आज काय घडले...
फाल्गुन व|| २
"आतां मज जाणे प्राणेश्वरासवें !"
शके १५७१ च्या फाल्गुन व. २ रोजी महाराष्ट्रांतील विख्यात सत्पुरुष तुकाराम महाराज यांचे निर्याण झाले.
संसारांत संकटपरंपरा निर्माण झाल्यावर मूळचेच परमार्थप्रवण असलेले तुकाराम महाराज परमेश्वराकडे संपूर्ण वळले. कीर्तनकारांच्या पाठीमागे ध्रुपद धरून तुकोबांरायांनी " कांही पाठ केली संतांची उत्तरें.” भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन ज्ञानदेव-एकनाथांच्या वाङ्मयाचे वाचन सुरू केल्यावर त्यांचे चित्त निर्मळ झाले. थोड्याच दिवसांत गुरुकृपा होऊन त्यांना कवित्वाची स्फूर्ति झाली. आणि त्यांच्या तोंडून पाझरणाऱ्या काव्यगंगेत महाराष्ट्रीय जनता सुखावली..तीन-चार शतकांपूर्वी ज्ञानदेवांनी संस्कृतांतील तत्त्वज्ञान मराठीत आणून मोठी कामगिरी केली. पण ते तत्त्वज्ञान अंतराळी होते. त्याला आपल्या अभंगवाणीने भूमितलावर तुकोबारायांनी आणले. स्वतः परमेश्वराची प्राप्ति करून घेतल्यावर तुकोबारायांनी 'उपकारापुरते उरले' होते. आपण स्वतः जेवून तृप्त झाल्यावर इतरांना संतर्पण करण्यासाठी ह्यांचे जीवित होते. तत्कालीन समाजांतील अनिष्ट चाली, ढोंगे, बुवाबाजी, नवससायास, यांवर तीव्र प्रहार करून समाजसुधारकाचे काम त्यांनी चोखपणे बजाविले. केवळ स्वतःचाच मोक्ष सावणारे तुकाराम महाराज नव्हते. सर्वांना त्यांनी वैराग्याचा बोधहि दिला नाही. तर प्रपंच हाच हरिरूप मानून निरहंकार वृत्तीने रहावे हा भागवत धर्माचा श्रेष्ठ संदेश त्यांनी थेट सामान्य जनतेपर्यंत पोचविला.
शेवटी शके १५७१ च्या सुमारास आपले कार्य संपल्याची जाणीव त्यांना झाल्यावर त्यांनी आवराआवरीस सुरुवात केली. फाल्गुन व. २ च्या कीर्तनांत तुकोबाराय बोलू लागले" सकळहि माझी बोळवण करा । परतोनी घरां जावें तुम्हीं ।
आतां मज जाणे प्राणेश्वरा सवें । मी माझिया भावें अनुसरलों ॥
वाढवितां लोभ होईल उशीर । अवघींच स्थिर करा ठायीं ||
सर्व लोक भजनप्रेमांत तल्लीन झाले होते. 'विठ्ठल विठ्ठल' म्हणत तुकाराम महाराजांनी सदेव वैकुंठगमन केले.
-९ मार्च १६५० कमी पहा