खेडवरून बाबांची बदली बत्तीस शिराळ्याला झाली. शिराळा हे त्या मानाने लहान गाव असल्याने बाबांनी इस्लामपूरला बिऱ्हाड करायचे ठरवले. मला कळणाऱ्या वयातील ही पहिली बदली म्हणू शकू. तशी आमची मानसिक तयारी असायची की साधारण ३-४ वर्षे झाली की नवीन जागी बाडबिस्तरा हलवायचा. पण लहान असले तरी पुण्याजवळच्या गावातून लांब अश्या सांगली जिल्ह्यात आमचा मुक्काम हालला. इस्लामपूरला आलो तेव्हा मात्र मनाची हीच तयारी होती की जास्तीत जास्त एक वर्ष राहायचे आणि मग पुण्याला स्वतःच्या घरी कायमचे राहायला जायचे.
इस्लामपूर हे वाळवा तालुक्यातील एक गाव. पण तरी वाळव्यापेक्षा बरेच मोठे गाव आहे. आमचा इस्लामपूरला जेमतेम १० महिन्यांचा मुक्काम होता. त्यामुळे तिथल्या माझ्या आठवणी फारच मर्यादित स्वरूपाच्या आहेत. पण बाबांबरोबर जी फिरस्ती झाली त्यातला हा एक टप्पा होता. आणि आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, जागा काही कारणाने आणि आपलं परस्परांप्रती काही देणे असते म्हणून येतात. तसाच आमच्या आयुष्यातील इस्लामपूरचा टप्पा.
आईबाबांनी आधीच येऊन एक घर भाड्याने घेतले. जराशी गावाबाहेर असलेली ती बंगल्यांची कॉलनी होती. त्या कॉलनीमधला दादांचा प्रशस्त बंगला आणि त्यातला एक फ्लॅटसारखा भाग आम्हाला भाड्याने मिळालेला. दादा म्हणजे राजकारणातले एक मोठे प्रस्थ होते. बहुतेक त्या कॉलनीमधला तो सर्वात मोठा बंगला असेल. मुख्य गेटमधून आत चालत येताना डाव्या हाताला मोठी बाग होती. बागेत बरीच झाडे होती. त्यातल्या त्यात केळाची झाडे मला आठवत आहेत. तर उजव्या हाताला एक आऊटहाऊस होते. त्यांच्याकडे काम करणाऱ्यांसाठी राहायला.
गेटमधून साधारण ३०-४० फूट आत आल्यावर बंगल्यात प्रवेश. खालचा संपूर्ण मजला त्यांच्याकडे होता. आणि वरच्या मजल्यावर २ फ्लॅटसारखी स्वतंत्र घरे होती. दादांचं खालच्या मजल्यावरचं घर म्हणजे २ प्रचंड मोठे हॉल, मोठे स्वयंपाकघर, स्वतंत्र डायनिंग हॉल, एक गेस्टरूम आणि ३ बेडरूम्स आणि एका हॉलला लागून रक बंदिस्त व्हरांडा. दोन हॉलपैकी एक हॉल खास त्यांच्या राजकीय भेटीगाठींसाठी होता. मग वरच्या मजल्यावर २ बेडरूम, हॉल, किचनचे दोन स्वतंत्र फ्लॅट. त्यातला एक आम्हाला भाड्याने मिळाला होता. आमच्या फ्लॅटला खूप मोठी गच्ची होती. कारण त्या गच्चीखाली त्यांचा एक मोठा हॉल होता. आमच्या घराचे स्वयंपाकघर खूपच मोठे होते. स्वयंपाकघराला लागून एक बाल्कनी होती. आणि आतल्या एका बेडरूमला जोडून अजून एक बाल्कनी होती. मला सुरुवातीचे काही दिवस तर घरातल्या घरात हरवायला व्हायचं. हे फार हास्यास्पद वाटेल पण खरंच मला कुठून कुठे गेलो म्हणजे घराबाहेर पडू किंवा आतल्या खोलीत जाऊ हे कळायचेच नाही.
दादांचं कुटुंब म्हणजे चार मुलगे, चार सुना आणि ५ नातवंडे. एक लग्न झालेली मुलगी देखील होती. त्यांची नातवंडे साधारण ५-६ वर्षांची आणि त्या खालील वयाची होती. पण स्वतःला संबोधताना 'आम्ही' असं संबोधत असत. त्या लहान लहान मुलांची नावं पण युवराज, हर्षवर्धन अशी भारदस्त होती. आम्हाला फार गंमत वाटायची. दादांची बायको म्हणजे घरमालकीणबाईंना दादीमाँ सगळे म्हणायचे. दादीमाँ, त्यांच्या सुना अश्या सगळ्यांच्या डोक्यावरून पदर असायचा. (खेडला आमचे घरमालक मारवाडी होते आणि त्यांच्या घरातील बायका पण डोक्यावरून पदर घेत असत. पण हे वातावरण वेगळं होतं.) आम्ही पहिल्या दिवशी तिथे पोचलो तेव्हा त्यांनी आम्हाला जेवायला बोलावले होते.
इस्लामपूरला आलो तेव्हा माझी सर्वात मोठी बहीण बारावीला, मधली बहीण नववीला, भाऊ आठवीला आणि मी पाचवीला असे होतो. आमच्या शाळा-कॉलेजच्या प्रवेशाचे पण काम केले होते. आम्हा शाळेत जाणाऱ्या भावंडांना इस्लामपूर हायस्कूल, इस्लामपूर मध्ये प्रवेश मिळाला होता. मला ५वी अ तुकडीत प्रवेश मिळाला होता. आम्ही साधारण शनिवारी वगैरे तिकडे पोचलो असू. त्यामुळे रविवारी शाळेला जायचा रस्ता, शाळेतला वर्ग कुठे आहे हे बघायला गेलो. शाळेची इमारत कशी तर उलट्या U सारखी, एकमजली आणि वर कौलं असलेली. पूर्ण शाळेत चक्कर मारली पण ५वी अ चा वर्ग काही कुठे सापडेना. ५वी ब चा वर्ग दिसला तो बघून ठेवला.
घरापासून शाळा चालत १०-१५ मिनिटांच्या अंतरावर होती. पहिल्या दिवशी शाळेत गेले आणि ५वी ब च्या वर्गात जाऊन बसले. बहुतेक प्रार्थना वगैरे झाल्यावर एक पाटणे नावाची मुलगी मला शोधत आली. ती मला म्हणाली की, 'अगं, आपला वर्ग दुसरीकडे आहे.' आणि मला माझ्या वर्गात घेऊन गेली. आम्ही एकमेकींना नावे वगैरे विचारली. मी तिला पाटणे असं संबोधायला सुरु केले. तर तिने विचारले की तू आडनावाने का हाक मारत आहेस? नावानेच बोलाव. पण नेमकं अजूनही तिचं नाव काही मला आठवत नाहीये आणि फक्त आडनावच लक्षात आहे. तर वर्ग न सापडण्याची गंमत अशी होती की आमचा वर्ग शाळेच्या इमारतीच्या एका कोपऱ्यात होता. आणि त्याला बाहेरून एक मोठे दार होते. त्यातून आत गेले की समोर मुख्याध्यापकांचे कार्यालय आणि डावीकडे आमचा वर्ग अशी रचना होती. त्यामुळे आदल्या दिवशी जेव्हा शाळा बघायला गेलो तेव्हा बाहेरचे दार बंद असल्याने आत वर्ग आहे हे लक्षातच आले नव्हते.
शाळा सुरु झाली. नवीन ओळखी होऊ लागल्या. फारसे कोणी आठवत नाही. ३-४ जणीच आठवतात. वर्गातलीच एक मुस्लिम मैत्रीण घराजवळ राहत होती. तिच्या घरी गेलेले तसेच खेळलेले आठवते. अजून एक वर्गमैत्रिण होती. तिचं घर शाळेच्या वाटेवर होतं. तिची आठवण म्हणजे तिला 'र' म्हणता यायचा नाही. ती 'र' ऐवजी 'ळ' म्हणायची. तिच्या वडलांचे नाव हंबीरराव होते. तर ती हंबीळळाव म्हणायची. आणि बहुतेक तिचीच लहान बहीण होती तिला 'ळ' म्हणता यायचा नाही तर ती 'ळ' ऐवजी 'र' म्हणायची.
ती मुस्लिम मैत्रीण ज्या घरात राहत होती त्याच्या अगदी शेजारी एक दलदल होती. म्हणजे एक बऱ्यापैकी मोठा खड्डा आणि त्यात कायस्वरूपी पाणी साठलेले असे आणि त्या पाण्यावर शेवाळ तयार झालेले हते. तेव्हा कोणी तरी सांगितले होते की त्याच्यात चुकून पाय जरी गेला तर आपण कायमचे आत जाणार. एक प्रकारची भीतीच वाटायची. अशीच एक दलदल शाळेच्या जवळ पण होती बहुतेक. अजून एक आठवण म्हणजे शाळेच्या जवळ काही धोत्र्याच्या झाडांसारखी झाडे होती. त्या झाडांवर विशिष्ट प्रकारचे किडे दिसायचे. आम्ही त्यांना काचीकिडे म्हणायचो. ते किडे खूप रंगीबेरंगी आणि चमकणारे असायचे. आम्ही त्यांना पकडून काड्याच्या पेटीत ठेवायचो.
५ वीत असताना मराठीच्या पुस्तकात एक धडा होता. एक कोणी तरी होते त्यांना विविध आकाराचे दगड गोळा करायची आवड होती. त्यांच्या संग्रहाचे फोटो पुस्तकात दिले होते. त्यात एका दगडाचा आकार माणसाच्या चेहऱ्यासारखा होता. हा धडा शिकल्यावर वेगवेगळ्या आकाराचे दगड गोळा करायचा नाद लागला. पण अवतीभवती असे काय वेगळे दगड मिळणार ना! थोडे वेगळे दिसणारे, काही गारगोटीचे असे बरेच दगड गोळा केले होते. आणि आमची गच्ची होती तिथे माझा हा संग्रह ठेवला होता. एकदा दादीमाँ आमच्या घराच्या राऊंडवर आल्या आणि ते सगळे दगड गोळा करून फेकून द्यायला सांगितले.
शाळेच्या आठवणीत अजून एक आठवण म्हणजे आम्हाला गणिताला आणि बहुतेक शास्त्राला कित्येक दिवस शिक्षकच नव्हते. माझी सर्वात मोठी बहीण जी बारावीत होती त्यांच्या कॉलेजमध्ये संप असल्याने कॉलेज बंद होते. (ऐन बारावीत नवीन गावात कोणी मैत्रिणी नसताना आणि कॉलेज बंद असताना तिने कसा अभ्यास केला काय माहीत.) तर तिने मला माझं पाचवीचं गणित शिकवलं होतं. आम्हाला NCERT ची पुस्तके होती. म्हणजे अभ्यास पण जास्त होता. तरी ताईने इतकं छान शिकवलं की वार्षिक परीक्षेत मी वर्गात पहिली आले. (आणि माझ्या ताईला गणित विषय आवडत नाही आणि त्यामुळे जमत नाही असे वाटते.)
अजून एक शाळेची आठवण म्हणजे आमचे एक सर होते त्यांची शाळेत खूप दहशत होती. तर त्यांच्याबद्दल माझ्या मधल्या बहिणीची मैत्रीण सांगत होती की त्यांना ब्लू फिल्म पाहताना पकडलं होतं. त्यावेळची माझी ब्लू फिल्मबद्दलची कल्पना म्हणजे तो चित्रपट धुरकट निळ्या रंगात दिसतो आणि काही तरी वाईट असतो. असो.
अजून एक गंमत आठवते. त्या काळी फक्त संध्याकाळनंतरच TV वर प्रक्षेपण सुरु व्हायचे. चित्रहारमध्ये नवीन चित्रपटातील गाणी दाखवायचे. आमच्या घराच्या गच्चीतून काही अंतरावरच्या घरातील TV दिसायचा. TV दिसायचा म्हणजे रंगीत चित्र हलताना दिसायचे. आणि तो TV कसा दिसतो ते बघायला आम्ही घरातला TV सोडून गच्चीत जायचो. तेव्हा पाप की दुनिया नावाचा सनी देवल आणि नीलमचा एक पिक्चर होता त्यातलं ‘चोरी चोरी यूं जब हो' हे गाणं त्या TV वर पाहिलेले आठवते. कारण त्यात खूप रंगीत फिल्टर्सचा वापर केला होता.
आमचं पुण्याचं घर बांधून पूर्ण होत होतं आणि आमचा इस्लामपूरमधला मुक्काम आवरता येत होता. घराचं बांधकाम सुरु असताना बिल्डरची पैसे भरण्याची पत्रे येत असत. बाबांनी काही बोलून नाही दाखवला तरी तो ताण जाणवायचा. आमची आई नेहमी म्हणते की बाकी सगळी सोंगं करता येतात पण पैश्याचं सोंग करता येत नाही. असो.
असे आठवणींचे अनेक रंगीबेरंगी बिलोरी तुकडे गाठीशी बांधून १९८८ च्या मेमध्ये आम्ही आमचा मुक्काम कायस्वरूपी पुण्याला हलवला.
प्रतिक्रिया
25 Jan 2021 - 12:25 am | उपयोजक
छान आठवणी आहेत.त्या काळचे साधे जीवन भावले. :)
रच्याकने या शहराचे नाव इस्लामपूर कशावरुन पडले? इस्लाम धर्माशी या नावाचा काही संबंध आहे का?
25 Jan 2021 - 8:56 pm | मुक्त विहारि
परकीय आक्रमण, आपल्या बरोबर, त्यांची भाषा आणि धर्म घेऊन येतो.
डोंब आळीचे, डोंबिवली करणे, हे एक उदाहरण
25 Jan 2021 - 9:01 pm | मुक्त विहारि
ह्याचे मूळ नाव "धाराशिव" असावे, नक्की आठवत नाही.
पण, शिवसेना, आता ह्याचे नामकरण, "ईश्र्वर पूर" असे करणार आहे.
26 Jan 2021 - 11:49 am | मनस्विता
धाराशिव हे उस्मानाबादचे नाव आहे.
26 Jan 2021 - 11:52 am | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
26 Jan 2021 - 11:47 am | मनस्विता
उपयोजक,
जेव्हा इस्लामपूर मध्ये राहत होते तेव्हा नावाचा इतिहास जाणून घ्यायची उत्सुकता वाटली नाही. पण इस्लामपूरला ईश्वरपूर फार आधीपासून म्हणतात. कारण माझा इस्लामपूरमधील पत्ता लिहीताना मी ईश्वरपूर असे लिहीत असे.
26 Jan 2021 - 6:43 pm | उपयोजक
धन्स
25 Jan 2021 - 1:13 am | शशिकांत ओक
इस्लामपुरातील नुतन मराठी शाळेत इयत्ता चौथीपर्यंत लांब लचक पाटावर मांडी घालून बसावे लागे. दप्तर पाटाखाली सरकवून ठेवायला सोय होती. दशम पद्धती लागू झाली असल्याने इंच, फूट, यार्ड, मण, शेर, छटाक यांची सद्दी संपून मीटर आणि लिटरची मापे वजने यांचे तौलनिक तक्ते भिंतींवर नवेपणा राखून होते. आणे, पै यांची रोकडवहीतून हद्दपारी झाली होती. शंभर नवा किंवा नया पैसा म्हणजे नवा एक रुपया किराणा दुकानात, भाजीबाजारातील हिशोबात बस्तान बसवायला काळ लोटला तरी नवाच राहिला होता.
चौथीच्या स्कॉलरशिपसाठी नदाफ गुरूजींच्या शिकवणीला मी जात असे. पाचवीत गेलो अन स्टेट्स बदलले. हायस्कूलच्या बेंचवर आरूढ होऊन सायन्सच्या पीरियड्सला प्रयोगशाळेतील चंबू, नसराळी, रबरी नळ्या, मोरचूद, क्लोरिक अॅसिड अशा सॉलिड द्रव्य, पदार्थाचे दर्शन झाले. प्रत्येक तासाला नवे ' सर' येऊन कॅटलॉगमधून प्रत्येकाच्या नावाचा पुकारा दररोज का करतात ते मला कधीच समजले नाही. शिवाय माझी आई पाचवी ते सातवीच्या वर्गाला मराठी आणि हिंदी विषयाची शिक्षिका म्हणून होती. एक बरे होते ती माझ्या तुकडीला शिकवत नसे! हनुमानाच्या चेहर्याचे सदैव संघाच्या खाकी चड्डीत वावरणाऱ्या एका रागीटसरांकडे पहायला मला भिती वाटे व ते आईशी बोलायला लागले की माझ्याकडे पहात. तेंव्हा मी आईच्या हाताला धरून असे. त्या सीडी देशपांडे सरांनी माझ्या आईला इंग्रजी शिकवले व तिला मॅट्रिकला त्या विषयात पास व्हायला धीर दिला होता. नंतर एकदा आई पुण्यातील वृद्ध निवासात असताना इस्लामपूरच्या आठवणीत रमताना म्हणाली होती, 'अरे तू पोटात होतास तेंव्हा मी मॅट्रिकची परीक्षा देत होते!'
माझ्या इस्लामपुरच्या मित्रात विद्याधर कुलकर्णी, जयंत फडके, गुबगुबीत यष्टीचा दिलीप सोनटक्के, नाजुक प्रकृतीचा अशोक सव्वाशे, बुटका सुनील जोशी असे काही होते. कधी अभ्यासासाठी एकत्र तर कधी आईच्या मैत्रिणींबरोबर गेल्यावर झालेल्या ओळखीतून जवळीक वाढली. आम्ही संभाजी चौकात माळवदे यांच्या दुमजली घरात राहायला गेलो तसे तिथले मित्र राजेन्द्र तोडकर-माळी, त्याचे वडील शिराळा पेटा-तालुक्यापेक्षा लहान विभागाचे मुख्य थोडक्यात मामलेदाराच्या हुद्द्यावर होते. तो आईला 'पा' म्हणायचा. कदाचित ती सावत्र असल्याने तसे असेल असे आता वाटते. त्यांच्या काळ्या कौलारू घराला सोपा होता. पुढच्या काही खोल्यांमध्ये कंडक्टर, शाळा मास्तर वगैरे एकांडे लोक रूम शेयर करून राहात असत. त्यात एक कदम म्हणून होते, केसांचा फुगा, गोरटेले ते सारखे एकच एक चित्र काढून रंगवताना दिसत. राजेन्द्रचे मोठे भाऊ रेडिओ सिलोन लाऊन बसत. बुधवारी बिनाका गीत माला ऐकायला कान देऊन ऐकताना पाहून ‘पा’ त्याचा राग राग करत असत. त्याची ताई कवठेमहांकाळ अशा लांबलचक नावाच्या गावात नांदायला गेली म्हणजे परदेशी गेली असे मला तेंव्हा वाटत असे. त्यांच्या घरी चोरून जावे लागे. कारण वाटेत तापट मोगऱ्या नामक कुत्रा सदैव भुंकायला तत्पर असे. त्याच्यामुळे इंजेक्शन घ्यायला लागलेले महाभाग असल्याचे ऐकून आम्ही तर काय टरकून असायचो. काही काळानंतर तो माझ्याकडे पाहून पुच्छ हालवायला लागला नंतर तर आमच्या इशाऱ्यानिशी तो इतरांवर भुंकायला जायला लागला. आधी आम्ही गांधी चौकातून पंड्या चौकाकडे जाणाऱ्या वाटेवर खूप उंच व डौलदार लिंबाच्या झाडापाशी असलेल्या तिमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर राहात असू. रामनामे यांच्या घराची इमारत तिथून समोर दिसे. त्या ठिकाणी शेजारच्या तिमजली इमारतीत शहा म्हणून सधन कुटुंब राहात होते. गोर्यापान गुबगुबीत अंगकाठीच्या गुजराथी पद्धतीने साडीचा पदर घेतलेल्या भाभी त्यावयात मला तेंव्हा फार आवडत. मात्र त्यांच्या घरी कोणी एक नातलग येत त्यांच्यापैकी एका समजत्या वयाच्या मुलाला चड्डी न घालायचे वेड होते. वर फक्त सदरा आणि हातात बैलगाडीवानांच्या हाती असलेला चाबुक या आवेशात तो सदैव असे! तो रस्त्यावर उतरून हातातला चाबूक उगारून जाणाऱ्या येणाऱ्यांची तारांबळ उडवायचा! मोठे मोठे लोकही त्याला टरकून रस्ता बदलून जात असत. मोठ्याने काही बाही बोलत तो रस्त्यावर चांगलाच उच्छाद मांडत असे. मला आमच्या गॅलरीतून ती पहायला मौज वाटे.
राजेन्द्र माळी शिवाय मला तिथे बाबू, रामू हे शेजारच्या मठात राहणारे सवंगडी झाले. विश्वनाथ बोंगाळे आणि त्यांच्या घरातील सदस्यांनी माझ्या भाषा ज्ञानात शिव्यांची भर घातली. शारिरीक अवयवांना कसे रंगदार नातेसंबंध द्यावेत, त्याचे वस्तुपाठ ते नित्य नियमाने देत. व्यवसाय शिंप्याचा म्हणून कदाचित तोंडाची कैची कराकरा चालवून ते सर्व कुटुंबिय घरगुती समस्या रस्त्यावर येऊन भांडत. शिवाय सार्वजनिक नळ त्यांच्या घरासमोर असल्याने घागरीतून पाणी आणि मुखातून शिव्या हे परिचित दृश्य अजूनही डोळ्यासमोर येते.
त्या बालपणात माझे वडील भाड्याची सायकल घेऊन हँडलला छोट्यामुलांची सीट लावून फिरायला नेत. पहिली बारी लताची मग माझी असे ठरलेले. मला नंतर फिरवलेले तरी चाले कारण मला ते पेठनाक्यापर्यंत लांबवर घेऊन जायचे. वाटेत त्यांच्या ओळखीचे कोणी भेटले की मग माझा फेरफटका तिथेच संपायचा. इस्लामपुरात त्यावेळी दोन थेटरे होती. पैकी मोहन टॉकीज माझ्या वडिलांचेच होते पण तिथे कोर्ट केसमुळे आता आम्हाला जायची शक्यता नव्हती. पण जयहिन्द टॉकीजमधे बाल्कनीत बसून राजतिलक, तूफान और दिया, सुवर्णसुंदरी असे सिनेमे पाहिल्याचे आठवते. सिनेमा चालू व्हायच्या आधी विविध रेकॉर्ड्स लावायची प्रथा असल्याने छोटागंधर्वांचे ‘दिलरुबा मधुर हा... जिवाचा’ हे गाणे ऐकून ऐकून कान किटायचे. नंतर फिल्मडिव्हीजनची न्यूजची रिळे मग सिनेमा चालू होई. मध्यंतर तीन वेळा होई. कारण मशीनवरील एक स्पूल संपले की दुसरे चढवून होई तोवर वेळ जात असे. शिवाय जुनी फिल्म असायची तेंव्हा तुटली की ती जोडायला नेलपॉलिश सारख्या वासाचे सोल्यूशन लावून जोडेपर्यंत पिटातील पब्लिकच्या कर्कश्य शिट्ट्यारूपी शिव्यातील नाराजी झेलायला लागे. पुढे बँड व मागे ढकलगाडीला दोन्ही बाजूला चालू सिनेमाचे नाव, कलाकार, सायं साडेसहा व रात्रौ साडेनऊ असे खेळाच्या वेळा वगैरे दर्शवणारे बोर्ड वाचत वाचत रहदारीचे रंजनही होत असे. क्वचित प्रसंगी काही नाच करणारे ही असत. त्या सिनेपाट्या रंगवायचे चाललेले काम मी मोहनटॉकीजच्या आवारात आल्यापासून पहात आलो होतो. त्यावेळचे पेंटर मगदूम व तांबोळी आर्टस वाले कलाकार म्हणजे मला दैवत वाटायचे. झाशी की राऩी व गजगौरी सिनेमे जोरात चालले असावेत कारण त्यांच्या जाहिरातीसाठी बनवलेल्या ढाली व तलवारी आमच्याकडे बरेच बर्षे पडून होत्या. माझा एक विजय नामक चुलत भाऊ होता त्याच्यासाठी आमच्या कडे तेंव्हा क्रिकेटच्या स्टंपा, बॉल वगैरे साहित्य हाताळायला मिळे. आमच्या घराच्या समोर सबनीस फोटो स्टूडिओ होता. त्याचे मालक आमच्याकडे फोटोसेशन करायला येत. ते ‘विच्छा माझी’ फेम वसंत सबनिस त्यांचे भाऊ होते असे नंतर एकदा वडिलांनी आवर्जून सांगितले होते. तसेच पंडित भीमसेन जोशी इस्लामपुरातील चव्हाण सायकल मार्टमधून भाड्याने सायकल घेऊन फिरताना वडिलांनी कोणाकोणाला दाखवले असत. क्रिकेटर मधु गुप्तेचे वडील मेडिकल रेप असावेत कारण ते टाय बांधलेले एकमेव पाहुणे कधी कधी ‘जन्याकडे’ म्हणजेच आमच्याघरी यायचे. इस्लामपुरला पाण्याचे दुर्भिक्ष म्हणून लाकडी गाड्यातून घागरी भरून विकायचा धंदा करणारे भिस्ती तेंव्हा असत. मुडीसचा चहा ढकलगाडीतून नेताना मजा वाटे. आमच्याकडे खूप फोटो व मोठा अलब्म होता. पुढे एका पोस्टींग नंतर काही लाकडीपेट्यांना वाळवी लागल्याने त्यातील सामान न उघडता त्याला रॉकेल घालून आग लावून द्यायला लागली त्या जळितात ते सर्व फोटो नष्ट झाले. असो.
डॉ. बाळासाहेब वैद्य, स्वामींच्या सानिध्यामुळे आमच्याकडे कारने ते येत. त्याचे मला फार अप्रूप वाटे. शिवाय डॉ. वसंतराव चिटणीस म्हणून आणखी एक दादांचे वल्ली मित्र होते. पायात सपाता घालून चिटणीस वहिनी अंड्यांच्या विविध रेसीपी बनवायच्या. त्याचा शंकर नामक कंपौंडर हातात पिशवी घेऊन मटन आणणार, मग रस्सा, खीमा पोळ्यावर ताव मारताना, नळी कशी चोखायची याचे प्रात्यक्षिक करून घेत मी झणझणीत मेनू चाखायचो. वडील डॉक्टरांबरोबर सिगरेटचे कश घेत तेंव्हा आईच्या चेहऱ्यावर लटका राग असे. या डॉक्टरांची लफडी होती हे मला त्या वयात माहित होते. एक मोलकरीण तर एक मुसलमानबाई फी न देऊ शकल्याने जवळीक साधून होती. ज्या जयवंत घराण्यातील शोभना समर्थ, नलिनी, नुतन, तनुजा अशा सौंदर्यवान मुली नातलग अशा चिटणीसवहिनी ते सर्व कर्म म्हणून डोक्याला हात लावून पहात असत. त्यांचे पंड्याचौकातील घर असे मजेशीर होते की फक्त 12 फुटाच्या रुंदीच्या बांधकामात तीन लाकडी मजले पत्याच्या बंगल्या प्रमाणे वाटत. शिवाय दोन उंच मजल्याला जोडणारा दहा फुटाच्या अंतरासाठी चिंचोळा अरुंद पूल होता. अनेकांना तो पार करायला जरा दडपण यायचे. मी लहान असूनही त्यावरून पटकन जाई याचे कौतुक डॉ. चिटणिसांना असे म्हणतात. त्यांच्याकडे एक मॉरिस टाईप पिटुकली कार होती. डॉक्टर एक तर दवाखान्यात असत नाहीतर या कारखाली झोपून काहीतरी दुरुस्ती करताना अनेकदा दिसत. त्या गाडीतून सर्वांना फिरवून आणायची त्यांना भारी हौस. ‘जन्या, मंगलाला घेऊन ऐतवड्याला पेशंटला बघायला घेऊन जाऊ’. म्हणून आम्ही गेलो व परतताना नेमकी गाडी बंद पडली. बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी काहीतरी लटपटी करून ती चालू करून घरी सोडले तेंव्हापासून आईने त्यांच्या कारकडे पहाणे देखील सोडले असावे. आणखी एक डॉक्टर होते फडके मामा. ते होते नाटकप्रेमी. त्यांनी बसवलेल्या कुलवधू नाटकात आईने काम केले होते. खेळ आमच्या मोहनटॉकीजमधे झाला होता. तेंव्हा किंवा असेच केंव्हातरी एकदा मला उभ्या माईकच्या उंची पर्यंत बखोट्ला पकडून लटकलेल्या अवस्थेत मी गीतेचा 12वा अध्याय पाठ म्हणून शाबासकी मिळवली होती.
एका दिलीप मधूकर पंडीतराव नावाच्या मित्रामुळे मला क्रिकेटची बॅट हाती धरायला शिकायला मिळाले. ओरडून टाईम प्लीज असे म्हणायचे म्हणजे क्रिकेट आले असा तेंव्हा खाक्या होता. संभाजी चौकात पाण्याच्याधारेने आट्यापाट्या, खोखो, हुतूतूचे अंगण ठरवले जायचे. मग मोठ्यामुलांचा खेळ रंगायचा. सर्कस आलेल्या शेतात जुन्या एस्टीस्टँडच्यावाटेवर वर्दळ माजे. शनिमंदिर आणि अन्य तलावातील शेवाळे साचलेले पाणी व त्यात आडव्याहाताने ठिकऱ्यामुळे वर्तुळे काढायचा खेळ रंगत असे. कंचे, भोवरे, सिगरेटची वापरलेली पाकिटे, काड्यच्यापेट्याची वरची चित्रे वट्ट्याच्या चपट्यादगडाने किंवा फरशीने आखलेल्या चौकोना बाहेर उडवून चवड जिंकायची म्हणजे तेंव्हाचे भूषण असे. असा गठ्ठा बाळगून असणे हे बालश्रीमंतीचे लक्षण होते. खोखोत जरा चकवायचे कसब होते. बाकी खेळात मी मध्यम वकूबाचा खेळाडू होतो. पत्त्याच्या खेळातील इशारे, कुठे डोके खाजव, तर कधी एकदम खोकला काढ, डोळा मार दुसऱ्याच्या हातातील पानात डोकाव, कॅरमच्या बोर्डावरील सोंगट्या डोळा चुकवून मुद्दाम हालवून पॉकेटपाशी सरकव, अशी हातचलाखी, फाजीलपणे मला भावले नाहीत.
सायकलची रीम व त्यावर रबरी धाव असलेल्या चाकाला हाताने थपडा देत पळवायला मजा वाटे. चकरा मारत मारत न कळत गल्ली बोळात काय काय चालते याची उजळणी होत असे. घोंगडी बनवताना ते लोकरीचे धागे चिंचोक्याच्या खळीत बुडवलेले, मोठ्या ब्रशने ती खळ लांबवर ताणून लावलेल्या धाग्याला लावताना येणाऱ्या उग्र वासाचा गंध, कांडपमिशिनीवर उडणारा मिरच्यांचा खाट, ऐरणीवर लाल भडक लोखंडाचा तुकडा हातोड्यांचा मार खात पातळ होता होता लागलेल्या घामाच्या धारा. कल्हई लावताना एका हाताने चामड्याचा भाता हाताने दाबून दुसर्या बाजूला तापलेल्या भांड्याला नवसागराची भुकटी टाकून केलेल्या धुरात कथीलाच्याकाडीचे टोक विरघळवून ते हलक्या हाताने फडक्याने पुर्ण भांडेभर पसरवून पितळेच्या भांड्याला पाण्यात बुचकळवून चुर्र आवाज काढून शुभ्र तकाकी आणलेली किमया, बैलांना काढण्या घालून ते खाली पाडून चारी पाय एकत्र बांधून जुन्या नालांना खरवडून काढून आधीच्या खिळ्यांना पकडीने काढून नवे कोरे नाल खुरांना ठोकून झाल्यावर धडपडत उभे होताना व नंतर नवे बूट पावलावर चढवले की नवेपणा आपल्याला जसा जाणवतो. कदाचित तसाच आनंद त्यांना ही वाटत असेल काय़? ही बालमनावर ठसलेली चित्रे उराशी बाळगून मी 1959 सालच्या मे महिन्यात इस्लामपूर सोडून माधवनगरशी जवळीक साधली.
(रम्य ते बालपण या लेखातून उद्धृत)
25 Jan 2021 - 9:42 am | चौकटराजा
मिपावर मला पहिल्यापासून खटकलेली गोष्ट अशी की इथे लेख व प्रतिसाद म्हणजे अभिप्राय असा खाक्या रूढ आहे ! तो काहीसा असावयास हरकत नाही पण यापेक्षा अधिक प्रगल्भ व माहितीपूर्ण फॉरमॅट म्हणजे मूळ मजकुरात भर टाकणारी जोड पुस्ती . या अर्थाने इथे शशिकांत ओक यांच्या प्रतीसादाचे मी स्वागत करतो.
26 Jan 2021 - 7:19 pm | अनुस्वार
अगदीच सहमत.
26 Jan 2021 - 7:24 pm | तुषार काळभोर
प्रतिसाद हे लेखात भर पाडणारे (सुद्धा) असावेत.
26 Jan 2021 - 11:51 am | मनस्विता
तुम्ही राहत होता तो भाग अगदी मध्यवर्ती भागातील असावा. त्यामुळे मला नावाने देखील संदर्भ आठवत नाहीत.
26 Jan 2021 - 4:15 pm | प्राची अश्विनी
ओक काकांचा प्रतिसाद सुद्धा सुरेख.
25 Jan 2021 - 9:28 am | खेडूत
लेख आवडला,
हा बहुतेक एकोंनव्वद सालचा काळ असेल. चारपाच वर्षे आधी आम्ही शेजारच्या तालुक्यातल्या शाळेत होतो, त्यामुळे ओळखीचा वाटला.
ओक काकांचं 1958 काळातलं स्मरणरंजन अजूनच आवडलं.
काकाजी, तुम्ही या आठवणी अधिक सुसूत्र पणे म्हणजे काल क्रमानुसार लिहिल्या तर खूप छान होईल. विशिष्ट कारण किंवा संदर्भ नसेल तर कुणी लिहीत बसत नाही.
ते जळालेले फोटो हा खजिना संपल्याचे वाईट वाटते.
पण आठवणी तर लिहून ठेवू शकाल.
25 Jan 2021 - 10:36 am | शशिकांत ओक
रम्य ते बालपण म्हणून लेखन केले आहे. ते माझ्या हवाईदलातील आठवणी या लेखमालेतील भाग आहे.
पण ते हवाईदलात जायच्या आधीचे असल्याने वर्गातील कान पकडून बाहेर उभे राहिलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे वाटते.
हा भाग पुढे माधवनगरच्या सख्यासवंगड्यांच्या सोबतच्या आठवणीत जास्त रमतो.
26 Jan 2021 - 11:53 am | मनस्विता
खेडूत,
तुमच्या नावावरून माझा नवरा मला खेडे गावातील म्हणून चिडवतो ते आठवले. कारण पुण्यात राहायला येईपर्यंत आम्ही लहान गावात राहत होतो.
26 Jan 2021 - 7:04 pm | तुषार काळभोर
कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा चाळीस दिवसांचा संप १९९८-९९ मध्ये झाला होता.
6 Feb 2021 - 4:44 pm | मनस्विता
१९८७-८८ चा काळ आहे.
25 Jan 2021 - 4:10 pm | साबु
कुठे आहे?
26 Jan 2021 - 11:54 am | मनस्विता
राजगुरुनगरचा लेख गणेश लेखमालेत प्रकाशित झाला होता.
https://misalpav.com/node/47361
26 Jan 2021 - 4:14 pm | प्राची अश्विनी
आठवणी आवडल्या. तो दगडांचा धडा बहुतेक अनिल अवचटांचा होता.
6 Feb 2021 - 4:46 pm | मनस्विता
यांचा आहे.
बालभारतीच्या साईटवर त्यांनी आतापर्यंत आधीची मराठीची पुस्तके अपलोड केली आहेत.
26 Jan 2021 - 4:51 pm | चौथा कोनाडा
सुंदर लिहिले आहे. माझ्या ही गावच्या आठवणी जाग्या झाल्या !
ते दशक जादुई होते हेच खरे !
27 Jan 2021 - 6:38 am | चौकस२१२
यावरून त्या भागावर बेतलेल्या "प्रकाश नारायण संत " यांचया "लंपन" या मुलाच्या "रम्य बालपणावर " बेतलेल्या कादंबऱ्या आठवल्या
4 Feb 2021 - 2:42 pm | असा मी असामी
मस्त आहे पुस्तक
6 Feb 2021 - 4:47 pm | मनस्विता
हा प्रतिसाद वाचून मी कालच लायब्ररीतून त्यांचे पंखा हे पुस्तक आणले आहे.
31 Jan 2021 - 6:13 pm | सिरुसेरि
छान आठवणी .
6 Feb 2021 - 4:48 pm | मनस्विता
धन्यवाद!