आज काय घडले...
फाल्गुन व. १
बुक्कराय यांचे निधन !
शके १२९९ च्या फाल्गुन व. १ रोजी सर्व हिंदुस्थानांत मुसलमानांचा धुमाकूळ सुरू असतांना दक्षिणेस तुंगभद्रेच्या तीरावर माधवाचार्यांच्या साह्याने विजयनगरच्या वैभवशाली हिंदुसाम्राज्याची स्थापना करणाऱ्या हरिहर आणि बुक्क या बंधूंपैकी बुक्कराय यांचे निधन झाले.
चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस इस्लामी संस्कृतीच्या टोळधाडी दक्षिणेत धुमाकूळ घालू लागल्या होत्या. शके १२४० मध्ये देवगिरीच्या यादवांचे राज्य बुडाल्यावर थोड्याच दिवसांत तेलंगणांतील वरंगळचे राज्यहि कायमचें नष्ट झाले सर्व दक्षिण भारतांत हिंदूचा पाडाव होऊन मोठी बिकट परिस्थिति निर्माण झाली. याच सुमारास तुंगभद्रेच्या उत्तर तीरावर अनागोंदी नावाचे एक छोटे.राज्य होते. शके १२४० वरंगळचे राज्य बुडाल्यावर त्याच्या पदरी असलेले हरिहर आणि बुक्क हे बंधु अनागोंदीच्या आश्रयास आले. एकास अनागोंदीची दिवाणगिरी व दुसऱ्यास खजिनदारी मिळून दोघां बंधूंची लौकरच भरभराट झाली. परंतु पुढे सात-आठ वर्षांतच सुलतान महमुद तघलक याने अनागोंदीचें राज्य बुडविले. आणि सर्व दक्षिण देश मुसलमानांना मोकळा झाला. धर्म बुडाला, स्वातंत्र्य गेले, पुरातन राज्ये गेली, मंदिरें जमीनदोस्त झाली, दैन्य, दारिद्य, दुष्काळ यांनी सारा दक्षिण देश व्यापला ! अशा बिकट प्रसंगी हरिहर-बुक्क या बंधूंनी शके १२५७ मध्ये विजयनगरी हिंदुसाम्राज्याची मुहूर्तमेढ रोविली. विजयनगरचे साम्राज्य त्या वेळी अत्यंत भरभराटीस आलेले असून त्याच्याएवढे संपन्न राज्य दुसरे नव्हते.
बुक्क मोठा पराक्रमी असून हिंदु धर्माचा मोठा अभिमानी व पुरस्कर्ता होता. पांच पांडवांत जसा अर्जुन तसा संगमाच्या पांच पुत्रांत बुक्क असे म्हणण्यांत येई. याची तरवार रणांगणावर नाचू लागली म्हणजे मुसलमानांची तोडे वाळून निस्तेज होत असत. ... शत्रु राजांना हा वज्राच्या तडाख्याप्रमाणे भासे... याची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे याने वेदभाष्य लिहिले. 'वैदिक मार्गप्रवर्तक' म्हणून जुन्या लेखांत याचा उल्लेख आढळतो."
-१४ फेब्रुवारी १३७८ कमी पहा