शके १८०५ च्या पौष शु.११ रोजी थोर पुरुष, उत्कृष्ट वक्ते, श्रेष्ठ कार्यकर्ते आणि विख्यात लोकसेवक केशवचंद्र सेन यांचे निधन झाले.
यांचे घराणे कट्टे बंगाली वैष्णव होते; यांच्या आजाचे नांव रामकमल असून प्यारीमोहन व शारदासुंदरी ही यांच्या मातापितरांची नावे होती. शाळेत असतांना बायबलाच्या वाचनाचा परिणाम यांच्या मनावर विशेष झाला आणि सन १८५७ मध्ये कुलामध्ये रूढ असणाऱ्या वैष्णव सांप्रदायाची दीक्षा न घेतां ब्राह्मसमाजाची त्यांनी दीक्षा घेतली आणि या कार्यासाटीं स्वतःला वाहून घेतले व 'इंडियन मिरर' नांवाचे इंग्रजी साप्ताहिक सुरू केले. सन १८६४ मध्ये त्यांनी प्रचारासाठी मुंबई-मद्रासकडे जो दौरा काढला तो त्यांच्या प्रभावी इंग्रजी वक्तृत्वाने फार यशस्वी झाला; परंतु शेवटी मतभेद झाल्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे 'भारतवर्षीय ब्राह्मसमाज' नांवाची संस्था सन १८६६ मध्ये काढली. त्यानंतर ते इंग्लंडमध्ये गेले. तेथे त्यांचा समाजसुधारक म्हणून अत्यंत गौरव झाला. तेथून परत मायदेशी आल्यावर समाज सुधारण्यासाठी त्यांनी अनेक संस्था काढल्या. 'सुलभ समाचार' यासारखी नियतकालिके त्यांनी काढली. शेवटी काही खाजगी गोष्टींवरून यांचे सहकारी फुटून दूर निघाले. त्यांनी केशवचंद्रावर टीकेचा गहजब केला.
या सर्वांचा परिणाम त्यांच्यावर झाला; आणि त्रस्त झालेल्या मनात विश्रांति मिळावी म्हणून यांनी ध्यानधारणेसाठी 'साधनकानन' नावाची बाग तयार केली, परंतु येथेंहि त्यांना म्हणावी अशी शांति लाभली नाही. यांच्या परिवारांतील लोकांनी स्वतंत्रपणे 'साधारण ब्राह्मसमाज' काढला. त्यामुळे यांच्या मनावर चमत्कारिक परिणाम झाला. तेव्हां यांनी 'नवविधान' नावाच्या पंथाची स्थापना केली. " यांच्याइतका प्रचंड व्याप करणारा, रोज नव्या कल्पना काढणारा, नव्या संस्था काढून त्यांच्याकडून कामे करून घेणारा समाजसुधारक अलीकडच्या काळांत क्वचितच सांपडेल.” जीवनवेद (आत्मचरित्र) व ब्राह्मधर्माधिष्ठान हे यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ होत.
-८ जानेवारी १८८४