तो होता तरी कोण? (कथा)

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
8 Mar 2021 - 10:05 am

आमच्या दोघांची भेट घडणे हा निव्वळ योगायोग असेल, असे मी अजिबात म्हणणार नाही. तो योगायोग असूच शकत नाही. योगायोगाने जुळून येणाऱ्या गोष्टी, एवढ्या समर्पक असूच शकत नाहीत. बहुतेक एखाद्या अदृश्य शक्तीनेच आम्हाला एकमेकांशी भेटवले असणार. पण एक गोष्ट कबुल करेन मी, या आमच्या भेटीचे सर्व श्रेय त्यालाच जाते. तोच माझ्याकडे आला होता. अगदी अनाहूतपणे.
              तो मला भेटला! बोलला! तेव्हा मला जाणवले की, त्याचे मला भेटणे किती जरुरीचे होते. त्याची भेट मी आयुष्यभरात कधी विसरेन, कधी तो विस्मरणात जाईल असे होणारच नाही. त्या एका भेटीत मला तो किती अचंबित करून गेला? हे केवळ माझ्या अंतर्मनाला माहीत. तो जसा आला होता, पुन्हा तसाच गेला. पण माझ्या मनात अनेक प्रश्न सोडून, ज्याची उत्तरे मी पुढे कित्येक दिवस शोधत बसणार होतो.
                  आता जरा सविस्तर सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील. अगदी संदर्भासहित! सगळी मागची, पुढची पार्श्वभूमी कळली म्हणजे, मी नेमके काय सांगणार आहे, हे तुम्हाला व्यवस्थित समजेल.
                
त्याचे झाले असे की, काही महिन्या आगोदर मी ते पुस्तक लिहायला घेतले होते. एक लेखक म्हणून, मी नेमका नावारूपाला येत होतो. पुस्तकाचा विषय काहीसा निराळा निवडला होता. जसा वेळ मिळेल तसे मी लिहीत गेलो. एक एक प्रकरण पूर्ण करत होतो. अनेक प्रसंग, घटना, वाद, संवाद, प्रतिवाद, कल्पना, वास्तव मी एक एका प्रकरणात रेखाटत होतो. मला ते पुस्तक काहीसे आगळे वेगळे व्हावे असे वाटत असल्याने, मी त्यावर प्रचंड मेहनत घेत होतो. एक एक वाक्य अतिशय विचारपूर्वक मांडत होतो. शब्दांची रचना, धाटणी, मांडणी एकमेकांना समर्पक अशी मांडत गेलो.
                    अकरा बारा प्रकरणे मी लिहून काढले होते. जसे जसे प्रकरण पूर्ण होत होते, तसे तसे एका मासिकात मी ते प्रसिद्ध करत होतो. खरेतर सगळे लिखाण एकदाच प्रसिद्ध करावे, असे एकदा मनात आले होते. पण, त्याला खूप कालावधी गेला असता. त्यामुळे लिखाणाला पाहिजे तसा उत्साह उरला नसता. त्यामुळे एक प्रकरण पूर्ण झाले की, मी ते मासिकात प्रसिद्ध करत होतो. वाचकांचे बरे वाईट अभिप्राय येत होते.त्याने पुन्हा लिहिण्याचा हुरूप येत होता. अशा प्रकारे मी अकरा बारा प्रकरणापर्यंत पोहोचलो होतो. अजुन तेवढेच प्रकरण पुढे बाकी होते. लिहिण्याचा उत्साह दिवसेंदिवस वाढत असल्याने, तेही प्रकरणे लवकर पूर्ण होण्याच्या मार्गावर होते.
                 इथपर्यंत सगळे काही ठीक होते. माझे दैनंदिन व्यवहार सुरळीत होते. पण त्याच्या त्या भेटीने आणि त्यानंतरच्या मंथानाने माझा सगळा मनोव्यापार ढवळून निघाला होता.
                 संध्याकाळचे सहाचे ठोके नेमके पडून गेले होते. धूसर अंधार वातावरणात धीम्या पावलांनी शिरत होता. मी ऑफिस मध्ये कामात व्यस्त होतो. हळूहळू ऑफिस रिकामे होऊ लागले. कदाचित मला आज उशिरापर्यंत थांबावे लागणार होते. कामाचा व्याप थोडा जास्त असल्याने मला थांबावेच लागणार होते. बघता बघता सातही वाजून गेले. आता सगळे ऑफिस रिकामे झाले होते. मी एकटाच ऑफिसमध्ये उरलो होतो. बाहेर पावसाला सुरुवात झाली असावी, रपरप आवाज कानात शिरत होता. थंडीची लहर अंगाला चाटून जात होती. वातावरण अचानक बदल्यासारखे जाणवत होते.
               तेवढ्यात दाराजवळ कोणाची तरी चाहूल जाणवली. मला जरासे नवल वाटले. ऑफिसमधले सगळे लोक गेले होते. मग आता यावेळी दारात कोण असेल? आता दारावर टकटक झाली! दार काचेचे असले तरी, पावसामुळे निश्चित असे काही दिसत नव्हते. तरीही मी काचेतून पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. पण काही फायदा झाला नाही. काही दिसायला तयार नव्हते. मी तसाच उठून दाराजवळ आलो. दार उघडले. दारात तो उभा होता. अगदी भिजलेल्या अवस्थेत. तेव्हा तो मला पूर्णपणे अनोळखी असल्याने, त्याचे काही विशेष जाणवले नाही. तो माझ्याच वयाच्या आसपास वाटला. पावसाने कपडे काहीसे ओले झाले होते. ते अंगाला चिकटले होते. देहयष्टी साधारणच दिसत होती. हातात एक चामडी पिशवी शिवाय, दुसरे काही समान नव्हते.
    मी त्याला आत घेतले. त्याला बरे वाटले. तो जरासा सावरला. आम्ही दोघे एकदम समोर समोर बसलो. त्याच्या चेहऱ्यावर काहीसा गोंधळ जाणवला मला. त्याने इकडे तिकडे बघत बोलायला सुरुवात केली.
   “ मी अमोघ दास. काही महत्वाच्या घटनेविषयी तुमच्याशी बोलायला आलोय. तुम्हाला वेळ आहे का?”
त्याने त्याचे येण्याचे थोडक्यात प्रयोजन मला सांगितले. त्याच्या बोलण्याचे मला थोडे नवल वाटले. एकतर अशा अवेळी तो आला होता. आणि या आगोदर कधीही मी त्याला पाहिले नव्हते. त्याचे माझ्याकडे काय काम असावे? हा प्रश्न मनात उमटून गेला. पण आता मलाही जरा उत्सुकता लागली होती.
 “ हो हो बोला. मला आहे वेळ.”
मी जास्त आढेवेढे न घेता त्याला म्हणालो.
त्याने माझ्यावर नजर टाकली. आणि त्याने आपल्या पिशवीतून काही मासिके बाहेर काढले. मासिके ओळखीची वाटत होती. त्याने मासिके समोर ठेवली. त्यातील एक मासिक त्याने हातात घेतले. एकदा माझ्याकडे नजर टाकली. त्या मासिकातले काही पाने त्याने उलटले, आणि अपेक्षित पान आल्यावर तो थांबला. त्याने ते मासिक आता माझ्या समोर धरले. मी ते हातात घेऊन त्या पानावर नजर टाकली. आणि त्याच्याकडे पाहिले. आता त्याचा चेहरा काहीसा कठोर जाणवला. आणि त्याने बोलायला सुरुवात केली.

तारीख 15 सप्टेंबर, 2005.
“तो बाजाराचा दिवस होता. मला आठवड्याचा सगळा बाजार आजच भरायचा असतो. त्यामुळे माझी बाजाराला जाण्याची गडबड सुरू झाली होती. हातात पिशवी घेऊन, मी बाजाराच्या दिशेने जात होतो. मनातल्या मनात काय काय खरेदी करायचे याचे गणित करत होतो. मी माझ्याच नादात चाललो होतो, अचानक ब्रेक मारण्याचा जोरात आवाज कानावर आला. मी एकदम जागेवर थांबलो. हृदयाची धडधड वाढली होती. मी मागे वळून पाहिले. एका ट्रकने जोरात ब्रेक मारले होते. समोर एक लहान मुलगी आडवी आली होती. थोडा वेळ तिथे चांगलाच गोंधळ माजला होता. लोक ट्रक चालकाला मारहाण करत होते. माझ्या हृदयाची स्पंदने पूर्ववत व्हायला काही वेळ लागला असेल. सगळ काही पूर्वपदावर आल्यावर मी बाजाराच्या दिशेने निघालो. बाजार चांगलाच बहरून आला होता. सगळीकडे नुसती माणसेच माणसे दिसत होती. सगळेजण आपल्या नादात होते. कोणाला कोणावाचून घेणे देणे नव्हते. मी हलकेच हसत आत बाजारात घुसत होतो. तेवढ्यात काहीतरी गलका ऐकू आला. बाजाराच्या एका रांगेतून एक माणूस वेगाने पळत येत होता. बहुतेक त्याला बाजाराच्या बाहेर पडायचे असेल. त्याच्या मागे पळत सात आठ माणसे येत होते.
चोरss चोरsss चोरssss
असे म्हणत ते त्याच्या मागे वेगाने धावत होते. म्हणजे पुढे पळत होता तो चोर होता तर! माणसे पटापट रस्त्यावरून बाजूला सरकत होती. आता तो चोर धावत धावत अगदी माझ्या जवळ आला होता. अगदी काही फुटाच्या अंतरावर आला होता. अचानक माझ्या मनात कुठली जोशाची भावना तरळून आली देव जाणो! पण माझ्याकडून अगदी जलद गतीने ती कृती घडून आली. मी एकदम पुढे होत त्या चोराला विळखा मारला. त्याला घट्ट पकडुन ठेवले. ती मागची माणसे धावत जवळ येताना दिसत होते. तो चोर सुटण्याची धडपड करू लागला. पण मी माझी मिठी घट्ट आवळली होती. आता तो पाठलाग करणारा माणसांचा समूह, अगदी जवळ आला होता. आणि अचानक ते झाले. कसे ते कळले नाही. पण त्या चोराच्या हातात चाकू आला होता. बहुतेक त्याच्या विजारीत तो असावा. मी काही प्रतिकार करायच्या आत, त्याने सापकन माझ्या दंडावर एक वार केला. वेदना सरसर करत माझ्या मेंदूपर्यंत गेली. घाव चांगला खोलवर बसला होता. साहजिकच माझी पकड सैल झाली होती. तेवढी संधी त्याला पुरेशी होती. त्याने तेथून पोबारा केला. मात्र त्याच्या नादात मी माझ्या देहाला कायमची सात आठ इंचाची जखम करून घेतली. फायदा तर काहीच झाला नाही, पण एक मोठा मनस्ताप मात्र वाटायला आला."

   त्याने मोठा सुस्कारा सोडला. तो बोलायचं थांबला. त्याने आपले थोडेसे पावसाने ओले झालेले शर्ट वर केले. हाताची बाही थोडी वर सरकवली आणि उजव्या दंडावरची ती पाच सहा इंचाची जखम, तिचा आता व्रण उरला होता, त्याने तो व्रण मला दाखवला. त्याने पुन्हा आपला सदरा नीट केला आणि माझ्याकडे बघू लागला. अगदी एकटकपणे.
      मी अजूनही अवाक नजरेने त्याच्याकडे बघत होतो. कधी त्याच्या चेहऱ्याकडे, तर कधी त्याने माझ्या हातात दिलेल्या त्या मासिकाच्या पानाकडे बघत. सगळे काही अविश्वसनीय वाटत होते. प्रथमदर्शनी तर हे सगळे धादांत खोटे आहे, असे वाटत होते. पण तो ज्या आत्मीयतेने आणि भावविवशतेने सांगत होता, त्यावरून मी त्याच्या बोलण्यावर अविश्वास दाखवूच शकत नव्हतो. माझ्याच्याने ते शक्यच झाले नसते. माझी अवस्था काहीशी संभ्रमित झाली होती. चेहर्‍यावर गोंधळ माजला होता.
   त्याने माझ्या त्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघून हलकेच एक स्मित केले. आणि पुन्हा आपल्या त्या चामडीच्या पिशवीत हात घालून, एक दुसरे अगदी तसेच मासिक बाहेर काढले. केवळ मासिकाचा महिना बदललेला होता. त्याने पुन्हा अगदी मघाचीच कृती केली. मासिकाची पहिली काही पाने पालटली. अपेक्षित पान आल्यावर ते मासिक माझ्या हातात दिले. मी मासिक हातात घेतले. एकदा त्या पानावर नजर टाकली. आणि पुन्हा त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघायला लागलो. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही ते मघाचेच हास्य तरळत होते. कदाचित माझा गोंधळलेला संमिश्र चेहरा पाहून, त्याला हसू येत असावे. तो थोडासा समोर झुकला आणि त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली.
          
तारीख 25 फेब्रुवारी 2006.
“आणि मला खाडकन जाग आली. उजवा हात चेहऱ्यावर फिरवीत, मी काहीसा हसत पुन्हा पलंगावर आडवा झालो. कितीतरी दिवसानंतर असे बरे स्वप्न पडले होते. नाहीतर अशात नुसते वाईट स्वप्नच पडू लागले होते. कधी सापांचे, जंगलाचे, मारहाणीचे, अपघाताचे, आत्महत्येचे, वाद विवादाचे नुसते असेच स्वप्ने. सगळे वाईट. आणि आजकाल तर रोजच अशी अमंगळ स्वप्नांनी जाग येत असे. पण आजचे स्वप्न त्याला अपवाद होते. आजचे स्वप्नच एकदम उलटे होते. कमालीचे रंजक होते.
    आज मी स्वप्नात का होईना, स्वर्गात गेलो होतो. अगदी इंद्राच्या दरबारात. सगळा सोन्याचा दरबार. सगळी आभूषणे घातलेले देवी देवता. आपल्या शाही सिंहासनावर बसलेला इंद्रदेव. समोर नृत्य करत असलेल्या रूपवान अप्सरा. त्यांच्या त्या नृत्याच्या मनमोहक अदा. सगळे कसे भव्य दिव्य दिसत होते. मी स्वर्गात कसा पोहोचलो, हे कोडेच होते. पण पोहोचलो होतो, हे मात्र खरे. एक साधारण मनुष्य स्वर्गात आल्याने, सगळे देव आश्चर्यचकीत झाले होते. प्रत्येकजण माझ्याकडे नवलाईने बघत होता. मला एकदम अवघडल्यासारखे झाले. सिंहासनावरुन उठून प्रत्यक्ष इंद्र माझ्याकडे येत होता. मी काहीसा घाबरून गेलो. इंद्र माझ्याजवळ आला. मला वाटले आता तो मला काहीतरी शाप नक्कीच देणार. पण झाले अगदी उलट. तो माझ्याजवळ आला. त्याने अदबीने माझी विचारणा केली. आस्थेने चौकशी केली. मीही अगदी नम्रपणे त्याला उत्तरे दिली. माझ्या प्रामाणिकपणावर तो भलताच खुश झाला. त्याला मनुष्याबद्दल कमालीचा जिव्हाळा वाटत असावा. त्याने माझे योग्य असे आदरातिथ्य केले. बसायला सुवर्णाचे आसन दिले. मी साक्षात देवाच्या पंक्तीत बसलो होतो. मला तर मी अचानक देव अवतारात गेल्यासारखे वाटत होते. मी भलताच खुश झालो होतो.
              तेवढ्यात अचानक एक दूत धावत येताना दिसला. बहुतेक तो काहीतरी वार्ता घेऊन आला होता. देवलोकावर असुरांनी आक्रमण केले आहे. मोठ्या संख्येने असुर, देवलोकवर प्रस्थान करून येत आहे. अशी वार्ता त्याने सांगितली. दरबारात एकच गोंधळ माजला. आता काय करायचे? हा प्रश्न सगळ्या देवांना पडला होता. असुरांचे सामर्थ्य देवांहून जास्त दिसत होते. इंद्रही हवालदिल झाला होता. नेमके आता या संकटाला कसे तोंड द्यावे? हे कोणालाच कळत नव्हते. सगळीकडे हाहाकार माजला होता. एवढ्या कमी देवतांना घेऊन असुरांचा पराभव करणे शक्य नव्हते. असे जो तो बोलत होता. सगळे हैराण झाले होते.
  तेवढ्यात मला काहीतरी सुचले. म्हणून मी बोलून गेलो,
    ”देवेंद्र, मी आपली काही सहायता करू शकतो का?” माझ्या अशा बोलण्याने सगळे देव माझ्याकडे बघू लागले. काहींना वाटत होते, हा क्षुद्र मनुष्य काय आपली मदत करणार? पण इंद्राने मला बोलायला होकार दिला.

“ देवेंद्र आमच्या पृथ्वीवर असे संकट अनेक वेळा आलेले आहेत. पहिले- दुसरे महायुध्द, यादवी युद्ध, अंतर्गत बंडाळी, इतिहासातील अनेक युद्धे अशा अनेक वेळी, अशा प्रसंगांना मनुष्याने तोंड दिलेले आहे. अशा प्रसंगी काही युध्छानितीचा वापर करावा लागतो. जसे गोर्रीला वॉरफेअर, टॉर्जन हॉर्स, गनिमी कावा, ब्लिट्झक्रीग अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. देवांना त्या पटल्या. आणि अशा तऱ्हेने या नितींचा वापर करून देवांनी असुरांवर विजय मिळवला. देवलोकात माझा सगळीकडे जयजयकार झाला. इंद्राने माझ्या गळ्यात विजयाची माळ घातली. आणि माझ्या स्वागताचे सगळीकडे ढोल नगारे सुरू झाले.”
आणि त्यासरशी मी झोपेतून जागा झालो.
   त्याने काहीवेळ बोलणे थांबवले. आणि माझ्याकडे बघून तो हसू लागला. खरेतर त्याच्या या स्वप्नाच्या गोष्टीने मलाही हसायला यायला पाहिजे होते, पण मी हसत नव्हतो. कसा हसू मी? मी पुन्हा त्या मासिकाच्या पानावर नजर टाकली. पुन्हा त्याचे ते स्वप्न आठवले. मी वेंधळ्यासारखा नुसता त्याच्या चेहऱ्याकडे बघत होतो.
   तो जशा जशा त्या घटना सांगत होता, तसे तसे मला आश्चर्याचे हादरे बसत होते. माझा गोंधळ नुसता वाढत जात होता. आधीची त्या चोराची घटना, आता त्याचे ते स्वप्न, स्वप्नातला तो देवाचा प्रसंग, तो ते सांगत होता पण, विचारमग्न मात्र मी होत होतो. त्याला एवढा माझा गोंधळ पुरेसा वाटत नव्हता. म्हणून की काय, तो हसायचा थांबला. आणि पिशवीतून त्याने पुन्हा चार पाच मासिके बाहेर काढली. मला आता कसेतरी व्हायला लागले. प्रश्नांची गुंतागुंत  नुसती वाढतच चालली होती. त्याला अनेक प्रश्न विचारायचे होते. पण, तो त्याचे घटना, प्रसंग सांगण्यात गुंग झाला होता. माझ्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर द्यायला तो तयार नव्हता. मला नुसती ऐकायची भूमिका वठवावी लागत होती. त्याने आता त्या काढलेल्या चार पाच मासिकांपैकी एक एक मासिक माझ्या हातात द्यायला सुरुवात केली. मी एका एका मासिकाचे पान पलटत होतो. आणि मला तो एक एक  प्रसंग, घटना , गोष्टी, अनुभव,  सांगत गेला. त्यात काही चांगल्या होत्या, काही वाईट होत्या. कटू गोड अनुभव होते. मी नुसता ऐकत गेलो. चेहऱ्यावर, डोळ्यावर , हावभावावर नुसते नवल उमटून जात होते. मी नुसता गोंधळला जात होतो. एक घटना सांगून झाली, की ते मासिक बाजूला पडत होते. दुसरा प्रसंग सांगून झाला की, दुसरे मासिक बाजूला पडत होते. तो अखंडपणे घटना, प्रसंग सांगत जात होता. मी मौन बाळगून ते ऐकत होतो. अखेर त्याचे ते चार पाच मासिके संपून गेले होते. मी स्तब्ध झालो होतो. काही बोलावे अशी इच्छाच उरली नव्हती.
    एव्हाना किती काळ, वेळ लोटला, हे काहीच माहीत नव्हते. मी घड्याळात नजर टाकली. रात्रीचे नऊ वाजले होते. आम्ही अजूनही ऑफिसात एकमेकांसमोर बसलेलो होतो. आता पावसाचा जोर अधिकच वाढला होता. त्याचा आवाज आमच्यातील रंजकता अजूनच वाढवू लागला. आम्ही दोघेही आता शांत बसलो होतो. वातावरण मोठे चमत्कारिक वाटू लागले. काळोख सर्वत्र दाटून आला होता. पिवळे, पांढरे दिवे अंधाराला मागे ढकलत होते. ऑफिसात आता कमालीची शांतता जाणवत होती. सगळे वातावरण कसे, एका विचित्र हुरहुरीने भारल्यासारखे वाटत होते. मला तर आजची ही रात्र एका वेगळ्याच पातळीवरची जाणवत होती. मानवी मनाच्या बाहेरच्या घटना, प्रसंग माझ्या मनोव्यापारात मिसळल्या जात होत्या. मनात वेगवेगळ्या संवेदना प्रवेश करत होत्या. त्यांनी सगळ्या शरीरभर गुंतागुंतीची वलये निर्माण होत होते. एक मन म्हणत होते, आता बास झाला हा खेळ. इथून तडक उठावे आणि घरी निघावे. याचे हे बोलणे, हसणे, हा मासिकाचा पोरखेळ इथेच सोडून, आपण आपले येथून चालते व्हावे. पण मी तसे करू शकत नव्हतो. कारण कुठल्या तरी आज्ञेत मी होतो. कदाचित त्याच्याच आज्ञेत. मला त्याच्या परवानगीशिवाय येथून हलता येणार नव्हते. आणि अजून मला त्याने येथून जाण्याची आज्ञा दिली नव्हती. मी काहीच करू शकत नव्हतो. त्याचे ते बोलणे शांतपणे ऐकण्याशिवाय.
       तो जागेवरून उठला. तसाच चालत खिडकीजवळ गेला. खिडकीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न करू लागला. पाऊस एवढ्या जोरात पडत होता की, खिडकीतून बाहेरचे काहीही दिसत नव्हते. तरीही तो बाहेर बघत होता. त्याचा चेहरा आता कमालीचा गंभीर वाटत होता. एकदम टोकाचा गंभीर. आधीचा त्याचा तो हसरा चेहरा, आता एकदम लोप पावला होता. त्याची जागा आता या अशा गंभीर चेहऱ्याने घेतली होती. तो खिडकीतून आरपार पाहण्याचा प्रयत्न करत असावा. नजर एकदम शुन्यावत जाणवली त्याची. तो पाठीमागे वळाला. तो आता माझ्याकडे बघत होता. आता त्याच्या नजरेत मला करुणा दिसू लागली. डोळे पाणावल्यासारखे वाटू लागले. मला आश्चर्य वाटले. क्षणापूर्वी एवढा गंभीर झालेला हा माणूस, एकदम कसा रडवेला झाला. मला कसतरी झाले. तो आता कमालीचा हतबल, खिन्न, उध्वस्त आणि अशक्त जाणवला मला. त्याच्या डोळ्यातून अजूनही पाणी येत होते. तो रडत होता.
तो तसाच पाणावल्या डोळ्यांनी माझ्याजवळ येऊन बसला. मी फक्त त्याच्याकडे बघत होतो. काही कृती करावी अशी इच्छाच झाली नाही. त्याने त्याच्या चामड्याच्या पिशवीत हात घातला. आणि त्या पिशवीत उरलेले ते शेवटचे मासिक बाहेर काढले. मी नुसताच त्याच्याकडे बघत होतो. माझा चेहरा आता निर्विकार बनला होता.
     त्याने ते मासिक हातात घेतले. नेहमीप्रमाणे त्याने त्याची काही पाने पलटली. अपेक्षित पान आले. त्याने शांतपणे ते मासिक माझ्या समोर धरले. मी अगदी यांत्रिकपणे ते हातात घेतले. मी त्या पानावर नजर टाकली. माझ्या डोळ्यात पुन्हा नवल उलटले. त्याने पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली.

तारीख 6 ऑक्टोबर 2006.
“त्या दिवशी तो अनोळखी फोन आला नसता, तर किती बरे झाले असते. पुढे होणारा प्रचंड मनस्ताप तरी, कमी झाला असता. मी उन्मळून तरी पडलो नसतो. पण कदाचित तसे व्हायचे नव्हते. सायंकाळचा पाचचा सुमार असावा. मी माझ्या ऑफिसातून नेमका बाहेर पडलो होतो. सव्वा पाचची बस पकडुन निवांत घरी जाऊ असा मनात बेत ठरवत होतोच की, फोन वाजला. अनोळखी नंबर दिसत होता. फोनच्य पांढऱ्या स्क्रीनवर उघडझाप होत होती. मी बटन दाबून फोन कानाला लावला. हॅलो म्हणायचे प्रयोजन ही न करता, पुढचा व्यक्ती बोलायला लागला.
     “तुमची बायको तुम्हाला फसवत आहे. तिच्यावर विश्वास टाकून, तुम्ही मोठा अपराध करत आहात. तुम्हाला जर काही प्रत्यक्ष बघायचे असेल, तर आज बरोबर सहा वाजता शहराबाहेरील शिव मंदिरात जाऊन बघा. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची प्रत्यक्षदर्शी उत्तरे मिळतील.”
सलग असे बोलून त्या व्यक्तीने फोन ठेऊन दिला. तो निर्जीव फोन हातात घेऊन, मी स्तब्धपणे एकाच जाग्यावर उभा राहिलो. मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो. डोक्यात हजारो प्रश्नांचे वारूळ फुटले होते. नाना विचार मनात पिंगा घालत होते. देवकीवर मला पूर्ण विश्वास होता. पण आता तो विश्वास, त्या अनोळखी फोनने काहीसा डळमळीत झाल्यासारखा वाटू लागला. मला आता त्या ठिकाणी गेल्याशिवाय चैन पडणार नव्हती. एकदाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मनात उठणारे ते, अनेक प्रश्न शमणार नव्हते. मी तसाच शिव मंदिराकडे निघालो. तिथे प्रत्यक्षात काहीही बघायला मिळू नये, ही आशा मनात बाळगत मी हताशपणे चालत होतो.
        सायंकाळचा कोवळा अंधार धीम्या गतीने वातावरणात शिरत होता. मंदिराकडे तुरळक गर्दी दिसत होती. मी आता मंदिराच्या जवळ आलो होतो. सहाचा सुमार यायला, अगदी थोडाच अवधी उरला होता. मी आता मंदिराच्या आवारात येऊन, एका झाडाखालच्या ओट्यावर टेकलो होतो. मनात अनेक शंका थैमान घालत होत्या. मनाला स्थिरपणा असा मिळतच नव्हता. माझी नजर मंदिराच्या मुख्य दरावरच होती. खरेतर दाराकडे बघावेसे वाटत नव्हते. पण एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावायचाच, या जिद्दिमुळे दाराकडे सारखी नजर जात होती. डोक्यात असे विचार चालूच होते की, कानावर काहीसा परिचित, हसण्याचा आवाज आला. अर्थात आवाज देवकीचा होता. मी दारावर नजर टाकली. दारातून देवकी आणि माझा मित्र महेश्वर आत येत होते. मी थोडा आडोशाला झालो. मी त्यांना दिसावे, असे मला वाटत नव्हते. मनात नुसते काहूर माजले होते. जे न दिसावे अशी अपेक्षा केली होती, तेच नजरेसमोर आले होते. काचेचे तावदान जमिनीवर पडून खळकन फुटून जावे, तसे माझ्या विश्वासाचे झाले होते. क्षणार्धात तो विश्वास तुटून गेला होता. देवकी एवढ्या नीच थराला जाईल, ही कल्पनाही मला करवत नव्हती. मला दुहेरी दुःख बोचत होते. मैत्रीच्या नावाला महेश्वर कलंक होता. आपल्याच मित्राच्या बायको सोबत असे खुलेआम, स्वैरपणे वागणे त्याला कसे जमत असावे? किती विश्वासाने मी त्याला घरी बोलवायचो. किती आपुलकीने त्याची खातीरदारी करायचो. आणि त्याचे त्याने असे फळ द्यावे?
      मेंदूत नुसती कालवाकालव होत होती. असेच पुढे होऊन दोघांना जाब विचारावा. देवकी माझे काय चुकले? असे तीला विचारावे. पण अशी कुठलीच कृती मी केली नाही. डोळ्यातून गळणारे पाणी महत्प्रयासाने दाबत होतो मी. ते दृश्य आता मनःपटलावर कायमचे गोंदले जाणार होते. मिटवावे म्हणले तरी ते आता मिटणारे नव्हते. मी हताशपणे घराची वाट धरली.
     मी कसाबसा घरी आलो. मनस्थिती पार खालावली होती. मनातील बेचैनी टोकाला जात होती. घालमेल होत होती. स्वतःच्या पुरुषपणाची शरम वाटायला लागली होती. माणसाच्या पुरुषत्वावर झालेला घाव, अतिशय मर्मभेदी असतो. त्याने झालेली जखम कधीच बरी होणारी नसते. प्रत्येक प्रसंगागणिक ती जखम चिघळत जाते. तिची वेदना मेंदूअगोदर हृदयापर्यंत जाते. तुम्ही स्वतःच्याच मनातून कोसळून जाता. स्वतःच्या मनातून सरसर खाली उतरत जातो माणूस. मी तरी त्याला कसा अपवाद राहू?
     त्या रात्री काहीशी उशिरा घरी आलेली देवकी, खुशीतच होती. तिचा तो आनंद मला किती वेदना देत असेल? हे केवळ माझ्या अंतर्मनालाच ठाऊक. मी तिला उशिरा येण्याचे कारणही विचारले नाही. काय विचारणार कारण? जणू काही तिच्या उशिरा येण्याचे कारण मला ठाऊकच नाही!
   त्या रात्री मला झोप अशी येतच नव्हती. माझ्यातला पुरुष त्या रात्री मरण पावला होता. एक नपुंसक देह केवळ अंथरुणात पडला होता. ज्यात जीव तर होता, पण स्वाभिमान मात्र उरला नव्हता. रात्रभर मी हमसून हमसून अंतर्मनात रडत राहिलो. त्या अश्रूंची नोंदही देवकीने घेतली नाही. अगदी स्वस्थपणे ती झोपून राहिली. अगदी तृप्तीने. मी मात्र अशांत होत, रात्रभर अश्रू ढाळत राहिलो.”
                     
  तो बोलायचा थांबला. त्याचे डोळे पाणावले होते. मला आता त्याची कीव वाटत होती. शेवटी मीही एक पुरुषच होतो ना? त्याच्याबद्दल मला सहानुभूती वाटत होती. पण दुसऱ्याच क्षणी माझ्या मनात ते असंख्य प्रश्न उफाळून वर आले. माझे संभ्रमातले मन पुन्हा प्रेरित झाले.
     मला आता त्याचे बोलणे सहन होत नव्हते. मी आता शांत बसणार नव्हतो. हे सगळे आता माझ्या सहनशक्तीच्या बाहेरचे होते. आत्तापर्यंत तोच बोलत होता. मी ऐकत होतो. कधी आश्चर्य, उत्सुकता, विस्मयता, कणव, भीती या भावनांनी मी खळबळून जात होतो. पण आता केवळ मी बोलणार आणि तो ऐकणार. आता माझ्या हरेक प्रश्नाचे उत्तर त्याला द्यावे लागणार.
      त्याने सांगितलेल्या घटना, प्रसंग, ते त्याचे स्वप्न, त्याच्या बायकोची म्हणजे देवकीची ती घटना, त्याचा मित्र माहेश्वर हे सगळे त्याच्या सोबत घडले होते, हे मी कसे मान्य करू? मी माझ्या त्या अकरा बारा प्रकरणात त्या घटना, ते प्रसंग, ते सगळे जसेच्या तशे मांडले होते. आणि तेच प्रसंग, घटना अनुभव अगदी हुबेहूब त्याने  सांगितले होते. आम्ही आयुष्यात कधी एकमेकांना भेटलो नव्हतो. की आमचा साधा परिचय नव्हता. मग हे सगळे कसे एवढे तंतोतंत जुळून आले होते? आणि वरून तो विश्वासाने म्हणत होता की, हे सगळे त्याच्यासोबत घडले आहे, त्यात काहीएक असत्य नाही. ती सर्व वस्तुस्थिती त्याने अनुभवली आहे. हे सगळे शक्य तरी वाटते का?  मी कसा त्याच्या शब्दावर विश्वास ठेऊ. मासिकातले माझे लिखाण वाचून तो असला बनाव करत नसेल कशावरून? एवढे तंतोतंत विश्लेषण, त्याच्या बाबतीत घडलेल्या घटनांचे माझ्याकडून कसे लिहिले गेले असेल? अगदी अपरिचितपणे! अनोळखीपणे! बर तो काहीतरी बनाव करत असेल, असे गृहीत धरले तरी?  त्याच्या उजव्या दंडावरची ती पाच  सहा इंचाची जखम, त्याचा व्रण, त्याच्या सांगण्यातील तपशील. आणि तो ज्या पोटतिडकीने त्या गोष्टी सांगत होता, त्यातून तो काहीतरी बनाव करत असेल असे अजिबात वाटत नव्हते. स्वतःच्या बायकोचे असे इतर पुरुषाबरोबर फिरणे, कोण तिर्‍हाईत माणसाला सांगेल. ते पण एवढ्या सहजासहजी.
   माझा नुसता गोंधळ उडत होता. तोही काहीसा गोंधळलेला जाणवू लागला. म्हणजे मी जे लिहीत होतो, ते त्याच्या बाबतीत घडत होते. किंवा त्याच्या बाबतीत जे घडत होते, ते माझ्याकडून लिहिले जात होते. अगदी एकमेकांना काही न समजता. अगदी तटस्थ राहून. कुठल्या जणीवांनी आम्ही एकमेकांना बांधले गेलो होतो? कुठली ऊर्जा आमच्या भावनांची, विचारांची, संवेदनांची आदान प्रदान करत होती? कसल्या परस्पर संबंधांनी आम्ही दोघे बांधलो गेलो होतो? प्रश्न अनेक होते. गोंधळ पलापलाने वाढत जात होता. काही कळायला मार्गच उरला नव्हता. एक विचित्र योगायोग. छे! छे! हा योगायोग असेल कसा? हा संयोग होता. त्याचा आणि माझा. मी लिहिणार होतो. तसे तो भोगणार होता. कधी त्याने जे भोगले ते मी लिहिणार होतो. एका सहजसंयोग बंधाने आम्ही दोघे आता बांधले गेले होतो.

“ मग आता पुढे काय?”
मी त्याच्याकडे बघत त्याला प्रश्न केला.
त्याने क्षणभर माझ्याकडे पाहिले. तो जग्यावरून उठला. खिडकीजवळ गेला. तो काहीतरी विचार करत होता. त्याला काहीतरी बोलायचे होते. पण तो घुटमळत होता. बराच वेळ तो तसाच खिडकीजवळ उभा थांबला. मी त्याच्या बोलण्याची वाट बघत होतो. तो खिडकीतून दूर झाला.
    “मला तुमची मदत हवी आहे. तुमच्याकडून मला ती मिळेल अशी अपेक्षा आहे.”
थोड्याशा कातर आवाजात तो मला म्हणाला.
   “कसली मदत?”
मी काही न समजून प्रश्न केला.
“ देवकी माझी जीव की प्राण आहे. तिच्यावर माझे जीवापाड प्रेम आहे. पण या प्रेमाची तिला कदर नाही. महेश्वर तर मित्र म्हणायच्या लायकीचा नाही. दोघांनीही माझा विश्वासघात केला आहे. बाहेर कुठे तोंड दाखवायला मला आता लाज वाटत आहे. ते अस्तित्वात असेपर्यंत, मी स्वाभिमानाने जगूच शकणार नाही. मला त्यांना संपवायचे आहे. मी माझ्या हाताने त्यांना संपवले असते, पण माझ्यात तेवढी हिम्मत नाही. किंवा देवकीच्या प्रेमापोटी मी ते करूही शकणार नाही. पण तुम्ही मला मदत केली तर मी त्यांना संपवू शकेन.”
तो काहीश्या निर्धाराने म्हणाला.
 “तुझे डोके ठिकाणावर आहे का? तू काय बोलत आहेस कळतेय का तुला? एवढे मोठे पातक मी करेन असे वाटते का तुला?”
मी क्रोधाने उसळत त्याला म्हणालो.
  “हे बघा, मी तुम्हाला प्रत्यक्ष अशी मदत करा असे म्हणत नाही. फक्त तुमच्या  पुस्तकाच्या पुढच्या प्रकरणात तुमच्या कथेचा नायक त्याच्या बायकोचा आणि प्रियकराचा खून करतो असे लिहा. कदाचित त्याचा नेहमीप्रमाणे माझ्या आयुष्यावर परिणाम होऊन, मीही त्या दोघांना संपवू शकेन. ते कसे घडेल, मला माहित नाही. पण जसे मागचे प्रसंग, घटना घडल्या आहेत, तसेच हे ही घडून जाईल. फक्त माझ्यासाठी एवढे करा. तुम्हाला प्रत्यक्ष अशी मदत करा असे म्हणत नाही. पण एवढे माझ्यासाठी करा. एकतर तुमच्यावर कोणी शंका घेणार नाही. आणि दुसरे म्हणजे याचा फायदा तुम्हाला तुमच्या पुस्तकासाठी होईल. तुम्हाला हात जोडतो, माझ्यावर उपकार करा.”
  तो अगदी काकुळतीला येऊन मला विनंती करू लागला. मला खरेतर त्याचा भयंकर राग येत होता. पण का कोण जाणे मला तो राग व्यक्तच करता येईना. अगदी तो आल्यापासूनच, त्याने माझा मनोव्यापार व्यापला होता. त्याच्या बद्दल एक अनुकूल मतप्रवाह माझ्या मनात निर्माण झाला होता. मला त्याला विरोध करायचा होता, पण तो करू शकत नव्हतो. त्याच्या बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम होऊ लागला. त्याच्या गोष्टी आता मला पटू लागल्या. त्याच्या बायकोने त्याच्याबरोबर योग्य केले नव्हते. त्याच्या जागी मी जरी असतो तरी, हीच भूमिका घेतली असती. शेवटी आपली बायको, एका परपुरूषाबरोबर मोकाट फिरत असेल तर, कोणत्या पुरुषाला राग येणार नाही? तो तरी त्याला कसा अपवाद असेल? दुसरे, पुन्हा आपल्या पुस्तकाला एक वेगळेच वलय निर्माण होईल. आणि जरी उद्या काही झाले तरी, आपला अपराध तरी काय आहे हे कोणी सिद्ध करू शकणार नाही. केवळ पुस्तकात काही लिहिले म्हणजे अपराध थोडीच ठरतो? हळू हळू माझे मत परिवर्तन होत होते.
  तो आता एकदम माझी जवळ आला. माझ्या समोर हात जोडून उभा राहिला आणि मला म्हणू लागला,
   “माझी मानसिकता समजून घ्या. माझ्या जागी स्वतःला उभे करा. मग विचार करा. मग तुम्हाला माझे मत पटेल. बघा! विचार करा. मी आता निघतो. तुमचा बराच वेळ घेतला मी. पण हे सारे तुम्हाला सांगणे गरजेचे होते. एका वेगळ्या अनुभूतीचे तुम्ही रचनाकार आहात. एका वेगळ्या मितीचे तुम्ही साक्षीदार आहात. देवाने एक अनोखी देणगी तुम्हाला दिली आहे. माझा बाबतीत नक्की सकारात्मक विचार करा.”
त्याने एकवार माझ्या डोळ्यात पाहिले आणि तो जसा आला होता, तसाच परत गेला. अगदी अनाहूतपणे.
    तो गेला होता. पण माझ्यासाठी पाठीमागे असंख्य प्रश्न ठेऊन. मला कमालीच्या द्विधा अवस्थेत टाकून. मला एका मोठ्या पेचात टाकून. मला काय करावे काहीच कळत नव्हते.
  बाहेर विजांचा कडकडाट वाढला होता. ढगांची गर्जना कानात मोठेमोठे वाद्य वाजत होती. पावसाचा जोर खूप वाढला होता. भोवताल सगळा गुंतागुंतीचा बनला होता. एका बाजूला त्याची बायको, तिचा प्रियकर महेश्वर आणि दुसऱ्या बाजूला विमनस्क झालेला तो. माझा नुसता गोंधळ माजला होता. मी सुन्न, स्तब्ध झालो होतो.
   बराच वेळ निघून गेला होता. मध्यरात्र जवळ आली होती. ऑफिसात मी एकटाच होतो. एका निर्धाराने मी जागेवरून उठलो. बॅग मधून लिहायची डायरी बाहेर काढली. पेन हातात घेतला. क्षणभर डोळे मिटले. मी करत आहे ते पातक नक्कीच नाही, अशी मनाची समजूत घातली. आणि ते दोन वाक्ये तेराव्या प्रकरणाच्या सुरुवातीला लिहून टाकले
  
“आणि तो आपल्या बायकोचा आणि तिचा प्रियकर असलेल्या आपल्या मित्राचा खून करतो.”

आता रात्र संपत आली होती. पाऊसही थांबला होता. विजांचा कडकडाट देखील बंद झाला होता. सकाळ एकदम निरभ्र होती. वातावरण प्रसन्न करणारे होते. मी ऑफिसात झोपलो होतो. घरी जाण्याच्या स्थितीत नव्हतो. कारण मनावर खूप मोठे दडपण आले होते. एका जीवघेण्या अनुभवातून कालची रात्र घालवली होती. कोणी सामान्य माणूस विश्वास ठेवणार नाही अशा घटनांचा मी साक्षीदार. नव्हे! नव्हे! रचनाकार होतो. माझा मलाच स्वतावर विश्वास बसत नव्हता. पण झाले ते सगळे मी अनुभवले होते. अगदी रात्रभर. ओठातल्या ओठात एक स्मित करत मी घराची वाट धरली. आजचा सगळा दिवस झोपून काढणार होतो. सगळी मरगळ झटकून टाकणार होतो. घरी जाताना मनात एकदा त्याचा विचारही आला. काय नाव त्याचे, हो अमोघ दास. नंतर त्याचेही विचार मनातून काढून टाकले. आता काही डोक्यात आणायचे नाही, केवळ मस्त झोप काढायची.
चार पाच दिवस ओलांडले असतील. अचानक ती बातमी कानावर आली. शहराबाहेरील त्या मंदिराबाहेर दोन व्यक्तींचे मृतदेह सापडले होते. एक स्त्री आणि दुसरा पुरुष. बहुतेक त्यांची कोणीतरी हत्या केली होती. बातमी ऐकताच मी एकदम सुन्न झालो. याचे दुःख मानावे की सुख हेच कळेना गेले. मी कागदावर रेखाटलेला तो मजकूर खरा ठरला होता. त्यांचा खून झाला होता. मनात अनेक विचार येत होते. आपण योग्य केले का अयोग्य? अमोघ दास आता कुठे असेल? त्याने कसे त्यांना मारले असेल? कदाचित आपण दुसरे काही लिहिले असते तर? अशा अनेक प्रश्नांनी माझ्या मनात गर्दी केली होती.
       
मी घरात अस्वस्थपणे बसलेलो होतो. शेवटी त्याने आपल्या बायकोला आणि मित्राला संपवले होते. त्यानी प्रत्यक्ष ते काम केले होते. तरी त्या पाठीमागचा खरा सूत्रधार मीच होतो ना?  त्याला स्वतःच्या तालावर नाचवणारा, खऱ्या अर्थाने मीच होतो ना? मी जे लिहिल ते तो करत होता. उद्या मी काहीही लिहिले तरी, त्याला ते करावेच लागणार होते ना? मी त्याचा विधाताच नव्हतो झालो का? हळूहळू माझ्यातली हुकुमी जाणीव प्रबळ होऊ लागली. मला आता काहीसा आनंद वाटू लागला. काहीसे समाधान वाटू लागले. त्याची बाजूच योग्य वाटू लागली. त्याने जे केले न्यायाला धरूनच होते. माझ्या मनात आता असे उलट सुलट विचार चालूच होते. तेवढ्यात दारावर टकटक झाली. मला कसेतरी झाले. बहुधा तो असावा. हो! हो! तोच असावा. मी गडबडीने दरवाजा उघडला. दारात पोलिस उभे होते.
“तुम्हाला आमच्या बरोबर पोलिस चौकीत यावे लागेल. “      माझ्याकडे बघत ते उत्तरले. मी समोर अशे पोलिस पाहून हडबडून गेलो.
          
मी खुर्चीत बसलो होतो. मनातून खूप घाबरलो होतो. एक पोलिस जवळ आला. त्या खुनाच्या संदर्भात मला प्रश्न करण्यात आला. मी सगळ्या प्रश्नांना नकारार्थी उत्तर देऊ लागलो. शेवटी त्याने मारायची धमकी दिल्यावर, मात्र मला तोंड उघडावेच लागले.
     “त्यानेच ते खून केलेले आहेत. अमोघ दास. हा! हा! तोच. त्याने मारले आहे त्या दोघांना. मी केवळ पुस्तकात ते लिहिले. तेवढाच माझा दोष. बाकी काही नाही. त्याला पकडा! इकडे आणा! तो सगळे कबुल करेल. त्यानेच हे सगळे केले. मी ओळखेल त्याला. त्याचे नाव ही माहीत आहे मला. अमोघ दास. उंची साधारणतः माझ्याच एवढी. उजव्या दंडावर चाकूचा पाच सहा इंचाचा व्रण आहे. मृत बाई त्याची पत्नी आहे. तर मृत पुरुष त्याचा मित्र. एवढ्या ओळखीवर तुम्ही त्याला पकडू शकता. कृपया त्याला पकडा त्याला. मी तर निर्दोष आहे. मला असे इथे का पकडून ठेवता."
मी त्यांना असे सांगतच होतो की, तेवढ्यात तो मला पोलिस स्टेशनमध्ये आलेला दिसला. हो तोच! अमोघ दास. मला एकदम हायस वाटल. मी पटकन जागेवरून उठलो. त्याच्या जवळ जाऊन, त्याच्या दंडाला धरले आणि, जोरात ओरडून म्हणालो,
” हा बघा! हाच तो.अमोघ दास. यानेच केलेत हे खून"
  माझ्या अशा ओरडण्याने सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. तो पोलिस चालत माझ्याजवळ आला. आणि विचित्र नजरेने माझ्याकडे बघू लागला. मी अमोघ दासला त्याच्या अगदी समोर उभे केले, पण तरीही तो पोलिस माझ्याकडे  त्या विचित्र नजरेनेच बघत होता. आणि काही कळायच्या आत, सणकन त्या पोलिसाचा हात माझ्या गालावर पडला. मी धडपडून पाठीमागे पडलो. त्या पोलिसाने झटदिशी माझा शर्ट वर केला. माझा उजवा दंड त्याने मोकळा केला. मी दंडावर नजर टाकली. तिथे पाच सहा इंचाचा व्रण दिसत होता. माझा फोटो लावलेले ओळखपत्र त्याने माझ्या समोर धरले. त्यावर ठळक अक्षरात ‘ अमोघ दास’ असे लिहिलेले दिसत होते. त्यांनी मला त्या दोन मृतदेहाजवळ नेले. तेव्हा माझ्या देवकीचा, हो! हो! माझ्या देवकीचा! माझ्या बायकोचा, चेहरा आता सुकून गेला होता. महेश्वरचा, माझ्या मित्राचा मृतदेह पाहून मला हसायला येत होते.
     शेवटी माझे बाराच प्रकरण पूर्ण झाले होते. तेराव्या प्रकरणात केवळ ते एकच वाक्य रेखाटलेले होते.
“आणि तो आपल्या बायकोचा आणि तिचा प्रियकर असलेल्या आपल्या मित्राचा खून करतो.”

मी आता पुन्हा अमोघ दास माझ्याकडे येण्याची वाट बघत होतो. मला तुरुंगात त्याची सोबत हवी होती. पण तो येतच नव्हता. आणि आला तरी तो कोणाला दिसायचा नाही. आणि वेडे लोक म्हणायचे, मी मनाशीच बोलत असतो. एकटाच बडबड करत असतो. असो. अमोघ दास आता आला आहे. त्याच्या बरोबर मला मंथन करायचे आहे. ते तेरावे प्रकरण पूर्ण करायचे आहे.

समाप्त
वैभव देशमुख.

कथालेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Mar 2021 - 10:18 am | मुक्त विहारि

आवडले