाम करु शकतात. ५०४४ पैकी फार कमी कंपन्या आणि हजार एक म्युच्युअल फंड पैकी फार कमी फंड्स हे चांगला परतावा देऊ शकले आहेत ही सद्यस्थिती नाकारता येणार नाही.

काही कंपन्या/ म्युच्युअल फंड मार्केटपेक्षा जास्त परतावा देतात आणि मग त्याचीच जाहीरात, बोलबाला जास्त केला जातो. हे पाहून अनेक गुंतवणूकदार आपले कष्टाचे पैसे मार्केट मधे टाकून हात पोळून घेतात. अनेकदा आपण टॉप परफॉर्मिंग फंड मधे गुंतवलेले पैसे मार्केट पेक्षा कमी रिटर्न देऊ लागतात. फार मोजक्या कंपन्या आणि फंड असे आहेत ज्यांनी सातत्याने मार्केट पेक्षा जास्त परतावा दिलेला आहे.

मिळणारा परतावा हा एक महत्वाचा विषय सोडून पण म्युच्युअल फंड मधे माझ्या दृष्टीने खालील प्रश्न आहेत

१. प्रत्येक फंड जेव्हा मार्केट मध्ये येतो तेव्हा त्याची थीम, त्याचे बाकी डिटेल्स प्रकाशित केले जातात, गुंतवणूकदारास उपलब्ध करून दिले जातात. पण त्या प्रकारे ५ ते १० वर्षे गुंतवणूक करून किती रिटर्न मिळाले असते हे कुठेही लिहिलेले नसते. जेव्हा आपण एखाद्या NFO मध्ये पैसे टाकतो तेव्हा बर्याचदा त्या थीमचे पास्ट रिटर्न उपलब्ध नसतात.

२. फंड मॅनेजर कोणता स्टॉक घेणार, का घेणार, कधी घेणार, किती विकणार, कधी विकणार, का विकणार, स्टॉक घ्यायचा आणि विकायचा क्रायटेरिया काय या बद्दल आपल्याला काहीही माहिती नसते.

३. प्रत्येक फंडचा एक्सपेन्स रेशिओ ठरलेला आहे, काही काही फंड्स चा एक्स्पेंस रेशिओ तर २ टक्के आहे. तो माझे पैसे गुंतवणार, स्वतःचे कमिशन घेणार आणि मग उरलेले रिटर्न मला देणार. माझ्या गुंतवणुकीवर २ टक्के कमिशन घेऊन काम करणाऱ्या माणसावर माझा काही कंट्रोल नाही. त्याला कामावर ठेवणे किंवा काढणे एवढेच माझ्या हातात आहे. आणि शिवाय मला किती रिटर्न मिळणार हे त्याच्या माहिती, ज्ञान, जजमेंटवर अवलंबून आहे. त्याची काम करण्याची स्टॉक निवडण्याची पद्धत काय आहे आणि किती शास्त्रशुद्ध आहे ते मला माहित नाही.

४. म्युच्युअल फंड्सचे होल्डिंग्स:- कित्येक वेबसाईटवर तुम्हाला मुच्युअल फंडचे होल्डिंग बघायला मिळतील. त्यातील स्टॉक लिस्ट बघितली त्यात अनेक स्टॉक असे आहेत कि ज्याचे वेटेज ०.५%, १% वगैरे असते आणि काही काही म्युच्युअल फंड मध्ये ५०, १०० स्टॉक पण आहेत. ०.५%, १% वेटेज असणारा स्टॉक टोटल रिटर्न वर असा काय परिणाम करतो कि जेणे करून तो त्या फंड मध्ये आहे? क्वॅलिटी ऑफ स्टॉक विषयी मी फार प्रभुत्वाने बोलू शकणार नाही, पण तो मुद्दा सुद्धा विचारात घ्यायला हवा.

गेले वर्षे अनेक म्युच्युअल फंड मार्केटपेक्षा कमी परतावा देत आहेत, यावर बरीच चर्चा आणि उहापोह होत आहे. आणि याला पर्याय म्हणून ईंडेक्स फंड सामोरे येत आहेत.

ईंडेक्स फंड म्हणजे सरळ सांगायचे झाले झाले तर निफ्टी ५०, सेन्सेक्स, बँकनिफ्टी यासारख्या निर्देशांकामधे ज्या कंपन्या ज्या प्रमाणात आहेत त्यात त्याच प्रमाणात गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड.

वेगवेगळ्या ईक्विटी बेस्ड ईंडेक्स विषयी थोडक्यात पाहू या.

१. Broad Based Indices:-
ह्या ईंडेक्स मार्केटमधील फ्री फ्लोट कॅपिटलायझेशन वर अवलंबून असतात आणि त्यातील स्टॉकचे वेटेज सुद्धा त्यावरच असते. e.g. Nifty 50, Sensex, Nifty next 50 etc

२. Sectoral Indices:- ह्यात एका ठराविक क्षेत्रातील कंपन्या एकत्र करुन मार्केट कॅप प्रमाणे त्यांना वेटेज देऊन त्याची ईंडेक्स तयार केली जाते. e.g Bank Nifty, Nifty IT, Nifty FMCG etc

३. Thematic Indices:- एकाच संकल्पनेवर आधारीत निर्देशांक. e.g. Nifty Shariah 25, Nifty India Consumption Index etc

४. Strategy Indices:- माझ्या मते हा सर्वात महत्वाचा विभाग. यात वेगवेगळे फंडामेंटल, टेक्निकल फॅक्टर यांची Objective रित्या नियमबद्ध मांडणी करुन त्यात ज्या कंपन्या शॉर्टलिस्ट होतील, त्यांच्या आधारे ईंडेक्स व त्यातील कंपन्या ठरतात. यात Momentum, Jensen’s alpha, Volatility, Beta etc सारखे टेक्निकल आणि/किंवा Quality, Value etc सारखे फंडामेंटल घटक पात्रता म्हणून वापरले जातात.
टेक्निकल फॅक्टर वर आधारीत गुंतवणूक करायची असाल अथवा फंडामेंटल अथवा दोन्ही. ईथे त्यावर नियमबद्ध, objective, well defined पद्धतीने तयार केलेली ईंडेक्स आहे.

ईंडेक्स मधे गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात तुमचे सगळे पुर्वग्रह, सापेक्षता बाजूला ठेवली जाते. ट्रेडींग किंवा गुंतवणूकीमधे नियमबद्धता, शिस्त आणि सातत्य याला अनन्यसाधारण महत्व आहे. आजकाल अनेक Quantitative Research Based म्युच्युअल फंड बाजारात येत आहेत. पण त्यांचे नियम आणि स्टॉक सिलेक्शन क्रायटेरिया, त्याचे बॅकटेस्टींग मधले रिझल्ट हे आपल्याला पहायला मिळत नाहीत.

ईंडेक्स फंड मधे गुंतवणूक करण्याचे महत्वाचे फायदे लिहायचे झालेच तर...

१. कोणता स्टॉक येणार, त्याचा क्रायटेरिआ काय, त्याचे वेटेज कसे ठरणार, कोणता स्टॉक जाणार, कधी जाणार, त्याचा क्रायटेरिआ काय हे सगळे निफ्टी च्या वेबसाईट वर स्वच्छ लिहिलेले आहे. उगीच कोणाच्या तरी विचारक्षमतेवर अवलंबून स्टॉक ची खरेदी विक्री होत नाही. स्टॉकची एंट्री, एक्झिट, वेटेज याची पद्धत objective, well defined आहे.

२. कमी एक्स्पेंस रेशिओ असलेले इंडेक्स फंड मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. आपण ज्या इंडेक्स मध्ये पैसे गुंतवणार हे माहित असल्यास त्यातील कमी एक्स्पेंस रेशिओ असलेले फंड निवडून त्यात गुंतवणूक करता येते. फंड हाऊस, फंड मॅनेजर कोणतेही असले तरी फरक पडत नाही कारण शेवटी त्यांना इंडेक्स मध्ये जे स्टॉक ज्या प्रमाणात आहेत तेच त्या प्रमाणातच घ्यावे लागणार.

३. ईंडेक्स फंड मधे किती स्टॉक्स असणार फिक्स असते आणि शिवाय ज्या Strategy Indices आहेत त्यात एका स्टॉकचे जास्तीत जास्त वेटेज किती असावे यावर बंधन आहे. त्यामुळे एक किंवा दोन स्टॉक मुळे ईंडेक्सचा परतावा फार वर खाली होत नाही.

पुढच्या भागात आपण सगळ्या ईंडेक्स मधील जास्तीत जास्त परतावा देणार्‍या ईंडेक्स पाहू.

Disclaimer:-

१. ईतरत्र पूर्वप्रकाशीत.

२. वर ऊल्लेख केलेल्या ईंडेक्स/Instruments मधे लेखकाची व त्याच्या नातेवाईकांची गुंतवणूक आहे.

३. लेखक सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक सल्लागार नाही. लेखकाकडे शेअर मार्केट, आर्थिक गुंतवणुकीसंबंधित काहीही पात्रता नाही. वर लिहिलेली सर्व माहिती एक शेअर मार्केटचा अभ्यास या दृष्टीने केलेली आहेत. वर लिहिलेल्या सर्व कॅल्क्युलेशन मध्ये चूक, human error असू शकतो. वरील लिखाणावर विसंबून कोणीही गुंतवणूक करू नये. केल्यास, लेखक जबाबदार नाहीत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आपल्या सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

गुंतवणूकलेख

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

17 Apr 2021 - 1:17 pm | वामन देशमुख

बाजारातले मला फारसे गम्य नसले तरी, हा लेख, लेखमालिका आणि प्रतिसाद वाचतो आहे.

हे सर्व वाचून कदाचित मी बाजाराकडे वळू शकेन.

...

अवांतर: सदर धागालेखकाचे नाव अर्थरंगी असले तरी मला ते अतरंगी असे का बरे दिसत आहे?

अमर विश्वास यांच्या धाग्यावर दिलेला प्रतिसाद पुन्हा इथे चोप्य - पस्ते करतोय...

'Know nothing' Invester साठी इंडेक्स फंड हा उत्तम पर्याय आहे.
मोतीलाल ओसवाल सर्वात जास्त इंडेक्स फंड्स देणारी एएमसी आहे, s&p 500 index आणि nasdaq 100 index ह्या अमेरिकेतील इंडेक्समधे गुंतवणुकीचा पर्याय ही एएमसी देते!

-(म्युच्युअल फंड गुंतवणुकदार) सोकाजी