आज काय घडले...
फाल्गुन व. ४
वि. ना. मंडलीक यांचा जन्म!
शके १७५४ च्या फाल्गुन व. ४ या दिवशी अव्वल इंग्रजीतील सुप्रसिद्ध सार्वजनिक कार्यकर्ते विश्वनाथ नारायण मंडलीक यांचा जन्म झाला.
यांचे जन्मस्थान मुरूड. मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिटयूटमध्ये चार वर्षे शिक्षण घेतल्यावर काही वर्षे यांनी सरकारी नोकरी केली. परंतु पुढे हे वकिली.करूं लागले. 'नेटिव्ह ओपिनियन' नांवाच्या इंग्रजी-मराठी साप्ताहिकाचे मंडलीक सात वर्षे संपादक होते. मंडलीक यांनी आपल्या जीवितांत अनेक प्रकारची लोकोपयोगी व शिक्षणोपयोगी कामें केली. रॉयल एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्ष, बेंगाल एशियाटिक सोसायटीचे सभासद, रॉयल जिऑग्रिफिकल सोसायटीचे फेलो, मुंबई विद्यापीठाचे फेलो, मुंबई व कलकत्ता कायदे कौन्सिलचे सभासद, सरकारी वकील, इत्यादि अनेक भूमिकांवरून यांनी केलेली कामगिरी महनीय अशीच आहे. हिंदी आणि इंग्रज या दोनहि लोकांत रावसाहेब मंडलीक प्रिय होते. " रावसाहेबांनी सत्याशिवाय कोणाची पर्वा केली नाही. मनोदेवतेशिवाय कोणाची पायधरणी केली नाही. लोकहिताशिवाय काही इच्छिले नाही किंवा न्यायरूप कुलदेवतेशिवाय कोणाचा प्रसाद त्यांना रुचला नाही." मंडलीक यांचा मोठा गुण म्हणजे त्यांचा सत्यशीलतेविषयीं दरारा. मोठमोठे अमलदार सुद्धा मंडलीकांच्यापुढे वचकून असत.
"मोठे डोके, रुंद कपाळ, अत्यंत तेजस्वी डोळे, तरतरीत नाक, दृढनिश्चयदर्शक भिंवया, गंभीर वृत्ति, गौरवर्ण, व मुखावर असलेली निरामयसूचक लाली यांनी रावसाहेबांचा चेहरा फार रुबाबदार दिसे. त्यावर विद्वत्तेचे तेज चढले होते. विचारीपणा हा जो त्यांचा विशेष गुण त्याचा ठसा चिन्हित झाला होता.... त्यांची वाणी खणखणीत होती. सत्यमार्गाने जाण्याचा त्यांचा.जो निश्चय होता त्याप्रमाणे त्यांचे आचरण असल्यामुळे कोणाला केव्हाहि भिण्याचे त्यांना कारण नसे. त्यामुळे त्यांचा चेहरा निर्भय दिसे.” बोधसार, लक्ष्मीशास्त्र, मराठी हिंदुधर्मशास्त्र, सिंधी भाषेचे लघुव्याकरण, व्यवहारमयूख, इत्यादि यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
-८ मार्च १८३३आज काय घडले...