चेरी इन द ब्रेड

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
9 Mar 2021 - 12:49 am

सकाळची वेळ. घरातले दुध संपल्यामूळे मी दूध पिशवी आणायला शेजारच्या बेकरीकडे निघालो. जाताना " मी पन येणार!" अशी गर्जना सुपुत्राने केली. अशा गर्जनेनंतर आमाच्या सुपुत्राला नेणे भागच पडते.

दुकानात सुपुत्र विस्फारलेल्या डोळ्यांनी आजूबाजूला पहात होतेच "पप्पा , ते काय आहे ? " चेरीच्या एका पाकीटाकडे बोट दाखवत माझा मुलगा विचारता झाला. " अरे चेरी आाहे ती. ब्रेड खाताना तू वेगळी काढून खात नाही का ? तीच ती. " मी उत्तरलो.

" पण पप्पा ती तर ब्रेडमद्धे तयार होती ना ? आणि तीपण कशीबशी सापडते. या काकांना कितीतरी ब्रेड पॅकेट मधून ती चेरी काढली असणार ना ? " आमच्या सुपुत्राच्या या निरागस बोलण्यावर तो बेकरीवाला हसू लागला. " बडा प्यारा बच्चा है आपका. अब इतना बोल रहा है तो दिला दो पाकीट चेरी का. उसमे क्या ? " बेकरीवाल्याने वेळ बघून आपले व्यापारी डोके व्यवस्थित वापरले. बेकरीवाल्याचे ते बोलणे ऐकून आमचे सुपुत्र मोठाल्या डोळ्यानी जवळ आले, आणि खिसा ओढून बोलू लागले , " मला आवडते ती चेरी. त्या ब्रेडमद्धे ती काय सापडतच नाही. मला पाहिजे ते पाकीट. " यावर मी काय बोलतोय याची वाट न बघता बेकरीवाल्याने ते पाकीट सुपुत्राच्या हाती टेकवले. आता माझ्यासमोर त्या बेकरीवाल्याच्या हातात पैसे टेकवण्याखेरीज दुसरा उपाय काय होता ? पैसे टेकवले आणि घराकडे निघालो.

घर येईपर्यंत आमचे सुपुत्र हातात ते चेरीचे पाकीट घट्ट पकडून होते. आपला बाप ते पाकीट वाटेतच हरवेल ह्या भितीपोटी तो ते पाकीट स्वताःच घेऊन चालत होता. त्यासाठी तो एक मोठाच खजिना होता. कधी एकदा घरी जातो आणि ते पाकीट फस्त करतो असे त्याला झाले होते. एकादाचे आम्ही घरी पोहोचलो आणि सुपुत्र धावत आईकडे गेले. तिच्याकडून त्या पाकीटाचे कौतूक करून घेतले. एका ताटात सगळी चेरी काढली आणि खायला बसले. " अरे एवढी सगळी चेरी काय एकाच वेळी खाणार आहेस ? संध्याकाळी खा थोडी " बायको सुपुत्राला दटावती झाली. पण तो केव्हाच चेरीत हरवला होता .

समोरची एक तुकडा उचलला आणि तोंडात टाकला. स्वर्गसुख ते यापुढे काय असे भाव तोंडावर प्रगटले. मी मात्र गंमत बघत उभा होतो. पहिला , दुसरा , तिसरा असे काही तुकडे खाऊन झाले . मग मात्र त्यातली मजा संपली होती. " पप्पा ,ही चेरी ब्रेडमधली नाही. ती किती टेस्टी लागते , पण हिला आता टेस्टच नाही. " मी थोडा आवाज खाखरून घेतला. उपदेशाची ही योग्य वेळ आहे असे मानून मी उपदेश चालू केला ," अरे टेस्ट त्या चेरीची नव्हतीच कधी ! चेरीची टेस्ट तेव्हाच लागते जेव्हा तूला ती ब्रेडमद्धे अचानक सापडते . चार पाच स्लाईमद्धे तिला शोधताना तिची टेस्ट वाढत जाते. अश्या रेडीमेड पाकीटात तिला काय चव येणार ? " आमचे सुपुत्र काहीच न कळाल्यासारखे , चेरीने भरलेले तोंड उघडेच ठेऊन माझ्याकडे पाहू लागले .

तेवढ्यात बायकोने दटावले " अहो कवढे पोर आहे ते ? त्याला नाही ते काय बोलत बसला आहात ? नाष्टा वाढून ठेवला आहे तो घ्या खाऊन. आजच प्रमोशननंतरचा पहिला दिवस आहे. इतके दिवस वाट बघितल्यानंतर तुम्हाला ते भेटले आहे. उगाच उशीर करून घेऊ नका !"

आपले प्रमोशन, चेरीचे पाकीट तर होणार नाही ना या विचारात मी नाष्टा करू लागलो.

बालकथालेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

9 Mar 2021 - 12:55 pm | आनन्दा

शेवट छान आहे..
शेवटी प्रमोशन म्हणजे तरी काय, चेरीचे पाकीटच :)

जगप्रवासी's picture

11 Mar 2021 - 10:31 am | जगप्रवासी

>>शेवटी प्रमोशन म्हणजे तरी काय, चेरीचे पाकीटच - प्रतिसाद जाम आवडला

मुक्त विहारि's picture

9 Mar 2021 - 7:28 pm | मुक्त विहारि

छान आहे...

सुखी's picture

9 Mar 2021 - 9:36 pm | सुखी

झकास

उगा काहितरीच's picture

10 Mar 2021 - 10:35 am | उगा काहितरीच

सही ! एकदम असाच विचार येतो बरेचदा.
बाकी, लिखाण आवडले.

एकदम मस्त रुपक (कथा)..
strong> आपले प्रमोशन, चेरीचे पाकीट तर होणार नाही

चौथा कोनाडा's picture

12 Mar 2021 - 2:49 pm | चौथा कोनाडा

टेस्ट त्या चेरीची नव्हतीच कधी ! चेरीची टेस्ट तेव्हाच लागते जेव्हा तूला ती ब्रेडमद्धे अचानक सापडते . चार पाच स्लाईमद्धे तिला शोधताना तिची टेस्ट वाढत जाते

हे छानच !