खंडेराव यांचा जन्म शके १६४५ च्या विजयादशमीस झाला. खंडोबा हे होळकरांचे दैवत असल्यामुळे मल्हाररावांनी मुलाचे नांव खंडेराव असें ठेविलें. शके १६५५ मध्ये यांचे देवी अहल्येशी लग्न झाले. अहल्याबाई व खंडेराव यांच्यांत दुर्दैवाने असावे तेवढे सख्य नव्हते. खंडेराव व्यसनी असल्यामुळे सत्त्वशील अहल्येला जीवित कष्टमय स्थितीत काढावे लागले. पतिसुख त्यांच्या नशिबांत एकंदर नव्हतेच. शके १६७५ मध्ये मराठ्यांनी डीगजवळील कुंभेरीच्या किल्ल्यास वेढा घातला. खंडेराव होळकर या वेळी लढाईत होते. तरी त्यांच्या हातून नीट काम होत नसे. वेढा चालू असतांनाच “भोजन करून खंडेराव मोर्चियांत निशाणापाशी आला. तो एकाएकी प्रळयवीज पडते तैसें होऊन जेजालेची गोळी अकस्मात् लागून मोति ठार झाला. शुभ्रवर्ण चक्षु होऊन गतप्राण पडला !” मल्हाररावांच्या एकुलत्या एक पोराच्या निधनाने ते तर वेडेच झाले. त्यांतून अहल्यादेवी सती जाण्याच्या तयारीस लागल्या. त्या वेळी सुभेदार बोलले, “बाई, मला उन्हाळ करित्येस की काय? तूं माझे पाठीवर आहेस, तर अहल्या मेली व खंडू आहे हा मला भरंवसा.” आणि अहल्याबाईनेंहि सहगमनाचा विचार दूर केला. पतिनिधनानंतर अहल्याबाईनें आपले जीवित धर्मकृत्ये करून पुण्याईने राज्यकारभार करण्यांत घालविलें !
खंडेरावांच्या मृत्यूमुळे मल्हाररावांना अतिशय वेदना झाल्या. त्यांतच त्यांनी प्रतिज्ञा केली की, “सुरजमल जाटाचा शिरच्छेद करीन व कुंभेरीची माती यमुनेंत टाकीन तरच जन्मास आल्याचे सार्थक !" यावर जाट घाबरून गेला. जयाप्पा जिंदे यांना शरण जाण्याचा विचार करून जयाप्पांना निरोप, पाठविला, "आजचे समयीं तुम्ही वडील बंधु व मी धाकटा बंधु आहे, कळेल त्या रीतीने बचाव करावा." यानंतर जाटास अभयदान मिळाले.
प्रतिक्रिया
10 Apr 2021 - 5:19 pm | प्रसाद गोडबोले
ह्याच सुरजामल जाटाने पुढे पानिपत च्या लढाईत मराठा फौजांना थोडी तरी मदत केली, जेव्हा ही अलम हिंदोस्तानात कोणीही मराठ्यांन्चा बाजुला उभे रहायला तयार नव्हते !
आणि हेच मल्हारराव पानिपताच्या भर रणांगणावरुन "माघार" फिरुन आले ही फ्यॅक्ट आहे .
पण आता जातीय ध्रुवीकरण इतकं झालंय की काही खरं बोलायची सोय राहिली नाही !
26 Apr 2021 - 7:58 pm | चित्रगुप्त
माझ्या आठवणीप्रमाणे (वाचल्याप्रमाणे) मल्हाररावांची समजूत अशी झाली की हा गोळा पलिकडील बाजूला असलेल्या शिद्यांच्या तोफेतून सोडला गेला होता. त्यामुळे या घटनेतून पुढे पिढ्यान पिढ्या चाललेले शिंदे-होळकर वैमनस्य सुरू झाले.
याविषयी जाणकारांनी कृपया खुलासा करावा. शिंदे-होळकर याच्या वैमस्याबद्दल असलेल्या "आणि क्षिप्रा वहात राहिली" या कै. निरंजन जमीनदार यांच्या पुस्तकाच्या शोधात मी आहे. कुणाला ठाऊक असल्यास कळवावे.