शके १५८७ च्या फाल्गुन शु. ९ ला श्रीछत्रपति शिवाजीमहाराजांनी रायगडावरील सर्व निवडक मंडळींचा निरोप घेऊन पुत्र संभाजी राजे, कांहीं सोबती व.चार हजार स्वार यांच्यासह औरंगजेबाच्या भेटीसाठी उत्तरेस आग्याकडे प्रयाण केले.
जयसिंहाच्या मध्यस्थीने शिवाजी राजे -औरंगजेब यांच्या भेटीचा योग घडून येणार होता. औरंगजेबाच्या बेइमानीपणाचा लौकिक सर्वत्र पसरला असल्यामुळे शिवाजी महाराज सावधच होते. मातुःश्री, गुरु व साधुसंत यांच्या सहवासांत त्यांच्या अंगांत स्वधर्माचे वारे सारखें संचारत असल्यामुळे बादशहाची सेवा करणे ही गोष्ट शिवाजी महाराजांस अत्यंत तिरस्करणीय वाटत असे. परंतु, जयसिंहाची चिकाटी मोठीच होती. 'बादशहाची मोठी इच्छा आहे की, तुम्हांस भेटावें, तुमचा गौरव करावा, तुम्हांस दक्षिणची सुभेदारी द्यावी....' इत्यादि वचनें तो शिवाजी राजांस देत होता. शिवाजी राजांनीहि आपल्या निकटच्या मंडळींत याविषयी खूप चर्चा केली. 'सिंहाच्या गुहेत आपण होऊन जाणे योग्य नाही' असे पुष्कळांचे मत पडले, 'तुमचे जिवास कोणताहि अपाय होणार नाही याबद्दल मी व माझा पुत्र रामसिह जामीन आहों' असा करार जयसिंहाने लिहून दिला. अखेर बादशहाच्या भेटीस जाण्याचे शिवरायांनी ठरविले.
अत्यंत चातुर्याने आणि दूरदृष्टीने शिवाजी राजांनी राज्याची व्यवस्था ठरवून दिली. मुख्य कारभार मातोश्री जिजाबाईवर सोपविण्यात आला. मोरोपंत प्रधान, मुजुमदार निळो सोनदेव व सेनापति प्रतापराव गुजर यांनी जिजाबाईचे आज्ञेनें वागावे असे ठरले. आपले किल्ले व मुलूख स्वतः एकवार नजरेत घालून त्यांची जपणूक करण्यास परोपरीने शिवाजी महाराजांनी किल्लेदारांना विनविले. आणि फाल्गुन शु. ९ रोजी शिवरायानी आग्र्यास जाण्यासाठी प्रयाण केले. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, सर्जेराव जेधे, हिरोजी फर्जद, बाळाजी आवजी, निराजी आवजी, रघुनाथ कोरडे, त्र्यंबकराव डबीर, इत्यादि मंडळी बरोबर होती.
-५ मार्च १६६६