रंगुनी रंगात सार्‍या

पुष्कर's picture
पुष्कर in जनातलं, मनातलं
16 Apr 2021 - 7:09 pm

२००८ ची गोष्ट आहे. कामानिमित्त मुंबईला राहत होतो, तेव्हा एक मित्र मला म्हणाला 'परवा होळी आहे. येणार का रंगपंचमी खेळायला?' पुण्यात सदाशिव पेठेत बालपण घालवलेला मी ह्या प्रश्नावर साडेतीन ताड उडालो. माझ्यातला व्याकरण-नाझी जागा झाला. होळीला रंगपंचमी कशी काय? मुळात 'पंचमी' ही तिथी होळीपौर्णिमेनंतर ५ दिवसांनी येते त्यामुळे 'पौर्णिमेला पंचमी खेळणे' म्हणजे ख्रिसमसच्या रात्री फटाके उडवून हॅप्पी न्यु यिअर करणे किंवा संक्रांतीला ध्वजवंदन करून गणतंत्रदिन (चिरायू होवो वगैरे) साजरा करणे अशी क्षणचित्रं माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली. तो एक वेळ 'रंग खेळायला येतोस का' म्हणाला असता तर मला तितका धक्का बसला नसता, कारण एव्हाना मला 'होली'च्या दिवशी रंग खेळतात हे हिंदी चित्रपटात बघून आणि दरवर्षी नेमाने होळीच्या दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात पहिल्या पानावर छापून येणार्‍या ढोलवादनरत रंगलिप्त मोदयुक्त अत्युल्लसित महामहीम लालूप्रसाद यादव ह्यांचा फोटो बघूनही माहित झालं होतं. पण त्या खेळालाच हा मित्र 'पंचमी' म्हणतो ही कल्पना मला रम्य वाटली. असो. आजकाल सदाशिव पेठेतही 'होली'लाच रंगपंचमी खेळतात. कारण त्याच दिवशी सगळ्यांना सुट्टी असते. त्याबद्दल 'हॅप्पी होली' हे लिहिलेलं आहेच. मीही आता तितका व्याकरण-नाझी राहिलो नाही. उलट मीच लिहिताना कितीतरी चुका करायला लागलो आहे! असो. तर विषय आहे 'रंग खेळणे' ह्याबद्दल.

रंगपंचमी हा लहानपणी तसा एक आवडीचा सण. त्याला कारणही तसंच होतं. उन्हाळ्याला सुरुवात झालेली असायची. संक्रांतीनंतर तिळातिळाने की काय म्हणतात तशी कमी होणारी थंडी पुढे ढेपे-ढेपेने, ढिगा-ढिगाने कमी होऊन अचानक नाहीशी व्हायची. जवळ येऊन ठेपलेल्या वार्षिक परिक्षेचे चटके शाळेत आणि घरात बसायला लागायचे. आंबे यायला, आईस्क्रीम खायला अजून १-२ महिने अवकाश असायचा. अश्या वेळी हा थंडावा अगदी हवाहवासा वाटत असे. होळी जवळ आली की होळीला लागणार्‍या साहित्याबरोबरच रंगपंचमीसाठी लागणारा दारुगोळासुद्धा विकत घेतला जायचा. जणू काही आपण युद्धच करणार आहोत अश्या कल्पनेने बालसैनिक त्यांच्या पिचकारीरूपी बंदुका, रंगरूपी दारूगोळा आणि पाण्याचे फुगे-नामक अतिशय बेभरवशाचे बॉम्ब विकत घ्यायला अगदी उत्साहाने सरसावायचे. रंग हे सर्वात मुख्य 'मट्रियल' असल्यामुळे आपली दोस्तमंडळी कुठल्या रंगात जास्तीत जास्त विनोदी दिसतील ह्या कल्पनाविलासात क्षणभर रमून आम्ही आपापले रंग निवडायचो. पिचकारीच्या बाबतीत दुकानदाराच्या 'यंदा हा नवीन स्टॉक आलाय बाजारात, भारीतला आहे' ही थाप आणि वडिलांच्या 'काय करायचंय असलं फॅन्सी, चायनीज काहीतरी! साधी दाखवा' हे म्हणताना पाठीवर पडलेली थाप, ह्या दोन्ही थापांचा सुवर्णमध्य गाठला जाऊन एक मध्यम आकाराची पिचकारीसारखी दिसणारी पिचकारी घेतली जात असे. मागच्या कुठल्यातरी वर्षी अशोकस्तंभावरच्या चार की तीन सिंहांसारखी दिसणारी पिचकारी घेऊन झालेला पश्चात्ताप अजूनही आठवत असल्यामुळे निदान पाणी पटकन भरता येईल आणि पटकन उडवता येईल हा मुद्दा आता कळीचा झालेला असायचा.

त्या मागच्या क्ष वर्षी मी, का कुणास ठाऊक, ती चार सिंहांची पिचकारी घेतली होती. तशी ती काही अशोकस्तंभासारखी दिसत नव्हती. पण तिला ४ बाजूला असलेल्या ४ सिंहाच्या तोंडांमुळे मला अशोकस्तंभाचीच आठवण झाली. ती इतर पिचकार्‍यांसारखी पिचकारी नव्हती. त्याला पाणी आत ओढायला आणि फेकायला पंप नव्हता. बाजूच्या एका सिंहाच्या पायाशी एक बटण होतं, जे दाबल्यावर त्या सिंहाच्या तोंडातून पाणी उडणार. पाणी संपलं की मधल्या सिंहाच्या डोक्यावरचं बूच काढून तो आख्खा सिंहावळा पाण्यात तिरका बुडवून त्यात पाणी भरून घ्यायचं. हे खेळणं पिचकारी आहे हे कुणाला कळणारच नाही आणि आपण सगळ्यांना रंगवू, हा गनिमी कावा करण्याचा माझा आनंद त्यातून पहिल्यांदा पाणी उडवेपर्यंतच टिकला. जेमतेम तीन इंच, आणि जरा जोर लावून 'पाय' इंचापर्यंत त्यातून पाण्याची बारीक धार उडाली. आता एकेकाला भिजवायचं म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचणं भाग होतं. बॉर्डर सिनेमात शत्रूच्या गोळ्या खात आणि 'माँ शक्ती' म्हणत हातात अँटी-टँक माईन घेऊन जाणारा सुनील शेट्टी डोळ्यासमोर आणा. तो निदान बॉर्डरच्या पलिकडे पोहोचतो तरी! माझ्या हातातल्या त्या इवल्याश्या सिंहोचकारीतलं पाणीच संपल्यामुळे मी बादलीत ती बुडवून पाणी भरायला घेतलं. त्यात 'थेंबे थेंबे तळे साचे' ह्या न्यायाने सावकाश पाणी भरलं जात होतं. तो पर्यंत मला सर्वांनी सर्व रंग-पाणी-फुग्यांनिशी धू धू धुतला होता. पुढे ते सिंह बाजूला पार्क करून सरळ आंघोळीच्या तांब्याने उरलेली रंगपंचमी खेळल्याचं आठवतंय. त्यामुळे फॅन्सी पिचकार्‍यांचा धसकाच घेतला होता. अशीच कधीतरी एक दुधारी पिचकारी माझ्या हातात आल्याचं आठवतंय. म्हणजे ती समोरच्यावर पाण्याचा मारा बरोबर करायची, पण त्यात पाणी भरताना आपण पिस्टन जोरात ओढला, तर त्या पिस्टनच्या मागच्या भोकातून पाणी आपल्याच अंगावर उडायचं - अशी दोन्हीकडून पाण्याची धार काढू शकणारी दुधारी पिचकारी होती ती.

पाण्याच्या फुग्यात योग्य प्रमाणात पाणी भरणे ही पासष्टावी आणि तो फुगा योग्य वेळेला योग्य व्यक्तिवर फुटेल अश्या रितीने भिरकावणे ही सहासष्टावी कला मानण्यात यावी. पाणी भरलेल्या फुग्याला ते पाणी कमी न होऊ देता आणि फुगा हातातून निसटू न देता गाठ मारणे - ही देखिल एक कलाच आहे. ह्या सर्व कलांमध्ये ढ असल्यामुळे एक तर माझे काही फुगे पाणी भरतानाच तो ताण सहन न होऊन फुटायचे, किंवा कमी पाणी भरल्यास एखाद्यावर आदळून देखिल फुटायचेच नाहीत. त्यात अर्धं पाणी आणि अर्धी हवा हा शोध कुणीतरी लावला होता. तो फुटण्यासाठी जरा जोरात मारावा लागतो. त्यामुळे फुटला, तर जखमी सैनिक बोंबलत असे आणि नाही फुटला तर तोच फुगा बुमरँग होऊन आपल्यावर येण्याचा धोका असे. काही गनिम एखाद्या मुलाच्या शर्टात पाठीमागून हा फुगा हळूच सरकवून देत व मग एक जोरदार शाबासकीची थाप देऊन त्या फुग्याचे उद्घाटन होत असे. बाकी काही असलं तरी 'आपल्यावर फुगा फुटणे' हा एक इगो इश्यु असतो. एखाद्याने नकळत पाणी उडवलं किंवा नकळत रंग लावला, तर कधी इगो दुखावला जात नाही; पण आपल्यावर कुणी फुगा फोडला, तर बुद्धिबळात चेकमेट केल्यासारखी जाणीव होते.

सगळे रंग एकत्र केले तर पांढरा रंग तयार होतो - असा कुणीतरी अतिशय चुकीचा शोध लावला आहे. तो शास्त्रज्ञ नक्कीच भारतीय नसणार, किंवा असल्यास कधी रंग खेळला नसावा. तुम्ही कितीही पिवळे, हिरवे वगैरे रंग लावा, शेवटी त्या सगळ्यांच्या मिश्रणातून एक लालसर गुलाबी रंग तयार होतो अशी माझी एक ठाम समजूत आहे. दिवसभर रंग खेळून परतणारी पोरे पहा, सगळी लालसर दिसतात. पुढे आठवडाभर त्यांचे कान आणि केसांची मुळं तो लालसर रंग चिवटपणे मिरवत असतात. कपडे तर त्या गडद लालसर गुलाबी रंगात इतके खराब होतात की ते धुवायचा विचारही करू नये. चित्रपटात होली खेळणारे लोक पांढरे कपडे घालून घराबाहेर पडतात, तेव्हा त्यांना त्यांची आई ओरडत कशी नाही? आम्हाला पांढरे कपडेच काय, कुठलाही फिकट रंग मिलीमीटर भर जरी कपड्यावर असेल तर असे कपडे त्या दिवशी घालायला मज्जाव होता. सगळ्यात विटलेले, आखूड होणारे, गोळे निघालेले 'वासांसि जीर्णानि' त्या दिवशी बाहेर काढले जायचे आणि ते खेळून झाल्यावर टाकण्यास योग्य झाल्यावरच आतला आत्मा शांत होत असे. सुवर्ण आणि चांदी आम्हा मृत्तिकेसमान असल्याचे बिंबवले गेल्यामुळे त्या सहजासहजी न निघणार्‍या अघोरी रंगांपासूनही आम्ही अलिप्त राहू ह्याची खबरदारी पालक घेत असत. तरीही लपून ह्या चंदेरी रंगांची तस्करी करून ते फासण्याची मस्करी करणार्‍यांचे चेहरे त्यांच्या आईने सँड पेपरने घासल्याचे किस्से ऐकिवात आहेत.

रंगांचा खेळ हा तसं म्हटलं तर सामूहिक, पण त्यातही बरंच वैविध्य आहे. वरती लिहिलेले किस्से हे ज्यांपुढे अगदीच सोज्वळ वाटतील असे अनेक प्रकार अनेक ठिकाणी पाहिले आहेत. कॉलेजला असताना हॉस्टेलवर मुलांनी काढलेली धिंड, फाडलेले कपडे, फोडलेली अंडी - अश्या गोष्टी पाहून कधी कराव्याश्या वाटल्या नाहीत. पण अश्यांचेही बरेच किस्से असणार ह्याची कल्पना आहे. उत्तरेत तर रंग खेळणे हा खूप मोठा सण आहे. त्या सणाशी निगडित अनेक खाद्यपदार्थही असतात. तुमचेही ह्यापेक्षा वेगळे किस्से तर नक्कीच असतील आणि ह्या निमित्ताने ते ही वाचायला आवडतील. खाली प्रतिक्रियांमध्ये जरूर लिहा.

समाजलेख

प्रतिक्रिया

Bhakti's picture

16 Apr 2021 - 9:11 pm | Bhakti

मस्त रंग खेळायची म्हणजे धमाल.महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षी परत भेटतो की नाही म्हणून खुप रंग खेळलो, आदल्या दिवशी,चुकून भिंतीला रंग लागला, महाविद्यालयाने अँक्शन घेण्याआधी पोबारा केला होता.संध्याकाळपर्यंत ट्रिपल सीट हुंदडत होतो..नंतर मी फार इकोफ्रेंडली झाले ;);)फुलांची, हळदीकुंकूने होळी खेळले (हा हा)
रच्याकने दोन लेख आहेत होळी वर.. दुसऱ्या लेखात
चामड्याचा डफ हुडकून काढायचो.
हे मी लहानपणी करायचे ते आठवलं.

पुष्कर's picture

29 Apr 2021 - 10:17 am | पुष्कर

हळदीकुंकूने होळी >> हे नव्यानेच ऐकले! ह ह पु वा :)

मुक्त विहारि's picture

17 Apr 2021 - 7:09 am | मुक्त विहारि

मनापासून लिहिले आहे

आवडले

पुष्कर's picture

29 Apr 2021 - 10:17 am | पुष्कर

धन्यवाद

अप्रतिम... आवडले..मस्त लिहिले आहे

पुष्कर's picture

29 Apr 2021 - 10:17 am | पुष्कर

मनापासून आभार!

सौंदाळा's picture

17 Apr 2021 - 8:09 am | सौंदाळा

मस्त खुसखुशीत लेख
लहानपणी होळीच्या वेळी पण बऱ्यापैकी थंडी असायची, त्यामुळे होळीला नमस्कार करताना, बाजुला उभे राहिले की सुखद ऊब मिळायची. आता घामेघुम व्हायला होते.
सकाळीच फुगे पाण्याने भरणे, रंग कालवणे आणि एकमेकांना घेरून फुगे आणि रंग मारायचे प्लानिंग करायला मजा यायची. पूर्वी रंगीबेरंगी फुगे मिळायचे त्यात बरेच गळके निघायचे. मग फुगा भरून जिथून गळतोय तिकडे बोट धरायचे आणि तसाच फेकून मारायचा. नंतर पांढरे आणि ग्रे कलरचे फुगे आले. ते इतके दणकट असायचे की कधी कधी फेकून मारले तरी फुटायचे नाहीत. मग ज्याला मारला तोच उलटा अटॅक करायचा.मोठं झाल्यावर फुगे वगैरे बंद झाले. बाईक ,सायकली काढून मित्रांच्या घरी जायचे आणि त्यांना टॉक टॉक करून बाहेर बोलवायचे. आला की रंगवायचे. मग त्याला घेऊन अजून पुढे असे करत कंपू जमला की कुठेतरी रंगलेल्या तोंडानी चकाट्या मारत बसायचे आणि चहा वडापाव वगैरे हादडून दुपारी अंघोळीसाठी घरी यायचे. आदल्या दिवशी मुद्दाम जास्त केलेल्या पुरणपोळ्यातील पोळी परत चापायची ते थेट संध्याकाळपर्यंत ताणून द्यायची. मज्जा यायची खूप.

पुष्कर's picture

29 Apr 2021 - 10:18 am | पुष्कर

मस्त आठवणी!

रंगीला रतन's picture

29 Apr 2021 - 12:11 pm | रंगीला रतन

एक नंबर लिहीलय!

पुष्कर's picture

30 Apr 2021 - 7:15 am | पुष्कर

रंगीला रतन, अनेक आभार!

तुषार काळभोर's picture

30 Apr 2021 - 9:54 pm | तुषार काळभोर

अगदी स्टॅण्ड अप प्रोग्राम ची स्क्रिप्ट वाचल्यासारखं वाटलं.

तुलना केली तर कदाचित वाईट वाटेल ;)
पण सारंग साठ्येची आठवण झाली.

पुष्कर's picture

12 May 2021 - 6:35 pm | पुष्कर

धन्यवाद! मी ही स्तुती म्हणून घेतो :)

चौथा कोनाडा's picture

3 May 2021 - 5:49 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्त लिहिले आहे.
होळी ते रंगपंचमी असे पाच दिवस गावाकडे घातलेला धुमाकूळ आणि मार्‍यामार्‍या आठवल्या !
तेव्हा प्लास्टिक पिचकार्‍या फार कमी असायच्या, फुगे तर नाहीतच (काही महाभाग निरोधक फुगे वापरायचे, अन मोठ्यांच्या खुप शिव्या खायचे )
गवर्‍या, लाकडं, जुने मोडके फर्निचर उदंड, होळी नुसती धडाडत असायची !
धुळीवंदन २-२ दिवस चालायचे. ही पापं धुवायला नदी होतीच !
सगळ्या जुन्या आठवणी टवटवीत झाल्या !

पुष्कर's picture

12 May 2021 - 6:36 pm | पुष्कर

फुल्ल राडा!
प्रतिक्रियेबद्दल आभार.