मराठेशाहीचे अखेरचे सेनापती - बापू गोखले

kvponkshe's picture
kvponkshe in जनातलं, मनातलं
19 Feb 2021 - 11:32 pm

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नजीक तळेखाजण येथे पिरंदवणे (तळेखाजण वाडी) येथे गोखले घराणे वसले होते. लष्करी पेश्याची कोणतीही परंपरा असण्याची शक्यता नसलेल्या या घराण्यात १७७१ मधे नरहर उर्फ बापू गोखले याचा जन्म झाला. बापुंचे वडील गणेशपंत, चुलते मोरोपंत व लक्ष्मणपंत हे शेतकरीच असावेत. बापूंच्या आई विषयी माहिती मिळत नाही.पितृसहवास बापुना किती लाभला हे ही समजत नाही. मात्र चुलते धोंडोपंत आणि काकू लक्ष्मीबाई यानीच बापुना सांभाळले असावे. बापूंना महादेव (आप्पा) नावाचा एक मोठा भाऊही होता. धोंडोपंत हे विजयदुर्ग सुभ्यास गंगाधर पंत भानू याच्या कडे कामास होते. त्यावेळी विजयदुर्ग परिसरात रामोशी टोळ्या लुटालूट करीत असत. त्यंच्या तक्रारी पुण्या नाना फडनिस याच्या पर्यंत पोचल्या होत्या.  तेव्हा धोंडोपंतानी एक शिपाईतुकडी उभी करून या लुटालुटीचा बंदोबस्त केला. या कामगिरीमुळे धोंडोपंतांचे पुण्यात वजन वाढले. त्यांनी पुढे टिपू विरुद्ध श्रीरांगा पट्टण च्या लढाईत चमकदार कामगिरी बजावली (१७९२).  कदाचित बापू त्यांच्या बरोबर पुण्यास येत जात असावा. पण इतिहासात त्याचा पहिला उल्लेख १७९७मध्ये येतो. २७ ऑक्टोबर १७९५ रोजी पेशवा सवाई माधवराव याला अपघाती मृत्यू आला. त्याच बरोबर पेशवाई मिळवण्या साठी राघोबाचा मुलगा रावबाजी, अमृतराव, चिमणाजी यांच्यामध्ये साठमारी सुरु झाली. यात अखेर रावबाजी ने बाजी मारली आणि तो पेशवाई पदावर आरूढ झाला. या रावबाजीच्या एकेक करामती चर्चिण्याची   ही जागा नाही पण त्याच्या तत्कालीन धोरणांमुळे पेशव्याचे करविरकर छत्रपती, सातारकर छत्रपती, पटवर्धन याच्याशी वितुष्ट आले. हे प्रकरण इतके विकोपाला गेले की पेशवा विरुध्द सातारकर व कराविरकर , पटवर्धन विरुद्ध कराविरकर, पटवर्धन वि. सातारकर अशा यादवीचा वणवा पेटला.  आपल्याला यात फार खोलात जाण्याची जरुरी नाही. पण या लढायांमध्ये बापूनी धोंडोपंत गोखाल्यानबरोबर भाग घेतला होता हे ध्यानात घेतले की पुरे.   गोखले वि. धोंडजी वाघ: या धोंडजी वाघाचे मूळ आडनाव पवार. याच्या कोणा अज्ञात पूर्वजाने आदिलशाहास औषधासाठी वाघिणीचे दुध हवे होते म्हणून दुभती वाघीण आणून दिली. मग खुश झालेल्या आदिलशहाने त्यास "वाघ" हाच किताब दिला अशी दंत कथा आहे. तर हा धोंडजी वाघ ज्यांच्या कडे चाकरी करे त्यांनाच काही काळानंतर त्रासदायक ठरत असे . एकदा हा हैदर आली चा सरदार बनून त्याने पटवर्धनांना सळो कि पळो करून सोडले होते. हैदर च्या नंतर हा टिपूच्याच मुलुखात धाडी घालू लागला. तेव्हा टिपुने त्यास कैद केले  १७९० मध्ये परशुराम पटवर्धन याला धारवाड मधून हाकलण्याच्या बोलीवर तो सुटला आणि पुन्हा टिपू च्याच प्रदेशात धाडी घालू लागला. तेव्हा पुन्हा   १७९३ मध्ये टिपू ने त्यास कायम कैदेत टाकले. १७९९ मध्ये टिपूच्या पाडवा नंतर इतर कैद्यान्प्रमाणे त्याची सुटका झाली. पुन्हा त्याने आपले पराक्रम सुरु केले. आता त्याने पटवर्धनांचा मुलुख लुटालूटीसाठी निवडला. याच वेळी धोंडोपंत गोखले याच्याशी त्याच्या चकमकी चालू होत्या. जून १८०३ मध्ये त्याच्याशी झालेल्या हातघाईत बापूचा मोठा भाऊ आप्पा व स्वतः धोंडोपंत ठार झाले. खुद्द बापू ही जायबंदी झाला.  शेवटी १०-९-१८०० मध्ये वेलस्ली, गोखले, निझाम यांच्या संयुक्त कारवाईत धोंडजी वाघ ठार झाला. इंग्रजी फौजांशी बापुंचा पहिला परिचय इथे झाला. सन १८०१ मध्ये बापूचा पटवर्धन यांचेशी संघर्ष झाला व त्यात बापुचीच सरशी झाली .  मध्येच रावबाजीने त्याला विठोजी होळकर याचा बंदोबस्त करण्यास पाचारण केले.  ( हे विठोजी कोण वगैरे तपशील मोठा आहे तेव्हा त्याबद्दल  नंतर कधीतरी ). बापूंबरोबर पानसे , पुरंदरे यांच्याही फौजा होत्या. त्यांनी विठोजी ला पकडून पुण्यास पाठवले . पुण्यास रावबाजीने इतरांच्या सल्ल्यास न मानता विठोजीस अत्यंत क्रूर पणे ठार केले. या गोष्टीमुले भडकलेले यशवंतराव  आले.  हडपसर जवळ त्यांची पेशवे शिंदे यांच्या संयुक्त सैन्याशी गाठ पडली.  होळकरी फौजांनी संयुक्त सैन्याचा धुव्वा उडवला.  हे ऐकताच रावबाजीने मुंबईकर इंग्रजांचे पाय धरले व पुन्हा तो इंग्रजी संरक्षणाखाली पेशवाई पदावर आरूढ झाला ( वसईचा तह ). हे समजताच शिंदे, भोसले , होळकर यांनी याविरुद्ध इंग्रजाशी युध्य पुकारले (दुसरे इंग्रज मराठा युद्ध ). पण  एकीच्या अभावाने आणि वेलस्ली च्या युद्ध कौशल्यामुळे असई वगैरे ठिकाणी शिंदे भोसले यांचा पराभव झाला . त्यांना इंग्रजांनी अपमानास्पद तह करण्यास भाग पाडले. यशवंतराव होळकर यांनी मात्र  बऱ्यापैकी टक्कर दिली. पण एकट्याच्या जीवावर त्यांना इंग्रजांचा पाडाव करता आला नाही .लक्षात ठेवण्याचा मुद्दा हा की या युद्धात बापू गोखले पेशव्याच्या फौजेचे नेतृत्व करत होता . असई च्या लढाईत तो वेलेस्ली बरोबर होता. पण त्याच्या नावे कोणतीही भरीव कामगिरी उल्लेखित नाही. मात्र इंग्रजांशी लढण्याची पद्धत त्याने जवळून अनुभवली असणार.  --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- बापू वि प्रतीनिधी व ताई तेलीण:प्रतिनिधी पद:- मुळात शिवाजी  महाराजांच्या अष्ट प्रधान मंडळात प्रतिनिधी हे पद नाही . १६८९ ते १७०० या दरम्यान छ. राजाराम जिंजीस आश्रयास गेलेला असताना हे पद निर्माण करण्यात आले. राजारामच्या अनुपस्थितीत प्रतिनिधीच्या  आज्ञेत सर्वांनी राहावे व राज्य कारभार चालवावा असा संकेत ठरला . त्यामुळे प्रतिनिधी हा पेशवे व इतर मंत्र्यांच्या हि वरच्या हुद्द्याचा होता   पुढे बालाजी विश्वनाथ भट याच्या पासून पेशवेच इतके वरचढ होत गेले कि त्यांनी खुद्द छत्रपतीनाच झाकोळून टाकले. (हे चूक / बरोबर या चर्चेचे इथे प्रयोजन नाही ) .  रावबाजी चा संबंध ज्या प्रतिनिधीशी आला त्याचे नाव परशुराम पंत. हा अत्यंत हूड प्रवृत्तीचा असल्याने नाना फडणीसाने  त्याला पुण्यास आपल्या नजरेखाली ठेवले होते .१७९५ मध्ये हा परशुराम १८   वर्षाचा झाला व स्वतः काभार पाहू लागला. त्यानेच नेमलेला कारभारी बळवंतराव आणि त्याची स्वतः ची आई यांच्या सल्ल्याने कारभार चालू झाला. पण पुढे परशुरामाचे त्यांच्याशी पटेना. त्यात त्याला भांगेचे व्यसन लागले होते. स्वतःच्या लग्नाच्या २ बायकांना टाकून त्याने रमा नामक स्त्रीशी जवळीक केली होती. हीच ती ताई तेलीण म्हणून ओळखली जाते. कारभारी बळवंतराव आणि त्याची स्वतः ची आई रावबाजी कडे परशुरामाच्या तक्रारी करत असत. तेव्हा  रावबाजीने  शिंद्यांच्या मदतीने त्याच्या वाड्याला  वेढा घातला व  "कारभारी बळवंतराव आणि  आई  यांच्या आज्ञेतच राहीन" असे परशुरामाकडून वचन घेऊनच उठवला . मात्र आपले वचन  पाळले नाही व पुन्हा आपले रंग तो दाखवू लागला (१८०३). त्याला वठणीवर आणण्यासाठी पेशव्याने बापूस पाठवले.  बापूचे प्रत्यक्षात प्रतिनिधीशी काही वैयक्तिक वैर नव्हते. बहुदा नाईलाजास्तव ही  कामगिरी स्वीकारली. १८०४ ते  १८०८ अशी प्रलंबित ही कारवाई होती. १८०७ मध्ये ताई तेलीण  स्वतःची फौज जमवली व प्रतिनिधीच्या जहागिरीचे रक्षण करण्यासाठी शस्त्र उपसले. वासोटा का दुर्गम दुर्ग तिने आपली लष्करी राजधानी केला. शिवाय आजूबाजूच्या ३०-४० मैलाचा प्रदेश ही ताब्यात घेतला. बापूने तिच्या विरुद्ध मोहीम उघडली आणि वासोटा सोडून  बहुतेक सर्व प्रदेश मुक्त केला.मार्च १८०८ पासून बापूने वासोट्या वर कारवाई तीव्र केली . ती तेलीणीने कडवा प्रतिकार करीत किल्ला लढवला . अखेर उपासमारीने हतबल होऊन ३० मे १८०८ रोजी तिने शरणागती पत्करली आणि वासोटा बापूच्या ताब्यात आला . ताई  तेलीणीच्या शौर्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे.  "श्रीमंत प्रतिनिधींचा हा अजिंक्य किल्ला वासोटा ताई तेलीण मारील सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा" ही आर्या प्रसिद्धच आहे . मात्र तिची उत्पत्ती समजत नाही . या सर्व मोहिमेत बापूचे आर्थिक परिस्थिती बिकट असावी असे त्याच्या गुरूला (चिदंबर स्वामी) त्याने लिहिलेल्या पत्रावरून दिसते . पेशव्या  कडून त्याला कुठलीही मदत मिळाली नसावी. वासोट्याच्या विजयामुळे त्याच्या शिरपेचात एक विजयाची भर पडली पण बाकी फायदा काहीच झाला नाही. आता त्याला फौज ठेवण्यासाठी, लढाया करण्यासाठी पैसा किती जरूर आहे याचा धडा मिळाला. शिवाय जीत प्रदेशातील रयतेची लुट हा पैसें उभारण्याचा मार्ग नाही हे ही समजले असावे.  शेवटी बापुनेच स्वतः  जामीनकी घेऊन  पेशवा व प्रतिनिधीत  समेट घडवला . प्रतिनिधीला त्याच्या बराचसा प्रदेश परत मिळाला व त्याची कैदेतून मुक्तता झाली . एवढे होऊनही पराशुराम मध्ये विशेष फरक पडला नाही . तो शेवटी १८४८ मध्ये वारला. उत्तररंग :-बापू गोखले याच्या या संक्षिप्त चरित्राचे आता अखेरचे पर्व सुरु होत आहे. साधारण १८१० ते १८१५ या काळातील परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे. इ. १८०२ च्या वसईच्या तहाने रावबाजी इंग्रजांचा मांडलिक झाला होता. १८०५ पर्यंत शिंदे, भोसले, होळकर हे ही इंग्रजी तहात बांधले गेले  होते. सातारकर व करवीरकर छत्रपती यांची स्वतःची विशेष ताकत नव्हतीच. एकुणात आता इंग्रजां विरुद्ध १७७३ प्रमाणे मराठ्यांच्या एकजुटीची  कोणतीही शक्यता उरली नव्हती. पटवर्धन , पानसे , निपाणकर  वगैरे सरदारांशी पेशव्याचे काही न काही खटके उडालेच होते. या सरदारांकडून रावबाजी सतत कोणत्या न कोणत्या कारणाने खंडण्या उकळत असे. त्याच्या स्वतःच्या चैनी, नाद खुपच होते. त्यावर एक वेगळा लेख होइल. शेवटी वैतागून या जहागीरदारानी इंग्रजांकडे दाद मागितली. मग इंग्रजांनी १८१२ साली एक नवीन व्यवस्था अमलात आणली. त्यानुसार  या जहागिरदारांनी पेशव्याचा मान राखावा, आपल्याकडील अतिरिक्त मुलुख सोडून द्यावा वगिरे गोष्टी पाळण्याचे बंधन त्यांच्यावर आले. उलट इंग्रजांच्या परवानगी शिवाय या जहागिरदारांचे मुलुख पेशव्याने जप्त करून नयेत से बंधन पेशव्यावर आले. विशेष म्हणजे या जहागीदारां बरोबर स्वतंत्र करार  मदार करण्याची मुभा हि इंग्रजांनी घेतली. आता जवळपास सर्वच मराठा सरदारांच्या चाव्या इंग्रजांच्या हातात पडल्या. खुद्द बापुशीही राव बाजीचे वाद होते. प्रतीनिधीवरच्या कारवाईत बापूस खूप पैका मिळाला आहे अशी त्याची समजूत होती. त्याच्या वसुली वरून हा वाद होता. याच सुमारास रावबाजीस अजून एक अवलिया इसम भेटला . त्याचे नाव त्रिम्बकजी  डेंगळे.हा इंग्रजांचा कट्टर द्वेष्टा होता. १८१२ साली पेशव्याने बापूस नवीन सरंजाम दिला व विशेष अधिकार दिले. इंग्रजांच्या कॅप्टन फोर्ड नावाच्या अधिकाऱ्या खाली एक कवायती पलटण ही उभी केली. कदाचित इंग्रजांशी आज न उद्या आपले वाकडे येणार याची त्याला कल्पना आतापर्यंत आली असावी. ( प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी १८१७ साली मात्र कॅप्टन फोर्ड व ही  पलटण इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली ) .अहमदाबाद च्या वसुलीवरून रावबजीचे  गायकवाड याच्याशी मतभेद होते. त्या व इतर काही व्यवहारातून पेशवा गायकवाडांकडे सुमारे अर्धा कोट रुपये मागत होता. त्या संबंधाने बोलणी करण्यासाठी गायकवाड यांकडून गंगाधर शास्त्री हा माणूस पुण्यास आला होता. हा इंग्रजांचा खास इसम होता. तर या गंगाधर शास्त्र्याचा २७ जुलै १८१५ रोजी पंढरपूर येथे खून झाला. यामागे त्रिम्बकजी व पेशवा आहे अशी इंग्रजांची खात्री होती. पण रावबाजी ला थेट आरोपी न ठरवता इंग्रजांनी त्याच्या कडे  त्रिम्बकजीला ताब्यात देण्याची मागणी केली. रावबाजीने बरीच चाल ढकल करून पहिली. इंग्रज ऐकेनात तेव्हा तो युद्धाची भाषा करू लागला. एल्पिस्टन ने शिरूर वरून इंग्रजी फौज मागवाली. मग मात्र पेशव्याचे धाबे दणाणले व त्रिम्बकजीला इंग्रजी हातात सोपवण्यात आले. याच नंतर बहुदा रावबाजीने इंग्रजां विरुद्ध युद्धाची तयार सुरु केली. त्याने बापूस ५००० ची नवीन फौज उभारण्यास सांगितले . अंतिम युद्धाच्या वेळी बापूला सेनापती बनवण्याचे ही त्याने ठरवले . प्रत्यक्ष लढाईला तोंड लागले तेव्हा पुण्यात किमान पेशव्याची ३००००-४०००० फौज होती . यावरून बापूने चोख कामगिरी केल्याचे दिसते.  रावबाजी मध्ये स्वतः कोणतेही युद्ध कौशल्ये  नव्हती. तो सर्वस्वी बापूवर अवलंबून होता. १८१६ मध्ये ठाण्याच्या तुरुंगातून त्रिम्बक जी पळाला. त्यामागेही पेशावाच आहे अशी इंग्रजांची खात्री होती . पुन्हा इंग्रजांनी रावबाजी कडे त्रिम्बक जी साठी तगादा लावला. रावबाजीने हि शिंदे, होळकर , छत्रपती याच्याशी संधान बांधले . बापुनेही पटवर्धन, रास्ते, विंचूरकर याच्या मदतीने फौजा उभ्या केल्या. आता पेशावाही त्याला पैसे पुरवत होता . याचवेळी पेंढारी टोळ्या इंग्रजांना सतावत होत्या. हे पेंढारी म्हणजे पूर्ण प्रशिक्षित सैनिक नसत. यांना सरकारकडून पगार नसे, मात्र शत्रूच्या प्रदेशात खंडणी वसूल करताना तिच्यापैकी कांही ठराविक भाग यांना मिळे. शत्रूची धान्यसामुग्री लुटणे व त्यांच्या देशाची खराबी करणे हे काम यांच्याकडे असे. हे घोडेस्वार असून यांचे घोडे फार चपळ असत. यांच्या वेगवेगळ्या टोळ्या असत व त्यांचे वेगळे  नायक ही असत. १८१६ पर्यंत अनेक सरदारांनी , संस्थानिकांनी आपले संरक्षण इंग्रजांकडे सोपवले होते. (याला तैनाती फौजेचा करार म्हणून ओळखले जाते).  त्यामुळे  त्यांच्या मुळच्या सैन्यातील सैनिकांना एकतर इंग्रजांकडे नोकरी पत्करावी लागे वा ते पेंढारी पथकात सामील होत. १८१० च्या दशकात या पेंढार्यां पृथक पृथक टोळ्या होत्या व त्यांचा वेगळा नेता असे. (उदा . मीरखान  वगैरे). त्यांनी मध्यप्रांत, माळवा, गुजराथ, महाराष्ट्र, मद्रास, बिहार वगैरे प्रांतात धुमाकूळ घातला. स्वत:चे स्वातंत्र्य नष्ट झाल्यामुळे रुष्ट झालेले बरेचसे संस्थानिक त्यांना आंतून मदत करीत. इंग्रजांच्या किरकोळ बंदोबस्ताने काही काम भागेना. म्हणून त्यांनी पेशवे शिंदे आदी सरदारांकडे मदत मागितली. रावबाजीने या संधीचा उपयोग सैन्य उभारणी साठी करत होता.  इंग्रजही काही भोळसट नव्हते.  या कार्यक्रमाचा अर्थ त्यांच्या ही लक्षात आला होता. बाळाजी नातू, मोरोपंत दिक्षित हे पक्षपाती पेशव्याच्या हालचाली एल्पिस्टन ला कळवत असत. उलट इंग्रजांकडील बातम्या रावबाजी ला समजत नसत. त्याने नेमलेले जासूस इंग्रजासच फितूर होत. त्रिम्बकजी वरून पेशवे इंग्रज संबध विकोपास गेले होते. रावबाजी वरवर पेंधाऱ्या विरुद्ध फौज उभी करत आहे पण आतून त्यांनाच सामील आहे असा त्यांचा  पक्का समज होता . १८१६ च्या शेवटी संघर्ष अटळ आहे हे दोन्ही बाजूना कळून चुकले. पेशवा मात्र संभ्रमात असावा. त्याची शिंदे,  होळकर , बापू आदी लोकांशी मसलती चालू होत्या. पण बापू सोडला तर इंग्रजांविरुद्ध समशेरीस हात लावण्याची भाषा कुणी करेना. बहुतेक सरदारांचे मत शिंदे,  भोसले  आणि इतर सरदार यांच्या फौजा एक करून इंग्रज मारावा असे होते. पण बापूला १८०२ चा अनुभव होता. त्यावेळीही मराठे एकत्र आले नव्हते व हरले होते . १६ मे १८१७ रोजी गवर्नर जनरल लॉर्ड हेस्टींग याने बाजीरावाचे सारेच राज्य खालसा करण्याचा ठराव केला.  १८१७ च्या सप्टेंबर मध्ये पुण्यात बापुशी पर्यायाने पेशव्याशी एकनिष्ठ  अशी किमान ३० ते ४०००० फौज जमा होऊ लागली होती. त्या फौजेत अरब ,गोसावी, पेंढारी आदींचे सैन्य ही होते. पानसे यांचा तोफखाना ही  होता. इंग्रजाच्या कडे जेमतेम  २००० घोडदल , १००० पायदळ , ८ तोफा होत्या .(यात पूर्व उल्लेखित फोर्ड ची पलटण समाविष्ट आहे) .   मुंबई व शिरूर येथून ही फौजा येणार होत्या . १९ ऑक्टोबर १८१७ रोजी पुण्यात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला . पुण्यात जमलेल्या सैन्याची थाटात संचलने झाली. बापू आता आता रावबाजी कडे हल्ल्याची परवानगी मागत होता. मुंबई आणि शिरूर च्या इंग्रजी फौजा पुण्याच्या फौजांना मिळण्यापूर्वीच हल्ल्याचा त्याचा डाव होता. २८ ऑक्टोबर ला पुन्हा त्याने हल्ल्याची परवानगी मागितली. पण का कुणास ठाव, ती मिळाली नाही . रावबाजी आपल्या मतावर ठाम नसावा. रेसिडन्सी भोवती आता मराठा सैन्याचा विळखा आवळत चालला होता. याच दरम्यान हल्ल्यासाठी गारपिरा पर्यंत गेलेले सैन्य निशाणाची काठी मोडली हा अपशकुन झाला म्हणून परत आले असा उल्लेख आहे .(छ. प्रताप सिंह आणि रंगो  बापुजी - ठाकरे). जर २८ ऑक्टोबर लाच हल्ला झाला असता तर कदाचित इतिहास बदलला असता  काय? … उत्तर कठीण आहे . किमान एल्पिस्तन हातात आला असता तरी मराठ्याचे पारडे जड झाले असते. काही असो पण एक सुवर्ण संधी नक्कीच निसटली. ३० ऑक्टो रोजी मुंबईची इंग्रजी पलटण  खडकीस पोचली . पुढील ४ दिवस असेच तणावात गेले. २ नोव्हेंबर रोजी गणेश खिंडीत पेशव्याच्या विश्राम्सिंग नामक नाईकाची ले.Shaw याच्याशी बाचाबाची झाली आणि विश्राम सिंगने त्यास भाल्याने जखमी केले.  गारपिरावरही  ( सध्याचे ससून हॉस्पिटल परिसर) बापूच्या सरदार खान नामक सरदाराने इंग्रजांची कुरापत काढली .  (एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. पेशव्या कडे पाऊण लाखाच्या आसपास सैन्य होते. जरी हा आकडा अतिशायोक्तीने प्रभावित धरला तरी किमान ३०-४०००० फौज नक्कीच होती. उलट इंग्रजांकडे ५-६००० पेक्षा  अधिक फौज नव्हती. आपल्या सेना सागराच्या बळावर टीचभर इंग्रजी फौज पाल्या पाचोळ्या सारखी उडवून लाऊ अश्या भ्रमात जर बापू असेल तर त्याला इंग्रजांच्या युद्ध पद्धतीबाबत ज्ञान नव्हते असे म्हणावे लागेल. बापु हा असाई च्या लढाईत वेलस्ली बरोबर होता. त्यावेळीही भोसले,  शिंदे यांच्या ३०००० पेक्षा अधिक सैन्याचा ७०००-८००० इंग्रजी कवायती फौजांनी धुव्वा उडवताना त्याने पहिले होते . "बाळाजी विश्वनाथाचे पुण्य तुम्हास तारो ………" युध्य करावे की  नाही या हॅम्लेटी मनस्थिती मधून बाहेर पडून अखेर रावबाजीने युद्धाचा निर्णय घेतला व बापूला हल्ल्याची परवानगी दिली . ५ नोहेम्बेर रोजी बापूने  पेशव्याच्या पायावर डोके ठेवले व रावबाजीनेही  त्याला "बाळाजी विश्वनाथाचे पुण्य तुम्हास तारो"  आशीर्वाद दिला. पेशव्यांनी युद्ध नेतृत्व करण्याचे दिवस केव्हाच संपले होते . बापू सेनापती होता आणि तोच लढाईचे नेतृत्व करणार होता. पेशवा स्वतः पर्वतीवर आला आणि तेथून लढाई "पाहणार" होता. युद्ध क्षेत्र साधारणतः आजचा खडकी दापोडीचा परिसर, आत्ताचा पुणे विद्यापीठ परिसर, औंध, गणेश खिंड गारपीर (ससून रुग्णालय परिसर, संगम परिसर(सध्याचा होळकर पूल ?) असे होते . मराठा डावी बाजू  मोरो दिक्षित आणि रास्ते , तर मराठा उजवी बाजू (बहुदा संगम परिसर) विंचूरकर सांभाळत होते. मध्यभागी बापू स्वतः होता. एकुणात २०००० घोडदळ , ८००० प्यादे, २० तोफा अशी फौज होती (Battles of the Honorable East India Company). पर्वतीवर ५००० घोडदळ आणि २००० पायदळ होते. राखीव सैन्य नाहीच. एल्पिस्तन खडकीवरून संगमावर आला होता. पण एकंदर राग रंग पाहून पुन्हा खडकीस गेला. त्याचा मेणा विंचूरकर सहज अडवू शकत होते पण तसे घडले नाही. यावर विंचूरकरांवर काही ठिकाणी आरोप ठेवला गेलाय. (सहज म्हणून सांगायला हरकत नाही - पानिपत मध्ये ही  गोल मोडल्याचा आक्षेप विठ्ठल शिवदेव आणि दामाजी गायकवाड यांवर ठेवला जातो ) . खरे काय माहित नाही पण एल्पिस्तन निसटला. ५ नोव्हें. ला दुपारी ३ वाजता मराठ्यांनि रेसिडन्सी वर हल्ला केला व ती जाळून टाकली. मध्यावर तोफांची गोळाबारी आधीच सुरु झाली होती. उजवीकडून मोरोदिक्षित कॅ.फोर्ड च्या पलटणीस भिडले. तत्पूर्वी त्यांची बापुशी वादा वादी झाली होती. रागाच्या भरात मोरो दिक्षित इंग्रजी फौजांना भिडला व तोफेच्या माऱ्यात सापडून ठार झाला. नेतृत्वहीन मराठा ( लेफ्ट ) फौज  मागे हटली. मध्यावर बापू त्याच्या घोडदळानीशी इंग्रजांवर चालून गेला. इंग्रजी फौजा बंदुकांचा शिस्तबद्ध मारा करीत पुढे येऊ लागल्या. बापूच्या घोड्याला गोळी लागून घोडा मेला. काही काल बापू दिसेनासा झाल्यावर मराठा आक्रमणात  गोंधळ उडाला. त्यामुळे कवायती पलटणी वर जो घोडदळाचा तगडा प्रहार व्हायला हवा होता तसा झाला नाही. इंग्रजी पलटणी बंदुकांचा शिस्तबद्ध मारा करीत पुढे येऊ लागल्या तसे मराठी सैन्यात जे बुणगे होते  दणाणले व ते पळू लागले. पळणाऱ्या मराठा लोकांवर इंग्रजी तोफांनी भडीमार केला व बरेच नुकसान केले. रात्री पर्यंत खडकी व दापोडी येथील इंग्रजी फौज एकत्र झाली. मात्र त्यांनी मराठा फौजांचा पाठलाग सोडून दिला.  या लढाईत मराठ्यांची जीवित हानी इंग्रजांपेक्षा अधिक झाली . या परीस्थितीत लढाई सुरु ठेवणे जरुर होते . मात्र रावबाजीने पुन्हा अवसानघातकी पण केला व लढाई थांबावयाचे आदेश दिले. बहुदा एकूण राग रंग पाहून तो पुरांदारावर जायला निघाला होता. पण बापूने त्यास थांबवून घेतले असावे. यानंतर ६ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर मध्ये काय झाले ते समजत नाही . पण १३ रोजी एक मोठी चकमक झाली . पुण्यात अजूनही फार इंग्रजी फौज  नव्हती . पण मराठा सैन्याकडून हा वेळ वय घालवला गेला .  ८ तारखेस जालन्यावरून जनरल स्मिथ पुण्यास निघाला व १५ रोजी घोरपडी येथे येउन ठेपला. त्यास रोखावायास गेलेल्या मराठा फौजा परास्त होऊन परत आल्या होत्या. १६ तारखेस बापूने येरवडा , घोरपडी येथे पुन्हा लढाई सुरु केली  यावेळी बाजीराव व चिमाजी हे युद्धभूवर हजार होते.  बापूने सुरुवातीस इंग्रजास दमवले. पण संगमावर विन्चुरकारांच्या देखत इंग्रजांनी पेशव्याच्या तोफा ताब्यात घेतल्या  व मराठा फौजांवर जोरात डागल्या.  ( विंचूरकर यांची ही भूमिका एक वेगळा संशोधनाचा विषय होईल. पण आता नको). मराठा फौजा आता पळ काढू लागल्या होत्या. त्यांच्यातील नंग्या गोसावी सैन्यांनी मात्र पराक्रमाची शर्थ केली. पण त्यांना कोणाची साथ  मिळाली नाही. रावबाजीने चिमणाजी च्या विरोधाला न जुमानता धूम ठोकली आणि उरली सुरली फौजही मग पळू लागली लागली. रावबाजी जो पळाला तो सासवड कडे गेला. ज्या शनिवार वाड्यातून जवळपास सर्व हिंदुस्थान चा कारभार चाले, ज्या शनिवार वाड्यातून विजयाच्या साठी आतुर मराठे मोहिमेस निघत त्याच शनिवार वाड्यावर इंग्रजी निशाण चढवायचे "भाग्य" बालाजी पंत नातू यास लाभले. १७ नोव्हेंबर १८१७ या दिवशी पुणे हि मराठ्यांची तत्कालीन राजधानी विना प्रतिकार इंग्रजी हातात पडली.---------------------------------------------------------------------------------------------------"………. त्यापेक्षा युद्धामध्ये सरकार कामावर आल्यास श्रेयस्कर" यापुढील कहाणी ही रावबाजीच्या पळाची आणि मराठेशाहीच्या अस्ताची कहाणी आहे. ***या पळाबद्दल आठवले यांनी बापूस थोडे कारणीभूत मानले आहे. लढाईच्या सुरुवातीपासून बाजीरावास  ताब्यात घेणे हेच इंग्रजांचे उद्दिष्ट  आणि पळापळी करावी लागली तरी पेशवा इंग्रजी हातात पडू  द्यायचा नाही असे बापूचे उद्दिष्ट असे ते म्हणतात ****येरवडा येथून रावबाजी सासवडास  गेला . त्याचा पलायन मार्ग खालील प्रमाणे :-येरवडा (पुणे) -> सासवड   -> जेजुरी -> पाडळी -> माहुली -> पुसे सावली - > मिरज  -> ***(गोकाक कडे जात असताना कर्नाटक मधून इंग्रजी फौज आल्याची चूल लागल्याने पुन्हा)***-> माहुली  -> ->पंढरपूर -> सिद्धटेक ***(वासोट्या वरून आणविले गेलेले छत्रपती प्रतापसिंह येथेच त्यांना सामील झाले )*** -> ? - > ? -> नगर ->संगमनेर ->ओतूर -> ब्राह्मणवाडा ***( येथे  बापूंचा मुलगा गोविंदराव तापाने वारला . तो क्षयाने आजारी होता . त्याची पत्नी राधाबाई सती गेली. ) **** - > शिरूर ( कडून पुन्हा पुण्याकडे) -> कोरेगाव भीमा ***( येथे कोरेगाव भीमा ची लढाई झाली )*** -> फुलगाव -->  साताऱ्या कडे - > ? -?-गोपाळ आष्टी ( सोलापूर च्या वायव्येस ) (फेब्रुवारी १८१८).  झुकांड्या  देणे म्हणजे काय हे जर पाहायचे असेल तर इच्छुकांनी वरील मार्ग नकाश्यावर रेखाटून पहा !!!!! वरील प्रमाणे पळत पळत पेशवा १५ फेब्रुवारी चा आसपास गोपाल आष्टी च्या मुक्कामी आला. पेशवा पुढे पळे आणि बापू मागून इंग्रजी फौजांना रोखून धरे. गोपाल आष्टी ला बापू व उरली सुरली मराठा फौज, छत्रपती प्रतापसिंह व त्यांचे कुटुंबीय, स्वत पेशवा, बापुची पत्नी यमुनाबाई वगिरे लोक एकत्र होते. इंग्रजी फौजा पाठीवरच होत्या. जनरल  स्मिथ जवळच वेळापूर येथे पोहोचल्याची बातमी बापूस लागली आणि म्हणून त्याने पेशव्यास  मुक्काम हलवण्याचा सल्ला दिला. मात्र आप्पा देसाई निपानकर याने ही बातमी खोटी असल्याची खात्री रावबाजीस दिली. सध्या पेशव्याची बापूवर गैरमर्जी झाली होती आणि हा आप्पा त्याचा लाडका झाला होता. २० फेब्रुवारी ला जनरल स्मिथ चा छावणीवर हल्ला झाला. रावबाजी यावेळी भोजनास बसला होता . त्याने पेशव्यास ‘‘श्रीमंत, इंग्रज जवळ आले आहेत. आता आपण पळू नये. आमच्या मागे जरा ठासून उभे रहाल, तर तरवारीची शर्थ करून त्यांना पुरे पडतो.’’ असे सांगितले.** रंगो बापुजी -ठाकरे ***तेव्हा रावबाजी खवळून बोलीला की "आजवर तुम्ही लढाईची मसलत दिलीत आणि आता आम्हाला सुखाने जेऊनसुद्धा देत नाही. असेच आमचे संरक्षण करणार की काय?’’  यावर आता "कोण येवो व न येवो मी आज आत्ता लढाई देणार" असे सांगोन बापू निघून गेले व इंग्रजी फौजांसमोर उभे ठाकले . त्यावेळी त्यांच्या बरोबर ५० एक असामी असावेत. गदारोळ सुरु झाला.  लढता लढता बापू व स्मिथ समोरासमोर आले. बापू गोखले म्हणतात तो मी असे बोलत स्मिथ वर त्यांनी समशेर  चालवली. त्याचा मानेवर जखम झाली.असे मराठी बखर सांगते. स्मिथने ही "जनरल तो मी " म्हणत पिस्तोल चालवली. बापूला दोन गोळ्या लागल्या. कुण्याचा तरी (स्मिथच्या ?)समशेरीने त्यांच्या डोक्यावर वार  झाला व तेथेच ते ठार झाले . (मराठी बखर) ."ते गर्दीत मिसळले आणि त्यांची अखेरी झाली ते ईश्वर जाणे " असे पाच्छापूर बखर सांगते .काही असो , या लढाईत बापूचा अंत झाला हे नक्की .  लढाई सुरु होताच पेशवा पळाला  होता आणि छत्रपतीना ही पळण्यास सांगत होता . पूर्व नियोजानंसार छ   प्रतापसिंह इंग्रजांना येथे सामील झाला . इतक्यात दोन डोल्या आल्या. एकींत गोखल्यांकडील अंताजीपंत हजीरनीरा जखमी होते. आणि दुसरीत बापू गोखले यांचे कलेवर  होते. त्यास मल्हार चिटणिसाने ओळखले. ‘फक्त आंगरखा मलमलीचा आंगात उरला होता. घोड्यांनी तुडविले. त्याणी पायाचे कातडे गेले होते. दोन जखमा होत्या.’’(-रंगो बापुजी - ठाकरे ). त्या रात्रीच बापूवर अंत्यसंस्कार करण्यात आले .  बापूंची पत्नी यमुनाबाई ही  पण गोपाल आष्टीलाच होती . पण आश्चर्य कारक रित्या तिला बापूंच्या पार्थिवाचे दर्शन घडले नसावे असे दिसते. त्यामुळे तीचा त्यांच्या निधनावर विश्वास बसला नाही. पुढे त्यावर चर्चा झाली आणि तत्कालीन शास्त्रानुसार तिला पुढील  २४ वर्षे सौभाग्य वती म्हणून राहण्यास मान्यता दिली गेली. काही वर्षे ती सातारा येथील वडूज,सासवड वगैरे ठिकाणी राहिली. पण नंतर पेशवे हे बिठूर ला होते तेथे जाऊन राहिली आणि  १८४१ साली (२० फेब्रुवारी १८४२ पूर्वीच ) ती वारली आणि विधवा होण्या पासून वाचली. अखेर धर्माशास्त्रा पेक्शा मृत्यू जास्त कनवाळू निघाला.  बापूंचे कोणी वंशज आहेत का, असले तर कुठे , त्यांच्या पुण्यातील वाड्याचे काय झाले हे मला समजले नाही . लढाईच्या आधी इंग्रजांनी त्यास फोडण्याचा प्रयत्न केला होता .पण  बापूने '' चाकरीवर प्राण गेला तर चिंता नाही . सरकारची (पेशव्याची ) तनाखोरी केल्यास तूर्त दौलत आपण (इंग्रज) देतील ।पन हे कर्म आपल्याने होणार नाही … त्यापेक्षा युद्धामध्ये सरकार कामावर आल्यास श्रेयस्कर " असा जबाब दिला .  त्यांच्या खात्यात जसे  छोट्या मोठ्या बंडवाल्याच्या विरुध्द चे यश जमा आहे तसेच खडकी ,येरवडा वगैरे ठिकाणी झालेले पराभव ही आहेत . त्यांच्या युद्ध कौशल्यावर कदाचित कोणी प्रशचिन्ह उभे करतील …………… पण त्याच्या शौर्याबाबत मात्र कोणतीही शंका -प्रश्न उद्भवत नाही हे नक्की !!!!!!!!! संदर्भ :-१. सरदार बापू गोखले -आठवले २. प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी -प्रबोधनकार ठाकरे ३. पेशवा बाजीराव दुसरा - पुराणिक ४. Battles of the honorable east India company-Nanaware5.few web source .  

इतिहासलेख

प्रतिक्रिया

दिगोचि's picture

20 Feb 2021 - 4:18 am | दिगोचि

कोणा एका कवीने बापुवर एक विनोदी कडवे लिहिले ते असे: श्रीमन्त पन्तप्रतिनिधी यान्चा किल्ला अजिन्क्य वासोटा. तेलीण मारील सोटा बापु गोखल्या सम्भाळ कासोटा. हा वासोटा किल्ला जिन्कायला कठीण आणि ताई तेलीण त्याची किल्लेदार होती. यामागची कहाणी माहित नाही कोणाला माहित असेल तर येथे लिहावे. बापूना हे कडवे ऐकवल्यावर ते हसले होते.

हिंदू धर्मात एकी नाही.

Rajesh188's picture

20 Feb 2021 - 7:24 am | Rajesh188

काही तरी कारण असतील ना.

मुक्त विहारि's picture

20 Feb 2021 - 7:39 am | मुक्त विहारि

सापडतील .....

चौकटराजा's picture

20 Feb 2021 - 10:08 am | चौकटराजा

हिंदू धर्मात ( संस्कृती ) मध्ये वर्ण व्यवस्था ,त्यात पुन्हा उतरंड असलेली जाती व्यवस्था यामुळे एकी कमीच पण एकी नसणे हे केवळ संपत्ती ,स्वार्थ या साठी घडते असे नाही तर अहंकार या माणसाचा सर्वात मोठा विशेष ( मी त्याला शत्रू असे संबोधणार नाही ! ) असल्यामुळेही ही ! सबब कॅथॉलिक विरुद्ध प्रोटेस्टंट असाही संघर्ष इतिहासात पाह्यला मिळतो तसा इराक इराण असाही !

चलत मुसाफिर's picture

20 Feb 2021 - 7:21 pm | चलत मुसाफिर

वाचताना खूप मजा आली. फक्त एका जागी सनावळींचा गोंधळ आहे. वाघ- गोखले चकमक 1803 साली झाली, आणि पुढच्याच वाक्यात 1800 साली वाघ हा मारला गेला, असे आले आहे. दुरुस्ती व्हावी.