दिसला गं बाई दिसला

Primary tabs

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जनातलं, मनातलं
25 Mar 2021 - 11:53 am

*दिसला गं बाई दिसला*
गेल्या जूनमधेच कान्हा टूर करून रिकाम्या हाताने (म्हणजे- रिकाम्या डोळ्यांनी) आणि जड पावलांनी परतलो होतो. तेव्हा वेळेअभावी बांधवगड ठरवलं नव्हतं. पण या वर्षी परत तोच सळसळत्या उत्साहाचा झरा घेऊन कटनीला पोहचलो..ट्रेन दोन तास लेट झाली होती..तरी उत्साह कायम होता. रात्री आठला कटनी स्टेशनहूनच ताला(बांधवगड) च्या "सन रिसाॅर्ट" च्या मॅनेजरने पिकअप साठी अरेंज केलेल्या इनोव्हाने सहा जणांचं उत्साही पथक निघालं. रस्ता फारच छान होता. खड्ड्यांचं नामोनिशाण नव्हतं. रस्त्यांवरच लावलेल्या रेडीयम सारख्या चमकदार पट्ट्यांमुळे वाटेवर दिवे अंथरलेत की काय असं वाटत होतं. उमारिया नंतर जंगल हद्द सुरू झाली आता चमकदार पट्ट्या नव्हत्या. ताला नऊ कि.मी.असताना अचानक हेडलाईटच्या उजेडात दोन डोळे उजव्या बाजूला चमकलेले दिसले ड्रायव्हरने गाडी साईडला घेतली. बघतो तर खरंच.. एक वाघीण दोन छाव्यासह रस्ता क्राॅस करायच्या तयारीत होती. आम्ही तिच्या त्या अनपेक्षित दर्शनाने अगदि भांबावून गेलो होतो, फोटो बीटोचं डोक्यातच आलं नाही...सावरेपर्यंत गाडी पुढे घ्यावी लागली कारण जास्त थांबून चालणार नव्हतं. सगळ्यांनाच "सुरूवात तर चांगली झालीय' हे फिलींग आलं होतं. उत्साहाचं प्रमाण अजूनच वाढलं.
सन रिसाॅर्ट ऑनलाईनच बुक केलं होतं. बघुनच खूप प्रसन्न वाटलं. झाडी,झूडपं..समोरचं मोठं लाॅन, आणि टुमदार ,स्वच्छ रूम्स. आतिथ्य पण उत्तम. ताला गेट पासून अगदि जवळ.
दुस-या दिवशी सकाळी पाच ची ताला गेटची सफारी. चारलाच उठून ताजेतवाने होऊन निघालो. जिप्सीचे गाईड आणि ड्रायव्हर अनुभवी होते. 31 वर्ष हेच काम करतोय असं ड्रायव्हर काकांनी सांगितलं. त्यांचा उत्साह बघून आमचा उत्साह द्विगुणीत झाला. आम्ही जाताना दिसणारे सर्पंट ईगल, मोर वगैरे फोटो घेत होतो तर ते काका म्हणाले 'पहले बाघ देख ले?' म्हटलं,"हां चलो..", कारण सगळेच खरंतर इकडे 'वाघच' बघायला येतात. इथे साल वृक्ष जास्त आहेत तसेच अर्जुन,मोह, बेल,बेहड,हर्दुल, बांबु,सफेता अशा अनेक वृक्षांची दाट झाडी आहे. मधोमध 'बांधवगड' किल्ला आहे. तो सहा-सात वर्षांपासून पर्यटकांसाठी बंद आहे. चितळ,सांबरं,मोर,रानडुकरं माकडं खुप दिसली. फिरता फिरता सांबराच्या अलर्ट काॅलचा मागोवा घेत गाईड, ड्रायव्हरने एका झाडीशी जिप्सी उभी केली..थोड्याच वेळात वाघोबांची गुरगूर ऐकु येऊ लागली. इकडे छातीत थोडी धडधड, आणि भितीही.! सगळे श्वास रोखून तयार.... कॅमेरा,मोबाईल पण रेडी होते. अन् थोड्याच वेळात आमच्या पासून पाच-सहा फुट अंतरावरून तो प्रचंड वाघोबा- -(मंगु नावाचा राॅयल बंगाल टायगर) झाडीतून बाहेर आला आणि आरामात, राजाच्या भारदस्त चालीत रस्ता ओलांडून समोरच्या झाडीत गेला. काय त्याचं ते प्रचंड धुड आणि भलीमोठी शेपूट... बघतच राहिलो अविचल होऊन.
ड्रायव्हरचा अंदाज एकदम बरोबर होता तो कुठून बाहेर पडेल याचा. आम्ही अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. गाईड ड्रायव्हरने खाकरून खोकुन बघितलं , पण 'त्याने' वळून बघायचीही तसदि घेतली नाही. गंमत म्हणजे या सफारीत एकमेव जिप्सीला हे व्याघ्रदर्शन झालं होतं. आणि ते 'आम्ही' होतो हे संध्याकाळच्या सफारीत आम्हाला तसेच इतर जिप्सी आणि वाघदर्शनातूर पर्यटकांनाही समोरा समोर जिप्सी आल्या कि संकेतांच्या देवाणघेवाणीच्या वेळी बोलताना समजलं. आणि इतरेजन आमच्याकडे अगदी आदराने बघायला लागले. लकी तर आम्ही ठरलोच होतो कारण संध्याकाळच्या सफारीतही तोच मंगु झाडीत निवांत बसलेला..पण नंतर मग जिप्सींच्या,माणसांच्या चाहुलीने उठून गुरगुरत आत आत जाताना दिसला. तो त्याच्या फॅमिलीला शोधतोय असं गाईडने सांगितलं. परतताना भेटणा-या प्रत्येक जिप्सीला आमचे गाईड संकेत देत होते त्याच्या ठिकाणाचा. आम्ही तर धन्य झालो होतो. अगदि सार्थक झालं होतं दोन्ही सफारींचं.
दुस-या दिवशीची सकाळची तिसरी सफारी खितौलीगेट वरून होती. इकडे जरा हिरवळ कमी कारण साल वृक्ष कमी, बांबु जास्त. पक्षी मात्र खूप दिसले. राज्यपक्षी असलेला Indian Paradise Flycatcher (शाही बुलबुल) पण दिसला. पाच वाजता पण चांगलं उजाडलेल होतं. आजचेही दोघे एकदम निपुण होते. तासाभरातच आम्ही आणि अजून एक जिप्सी मोक्याच्या जागी उभे होतो. आणि 'ती' आतुन येताना व्यवस्थित दिसत होती. ( दरहा तीचं नाव..ती ज्या ठिकाणी जास्त राहते त्यावरून ठेवलेलं ) जास्त दाट नव्हती झाडी त्यामुळे..ती आली डौलदार दमदार पावलं टाकत.. एका झाडाशी वास घेऊन तीने स्प्रे केलं दोनदा..आमचे ड्रायव्हर, गाईडने खाकरणं खोकण्याचा आवाज केला तशी तीने चार फुटांवरून आमच्याकडे बघितलं....काय तिची नजर होती !..भान हरपायला झालं होतं..मग तशीच चालत ती समोरच्या झाडीत हळूहळू दिसेनाशी झाली...आमची अवस्था "अजी मी ब्रम्ह पाहिले" अशी झालो होती. शब्दच उरले नव्हते बोलायला..गाईडने अजून एक अचंबित करणारा अनुभव दिला..गाडी अगदि त्या झाडाशी घेतली जिकडे तीने स्प्रे केलं होतं..त्या झाडाचा टवका काढून हातात धरला, आम्हाला वास घ्यायला लावला..तो युरीनचा वाईट नाही तर चक्क बासमती सारखा सुवास होता. काय किमया असते एकेक निसर्गात ! आम्ही आश्चर्यमिश्रीत आनंदाने इतर पक्षी बघत सफारी पुर्ण केली...पण खरंच अगदी सार्थक झाल्यासारखं वाटलं. आजवर अनेक झू मधे वाघ बघितले होते. पण असा.. तो ही मोकळाआणि आपणही..समोरासमोर चार-पाच फूट अंतरावरून. अगदि Mesmerising experience..!!एकदा नाही दोनदा नाही चक्क चारवेळा दर्शन देऊन वाघोबांनी आणि वाघिणीने आम्हाला धन्य केलं होतं आणि आमची एकही सफारी वाया गेली नव्हती. आमच्यासाठी खुपच आनंददायी आणि अविस्मरणीय अशी हि टुर झाली.
©वृंदा मोघे
19जून2018

लेख

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

25 Mar 2021 - 12:16 pm | चौथा कोनाडा

व्वा, भारी अनुभव. वाचतानाही थरार जाणवला !

Vichar Manus's picture

25 Mar 2021 - 12:20 pm | Vichar Manus

छान लेख, फोटो नाहीत का

गोरगावलेकर's picture

25 Mar 2021 - 1:50 pm | गोरगावलेकर

छान अनुभव. एखादा तरी फोटो असता तर आम्हालाही ते रूप पाहता आले असते.

आम्हीही तीन वर्षांपूर्वी कान्हा अभयारण्याची सहल केली होती.
मुक्की झोन, कान्हा झोन, सार्ही झोन अशा वेगवेगळ्या भागात तीन राईड केल्या. वाघाच्या पावलांचे ठसे तसेच पक्षी, चितळ, माकडांकडून मिळालेले अलर्ट यावरून वाघोबा जवळपासच असावे असे संकेत मिळत होते पण त्यांनी दर्शन काही दिले नाही.

मनाचे समाधान करून घेण्यासाठी 'एक_वात्रट' याच्या लेखातील एक वाक्य
जंगलात गेल्यावर झाडे पहावीत, फुले पहावीत, पाने पहावीत, जंगलाचा तो विशिष्ट वास नाकात भरून घ्यावा, जंगल अनुभवावे. वाघ किंवा बिबट्याच दिसायला हवा असं थोडंच आहे?

तुषार काळभोर's picture

25 Mar 2021 - 3:02 pm | तुषार काळभोर

णिषेढ!

VRINDA MOGHE's picture

25 Mar 2021 - 3:56 pm | VRINDA MOGHE
VRINDA MOGHE's picture

25 Mar 2021 - 3:56 pm | VRINDA MOGHE

माफ करा मंडळी..
सर्वात आधी प्रतिक्रीयांबद्दल मनापासून धन्यवाद.!
फोटो कृपया vgmblogs.blogspot.com वर पहावेत. खरच माफ करा. आता लवकरच शिकुन घेईन फोटो पोस्टायला म्हणजे इथे चिकटवायला. तोपर्यंत तसदिबद्दल क्षमा करा !

चौथा कोनाडा's picture

25 Mar 2021 - 9:03 pm | चौथा कोनाडा

छान आहेत फोटो.
पण लेखाचं शिर्षक लैच रोमॅण्टिक झालंय !

चौथा कोनाडा's picture

25 Mar 2021 - 9:07 pm | चौथा कोनाडा

फोटो डकवणं एवढं सोपं आहे !

THGER1234889